अजूनकाही
१. मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो ३ प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यावर घातलेली बंदी उठवण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. वृक्षतोड केल्याशिवाय मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी करणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आल्यावर ‘बेसुमार वृक्षतोड होत असल्यास आपल्याला दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागेल,’ अशा शब्दांमध्ये मुख्य न्यायाधीशांनी वृक्षतोडीवर भाष्य केले.
अहो न्यायाधीश महाराज, हळु बोला. झाडंझुडपं, वातावरण वगैरे असलेल्या एखाद्या ग्रहाने हे ऐकलं तर काय होईल, याचा विचार करा. पृथ्वीवरचा नादान मानव आपल्याकडे यायला निघालाय, हे त्याला कळलं तर बिचारा त्या धास्तीने त्याची जी कोणती सूर्यमाला असेल ती स्वखुशीने सोडून डोक्यात राख घालून घेऊन धूमकेतू बनून फिरायला तयार होईल.
………………………………………………
२. मुंबई महानगरपालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी आधी शिवसेनेने भाजपसोबत राज्यातील सत्तेत राहायचे की नाही, ते निश्चित करावं, अशी अट काँग्रेसने पुढे केली आहे. त्याचवेळी शिवसेनेने काँग्रेसबरोबर अभद्र युती करू नये, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
उधोजीराजे, हे कायम लक्षात ठेवा की,
पप्पूची पप्पी… भद्र असते
तडीपार अध्यक्ष… भद्र असतो
पीडीपीची झप्पी… भद्र असते
राष्ट्रवादीच्या गुंडांना प्रवेश… भद्र असतो…
फक्त काँग्रेसशी युती तेवढी अभद्र!! शिव शिव शिव!!!
………………………………………………
३. पाकिस्तान आणि भारत यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणे टाळायला हवे. निवडणूक प्रचारात मी भारतविरोधी भूमिका घेतली नव्हती. : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ
शरीफमियाँ, तुम्ही इकडे हे बोलत असताना तिकडे कुणी तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब लावत नाहीये ना, ते पाहा. कारगिल विसरलात का? तुमच्या देशाचं सगळं अस्तित्त्व भारतद्वेषावर उभारलेलं आहे. ते एका रात्रीत बदलणार आहे का? ठेविले लष्करे तैसेचि राहावे, या स्थितीतून तुमची लोकशाही आधी बाहेर काढा, मग शांततेची प्रवचनं झोडा.
………………………………………………
४. नोटाबंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नोटांचा वेगाने पुरवठा करावा आणि ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये गरज वाटल्यास जुन्या नोटा पुन्हा चलनात आणाव्यात, अशी महत्त्वाची सूचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. एखादे व्हॅक्यूम क्लीनर असावे, तशा पद्धतीने नोटाबंदीने बाजारातील रोकड खेचून घेतली असून नोटाबंदीमुळे भारताच्या विकासदरावरही गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातील बँकांवरील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. शिवाय नोटाबंदीमुळे ज्या उद्योगांचे नुकसान झाले आहे, त्यावरही सरकारने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असे आयएमएफने नमूद केले आहे.
अरे या आयएमएफचा कोण पंटर आहे भारतात त्याला जरा अमितभाईंकडे पाठवा, ते खर्चापानी देतील त्याला कोपच्यात घेऊन. म्हणजे समजावून सांगतील की, हा सगळा कसा विरोधकांचा अपप्रचार आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता कशी खूष आहे ते इथल्या निवडणुकांच्या निकालांवरून दिसतंच आहे. आता आम्हाला मत देणारी जनता हुशार की तुम्ही तज्ज्ञ लोक हुशार? आपल्या औकातीत राहा, जरा चांगले पॉझिटिव्ह सर्व्हे वगैरे करा.
………………………………………………
५. उत्तर प्रदेशमधून सुरू झालेली गुजरातच्या गाढवांची लाट आता फिरून गुजरातमध्ये पोहोचली आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरात विधानसभेतल्या ४४ पाटीदार आमदारांना गाढवाची उपमा देऊन नवा वाद निर्माण केला आहे. तो म्हणाला, भाजपच्या सांगण्यावरून मला साथ न देणाऱ्यांच्या डीएनएमध्येच काहीतरी कमतरता आहे. मला लोक नेहमी विचारतात की, एवढ्या मोठ्या आंदोलनामुळे तुम्हाला काय मिळाले. तर मी त्यांना सांगतो की, या आंदोलनामुळे मला ४४ पाटीदार गाढव आमदार मिळाले, जे १४ पाटीदार युवकांच्या मृत्यूनंतरही गूपचूप बसले.
ही एक वेगळीच गंमत आहे बरं का गुजराती नेत्यांची. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अमिताभ बच्चन यांना 'गुजरातच्या गाढवांची' जाहिरात न करण्याचा सल्ला दिल्यानंतर खरं तर गुजराती माणसांना गाढव म्हटल्याचा निषेध आणि प्रतिकार व्हायला हवा होता त्यांच्याकडून. पण, पंतप्रधानांनीही 'अखिलेश गुजरातच्या गाढवांनाही का घाबरतात,' अशा वक्तव्य केलं; आता हार्दिक तर आपल्याच समाजाच्या आमदारांना स्वत:च गाढव म्हणतोय. ये माजरा क्या है भाई? लगता है किसी गधे से पूछना पडेगा.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment