विज्ञानाचा काटेकोर वापर करणाऱ्या ‘विज्ञानकथा’ आपण अनेक वर्षं वाचतो आहोत. त्यांना सोबत घेऊन ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ या लेबलखाली अनेक कथाप्रकारांचा एकत्र विचार आज जागतिक पातळीवर केला जातो. आज, आत्ता जे वास्तवात नाही, ते सगळं स्पेक्युलेटिव्हखाली येतं. त्यात मग विज्ञान फॅंटसी, सायबरपंक, स्टीमपंक, स्पेस ऑपेरा, सुपरहीरो, क्लायमेट फिक्शन, बरंच काही येतं.
मराठी लेखक-वाचकांचं जागतिक एक्सपोजर जसं वाढतं आहे, तसं आपणही ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’कडे वाटचाल करतो आहोत का, असं वाटायला लागलं आहे. ओटीटीवरच्या मालिका किंवा क्रॉस-जानर चित्रपटांमुळे आपण आशय आणि ट्रीटमेंटकडे जास्त लक्ष देत व्याख्यांना थोडं मागे लोटायला लागलो आहोत, असंही जाणवतं.
त्यामुळे या लेखात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या साऱ्या कथांचा विचार केला आहे आणि शक्य तिथे विशिष्ट टॅग वापरले आहेत.
विषयातलं वैविध्य
गेली दोन वर्षं दिवाळी अंकातल्या विज्ञानकथांचा आढावा घेताना विषयांचं वैविध्य नेहमीच आनंद देऊन जातं. या वर्षीही कालप्रवास किंवा एलियन असे ऑल-टाइम-फेवरीट विषय आहेत. पण त्यापेक्षा जास्त कथा या आजच्या किंवा येत्या काळातल्या तंत्रज्ञानाचा विचार करताना दिसतात. त्यासाठी लेखक मंडळींचं आणि संपादकांचं कौतुक करायला हवं.
‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकात भ्रमर यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या कथेत क्रिस्पर तंत्रज्ञानाविषयी लिहिताना माणसाच्या टोकाच्या अपेक्षा आणि नैतिक प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. याच अंकात ‘शठे शाठ्यं समाचरेत्’ या सन्जोप राव यांच्या कथेत नवीन तंत्रज्ञान आणि चांगल्या कथानकाच्या जोडीला क्लासिक दर्जाची चर्चा आहे. लेखकाचं सामर्थ्य जाणवून देणारी ही कथा आहे. त्यांच्याकडून आणखी विज्ञानकथांची अपेक्षा आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
डॉ. बाळ फोंडके हे विज्ञानकथांमधलं अग्रणी नाव. त्यांची ‘धनंजय’मधली ‘मुखपट्टी’ ही कथा एका नव्या आणि वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. कथेतले सामाजिक संदर्भ आणि तिची शोधकथा अशी गुंफण सुरेख जमलेली आहे. ‘लोकप्रभा’मध्ये डॉ. संजीव कुलकर्णी यांची कथा ‘तुम्हां कोण म्हणेल दुर्बल बिचारे...’ हीदेखील अत्यंत वेगळ्या विषयावर आहे. रोबॉट्स माणसाविरुद्ध बंड करून उठतात, अशा कथांची आपल्याला सवय असताना ही आगळी दिशा थक्क करते. मात्र कथेत माहिती जास्त झाल्याने कथानक मागे पडल्यासारखं झालं आहे.
मकरंद जोशी यांची ‘आपला माणूस’ ही ‘धनंजय’मधली कथा. कल्पना रंजक आहे, पण कथेतील रहस्य एक एक क्ल्यूमधून वाचकापुढे आलं असतं तर खूप छान अनुभव मिळाला असता. याच अंकात ‘स्पर्श होता तुझा’ या स्मिता पोतनीस यांच्या कथेत स्पर्श ही मध्यवर्ती संकल्पना आहे. स्पर्शातून भावना जाणवणं जमायला लागल्यावर रोबॉट मानवी होण स्वाभाविक, पण त्यांना तयार करणारी माणसं त्यांना नेमकं काय समजतात? रोबॉटच्या भावना खर्या की, माणसांचं भावनाहीन होणं खरं? माणूस कोणता आणि रोबॉट कोणता? हा विचार करायला लावणारा प्रश्न स्मिता पोतनीस यांनी या कथेतून मांडलाय.
स्वरा मोकाशी यांची ‘ऑन द स्पॉट’ ही ‘धनंजय’मधली कथा चांगली जमलेली आहे. परग्रहावर वसाहत, त्याचाच बिझनेस, आणि सासरे, जावई यातली चकमक खुसखुशीतपणे दाखवलेली आहे. राजश्री बर्वे यांची ‘धनंजय’मधली ‘बीज अंकुरे अंकुरे’ ही कथा किंवा ‘नवल’मधली ‘आदित्य परत भेटेल का’ ही कथा या दोन्ही कथा चांगल्या असूनही विज्ञान संकल्पनांच्या भाऊगर्दीत कथानक हरवून गेल्यासारख्या वाटतात.
अनिल पाटील यांची ‘धनंजय’मधली कथा ‘एथिकल फ्लेक्झीबिलीटी’ विज्ञानकथा म्हणून आली असली तरी कथेतला नैतिक प्रश्न कोणत्याही विषयाला लागू पडणारा आहे. त्यामुळे त्यातलं वैज्ञानिक संशोधन मध्यवर्ती म्हणता येणार नाही. डॉ. प्रेमनाथ रामदासी यांची ‘धनंजय’मधली ‘चेतक’ कथा जेनेटिक इंजीनीयरिंग या संकल्पनेवर आधारित आहे. कथा अत्यंत वाचनीय आहे, पण शरीरातील एका संवेदनेची क्षमता वाढवली तरी बाकीचं शरीर, विशेषत: या संवेदनेचा अर्थ लावणारा मेंदू त्याला लगेचच साथ देऊ शकेल का हा प्रश्न उरतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मेंदूचे वाचन करता आलं तर, यावर ‘दीपावली’ अंकातील असीम चाफळकर यांची ‘केतकीच्या मनी तिथे’ ही विज्ञानकथा अतिशय सुरेख उतरलेली आहे. पूर्ण कथा या संकल्पनेभोवती विणलेली आहे, आणि त्यातील रहस्य शेवटपर्यंत टिकवण्यात लेखक यशस्वी झालेला आहे.
‘नवल’मधली शैलेन्द्र शिर्के यांची ‘हस्तक्षेप’ आणि सुरेश भावे यांची ‘एकांतवास’ या दोन्ही कथा अवकाशाच्या प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर घडतात. शिर्के यांच्या कथा अनेकदा विज्ञानाची हलकीफुलकी बाजू पेश करत असतात. ही कथादेखील ती अपेक्षा पूर्ण करते. भावे यांच्या कथेत चर्चा जास्त आहे. शिवाय सुरुवातीचा तांत्रिक भाग थोडा रसभंग करतो. विज्ञानकथेत माहितीपेक्षा त्या पायावरचं नाट्य अनुभवायला मिळालं पाहिजे हे इथे प्रकर्षाने जाणवलं. असाच काहीसा अनुभव ‘साप्ताहिक सकाळ’मधल्या श्रीनिवास शारंगपाणी यांच्या ‘समुद्रमंथन’ कथेत येतो. कथेला सुरेख पार्श्वभूमी असली, तरी त्यातल्या विज्ञान संकल्पनेवर नाट्य उभं रहात नाही. ‘प्रभात’ दिवाळी अंकात विशाखा गंधे यांची ‘प्रवास नव्या दिशेने’ ही कथा नेमका उलटा अनुभव देते. त्यात कथानक आणि नाट्य चांगलं असलं तरी वैज्ञानिक संशोधनाच्या जागी इतर सामाजिक घटनादेखील अशीच कथा उभी करू शकेल.
गेल्या काही वर्षांमध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)ने आपल्या आयुष्यात शिरकाव केलेला आहे. अलेक्सा आणि नेटफ्लिक्सची रेकमेंडेशन्स यामागचं तंत्रज्ञान आता अनेकांना समजतं. त्यामुळे साहित्यात, त्यातून विज्ञानसाहित्यात एआय दिसलं नाही तर आश्चर्य म्हणायला लागेल. या वर्षीच्या काही दिवाळी अंकांमध्ये एआय संबंधी लेख आहेत, तर विज्ञानकथांमध्येदेखील एआयची तऱ्हेतऱ्हेची रूपं पहायला मिळाली. कधी एआयवर कुरघोडी करायची एखादी क्लृप्ती दिसते (‘झांगडगुत्ता’ - निलेश मालवणकर यांची ‘सामना’मधली चटपटीत कथा) तर कधी एआयने आयुष्य पूर्ण व्यापून टाकलेली स्थिती दिसते.
बिग डेटा आणि एआय काय काय करू शकेल याची फॅंटसीयुक्त झलक झंपूराव तंबुवाले यांची ‘यमांत’ (ऐसी अक्षरे - ऑनलाइन अंक) ही कथा देते. अर्थात पुराणं आणि वैज्ञानिक पायावरचा भविष्यकाळ यांचा काही संबंध नसल्याने ती गमतीत घ्यायची कथा आहे आणि अपेक्षित ते मनोरंजन करते.
आभासी आयुष्य आणि जागोजागी ऑटोमेशन यावर खरं तर आजही अनेक जण उपाय शोधताना दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर कमी करून नैसर्गिक गोष्टींकडचा कल वाढतो आहे. याचं नजीकच्या भविष्यकाळातलं प्रक्षेपण आणि सोबत अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करणारी अतिशय प्रगल्भ कथा म्हणून सचिन गिरी यांच्या ‘हंस’मधल्या ‘गुरुजींचा होलोग्राम’कथेकडे पाहता येईल. वातावरण निर्मिती उत्तम आणि निवेदनही सशक्त. कथेच्या मध्यावर एक महत्त्वाचा प्रश्न येतो. तो अखेरीस आणखी थोडा हाताळला असता तर कथेचा प्रभाव प्रचंड वाढला असता.
‘नवल’मधल्या ‘मधुसूदन मसुरकरांच्या मृत्यूचं मॅटर’ या अभिषेक वाघमारेंच्या कथेत अशाच ऑटोमेशन आणि सोबतच्या एकटेपणाचा संदर्भ घेत चांगलं लेखन आहे. ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकातली विजय तांबे यांची ‘एक जानेवारी एकनंतर…’ ही दीर्घकथादेखील येत्या काळातलं माणसांचं निष्क्रिय आयुष्य समर्थपणे मांडताना दिसते. नंदा खरे यांच्या लेखनाशी नातं सांगणारी ही कथा मधूनच रत्नाकर मतकरींच्या ‘गॅस चेंबर’ या संग्रहाची आठवण करून देते. आपल्याला ऑटोमेशनचे, सर्व्हिलन्स सोसायटीचे आणि आभासी जगण्याचे परिणाम जाणवू लागले आहेत असाच या कथांचा अर्थ आहे का? विज्ञानकथा अनेकदा अशा ‘सावध ऐका पुढल्या हाका’ देत असतात त्याचा इथे प्रत्यय येतो.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. लाइन अंपायर्सच्या जागी तंत्रज्ञान हवं असा हट्ट जोकोविचने गेल्या वर्षी धरला होता. त्यामुळे ‘नवल’मधली शिरीष नाडकर्णी यांची ‘मात’ ही कथा खेळातल्या तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करते तेव्हा दाद दिल्यावाचून रहावत नाही. ‘नवल’मधल्या सोनाली करमरकर यांच्या ‘चॅटबोट’ या कथेचं नाव बघून आधी दचकायला होतं. चॅटबॉट म्हणायचं असेल का, प्रश्न पडतो. प्रत्यक्षात कथेत चॅटबॉटचा वापर करता करता गंमत आणली आहे. मेघश्री दळवी यांची ‘पृष्ठ सतरा’ ही याच अंकातली कथा एक वेगळा अनुभव देत मुख्य पात्रातल्या बदलाची आर्क उभी करते. मात्र त्यातल्या विज्ञान संकल्पनेचा पुरेसा उलगडा केलेला नसल्याने ही विज्ञानकथा म्हणावी का, हा प्रश्न आहे.
गेली दीड वर्षं आपण करोना संकटाचा सामना करत असल्याने काही कथांमध्ये ते संदर्भ येणं अपेक्षित होतं. तुलनेने फार कमी कथांनी करोना किंवा करोनाने बदललेल्या आपल्या जीवनशैलीचा वापर केला आहे. मेघश्री दळवी यांच्या ‘धनंजय’मधल्या ‘सुनंदिनीराजेंची सून’ कथेत ही मध्यवर्ती कल्पना आहे. कोविड लाटा सरल्यावर अशा काही साथी आलेल्या असताना असं काही होणार, याची जाणीव भूतकाळात झाली, तर काही बदल होईल का? काही काळजी आधीच घेतली जाईल का? अशी आशा ही कथा व्यक्त करते. भविष्य, भूत, आणि वर्तमान याला जोडणारी कथा म्हणता येईल.
मुकुंद नवरे यांची ‘धनंजय’मधली ‘को-विद’ ही कथा या साथीचा आणि तिच्या नावाचा वापर करून घेते. पेशीतील नाट्य रंगवताना त्यांनी कल्पना आगळी घेतली आहे. पण मांडणी आणखी खुलून आली असती, शेवटाकडे काही अर्थपूर्ण कलाटणी मिळाली असती, तर कथा वाचनीय झाली असती.
विज्ञानकथा म्हटलं की त्यात सुस्पष्टता हवी असा एक संकेत आहे. उलट स्पेक्युलेटिव्ह कथांमध्ये असं काही अपेक्षित नसल्याने कधी कधी स्पेक्युलेटिव्ह कथा जास्त रोमांचक होतात. स्मिता पोतनीस यांची ‘नवल’मधली ‘पिसांतोला’ ही कथा टेलीपोर्टेशन या संकल्पनेवर आधारित आहे. ही कथा एक संभ्रमित अवस्था उत्तम उभी करते. तसाच अनुभव येतो ‘धनंजय’ अंकातल्या शैलेन्द्र शिर्के यांची ‘काल्हेरचे मारेकरी’ या कथेत. ही स्पेस ऑपेरा कथा विज्ञान संकल्पनेचा वापर करताना नॉनस्टॉप अॅक्शन पेश करते. मेघश्री दळवी यांची ‘अनुभव’मधली ‘पॉपअप’ ही करोना पार्श्वभूमीवरील टेक्नोफॅंटसीदेखील थरारक अनुभव देते, तर ‘धनंजय’मधली ‘नावाडी’ ही गॅरेथ जोन्स यांची छोटी अनुवादित कथा विज्ञान फॅंटसीची मजा देते.
‘ऐसी अक्षरे’ या अंकात प्रभुदेसाई यांची ‘पॉपकॉर्न परत आले’ ही विज्ञान फॅंटसी कथा आहे. कल्पनाशक्तीला मुक्त वाव देऊन भन्नाट कथा लिहिता येतात हे या लेखकाने आधी दाखवून दिलं आहे. ही कथा मात्र अर्धकच्ची वाटते. विशेषत: डॉ ननवरे यांच्याभोवती एक युनिव्हर्स गुंफताना काही परत परत येणारे संदर्भ किंवा अचाट गोष्टी कंटाळवाण्या वाटू शकतात.
‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’त गिरीश पळशीकर यांनी लिहिलेली ‘अदृश्य’ ही कथा आहे. कथेतल्या विज्ञान संकल्पनेतून काहीतरी भारी काम करून दाखवण्याची संधी लेखकाने सोडल्यासारखी वाटते. त्यातली विज्ञान संकल्पना काढली तरी ती कथा कायम राहू शकते. याच अंकात ‘माइंड रीडर’ ही राजीव तांबे यांनी लिहिलेली विज्ञान रहस्य कथा खूप वाचनीय आहे. तसा त्याचा शेवट काय असेल याचा अंदाज वाचक करू शकत असूनही त्यातलं कुतूहल कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
स्पेक्युलेटिव्ह कथांमध्ये पर्यावरणावर आधारित कथा हा एक विशेष प्रकार आहे. आज बहुधा पर्यावरणाचा प्रश्न दाहक झाल्यावर अशा कथांची आवश्यकता जास्त वाटते. ग्लोबल वॉर्मिंग या ज्वलंत प्रश्नावर आधारित सद्गुरू कुलकर्णी यांची पत्रिकेतली ‘ब्राह्मो-९ आणि शाश्वत विकास’ ही कथा छान जमलेली आहे. तिच्यात विज्ञान आणि कल्पनेचा मेळ चांगला घातलेला आहे. या कथेत ग्लोबल वॉर्मिंगवर तोडगा काढायचा विचार केलाय तर त्याच अंकात आलेल्या रवींद्र भयवाल यांच्या ‘हिमाग्नी’ कथेत कशापासून धोका होऊ शकतो याविषयी सांगितलं गेलंय. ही कथाही वाचनीय आहे.
यावर्षी दोन टोकांच्या कथा वाचायला मिळाल्या. आजच्या काळाशी सुसंगत कल्पना आणि अचूक माहिती कल्पकतेने वापरणाऱ्या अशा काही आशादायक कथा होत्या. तर दुसऱ्या टोकाला जुन्या पद्धतीच्या ‘दे ठोकून’ अशाही होत्या. कालप्रवास करून भविष्यात जाताना पेजर बरोबर नेणे, प्रचंड मोठ्या मोहीमांमध्ये लीडरशिपविषयी बाळबोधपणे निर्णय घेणे, एकट्याने क्लिष्ट संशोधन करणे, हे वाचून आजच्या वाचकाला काय मिळणार आहे ? आजचा वाचक जागरूक आहे आणि त्याला फटाफट ऑनलाइन माहिती शोधता येते हे विसरून कसं चालेल? बरेचदा भूतकाळात जाऊन काही बदल करून परत येणे याचा उपयोग करून लिहिल्याने अशा कथा नुसत्या परीकथा होतात.
आजच आपण पायोनियरसारखी मानवविरहित यानं दूरवर पाठवतो. अवकाशात लहानमोठे प्रोब्स सोडतो. मग अतिदूरच्या अंतराळ प्रवासात एक स्त्री आणि एक पुरुष यांना पाठवणं हे केवळ कथेच्या सोयीसाठी उरतं. एलियन सुंदरी मानवी पुरुषाला मोहात पाडते, अशा कथा पन्नास वर्षांपूर्वी वाचायला ठीक वाटत असतील. पण महायुद्धांच्या काळात घडत असेल अशा कथेला एलियन बॅकग्राऊंड देऊन विज्ञानकथा म्हणणं किती वर्षं चालणार आहे? विज्ञानाचा भाग वगळला तरी केवळ फॅंटसी म्हणूनही आज अशा कथा फारच उण्या पडतात.
कुमार वाचकांसाठी विज्ञानकथा
‘वयम’मध्ये डॉ जयंत नारळीकर यांची ‘अभयारण्य’ ही विज्ञानकथा आहे. कथा एकोणीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रसिद्ध झाली असली तरी आज वाचतानाही ती खरोखरीच कालातीत वाटते. कथेतील रूपक कुमार वाचकांना चटकन अपील होईल असं आहे, आणि अदिती पाध्ये-देसाई यांच्या सुरेख रंगीत चित्रांनी कथा आणखी खुलली आहे.
‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’त बालवाचकांसाठी नेहमी खास विभाग असतो. त्यात स्मिता पोतनीस यांची ‘भीमाचे बंड’ ही विज्ञानकथादेखील मुलांना सुपरिचित असलेल्या कहाणीचा चांगला उपयोग करून घेते. मात्र कथेतील सार स्वत: वाचकांनी शोधलं तर अधिक योग्य होईल. ‘पासवर्ड’ या दिवाळी अंकात ‘परग्रहावरचा निर्वासित’ या मूळ जपानी कथेचं निसीम बेडेकर यांनी स्वैर रूपांतर केलं आहे. सहज भाषेत येणाऱ्या या कथेतूनही एक चांगला मेसेज मुलांपर्यंत जातो.
‘किशोर’मध्ये राजीव तांबे यांनी त्यांच्या खुसखुशीत शैलीत ‘स्नो ब्रेकर-डॉ. बर्डी’ अशी अॅक्शन-पॅक्ड कथा सादर केली आहे. विज्ञान उत्तम प्रकारे वापरून विचार करायला लावणारी ही कथा आहे. ‘पासवर्ड’ या अंकात मेघश्री दळवी यांची ‘मेसोलिया’ कुमार वाचकांच्या ओळखीचे संदर्भ आणि शिवाय नवीन माहिती देते. त्यामुळे कुतूहल वाढवणारी ही विज्ञानकथा आहे. याच अंकात निरंजन घाटे यांची अतिशय रंजक कथा आहे – ‘आणि पालखीला चाकं लागली’. पूर्वी काय घडलं असेल याचा विचार करताना ज्येष्ठ लेखक घाटे यांनी या स्पेक्युलेटीव्ह कथेत अनेक बारीकसारीक तपशील सुरेख रंगवले आहेत. दीपक संकपाळ यांची रेखाटनं कथेला उत्तम साथ देणारी आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी कुमार वाचकांसाठी विज्ञानकथा कमी दिसल्या. तरीही येत्या काळात विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याकडे डोळसपणे पाहाण्याची वृत्ती विज्ञानकथेतून कुमारांना मिळत रहावी असं आवर्जून वाटलं. मराठी विज्ञानकथांच्या केंद्रभागी माणसाच्या भाव-भावना असतात ही अत्यंत प्रगल्भ दृष्टी आहे. मात्र ज्यूल्स व्हर्नच्या कादंबऱ्यांमध्ये दिसणारं साहस आणि थ्रिल जसं भा. रा. भागवतांनी आपल्या प्रसन्न शैलीत अनुवाद करून मराठीत आणलं तसं या वयाच्या वाचकांना अधिक भावेल. विशेषत: आज प्रिंट माध्यम हे सहज उपलब्ध असलेल्या धमाल ऑडिओ-व्हिडिओ कंटेंटच्या स्पर्धेत असताना तर हे जास्तच गरजेचं आहे. त्यासाठी चांगल्या परदेशी कथांचे अनुवाद मुलांपुढे आणणं हाही एक पर्याय आहे.
रेखाटनांचा सहभाग
कथांसोबतची रेखाटनं हे दिवाळी अंकातल्या कथांचं खास वैशिष्ट्य. त्यातही विज्ञानकथेमागची भव्यता, कधी रहस्य तर कधी गूढ, तर कधी अवकाशाची सुरम्य पोकळी अशासारख्या पैलूना वाचकांसमोर आणण्याची ही उत्तम संधी असते. या वर्षीही चंद्रमोहन कुलकर्णी, अनीश दाते, सतीश भावसार, यासारख्या मान्यवरांची रेखाटनं विज्ञानकथांना साथ देत आहेत. स्पेक्युलेटिव्ह कथांची रंगत वाढवत आहेत. काही अंकांमधून नवीन चित्रकारांचा परिचय झाला. ही चित्रांकनं म्हणजे जणू कथेचे नेपथ्य करतात. या सगळ्या कलाकारांनी कथेचा अर्क चित्रांकनात उतरवल्याचे दिसून येते. कथा चित्रबद्ध करून वाचकाच्या डोळ्यांसमोर दृश्यरूपात उभी राहावी. आणि तरीही त्या कथेचा रहस्यभंग होऊ नये ही तारेवरची कसरतही सहजी जमवलेली आहे. (अगदीच नाही म्हणायला चित्रातून कथेतला शेवट आधीच समोर आल्याची दोन उदाहरणं दिसली.) विज्ञानकथांची चित्रांकनं फार अतिरंजित, अतिशयोक्तीपूर्ण नसावीत तर ती विज्ञानाची शास्त्रीय वस्तुस्थिती दर्शवणारी असावीत. सर्वांकडून मान्यता मिळवणारी उत्तम असावीत. असं अनीश दाते यांनी मागे म्हटलं होतं. अशी जर अपेक्षा आपण धरली तर ती अपेक्षा चित्रांकनाच्या बाबतीत बऱ्याच अंशी पूर्ण झाल्याचं दिसून आलं.
विज्ञानाशी संबंधित एकूण ४१ कथा २०२१च्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत, (काही कदाचित पाहायच्या राहून गेल्या असतील.) त्यातल्या बहुतांशी कथा चांगल्या दर्जाच्या आहेत. भविष्यवेधी चित्रण करता करता रंजन आणि विचाराला चालना या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरतात.
या वर्षीच्या कथालेखकांमध्ये अनेक नवीन चेहरे दिसले ही आम्हांला अतिशय आशादायक गोष्ट वाटली. ‘दीपावली’, ‘लोकप्रभा’ यांनी आग्रहाने नव्या लेखकांना संधी दिली. उत्साही लेखकांना आज पुरेसे प्रिंट प्लॅटफॉर्म्स उपलब्ध नसताना ही संधी अधिक महत्त्वाची ठरते. ‘लोकप्रभा’ हे साप्ताहिक असल्याने त्यांना कदाचित नियमितपणे त्यांचा प्लॅटफॉर्म देता येईल. मराठी भाषेविषयी अधूनमधून काळजी व्यक्त होत असते. त्या पार्श्वभूमीवर तर मराठी विज्ञानकथांमध्ये नवे लेखक, नवे विषय, नव्या शैलीतलं लेखन याचा आनंद द्विगुणित होतो.
मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
meghashri@gmail.com
स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.
potnissmita7@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment