पु. ल. देशपांडे यांच्या लेखनाविषयी सतत उलटसुलट चर्चा होत असते. एकीकडे, पुलं आता कालबाह्य झाले आहेत किंवा त्यांच्या लेखनातला काळ आता राहिलेला नाही, असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे, एक वर्ग सतत त्यांच्या लेखनाचे दाखले देत असतो. ‘अंतू बरवा एयरपोर्टवर—’ असा एक व्हॉट्सअॅप-लेख नुकताच वाचला. त्या आधी काही दिवसांपूर्वी ‘नारायण एका लग्नात’ असाही एक लेख आला होता. याचा अर्थ असा की, अजूनसुद्धा पुलंचे हे मानसपुत्र हवेसे वाटतात. पुस्तकांच्या दुकानांतून आजही त्यांच्या पुस्तकांची विक्री चांगल्यापैकी होते. आणि ग्रंथलयांमधूनही ती चांगल्यापैकी वाचली जातातच... पुलंची लोकप्रियता नेमकी कशात आहे? कशामुळे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणारा हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
मला नेहमी हा प्रश्न पडतो की, पुलंची लोकप्रियता नेमकी कशात आहे? साधारणपणे पुलंवर प्रेम करणारा त्यांचा भक्त असणारा वाचक त्यांना विनोदी लेखक म्हणतो. यात काहीच संशय नाही की, पुलंनी त्यांच्या लेखाची मांडणी बहुतांश विनोदी पद्धतीनेच केली आहे. मराठी माणूस, त्याची वृत्ती-प्रवृत्ती आणि गुण-अवगुण, याचीदेखील खिल्ली उडवतच त्यांनी लेखन केले. मध्यमवर्गीय मराठी माणसांसाठी त्यांनी आपली लेखणी कायम चालवली आणि त्याची प्रतिमा त्याच्याच समोर ठेवली. ‘राजकीय भाषणाला जाताना पिशवी न्यावी आणि चपला त्यात ठेवाव्यात’, हा रिवाज जुना असला तरी अस्सल मराठी आहे. काळ बदलला असला तरी आपल्याला अजूनही गालात का होईना हसू येते. याला विनोद म्हणायचे की नाही, याचा विचार न करता आपण ते स्वीकारले. हा विनोद नक्कीच आहे, पण त्यात एक प्रवृत्तीदेखील आहे. ही नेमकी मराठी आहे, इतकी की, गेली कित्येक वर्षं आपण त्याच्या प्रेमात आहोत…
नारायण, चितळे मास्तर, अंतू बरवा, चौकोनी कुटुंब, सखाराम गटणे, इतकेच काय पण नंदा प्रधान आणि पेस्तनकाकामध्येदेखील आपण हे मराठीपण अनुभवले आहे. त्याचा ताजेपणा अजूनदेखील आहे. माझ्यानंतरच्या पिढीलादेखील त्याने नादावले आहे, ही वस्तुस्थिती आहे. नारायण आज नामशेष झाला आहे, असे म्हटले जाते. त्याची जागा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ घेत आहे, हे सत्य असूनदेखील नारायणच्या असण्यातून आपण एक कविता हुडकत जातो. चितळेमास्तरांची एखादी आवृत्ती आपण कुठेतरी अंशत: का होईना बघितलेली आहे. नंदा प्रधान लौकिकदृष्ट्या १०० टक्के मराठी नाही, पण इंदू वेलणकरबद्दल आपण कसली जवळीक बाळगून असतो? आपल्या वर्गातील एखादा अति-श्रीमंत मुलगा आणि त्याचे हे असले नंदासारखे रहस्यमय आयुष्य आपल्याला अंधुक आठवते आणि आपण ते तुकडे एकमेकांशी जोडून\ताडून पाहतो. पुलंच्या लिखाणात ही जोडून\ताडून पाहण्याची प्रतिभा आहे. आणि ते त्यांचे वेगळेपण आहे. ‘अंतू बरवा एयरपोर्टवर—’ असा एक व्हॉट्सअॅप-लेख नुकताच वाचला. त्या आधी काही दिवसांपूर्वी ‘नारायण एका लग्नात’ असाही एक लेख आला होता. याचा अर्थ असा की, अजूनसुद्धा पुलंचे हे मानसपुत्र हवेसे वाटतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पुलंच्या साहित्यिक सफरीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्यक्तिचित्रण. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘असा मी असामी’, ‘आपुलकी’ आणि ‘गुण गाईन आवडी’, या पुस्तकांतून विविध माणसं आपल्याला भेटतात. ‘गणगोत’ आणि ‘आपुलकी’मधून जिवंत व्यक्तींची चित्रणे आहेत. इथं आणखी एक मुद्दा मला जाणवला. पुलंच्या इतर पुस्तकांतूनदेखील जी माणसं आपल्याला भेटली, ती जिवंत होऊन आजसुद्धा आपल्या आयुष्याचा भाग बनून राहिली आहेत. लेखक म्हणून हे यश सगळ्यांच्या वाटेला येत नाही. मुख्य मुद्दा आहे- तो त्यातील अस्सलतेचा. हे सगळे नमुने आपण विखुरलेल्या अवस्थेत ‘हरितात्या’मध्ये पाहिले, ‘नाथा कामत’मध्ये पाहिले आणि ‘चौकोनी कुटुंबा’तही पाहिले. ‘हरितात्या’ ही व्यक्ती काल्पनिक आहे, हे कितीही पटवून घेतले तरी आजही मला पचनी पडत नाही. आरतीच्या, नैवेद्याच्या वेळेचा तो प्रसंग आणि हरीतात्यांचा तिरका झालेला डोळा इतका जिवंत आहे की बस्स! मला आठवतं- माझ्या लहानपणीची सामूहिक आरती. अनेक ठिकाणी तुकड्या-तुकड्यानं पाहिलेले ‘हरितात्या’ आठवतात. असं जिवंत चित्रण आणि तेही अनेक वर्षं न बदललेले.
मला वाटतं, अशा व्यक्ती त्या संस्कृतीच्या साक्षीदार असतात. कारण अनेक पिढ्यांच्या वाटेला तेच प्रसंग अंशत: का होईना आलेले असतात. आणि तेच त्या पिढीचं कायमस्वरूपी संचित असतं. ज्यांना हे अनुभवायला मिळालं, त्यांना त्यातील मजा कळेल. जीव इतका हल्लक होतो की, पुस्तक मिटून आपण त्या त्या काळात रमतो. हे रमणं किती वर्षांचं आहे? मला तर त्यात रमणं अजूनही आवडतं. अर्थात हा माझ्या मानसिक ठेवणीचा भाग आहे. त्याबद्दल मला अधिक काही सांगता येणार नाही.
आणखी एक गोष्ट विचारात घ्यायला हवी. पुलं अधिक प्रभावी झाले, ते त्यांच्यातल्या ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’मुळे हे खरं. त्यांच्यामधून एक नट कायमच डोकावत राहिला आहे. त्यातूनदेखील अनेक व्यक्तिचित्रं निर्माण झाली (त्यांची यादी करत नाही). त्यांची नाटकं, भाषणं आणि इतर लेख, यांतून ते चिंतन अनेक ठिकाणी विखुरलं आहे. पुलंचे रसिक चाहतेदेखील एरव्ही त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. शिवाय इतक्या जबरदस्त, विपुल लिखाणातून पुलंनीदेखील स्वत:ची अशी भूमिका कुठे मांडलेली नाही. पु.ल. देशपांडे म्हणून जे व्यक्तिमत्त्व आपल्याला माहिती आहे, तो व्यक्ती म्हणून असलेल्या वास्तवाचा भाग आहे. ते खरंच तसं आहे, असं आपण सहज म्हणतो, इतके ते आपल्याभोवती सतत आहेत.
हा रमण्याचा आणि स्मरणरंजनाचा भाग रसिकाला समांतर साहित्यापासून दूर ठेवतो आणि जगातील समकालीन विषयापासून वंचित ठेवतो, असा एक मत-प्रवाह आहे. (साहित्य आकलनाची वरची म्हणून काही यत्ता असते, ती गाठणं अवघड जातं, कारण पुलंचं साहित्य आपल्यावर गारुड करणारं आहे, असा काही सूर आहे.)
हा वर्ग पुलंना श्रेष्ठ साहित्यिक वगैरे मानतोच असं नाही. ‘स्मरणरंजन’ हा एक स्वतंत्र विषय आहे. वाचकाला तसं कायम गुंगवून ठेवणं, हे साहित्याचं चांगलं लक्षण आहे का नाही, यावर वेगळी चर्चा व्हायला हवी.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आपण पु.ल. देशपांडे म्हणजे काय आहे ते पाहू. त्यांचे लोकप्रिय संदर्भ (सतत ज्याचे संदर्भ हजारो वेळा येतात ते!) हे एका वर्गाचे आणि काही ठिकाणी ते वयाचेदेखील आहेl, आणि त्या वर्गालादेखील बाहेर पडण्यासाठी ते काही दिशा देत नाहीत. उलट, आपलं जे आहे, त्यातील ‘काव्य’ हुडकून तेच श्रेयस्कर, शुभंकर आणि अपरिवर्तनीय असल्याचं प्रक्षेपण त्यातून होतं. पुलंबद्दल हा दुसरा आक्षेप. साहित्याकडून अशी कुठलीही चौकट कल्पून अपेक्षा ठेवणं, हे जरा चुकीचं वाटतं. अमुक एका वर्गाला कायम तसं मागास/जुनाट ठेवलं गेलं. आनंदाचे विषय आणि यशाचे मापदंडदेखील कायम ठेवले गेले, असे आरोपदेखील केले गेले.
तसं पाहिलं तर पुलंच्या साहित्याकडून अशी अपेक्षा का व्यक्त केली जाते, हेच मुळात आश्चर्य आहे. मुळात कुठल्याही साहित्यिकाकडून असं का अपेक्षिलं जातं? आपल्या आपल्या मगदुराप्रमाणे आपण पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पनेतलं विश्व रेखाटत असतो. अनेक सिद्धहस्त लेखकांनी ते केलंही आहे. इतर कुणाचं नाव किंवा साहित्य-कृतीचा उल्लेख मी मुद्दाम टाळतो आहे. अकारण ती तुलना व्हावी, असा माझा हेतू नाही.
पुलंच्या लिखाणावर विनोदाचा शिक्का बसला आहे, हे सत्य आहे. पण खरंच ते ‘फक्त तसं’च आहे का, याचा विचार व्हायला हवा. त्यांच्या विनोदाची जातकुळीदेखील अवघड आहे. ‘बबडूच्या कथा किंवा किस्से ऐकून आमच्या पूर्वजांच्या तसबिरींनादेखील घाम फुटला असेल...’ हा केवळ विनोद नाही, तर एका सांस्कृतिक बैठकीवरील भाष्य आहे. बुद्धिजीवी लखू रिसबूडमध्ये लपलेला सर्वज्ञानी फिलॉसॉफर आणि त्याने घेतलेले मुखवटे, हा त्याच्या जगण्याचा एक भाग आहे. असे अनेक ‘सर्वज्ञानी’ आपल्यालादेखील भेटतात. लखू अशा वेळी केवळ व्यक्ती राहत नाही, तर ते सामाजिक व्यंग होऊन जातं.
जो विवेकी, केवळ निर्भेळ दृष्टीकोन पुलंनी त्यांच्या शेकडो पात्रांमार्फत मांडला, त्यातील जागा नेमकेपणानं आकलन होणं सोपं नव्हतं, आजदेखील ते सोपं नाही. बदलत्या जगाच्या व्यवहाराबद्दल आक्रस्ताळा विरोध न करता सहजपणे बेंबट्या स्वत:च (एका व्यापक अर्थानं ‘असा मी असा मी’ हेदेखील व्यक्तिचित्रच आहे.) बदलत गेला. आठवणीत रमणं म्हणजे बदल नाकारणं, हा अर्थ कुणी काढला? या नायकाचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर.
‘बेन्सन जॉन्सन’ कंपनीत खर्डेघाशी करत आयुष्य बेतलेला धोंडो भिकाजी जोशी हा कारकून स्वत:ला सभोवताली जुळवून घेतो. तो काळाप्रमाणे बदलतोदेखील. पण अखेरच्या चिंतनात पुलं त्याच्या आयुष्याचा पट आपल्यापुढे ठेवतात. गोठोस्कर दादा, आप्पा भिंगार्द्या, नानू सरंजामे, केशर मडगावकर ही माणसं बेंबट्यासह बदलत गेली.
सामाजिक जीवन झपाट्यानं बदलत जाणारा तो काळ मध्यमवर्गीयांसाठी एका दृष्टीनं ‘संक्रमण काळ’ होता. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता बघता बघता ‘लेडीज क्लब’मध्ये जाऊ लागली होती. धोंडो भिकाजी, कॉलनीतील मुलांचे ‘डीबी अंकल’ झाले. ‘काल’बद्दल ते हळवे होते, पण बदल त्यांनी नाकारला नव्हता. हा सगळा काळ आमच्या पिढीनं पाहिला, अनुभवला आहे. तो ‘रीव्हिझिट’ करताना किती तारा झंकारल्या जातात, कसं सांगणार? आजच्या विस्तीर्ण पोकळीमधील हा गांधार आम्ही जपून ठेवलाय. त्याशिवाय दुसरा उपाय नाही आमच्याजवळ!
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
नारायणचंच उदाहरण घ्या. ती एक संस्थाच आहे. दुर्लक्षित असूनसुद्धा अनिवार्य आहे. लग्नाची अनेक कामं करणाऱ्या अत्यंत प्रोफेशनल संस्था आणि कार्यालयं आज आहेत. पण नारायणचं अस्तित्व त्यापेक्षा अधिक काही देतं. तुमच्या-आमच्या गोतावळ्यात नारायण आज नाही. पुलंच्या ‘नारायण’मध्ये त्या सर्व मोहक खुणा अनुभवता येतात. ‘मांडवात एका बाजूला नारायण झोपला आहे आणि दुसऱ्या बाजूला मांडववाल्याचा माणूस. बाकी सगळी सामसूम!’, इथं कुठेतरी मन हळवं होतं, पण नारायणला सुमीच्या नंतर अजून एक लग्न उरकायचं असतं! नारायण आता त्याच विचारात झोपला आहे.
दुर्दैवाचे दशावतार अनुभवलेला अंतू बरवा मनातून उदास असला, तरी खचलेला नाहीय. स्वत:च्याच आयुष्यावर हसायला त्याला आवडतं. आयुष्यातील बऱ्या-वाईट घटनांची वीण पांघरून तो खुमासदार बोलतो. त्यांच्या बोलण्यात वाचनानं आलेली प्रगल्भता नाही, पण खाचखळग्यांतून आलेले ते शब्द आहेत. ‘बघायचे काय त्या प्रकाशात? दलीन्द्रच ना?’ ही पळवाट नाहीय तर, ते एक जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. ‘आमची ही गेल्यापासून दारचा आंब्याला मोहर नाही आला’ म्हणणारा अंतू बरवा तोच असतो आणि ‘डोंबारी बरा... तो आधी खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो…’ अशी छद्मी पिंक टाकणाराही अंतू बरवाच असतो!
आणि पेस्तनजी? तो तर तसा मराठीसुद्धा नव्हता. पेस्तनजीमध्ये श्रममूल्य मानणारा एक मध्यमवर्गीय आहे. तो मिश्किल आहे. नंदा प्रधानच्या व्यक्तिमत्त्वातला मित्र केवळ इंदूमुळे आपला वाटत नाही, तर त्याची अथांगता आपल्याला अंतर्मुख करते. किती छटा आठवायच्या? किती व्यक्ती आणि किती वल्ली? घरातल्या डीटमारच्या दिव्यात आणि कंदिलाच्या प्रकाशात पहाटे अभ्यास घेणारे चितळे मास्तर (वांदरे आली गो… खरवस देणार होतीस ना?), घोसाळकर मास्तरांच्या नावे इंग्रजीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस ठेवणारा बबडू, आजन्म सेक्रेटरी बापू काणे, प्राज्ञ मराठी बोलणारा सखाराम गटणे, हे सगळे आपलेही आप्त होतात.
ही सगळी सौंदर्यस्थळं आहेत. ती ‘गणगोत’मध्येसुद्धा आहेत. ऋग्वेदी, बाय, फणसळकर मास्तर या माणसांसोबत पुलं आपल्याला तो प्रवास घडवून आणतात. एक संपन्न काळ आपल्यासमोर उभा राहतो. आपण तो कुठेतरी अनुभवला आहे. त्यामुळे त्यांनी जोपासलेली ती वेडं आपला वर्तमान प्रकाशित करतात. मनावर आलेलं मळभ किंचित दूर होतं!
मात्र, ही वेडं जोपासणाऱ्या माणसांची ओळख आता दिवसेंदिवस पुसट होत चालली आहे. कदाचित नव्वदनंतर जग खूप झपाट्यानं बदललं, हेदेखील खरंच आहे. पण आहेत, अजूनसुद्धा माझ्यानंतरच्या पिढीतदेखील या लोभस मित्रांना ओळखणारी माणसं आहेत. आणि शेवटचा मराठी माणूस असेपर्यंत पुलंचं नाव राहणार आहे. मुद्दलात मध्यमवर्गच आज हरवला आहे. पैशाच्या प्राबल्यापायी किंवा शहरी सवयीमुळे आपल्या अस्तित्वालाच एक एकारलेपण येत आहे. मुंबईच्या भाऊगर्दीत शाळेसाठी भिक्षांदेही करणारे चितळे मास्तर येतात. कसलं तरी वेड घेऊन शाळेचे माजी विद्यार्थी हुडकत येतात. ओळीत नऊ अक्षरं आली तर, ते खोडून दुसऱ्या ओळीत लिहिणारा जोगळेकर आणि शासकीय नोटमध्येसुद्धा ते ओळखणारा नुरू काझी... हे चितळे मास्तरांचे वंशजच आहेत. ही माणसं आणि त्यांची लोभसता पुलंनी शोधली आणि आपण ती अधूनमधून वाचतो. जीवाची काहिली किंवा बेचैनी कमी होते. आपल्या चौकटीत मावेल इतकं किमान बिनधास्तपण येतं. कुठल्याही व्याख्येत न बसणारा दिलासा मिळतो.
‘गणगोत’ आणि ‘आपुलकी’मधील माणसं ही प्रत्यक्षातली आहेत. (खरं तर नारायण, अंतू बरवा, हरितात्या, बबडू ही तरी नाहीत, असं कसं म्हणावं? तीही आहेतच) ऋग्वेदी, बाय यांचा उल्लेख आधी केला आहे. मात्र विनोबा, ब.मो. पुरंदरे, बालगंधर्व, इत्यादी वेगळी माणसं आहेत. जगण्याच्या प्रक्रियेत हे सगळेच काहीतरी देऊन जातात. सामान्य मध्यमवर्गीय आयुष्यात विनोबाची निष्ठा आपण हुडकत राहतो. त्यांच्या समर्पण वृत्तीचं दर्शन आपल्याला समृद्ध करून जातं. बालगंधर्व किंवा चिंतामणराव कोल्हटकर ही रंगमंचावरील माणसं! खरं तर, यातील कुठलीही व्यक्ती आपण पाहिलेलीसुद्धा नाही. विनोबांच्या आश्रमातील पहाटेचा त्यांचा धीरगंभीर उद्गार आपल्याला ऐकू येतो. कपाळावरील शिरेत सगळा अपमान व्यक्त करणारे चिंतामणराव नाटकाचे ते वैभवी दिवस पुलं आपल्याला दाखवतात.
मुलांनी चार घास जास्त खावेत म्हणून त्यांना गोष्टीत रंगवणारी बाय एका संस्कृतीचा बेचैन करणारा श्रीमंत तुकडा आहे. किंचित व्यापक दृष्टीनं किंवा तिऱ्हाईत नजरेनं पाहिलं तर पुलंना भिडलेले हे सगळे क्षण, त्या व्यक्ती, त्यांची श्रीमंती हा सगळा एक सांस्कृतिक पट आहे. जग बदलेल—नाही बदललंच आहे, पण ‘ब्रोमायीड प्रिंट’मधली ही कुटुंबं जुन्या अल्बममध्ये दिसतात. आयुष्यातील साधेपण, शुचिता, निर्भेळपण यांच्या व्याख्या आता करू नयेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘आपुलकी’मधील पुलंनी निवडलेली माणसं वेगळी आहेत. या ना त्या नात्यांनी (आणि कारणांनी) जवळीक निर्माण झालेली माणसं त्यात आहेत. १९९८मध्ये ‘आपुलकी’ची पहिली आवृत्ती निघाली. म.म. दत्तो वामन पोतदार, गोविंद तळवलकर, कोल्हापूरचे नाट्यप्रेमी लोहिया, गांधीवादी चळवळीतील आवाबेन हवेवाला, वास्तू-विशारद माधव आचवल, अशा व्यक्तींबद्दल ते ‘आपुलकी’मध्ये लिहितात. ही सगळी माणसं त्यांच्या आपुलकीतील असली तरी, ती सगळीच दोस्तान्यातली नाहीत. त्यांच्या कार्याचा पुलंनी घेतलेला वेध घेतानासुद्धा तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच घेतला आहे. काही उदाहरणं आठवतात, पण ते मी टाळतो आहे, कारण त्याचं इथं प्रयोजन नाही.
या ‘आपुलकी’मध्ये शरद तळवलकर आणि वसंतराव देशपांडे यांचा अपवाद सोडला तर बाकींच्या मंडळींमध्ये एक गांभीर्य लपलेलं आहे. पुलंची मुशाफिरी ही बंदिस्त चौकटीतील नव्हती, असं मात्र ठामपणे म्हणता येईल. अशा लिखाणातूनदेखील त्यांची निवेदनशैली ही ‘लायटर व्हेन’मध्येच राहते. ‘आपुलकी’मधील आवाबेन किंवा लोहिया यांची आपली साधी ओळखसुद्धा नाही. अशा व्यक्ती निवडताना पुलंचा काय हेतू असावा? पण मग असंही वाटतं की, पुलं कधीच काही हेतू मनात ठेवून लिखाण करत नाहीत. हेतू असेलच तर, ते सत्य, शिव आणि सुंदर जगापुढे आणण्याचा. त्यांच्या अलौकिकत्वाला एक अभिवादन करावं असं पुलंना नक्कीच वाटलं असणार.
आवाबेनबद्दल लिहिताना पुलं लिहितात की, “वास्तविक आवाबेन ही पार्ल्याची, हवेवाला या पारशी कुटुंबातली.” इथं नकळत पुलं पार्ल्याच्या सांस्कृतिक बैठकीवर भाष्य करतात! “झवेरचंद मेघाणीसारखा लोकोत्तर कवी आहे, याची पूर्व पार्ल्याला कल्पना नव्हती आणि न.र. फाटक यांच्यासारखा प्रकांड पंडित पश्चिमेला माहिती नव्हता. मोठ्या शहरातून ही अशी बेटे अकारण निर्माण होतात…” गांधीजींची सत्याग्रही चळवळ ही आवाबेनची ओळख. पडेल ते काम करायचं, अशी तिची ठेवण. स्वातंत्र्यानंतर पूजा संपली आणि मग प्रसादासाठी खूप गर्दी उसळली, पण आवाबेन मात्र त्या गर्दीत नव्हती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदललेल्या राजकारणाचं, समाजकारणाचं एक चित्र पुलं आपल्यापुढे सहज ठेवतात. आवाबेनच्या अखेरच्या दिवसांत पुलंना ‘एकला चलो रे’ हे आवाबेनचं गाणं आठवतं. आवाबेनच्या मृत्यूनंतर ‘मटा’मध्ये बातमी आली होती आणि त्याखाली बातमी होती- ‘पुलंचे आज हार्मोनियम वादन…’
आजोबा गेले, त्या वेळी रमीचा डाव मांडून बसलेले पुलं मला आठवले. हीच ती विसंगती. आणि त्याची संगती लागावी म्हणून अशा लोकोत्तर व्यक्तीचित्रांची निर्मिती त्यांनी केली. त्यात केवळ विनोदापलीकडे बरंच काही आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे.
पुलंच्या या सगळ्या गोतावळ्यात मध्यममार्गी जीवनशैलीवरचं त्यांचं प्रेम प्रगट होतं, हे तर उघड आहे. वेदनेचा सूरदेखील ते नाकारत नाहीत. नंदाचं एकटेपण, (उंदरालासुद्धा घाबरणारी विल्मा काय हिटलरला खाणार होती?) आणि इंदूचा बाप हे सगळं वास्तव करुण नक्कीच आहे.
अंतू बरवा हे तर मूर्तीमंत कारुण्यच आहे. मात्र त्या जगण्याला छेद देणारी त्याची प्रवृत्ती हीदेखील प्रवाही आयुष्याचं प्रतीक आहे. मृत्यू आपल्या आयुष्यात एकदाच येतो, पण जीवन मात्र रोज नव्यानं येतं. त्याला अष्टांगानं भिडण्याचं कौशल्य महत्त्वाचं. अर्थात पुलंनी ही भूमिका कुठेही मांडलेली नाही... किंवा तसा काही संदेश देण्याचा त्यांचा पवित्रादेखील कुठे दिसत नाही. आणि तरीही ते आपल्याला दिसतं... जाणवतं...
विसंगती हे आयुष्याचं एक लक्षण आहे. या विसंगतीतील सुसूत्रता आपल्यापुढे ठेवणारी ही त्यांची खास अशी शैली आहे. या विसंगतीतील संगती हुडकता आली आणि सापडली त्यांना नंदा प्रधानच काय, पण नामू परिट आणि भैय्या नागपूरकरदेखील सगे-सोयरे वाटतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पुलं माहिती आहेत, पण वाचले नाहीत, वाचले आहेत पण, समजत नाहीत, अशांची बरीच संख्या आज आहे. त्यांना ‘बिचारे’ वगैरे म्हणण्याचा अधिकार मला नाही. परंतु त्यांनी नक्कीच खूप काही गमावलं आहे, याबद्दल सध्या माझ्या मनात काही शंका नाही. पुलं किती काळ राहतील, किती विस्मृतीत जातील, याबद्दल भाष्य करण्यात काही अर्थ नाही.
१९४३-४४च्या सुमारास ‘अभिरुची’मध्ये त्यांच्या नावे ‘भैय्या नागपूरकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झालं. त्याला ७७ वर्षं झाली आहेत. ‘कुलकरणी मेला’ (माणेमाच्या कमलने फशिवले...) अशी एका वाक्यात त्याच्या मरणाची संभावना करणारा नामू परीट किंवा गोठोस्कर दादांचा कोट आहे, हे कळल्यावर रेवरंड गुरुदेवांना साष्टांग घालणाराधोंडो भिकाजी जोशी अजूनसुद्धा लांबलेल्या रात्री येतात, झिम्मा जागवतात. मला तितकं पुरं आहे. ते नक्षत्राचं देणं आहे.
खरं तर अजून लिहिता येणं शक्य आहे, पण हा लेख म्हणजे पुलंच्या पंचेसवरील दोन मित्रांच्या गप्पा नाहीत. शिवाय दुसरे प्रसंग आठवणारे हजारो रसिक आहेत. आणि मला वाटतं की, हेच पुलंच्या साहित्याचं शक्तिस्थळ म्हणायला हरकत नाही!
पुलंनी एका संपत आलेल्या काळखंडाचा आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्याचा लुत्फ घेणारे वाचक आजही आहेत. ज्यांनी तो काळ अनुभवलाच नाही, त्यांना त्यातील विनोद किंवा जिव्हाळा, हुरहूर समजेलच, असा दावा करण्यात अर्थ नाही. पण एक गोष्ट नोंदवली पाहिजे- त्या काळाचं असं जिवंत चित्रण… दाखवणाऱ्या व्यक्ती, वल्ली किंवा विभूती पुन्हा निर्माण झाल्या नाहीत. आमच्या मध्यममार्गी शैलीला, भित्रेपणाला, भाबडेपणाला, साधेपणाला, भरजरी करण्याचं सामर्थ्य असणारे दुसरे पुलं मला फारसे कुठे दिसत नाहीत! गारुड असेलच तर ते हे आहे!! कुणी माना अगर न माना…
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment