सिंहगडावर दर आठवड्यात एकदा तरी जाणे, हा माझा अतिशय सुंदर अनुराग आहे. ती माझी अटॅचमेंट आहे. डीप अटॅचमेंट आहे! ते माझे व्यसन आहे!
‘व्यसन’ हा शब्द ऐकला की, अनेकांना खटकल्यासारखे होईल. ‘अनुराग’ हा शब्द असताना ‘व्यसन’ कशाला? पण खरं तर ‘व्यसन’चा मूळ अर्थ तसा वाईट नाहीये. या शब्दाला संदर्भामुळे, म्हणजे कॉंटेक्स्टमुळे वाईट अर्थ प्राप्त झाला आहे. दारू वगैरेंच्या संगतीने अनेक माणसांचे रेप्युटेशन गेले आहे, त्याचप्रमाणे ‘व्यसन’ या शब्दाचीही बदनामी झाली आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो, पण हा कुठून आला, याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो. तो संस्कृतमधील ‘अस्’ या मूळ शब्दरूपा वरून आलेला आहे. ‘अस्’ म्हणजे ‘असणे’. या वरून अनेकांना ‘अस्’ हा धातू ‘असणे’ या मराठी शब्दावरून आला आहे असे वाटेल. पण ते तसे नाहीये. मुलगी आईसारखी दिसते आहे, याचा अर्थ ती आपल्या आईची आई असत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर ‘अस्’ या मूळ-शब्दाला ‘वि’ जोडला गेला की, ‘व्यसन’ हा शब्द तयार होतो. एखाद्या शब्दाच्या पुढे ‘वि’ हे इंजिन लागले की, त्या शब्दाला वजन येते किंवा विशेष अर्थ प्राप्त होतो. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘विपक्ष’. साधा पक्ष असतो. त्याला ‘वि’ लागला की, तो विरोधी पक्ष होतो. ‘विख्यात’ शब्द घेतला तर लक्षात येते की, ‘ख्यात’ शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लागला की, विशेषत्वाने ख्यातनाम असलेला किंवा असलेली असा अर्थ तयार होतो. आता ‘अस्’ या मूळ शब्दरूपाला ‘वि’ लागला की, ‘विशेषत्वाने असणे’ असा अर्थ तयार होतो. एखाद्या गोष्टीत विशेषत्वाने असणे म्हणजे व्यसनात असणे.
‘अनुराग’ या शब्दाचीही अशीच मजा आहे. अनुराग म्हणजे प्रेम. या प्रेमळ शब्दात ‘राग’ काय करतो आहे? ‘व्यसन’ या शब्दाला आपण चांगले समजत नाही, तसाच ‘राग’सुद्धा वाईटच! मग तो ‘अनुराग’ या शब्दात काय करतो आहे? प्रेमात आणि रागात नक्की काय साम्य आहे?
हा शब्द ‘रंज्’ या मूळ शब्दरूपावरून आलेला आहे. म्हणजे रंगलेला. आसक्त असलेला. अटॅचड् असलेला. एखाद्या व्यक्तीत रंगून गेलो की, आपण त्या व्यक्तीवर आसक्त होतो. आपल्याला त्या व्यक्तीविषयी अटॅचमेंट,. प्रेम वाटू लागते. आपण एखाद्या मुद्द्याला जास्त अटॅच झालो आणि त्या मुद्द्याविरोधात गोष्टी जाऊ लागल्या की, आपल्याला राग येतो. प्रेमात आणि रागात ‘अटॅचमेंट’ ही कॉमन असते. रंगून जाणे कॉमन असते.
सिंहगड हा अनुराग आहे. सिंहगड हे एक व्यसन आहे. या मुख्य व्यसनात अनेक पोटव्यसनांची मालिका आहे. पण ती सगळी व्यसने इथे लगेच सांगून टाकायचे कारण नाही. सिंहगडावर एक लेख-मालिका लिहायची माझी इच्छा आहे, त्यात ही सारी व्यसने ओघाओघाने येतीलच.
पण एक गोष्ट सांगून टाकायला पाहिजेच. गडावर मिळणारे दही हे माझे एक जबरदस्त व्यसन आहे. छोट्या छोट्या मातीच्या मडक्यांमध्ये मिळणारे दही! काळ्या मडक्यांमध्ये मिळणारे पांढरे शुभ्र दही! दह्याचा पांढरा शुभ्र रंग. त्या पांढऱ्या शुभ्र पृष्ठभागावर फर्मेंटेशनमुळे पडलेली अत्यंत सुंदर जाळी. असे अत्यंत सुंदर दही! त्याची सुंदर अधमुरी आंबट गोड चव. आणि मुख्य म्हणजे त्या मडक्यांच्या बाजूला ठेवलेले लाल आणि पांढरे मीठ!
आपण गड चढून थकलेलो असतो. ओला टी शर्ट काढून कोरडा टी शर्ट घातलेला असतो. आत्यंतिक व्यायामाने एन्डॉर्फेन्स रिलीज झालेली असतात. आपण चहा वगैरे प्यायलावर ब्रेनमध्ये आपल्याला छान वाटायला लावणारी बायोकेमिकल्स सीक्रिट होतात. त्याचप्रमाणे भरपूर व्यायाम झाल्यावरसुद्धा अतिशय छान वाटायला लावणारी एन्डॉर्फेन्ससारखी बायोकेमिकल्स ब्रेनमध्ये रिलीज होतात. या एन्डॉर्फेन्समुळे आपण गडाच्याच नाही, तर एकंदर मानवी जीवनानुभवाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलो आहोत, असा फील आपल्याला येत राहतो! (या अर्थाने तर सिंहगड हे एक सुंदर व्यसनच ठरते! नक्कीच ठरते!)
चित्तवृत्ती उल्हसित असतात आणि इंद्रिये सजग झालेली असतात. डोळ्यांना जरा जास्त स्वच्छ दिसायला लागलेले असते, वारा स्किनवर रुंजी घालत असतो. अशा वेळी रसना प्रदीप्त झालेली असते. सिंहगडावरच्या दह्याची चव फक्त दह्याची चव नसते. दह्याच्या चवीत या सुंदर जीवनानुभवाची चव मिसळलेली असते. हेच दही तुम्ही गडावर गाडीने जाऊन खाल्ले तर ते एवढे अप्रतिम लागत नाही!
आम्ही नेहमीच्या टपरीमध्ये जाऊन बसलेलो असतो. संतोष किंवा त्याची बायको तीस-पस्तीस दह्याची मडकी समोर आणून ठेवतात.
पाटीतले दही, गोधडीसारख्या चिंध्यांनी बनवलेल्या जाड कापडाच्या उबेत झाकलेले असते. रात्री हेच दही चुलीच्या निखाऱ्यांच्या उबेत असते!
हे उबेच्या मायेत घट्ट् झालेले दही समोर येते आणि मन प्रसन्न होते!
या जगात माणसाला अजून काय पाहिजे?
मग ग्रूपमधला प्रत्येक जण आपापल्या औकातीनुसार आणि हिंमतीनुसार दही खातो. दत्ता पंधरा ते सोळा मडकी खातो, मी दहा ते बारा.
‘मडके’ या शब्दामुळे घाबरून जाण्यात काही पॉइंट नाही. प्रत्येक मडक्यात साधारणपणे ५० ग्रॅम दही असते.
गड चढून गेल्यावर अर्धा लिटर घट्ट् दुधाचे दही पोटात गेले तरी हृदयाने तक्रार करायचे कारण नाही, असे वाटत असते. सैन्य पोटावर चालते, तसे आपणही पोटावरच चालतो, हे हृदयाने समजून घ्यायला पाहिजे!
हृदय एकवेळ समजून घेईल, पण स्त्री ही अशी गोष्ट आहे की, ती काहीही समजून घेत नाही!
माझी एक शाळेतली मैत्रीण आहे- मोहना. तिला मी या दह्याचे फोटो पाठवले. हेतू हा की, तिने कधीतरी गडावर यावे. (ती राहते जयपूरला. ती पुण्यात कधी येणार आणि गडावर कधी येणार हा वेगळा विषय‘)
तिला दह्याच्या मडक्यांच्या चवडीचा फोटो पाठवला तर तिने विचारले किती दही खाता?
मी म्हटले दत्ता १६ खातो, मी १२.
मोहना फार मोठी डॉक्टर आहे, त्यामुळे तिने माझी बायपास काढली.
म्हणाली, तुझी बायपास कधी झाली आहे?
मी म्हटले, १५ साली.
तिचा पुढचा मेसेज आला - कर्ट मेसेज – चार-पाच पुरे!
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आज गडावर गेल्यावर मडक्यांची चवड आली.
मी दत्ताला म्हटले - मोहनाने चार-पाचच मडकी खायला सांगितली आहेत.
दत्ता म्हणाला- का?
त्यावर मी बायपास चर्चा सांगितली. चार-पाचचे लिमिट सांगितले.
त्या लिमिटला मी ‘मोहना लिमिट’ असे नाव दिले.
दत्ता म्हणाला, ‘किती लकी आहेस तू? तुझी बायको तुझी काळजी घेते. आणि तुला तुझी काळजी करणाऱ्या मैत्रीणीसुद्धा आहेत!’
मी म्हटले, ‘मोहना मोठी डॉक्टरही आहे.’
दत्ता म्हणाला, ‘तुला तुझी काळजी करणाऱ्या डॉक्टर मैत्रिणीसुद्धा आहेत.’
मी म्हटले, ‘आपण ‘मोहना लिमिट’ मानले पाहिजे.
दत्ता म्हणाला – ‘नक्कीच!’
पाचव्या दह्यापर्यंत आल्यावर मी म्हटले की – ‘दत्ता, मला एक आध्यात्मिक पुरुष भेटले होते. ते म्हणाले की, आत्म्याला जेव्हा शरीर सोडायचे असेल, तेव्हाच तो सोडतो. त्याआधी शरीरात काहीही बिघाड झाला, तरी तो दुरुस्त करून घेतो.’
सहावे मडके माझ्या पुढे ठेवत दत्ता म्हणाला की, त्यांचे अगदी बरोबर आहे.
मी म्हटले की, ‘मोहनाने जी काळजी व्यक्त केली आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलेच पाहिजे. नाहीतर या क्रूर आणि स्वार्थी जगात कोण कुणाची काळजी करतो?’
दत्ता म्हणाला, ‘ती काय म्हणते आहे त्याबद्दल तू कृतज्ञ राहायलाच पाहिजे. पण कृतज्ञ राहणे आणि तिचे ऐकणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, हेसुद्धा तू लक्षात घेतले पाहिजेस! तिचे एक कणसुद्धा न ऐकता तू तिच्या सल्ल्याविषयी कृतज्ञ राहू शकतोस!’
मला दत्ता आवडतो, तो याच कारणासाठी! त्याने मला एका फार मोठ्या क्रायसिसमधून सोडवले, हे मला आज मान्य करावेच लागेल!
दत्ता पुढे म्हणाला, ‘आत्म्याचे काय असते तुला सांगतो जोश्या, त्याला जायचे असेल तेव्हाच तो जातो. शेवटी आत्मा म्हणजे खुद्द ब्रह्मनच असते. म्हणजे देवांचेही मूलतत्त्व!’
हा विचार अत्यंत विचार करायला लावणार होता. त्या विचारातच मी सातवे मडके घेतले.
आपण देवांना मानतो आणि ते योग्यही असते. पण, आपण खरं तर देवांचेही देव असतो मुळात!
दत्ता म्हणाला, ‘तुझी बायपास झालेली असली तरी तू गडावर यायला घाबरत नाहीयेस. याचाच अर्थ असा की, तुझ्या आत्म्याला तुझे शरीर सोडायचे नसणार इतक्या लवकर!’
दत्ता म्हणाला ते अगदी खरं असणार. बायपास या गोष्टीची मला कधीच भीती वाटली नाही. या गोष्टीचा कसलाही पावशेर घ्यावा, असे मला कधीही वाटले नाही. म्हणजे मी शूर वगैरे आहे, असे अजिबात नाही. मला खूप भीत्या वगैरे आहेत. पण, बायपास या गोष्टीची मला कधीच भीती वाटली नाही, हेसुद्धा माझ्या भीत्यांइतकेच खरे आहे. मी परत एकदा विचार करत राहिलो. विचार करता करता दही खात राहिलो. मला दत्ताचा विचार पटत गेला. एका क्षणी मी त्याला म्हटले – ‘खरे असणार तुझे!’
दत्ताने आठवे मडके माझ्या समोर ठेवले.
ते उचलून त्यात चमचा बुडवता बुडवता मी खोल विचार करत राहिलो. एकाच वेळी मैत्रिणीने दिलेला सल्ला मोडणे आणि तिने दिलेल्या सल्ल्याविषयी कृतज्ञ राहणे, या दोन गोष्टी वेगळ्या होत्या. अगदी खरे! पण जे खरे आहे ते योग्य असतेच का?
या विचाराबरोबर माझ्या मनात एक ‘डीप क्रायसिस’ तयार झाला. कुणाचा सल्ला मानावा? मोहनाचा की दत्ताचा? एका बाजूला मोहनाची मैत्री आणि दुसऱ्या बाजूला दत्ताची मैत्री. काय करावे?
एक मैत्रीण आणि एक मित्र यांचे सल्ले क्लॅश झाले की, पूर्वी मला मैत्रिणींचे सल्ले पटत. ‘नॅचरल’ होते ते त्या वयात! पण आता वय वाढल्या नंतर त्या पूर्वीच्या उसूलावर चालणे योग्य होणार होते का?
..................................................................................................................................................................
दत्ता म्हणत होता ते योग्य होते. लाईफ ही एक प्रगतीची मालिका असायला पाहिजे, हा विचार बरोबर असावा. मानवी जीवन म्हणजे सततची प्रगती, असे अध्यात्म म्हणते ते खरे असावे. हे मायेमध्ये गुरफटलेले जग सुटले की, पुढे काही तरी ग्रेट असणार. दारूच्या फालतू मोहाच्या पलीकडे सिंहगडाचा ग्रेट मोह होता तसा! हा मोह सोडला पाहिजे. मी दहावे मडके बाजूला सारले.
.................................................................................................................................................................
क्रायसिस हा असा प्रकार आहे की, तो एकट्याने कधी येत नाही. एकमागून एक क्रायसेस येत राहतात. या जगाच्या सुरुवातीपासूनची ती पद्धत आहे.
क्रायसेस एकट्याने का येत नाहीत, हा फार गहन प्रश्न आहे.
त्या गहन विचारातच मी नववे मडके घेतले. मी विचारात असलो की, मला काहीतरी चाळा हवा असतो. त्यामुळे विचारांमुळे येणारी भावनिक अस्वस्थता कंट्रोल होते. भावनिक अस्वस्थता कंट्रोल झाली नाही, तर विचार भरकटतात. विचारांना मार्गावर ठेवायचे असेल तर काहीतरी चाळा असावाच लागतो. पूर्वी, बायपासच्या आधी मला सिगरेट लागायची, आता चहा किंवा कॉफी लागते. तिथे समोर दही असल्याने मी दही उचलले इतकेच. मी नववे मडके उचलले, तेव्हा त्या क्रियेमध्ये मोहनाच्या सल्ल्याच्या विरोधात असे काही नव्हते आणि दत्ताच्या सल्ल्याच्या बाजूचे असेही काही नव्हते.
आता नऊ मडकी झाल्यावर मजा आली होती. पांढरे आणि लाल मीठ पेरून पेरून दही खाल्ल्याने गड चढताना घामाबरोबर वाहून गेलेली शरीरातली मिनरल्स परत एकदा शरीरात आली होती. सगळा थकवा निघून गेला होता.
नववे मडके झाल्यावर मी निकराने दत्ताला म्हटले, ‘ ‘मोहना लिमिट’ आपण पाळायलाच पाहिजे. आपल्या आत्म्यांनी आपली शरीरे लवकर सोडायची नाहीत असे ठरवले असले, तरी डॉक्टर नावाची काही चीज आहे की नाही या जगात? आणि मैत्री? ती एवढे सांगते आहे, आपण ऐकलेच पाहिजे. आपण आपल्या मोहातून सगळी अर्ग्युमेंटस् करतो आहोत. आपले मोह आपण आवरले पाहिजेत. आपल्या ग्रूपमध्ये कितीतरी मध्यममार्गी लोक आहेत. श्रीकांत चारच मडकी खातो, देशपांडे मॅडम तीनच खातात. आपणसुद्धा त्यांच्यासारखं झालं पाहिजे. शेवटी, आपले आत्मे तळ ठोकून बसणार आहेत, म्हणून आपण मध्यममार्ग सोडायचे काय कारण आहे? इतरांना नाही का थोडक्यात गंमत येत? आपल्या आत्म्यांना आपल्याला सोडायचं नसेल, पण आपण अध्यात्म का सोडायचं? माझ्या शाळेतली मैत्रीण प्रेमानं मला सांगते आहे. मी ऐकायचं नाही? तिला माझ्याकडून काही नको आहे. आम्ही शाळेतला काळ एकत्र घालवला, त्या सुंदर असोशिएसनमधून ती बोलते आहे. लहान मुलांमध्ये एक निर्मळ माया असते, ती माया तिने तिच्या कळत-नकळत जपली आहे. त्या मायेतून ती बोलते आहे. आपण आदर करायला पाहिजे त्या रेअर भावनेचा!’
दत्ता माझ्याकडे बघत राहिला. मी म्हणालो, ‘मोह सुंदरच असतात. मोह एवढे स्ट्राँग असतात, कारण ते अतीव सुंदर असतात! इंद्रिये सुंदर आहेत, त्यांच्या संवेदना सुंदर आहेत आणि त्यातून येणारे मोहसुद्धा सुंदर आहेत. आपण काही मूर्ख नसतो, मोहात अडकतो तेव्हा. हे दही ही एक चव नाहीये फक्त. तो एक अनुभव आहे. तो जिवंतपणा आहे.’
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
दत्ता म्हणाला, ‘आपण आपल्या संवेदनेनं जगतो आहोत आणि मरतो आहोत. मोहनाची एक संवेदना आहे. त्या संवेदनेनं ती जगते आहे. यात कोणी कोणाला रिस्पेक्ट करायचा प्रश्न नाहीये.’
दत्ता त्याच्या विनोदाच्या ‘डीफॉल्ट सेटिंग’मधून बाहेर येऊन कधी गंभीर होईल हे सांगता येत नाही. दत्ता परपेच्युअली विनोदाच्या सेटिंगमध्ये असतो तेच चांगले असते. नाहीतर नको असलेली सत्य आपल्या तोंडावर येऊन आदळत राहतात.
दत्ता बोलत राहिला – ‘आपण जेवढ्या डीसेंटली जगता येईल तेवढं जगत राहायचं. आणि स्वतःशी तरी खरं बोलायचं. तू दारू सोडलीस, सिगरेट सोडलीस - सिंहगड चढून जाण्यासारखे वरच्या स्तरावरचे आनंद तुला कळले, तेव्हाच सोडल्यास ना तू या गोष्टी?’
दत्ता योग्य बोलत होता. मी स्वतः साठी हे मोह सोडले होते, अध्यात्मासाठी नाही. आणि मुख्य म्हणजे, मला गडाचा मोह मिळाला नसता, तर मी दारूचा आणि सिगरेटचा मोह सोडलाच नसता.
थोडा वेळ गेला आणि माझ्या मनात विचार आले – ‘आता या गडाच्या मोहाच्या पलीकडचे सुंदर मोह काय आहेत? मी तर एका मोहाकडून दुसऱ्या मोहाकडे वाहत जाणारा माणूस आहे.’
मी दत्ता कडे वळून म्हटले – ‘तुझी माझी धाव आहे मोहापासून मोहाकडे…’
दत्ता हसला. म्हणाला, ‘इतके दिवस तू स्वतःच्या संवेदनांमध्ये जगलास. आता दुसऱ्याच्या संवेदनांसाठी जग. खऱ्या अर्थाने दुसऱ्यांचा रिस्पेक्ट कर. ते तुझे पुढचे व्यसन असेल, तो तुझा पुढचा ‘हाय’ असेल.’
दत्ता म्हणत होता ते योग्य होते.
लाईफ ही एक प्रगतीची मालिका असायला पाहिजे, हा विचार बरोबर असावा. मानवी जीवन म्हणजे सततची प्रगती, असे अध्यात्म म्हणते ते खरे असावे. हे मायेमध्ये गुरफटलेले जग सुटले की, पुढे काही तरी ग्रेट असणार. दारूच्या फालतू मोहाच्या पलीकडे सिंहगडाचा ग्रेट मोह होता तसा!
हा मोह सोडला पाहिजे. मी दहावे मडके बाजूला सारले. दत्ताने ते परत माझ्याकडे सरकवले. म्हणाला, ‘तुला मोहनाचा सल्ला मानायचा असता, तर तू इतकी चर्चाच केली नसतीस. सिंहगडावर जाणे चांगले की, वाईट ही चर्चा तू करतोस का? तुला मोहनाच्या भावनांना रिस्पेक्ट करायचे आहे हे खरे आहे, पण तू आत्ता या क्षणी तिला रिस्पेक्ट करत नाहीयेस हे सुद्धा तेवढेच खरे आहे.’
मी मुकाट्याने दहावे दही खायला सुरुवात केली.
मी दत्ताकडे बघत म्हटले, ‘मी मोहनाला रिस्पेक्ट करत नाहीये ही खरी गोष्ट आहे. पण तिच्या भावनांना रिस्पेक्ट करावेसे वाटणे, हीसुद्धा एक मोठी गोष्ट आहे.’
दत्ता म्हणाला, ‘कसली मोहना आणि कसले काय? खरं तर आपण एकटे असतो.’
दत्ताने रामदासांच्या ओळी त्याच्या फोनमध्ये सेव्ह केल्या होत्या त्या दाखवल्य- ‘ते माया खेळ खेळे येकली। ते मायेनेच विराली पाहिजे माया।’
मायेचा खेळ एकट्यानेच सुरू असतो. मायेचा एक भाग म्हणून तुम्हीसुद्धा एकटे असता. आणि मायेच्या आवर्तात गटांगळ्या खाणारेसुद्धा तुम्ही एकटेच असता.
दारू, सिंहगड, दुसऱ्याच्या संवेदना रिस्पेक्ट करणे, सगळी मायाच. सगळेच खोटे.
दही कमी खाऊन काहीच होणार नव्हते, जास्त खाऊनही काही होणार नव्हते. कारण जन्म खोटा आणि मरणही खोटे.
..................................................................................................................................................................
आज गडावर गेल्यावर मडक्यांची चवड आली. मी दत्ताला म्हटले - मोहनाने चार-पाचच मडकी खायला सांगितली आहेत. दत्ता म्हणाला- का? त्यावर मी बायपास चर्चा सांगितली. चार-पाचचे लिमिट सांगितले. त्या लिमिटला मी ‘मोहना लिमिट’ असे नाव दिले. दत्ता म्हणाला, ‘किती लकी आहेस तू? तुझी बायको तुझी काळजी घेते. आणि तुला तुझी काळजी करणाऱ्या मैत्रीणीसुद्धा आहेत!’ मी म्हटले, ‘मोहना मोठी डॉक्टरही आहे.’ दत्ता म्हणाला, ‘तुला तुझी काळजी करणाऱ्या डॉक्टर मैत्रिणीसुद्धा आहेत.’ मी म्हटले, ‘आपण ‘मोहना लिमिट’ मानले पाहिजे.
.................................................................................................................................................................
मला अध्यात्मातले फारसे येत नाही, मला प्रचिती आलेली नाही. मला अध्यात्मातल्या तत्त्वज्ञानात्मक पोझिशन्स माहीत आहेत इतकंच. अध्यात्मातले विचार हे एका ग्रेट फिलॉसॉफिकल फ्रेमवर्क आहेत, असे माझे मत आहे.
माया ही एकटी आहे आणि त्या मायेत मीसुद्धा एकटा आहे. मला ही तत्त्वज्ञानात्मक पोझिशन्स माहीत आहे, मानवी एकटेपणाचे निखारे मलासुद्धा अधूनमधून लागत असतात. आणि, तरीही मला सगळ्यांशी रिलेट व्हायचे असते. सिंहगड, त्याचा निसर्ग, ते दही, तो अनुभव, तो बायोकेमिकल्समुळे येणारा ‘हाय’, आणि ते सगळ्यांशी आपण अटॅचड् असल्याचे समाधान. आणि गंमत म्हणजे या सगळ्यात मी मोहनालासुद्धा ओढत होतो.
मी या सर्व मोहांचा विचार करत राहिलो... दारूच्या मोहाच्या वर गडाचा सुंदर मोह होता, त्याच्यावर दुसऱ्याच्या भावनांना रिस्पेक्ट करायचा मोह होता. एकावर एक अशी मोहांची किती गगने?
मला रामदासांच्या ओळी आठवल्या – ‘गगनीं गंधर्व नगरे। दिसताती नाना प्रकारें। नाना रूपे नाना विकारें। तैसी माया।’
मी प्रगती करत राहणार होतो, म्हणजे मोहाचे एकाहून एक सुपिरियर गगन चढत जाणार होतो. कितीही प्रगती केली तरी माझ्या हाती फारसे काही लागणार नव्हते.
मी पुढचे मडके ओढले.
दही खात असतानाच कानात कुमार गंधर्वांचे ‘सुनता हैं गुरू ग्यानी’ घुमू लागले. गडावर सकाळी सकाळी शास्त्रीय संगीत ऐकणारी एक जमात आहे, त्यातल्या कुणीतरी ‘सुनता हैं’ लावले होते.
कुमार कबीरांचे शब्द आळवत होते -
‘गगन मंडलू में गौ बियानी भोई से दही जमाया।
माखन माखन संतों ने खाया छाछ जगत बापरानी।।’
गगनाच्या गाभाऱ्यात ती शक्तिरूपी गाय व्याली आहे. हे जग म्हणजे तिच्या दुधाचे दही आहे. संत लोक या दह्याला घुसळून अंतिम श्रेयाचे माखन खाऊन जातात. बाकी जग मात्र ताक ओरपत बसते.
एक अतिशय मोठ्ठे रूपक - आद्य क्रिएटिव्ह इम्पल्स मुळे मॅटर तयार झाले. अणु-रेणू तयार झाले. हे एकत्र अरेंज होत गेले आणि या विश्वाचे दही तयार झाले. हे जीवन जगून जगून, हे दही घुसळून घुसळून, संत लोक त्या आद्य क्रिएटिव्ह इम्पल्सच्या प्रेरणेपर्यंत गेले. दह्यात लपलेल्या मूळ तत्त्वापर्यंत गेले.
सिंहगडावर एक सुंदर झुळुक आली. खाली दरीत अथांग धुके भरले होते. खरं तर हे सगळेच दही होते.
आंबट गोड दही. यात प्रेम आणि राग एक होता, एखाद्या रंगाने व्यस्त होऊन राहणे आणि तटस्थ राहणे एक होते. स्त्री म्हणून असणे आणि पुरुष म्हणून असणे एक होते. जन्म आणि मृत्यू हे एकच होते. सगळी व्यसनेच! नशिबात आलेल्या गोष्टींशी विषेशत्वाने त्यांचे होऊन राहणे.
मी कड्यावर उभं राहून खोल श्वास घेतला. हे विश्वाचे दही फुकट होते. पूर्वी मी साठ एमएल दारू २४० रुपयांना घेत होतो. त्यानंतर मी ५० एमएल दही २० रुपयांना घेऊ लागलो. विश्वाचे हे दही फुकट होते. आणि मुख्य म्हणजे इथे ‘मोहना लिमिट’ नव्हते.
गडावरून आलो की, मी दुपारी झोपतो. तसाच मी आजही गाढ झोपलो. मला एक स्वप्न पडले. डॉ. जयंत नारळीकर एका मोठ्या फळ्यावर गणिते सोडवत होते. मी त्यांच्या वर्गात बसलो होतो. ते सोडवत असलेले गणित सुटल्या सुटल्या आम्हाला या जगाचे अंतिम श्रेय सापडणार होते. आम्ही दोघेही मोहांच्या गगनांच्या पार जाणार होतो. मी घाबरून उठलो. मला जगाचे अंतिम श्रेय गणिताच्या मार्गाने नको होते. कॅल्क्युलसच्या लिमिटलेस घसरगुंडीवरून घसरत जाता जाता जगाचा मूळ अर्थ कळणार असेल तर काय गंमत?
मला का कुणास ठाऊक कबीराचा मार्ग भारी वाटला. जगाचे अंतिम श्रेय अध्यात्ममार्गानेच मिळण्यात मजा आहे असे वाटले.
मी परत एकदा झोपलो. डॉ. नारळीकर ते गणित सोडवतच होते. मी त्यांना विचारले – ‘प्रिय सर, गणितात सिंहगडाएवढा रोमान्स आहे का?’
ते शांत राहिले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मी मनात म्हटले, ‘असणारच! नाही तर तुम्ही कशाला इतकी वर्षं गणित करत राहिला असता? ते शांतपणे हसले.’
मी त्यांना विचारले, ‘गणित हे दही आहे की लोणी की केवळ एक रवी?’
ते काहीच बोलले नाहीत.
मी डॉ. जयंत नारळीकर यांच्या वर्गातून उठलो आणि बाहेर निघून गेलो. मला जगाचा अर्थ, गणितातून निघालेला केवळ एक निष्कर्ष म्हणून माझ्या हाती लागायला नको होता. मला तो माझ्या मनाच्या आणि बुद्धीच्या धुक्यातून सुवर्ण प्रकाशरूपाने मला भेटायला यायला हवा होता. तोसुद्धा मी सिंहगडाच्या कड्यावर धुक्यात बसलो असताना. डॉ. नारळीकरांना गणितात रोमान्स वाटत असेल. मला वाटत नव्हता. गडाच्या धुक्यात अंतिम सत्य भेटायला यावे, हा माझा रोमान्स आहे… तो माझा अल्टीमेट मोह आहे!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment