अजूनकाही
यंदाच्या नाशिक येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनातही अपेक्षेप्रमाणे मानापमान आणि वादाचे प्रसंग घडले. त्यात शेवटच्या दिवशी ‘लोकसत्ता’चे संपादक आणि ‘रेनेसान्स स्टेट : दी अनरीटन स्टोरी ऑफ दी मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या इंग्लिश पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी महाराजांची बदनामी केल्याच्या आरोपावरून ‘संभाजी ब्रिगेड’च्या दोघा जणांनी बुक्काफेक केल्याची घटना घडली. ती अर्थातच निषेधार्ह होती. परंतु याचा अर्थ, वादाच्या केंद्रस्थानी असलेले कुबेर ज्या वातावरणाचा संस्कार, प्रभाव आणि पाठिंबा मिळवत अभिव्यक्तीतले आपले स्थान बळकट करते झाले, त्याची चिकित्सा होऊच नये असे नव्हे...
..................................................................................................................................................................
अधूनमधून काही कारण तयार होते, ‘लोकसत्ता’चे विद्यमान संपादक गिरीश कुबेर चर्चेत येतात. पण त्यांचे हे अधूनमधून येणे आकस्मात नसते, तर त्यात एक सातत्य आहे. ही एक बाब महत्त्वपूर्ण आहे, हेच आधी सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आहे.
गिरीश कुबेर यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यांचे नावाचे वजन आणि त्यांची उंची खूप मोठी आहे. गिरीश कुबेर काय म्हणतात, म्हणत आहेत, काय म्हणतील याकडे जवळपास सगळ्यांच वाचकांचे लक्ष असते. याचे नेमके कारण काय, हेसुद्धा आधी लक्षात घेतले पाहिजे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
महाराष्ट्रात हजारो मीडियाकर्मी आहेत, लेखक-साहित्यिक-संपादक-पत्रकार आहेत. त्या सगळ्यांपेक्षा गिरीश कुबेर यांच्याबद्दल अधिक का बोलावे लागते वा बोलले जाते? त्याचे गणित मराठी माध्यमे आणि त्यांचा घडणीचा इतिहास यात दडलेले आहे. या प्रक्रियेला सूत्र, इंगित वा गुपित न म्हणता, त्यात एक निश्चित असे गणित दडलेले आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
प्रस्थापित वृत्तपत्रांची पूर्वापार प्रतिष्ठा
‘इंडियन एक्स्प्रेस’ ग्रूप हा एक मोठा व्यावसायिक माध्यम ग्रूप आहे. भारतात ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या समूहांना त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक यशामुळे प्रतिष्ठा आणि वजन प्राप्त झाले. त्या दोघांची अपत्ये म्हणजे, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ ही दोन मराठीमधील दैनिके. या दोन दैनिकांची छपाई अर्थातच मुंबईतून होत असे. प्रकाशनदेखील तिथूनच. मुंबईच्या एकदम ‘हॉट प्रॉपर्टी एरिया’त यांच्या उत्तुंग इमारती आहेत. मुंबईची लोकसंख्या पाहता यांचा खप त्याच ठिकाणी जास्त असणे क्रमप्राप्त आहे.
वाचकांची ओळख आणि मध्यमवर्गाचे पर्यावरण
या दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग नेमका कोणता, हा एक प्रश्न आहे. पण त्याचे उत्तर सरळ नाही. कारण दर दहा वर्षांनी शिकलेल्या आणि वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते. पण या दैनिकांचा जन्म झाला, त्यानंतर पुढची किमान ३० वर्षं यांचा वाचक हा मुख्यतः मुंबईतील उच्चवर्णीय मध्यम, वरिष्ठ मध्यमवर्ग होता. वाचणारा, बोलणारा, चर्चा करणारा आणि जमेल तितकी चळवळ करणारा हाच वर्ग होता. जवळपास सगळे एकाच वर्णीय, वर्गीय समूहातील असल्यामुळे त्यांना एकमेकांना भेटण्यात, चांगले म्हणण्यात किंवा चुका दाखवण्यात काही वावगे वाटत नव्हते. हा समूह ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांचा हमखास हक्काचा वाचक बनला. आणि ही दैनिके या वर्गाची मुखपत्रे बनली. त्या काळात अस्तित्वात असलेल्या शिक्षण संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यावर युरोपीय छाप होती आणि त्या ठिकाणी हा वर्ग शिकायला, शिकवायला, राबायला, वावरायला होता. त्यामुळे इकडूनतिकडून सगळीकडून एकमेकांना सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळू देण्याचा तो काळ आणि ते वातावरण होते.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
तत्कालीन उच्चवर्णीय मध्यम, वरिष्ठ मध्यम समूह इतर तीन भागांत सामावलेला होता. एक भाग आहे काँग्रेसमधला- ज्यात स्वातंत्र्य चळवळ, गांधी नेहरू, जागतिक राष्ट्रीय चळवळी यांचे आकर्षण, इच्छा आणि तत्त्वे मान्य होती. दुसरा भाग होता कम्युनिस्ट पक्ष, संघटना युनियन्स, सिनेमा, नाटके इत्यादीमध्ये. तिसरा भाग होता समाजवादी प्रवाहाचा- ज्यांच्यावर गांधी आणि लोहियांचा संमिश्र प्रभाव होता. गांधी मात्र सगळ्यात कॉमन होते. पण या तीन भागांतील या ‘कॉमन मिनिमम’ समूहाला एकमेकांना सांभाळून घेण्याची, साथ देण्याची सांस्कृतिक गरज होती. त्यांचे प्रश्न, राहणीमान जवळपास समान होते. युरोप-अमेरिका, कोकण, मुंबई, हे त्यांचे आकर्षण होते. जवळपास सगळे प्रकाशक मुंबईत होते.
मध्यवर्गीय इच्छा-आकांक्षांचे पाठिराखे
या सगळ्यांची दुसरी आणि तिसरी पिढी अधिक इंग्रजी शिक्षण घेऊन अधिक वेगवगेळ्या वाटेने घरांतून, इच्छांतून, पद्धतींतून बाहेर पडली. संकुचितपणाला प्रतिष्ठा हा एक संस्कार घरांतून पेरला जाऊ लागला. त्याला साहजिकच त्यांच्या उच्च असण्याच्या जाणिवांचा आधार होता. म्हणूनच सर्व माध्यमे आणि अभिव्यक्ती यामध्ये याच समूहाच्या इच्छा आवडी, जाणिवा, गरजा यांचीच चित्रे येऊ लागली. त्यामुळे वाढत गेलेला प्रेक्षक वाचक वर्ग हा त्यांच्याच अनुसरणातून आकार घेत गेला. पुरस्कार, सत्कार, हळहळ, तळमळ, कौतुक, मदत, पाठिंबा, या गोष्टी याच समूहातील दुसऱ्या- तिसऱ्या पिढीतील मोठ्या वर्तुळातच तळ ठोकून राहिल्या.
अर्थात हे सर्व संक्षिप्त प्रातिनिधिक स्वरूपात मांडले आहे. अधिक तपशील आणि घटना यासाठी स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल. पण त्याच समूहातील सर्वांसाठी ज्यांनी आपली बौद्धिक श्रम, कष्ट, संकल्पना उपयोगात आणायचे धोरण घेतले, त्या सर्वांपैकी एक गिरीश कुबेर आहेत. त्यांनी पत्रकारिता हा व्यवसाय निवडला. पण त्यासाठी त्यांनी अन्य जुन्या पिढीतील पत्रकारासारखे देशसेवा, राजकीय चळवळ असे काही ठरवलेले नाही. पण म्हणून त्यांना ‘राजकीय भूमिका’ नाहीच असे नाही. त्याला ते थेट राजकीय म्हणत नाहीत. इतकंच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
गिरीश कुबेर जर समजा ‘लोकसत्ता’ दैनिकात संपादक नसते, तर कुठे नोकरीला असते? तेव्हा त्यांना आजच्या एवढा ‘फॉलोअर’ मिळाला असता का?
त्या उच्चवर्णीय-उच्चवर्गीय समूहाचे दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील सगळ्यांचे एकूण भारत, एकूण महाराष्ट्र, एकूण संस्कृती, एकूण समाज रचना इत्यादींबद्दल काय काय मते व विचार आहेत, हे पाहायला हवे. समजा, या सर्व इंग्रजी पाया असलेल्या मराठी अहंकारी स्वभाव नि बौद्धिकता असणाऱ्या लोकांची संख्या एक लाख आहे, त्यापैकी किती जणांना महाराष्ट्राची जडणघडण माहीत आहे? त्यांच्यापैकी किती जण स्वतःहून अभ्यास, चिंतन-मनन करतात? समाज आणि संस्कृती यांचा कसलाच अभ्यास नसेल, तर या प्रचंड मोठ्या समूहाचे मानसिक संवर्धन कसे होणार, याची कुणालाही फिकीर नसते. पण मग यांचा जो सामाजिक- सांस्कृतिक वावर अलीकडच्या ३० वर्षांत कोणत्या गोष्टीत वाढलेला आहे? तो कोणी कसा वाढवला? हेही समजून घ्यावे लागते.
चलाखीने राबलेला मिक्स अजेंडा
दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतील सर्व उच्चवर्णीय-वर्गीय व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाना एकच एक साचा आयता हातात देण्यात आलेला आहे. त्या साच्यात एकाच वेळी शिवाजी राजाला ‘हिंदू’ म्हणायचे, त्यांचे राज्य म्हणजे ‘स्वराज्य’ म्हणायचे आणि त्याच वेळी त्याला ‘शूद्र’ आणि ‘कमअस्सल’ही म्हणायचे. असा मिक्स अजेंडा तयार कोणी केला? शोध-संशोधन हाच जर अभ्यास आणि अभिव्यक्ती याचा प्राण आणि आधार असेल तर तमाम मीडियाकर्मी आणि संपादक याबाबत संशोधन का करत नाहीत? एक मोठा समूह शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास न करता तुच्छतेची भावना बाळगतो, उगाळतो, पसरवतो. तो ते नेमके कशासाठी करतो? हा समूह गांधींच्या निर्जीव छायाचित्रांवर गोळ्या घालण्याचेसुद्धा समर्थन का करतो? हा संपूर्ण समूह आसपास घडणाऱ्या प्रत्येक हिंसाचाराचे समर्थन का करतो? अशा सर्व राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घटनांचा शोध मीडिया म्हणून घ्यायचा आहे की नाही? असा जर प्रश्न गिरीश कुबेरांना विचारला तर त्यांचे उत्तर काय असेल? याचा अंदाज प्रत्येकाने बांधायचा आहे.
गिरीश कुबेर हे तिसऱ्या पिढीतील समूहाचे माध्यम प्रतिनिधी आहेत. त्यांच्या हयातीत त्यांना छापील-टीव्ही-इंटरनेट-डिजिटल असा सर्व मीडिया उपलब्ध झालेला आहे. त्यांच्या हयातीत बाकी वर्तमानपत्रांनी आपापली विश्वसनीयता पूर्ण घालवलेली आहे. आपल्या दैनिकाची आठ-दहा-पाने कोणत्या मजकुराने भरायची यासाठी ही दैनिके स्थानिक उठवळ नेत्यांवर अवलंबून आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची मालकी आणि स्वरूप बदलले. त्यामुळे त्यातल्या त्यात चांगला वाचनीय मजकूर आणि त्यास जागा देणारे वर्तमानपत्र म्हणून नवीन आणि जुना वाचक हा ‘लोकसत्ता’ पसंत करतो आहे. राजकीय आणि सांस्कृतिक विषयात जास्त मजकूर मिळू शकणारे हे वर्तमानपत्र आहे. अशा या अभावग्रस्त माध्यमकाळात गिरीश कुबेर हे यशस्वी आणि प्रातिनिधिक संपादक ठरतात. त्यांचे वलयांकित असणे यातून आलेले आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
गिरीश कुबेर टाटासमूहाबद्दल अभ्यास पूर्ण लेखन करतात, पण अंबानीबद्दल रिपोर्टिंग अभावानेच ‘लोकसत्ता’त दिसते. अमेरिका आणि युरोपमधील संसदेत काय काय अचंबित घडते, हे मोठ्या रसभरीत वर्णने करून आणि त्यात लज्जत वाढवत ते सांगतात, पण भारताच्या संसदेत काय-काय घडावे, घडते हे मात्र सांगत नाहीत. एका मजबूत पण, एककल्ली मनोवृत्ती असलेल्याच्या हातात देशाची सूत्रे असणे किती अपरिहार्य आहे, हे बिनदिक्कत सांगणारे कुबेर नंतर मात्र हळूच ती भाषा झाकून, तेच सत्य इतर मार्गांनी वदवून घेतात. म्हणूनही त्यांच्या लेखनातील दिलेले तपशील, उदाहरणे आणि न उल्लेख केलेली मते याकडे वाचकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. पण वाचक फक्त कौतुकाने अचंबित होतात. गिरीश कुबेर हे पत्रकार म्हणून जगभर फिरतात आणि जगभर त्यांची चांगली ओळख आहे, नाव आहे; जगातील मीडियाबद्दल त्यांचा अभ्यासही आहे.
पत्रकारितेतील जी तत्त्वे जगभर गौरवली जातात, त्याबद्दल गिरीश कुबेर काही मतभेद व्यक्त करू शकत नाहीत. पण व्यक्तिगत/सार्वजनिक जीवनात कोणती तत्त्वे अधिक सर्वसमावेशक पोषक ठरतील, याकडे गिरीश कुबेर कसे पाहतात, काय ठरवतात? त्याबद्दल त्यांची काय मते, विचार आहेत, याची चिकित्सा ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी आणि त्यांची सर्व पुस्तके वाचलेल्या वाचकांनी करायची आहे.
मुद्दा आणि आग्रह इतकाच की, गिरीश कुबेर यांची वैचारिक-सांस्कृतिक-राजकीय चिकित्सा होणे नितांत गरजेचे आहे.
हा मूळ लेख ‘अभावग्रस्त माध्यमकाळातल्या कुबेरांचे इंगित’ या नावानं ‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ डिसेंबर २०२१च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
.................................................................................................................................................................
सुनील बडुरकर
badurkarsunil@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment