अजूनकाही
आज डॉ. श्रीराम लागू यांचा दुसरा स्मृतिदिन. ते निरीश्वरवादी, बुद्धिजीवी होते; तर्काने विचार करणारे होते, तसेच गांधीवादीसुद्धा होते. सामान्य माणसाला स्वतःच्या आयुष्यातील घटनांचे अर्थ लावायला नियती, दैव, नशीब यांसारख्या गोष्टींची गरज लागते. डॉक्टरांनी त्यांच्यापुरते ते अर्थ विज्ञानात शोधले. खरे म्हणजे डॉक्टर ‘अॅक्टिंग’मध्ये मोठे की, ‘अॅक्टिव्हिसम’मध्ये हा एका स्वतंत्र परिसंवादाचाच विषय ठरू शकेल. आपण समाजाचे देणे लागतो, ही जाणीव जरी बऱ्याच जणांना असली तरी फार थोड्या लोकांना त्या जाणीवेचे रूपांतर कृतीत करता येते. विशेषतः कलाक्षेत्रातील फार कमी नामवंतांना आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा किंवा त्यायोगे मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा समाजास करून देता आल्याचा दाखला आहे. डॉक्टरांनी हात घातलेल्या, पुढाकार घेतलेल्या असंख्य सामाजिक मुद्द्यांवरचे त्यांचे योगदान हा त्यांनी आपणा सगळ्यांसाठी घालून दिलेला वस्तुपाठ आहे.
साधारणपणे नटाला सामाजिक बांधिलकी असावी काय किंवा ती कितपत असावी, याबाबत बरेच प्रवाद आढळतात. त्यात नट जर डॉक्टरांसारखा ‘अॅथलिट फिलॉसॉफर’ असेल तर त्यांचे सामाजिक काम हे बऱ्याच लोकांसाठी डोकेदुखीसुद्धा होऊ शकते. या सगळ्या शक्यता असूनसुद्धा आणि त्यांचे परिणाम स्वतःच्या व्यवसायावर होण्याची खात्री असतानासुद्धा डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या कामात अग्रेसर राहिले. समाजाची भीड न बाळगता, तर्काला अनुसरून बोलायला जे धैर्य लागते, ते त्यांचा ठायी होते. ‘परमेश्वराला रिटायर करा’ असे सांगत त्यांनी देव नावाच्या संकल्पनेवरच प्रहार केला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
परमेश्वर व आत्मा या दोन्ही भव्य व सुंदर, पण तरीही कवी-कल्पनाच असाव्यात, यावर त्यांनी ठामपणे मते मांडली. तसेच अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम जवळजवळ फॅशनेबल झाल्याचीही जाणीव आपल्या सर्वांना करून दिली. आज तो लेख (खरं म्हणजे ती प्रस्तावना होती एका पुस्तकासाठी) प्रसिद्ध झाल्याच्या साधारपणे ३० वर्षांनंतरसुद्धा देवाधर्माबद्दलची अनाठायी आस्था ‘वाढता वाढता वाढे’ अशीच आहे. आजही आपल्याला एकीकडे माणसाच्या याच भोळेपणाचा फायदा घेणारी बरीच मंडळी दिसतात, तर दुसरीकडे मूळ निर्मूलनापेक्षा ‘मी देवाला कसा मानत नाही?’ याचाच प्रचार करणारी मंडळीसुद्धा.
डॉक्टरांच्या कुठल्याही कार्यास तात्त्विक विचारांची बैठक होती. तर्कावर मांडलेल्या अशा भूमिका, मग त्या निर्घृण हत्या केलेल्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात असोत की, विवेकवादी भूमिकेचा हट्ट असो, ते ठाम असत. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा नुसता शब्दच कठीण नाही तर तसे जगणे, हे त्याहून अधिक कठीण असावे. ‘परमेश्वर तुला सजा करेल’ म्हणून नीती शिकवणे याला त्यांचा मनापासून विरोध होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारलेला समाज हाच काय तो चिरंतर आहे आणि त्यासाठी बाकी कुठल्याही नीती-अनीतीच्या संकल्पना अस्तित्वात असू नयेत, असे त्यांना वाटत असे. डॉक्टरांना श्रद्धेची डोळस व अंध अशी वर्गवारीसुद्धा मंजूर नव्हती.
खरे म्हणजे डोळस श्रद्धा हा पळवाटीचाच प्रकार म्हणायला हवा. पिढ्यान्पिढ्या ज्या चालीरीती आपण पाळत आलोय आणि ज्याने कोणालाच हानी होत नाही, असा आपला समज आहे, त्यांना आपण बिनदिक्कत डोळस श्रद्धा म्हणून मोकळे होतो. तरुण वर्ग जेव्हा परीक्षेआधी देवळात जाताना दिसतो, तेव्हा याचाच प्रत्यय येतो. कुठलीही घटना विज्ञानाच्या चौकटीतून बघितल्यास ती स्पष्टपणे समजून घेता येऊ शकते, यावर डॉक्टरांचा पूर्ण विश्वास होता. तसेच नुसता विरोधाखातर विरोध करायचा म्हणून ते कुठली आढ्यताखोर भूमिका घेत नसत. नमस्कारास संस्काराचा भाग मानून त्याचा मोबदला मागण्यास किंवा तो न केल्यास काहीतरी अघटित घडेल, असे मानण्यास ते श्रद्धा म्हणत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
साधारणतः प्रत्येक पिढीचा स्वतः बद्दल आपला म्हणून एक समज असतो. आपण काबाडकष्ट करून, नव्हत्याचे होते करून, समाजातील बदल पचवून नव्या लोकांसाठी एक आदर्शवत व्यवस्था निर्माण केली आहे, असे सगळ्याच बुजुर्गांना वाटत असते. त्यातील बहुतेकांना, नव्या पिढीतील लोकांनी आपण केलेल्या कामाचे चीज केले नाही, अशीही एक भावना असते. याला कुठलीही पिढी अपवाद नसावी. पण डॉक्टरांसारखे फार कमी लोक असतील, ज्यांनी स्वतःच्या पिढीचे आत्मनिरीक्षण इतक्या तटस्थ केले असेल. त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांची पिढी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वतःतच मश्गुल राहिली. त्यांच्या लक्षात आले की, आपण नुसतेच रंगभूमीवर केलेल्या प्रायोगिकतेने आनंदी राहायला नको होते. ती प्रायोगिकता प्रेक्षकांपर्यंत किती पोचतीये, तो किती प्रगल्भ होतोय, याचेही मोजमाप करायला हवे होते. तसेच दैववादाचं तत्त्वज्ञान समाजास घातक आहे. ईश्वरवादाची, भोंदूबाजीची जळमटे लोकांच्या डोक्यातून काढून त्यात बुद्धिनिष्ठित विचारांनी बदल घडवून आणावयास हवा होता. असा बदल घडवून आणण्यात ते व त्यांची पिढी कमी पडली, यांचं त्यांना वैषम्य वाटत असे. एकूणच काय, तर समाजाची पातळी मग ती बौद्धिक असो वा सांस्कृतिक, ती वाढली पाहिजे आणि एक जबाबदार नागरिक या नात्याने तेही त्यांची जबाबदारी होती, असे समजत असत.
डॉक्टरांची प्रासंगिकता आज कलाक्षेत्रातील सेन्सॉर‘शाही’च्या अनुषंगाने प्रकर्षाने जाणवते. अर्थात डॉक्टर काही एकटेच नव्हते, जे कलाक्षेत्रातील सेन्सॉरशिपच्या विरोधात लढले. खरे म्हणजे सुरुवातीला आणीबाणीला त्यांचा पाठिंबा होता, पण इथेही त्यांची स्वतःचे परीक्षण करून गरज असल्यास मते बदलण्याची वृत्ती जाणवते. डॉक्टरांच्या काळात सेन्सॉरशिपच्या विरुद्ध लढल्याने किती कलाकारांचे किती नुकसान झाले असेल, हे आज कळणे कठीण आहे. एखाद्या कलाकारास नवीन काम मिळणे दुरापास्त झाले असेल किंवा त्याला आर्थिक नुकसान सोसावे लागले असेल. पण त्या सेन्सॉरशाहीने प्रेक्षकांचे, सामान्य जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे असे वाटते. कदाचित या सेन्सॉरशिपमुळे कलाकारांत, लेखकांत नवीन कलाकृती तयार करण्याची उमेदच निर्माण झाली नसेल.
तसेच एखाद्या कलाकृतीस नीतीमत्तेच्या चौकटीत न बसवता बघता येण्याची हिंमत हे त्या काळापासून प्रेक्षक म्हणून आपण हरवून बसलो आहोत, असे वाटते. आजच्या घडीला सिनेमा-नाटकांतल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी जनतेच्या भावना दुखावण्याचे प्रमाण वाढले आहे, हे खरे म्हणजे त्याचेच द्योतक होय. अर्थात हा विरोध किती खरा व किती बनावट हे सांगणे कठीण आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अगदी डॉक्टरांच्या जमान्यातसुद्धा ‘सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेले नाटक’ अशी जाहिरात असलेल्या नाटकाला वेगळाच भाव असे. डॉक्टरांनी या दुटप्पी भूमिकेची यथेच्छ चिरफाड मनापासून केली. पण ती करत असतानासुद्धा त्यात स्वतःची जवाबदारी ते विसरत नसत. या गोंधळाला ‘मी’ जबाबदार आहे, कारण हे सरकार ‘मी’ निवडून दिले आहे. त्यामुळे त्यातील सगळ्या यशापयशात माझा सहभाग आहे, हे ते अगदी ठामपणे मांडताना दिसले. त्यांचा लेखी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सुसंकृत समाज तयार करण्यापासूनच सुरू होते व समाज प्रबोधन हाच त्यावरचा ‘रामबाण’ उपाय आहे, असे ते मानत असत.
अशी लोकांची असंख्य ओझी या लमाणाने वाहिली, अगदी त्यांच्या टीकेची तमा न बाळगता वाहिली. आपण फक्त ‘वाहक’ यावर त्यांचा मनोमन विश्वास होता. त्यांनी ही ओझी जाताना आपल्या खांद्यावर ठेवलीयेत काय? ती वाहून नेण्यास आपण समर्थ आहोत काय? हाच काय तो मोठा प्रश्न आहे.
.................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
डॉ. श्रीराम लागू - ‘athlete philosopher’ असलेला कलावंत!
डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर : दोन दिग्गज, एक सामना
माझं बुद्धिप्रामाण्य - डॉ. श्रीराम लागू
.................................................................................................................................................................
लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.
salilsudhirjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment