साधनसामग्रीच्या अभावामुळे या चरित्राला काही मर्यादा असल्या तरी १९३९ साली लिहिलेले हे चरित्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते!
ग्रंथनामा - झलक
विश्वनाथ शिंदे
  • ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 07 December 2021
  • ग्रंथनामा झलक समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र शांताबाई बनकर Shantabai Bankar जोतीराव फुलेJyotirao Phoole महात्मा फुले Mahatma Phoole सावित्रीबाई फुले Savitribai Phoole

शांताबाई बनकर यांनी १९३९मध्ये लिहिलेलं समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्रहे सावित्रीबाईंचं पहिलं चरित्र. ते नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग व महात्मा फुले अध्यासन यांनी पुनर्प्रकाशित केलं आहे. त्याचं प्रा. विश्वनाथ शिंदे आणि प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी संपादन केलं आहे. या चरित्राला प्रा. शिंदे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई फुले यांचे अल्प चरित्र’ ही छोटेखानी पुस्तिका कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांनी १९३९ साली लिहून स्वत: प्रकाशित केली आहे. आज अत्यंत दुर्मीळ झालेले हे पुस्तक पुणे येथील ‘समता प्रतिष्ठान’च्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचा सुगावा श्री बापूराव घुंगरगावकर यांना लागला. मा . कुलगुरू प्रो. नितीन करमळकर यांनी ‘समता प्रतिष्ठान’चे अध्यक्ष मा. बाबा आढाव यांना, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रस्तुत ग्रंथ पुनर्मुद्रित करण्याची तयारी आहे, आपण हे पुस्तक आम्हास उपलब्ध करून करून द्यावे,’ अशी विनंती केली. मा. बाबा आढाव यांनी तत्काळ अनुमती दिली. आमच्या विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव असल्याने ही दुर्मीळ पुस्तिका विद्यापीठाने प्रकाशित करून वाचकांसाठी उपलब्ध करून देणे अनेक अर्थाने सुसंगत आणि सार्थ बाब असल्याने शांताबाई बनकर लिखित सावित्रीबाई फुले यांचा चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तरवाडी येथील ‘सत्यशोधक केंद्रा’च्या ग्रंथालयामधूनही या पुस्तकाची एक प्रत आम्हास उपलब्ध झाली.    

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शांताबाई यांनी हे पुस्तक लिहिले, त्या वेळी त्यांनी नुकतीच मॅट्रिकची परीक्षा दिली होती. याचा अर्थ त्या वयाने लहान होत्या. इतक्या लहान वयात त्यांना सावित्रीबाई फुले यांचे चरित्र लिहावे असे वाटणे, ही अत्यंत लक्षणीय बाब आहे. यातून शांताबाई यांची संवेदनशीलता तर प्रत्ययाला येतेच, शिवाय त्यांच्या ठिकाणी असणारी सजगता व पुरोगामी विचारसरणीचीही अनुभूती येते.

या संदर्भात प्रस्तुत पुस्तकात त्या म्हणतात, “ह्या श्रेष्ठ विभूतीचे चरित्र वास्तविक पाहतां ह्यांच्या आधीच लिहले गेलें पाहिजे होते. पण त्यांच्या चरित्र लेखनाची आस्थाच कोणी बाळगली नाही; व कालावधीने मी कथिलेली माहितीसुद्धा लोप पावली असती. मी खात्रीने सांगते की ही महासाध्वी जर ब्राह्मण समाजात जन्मास आली असती तर तिचे चरित्र त्या समाजाकडून त्वरित लिहले गेले असते. पण ती क्षत्रिय माळी समाजात जन्मास आली! कर्मधर्म संयोगाने ह्या साध्वीचे चरित्र लिहिण्याची सुसंधी मला मिळाली व माझ्या सामर्थ्यानुसार पुढीले पिढीला मार्गदर्शक ह्या दृष्टीने त्यांचे सत्कार्य अल्प प्रमाणात का होईना मी आपणा भगिनीपुढे सादर केले आहे.”

शांताबाई यांच्या मनात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी किती आदर आणि आस्था होती, हे त्यांच्या उपरोक्त प्रतिपादनातून आपणास समजते.

कोण होत्या या शांताबाई बनकर?

शांताबाई रघुनाथ बनकर-भुजबळ असे त्यांचे नाव. त्यांचा जन्म १९१९मध्ये भोईवाडा, क्रास रोड, परेल मुंबई येथे झाला होता. त्या काळी मुलींच्या स्वतंत्र शाळा नव्हत्या. त्यामुळे त्या मुलांच्या शाळेत शिकल्या व १९३९ साली मॅट्रिक परीक्षा पास झाल्या. संबंध मुंबई इलाख्यातील माळी समाजातील मॅट्रिक परीक्षा पास झालेली ही पहिली मुलगी होय. बनकर हे घराणे मुळात शिवरी (जेजुरीजवळ), जिल्हा पुणे येथील असून शांताबाई यांचे वडील रघुनाथ देवजी बनकर हे आधी सरकारी नोकरीत होते, पण नंतर नोकरी सोडून त्यांनी गुत्तेदारीचा (कॉन्ट्रॅक्टर) व्यवसाय सुरू केला आणि ते मुंबईत स्थायिक झाले. रघुनाथ बनकर १९२१ ते ९ नोव्हेंबर १९३०पर्यंत ‘अखिल भारतीय सत्यशोधक समाजा’चे सचिव होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

१ मे १९४४ रोजी सकाळी १०-३० वाजता शांताबाई यांचा विवाह सत्यशोधक मतानुसार दत्तात्रय कोंडाजी भुजबळ यांच्याशी धुरू हॉल मुंबई येथे संपन्न झाला. ‘दिनमित्र’ पत्राच्या २६ एप्रिल १९४४च्या अंकात ह्या विवाहाची निमंत्रण पत्रिका प्रकाशित झाली आहे. २० व्या माळी परिषदेचे अध्यक्ष कोण व कसे असावेत, याविषयीचे पत्र शांताबाई यांनी लिहिले असून ते ११ डिसेंबर १९३५च्या ‘दिनमित्र’च्या अंकात प्रसिद्ध झाल्याचे दिसते. यावरून शांताबाई या सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय असाव्यात तसेच सामाजिक कामात त्या सहभागी असाव्यात यात कसलीच शंका नाही.   

आचार्य प्र. के. अत्रे यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्यावर चित्रपट काढल्यानंतर अत्रे आणि बाबुराव पेंढारकर यांचा सत्कार शांताबाई यांच्या पुढाकाराने श्री टॉकीज, नागपूर येथे आयोजित केला होता, अशी माहिती मिळते. यावरूनही त्या काळात लहानपणीच प्रसिद्ध व्यक्ती म्हणून नावारूपाला आल्या होत्या, असे सांगता येईल. शांताबाई यांचे निधन कधी झाले, याविषयी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही, पण १९९५ नंतर त्या कधीतरी वारल्या असाव्यात असा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त केला जातो.

शांताबाई यांचे वाचन उत्तम होते असे, त्यांनी प्रस्तुत पुस्तकात जे नानाप्रकारचे संदर्भ–उल्लेख केले आहेत त्यावरून स्पष्ट होते. त्यांनी गार्गी–मैत्रेयी या प्राचीन काळातील विदुषींचा त्या आत्मज्ञानी होत्या असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे, युद्ध-कौशल्य पारंगत असणाऱ्या कैकयी, चांदबीबी, अहल्याबाई यांचा निर्देश केला आहे. तसेच यासारख्या अनेक स्त्रियांनी चित्रकला, गायन, वादन, लेखन-वक्तृत्व या कला आत्मसात केल्या होत्या, असे त्या अभिमानाने सांगतात. आधुनिक काळातील रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई यांच्याविषयी त्यांच्या कार्याबद्दल शांताबाई यांना योग्य ती माहिती असलेली दिसते. ‘मी आजपर्यंत श्रेष्ठ विभूतीनची चरित्रे वाचली’ असे त्या सांगतात. सिसरो, डेमोस्थेनीस या चरित्रनायकांच्या कर्तृत्वाचा निर्देश करून त्यांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल नेमके मत त्यांनी व्यक्त केले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे १९ शतकातील प्रतिष्ठित संपादक आणि त्या काळातील मान्यवर विचारवंत होते. त्यांना भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान होता, ते मराठी भाषेची निष्ठापूर्वक सेवा कराणारे वाङमयसेवक होते. मात्र महात्मा फुले यांच्याविषयी आणि सत्यशोधक समाजाविषयी त्यांना राग होता, ते फुले यांचा द्वेष करत. २० मार्च १८७७ रोजी सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट सर्व वर्तमानपत्राप्रमाणे अभिप्रायासाठी ‘निबंधमाले’कडेही पाठवण्यात आला, तो रिपोर्ट वाचून शास्त्रीबुवांना मोठा संताप आला. मालेच्या ४४व्या अंकात (१८७७ साल) रिपोर्टवर लिहावयांचे सोडून म. फुले यांच्या ‘गुलामगिरी’, ‘ब्राह्मणांचे कसब’ पुस्तकांवर आणि म. फुले यावर त्यांनी मनसोक्त तोंडसुख घेतले. ‘गुलामगिरी’वर लिहिताना संतापाच्या भरात ब्राह्मणेतरांच्या स्त्रियांविषयी शास्त्रीबुवांनी अनुदार उद्गार काढले होते. ते शांताबाई यांना माहिती असल्याने त्या लिहितात, “मराठी भाषेचे शिवाजी म्हणविणाऱ्या पाश्चात्य विद्याविभूषित पंडितांचे हे विचार, केवळ वजनावरून मेंदूची योग्यता ठरविण्याची कल्पना अजब खरी!” अशी चाणाक्ष टिप्पणी शांताबाई विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या प्रतिपादनावर करतात. त्यांची दृष्टी आकुंचित होती, ते टीका करताना मनांची क्षुद्रवृत्ती प्रगट करत, अशा थेट भाषेत त्यांनी चिपळूणकरांची संभावना केली आहे. त्या काळात चिपळूणकरांबद्दल सडेतोड लिहिणे ही सामान्य गोष्ट नव्हती. शांताबाई अत्यंत धाडशी तर होत्याच, पण त्यांनी जो व्यासंग संपादित केला होता, त्या अधिकाराच्या बळावरच हे धाडस त्या करू शकल्या, असे म्हणता येईल .

प्रस्तुत चरित्रपर पुस्तकाच्या प्रारंभी एकोणिसाव्या शतकातील म्हणजे सावित्रीबाई यांच्या जन्माच्या वेळची सामाजिक स्थिती कशा प्रकारची होती, यांचे वर्णन शांताबाई थोडक्यात करतात. त्यासंबंधीची त्यांची निरीक्षणे अत्यंत सूक्ष्म व महत्त्वाची आहेत. विशेषत: ब्राह्मण पुरोहित देवधर्माच्या नावाने सर्वसामान्य भोळ्या लोकांची कशी लूट करत होते, त्यांचे सर्वच क्षेत्रात कसे वर्चस्व होते, नानाप्रकारची व्रतवैकल्ये करण्यास सांगून, ती केली नाही तर इहपरलोकी सुख लाभणार नाही, अशी भीती घालून भिक्षुकशाही गरीब जनतेची कशी लयलूट करत, गरीब जनतेला फशी पाडून धनधान्य, गायी म्हशी दान घेत असत, असे त्या लिहितात.

१९वे शतक महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे शतक होते. नवी पिढी शिकून तयार होत होती. शेतीव्यवस्थेपासून न्यायाव्यवस्थेपर्यंत नवी रचना निर्माण होत होती. शिक्षणव्यवस्था बदलत होती, प्रबोधनाच्या–धार्मिक सुधारणांच्या चळवळी सुरू होऊ लागल्या होत्या. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांना महत्त्व देणारी जुनी व्यवस्था टिकून होती. या पार्श्वभूमीवर शांताबाई लिहितात, “चोहोकडे गाढ अज्ञान व त्यामुळे थोडे फार लोक चारपाच इंग्रजी पुस्तके शिकले की त्यांना फार अभिमान वाटे व ते इतरांकडे तुच्छतेने पहात.”

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

यांचा अर्थ शांताबाई चौकस होत्या आणि त्यांचे १९व्या शतकाचे आकलन यथार्थ होते असे म्हणता येईल. तत्कालीन स्त्रियांच्या स्थितिगतीबद्दल त्या लिहितात, “एकोणिसाव्या शतकातील स्त्री- जीवनाविषयी विचार केला असता  असे आढळून येते की, स्वातंत्र्य बाजूलाच राहिले, पण उलट त्रास, अपमान, छळ ही त्यांच्या वाट्यास आला. त्यांना पुरुषांच्या गुलांमगिरीत आपले आयुष्य कंठावे लागत असे. स्त्री ह्या नावापुढे त्या निर्भत्सनेस पात्र झाल्या व सून हा शब्द तर गुलामगिरीचा वाचक झाला. सून म्हणजे हक्काची मोलकरीण, तिचे जिणे फक्त चूल व मूल एवढ्या पुरतेच! चार भिंतीबाहेर फिरकू देण्याची काय आवश्यकता आहे? कोठे त्यांना सामाजिक वातावरणात जायचे आहे? कितीही झाले तरी त्या अबलाच! त्यांना शिक्षण देऊन काय करावयाचे आहे? अशा तऱ्हेच्या कल्पना चोहोकडे पसरल्या होत्या.”

अशा तऱ्हेचे निरीक्षण शांताबाई यांनी मांडले आहे. याचा अर्थ स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्या जाणत होत्या. त्याविषयी त्या अतिशय जागृत होत्या असेही दिसते.

शांताबाई यांनी लिहिलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथाला आता ८० हून अधिक वर्षे उलटली आहेत. इतक्या प्रदीर्घ काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्रविषयी विपुल नवी माहिती डॉ. मा. गो. माळी, फुलवंताबाई झोडगे, प्रेमा गोरे, नूतन माळी, डॉ. दिनकर गायकवाड, डॉ.कृ.पं. देशपांडे, प्राचार्य गजमल माळी, श्री हरी नरके, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, प्रा.ना.ग.पवार, डॉ. गेल ऑमव्हेट, डॉ.तारा भवाळकर, डॉ. सुभाष सावरकर, प्रमोद विठलराव सलामे, डॉ. सुमन पाटील, नीला पांढरे अशा अनेक अभ्यासक/संशोधकांनी उजेडात आणली आहे. यापैकी काहींनी उपलब्ध नव्या माहितीच्या आधारे सावित्रीबाई फुले यांची चरित्रेही लिहिली आहेत, सावित्रीबाई यांच्या जीवनावर कादंबरी-दीर्घकाव्य रचलेले आहे. याचा अर्थ असा नव्हे की, हा शोध आता संपला आहे. तो शोध यापुढील काळातही सुरूच राहील यात शंका नाही. आज सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रासंबंधी नवी माहिती उपलब्ध झालेली असली तरी शांताबाई यांची प्रस्तुत चरित्रपुस्तिका अजिबात कालबाह्य ठरत नाही, ऐतिहासिकदृष्ट्या हे पुस्तक महत्त्वाचे आहे यात शंका नाही.

सावित्रीबाई फुले एक विलोभनीय, त्यागी आणि प्रभावी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नारीरत्न होत्या, महात्मा जोतीराव फुले यांच्याबरोबर पन्नास वर्षे त्यांनी सहप्रवास केला. त्या म. फुले यांनी अंगिकारलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात केवळ सहभागी होत्या असे नव्हे, तर त्या स्वतंत्र विचारांच्या कार्यकर्त्या होत्या. त्या भारतीय स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रवर्तक होत्या. आधुनिक मराठी काव्याच्या जननी होत्या.

शांताबाई ‘लेखिकेच्या हृदगत’मध्ये लिहितात, “सावित्रीबाई संबंधाने पुरेशी माहिती मला मिळू शकली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तरी पण प्रयत्न करून मला जी थोडी फार माहिती मिळाली, त्या आधारावर मी हे चरित्र लिहू शकले.” त्या काळात बहुजन समाजातील अनेक थोर व्यक्तिमत्त्वाच्या जीवन व कार्याच्या नोंदी सापडत नाहीत. पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १९२७मध्ये अपार कष्टपूर्वक लिहिलेले महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र पहिले मानले जाते. स्वत: पंढरीनाथ पाटील म. फुले यांचे अधिक विस्ताराने दुसरे चरित्र लिहिण्याची तयारी करत होते. याचा अर्थ आपण लिहिलेल्या पहिल्या चरित्राला मर्यादा आहेत, असे त्यांना वाटत असावे. त्या आधीची तर चरित्रे तुटपुंज्या माहितीच्या आधारे व अत्यंत त्रोटकच होती. तर सांगायचा मुद्दा असा की, बहुजनांच्या नायक-नायिकांची चरित्रे लिहिताना साधने उपलब्ध नव्हती, साहजिकच तीच मर्यादा कुमारी शांताबाई यांनाही पडली आहे.

सावित्रीबाई यांचे चरित्र सांगताना जोतीराव यांची माहिती येणे अपरिहार्य आहे. त्यामुळे शांताबाई सावित्रीबाईंच्या चरित्रात म. फुले यांच्या जीवनातील ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमधील मानहानीची घटना, ब्राह्मणपुरोहितांकडून जनतेची होणारी पिळवणूक, स्त्रियांची दयनीय स्थिती, अस्पृश्यांचा होणार छळ पाहून त्या सर्वांना या जाचातून मुक्त करण्यासाठी जोतीराव फुले यांनी केलेले प्रयत्न, १८४८ साली मुलींसाठी काढलेली शाळा, महार-मांग मुलांची शाळा, त्यांनी केलेली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना इत्यादी ठळक गोष्टी सांगतात. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटना-प्रसंगांचे चित्रण या चरित्रपर पुस्तकात शांताबाई यांनी केले आहे.

सावित्रीबाई यांचा जन्म पुण्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे कवठी या गावी झाला, असे लेखिका सांगतात. (त्या काळात नायगाव हे गाव कवठी या नावाने ओळखले जात असेल का यांचा शोध घ्यावा लागेल.) घटना-प्रसंग असोत, व्यक्तिचित्रण असो लेखिका शांताबाई अत्यंत समरस होऊन त्यासंबंधी बोलतात. त्यातून त्यांच्या संवेदनशील मनाचा हृद आविष्कार प्रगट झालेला दिसतो. “महात्माजींचे वडील गोविंदराव फुले ही एक ज्ञानी, जिज्ञासू व कर्तबगार व्यक्ती होती. ब्राह्मणांच्या मुलांना शिक्षण घेण्याचा हक्क! मग तो आपल्या मुलांना का नसावा? अशी कल्पना मनात येऊन त्यांनी जोतिबांना शाळेत घातले.”

गफार बेग मुनशी यांच्या सांगण्यावरून गोविंदराव यांनी जोतीस शाळेत घातले, ही माहिती नंतर पुढे आली असली तरी लेखिका शांताबाई वेगळे सांगतात. त्यातून गोविंदराव फुले यांचे स्वतंत्र व्यक्तित्व साकार होते. किंवा “सावित्रीबाई आळी आळीतून फिरत असत. स्पृश्य अस्पृश्य हा भेद न मानता त्यांनी त्यांच्या बालकांना विद्याअमृताची गोडी चांखाविण्याचे पवित्र कार्यास सुरुवात केली.” यातून सावित्रीबाईंची तळमळ प्रगट झालेली दिसते. तसेच “स्वत:स अपत्य नसल्याने या साध्वीने आपल्या आश्रयास अनेक विद्यार्थी ठेवले होते. त्यांनी जे अर्भकालय काढले त्यात बिनवारसी मुले ठेवली जात, त्या मुलांवर त्यांचे खरोखरीच मातृवत प्रेम होते.” या निवेदनावरून सावित्रीबाई यांचे कार्य जसे समजते, त्याबरोबरच सावित्रीबाई कशा प्रेमळ व मातृहृदयी होत्या, हे वाचकांच्या लक्षात येते.

यशवंतरावांचे लग्न ससाणे यांच्या कन्येशी ठरले. आपली सून सुशिक्षित असावी म्हणून सावित्रीबाई तिचे शिक्षण स्वत:च्या नजरेखाली करून घेतात, मुलगी सुशिक्षित झाल्यावरच विवाह घडवून आणतात “सावित्रीबाई यांचा स्त्री शिक्षणाविषयीचा ओढा, स्त्रीची प्रतिष्ठा, तिचा सन्मान याबद्दल त्या किती सजग होत्या, हे आपणास कळते. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राकडे बघण्याचा लेखिकेचा स्वत:चा एक वेगळा दृष्टीकोन आहे. तो त्यांचा दृष्टीकोन, भूमिका त्यांनी ज्या रीतीने घटना- प्रसगांची मांडणी केली आहे त्यामधून स्पष्ट होते.

शांताबाई या चरित्रात सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात, त्यांच्या कार्याची थोरवी गातात. तसेच स्वत:चे मतही मांडतात. “महाराष्ट्रात पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे कट्ट्या सनातन्याच्या माहेरघरी स्थापन झालेली ही पहिली शाळा होय. भगिनीनो! अशा श्रेष्ठ दांपत्यांचे की ज्यांनी प्रथमच अज्ञ भगिनीना विद्यादेवीचे दर्शन घडविले व विचारी बनवून अबला समजल्या जाणाऱ्या आम्हा स्त्रियांची गुलामगिरीतून सोडवणूक केली त्यांचे ऋण केव्हाही फिटणे शक्य आहे काय?” किंवा “अस्पृश्य हे आपलेच! आपण त्यांना स्वच्छता शिकविल्याविना त्यांचा उद्धार कोण करणार?” ह्या दोन अवतरणात व्यक्त झालेले लेखिकेचे मत पाहता शांताबाई यांची समज अत्यंत प्रगल्भ, व्यापक व वंचित घटकांबद्दल सहानुभाव प्रगट करणारी असल्याचे दिसते.

इतक्या लहान वयातील शांताबाई यांच्या विचारातील प्रौढता, समाजहिताची दृष्टी खरोखर अचंबित करणारी आहे. या वयात सावित्रीबाई यांचे चरित्र लिहिण्याची त्यांना बुद्धी होणे, ही गोष्टच मुळी लेखिकेच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा परिपाक आहे, असेच म्हणावे लागेल. स्त्रीशिक्षणाची आधारशीला रचणारी, स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष करणारी, दलितांच्या उद्धाराचे मूलभूत काम करणारी, विधवाविवाहाला प्रोत्साहन देणारी, अनाथ बालकाश्रमात प्रेमळ मातेची भूमिका बजावणारी, सुनबाईला बरोबरीची मानून सन्मान देणारी, दत्तकपुत्र यशवंतावर सख्या मुलांहून अधिक माया करणारी, म. फुले यांच्या सर्व प्रकारच्या कार्यात अखेरपर्यंत साथ देणारी आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारी, जनतेची सेवा करत असतानाच प्लेगची लागण झाल्याने, या जगाचा आनंदाने निरोप घेणारी सावित्रीबाई शांताबाई यांनी आपणासमोर साजिवंत साकार केली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ही अल्पवयीन लेखिकेची कामगिरी निश्चितच महत्त्वाची आहे, असेच म्हणावे लागेल. साधन सामग्रीच्या अभावामुळे या चरित्रपर पुस्तकाला काही मर्यादा पडल्या असल्या तरी १९३९ साली लिहिलेले हे सावित्रीबाई फुले यांचे चरित्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते, यात शंका नाही.

समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र’ - शांताबाई बनकर

संपादक : विश्वनाथ शिंदे, श्रद्धा कुंभोजकर

इतिहास विभाग व महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पाने : ५०

मूल्य - १०० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. विश्वनाथ शिंदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘महात्मा जोतीराव फुले अध्यासन’चे प्रमुख आहेत.

dr.vrshinde@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......