शांताबाई बनकर यांनी १९३९मध्ये लिहिलेलं ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र’ हे सावित्रीबाईंचं पहिलं चरित्र. ते नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग व महात्मा फुले अध्यासन यांनी पुनर्प्रकाशित केलं आहे. या चरित्राचं प्रा. विश्वनाथ शिंदे आणि प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी संपादन केलं आहे. हे चरित्र शोधणाऱ्या बापूराव घुंगरगांवकर यांनी लिहिलेला हा खास लेख...
.................................................................................................................................................................
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली, त्याला या वर्षी १४८ वर्षं पूर्ण होत आहेत. ‘सत्यशोधक समाजा’ने घेतलेल्या विद्रोही भूमिकांमुळे फुले दाम्पत्याला त्यांच्या हयातीत आणि पश्चातदेखील प्रखर विरोध आणि उपेक्षेचे धनी व्हावे लागले. त्यांच्या क्रांतिकारी जीवनाची ओळख जनतेला करून देण्यासाठी त्यांचं चरित्र लिहिलं जायला विसावं शतक उजाडावं लागलं. पं. सी. पाटील यांनी १९२७मध्ये लिहिलेलं हे पहिलं उपलब्ध फुलेचरित्र आहे. फुलवंताबाई झोडगे यांनी १९६६मध्ये लिहिलेलं ‘साध्वी सावित्रीबाई फुले’ हे पुस्तक सावित्रीबाईंचं पहिलं चरित्र मानलं जात होतं. मात्र शांताबाई बनकर यांनी १९३९मध्ये लिहिलेलं ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र’ हे पुस्तक नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग व महात्मा फुले अध्यासन यांनी पुनर्प्रकाशित केलं आहे. शांताबाई बनकर या लेखिकेमुळे समाजाला सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय झाला.
शांताबाई बनकर यांचा जन्म १९१९मध्ये झाला. सत्यशोधकीय विचारांची ओळख त्यांना बालपणीच झाली होती. त्यांचे आजोबा शेट देवाजी बनकर हे सत्यशोधक विचारांचे पाईक होते. वडील रघुनाथराव बनकर ‘सत्यशोधक समाजा’च्या दुसऱ्या पिढीतील विचारवंत व प्रचारक होते. रघुनाथराव १९१८ ते १९३० या काळात ‘अखिल भारतीय सत्यशोधक समाजा’चे सचिव होते. ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील व रघुनाथराव बनकर यांच्या नेतृत्वात ‘सत्यशोधक समाजा’चे कराडमध्ये नववे आणि मुंबईत झालेले चौदावे अधिवेशन विशेष महत्वाचे ठरले होते. मुकुंदराव पाटील यांनी ‘शेटजी प्रताप’ हे खंडकाव्य रघुनाथराव यांच्या ‘प्रेमळ आणि सरळ मनास’ अर्पण केले आहे. शांताबाईंच्या आई जानकीबाई बनकर या मुंबईतील ‘सत्यशोधक समाजा’च्या कार्यकर्त्या होत्या.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शांताबाईंनी किशोरवयातच अनेक विचारवंताची चरित्रं वाचली होती. गार्गी व मैत्रेयी या आत्मज्ञानी स्त्रियांची महती त्या जाणत होत्या. तसंच कैकेयी, चांदबीबी आणि अहिल्याबाई यांच्या युद्धकौशल्य ज्ञानाची माहिती त्यांना होती. सिसरो व डेमास्थेनिस या जगविख्यात विचारवंतांचा इतिहास त्यांनी अवगत करून घेतला होता. या सर्वांचं जीवन तत्कालीन समाजासाठी प्रेरणादायी होतं.
याच प्रकारे शांताबाईंना सावित्रीबाईंचं जीवन गौरवशाली, त्यागाचं उदाहरण वाटलं. या प्रेरणेतूनच १९३९मध्ये त्यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी ‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्प चरित्र’ लिहिलं. तत्कालीन समाजापुढे सावित्रीबाईंचा प्रेरणादायी व आदर्शवत जीवनवृत्तान्त ठेवला. शांताबाईंनी हे चरित्र आपली आई ती. सौ. जानकीबाई बनकर यांना अर्पण केलं आहे.
या चरित्राला सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी प्रस्तावना लिहिली असून त्यांनी लेखिकेचं कौतुक केलं आहे. ते म्हणतात, “एकंदरीत या लेखाच्या वाचनाने सावित्रीबाईच्या कामाचे महत्त्व आमच्या स्त्री समाजाच्या अंतःकरणावर बिंबो व त्यांना समाजसेवेची स्फूर्ति होवो असे इच्छितो. कुमारी शांताबाई यांचा हा पहिला प्रयत्न पुष्कळ यशस्वी आहे. वाचन अखंड ठेवून लेखनाकडे जास्त लक्ष दिल्यास त्या चांगल्या लेखिका होतील अशी आशा आहे.’’
शांताबाईंनी त्यांची ही आशा पूर्ण केल्याचं दिसतं. त्यांचे शिक्षक मोरेश्वर वासुदेव दोंदे हेदेखील या चरित्र लेखनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतात. “कुमारी शांताबाई बनकरने केलेला प्रयत्न कौतुकास पात्र आहे. कुमारी बनकर माझ्या शाळेंतील विद्यार्थिंनी असल्यामुळे मला स्वतःला तिचा हा प्रयत्न पाहून विशेष आनंद होत आहे. तिच्या अंगच्या सौजन्याने, विनयाने आणि कार्यसक्तीमुळे अधिकाअधिक मोठी कार्ये तिच्या हातून पार पडतील; व बहुजन समाजाची सेवा स्पृहणीय अशीच झाल्याशिवाय राहणार नाही.”
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
शांताबाईंचं तरुण वय आणि त्यांनी चरित्रलेखनासाठी निवड केलेल्या सावित्रीबाईंच्या कार्याचं गांभीर्य लक्षात घेता, हे चरित्र कदाचित त्यांनी लिहिलं नसावं, अशी शंका काही लोक उपस्थित करतात. परंतु त्यांच्या लिखाणाची शैली आणि त्यांना टोचणाऱ्या विषयांचा त्यांनी खरमरीत शब्दांत घेतलेला समाचार पाहिला की, अशी शंका उरत नाही.
महात्मा फुले यांनी १८४८मध्ये पुण्यात मुलींची शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. यामुळे समाजातील रूढीप्रिय लोकांनी जोतीरावांच्या वडिलांकडे सुनेविषयी केलेल्या टीकेचा शांताबाईंनी समाचार घेतला आहे- “अहो तुमची सून! तिनें म्हणे, शाळेत जाऊन महारांच्या मुलांना शिक्षण द्यावें. आळीआळीत फिरून त्यांना उपदेश करून मदत करावी. केवढा हा भ्रष्टाचार! अरेरे धर्म बुडाला, तुमच्या सुनेनें लाज सोडिली, पतिव्रत्याला गुंडाळून ठेविलें अशा तऱ्हेने तुमची सून वागत असतांना सुद्धां तुम्हीं दुर्लक्ष करतां व आमच्या नावांला कमीपणा आणतां! ह्याला म्हणावें तरी काय?” या टीकेला शांताबाई ‘नीतिशतका’तील दाखला देऊन उत्तर देतात.
‘क्वचिद्भूमौशय्या क्वचिदपि च पर्यङ्कशयनम् ।
क्वचिच्छाकाहारी क्वचिदपि च शाल्योदनरुचि: ।।
क्वचित्कन्थाधारी क्वचिदपि च दिव्याम्बरधरो ।
मनस्वी कार्यार्थी न गणयति दु:खं न च सुखम् ।।’
(आपल्या कार्यावर दृष्टी ठेवणारा विवेकी मनुष्य सुख किंवा दु:ख यांची केव्हाही पर्वा करत नाही. तो एखादे वेळी जमिनीची शेज करील तर कधी पलंगावर निजलेले आढळेल. कधी भाजी-भाकरी खाऊन राहील, तर उत्तम पक्वाने खाईल. कधी घोंगडी पांघरून राहील, तर कधीं उंची वस्त्रे वापरतांना दिसेल. तद्वत आपल्या कार्यावर दुष्टी ठेवणाऱ्या सावित्रीबाईंनी सुख अथवा दु:ख यांची पर्वा केली नाही.)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सावित्रीबाईंनी सार्वजनिक सभांना जाणं, तिथं भाषण करणं, हे समकालीन पुराणमतवादी स्त्रियांना टीकास्पद वाटत होतं. या स्त्रिया आपापसांत काय गप्पा मारत त्याचं वर्णन शांताबाईंनी केलं आहे- “कां हो, म्हणे आज ती सभेला गेली होती. ती कोणी तरी एक बाई आली आहे, तिच्या शेजारीं म्हणे ह्या जाऊन बसतात. सर्वत्र भ्रष्टाकार केला, लाज सोडली, बोलावं तरी किती?”
आणि लगेचच या स्त्रियांच्या अशा वागण्याचं कारणही शांताबाई देतात- “बिचाऱ्यांना आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा काळ महत्त्वाच्या कार्याकरितां कसा खर्च करता येणार! कारण शिक्षणाचा अभाव.” पुराणमतवादी स्त्रिया या अशिक्षित व अविवेकी होत्या, याउलट सावित्रीबाई या शिक्षणाचं महत्त्व जाणत आणि काळाच्या पुढचा विचार करत, असं शांताबाईंना वाटे. त्या पुढे म्हणतात, “ज्यांची सावली म्हणजे शुभ कार्यात अशुभ चिन्ह समजली जात असे, ज्या अस्पृश्यांना भिक्षुकशाहीप्रमाणे हात, पाय, तन, मन, विचार, मेंदू सर्व कांही सारखी असूनही एखाद्या दारांतल्या कुत्र्यापेक्षाही कमी लेखण्यात येत असे, अशा त्या दलित बंधू-भगिनींना शिकविण्याचे व समुपदेशांचे घुटके पाजण्याचे कार्य सावित्रीबाई करत होत्या.”
गौतम बुद्धांनी प्रस्थापित केलेला धर्म लयाला जातो की, काय अशी भीती वाटू लागली, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी एकत्र येऊन बौद्धसंघाची निर्मिती केली. या संघशक्तीच्या जोरावर बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्यानं झाला. त्याच प्रकारे महात्मा फुले यांच्यानंतर ‘सत्यशोधक चळवळ’ मंदावते आहे, असं वाटत असतानाच पुन्हा १९१० सालापासून ‘सत्यशोधक समाजा’त नवं चैतन्य आलं. शांताबाई लिहितात, “छ. शाहू महाराज यांना सत्यशोधक समाजाची महती कळून येऊन ते ही या समाजाचे कट्टर पुरस्कर्ते झाले. शाहू महाराजांना सत्यशोधकीय मतांचा प्रसार झाला, तरच बहुजन समाजाचा अज्ञानपणा दूर होऊन त्याची धार्मिक, सामाजिक व आर्थिक सुधारणा होईल असा विश्वास होता. या करिता त्यांनी समाजाच्या प्रसाराकरितां त्यांनी सढळ हातानें द्रव्यसहाय्य केले.”
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
शांताबाई समकालीन समाजाचं जातवास्तव जाणत होत्या. इतिहास म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून महान व्यक्तींची चरित्रं लिहिणं, असा एक सर्वसाधारण समज इतिहासलेखनांमध्ये प्रदीर्घ काळ वर्चस्वात असल्याचं दिसून येतं. “ह्या श्रेष्ठ विभूतीचें चरित्र पाहतां ह्याच्या आधींच लिहिलें गेलें पाहिजे होतें. पण त्यांच्या चरित्रलेखनाची आस्थाच कोणी बाळगिली नाही. मी खात्रीने सांगतें कीं, ही महासाध्वी जर ब्राह्मण समाजांत जन्मास आली असती तर तिचें चरित्र त्या समाजाकडून त्वरित लिहिलें गेलें असते. पण ती क्षत्रिय माळी समाजांत आली!”
शांताबाईंना सावित्रीबाईंच्या कार्याचा, धैर्याचा अजरामर इतिहास काळाच्या पडद्याआड जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून त्यांनी त्यांचं चरित्र उपलब्ध साधनांच्या आधारे लिहिण्याचा मोठं धाडसाचं काम केलं.
हे चरित्र लिहिण्याआधीदेखील शांताबाई स्फुटलेखन करत होत्या असं दिसतं. १९३५मध्ये होणाऱ्या विसाव्या ‘क्षत्रिय माळी शिक्षण परिषदे’चे अध्यक्ष ‘कसे व कोण असावे?’ या संबंधी वयाच्या अवघ्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी ‘दीनमित्र’ या दैनिकात लेख लिहिला होता. प्रथमत: अध्यक्ष ‘कसा असावा’ हे त्या सांगतात, “अध्यक्ष खरे अनुभवपूर्ण, उदार अंत:करणाचे, ज्यांच्या ठायी सहनशीलता वसलेली, ज्यांना आपली इतिकर्तव्यता कळत आहे, ज्यांच्या ठायी चिकाटी, शौर्य आहे, ज्यांना स्त्रियांचा थोरपणा पटला आहे, बालविवाहाने होणारे अपरिमित नुकसान ह्याची ज्यांना जाणीव आहे, अशांनाच अध्यक्षपदाचा मान दिल्यास त्या अधिवेशनाचे श्रेय आपल्या पदरी पडेल.”
अध्यक्ष ‘कसा नसावा’ या संबधी लिहिताना त्या म्हणतात, “वरील गुण ज्यांच्या ठायी नाहीत, जे स्त्री शिक्षण नको म्हणतात, स्त्री-शिक्षणाचा उपयोग काय? स्त्री राज्य म्हटलें की चूल आणि मूल अशी मते ज्यांची आहेत, जे सुनांना मोलकरीण समजतात. जे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात, ‘अहो, बालविवाह करणे म्हणजे दोन जीवांची, दोन जीवांची नव्हे तर भावी पिढीची हानी करणे होय.’ तेंच स्वतःच्या मुलाचे लग्न अल्पवयीन मुलींशी लावतात, व स्वतःच्या अल्पवयीन मुलीचे लग्न उरकून घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशांना अध्यक्षपदाचा मान देऊन, अध्यक्षाची खुर्ची अडविण्यास लावणे व पोकळ अभिमानाच्या गर्तेत भराऱ्या मारण्यास लावणे चांगले नाही.”
याच लेखात स्त्रीशिक्षणाच्या स्थितीविषयी खेद व्यक्त करताना शांताबाई म्हणतात, अद्याप आमच्या समाजांत व्हावयास पाहिजे तेवढा शिक्षण प्रसार झाला नाही, अद्याप ५-१० मुलीसुद्धा मॅट्रिक का होऊ नयेत?’’
सत्यशोधक समाजाच्या परंपरेनुसार शांताबाईंनी स्वतः शिक्षण घेतलं. जून १९३९मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या. त्यांच्या जातीमध्ये मॅट्रिक पास होणारी ही पहिली मुलगी असल्यामुळे ‘दीनमित्र’मध्ये त्यांचं कौतुक करणारी बातमी छापून आली. बालविवाहावर टीका करणाऱ्या शांताबाईंचा वयाच्या २५व्या वर्षी १ मे १९४४ रोजी दत्तात्रय कोंडाजी भुजबळ यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या विचारात व आचरणात समानता असल्याचं दिसून येतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
महात्मा फुले सेवा मंडळातर्फे श्री टाँकिज नागपूर येथे महात्मा फुले जीवनपटाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये आचार्य अत्रे व श्री बाबुराव पेंढारकर यांचा सत्कार शांताबाई बनकर-भुजबळ यांच्या हस्ते १९५५मध्ये करण्यात आला. याप्रसंगी शांताबाईंनी केलेल्या भाषणाचा ‘दीनमित्र’ या वृत्तपत्रातील वृत्तांत उपलब्ध आहे- “आचार्य अत्रे यांनी म. फुले यांचे जीवन चरित्रावर बोलपट काढून बहुजन समाजाला त्यांच्या समग्र चरित्राची पुनः आठवण करून दिली. तसेच नटश्रेष्ठ श्री. बाबुराव पेंढारकर यांनी महात्मा फुले यांची भूमिका अतिशय तन्मयतेने केली, याबद्दल मी उभयतांचे हार घालून सत्कार करते.”
शांताबाई बनकर-भुजबळ या अखेरपर्यंत आपल्या आईप्रमाणेच सत्यशोधक कार्यकर्त्या होत्या. तहहयात सत्यशोधकीय विचारांशी प्रामाणिक राहिल्या. आजच्या घडीला सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या चरित्रलेखिकेचा बहुमान त्यांच्या नावावर कोरला गेला आहे.
‘समाजभूषण कै. सौ. सावित्रीबाई जोतीराव फुले यांचं अल्प चरित्र’ - शांताबाई बनकर
संपादक : विश्वनाथ शिंदे, श्रद्धा कुंभोजकर
इतिहास विभाग व महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पाने : ५० | मूल्य - १०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक बापूराव घुंगरगांवकर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
bapuraog4131@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment