अजूनकाही
मराठी आणि हिंदी मालिकांची काही ठळक साचेबद्ध गुणवैशिष्ट्यं असतात. मालिका कोणत्याही विषयावर, कुठेही घडणारी असो, हे तयार साचे जसेच्या तसे वापरले जातात.
विशेषत: मराठी मालिकांच्या जगात, गेली निदान दहा वर्षं हे साचे बदलण्याची, काही अपवाद वगळता, जराही तसदी घेतली गेली नाहीए. नायिका, नायक, त्यांचे भाऊ-बहिण, आई-वडील असलेले ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चं जग, नायक-नायिकांचं भेटणं, त्यांचा रोमान्स, गैरसमज, इतरांनी केलेल्या कारवाया, लग्न, सासुरवास, मूल होणं किंवा न होणं, नायकाची नोकरी, व्यवसाय, त्यातल्या समस्या, घरावरची संकटं. नायिकेनं खंबीरपणे घराकरता उभं राहणं, चोरीचे आळ, खलनायिकांचं आगमन, त्यांच्या वेशभूषा, गैरसमज, अजून गैरसमज, अजून अजून गैरसमज, नायिकेचं घराबाहेर जाणं\जावं लागणं.... सात वर्षांची लिप... तिच्यातल्या साचेबद्ध प्रसंगांचा सिलसिला पुढच्या एपिसोडमधे तसाच सुखनैव चालू. मालिका सर्वाधिक लोकप्रिय. चॅनेल, मालिकेचा प्रकार कोणताही असो.
अर्थात मालिकांचे नावापुरते कितीही वेगवेगळे प्रकार, उदा. राजकीय, कार्पोरेट, ग्रामीण, शहरी, विनोदी. त्यांचा मूळ गाभा फक्त आणि फक्त ‘कौटुंबिकतेचा’च असतो. जेम्सच्या रंगीबेरंगी गोळ्यांसारख्या या मालिकांचे रंग वेगवेगळे, आकर्षक, पण आतली चव तीच गोडमिट्ट, गुळमट. कौटुंबिकतेची. याच एकरंगी छत्रीखाली हिंदी-मराठी मालिकांमधलं जग दाटीवाटीनं नांदतं. बाकी सगळे रंग केवळ दिखाऊ. खरं स्वरूप रोज संध्याकाळी टीव्हीसमोरच्या काउचवर बसणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ सदस्यांना खूश करणारं, ‘कौटुंबिकच’ असायला हवं, हा अलिखित नियम सगळ्या मालिका निर्मात्यांचा आणि चॅनेलवाल्यांनी एकमुखाने बनवून टाकला आहे.
या कौटुंबिक साच्यात फिट्ट बसलेला एक प्रमुख साचा म्हणजे मालिकांमधल्या प्रमुख स्त्री व्यक्तिरेखा. अर्थातच आपल्या सहनशील, सोशिक, गुणांची खाण असलेल्या, बाळबोध संस्कारांची गुटी प्यायलेल्या, मर्यादशील नायिका. प्रत्यक्ष समाजातून हा साचा पन्नास वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेला असला तरी मालिकांच्या जगात त्याचं गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत:, जोरदार पुनरुज्जीवन झालेलं आहे. हा साचा बदलायलाच मालिकावाले तयार नाहीत.
तशी मालिकेची सुरुवात होते तेव्हा हा साचा वेगळा असल्याचा आभास निर्माण केला जातो, प्रोमोजमधून किंवा सुरुवातीच्या एक-दोन भागांमधून दिसलेली आपली ही नायिका अत्यंत हुषार, चमकदार, शिकलेली, सुंदर, तडफदार, धडाडीची असते. मग लगेचच ती प्रेमात पडते, तिचं लग्न होतं. एकदा का तिचं लग्न झालं रे झालं की, हनिमूनच्या रात्री संपायच्या आतच हा तिच्यावर सोशिक, सहनशील, संस्कारी, बावळटपणाचा साचा ठाकून ठोकून घट्ट बसवला जातो. तो काही शेवटच्या भागापर्यंत, जर तो आलाच तरच अर्थात, सुटत नाही. आपली ही तडफदार नायिका मग सासरच्यांचं मन जिंकून घेण्याचा ‘पण’ केलेली, साडी(च) नेसलेली, मनमिळावू, आज्ञाधारक गुळगुळीत साबणाच्या वडीसारखी, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’त परफेक्ट साजेशी बहू म्हणा, सूनबाई म्हणा, होणारच होणार. कधी तिचं नाव गौरी असतं, कधी जान्हवी, कधी मंजिरी, कधी सरस्वती, कधी अजून काही ठमा, कमळा... साचा बदलत नाही!
कुटुंबातल्या, खास करून खाष्ट व्यक्तींबद्दल तिला कमालीची आस्था असणार, कुटुंबावर कोणतंही संकट ओढवलं की, ही अंगावरचे दागिने उतरवणार, ती उलट उत्तरं देत नाही, चोरीचा आळ आल्यावर मुळमुळू रडून दाखवते, कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्यांची मन जिंकायला ती मनोभावे पूजाअर्चा करते. आपल्या नायकासोबतचा तिचा रोमान्सही माफक, संस्कारी. त्याकरता पन्नासच्या दशकातले ‘मोगऱ्याचे गजरे’ मालिकांमध्ये अजूनही पॉप्युलर आहेत. (या रोमान्सचाही एक साचा. पण तो नंतर). आपल्यावरचे आरोप, अपमान सोशिकतेनं गिळणाऱ्या या नायिका कुटुंबावर संकटाची काळी छाया आली की, मात्र आपला बुळचट बुरखा फेकून देतात, मग त्यांच्या अंगी महिषासूरमर्दिनी संचारते. संकटाशी सामना करून आख्ख्या कुटुंबाचा भार ती आपल्या नाजूक खांद्यांवर पेलते.
आपल्या या नायिकांचा नोकरी-व्यवसाय? तो कोणताही असो, त्याने फार फरक पडत नाही. नोकरी (केलीच तर) करणाऱ्या नायिका घरात पाय टाकताक्षणी पदर खोचून गरम स्वयंपाक करणाऱ्या, हसतमुख, नवऱ्याचा चारचौघात ‘अहो’ म्हणून मान ठेवणाऱ्या, काठापदराच्या साड्या, कुंकू लावणाऱ्याच असणार.
सध्या चालू असलेल्या झी मराठी आणि कलर्सवरच्या, सोनी, स्टारप्लस्वरच्या सगळ्या प्रमुख, लोकप्रिय मालिका डोळ्यांपुढे आणा. नायिकांचे हे साचे समोर येतील. या नायिकांना पाठीचा कणा नावाचा अवयवच नसतो का देवाने दिलेला; स्वाभिमान, अस्मिता अशा कोणत्याही शब्दांशी त्यांचा परिचय नसतोच का कधी झालेला, असे प्रश्न प्रेक्षकांनी मनातल्या मनात (सोशिकपणे) गिळून टाकायचे फक्त.
एखादी चंट, स्मार्ट, जशास तसे करणारी स्त्री व्यक्तिरेखा नायिकेच्या भूमिकेत असलीच, तर मग नक्कीच ती कोणीतरी कुटुंबाच्या संस्कारांना धब्बा लावणारी, स्वार्थी स्त्री असणार.
उदा. ‘खुलता कळी खुलेना’मधली मोनिका. तिने लग्नानंतर साडी नेसायचं नाकारलं, ड्रेस घालायचे ठरवले, आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायचं ठरवलं, बाहेरून खायला मागवायचं ठरवलं... हे असं करणं काहीच साच्यामध्ये बसणारे नाही. त्यामुळे मग ते अशा भडक पद्धतीनं दाखवायचं की, या एरवी घराघरांमध्ये नॉर्मल समजल्या जाणाऱ्या या गोष्टी मालिकेमध्ये ‘काय हे पाप?’ अशा स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणल्या जाणार. हे सगळं वाईट, ते करणारी नायिका सुपर वाईट.
नायिकेच्या चुलबुल्या, खोडकर, आपल्या नटखटपणाने नायिकेला अडचणीत आणणाऱ्या बहिणी, तिचे बेकार, निकम्मे पण राखी पौर्णिमेला आवर्जुन राखी बांधून तिच्या रक्षणाकरता उभे राहणारे भाऊ, गरीब, पिचलेले चंद्रकांत गोखलेंचे वंशज असलेले वडील; श्रीमंत, उर्मट, पैशांनी जग विकत घेऊ पाहणारे सप्रूचे वंशज असणारे दुसऱ्या प्रकारचे वडील; आपापल्या अहोंना उद्देशून ‘इश्श, काहीतरीच तुमचं’ म्हणणारी, सारखा डोळ्यांना पदर लावणारी आई; बडबड करून वैताग आणणारी, मिश्किल, आयुष्याचं सार सांगणारी आजी... हे इतरही दुय्यम साचे या ‘कौटुंबिक’ मालिकांमध्ये आपल्या नायिकेला जोड देणारे असतातच.
कधीही न बदलणारे, बदलायची शक्यताही नसलेले अजूनही काही अपरिहार्य साचे आपल्या नायिकेकरता प्राणपणाने जपले गेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे शकुन-अपशकुनांचा खेळ. दशकं संपली, पिढ्या उलटल्या, आधुनिकता आली, जागतिकता आली, पण यांचे समज काही बदलायला तयार नाहीत. पूजेच्या थाळीतला (थाळीच, तबक म्हणणं मालिकांमध्ये कालबाह्य) दिवा विझणं, थाळी खणकन पडणं, कुंकू पसरणं, डोळा लवणं, देवाच्या मूर्तीला पाण्यात ठेवणं, नवस बोलणं असं सगळं त्यांनी साग्रसंगीत चालू ठेवल्यानेच घरोघरची भारतीय संस्कृती टिकून आहे! शिवाय सण आहेतच. भाऊबीजेपासून वटसावित्री, करवा चौथ, रक्षाबंधन, पाडवा... प्रत्येक मालिकेमध्ये आपल्या नायिकेनं हे सगळं करणं अनिवार्य.
कोणत्याही भारतीय भाषेतल्या मालिकांचा ‘स्त्रिया’ हा प्रमुख, सर्वांत मोठा प्रेक्षक गट आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, घराघरातल्या स्त्रिया जमेल तशा, जमेल तितक्या मालिका नियमाने पाहत असतात. आणि असं असूनही गेल्या निदान चाळीस वर्षांमध्ये या घरोघरच्या भारतीय स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये झालेले बदल नेमके काय आहेत, जगण्याची नवी आव्हानं या स्त्रिया नेमक्या कशा पेलत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची यात नेमकी काय साथ मिळते आहे किंवा मिळत नाही, कुटुंबाचे बदलत गेलेलं स्वरूप, त्यांचे आपापसात बदलत गेलेले नात्याचे स्तर या कशाकडेही लक्ष न देता भारतीय मालिका इतक्या साचेबद्धपणे ‘कौटुंबिक’ मालिकेतल्या प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांचं चित्रण कसं करू शकतात? आणि का? मालिका संपायची वेळ आल्यावर अचानक नायिकेला कणखर, विजयी दाखवायचं आणि पूर्ण मालिकेभर तिला साच्यात अडकवून ठेवायचं, हा खेळ नेमका का, कशामुळे खेळला जातो?
हे प्रश्न ना मालिकेच्या निर्मात्यांच्या मनात येतात, ना प्रेक्षकांच्या. अर्थात प्रेक्षकांच्या मनात तो आला तरी त्यांना विचारतंय कोण. स्त्रियांना आपलं हे असं कणाहीन, स्वाभिमानशून्य, सोशिक रूप बघायला आवडतं, असं मालिकेच्या निर्मात्यांनी, चॅनेलवाल्यांनी, लेखकांनी एकदा ठरवून टाकलं आहे ना? मग ते तसंच दाखवलं जाणार.
एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनतर्फे निघालेल्या मालिकांनी हा ‘कौटुंबिक’ मालिकांचा साचा निर्माण केला आणि बाकीच्यांनी तो जसाच्या तसा, आंधळेपणाने वापरात आणायचा कल्पनाशून्य आळशीपणा दाखवला असं आपण ढोबळपणे म्हणून शकतो. कारण बालाजीच्या ‘क’कारी मालिकांचा सुळसुळाट होण्याआधी आलेल्या मालिकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा इतक्या साचेबद्ध, गुळगुळीत नक्कीच नव्हत्या.
‘हमलोग’, ‘बुनियाद’पासून, ‘स्वाभिमान’, ‘विरासत’, ‘खानदान’, ‘सैलाब’, ‘स्पर्श’, ‘उडान’, ‘रजनी’... मराठीत ‘आभाळमाया’, ‘प्रपंच’, ‘दामिनी’सारखे मोजके का होईना अपवाद होते... ज्यामधे नायिका खऱ्या, गुणदोषांसकट मालिकेत वावरल्या. प्रेक्षकांनीही त्यांना प्रेमानं स्वीकारलंच होतं ना, मग आता गेली काही वर्षं असं काय नेमकं व्हावं की मालिकांमध्ये, विशेषत: मराठी मालिकांमध्ये असे गुळगुळीत, संस्कारांमध्ये जखडलेल्या नायिकांचे साचे तयार व्हावेत? की ही ‘मेल गेझ’ आहे? नायिकेने फक्त आकर्षक दिसायचं, प्रेमात पडायचं, संस्कार-सणवार पाळायचे, घर सांभाळायचं, घरातल्यांच्या जेवणाची-खाण्याची काळजी वाहायची, रक्षणाकरता ठामपणे उभं रहायचं... जी काही फॅशन, स्वतंत्र अस्मिता त्यांना दाखवायची आहे ती लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर साच्यात बांधून घ्यायचं. लग्न झाल्यावर बायकांनी नोकऱ्या सोडायच्या तरी किंवा केल्याच तर घराच्या सुव्यवस्थेला कोणतीही बाधा येऊ न देण्याची काळजी घेऊनच. जे काही काम करायचं ते संस्कारांमध्ये राहून, खांद्यावरचा पदर ढळू न देता... जगाबरोबर न बदलू पाहणाऱ्या सनातन भारतीय पुरुषाच्या मनातली ही स्त्री व्यक्तिरेखा आहे का?
शिवाय यात ‘बाईच बाईला छळते’वाला कालबाह्य कोन मालिकेत अजूनही तितकाच टोकदार आणि धारदार राखला गेला आहे. घरातले पुरुष एकजात सांभाळून घेणारे, शहाणे आणि त्यांच्या बायका बोलभांड, बिनडोक, खाष्ट. या साचेबद्ध चित्रणातून एकही मालिका अपवादानेही सुटलेली नाही. ‘बालिका वधू’मधली आनंदी असो, ‘काहे दिया परदेस’मधली गौरी असो, ‘अस्स सासर सुरेख बाई’मधली मुन्नू, ‘नांदा सौख्य भरे’मधली स्वानंदी, सरस्वती... वगैरे अनेक. आणि या सर्वांवर सरताज अशी एक नवी नायिका सध्या ‘पॉप्युलर’ आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधली राधिका. स्वाभिमानशून्य, लाचार, अडाणी, घोळघालू, बावळट, चुकांमधून काही शिकण्याची अक्कल नसणारी, व्यवहारशून्य, सर्वांत महत्त्वाचं नवरा म्हणजे पतीपरमेश्वर मानणारी, त्याच्या लफड्यांकरता दुसऱ्या स्त्रीलाच जबाबदार मानणारी, घराच्या चार भिंती हाच माझा स्वर्ग मानणारी ही आजची, २०१७ सालातली राधिका केवळ अविस्मरणीय!
निदान तीन पिढ्यांपूर्वी समाजातून कालबाह्य झालेले हे साचे विशेषत: मराठी मालिकांना आता नेमके का वापरावेसे वाटायला लागले आहेत? मुख्य नायिकेच्या रूपात अजूनही घरातल्या मुलाच्या, पुरुषाच्या भोवती रुंजी घालणाऱ्या, स्वयंपाकघरात रमलेल्या बायका तेवढ्या चांगल्या; तर पुरुषांना तोडीस तोड उत्तर देणाऱ्या, त्यांच्या वर्चस्वाला भीक न घालणाऱ्या, आपल्याला हवे तसे कपडे घालणाऱ्या, चतुराईनं धंद्यातली गणितं सोडवणाऱ्या, टॉप बॉसेस असणाऱ्या, ड्रिंक्स, वाईनला न बिचकणाऱ्या, भरपूर पैसे कमावणाऱ्या, स्मार्ट व्यक्तिमत्त्वाच्या बायका फक्त खलनायिकेच्या भूमिकेतच का दाखवल्या जातात? भारतीय मालिका इतक्या पुराणमतवादी होण्यामागे नेमकं कोण जबाबदार आहे?
घरोघरीच्या गृहिणी मुख्यत: मालिकांचा प्रमुख प्रेक्षक असतात, त्यामुळेच अशा तऱ्हेचं चित्रण केलं जातं, असा एक खुळचट दावा मालिका निर्मात्यांकडून, लेखकांकडून केला जातो. तो खरा आहे हे गृहित धरलं तर मग अशा सोशिक, बाळबोध, कालबाह्य संस्कार जोपासणाऱ्या, किचन पॉलिटिक्समधे रमणाऱ्या, बाहेरच्या जगातल्या वाऱ्यानेही बिचकणाऱ्या, कणाहीन नायिकांचे साचे पुनरुज्जिवित करून आपण भारतीय समाजामधे नेमकी किती ‘रोगट’ कुटुंबं तयार व्हायला खतपाणी घालत आहोत, याचा जरासाही सूज्ञ, शहाणा विचार त्यांच्या कुणाच्याच मनात कधीही येत नाही का?
लेखिका कलासमीक्षक आहेत.
sharmilaphadke@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment