‘झिम्मा’ : वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या सात जणींची इंग्लंडला निघाली ‘टूर-टूर’
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘झिम्मा’ या सिनेमाचं एक पोस्टर
  • Tue , 07 December 2021
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा झिम्मा Jhimma हेमंत ढोमे Hemant Dhome सिद्धार्थ चांदेकर Siddharth Chandekar इरावती कर्णिक Irawati Karnik निर्मिती सावंत Nirmiti Sawant सुचित्रा बांदेकर Suchitra Bandekar मृण्मयी गोडबोले Mrinmayee Godbole क्षिती जोग Kshitee Jog सुहास जोशी Suhas Joshi सोनाली कुलकर्णी Sonalee Kulkarn सायली संजीव Sayali Sanjeev

शिकल्यासवरलेल्या स्त्रिया अजूनही स्वतःच्या आनंदासाठी काही क्षण व्यक्तिगतरित्या घालवण्याचा विचार करू शकत नाहीत. घर सांभाळणे हा पूर्ण वेळ करिअरचा पर्याय ज्यांनी निवडला आहे, त्यांचा ‘विकेंड प्लॅन’ अजूनही ‘हे काय म्हणतात ते विचारून सांगते’ असा असतो. नवरा पूर्ण वेळ करिअर करत असला तरीही त्याला आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी असते, परंतु घर सांभाळणाऱ्या स्त्रीला सुट्टी नसते.  त्यामुळे त्यांच्या शाळकरी मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जरी एखादा रविवार सर्व मैत्रिणींनी एखाद्या ठिकाणी जेवायला जाण्याचा बेत केला किंवा दिवसभर बाहेर जाण्याचा बेत केला, तरी अशा स्त्रिया तसा विचार करण्यास तयार नसतात. नवरा-बायको दोघेही स्वतंत्रपणे करिअरमध्ये गुंतलेले असतील तरीही स्त्रियांचा असा ‘आउटिंग’चा प्लॅन लगेच ठरत नाही. यामध्ये मुख्य कारण स्त्रिया कौटुंबिक कोषामधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विचार करत नाहीत.

यावर कोणी म्हणेल, हे चांगलेच आहे, त्यामुळेच आपली कौटुंबिक व्यवस्था टिकून आहे. परंतु हे काही त्याला खरे उत्तर नाही. स्त्रियांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त न करणे, अशीच सामाजिक व्यवस्था आपण पूर्वीच्या काळापासून तयार केली आहे. याचे मूळ आपल्या संस्कृतीमध्ये, पारंपरिक रीतीरिवाजामध्ये दिसून येते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अशा समाजरचनेमध्ये पुरुषांचे शालेय मित्र, कॉलेजचे मित्र, करिअरमधले मित्र असे विविध ग्रुप असतात, त्यांच्या पार्ट्या, मिटिंग ठरतात. शालेय मैत्रिणीचे ग्रुप निरंतर सुरू राहण्यात ‘लग्नानंतर नाव बदलणे’ हा एक मोठा अडथळा असतो. नाव बदलण्याबरोबर त्यांची ओळखच बदलून जाते, गाव बदलते, अनेक ठिकाणी खान-पान-वागणे-बोलणेसुद्धा अमूलाग्र बदलते. अशा अनेक कारणांमुळे कालांतराने स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती लोप पावते. तसेही बरेच पालक मुलींना, असे वागू नको-तसे करू नको-लग्नानंतर जड जाईल, अशी वाक्ये ऐकवत वाढवतात, ज्याचे परिणाम मुली आयुष्यभर भोगतात. अजूनही बऱ्याच मुलींना महाविद्यालयात जाण्यासाठी कोणा-ना-कोणाची सोबत लागतेच. कॉलेजमध्ये जाणाऱ्या आपल्या मुलीने एकटीने स्वतंत्रपणे विषय निवडावे, लांब अंतरावरच्या कॉलेजमध्ये एकटीने बसने जावे, असा दुरोगामी विचार करून मुलीला न वाढवता अनेक पालक आपली कन्या पूर्णपणे आपल्यावरच कशी अवलंबून राहील, याचाच विचार करतात. 

अशा बंधनांतून वाढलेली मुलगी अनेक निर्णयासाठी पुरुषावर अवलंबून असते. असा समाज पुरुष व्यवस्थेचा अहंकार जोपासणारा असतो, तोच पुरुषाला हवाहवासा वाटतो. या मुली लग्नानंतर अनेक वर्षे झाली तरीही कधी मैत्रिणींची दहा दिवसांची ट्रीप आयोजित करू शकत नाहीत. ‘इंग्लिश विंग्लिश’सारख्या चित्रपटामधून हे वास्तव प्रकर्षाने मांडले. ही ‘एक थप्पडही मारा है ना?’ असे प्रश्न निलाजरेपणाने विचारणारा समाज ‘थप्पड’सारख्या चित्रपटातून बघितला आहे. त्या वेळी आपल्याला वेगळे काही बघत आहोत, असे वाटलेच नाही. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटात हेच वास्तव आपल्यापुढे येते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या सात स्त्रिया ट्रॅव्हल कंपनीतर्फे इंग्लंडच्या ट्रीपवर जाण्याचे ठरवतात. नवऱ्यासमोर चार वाक्ये बोलताना चाचरणारी निर्मला पाटील (निर्मिती सावंत) एका राजकारण्याची पत्नी आहे आणि पहिल्यांदाच असे काही धाडस करते आहे. नवऱ्याच्या अकाली निधनानंतर आत्मविश्वास गमावलेली मीता (क्षिती जोग) स्वतंत्रपणे कुठेही बाहेर पडलेली नाही.  रिटायर झालेल्या आईला नातवंडांना सांभाळण्याचे पूर्ण वेळ काम करायला लावणाऱ्या मुलांच्या वागण्याला कंटाळलेली इंदू (सुहास जोशी) रोज लादलेल्या कामाला कंटाळलेली आहे. वैशाली – मैथिली या माय-लेक (सुचित्रा बांदेकर – सोनाली कुलकर्णी) दोघींमधल्या रोजच्या वाद-विवादाला कंटाळल्या आहेत आणि हवापालट करून नात्यामध्ये काही शोधू पहात आहेत. कृतिका (सायली संजीव) बंडखोर युवती आहे. कबीर (सिद्धार्थ चांदेकर) टूर मॅनेजर आहे, पण ‘बायकांच्या ट्रीप’चे मॅनेजर होणे, हे त्याला बिलकुल आवडलेले नाही. 

इरावती कर्णिक यांनी वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे स्वभाव चांगले रेखाटले आहेत, परंतु त्यांची एकमेकांत गुंफण अधिक चांगल्या पद्धतीने करता आली असती. टूर मॅनेजरचे महत्त्वाचे काम म्हणजे सर्व प्रवाशांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी रोज कल्पक खेळ आयोजित करणे. चित्रपटातला टूर मॅनेजर असे काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. हा कबीर कोणत्याही स्थळाची कोणतीही माहिती प्रवाशांना देत नाही.  

अभिनयाच्या बाबतीत क्षिती जोगने तिच्या आजवरच्या इमेजच्या विरुद्ध भूमिका करताना आत्मविश्वास गमावलेली स्त्री कमालीच्या शिताफीने उभी केली आहे. निर्मिती सावंत यांनी साकारलेली राजकारण्याची बायको कमाल आहे. सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव यांचा अभिनय उत्तम आहे. मृण्मयी गोडबोलेचे पात्र सुरुवातीचे गुजराथी ‘बेअरिंग’ नंतर सोडून देते, हे खटकणारे आहे, अर्थात ही लिखाणामधील उणीव म्हणता येईल. सिद्धार्थ चांदेकरने त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने केली असली तरी टूरसंबंधी काही काहीच मॅनेज न करणारा टूर मॅनेजर पटत नाही.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

सिनेमॅटोग्राफर आदित्य बेडेकर यांनी इंग्लंडचे सौंदर्य उत्तमरीत्या कॅमेराबद्ध केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ठीक आहेत. आदित्य बेडेकर यांना पार्श्वसंगीतामधून प्रत्येक पात्राला वेगळे संगीत देण्यास वाव होता. निर्माती क्षिती जोगने उच्च दर्जाची निर्मिती करताना हात आखडता घेतला नसल्याचे जाणवले. हेमंत ढोमे यांनी चित्रपट दिग्दर्शन करताना लेखनातील त्रुटीवर मात करण्याची काळजी घेऊन वेग वाढवता आला असता. हेमंत यांनी फैझल महाडिक या संकलकाच्या साथीने पहिल्या अर्ध्या तासात पकड घेतली असती, तर चित्रपट सुरुवातीलाच पुढच्या गिअरमध्ये गेला असता.         

प्रवास या विषयाला वाहिलेले अनेक उत्तमोत्तम चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये बघता येतात. ‘रोमन हॉलिडे’, ‘इन टू द वाइल्ड’, ‘सनराईज ट्रायोलॉजी’, ‘रेन मॅन’, ‘अबाउट श्मिड’, ‘नोमॅड लँड’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जब वी मेट’, ‘क्वीन’, ‘हनिमून ट्रॅव्ह्ल्स प्रा. लि’, ‘दिल धडकने दो’ असे चित्रपट ही त्यातील काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

एका स्त्रीला विचार करण्याचे स्वातंत्र्य गवसण्याची कथा ‘क्वीन’, ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये उत्तमरीत्या सांगितली आहे. प्रवासादरम्यान आपल्याला आपल्याच परिचयाच्या व्यक्तीचे वेगळे रंग दिसतात.  मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांमधील प्रवासामध्ये बदलणारे संबंध झोया अख्तर या दिग्दर्शिकेने कमालीच्या कौशल्याने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात दाखवले आहेत. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे’ या चित्रपटाची गणना या कॅटेगरीमधील उत्कृष्ट मराठी चित्रपटात करता येईल, कारण त्यामध्ये मराठी प्रेक्षक प्रगल्भ आहे, असे गृहीत धरले होते.   

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षक हुशार आहे, असे समजून लिहिले/दिग्दर्शित केले जात नसावेत. अनेक गोष्टी समजावून सांगण्याची मराठी चित्रपटात प्रथा आहे. काही गोष्टी सिनेमाच्या भाषेत संवादाविना सांगितल्या तर मराठी प्रेक्षकांना समजणार नाहीत, अशी चित्रपटकर्त्यांना भीती वाटते काय? हाच मराठी प्रेक्षक इतर भाषेच्या चित्रपटातील अनेक दृश्ये संवादाविना बघू शकतो, ती दृश्ये त्यांना समजतात. लॉकडाऊनच्या काळात याच प्रेक्षकांनी ओटीटीवर अनेक इंग्रजी/मल्याळम/ तमिळ चित्रपट बघितले आहेत, ते त्यांना समजले आहेत.

या चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट कुठे आहे, याची त्याला जाण आहे. त्याहीपूर्वी याच मराठी प्रेक्षकांनी संवाद नसलेला पुष्पकसारखा चित्रपट बघितला, उचलून धरला. तरीही ‘झिम्मा’सारख्या चित्रपटात सर्व काही संवादामधून वारंवार उलगडून दाखवण्याचे बरेच प्रसंग आहेत. इंदू (सुहास जोशी) घरी तीर्थयात्रेचे कारण सांगून इंग्लंडच्या ट्रीपवर आली आहे. हे खरे तर कारमध्ये झालेल्या फोनवरील संभाषणामधून आपल्याला समजते. परंतु ते पुन्हा एकदा आवर्जून सांगण्याचा प्रसंग आहे. मुलगी मैथिली (सोनाली कुलकर्णी) आणि तिचा होणारा नवरा निखील (हेमंत ढोमे) यांच्यामध्ये संवाद सुरू झाला आहे, हे आईला (सुचित्रा बांदेकर) मुलीच्या चेहऱ्यावरून समजू शकते, परंतु ते आईला समजले आहे, हे प्रेक्षकांना संवादांमधून पुनश्च समजावून सांगितले आहे. 

अशा अनेक प्रसंगामुळे चित्रपटाचा वेग विलक्षण मंदावतो. चित्रपटात पहिला अर्धा तास खरे तर काहीच घडत नाही. इतक्या पात्रांचे स्वभाव उलगडून सांगण्याच्या नादात कालापव्यय रसभंग करणारा ठरतो. मुळात पर्यटन या विषयावरचा चित्रपट वेगच पकडत नाही.  मानवी स्वभावाचे अंतरंग उलगडून दाखवणारे चित्रपट धीम्या गतीचे असतात, परंतु हा चित्रपट तसाही प्रयत्न करत नाही.  त्यामुळे ‘हा विषय समजला, आता पुढे चला’ असे वाटत राहते. 

मराठी चित्रपटाला प्रेक्षक, विशेषतः युवा वर्ग येत नाही अशी तक्रार असेल तर असे प्रकार प्रेक्षकवर्ग कमी होण्याला हातभारच लावतात. ओटीटीवर जगभरातले चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकांना मराठी चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये आणायचे असेल तर, मराठी प्रेक्षकांची समज वाढली आहे, असे गृहीत धरून चित्रपट तयार करायला हवेत. 

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख