‘नवल’ कादंबरीवर वाचकांनी दिलेल्या काही प्रतिक्रियांमध्ये एक मुद्दा हमखास आढळतो, तो असा –
“एका विशिष्ट कथारूपाला धरून चालणारी... म्हणजे एकमेकांना अनुसरून, एका रेषेत घडत जाणाऱ्या घटनांची मालिका (यात नाही).” (नितीन पाटील, साहित्य सौरभ, आकाशवाणी, पुणे अ केंद्र, मार्च २०२१)
“हे… घटनेला रंगवून सांगणारे लक्षवेधक कथाकथन नव्हे.” (समीर दळवी, फेसबुक)
“शैली कशी आहे? कथेची पात्रं काय करत आहेत? भोवताल काय आहे? ह्या गोष्टीत मी गुंतत नाही.” (विजय बेंद्रे, फेसबुक)
“मागे काय काय घडत आले हे तुमच्या लक्षात राहीलच असे नाही आणि पुढे काय होईल याची उत्सुकता ताणणारेही काही नाही. घटनांची सलग साखळी नाही… कथानक असे काहीच नाही… इथे वस्तूंना वा घटनांना त्यांचे असे वजन वा मूल्य नाही… म्हटले तर ही कादंबरी कुठूनही वाचता येते.” (चं. प्र. देशपांडे, फेसबुक)
“I would like to return to some of the passages to savour them again, but the novel's fragmented yet unified structure without any recognisable markers would make it impossible.” (शांता गोखले, फेसबुक)
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गंगाधर गाडगीळांच्या ‘तलावातले चांदणे’ या कथेविषयी रा. ग. जाधव लिहितात, “भरघोस अशी कोणतीच घटना या गोष्टीत नाही… तिची वीण घटनाक्षीण आहे.” (मूळ लेख : तलावातलं चांदणं, ‘निळे पाणी’, १९८२; ‘निवडक समीक्षा’, २००६ मध्ये समाविष्ट)
शांता गोखले पुढे ‘नवल’विषयी लिहितात, “The observer makes the observed ‘in his own image’, allowing the reader to experience the material world, including people, anew.”
जाधव ‘तलावातलं चांदणं’विषयी लिहितात, “त्यातल्या घटना, घटना म्हणून सर्वसामान्य लोकांसारख्या आहेत हे खरे; पण सर्वसामान्य नसलेल्या मन:स्थितीमुळे, त्या घटनांचा पुनःप्रत्यय जगावेगळा ठरला आहे… चिरपरिचित (दृश्यांना) एक आगळी अर्थपूर्णता नायकनजरेत लाभलेली आहे. किंबहुना, ज्या ज्या आठवणींतून असा अर्थ नायकाला जाणवत आहे, त्या त्या आठवणीच फक्त या कथेत अवतरल्या आहेत.”
घटना म्हणून दखल घ्यावी की, पार्श्वभूमी समजून जरासं बेदखल करावं अशा पेचात पाडणाऱ्या, क्षणिक, क्षुल्लक वाटणाऱ्या, पण अर्थातच निवेदकाला नोंदवाव्याश्या वाटलेल्या मूर्त-अमूर्त घडामोडींमधून (गणेश विसपुतेंनी त्यांना ‘भूसुरुंग’ म्हटले आहे) जे लहान मोठे अर्थउत्स्फोट होतात, त्यातून फुटतील त्या दिशांना ‘नवल’ घरंगळते.
‘तलावातलं चांदणं’मधल्या त्यांना जाणवणाऱ्या सलगतेच्या आणि एकरेषीयतेच्या अभावाविषयी जाधव लिहितात, “या कथेतील दाम्पत्यजीवनाचे चांदणे नायकाच्या स्मृतिरूप तलावात पडताना थोडेसे विस्कटलेले आहे.” हे विस्कटलेपण पती-पत्नी संबंधांतल्या विषमतोलात असावं असं सुचवत जाधव लिहितात, “या कथेला कथेतल्या नायिकेचे स्वगत अनुकूल ठरले नसते. त्या स्वगताला कदाचित सुशांत पाण्याची - त्यातल्या विलोल चांदण्याची नव्हे - कळा प्राप्त झाली असती.” लिंगभेदाच्या परिप्रेक्ष्यातून माया पंडित कदाचित सुचवतील की, नायिकेचं स्वगतदेखील फार ‘सुशांत पाण्या’सारखं झालं नसतं. (सुधा जोशी, ‘तलावातलं चांदणं : कथेला लाभलेलं मुक्तांगण’, ‘अंतर्नाद’, दिवाळी २००६).
दाम्पत्यजीवनाविषयी बाळगलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे होणारी, ‘‘भ्रामक”, ‘‘अनैसर्गिक’’ (‘विकृत’सुद्धा म्हटलं आहे), ‘‘मानसिक द्वंद्वात डळमळणारी’’, ‘‘विलोल’’, “फार काळ न टिकणारी’’, “निसटती’’ मन:स्थिती, जी “अस्पर्श’’, “अश्रोतव्य’, “अनिवेदनीय’’ असते, ती अस्वाभाविकरित्या निवेदनबद्ध झाल्यामुळे, निवेदन विस्कळीत झालं असावं, असंही जाधव सुचवतात, असं वाटतं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘तलावातलं चांदणं’मधले आठवणींचे कढ एका अनुपस्थित सहानुभवी सहचराला अनुलक्षून येतात. ‘नवल’मधलं सोनकुळेच्या तरल, प्रवाही, अनिश्चित, अंतस्थतेत उगम पावणारं अंतर्मुख निवेदन एखाद्या लक्षणीय इतराच्या (significant other) अभावामुळे विकेंद्री किंवा लक्ष्यहीन राहत असावं. सोनकुळेची अंत:स्थ आंदोलनं, वेड्यावाकड्या वळणांनी वाहणारे स्थिर-अस्थिर विचार, घडोघडी होणारे अर्थांचे प्रासंगिक उत्स्फोट या सगळ्याला ‘नवल’मधले दैनंदिन व्यवहार एक कथात्म बाज देतात. त्याला आवश्यक अशी मूर्तता, घनता, तपशील पुरवतात. आणि लगोलग, तुकड्यातुकड्यांच्या, विरविरीत निवेदनात शांता गोखलेंनी म्हणलंय तशा ‘gossamer’ किंवा ‘तलावातले चांदणे’विषयी जाधव लिहितात, तशा ‘घटनाक्षीण विणी’च्या बासनात बांधले जाऊन ते विस्मृतीच्या पोटमाळ्यात दाखल होतात. बेदखल होतात.
विसरणे, हरवणे, आठवणे, जणू आठवणे, देजॅ वू, दिवास्वप्न, घडलेले-न-घडलेले इतिहास इत्यादी मनाचे खेळ कादंबरीभर जाणिवांचं, सुबोध मनोव्यापारांचं अंतर्बाह्य अपुरेपण सूचित करतात. सोनकुळेला वाटतं, “गाफील राहून चालणार नाही. (पण) म्हणजे काय करायचं नेमकं? कशाची चाहूल घ्यायची? आपण किती सजग राहू शकतो? किती काळ? कशाचे तुकडे जुळवायचे? कशाकशाचे?” कधी कधी झोपेतून जागं होत असताना त्याला वाटत राहतं “असं स्वप्न त्याला पूर्वी पडलं आहे. आता ते त्याला दिसतंय की आठवतंय? माहोल झोपेचाच आहे, रात्र आहे, वस्तू अजून जाग्या आहेत आणि झोपत असताना वाचताना… उजाडलेल्या जडावलेल्या संज्ञेत ते स्वप्न येतंय.” छत्री हरवते तेव्हा सोनकुळेला “आठवण येते, जाते, छत्री कुठवर बरोबर होती-नव्हती ते धूसर आठवतं, नाही आठवत.” “आठवणीतल्या आठवणीत पसार झाली छत्री” असं वाटून तो बावचळतो. चं. प्र. देशपांडे लिहितात, “शेवटाच्या भागात येणारे छत्री हरवण्याचे प्रकरण नंतर पूर्ण कादंबरीवर त्याची छाया टाकते.”
सोनकुळेच्या विश्वात ‘विस्मृती’ ही केवळ स्मरणाच्या प्रांताबाहेर, पण जाणिवेच्या सीमेत कल्पिलेली एखादी संज्ञा नाही, तर ती एखाद्या प्राणभूत इंद्रियाच्या मोलाची असावी असं वाटतं. तीच गोष्ट विस्कळीतपणाची. जाधवांना जाणवणाऱ्या ‘तलावातलं चांदणं’मधल्या विस्कळीतपणावर त्यांनी उणेपणाचा, अनैसर्गिकतेचा ठपका ठेवला आहे, तर, ‘नवल’मध्ये विस्कळीतपणा अस्तित्वाच्या, अभिव्यक्तीच्या एखाद्या अंगभूत वैशिष्ट्याच्या रूपात मिरवतो असं वाटतं. त्यात सलग सुसंगत वास्तवाचं विस्कळीत वर्णन नाही; तर, अस्ताव्यस्त वास्तवाचं अंदाधुंद निवेदन असावं किंवा आकाशातल्या इतस्ततः पसरलेल्या चांदण्याचं तलावात विखुरलेलं प्रतिबिंब आहे, असावं असंच वाटतं.
‘तलावातलं चांदणं’मधल्या स्मृती-विस्मृतीच्या खेळामुळे प्रक्षेपित होणाऱ्या विस्कळीतपणाकडून, आणि त्यातल्या त्यांना न सापडणाऱ्या कथानकाच्या शोधाकडून जाधव आपलं लक्ष त्यातल्या ‘आगळ्या अर्थपूर्णतेकडे’, ‘काव्यात्म मन:स्थितीच्या सूराकडे’ वळवतात; तर ‘मिसळ पाव’मध्ये ‘नवल’विषयी पाटील सोनकुळेच्या ‘भावनाप्रदेश/विचारप्रदेशाकडे’ लक्ष वळवत लिहितात, “तसं बघायचं झालं तर ही कादंबरी नाहीच आहे! निवांत पसरलेल्या अजगरासारखी विस्तीर्ण अशी तीनशे पानांची लांबलचक कविताच आहे ही!!”
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कथात्मतेच्या निकषावर ‘नवल’मधल्या घडामोडी कुणाला नगण्य आणि निमित्तमात्र वाटत असल्या तरी, त्यांना आगळीवेगळी अर्थपूर्णता बहाल करणारी, पाटील लिहितात त्याप्रमाणे “ ‘नवल’ची ओळ न ओळ, अगदी विरामचिन्हांसकट सगळा मजकूर… पॅराग्राफच्या पॅराग्राफ, वाक्यामागून वाक्यं, छोटी छोटी मग्न वाक्यं” या सगळ्यात ‘नवल’चा जीव सारख्याच जिव्हाळ्याने वसतो. शांता गोखले लिहितात “It lives in its detail”.
‘नवल’मध्ये इंद्रायणी जशी ‘‘पाण्याच्या पावलांनी चालते’’ तशी ‘नवल’ त्यातल्या एकेका संज्ञेच्या आणि एकेका संज्ञासमूहाच्या पावलांनी उलगडते. पाण्यासारख्या निसटत्या आणि निसरड्या विश्वाचे ‘‘तळ, पाताळ’’, ‘‘कल्पनेतली... स्मृतिस्वप्नांमधली... भौतिक-अभौतिक सत्तांमधली... अधांतरं’’, ‘‘अधांतराला आधार देणारा अधोलोक’’, ‘‘अंतराळं’’, ‘‘तुटक वास्तवं’’ इत्यादी पसाऱ्यात कुठेही, कसाही, कादंबरीचा नायक/निवेदक एखाद्या ट्रॅपेझ आर्टिस्टच्या चालीत चालतो.
त्यांच्या जोडीला ‘नवल’मधल्या सर्वसंचारी भाषेची पावलं किंवा तिचे लांब हात थेट नेणिवेपर्यंत किंवा मौनापर्यंत पोचताना दिसतात. सोनकुळेच्या ‘‘नेणिवेत (काही) निक्षून घोकलं जात असतं.’’ ‘नवल’मधला एक लेखक “अशब्द’’ पण विधानांसारखी विसंगत, असंबद्ध, भरमसाठ किंवा ‘‘अद्वातद्वा नेणीव सांगत जातो.’’ ‘‘कल्पनाशक्ती… ज्या अबोध स्तरावर… गुपचूप उभी राहते’’ तिथेही ‘‘तिला... शब्दांची भीती वाटते.’’ ‘‘कंठात सुप्त शब्द असतात.’’ एखाद्या शब्दवजा चिन्हासारखं ‘‘मौन संक्रमित होतं.” संक्रमित होऊ शकेल अशी सकार मिती त्याला असते.
सोनकुळेचं बोलणं बरेचदा न-बोलण्यासारखं असतं. ‘‘कधी तो स्फुट-अस्फुट बोलत राहतो... कधी धुमसतो’’, तर कधी ‘‘काहीतरी वाटण्याच्या, प्रति-वाटण्याच्या, प्रति-प्रति-वाटण्याच्या प्रत्युत्पन्न वर्तुळात उभा असतो आणि कशाचं काही ठरत नसतं, कशाला ठहराव नसतो.” गावाकडून शहरात यायची तयारी करताना त्याला वाटतं, दुसरीकडे जाऊन आपण नुसतं ‘‘भटकत-लटकत रहायचं.’’ ‘‘(दोन अधिवासांच्या दरम्यान पुन्हा पुन्हा ये-जा करणाऱ्या स्थलांतरित पक्षांसारखे)’’, भाव आणि भाषांचे लोलक ‘नवल’मध्ये संज्ञा-प्रतिसज्ञांच्या किंवा शब्द-प्रतिशब्दांच्या दरम्यान, कुठे रुजू होतात, तर कुठे रुजू होत नाहीत. जसं-
“स्थलांतर करणारे पक्षी… ‘समाधानाचा वा असमाधानाचा’ सुस्कारा सोडल्यासारखे परत फिरतात.”
“कबुतरांवरचं खिन्न लक्ष कंटाळून वर जातं; वरच्या ‘रंगावर, अरंग रंगावर’ जातं.”
“ ‘अकळत-नकळत’ हा मोठ्यांच्या जगातला लहान मुलगा होऊन गेला होता.”
“विचार गावातल्या वातावरणातून त्याने ‘नकळत—किंवा कळत’— वेचलेला” असतो.
“ ‘हे कधीतरी आपल्या कामी पडू शकेल’ अशा ‘बेहिशेबी हिशेबा’ने तो ते… दृश्य” पाहतो.
“ ‘ओशाळून, संकोचून, कातावून, वैतागून, धुमसून’ हा म्हणतो: नाही, नाही, नाही. मग हसतो.”
“तो ‘बेसावधपणे सावध’ असतो.”
“त्यांना त्याच्या ‘शक्तीची-अशक्तीची’ काहीच कल्पना नाही.”
“ ‘छोटा समाज नि मोठा समाज, वेगळा समाज नि सगळा समाज, समाजाचे समज-गैरसमज’ असं सगळं डोक्यात भिरभिरून तो तिथून निघून जातो.”
“ ‘खरं-खोटं’ त्याला माहीत नाही. अर्थात ‘समज-गैरसमज’ किंवा ‘अफवा-आख्यायिका’ या गोष्टींची शहानिशा होऊ शकत नाही.”
“कुठे कुठे ‘स्पष्ट-अस्पष्ट’ आरोहण-वाटा. सिनेमाच्या सेटसारखे हे डोंगर आहेत. ‘खोटे पण खरे.’ ”
वगैरे वगैरे.
एकेका सौम्य-तीव्र अर्थी-द्वैताच्या दरम्यान असलेल्या अनेक मिश्रछटांमधून नेमकी छटा शब्दांत टिपण्यासाठी किंवा शब्दांनी गोंदवण्यासाठी थरथरणारी अक्षरांची सुई कधीकधी संज्ञांचे, वस्तूंचे, व्यक्तींचे नव्याने नामकरण करून नेमकेपणाचा, खऱ्याखोट्याचा प्रश्न तिथल्या तिथे, तिथल्यापुरता सोडवते.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
‘नवल’मध्ये दुर्वेनी सांगितलेल्या गोष्टीतला परीस हा ‘‘काल्पनिक पदार्थ असतो. परीस अस्तित्वात नसतो’’, पण दुर्वेनी दाखवलेला दगड त्याच्या मते परीसच असतो, ‘‘कारण तो त्याला ‘परीस’ म्हणतो.” फिक्शनमधल्या चिजा अशा ‘स्वप्रमाण’ असतात, ‘खरं सांगणाऱ्या खोट्या असतात’, ‘खऱ्याहून खऱ्या’ असतात, असं कायकाय ऐकिवात आहे. दुर्वेच्या गोष्टीत जसा ‘‘परीस आणि कसवटीचा दगड एकच असतो’’, तसे ‘नवल’मध्येदेखील ठिकठिकाणी ‘‘गवतरंगी गवत’’, ‘‘पोकळ पोकळी’’, ‘‘चहासारख्या चवीचा चहा’’, ‘‘माणसांसारखी माणसं’’, ‘‘पुरुषासारखा पुरुष’’, ‘‘दुर्वेसारखा दुर्वे’’ इत्यादी आहेत.
‘नवल’मध्ये ‘‘लिओनार्दोचा चरित्रकार… लिओनार्दोच्या चित्रातल्या कपड्यांवरच्या छायाप्रकाशाच्या चुण्या पाहून म्हणतो : खरं कापडही एवढं खरं कधी दिसत नाही.’’ त्या चालीत म्हणता येईल, गाडगीळांच्या कथेत विस्कटलेलं तलावातलं चांदणंच जास्त खरं वाटतं.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा : ‘नवल’चा नायक सोनकुळे पुलावरून नाही तर थेट पाण्यावरून चालत असल्यासारखा “पायवाट न पाडता” हिंडतो-फिरतो, अतिअंतर्मुखतेच्या महाप्रलयी पाण्यावर…
..................................................................................................................................................................
आणि इकडे सोनकुळेला वाटत असतं, “भर उजेडात तो स्वप्नसंज्ञा. म्हणजे तो सोडून बाकी सगळं खरं आहे.” “सर्व जागच्या जागी आहे. ते कुणीतरी मानलं आहे जणू किंवा हातच्याला ठेवलं आहे. आपण असे उरलेले.” रिते. ओसाड. त्याला ‘‘काही वैशिष्ट्य नाही’’. “(स्वत:चं) उत्खनन करून त्याला उजाड होऊन जायचं असतं.” “त्याच्यापाशी हृद्गत वगैरे नाहीये. त्याची काही गुजगोष्ट नाहीये… खिशात काही नाही; खरंच काही नाही. खिशात नाही; कपाटात नाही; खोलीत नाही; मनात नाही… मी फक्त मी आहे; दिसतो तेवढाच आहे; माझ्याकडे फक्त मीच आहे.” वगैरे. वगैरे.
असं रिकामपण ही सोनकुळेला इष्टापत्तीच वाटते. माणूस असाच असायला हवा असं त्याला वाटतं. “रिकाम्या, सामानसुमान नसलेल्या, आकाश-चौकस खोलीसारखा. चाहूल-घेती, अंदाज-घेती, खुली, खूप खोली… सुनसान… खोलीत लहानसा आवाजही स्पष्ट ऐकू येतो. अजून कुणी ऐकतंय या जाणिवेच्या सावल्या डहुळतात, प्रतिध्वनींचे भास होतात.” असा रिकामा “अजाण माणूसच आकाश संवेदत नव्या विशिष्ट वस्तूकडे जाऊ शकतो.” असा “माणूस(च) कशातही गढून जाऊ शकतो.” जरी “मश्गूल माणूस रिकामाच (राहतो). दंग दिसतो पण असतो रिता, (तरी).” वगैरे वगैरे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सोनकुळेला अशा रिकाम्या ‘माणूस’रूपी, ‘स्व’रूपी खोलीचं रितेपण जाचू लागतं. “मोकळेपणाच नाकेबंदी करतो… साध्या साध्या गोष्टींचं अप्रूप वाटतं… साधी जटिलताही तिला मानवत नाही”, असं त्याला कळून चुकतं. “मग ही खोली सतत आक्रसत का राहते असं वाटून (त्याचा) कोंडमारा होतो.” आणि मग त्या ‘स्व’चं त्याला लोढणं वाटायला लागतं.
सोनकुळेला चोंग ह्योनजोंग कवितेत सुचवतो, “ ‘स्व’चं शुक्लकाष्ठ न कळणाऱ्यांसाठी आहे.” तरी ते बाळगायला लागतं. चोंग ह्योनजोंग ‘नवल’मध्ये लिहितो “मी शकत नाही l सोडून येऊ कुठेतरी स्वतःला I जशी विसरावी छत्री कुठेतरी I म्हणून मी इतकं सोसत राहतो II”
‘नवल’मध्ये सोनकुळे छत्री हरवतो. की नाही हरवत?
नवल – प्रशान्त बागड
पपायरस प्रकाशन, कल्याण
मूल्य – ४७५ रुपये.
..................................................................................................................................................................
माया निर्मला
maya.nirmala@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment