श्रीराम राघवन : भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक डार्क स्वप्न
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • दिग्दर्शक, पटकथाकार श्रीराम राघवन
  • Sat , 25 February 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar श्रीराम राघवन Sriram Raghavan एक हसीना थी Ek Hasina Thi इर्मिला मातोंडकर Urmila Matondkar सैफ अली खान Saif Ali Khan जॉनी गद्दार Johnny Gaddar रामन राघव Raman Raghav बदलापूर Badlapur एजंट विनोद Agent Vinod

तीस वर्षांची कारकीर्द आणि जेमतेम चार सिनेमे खात्यात, असं पाच-सहा शब्दांत श्रीराम राघवनचं करिअर तुम्ही मोडून काढू शकत नाही. श्रीराम राघवन हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक डार्क स्वप्न आहे. विजय आनंदनंतर भारतीय 'नॉईर'ला संजीवनी देणारा हा दिग्दर्शक. त्याच्या कुठल्याही सिनेमाने शंभर करोडचा बिझनेस केलेला नाही किंवा याला कुठलाही आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. पण चोखंदळ सिनेमा रसिक श्रीराम राघवनला सोडून बॉलिवुडची कल्पना करू शकत नाहीत.

श्रीराम हा तसा विक्षिप्त जीनियस. वर्षानुवर्षं माध्यमांसमोर तो येत नाही. त्याला प्रसिद्धीची कसलीच हौस नाही. आपल्या एका ठराविक वर्तुळात तो रमतो. श्रीराम हे राजकुमार हिराणी, डेव्हिड धवन, नसिरुद्दीन शाह यांच्यासारखंच पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं प्रॉडक्ट आहे. ऐंशीच्या दशकात त्याने तिथून दिग्दर्शनाचा कोर्स केला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे श्रीराम काय चीज आहे हे त्याच्या पहिल्या प्रोजेक्टमध्येच दिसून आलं होतं.

मुंबईमध्ये त्या काळी धुमाकूळ घातलेल्या रामन राघवन या खतरनाक सिरिअल किलरवर त्याने 'डॉक्युफिक्शन' बनवली होती. त्यात रामनची भूमिका अष्टपैलू अभिनेता रघुवीर यादवने केली होती. त्या कोवळ्या वयात श्रीरामला एका खतरनाक सिरिअल किलरच्या मनोव्यापाराचा वेध घ्यावासा वाटला यातच त्याच वेगळंपण आहे. रामन राघवन हा गुन्हेगार नाही तर मानसिक रुग्ण आहे, अशी एक प्रगल्भ भूमिका श्रीरामने त्या 'डॉक्युफिक्शन'मधून मांडली होती.

त्यावेळी सिनेमाचं डिजिटल प्रारूप अस्तित्वात नव्हतं. ती फिल्म व्हीएचएसवर होती. ती 'डॉक्युफिक्शन' त्यावेळेस बरीच गाजली. त्या काळी ती पाहणाऱ्यांमध्ये दोन लोक होते. पहिला, अनुराग कश्यप, जो त्यावेळेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये उमेदवारी करत होता. दुसरा, नवाजुद्दीन सिद्दीकी. त्या काळी त्या दोघांना कल्पना तरी असेल का अजून तीस वर्षांनी आपण रामन राघवनवर आधारित सिनेमावर काम करणार आहोत म्हणून?

फिल्म इंडस्ट्रीमधले काही योगायोग अनाकलनीय असतात हेच खरं. अनुरागच्या ‘रामन राघवन २.०’ वर श्रीरामच्या 'डॉक्युफिक्शन'चा खूप प्रभाव आहे. तो त्याच्या सिनेमातल्या लोकेशनवर आणि कॅमेरा अँगल्समध्येही दिसून येतो. अनुराग कश्यप श्रीरामाचा 'फॅनबॉय' बनला तो तेव्हापासून. नंतर काही वर्षांनी हा फॅनबॉय श्रीरामच्या मदतीला धावून आला. श्रीराम जे काही लिहायचा ते इतकं काळापुढचं होतं की, त्याला त्याच्या सिनेमासाठी निर्मातेच मिळेनात. अशीच निर्मात्यासाठी वणवण चालू असताना श्रीरामला अनुराग भेटला. अनुराग त्यावेळी रामगोपाल वर्मासाठी 'सत्या' लिहून लाइमलाईटमध्ये होता. तेव्हा अनुराग आणि रामूचा दोस्ताना एकदम जिगरी होता, आतासारखी दुश्मनी नव्हती. अनुरागने श्रीरामला रामूपर्यंत पोचवलं. तुम्ही रामूवर कितीही टीका करा, पण अनेक नवोदित टॅलेंटला त्या काळी त्याने जितक्या संधी दिल्या आहेत, तितक्या कुणीच दिलेल्या नाहीत. रामगोपाल वर्माने मग श्रीरामची स्क्रिप्ट प्रोड्युस केली. सिनेमाचं नाव 'एक हसीना थी'.

हा सिनेमा पाहिलाय आणि आवडला नाही असं सांगणारा एकही माणूस माझ्या बघण्यात नाही. प्रेमात फसवल्या गेलेल्या एका स्त्रीची सूडकथा या वन लाईनरमध्ये सिनेमाचा अंदाज लागत नाही. श्रीरामने पडद्यावर ही कहाणी फुलवली आहे, त्याच्यावरूनच तो एक मास्टर स्टोरीटेलर आहे हे कळतं. त्यात साध्या उंदराला घाबरणारी पोरगी ते ज्याने आपल्याला फसवलं त्याला क्रूरपणे शिक्षा करणारी स्त्री, हे उर्मिला मातोंडकरच्या पात्राचं ट्रान्सफॉर्मेशन हे 'अत्युच्च' या श्रेणीत येतं. त्यातला ग्रे शेड असणारा सैफ अली खान हे सिनेमातलं सरप्राईज पॅकेज होतं. विनोदी भूमिका आणि रॉमकॉममध्ये अडकलेल्या या अभिनेत्याची क्षमता या सिनेमातून प्रेक्षकांना नव्याने कळाली.

'सूड' ही संकल्पना श्रीराम राघवनची सगळ्यात आवडती असावी. त्याच्या सिनेमात सूड हा मध्यवर्ती असतो. ‘एजंट विनोद’चा अपवाद वगळता. श्रीराम राघवनचे काही वीक पॉइंट्स आहेत. जेम्स हेडली चेसच्या कादंबऱ्या, विजय आनंदचे सिनेमे, रेल्वे प्रवास हे ते वीक पॉइंट्स. हे घटक त्याच्या फिल्ममेकिंगवर प्रभाव टाकून आहेत. त्याच्या कथा या बऱ्याचशा जेम्स हेडलीच्या कादंबरीसारख्या असतात. ग्रे रंगातली पात्रं, सेक्स, हिंसाचार हे जेम्स हेडलीच्या लिखाणाचे अविभाज्य घटक आहेत. तीच वैशिष्ट्यं श्रीरामच्या सिनेमांच्या कथानकाची असतात.

'जॉनी गद्दार' (माझ्या मते श्रीराम राघवनचा सर्वोत्कृष्ट सिनेमा )मध्ये हे संदर्भ वारंवार येत राहतात. रेल्वे प्रवासाच्या प्रसंगात नील नितीन मुकेश जेम्स हेडली चेसचं पुस्तक वाचताना दिसतो. ‘परवाना’ या सिनेमातला प्रसंग पाहून नील नितीन मुकेशला गुन्हा करण्याची आयडिया सुचते. ‘बदलापूर’मध्ये पुन्हा सूडाच्या भावनेनं पेटलेला नायक दाखवला आहे. ‘बदलापूर’मध्ये सिनेमाच्या शेवटी नवाजच्या लायकबद्दल आपल्याला सहानुभूती वाटायला लावणं, हे श्रीरामच्या दिग्दर्शीय क्षमतांची पोचपावती.

‘एजंट विनोद’ हा सिनेमा वाईट नसला तरी तो त्याच्या बाकीच्या सिनेमांची उंची गाठू शकत नाही हेच खरं. सैफ सोबत असलेल्या मैत्रीमुळे हा सिनेमा त्याने केला असावा अशी शंका घेण्यास भरपूर वाव आहे. त्याच्या काही टीकाकारांच्या मते श्रीराम राघवन स्वतःच्याच प्रतिभेचा कैदी बनला आहे. तो एकसारखेच सिनेमे बनवत आहे आणि त्याच्या सिनेमांच्या विषयांमध्ये वैविध्य नाही. मला स्वतःला हा आक्षेप फारसा पटत नाही. टारंटिनो किंवा गाय रिची एकाच शैलीतले सिनेमे बनवतात म्हणून त्यांच्यात दिग्दर्शक म्हणून काही उणीव आहे असं मला तरी वाटत नाही. आता श्रीराम पुढचा सिनेमा दीपिका पदुकोणला घेऊन बनवत आहे. सिनेमा विकास स्वरूपच्या ‘The Accidental Apprentice’ या कादंबरीवर आधारित आहे. तो नक्कीच श्रीरामकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल हे नक्की. 

पटकन कुठलेतरी ट्रेंड चालू करून तिच्यामागे धडपडत जाणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये श्रीराम राघवनच असणंच आश्वस्त करणारा आहे. आपल्याला लागणारा वेळ घेऊन तब्येतीत सिनेमा बनवणारा हा अवलिया आहे, तोपर्यंत डार्क सिनेमाचा पुरवठा या जॉनरच्या चाहत्यांना होत राहील हे नक्की.  

 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

Ram Jagtap

Sat , 25 February 2017

धन्यवाद मित्रा, दुरुस्ती केली आहे.


chintamani bhide

Sat , 25 February 2017

कंटेंपररी दिग्दर्शकांवर असं लिखाण अत्यावश्यक आहे. कारण त्यांचं मूल्यमापन योग्य पद्धतीने होत नाही. अगदी तद्दन व्यावसायिक प्रवाहातील दिग्दर्शकांचंही मूल्यमापन व्हायला हवं. मी मुंबई टाइम्समध्ये २००५ ते २००७ या सुमारास 'डिरेक्टर्स कट' हे कंटेंपररी फिल्ममेकर्सवरचं सदर लिहिलं होतं. मात्र, आपल्याकडे नॉस्टॅल्जियातच रमण्यात लोकांना जास्त रस असल्यामुळे चालू काळातील लोकांविषयी फारसं लिहिलं जात नाही. वरच्या लेखात एकच बारिकशी चूक आहे.. चूक म्हणण्यापेक्षा तपशिलातील गल्लत आहे. जॉनी गद्दार चित्रपटात जॉनी मेरा नाम बघून नायकाला गुन्हा करण्याची कल्पना सुचत नाही, तर 'परवाना' हा चित्रपट बघून त्याला कल्पना सुचते. लेख ऑनलाइन असल्यामुळे सुधारणेला वाव आहे, तरी शक्य झाल्यास सुधारणा व्हावी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......