अजूनकाही
शुक्रवार, ३ डिसेंबरपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्या संध्याकाळी चार वाजता समारोप होईल. तो जर वेळेत सुरू झाला आणि वेळेत संपला तर सात वाजता हा समारोप संपेल.
साहित्य संमेलनाची अलीकडच्या काही वर्षांतली एकंदर परंपरा पाहता संमेलनस्थळ जाहीर झाल्यापासून त्याच्याविषयी काही ना काही वाद व्हायला सुरुवात होते. संमेलन व्हायच्या आधी दोन-तीन महिन्यांपासून त्याला सुरुवात होते आणि संमेलन संपल्यानंतर महिनाभर तरी त्याचं कवित्व या ना त्या निमित्तानं होत राहतं. संमेलनाबाबतचे बरेचसे वाद बऱ्याचदा अगदी क्षुल्लक, किरकोळ आणि बाष्कळ स्वरूपाचे असतात. पण काही तथाकथित आणि साहित्य-समाजकंटक ते हिरिरीनं खेळण्याचा प्रयत्न करतात. अपवाद वगळता त्या वादांतून फारसं काही निष्पन्न होत नाही. एक गोष्ट मात्र होते, ती म्हणजे त्यानिमित्तानं प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येत राहतात, आणि त्यामुळे संमेलनाविषयी वातावरणनिर्मिती व्हायला सुरुवात होते. आणि हीसुद्धा चांगलीच उपलब्धी आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हल्ली राजकारण्यांचं पाठबळ, कृपाशिर्वाद आणि आर्थिक मदत यांशिवाय संमेलन होत नाही. अलीकडच्या काळात तर ते शरद पवार यांच्याशिवायही होईनासं झालं आहे! साहजिकच राजकारणी संमेलनाचे कर्तेधर्ते होतात, तेव्हा संमेलन झगमगाटी, उत्सवी आणि शानदार होतं. ‘राजकारणाचे जोडे बाहेर काढून’ राजकारण्यांनी संमेलनाला यावं, असं म्हणण्यात काही हशील नाही. आणि काही मराठी साहित्यिकही राजकारण करण्यात खऱ्या राजकारण्यांना लाजवतील, असे कर्तुमकर्तुम पराक्रमी योद्धे आहेतच! असो.
हे संमेलन खरं तर ९५वं असायला हवं होतं. पण गेल्या वर्षी करोनाकहरामुळे ते होऊ शकलं नाही. आताही परत ‘ओमिकॉन’ हा करोनाचा नवा उत्क्रांत अवतार द. आफ्रिका, युरोपात हात-पाय पसरतोच आहे. भारतात अजून फारसा डेरेदाखल झालेला नाही. त्यामुळे तूर्त काळजीचं विशेष कारण नाही. त्यामुळे या संमेलनावर करोनाची छाया असली तरी ती तितकीशी गडद नाही.
पण देशातलं एकंदर वातावरणच गेल्या सहा-सात वर्षांपासून इतकं गडद, गढूळ झालेलं आहे की, त्याची छाया मात्र या संमेलनावर पडल्याशिवाय राहिली नाही. आधी या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. असे बाष्कळ वाद पूर्वी काही समाज व साहित्यकंटक करत असत. आता ते वर्तमानपत्रंही करू लागले आहेत. एका मराठी वर्तमानपत्रानं विश्वास पाटील यांच्यावरील आक्षेपाच्या बातम्या चवीचवीनं आणि प्राधान्यानं दिल्या. पण त्याला ‘अगोचरपणा’ असंच म्हणावं लागेल. कारण पाटील यांनी आपल्या शासकीय कार्यकाळात केलेल्या काही कामांबद्दल वाद, आरोप-प्रत्यारोप असले तरी ते मराठीतले एक प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यामुळे त्यांना उद्घाटकपदाचा मान देणं, यात काहीही चूक नव्हतं, नाही.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
साहित्यबाह्य कामगिरीचा निकष साहित्य संमेलनासाठी लावायचा झाला तर संमेलनाच्या व्यासपीठावर बऱ्याच साहित्यिकांनाही जाता येणार नाही आणि राजकारणी, पत्रकार यांनाही. त्यामुळेच फुकाचे वाद निर्माण करून धुरळा उडवू पाहणाऱ्यांकडे होता होईल तो दुर्लक्ष केलेलं चांगलं.
उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सिनेगीतकार जावेद अख्तर यांच्या नावावरूनही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला. जावेद अख्तर स्पष्टवक्ते, निर्भीड सिनेकलावंत आहेत. ते धर्मानं मुस्लीम असले तरी हिंदू धर्मातल्या धर्मांधांना जसे खडे बोल सुनावतात, तसेच मुस्लीम धर्मातल्या धर्मांधांनाही. अशा ‘सेक्युलर’ कलावंताला विरोध करणं हे खरं तर कर्मदरिद्रीपणाचं लक्षण होतं. पण हल्ली तोच अनेकांचा स्वभावगुण व स्वभावैशिष्ट्य झालेलं असल्यामुळे त्याकडेही लक्ष न दिलेलंच चांगलं.
आयोजक व साहित्य महामंडळानं मात्र विश्वास पाटील आणि जावेद अख्तर यांच्याबाबत खमकेपणाची भूमिका घेतली, हे बरं झालं. तीन वर्षांपूर्वी, २०१९च्या यवतमाळला झालेल्या ९२व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या इंग्रजी लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कर्त्या नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर ते राजकीय दबावामुळे मागे घेऊन तत्कालीन आयोजक व साहित्य महामंडळानं जे आपलं हसं करून घेतलं होतं, तशी नौबत यंदा जावेद अख्तर यांच्यावरून आली नाही, हे एका परीनं चांगलंच झालं. असो.
उद्यापासून या संमेलनाची ठळक वैशिष्ट्यं आणि त्याच्या मर्यादा नेहमीप्रमाणे हिरिरीनं सांगितल्या जातील. पण एक ‘ऐतिहासिक संधी’ या संमेलनाला साधता आली नाही, हे मात्र खरं. २०१९च्या उस्मानाबादमधील ९३व्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि या ९४व्या संमेलनाचे अध्यक्ष जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे दोघंही प्रकृति अस्वास्थ्यामुळे या संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण समजा ते राहिले असते तर? तर साहित्य संमेलनाच्या इतिहासात एका ख्रिस्ती-मराठी साहित्यिकाकडून एका विज्ञानकथालेखकाकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली जाण्याचा ‘अपूर्व ऐतिहासिक क्षण’ मराठी साहित्यप्रेमी रसिकांना आणि महाराष्ट्राला अनुभवायला, पहायला मिळाला असता.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
निवडणूक न घेता थेट संमेलनाध्यक्षाची निवड करण्याची पद्धत साहित्य महामंडळानं २०१९ साली सुरू केली. तेव्हा खरं तर ‘अक्षरनामा’नं महामंडळाच्या या निर्णयावर ‘साहित्य महामंडळ हिताची प्रायव्हेट लिमिटेड’ असा खरमरीत लेख छापून टीकाही केली होती. कारण साहित्य महामंडळाचा अलीकडच्या काळातला एकंदर लौकिक पाहता या निर्णयामुळे संमेलनाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया मूठभराकडून चिमूटभरांकडे हस्तांतरित होण्याचा धोका होता. पण आम्हाला हे कबूल करायला आवडेल की, गेल्या तीन वर्षांत तरी महामंडळानं केलेल्या तिन्ही संमेलनाध्यक्षांच्या निवडी अतिशय उचित, किंबहुना नवा स्तुत्य पायंडा पाडणाऱ्या आहेत.
यवतमाळच्या ९२व्या संमेलनासाठीची पहिलीच निवड केली गेली, ती ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांची. ढेरे संमेलनाध्यक्षपदासाठी पात्र असल्या तरी त्यांची निवड अपेक्षेपेक्षा जरा लवकरच करण्यात आली होती. आणि त्यामागे कदाचित ‘पहिल्याच वर्षी अडचणीत आणणारा संमेलनाध्यक्ष नको’ असा हिशोब असावा. पण ९३व्या संमेलनाध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळानं थेट फादर फ्रान्सिस दिब्रिटो या ख्रिस्ती-मराठी लेखकाची निवड करून साहित्यप्रेमींना सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता. (अर्थात काही समाजकंटकांनी त्यांच्या नावालाही विरोध केला होताच.) आणि यंदाच्या संमेलनासाठी तर थेट डॉ. जयंत नारळीकर यांचीच निवड केली गेली. साहित्य महामंडळाची ही वृत्ती व प्रवृत्ती अशाच प्रकारे निकोप राहो आणि दिवसेंदिवस वर्धिष्णूही होत राहो.
एक ख्रिस्ती फादर मराठी साहित्यात मोलाची भर घालतो, संमेलनाध्यक्ष होतो, ही गोष्ट जितकी महत्त्वाची आहे, तितकीच जागतिक कीर्तीचा एक खगोलशास्त्रज्ञही मराठी साहित्यात आपल्या विज्ञानकथांच्या माध्यमातून मोलाचं योगदान देतो, संमेलनाध्यक्ष होतो हीसुद्धा! त्यामुळेच दिब्रिटो यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रं डॉ. नारळीकरांकडे सुपूर्त केली जाण्याला केवळ साहित्य संमेलनाच्याच नव्हे तर एकंदर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेच्या दृष्टीकोनातूनही ‘ऐतिहासिक’ महत्त्व होतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
परंतू याचं भान साहित्य महामंडळाला राखता आलं नाही. कदाचित आलं असेल, पण दिब्रिटो यांची वयाच्या ७७व्या वर्षी आणि नारळीकरांची वयाच्या ८३व्या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली गेल्यामुळे आणि त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची संमेलनाच्या व्यासपीठावर प्रत्यक्ष भेट घडवून आणणं शक्य झालं नसावं. कदाचित महामंडळानं आपल्या परीनं शेवटपर्यंत प्रयत्नही केले असतील, पण ते शक्य झालं नसावं. गेल्या वर्षी डॉ. नारळीकरांची निवड केल्यानंतरची त्यांच्याकडून आपणाला तिन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणं शक्य होणार नाही, याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे महामंडळ याबाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतं, अशातलाही प्रकार नाही.
असो, आता झाल्या गोष्टीला इलाज नाही.
तसं ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अशा भारदस्त नावानं ओळखलं जाणारं हे संमेलन सुरू झालं, ते ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजे केवळ लेखकांचं संमेलन म्हणून. महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक कामांची मुहूतमेढ रोवणारे, महाराष्ट्राला उदारमतवादाची दीक्षा देणाऱ्या न्या. महादेव गोविंद रानडे यांनी त्याची मुहूतमेढ रोवली. ११ मे १९७८ रोजी पुण्यात पहिलं ‘ग्रंथकार’ संमेलन झालं. त्याचे अध्यक्षही न्या. रानडेच होते. या पहिल्या संमेलनासाठी अनेक मराठी लेखकांना निमंत्रणं पाठवण्यात आली होती. पण परंतु फारच थोडे लेखक त्याला उपस्थित राहिले. त्यानंतर दुसरं संमेलन पुण्यातच २४ मे १८८५ रोजी कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या संमेलनाला तुलनेनं बरा प्रतिसाद होता, असं दिसतं. याला जवळपास ३०० लेखक उपस्थित होते. तिसरं संमेलन होण्यासाठी १९०५ हे साल उजाडावं लागलं. तोवर न्या. रानड्यांचं निधन झालं होतं. हे संमेलन साताऱ्याला झालं. रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे त्याचे अध्यक्ष होते. तिथपासून हे संमेलन अधेमध्ये एखाद्या, कधी कधी दोन दोन वर्षांचा आणि सत्तरच्या दशकात तर सलग तीन वर्षांचा ब्रेक घेत आजवर होत आलं आहे.
१८७० ते ८० या दशकात न्या. रानड्यांनी तीन मराठी ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथप्रकाशनाच्या वाटचालीच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे उपक्रम सुरू केले. १) महाराष्ट्र वक्तृत्वोत्तेजक सभा व वसंत व्याख्यानमाला, २) मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी आणि ३) मराठी ग्रंथकारांचे संमेलन. हे तीनही उपक्रम १४० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्रात चालू आहेत, यावरून न्या. रानड्यांची दूरदृष्टी दिसून येते. पहिले दोन उपक्रम सुरुवातीच्या काळात अतिशय जोमानं आणि उत्साहानं चालू होते, गेल्या ३०-४० वर्षांत मात्र त्यांन काहीशी मरगळ आली आहे, पण ते अजूनही चालू आहेत. ग्रंथकारांचं संमेलन सुरुवातीच्या काळात मरगळलेल्या अवस्थेत होतं, त्याला गेल्या ३०-४० वर्षांत मात्र अतिशय भव्यदिव्य स्वरूप आलं आहे.
हे तिन्ही उपक्रम परस्परपूरक म्हणून न्या. रानड्यांनी सुरू केले होते, त्यांची आज मात्र फारकत झाली आहे. असो.
पहिल्या चार संमेलनाला ‘मराठी ग्रंथकारांची सभा’ असं संबोधण्यात आलं होतं, १९०८ सालच्या सहावे संमेलन ‘मराठी लेखकांचे संमेलन’ म्हणून भरवण्यात आले. १९०९ सालच्या सातव्या संमेलनापासून त्याला ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ असे म्हटले जाऊ लागले. पण ही संमेलन महाराष्ट्राबाहेर बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर अशा ठिकाणीही भरू लागली, तेव्हा ‘महाराष्ट्र’ हे प्रादेशिक नाव बदलून ते ‘मराठी साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर बहुधा १९५४ साली दिल्लीला भरलेल्या ३७व्या संमेलनानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले.
जुन्या पिढीतील एक लेखक, रा. प्र. कानिटकर यांनी जानेवारी १९८८ साली ‘साठ संमेलनाध्यक्ष’ या नावाचं पुस्तक लिहून तोवरच्या ६० संमेलनाध्यक्षांची, त्यांच्या अध्यक्षीय भाषणांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे, “या साठ संमेलनांच्या अध्यक्षांपैकी एकही व्यक्ती दुबार अद्यक्ष झाली नाही. बहुतेक सर्व अध्यक्ष ४५ ते ६० या वयोवस्थामधील असून सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून महादेव गोविंद रानडे (वय ३६) व सर्वांत ज्येष्ठ अध्यक्ष म्हणून विश्राम बेडेकर (वय ८२) यांचा नामनिर्देश करता येईल.”
ऐंशीच्या दशकापासूनच संमेलनाध्यक्षपदासाठी वयवर्षं साठ पूर्ण झालेली असलीच पाहिजेत, असा एक अलिखित दंडकच झालेला आहे. आणि त्यामुळे संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षांकडून होणारं चिंतन हे स्मरणरंजन, आत्मस्तुती, उमाळे-उसासे, मराठीची चिंता, जागतिकीकरणाची भीती अशा त्याच त्या विषयांभोवती फिरताना दिसतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी दाखवलेला बाणेदारपणा, १९८४ साली शंकरराव खरात यांची, ८५ साली शंकर पाटील यांची, ९० साली यु.म. पठाण यांची, ९५ साली नारायण सुर्वे यांची, २००५ साली केशव मेश्राम यांची आणि २०१० साली उत्तम कांबळे यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड, असे काही साहित्य संमेलनाच्या आजवरच्या प्रवासातले ‘ऐतिहासिक क्षण’ होते.
दिब्रिटो आणि नारळीकर यांची निवडही त्याच वर्गवारीत करता येण्यासारखी आहे. पण या दोन्ही संमेलनाध्यक्षांची वयोमर्यादा ७५च्याही पुढे असल्यामुळे उस्मानाबादला टळलेली नामुष्की नाशिकला मात्र साहित्य महामंडळाला सहन करावी लागलीच!
यापासून महामंडळाने धडा\बोध घेऊन पुढच्या वर्षी संमेलनाध्यक्षाची वयोमर्यादा किमान पन्नाशीपर्यंत आणायला हवी. आणि त्यापुढच्या एक वा दोन साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्कार किंवा त्याच्या साहित्याविषयी खास परिसंवाद\चर्चासत्र असे काही उपक्रम योजून यथोचित मानवंदना द्यायला हवी...
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment