अजूनकाही
काल, सोमवार, १३ डिसेंबर २०२१चा पूर्ण दिवस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघातील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी खर्च केला. त्यांनी गंगेत घेतलेली डुबकी आणि सायंकाळी गंगा आरतीला लावलेली उपस्थिती, हे कोट्यवधी भारतीयांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दिवसभर पाहिले.
काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा हा नवा चेहरामोहरा निश्चितच बघायला गेले पाहिजे, असे मला वाटून गेले. आपल्या मतदारसंघासाठी मोदींनी हे फार मोठे योगदान दिले आहे, यात शंका नाही. पण त्याच्या पाठीमागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे येत्या दोन-तीन महिन्यांत उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
दिवसभर या सोहळ्यातील अनेक क्षण पाहताना मला गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेची आठवण झाली. गांधीजींनी १९०२मध्ये काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली होती. ‘सत्याचे प्रयोग’च्या तिसऱ्या खंडात ‘काशीत’ या विसाव्या प्रकरणात त्याचे वर्णन करताना गांधीजींनी लिहिले आहे, “बाराएक वाजता स्नानादिक आटोपून मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेलो. त्याची स्थिती पाहून वाईट वाटले. मुंबईत १८९१ साली मी वकिली करत होतो, तेव्हा एकदा प्रार्थना समाजाच्या मंदिरामध्ये ‘काशीची यात्रा’ या विषयावर व्याख्यान ऐकले होते. त्यामुळे निराशेसाठी थोडीशी तयारी झालेलीच होती, पण निराशा झाली ती अपेक्षेपलीकडे.”
गांधीजी पुढे लिहितात, “अरुंद, घसरड्या गल्लीतून जायचे! शांततेचे नाव नाही. माशांचा बुजबुजाट, वाटसरूंचा आणि दुकानदारांचा गोंगाट, हे सर्व असह्य झाले. ज्या ठिकाणी मनुष्य ध्यान व भगवच्चिंतन यांच्या अपेक्षा ठेवतो, तेथे त्यांपैकी काहीच मिळत नाही! ध्यान पाहिजे असेल, तर ते अंतरीच्या भावनेतून मिळविले पाहिजे. अशा भाविक स्त्रियाही मला दिसल्या, की ज्यांना सभोवार काय चालले आहे, याची गंधवार्ता नव्हती, व ज्या केवळ स्वतःच्या ध्यानामध्ये मग्न होत्या. प हे काही व्यवस्थापकाच्या प्रभावामुळे नव्हे. काशी विश्वनाथाच्या सभोवार शांत, निर्मळ, सुगंधित व स्वच्छ वातावरण – बाह्य त्याप्रमाणेच आंतरिक - निर्माण करणे व टिकवणे हे व्यवस्थापकाचे कर्तव्य आहे. त्याऐवजी ज्यामध्ये लुच्चेगिरीची परमावधी झालेली आहे, अशा तऱ्हेची मिठाई व खेळण्यांची दुकाने मला दिसली...”
पुढे गांधीजी लिहितात, “मंदिराशी जातो तो दरवाजासमोर कुजलेल्या फुलांची घाण सुटलेली. आत सुंदर संगमरवरी दगडाची फरसबंदी होती, ती कोणा अंधश्रद्धाळू इसमाने रुपये जडवून विच्छिन्न करून टाकली होती आणि त्या रुपयांमध्ये मळ साचून राहिला होता. ज्ञानवापीपाशी गेलो. तेथे मी ईश्वराला हुडकून काढण्याचा प्रयत्न केला; पण तो आढळेच नात्यामुळे मनात खळबळ चालली होती.”
गांधीजींनी पुढे लिहिले आहे, “नंतर दोनदा काशी विश्वनाथला गेलो आहे, पण तो ‘महात्मा’ झाल्यानंतर. अर्थात मग १९०२चे अनुभव कोठून मिळणार?... बाकी दुर्गंधी आणि गोंगाट मी तशीच अनुभवली.”
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागात मी विद्यार्थी असताना दै. ‘सकाळ’मध्ये इंटर्नशिप करणारा बातमीदार म्हणून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे वाराणसी येथील राष्ट्रीय अधिवेशन कव्हर करण्यासाठी गेलो होतो. त्या तीन दिवसांच्या मुक्कामात काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनाला गेलो. अरुंद अशा गल्लीतून वाट काढत गाभार्यापाशी पोहचलो आणि तिथे बेलाची पाने अर्पण करून, नमस्कार करून निघालो.
देशातील कोट्यवधींचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील दुरावस्था मी १९७७च्या नोव्हेंबर महिन्यात पाहिली होती. त्यानंतर पुन्हा कधी काशीला जाण्याचा योग आला नाही. पण काल काशी विश्वनाथ परिसराचा जो कायाकल्प पाहायला मिळाला, तो पाहून मात्र अक्षरशः थक्क झालो! हा कायाकल्प पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने झालेला आहे. काल ते दिवसभर मंदिरात, मठात आणि परिसरात वावरत होते. अनेक मंदिरांत त्यांनी आरती केली. संध्याकाळच्या गंगा आरतीमध्येही ते सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. पंतप्रधानांना त्यांचा धर्म असलेल्या धर्माचरणाबाबत कोणी काही बोलू शकत नाही. पण काल उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडित मृत युवतीच्या घरातील लोकांना काय वाटले असेल?
केंद्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या बेलगाम चिरंजीवांनी ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या मोर्चात गाडी घुसवून चार जणांचा बळी घेतला. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात काल कोणती मानसिक आंदोलने उमटली असतील?
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काल दिवसभर संसदेचे कामकाज सुरू होते. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी संसदेत प्रवेश करताना तिच्या पायरीवर माथा टेकवला होता. त्या संसदेत ते बहुतांश वेळा अनुपस्थितच असतात. त्याविषयी त्यांना कोणी प्रश्नही विचारताना दिसत नाही.
काल ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष करताना समोरचे भक्तगण, कॉरिडॉरचे काम करणारे शेकडो कर्मचारी, कामगार, भाजपशासित ११ राज्यांचे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले संत, महात्मा, साधू, बाबा हे सर्वजण विलक्षण भारावून गेले असणार.
भारतीय राज्यघटनेने भारतीय संघराज्य ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे सांगितले आहे. आणि या राज्यसंस्थेचा विद्यमान कार्यकारी प्रमुख पूर्ण दिवस धार्मिक कार्यात वेळ दवडतो, याबद्दल प्रश्न विचारण्याची कोणाकडेच शामत राहिलेली नाही!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र विकासाच्या योजनांबाबत माहिती दिली. तीर्थक्षेत्रांचे विकास व्हायलाच पाहिजेत, यात शंका नाही, पण देशाच्या कार्यकारी प्रमुखाने त्या ठिकाणी किती वेळ घालवायचा, हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की नाही?
पंतप्रधानांच्या भाषणातील तीन संकल्प निश्चितच महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिला स्वच्छतेचा, दुसरा सृजनतेचा किंवा इनोव्हेशनचा आणि तिसरा आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा.
अशा अनेक संमिश्र गोष्टी काल दिवसभर पाहत\ऐकत होतो, आणि मला सारखी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आठवण येत होती. या देशातील परंपरा, संस्कृती यांचा गाढा अभ्यास असलेल्या पंडितजींनी १९५०च्या दशकात विकसनशील भारताच्या भविष्यासाठी काय आवश्यक आहे, याचा एक अजेंडा आखला होता. आणि त्यानुसार सगळे जण काम करत होते.
पंतप्रधान मोदीही विकासाचा अजेंडा मांडत असतात. पण त्याच वेळी आपला धार्मिक चेहरा सतत समोर न दाखवता, त्याचे मर्यादित रूप दाखवता येणे शक्य नव्हते का, असाही प्रश्न निर्माण होतो. या देशातील कोणाही सुजाण नागरिकांच्या मनातदेखील असेच प्रश्न निर्माण झाले असतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गांधीजींनी १९०२ साली काशी विश्वनाथ मंदिर पाहून जी टीका केली होती, त्यातील तथ्य लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर साकार करून नक्कीच मोठी मजल मारली आहे…
तरीही काही प्रश्न उरतातच…
देशातील विरोधी पक्ष किंवा विविध राजकीय पक्षांतील ज्येष्ठ नेते असे काही प्रश्न त्यांना विचारतील का?
नव्या भव्य देखण्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरला भेट देण्यासाठी उत्तर प्रदेश निवडणूक काळात एक दौरा करावा, असे मनात आहे. भोलेनाथ शंकराने त्यासाठी कृपा करावी, अशी मनोकामना करतो.
..................................................................................................................................................................
लेखक अरुण खोरे हे ज्येष्ठ संपादक असून सध्या ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.
arunkhore@hotmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Girish Khare
Thu , 16 December 2021
मोदींचं काय चुकलं आणि कसं यावर गेल्या २० वर्षात अनेक पत्रकारांची पत्रकारितेतील करिअर झाली आहे. हा प्रकार पुढील अनेक वर्षे सुरू राहावा ही सदिच्छा.