‘हुसेनभाईचा कुणी नाद न्हाय करायचा!’ ही युसुफ शेख यांची नवी कोरी कादंबरी नुकतीच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला ज्येष्ठ कथाकार सतीश तांबे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. कशी आहे ही कादंबरी? कादंबरी म्हणून कशी आहे? ग्रामीण भागातील हिंदू-मुस्लीम संबंधांबाबत काय सांगते? तिची भाषा कशी आहे? संपादित स्वरूपातली ही प्रस्तावना म्हणजे या सगळ्याचा आणि अजून बऱ्याच गोष्टींचा ‘ट्रेलर’... चला, तर मग... करा, सुरुवात...
..................................................................................................................................................................
युसुफच्या कादंबरीविषयी अभिप्राय लिहायला मी तयार का झालो? तर याचं उत्तर आहे, युसुफच्या आणि माझ्या सुमारे पन्नास वर्षांच्या ओळखीतून मला जाणवलेली मराठी साहित्याविषयीची त्याची आत्मीयता. मला ग्रामीण साहित्यातील कळत नसलं तरी ग्रामीण भाषा, बोलीभाषा, त्यातील बारकावे, हेल, ग्रामीण किस्से, त्यांची कथनशैली नेहमीच मोहवते. त्यामुळे युसुफचं बोलणं, त्याचे अनुभव ऐकणं, ही माझ्या संवेदनांना चमचमीत मेजवानी असते.
युसुफशी नाळ जुळण्याचं मुख्य कारण हे होतं की, कराड जवळच्या एका आडगावात बालपण जाऊनही ‘सत्यकथा’सारख्या मराठी वाङ्मयातील तेव्हाचं पताकास्थान म्हणून मान्यता असलेल्या मासिकाची त्याला यथास्थित माहिती होती. कवितेत त्याला विशेष रुची होती आणि अनिल डांगे, श्याम मनोहर, विलास सारंग या तेव्हा गाजत असलेल्या नवकथाकारांच्या त्रिकुटाच्या कथांचाही तो चाहता होता. त्याचं वाचन चौफेर होतं आणि त्याचं मराठी हस्ताक्षर तर ‘मोत्याचे दाणे’ असं म्हटलं जातं, तसं सुंदर होतं. त्याला समाजकारण, राजकारण यामध्येही काहीसे तिरपागडे वाटणारे पण स्वतंत्र विचार होते आणि समाजजीवनाकडे तो धर्मापलीकडे जाऊन प्रविशालकोनातून बघायचा. अध्येमध्ये तो एक जागरूक नागरिक या भूमिकेतून वर्तमानपत्रात पत्रं, छोटेखानी लेख गेली अनेक वर्षे लिहितो आहे. तसा एके काळी तो कविताही करायचा. त्यातील काही कविता ‘अस्मितादर्श’ वगैरे नियतकालिकांमधून प्रकाशितही झाल्या होत्या.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
बाकी ‘गावरान’ अनुभवांचा तर त्याच्याकडे तुडुंब खजिनाच होता आणि ते सांगण्याची भन्नाट शैलीही होती. त्यामुळे त्याच्या अनुभवकथनातून जाणवणार्या जगरहाटीकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीमुळे वाटायचं की, त्याचे हे अनुभव गद्यसाहित्यामध्येही यायला हवेत. ज्यातून माझ्यासारख्या ग्रामीण साहित्याविषयी अज्ञ परंतु जिज्ञासा असणाऱ्या वाचकांना ग्रामीणतेचे आणखी काही पैलू/बारकावे सापडतील. युसुफला आम्ही मित्र बऱ्याचदा तसं सुचवायचोही, पण तो ते काही मनावर घेत नव्हता. पण या करोना काळात मात्र घरी अडकून पडल्यामुळे असेल, युसुफने बैठक मारली आणि आपल्या आठवणींच्या खजिन्यातून काही ऐवज बाहेर काढला व त्याला वर्षानुवर्षांच्या वाचनातून, साहित्यविषयक चिंतनातून साकारलेल्या कल्पकतेची जोड देऊन ही कादंबरी प्रसवली.
‘हुसेनभाईचा कुणी नाद न्हाय करायचा!’ या कादंबरीच्या शीर्षकातूनच ‘हुसेन’ हा या कादंबरीचा नायक असल्याचा कयास बांधला जातो व तो खराही आहे. एका अर्थाने ही कादंबरी हुसेन आणि सोनी यांची प्रेमकहाणी म्हणता येईल. कादंबरीच्या सुरुवातीच्या भागातच हुसेन आणि बाबू नांगऱ्याची सोनी यांना परस्परांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा उल्लेख येतो आणि भुत्याचा माळ या निर्मनुष्य भीतीदायक प्रदेशात एखाद्या कपारीत ते दोघं चोरून कसे भेटायचे, याचं अगदी थोडक्यात पण रसरशीत वर्णन येतं.
तर कादंबरीच्या शेवटी हुसेन आणि सोनी यांच्या संबंधांना ग्रामसभेची परवानगी मिळून ते नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी ‘काळगाव-मुंबई रातराणी’ने मुंबईला रवाना होतात. सुरुवात ज्याच्यापासून होते आणि शेवटही ज्याच्या उल्लेखाने होतो, तो त्या कलाकृतीचा नायक असतो, या ढोबळ ठोकताळ्यानुसार हुसेन या कादंबरीचा नायक नक्कीच आहे. मात्र हुसेन जरी या कादंबरीचा नायक असला तरी कादंबरीच्या कथानकातून तो बराच काळ गायब असतो. त्याचा जीव जडलेल्या म्हणजे रूढार्थाने नायिका असलेल्या सोनीचे उल्लेख तर खूपच तुरळक येतात.
याचं कारण असं की, ही प्रेमकहाणी गावातली आहे. मुख्य म्हणजे आंतरधर्मीय आहे. त्यामुळे या कहाणीमध्ये अर्थातच छुपेपणा आहे. परिणामी कादंबरीभर या दोघांचे संबंध खुलवून अवकाश भरायला वावच नाही. तर हे संबंध खुलण्यासाठी गावातील वातावरणात वाव कसा नाही, हा विषय कादंबरीमध्ये त्याच्या वेगवेगळ्या पैलूंमधून मांडलेला आहे. कादंबरीमध्ये हुसेनचे सगेसोयरे आणि गावातील काही म्होरके यांच्या व्यक्तिरेखांखेरीज आणखी अनेक पात्रांचे उल्लेख आहेत. पण यातील थोडीच पात्रं वाचकाच्या डोक्यात ठसतात आणि पात्रं जेव्हा अशी धुसर राहतात, तेव्हा साहजिकच ते वातावरण ठळक होतं आणि अशा कथानकाचं नायकत्व मग अलगदपणे त्या वातावरणाकडे येतं.
‘हुसेनभाईचा...’मध्ये हेच घडतं. ‘टॉवरिंग इन्फेर्नो’सारखा सिनेमा पाहिल्यावर शेवटी जसं कळतं की, ‘आग’ या सिनेमाची नायिका आहे, तसंच ‘हुसेनभाईचा...’ वाचल्यावर जाणवतं की, गावातील वातावरण हे या कादंबरीचं नायक आहे आणि हुसेन हा कादंबरीचा उपनायक आहे. मग असंही वाटून जातं की, हुसेन हा नायक आणि त्याच्या व सोनीच्या नैसर्गिक आकर्षणाला पोषक नसलेलं गावचं वातावरण हे पारंपरिक धारणेतून खलनायक म्हणावं का? तर ते उचित वाटत नाही, कारण खलनायक हा नायकाच्या विरोधात जाणूनबुजून, विचारपूर्वक कारनामे/वर्तन करत असतो. गावच्या वातावरणात तसं सहेतुक काही घडताना दिसत नाही. तर ते वातावरण ही त्या गावाची वस्तुस्थिती आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
गाव तसं छोटेखानी आहे. त्याच्या छोट्या छोट्या बारा वाड्या आहेत. जास्त घरं हिदूंची आहेत. त्यात चारदोन घरं ब्राह्मणांची आहेत, बाकी बहुजनसमाजातील विविध जाती या गावात नांदत आहेत. मुसलमानांची मोजकीच पाच घरं आहेत. एकाअर्थी काळगाव हे अठरापगड जातिधर्माचे लोक जिथे राहतात त्या भारताचं लघुरूपच ठरावं एवढं प्रतिनिधिक आहे. या गावात जातिधर्मांमध्ये बऱ्यापैकी सलोखा आणि एकोपा आहे. याचं कारण आटोपशीरपणामुळे इथे सगळ्यांची व्यक्तिश: ओळखपाळख आहे. वस्ती जेवढी विस्तारत जाते, तेवढी ही व्यक्तिगत संबंधांची शक्यता अर्थातच नाहीशी होते. आणि मग माणसं फक्त विशिष्ट जातिधर्माची उरतात. या गावात तसं होत नाही. मात्र याचा अर्थ गावच्या वातावरणात जातीधर्म लोप पावलेले आहेत, असं अजिबात नाही. विशेषत: अल्पसंख्याकांना जरी कायमस्वरूपी दहशत वाटावी अशी घुसमट/रटरट वातावरणात नसली तरी हुसेनच्या आणि सोनीच्या लग्नासारखा बाका प्रसंग आला तर आपल्या समाजाला त्यामुळे नुकसान पोहोचू शकतं, एवढा सावधपणा त्या वातावरणात आपसूकच जाणवतो.
हुसेनचा म्हातारा बाप चाँदभाई हा तसा तालेवार आहे. शापुआंब्याच्या झाडाखाली जेव्हा हुसेन आणि टोळक्याचा आतरंगी गप्पांचा अड्डा पडायचा, तेव्हा खालच्या पाटलांच्या आळीत हुसेनच्या चेहऱ्यामोहऱ्याची काही पोरं कशी आहेत, यावर घनघोर चर्चा व्हायची. तरीही चाँदभाईला जेव्हा हुसेन आणि सोनीच्या प्रकरणाविषयी कळतं, तेव्हा तो हवालदिल होतो. त्यासंबंधात गावात मुसलमानांची इनमीन पाच घरं, तर जपून आणि घाबरून राहणं शहाणपणांचं होतं, हे मुसलमानांना ठाऊक होतं, असं जे एकदोन वाक्यात वर्णन येतं, ते गावच्या सामाजिक स्थितीवर पुरेसं बोलकं आहे.
हुसेनची आई गुलशनबाईचं डोकंदेखील हे प्रकरण कळल्यावर सैरभैर होतं. एवढंच नव्हे तर अंगात रग असलेल्या स्वत: हुसेनलाही आपल्या उसळत्या रक्ताला बांध घालायला हवा, याची अक्कल होतीच. त्यामुळेच तर चाँदभाई जेव्हा त्याला सायरा या बहिणीच्या तांबवे या गावी धाडतात आणि नंतर तर त्याचा जम बसेल व तो तिथेच स्थाईक होईल, अशा मनसुब्याने मुंबईला पाठवतात, तेव्हा त्याने काहीही मोडता घातल्याचे दिसत नाही. त्याच्या परीने तोदेखील मनाला आवर घालता येत नाही, तर शरीरानेच दूर जावं, असे प्रयत्न निमूटपणे/गपगुमान करत असल्याचं जाणवतं.
एरवी गावातील वातावरण वरकरणी तसं खेळीमेळीचं आहे. मैत्रीमध्ये जातीधर्मामुळे काही फरक पडत असल्याचं जाणवत नाही. किंबहुना हुसेन हा गावातला हिरो आहे, त्याच्या मर्दुमकीचं सगळ्या गावाला कौतुक आहे. त्याला शिकारीचा छंद आहे आणि त्याच्या सवंगड्यांमध्ये पाटलाचा सयाजी, लक्ष्मीकांत, शिवाजी, राजाराम, भिकू, गोविंदा, रंगा अशी टारगट टोणगी अनेक हिंदू मुलं असल्याचा उल्लेख सुरुवातीलाच आला आहे, फार काय सोनीच्या नांगरे वाडीतील काही मुलंदेखील हुसेनचे मैतर आहेत. हुसेनचा महादेवाच्या देवळातील वावर एखाद्या हिंदूचा असावा तेवढाच सहज आहे आणि त्या देवळाचं व आसपासच्या परिसराचं वर्णन तर खूपच लोभस आहे.
आपल्या सामाजिक सरमिसळीच्या संदर्भात रोटीबेटी व्यवहार हा एक महत्त्वाचा निकष आहे. रोटीबेटी हा शब्द जरी एकत्र येत असला तरी प्रत्यक्षात ते रोटी आणि बेटी असे दोन वेगळे व्यवहार आहेत. गावातला बेटी व्यवहार जरी सीमित असला तरी रोटी व्यवहार मात्र खुला आहे, इतका की, बाळूभटजी या वैदिक ब्राह्मणाचा गजा नावाचा मुलगा मांसाहाराला नुसता चटावलेलाच नाही, तर चक्क मुसलमानाच्या घरी जाऊन ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो अल्ला आम्हाला देतो’ असं भजन म्हणून हक्काने वशाट मागतो.
गावात जातिधर्माची जी सरमिसळ आहे तिचं अशा अनेक घटना, प्रसंगांमधून नेमकं चित्रण घडतं. गावातील रोजच्या व्यवहारात सततच जातिधर्माचा विचार चाललेला जाणवत नाही. जसं की, सादिक हा हुसेनच्या बहिणीचा मुंबईच्या पोलीस खात्यातील नवरा, सासुरवाडीला आला की, घरात तर मिळून मिसळून वागतोच, पण आणखीही चार प्रतिष्ठित घरामध्ये उठबस ठेवतो. तो ना पाच वेळा नमाज पढतो, ना रमजानात रोजे ठेवतो. थोडक्यात त्याची गणना काफिरातच करता आली असती. पण बढती मिळण्याच्या मिषाने तो चक्क, ‘नवसाला पावते’ असा लौकिक असणाऱ्या वेताई देवीला नवस बोलायचं ठरवतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या वेताई देवीचं देऊळ जंगलात असतं. जावयाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चाँदभाई त्याला घेऊन तिथे जातात. चार नारळ वाढवतात व जावयाच्या बढतीसाठी वेताईला साडी-चोळी नेसवण्याचा नवसही बोलून येतात. आपल्या व हिंदूच्या देवाधर्माच्या कल्पना वेगळ्या आहेत, यात त्यांना काहीही वावगं वाटत नसतं. गावातील एकूण वातावरणच ‘सर्व धर्म समभाव’ कळत-नकळत रिचवलेलं, पचवलेलं वाटतं. मुसलमानांच्या घरात ‘ताजे’ बसले की, झाडून सारे गावकरी बायकामुलांसह पाया पडायला येतात. त्यांना नैवेद्य दाखवतात. नवस करतात आणि आठवणीने फेडतातही.
जातीधर्माच्या संदर्भातील चाचपणीच्या ‘रोटीबेटी व्यवहार’ या पूर्वापार निकषाच्या जोडीने आधुनिक काळातील आणखी एक निकष आहे- तो म्हणजे निवडणुकांचं राजकारण. म्हणजेच रोटीबेटीच्या ‘टी’अंती चालीवर म्हणायचं तर ‘मतपेटी’ व्यवहार. गावच्या पातळीवर चालणाऱ्या राजकारणाचं चलनवलन हा या कादंबरीच्या उत्तरार्धातील लक्षणीय भाग आहे. गावाबाहेरहून आलेले काही लोक मुसलमान आळीत जाऊन ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देतात, तेव्हा राजकारण हे अगदी गावपातळीपर्यंत धार्मिक दुफळी कशी माजवतं आहे, याचं नेमकं दर्शन घडतं.
तात्यासाहेब हे प्रसंगावधान राखून या परगावातील लोकांना दरडावून पिटाळून लावतात व परिणामी हिंदू-मुसलमान अशी दुफळी न माजता उलट एकजूटच होते. गावपातळीवर सगळेच एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे हे शक्य होतं. पण शहरांमध्ये असा वैयक्तिक परिचय नसल्यामुळे जातीधर्मातील कटुता राजकारण कसं वाढवतं, त्याची चुणूक मिळते.
या कादंबरीच्या कथानकाच्या ओघात मुस्लीम समाजाविषयीचे अनेक बारकावे समोर येतात. जसं की, ‘दिवसेंदिवस उपवर मुलींकरता धार्मिक शिक्षण अत्यंत आवश्यक मानलं जाऊ लागलंय. मुलग्याला कुराणातला ओ की ठो नाही कळला तरी चालेल पर मुलीला कुराणपठण आलंच पाहिजे, ती पंचगणा नमाजी असलीच पाहिजे. नाहीतर लग्नाच्या बाजारात ती नाकारली जाण्याची मोठीच शक्यता असते’, हे मशिदीतून फक्त पुरुषांचा वावर दिसणाऱ्या बहुतेकांना धक्कादायक निरीक्षण वाटू शकेल. या धार्मिक ज्ञानासंबंधी येणारा उल्लेखही दाहकता वाढवणारा आहे, तो असा की, ‘ग्रामीण भागात इस्लामचे धार्मिक ज्ञान वाढवणे अशक्य असते. ग्रामीण भागातील व इतर कुठल्याही भौगोलिक स्थितीची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. त्याला अनुरूप अशी तिथे भाषा, संस्कृती यांची नैसर्गिक जडणघडण होत असते. त्यामुळे उपरी भाषा, संस्कृती यांचे रोप सहजासहजी रुजू शकत नाही. संवर्धन होणे ही फार नंतरची गोष्ट झाली. देशाच्या ग्रामीण भागात मौलाना मिळू शकत नाहीत.’
याच्यापुढे असं वर्णन येतं की, ‘खेड्यातील कित्येक कुटुंबांना कुराणातील गमभनसुद्धा येत नाही. अलीकडे हळूहळू यात बदल होऊ लागलाय. ज्यामध्ये बिहार, यूपीमधून इकडे मौलानांच्या नोकर्या करण्याकरिता तरुण येऊ लागलेत.’
हे वर्णन वाचल्यावर रामजन्मभूमी आंदोलनाच्याच काळात समांतरपणे तबलिग चळवळ खेडोपाडी कशी कार्यरत होत आहे, त्याची सांगड घालता येते. किंवा ‘इस्लाममध्ये समानता आहे, रोटीबेटी व्यवहार बिनदिक्कतपणे होतात अशी बहुतेकांची समजूत आहे. इस्लामविषयी इतर धर्मात, लोकात असे कित्येक चांगले वाईट समज आहेत. पण ते वास्तव नाही. समाजात ज्या काही खालच्या जाती समजल्या जातात त्यांच्याशी वरच्या जातवाले लग्न करत नाहीत, इतर जातीही आपापसात रोटीबेटी व्यवहार करत नाहीत, हे वास्तव आहे.’
हे वाचून जाणवतं की, स्वधर्मातील जातिभेदातून वाट्याला आलेल्या हलाखीच्या जीवनामुळे कंटाळून धर्मांतर केल्यावरही त्या उतरंडीच्या सावलीने तिथेही पाठ सोडलेली नाही.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
या कादंबरीत मुसलमानांच्या अनेक धार्मिक चालीरिती पाहून मुसलमानांचं सांस्कृतिकदृष्ट्या या मातीशी असणारं आंतरिक नातं स्पष्टपणे जाणवतं. नमुन्यादाखल लग्न सोहळ्याचं वर्णन घेऊ. त्यात इथल्या हिंदू लग्नांप्रमाणेच वरात आहे. हळद आहे, मेहंदी आहे, गाणी-बजावणी आहेत. ही गाणी खूपच धमाल आहेत-
आगरेसे मंगाया घागरा, घागरेका भार तुझे झेपताय क्या गे
कलकत्तेसे मंगाये तोडे, तोडेका भार तुझे झेपतंय क्या गे
दिल्लीसे मंगाया सखल्या, सखल्याका भार तुझे झेपताय क्या गे
मद्राससे भंगाया लच्चा, लच्चेका भार तुझे झेपताय क्या गे
या ओळी वाचताना ‘या गावचा त्या गावचा माळी नाही, आला वेणी नाही मला’, हे ‘नाच गं घुमा’ लोकगीत आठवलं. या लग्नातली नंतर बिदाई आहे. करवलीसारखी पाठराखीण आहे. एकूणच मुस्लीम संस्कृतीचं यातून जे दर्शन घडतं, ते पाहून अरबस्तान किंवा अनेक मुस्लीम देशांशी त्यांचा काहीच संबंध नसून त्यांची या मातीतील पाळंमुळं किती घट्ट आहेत ते जाणवतं. किंवा ‘सिट्टावखट्टावकातरखट्टाव झेंगट’ हा या कादंबरीमध्ये अनेकदा अवतरलेला शब्दप्रयोग कदाचित नुसताच ग्रामीण असेल, पण ते वाचून शब्द माहीत नसतानाही त्यातील नादामुळे भाऊ पाध्येंच्या ‘वासुनाका’तील ‘एकसष्ट बासष्ट’सारखा अर्थ नेमका प्रतीत होतो.
‘हुसेनभाई...’मध्ये भाषेचे तीन ओघ जाणवतात. निवेदनाचा काही भाग हा प्रमाण/नागर भाषेमध्ये येतो. कथानकाच्या ओघात मध्येच काही भाग तात्त्विक चिंतन स्वरूपात येतो, तिथे तर हा भाषापालट प्रकर्षाने जाणवतो. वर्णनाचा काही भाग हा ग्रामीण भाषेमध्ये येतो. तर बऱ्याचदा संभाषणं ही मुसलमानी भाषेत येतात. बोली भाषेत एकूणच जो गोडवा असतो तो स्थानिक मराठी, हिंदी, उर्दू यांचा मेळ घातलेल्या या मुसलमानी भाषेत अंमळ जास्तच जाणवतो. त्याचा एकच मासला देतो- ‘मुडदा कत्ता बेशरम! तभी आपनेकूबी यत्ता कुछ समजताबी नथा. इता नुसती उस बातकी याद आय तभी आंगपे काटा आतंय. तव तो आपली उमरभी क्या हाथी! इत्ता तभी आपलंकू कायमंकी क्या अक्कल हय बोलो और कायमंका क्या फथ्र समजतंय बोलो! क्या हुइंगा कुछ समजमं नय आता. कलीजंमं सारखा धडधड करतंय और दिमागका पुरा भुगा हुनंकी बारी आयीय्या. फुफूने अजून कुचभी बात काढेली नय. उनं कुछ बोलती नय तव तक आपलंकुबी गपच बैठणं हुना. और बोलकेबी उनं क्या बोलनेवाली! जो कुछ भोगनेका हाय वो आपलंकुच भोगनेका है. छोऱ्यांके जिंदगीकू ये फुकटकाच ताप हाय. हुया चकोट तो हुतंय, नैतो सारंच जिंदगीका विचका!’
शुद्धाशुद्धतेच्या चष्म्यातून आणि व्याकरणाच्या चौकटीतून या कादंबरीतील भाषेत अनेक त्रुटी सापडतील हे नक्कीच, पण प्रसंग, घटना, स्थळं यांची या कादंबरीत येणारी वर्णने इतकी प्रत्ययकारी आणि ओघवती आहेत की, या सर्व त्रुटी डोळ्यांना जराही खटकत नाहीत. किंबहुना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्षच केलं जातं. एकूणच ग्रामीण मजकुराचं मुद्रितशोधन हे एक वेगळंच तंत्र/आव्हान असावं असं ‘हुसेनभाई...’ वाचताना तीव्रतेने जाणवलं.
‘हुसेनभाई...’च्या शेवटाकडे सादिकने बढतीचा नवस पूर्ण न झाल्याच्या उद्वेगात घणाने फोडलेल्या वेताईच्या मूर्ती, निवडणुकीच्या धुमश्चक्रीमध्ये आकारामचा झालेला खून, यामुळे वातावरण खूपच भळभळतं होऊन जातं. त्यात सोनी आणि हुसेन हे रंगेहाथ सापडतात आणि त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी घाईगर्दीत सार्वजनिक ग्रामसभा भरवली जाते. प्रसंगावधान ओळखून तात्यासाहेब या सभेची सूत्रं हाती घेतात आणि बाबू नांगरे व चाँदभाईंच्या कुटुंबांना मंजूर नसतानाही हुसेन व सोनी यांच्या मतांना महत्त्व देऊन ‘मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी’ या न्यायाने त्या दोन प्रेमी जिवांनी तातडीने मुंबईला जावं व तिथे नोंदणी पद्धतीने लग्न करून गावातलं वातावरण शांत झाल्यावर परतावं, असा तोडगा काढतात. तात्काळ तसं घडतंही. गावातून निघणाऱ्या रातराणीला काही वेळ थांबवून हुसेन आणि सोनी घाईघाईत निघून जातात. या प्रसंगाचं वर्णन ‘सर्व गाव त्यांना निरोप द्यायला हजरच होता. सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते... हुसेनची मित्रमंडळी अगदी एसटीला लागूनच हुसेन व सोनीच्या खिडकीबाहेर दंगा, धमाल करत उभी होती. हुसेन आणि सोनीने जोरात हात हलवत सर्वांचा साश्रू नयनांनी निरोप घेतला,’ असं येतं आणि सामोपचाराने घेतल्यास बेटी व्यवहारही घडू शकतो, हा दिलासा मिळतो.
गावच्या पातळीवरचा हा शेवट सध्याच्या ‘लव जिहाद’च्या काळात आदर्शवादी म्हणावा असा आहे. पण कादंबरीभर जी हिंदू-मुसलमान सरमिसळ दाखवली आहे, त्या पार्श्वभूमीवर हा शेवट तितकासा खटकत नाही. ‘हुसेनभाई...’मध्ये ही सरमिसळ यथोचित प्रमाणात मांडली गेली आहे, ही या कादंबरीची जमेची बाजू आहे. जातिधर्मांची अशी सरमिसळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुसंख्य गावांमध्ये असणारच हे गृहीत धरता विचार असा येतो की, भारतीय साहित्यात-खरं तर कलाकृतींमध्येच-ही सरमिसळ त्याच प्रमाणात मांडली जाते का? अल्पसंख्यांकांच्या जगण्याला ‘हुसेनभाई...’सारखं प्रतिनिधित्व किती कलाकृतींमध्ये मिळत असेल? महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास ‘मुस्लीम मराठी साहित्य संमेलन’ भरवण्याइतपत साहित्य मुस्लीम समाजाकडून प्रसवलं जात असलं तरीही ‘लोकसंख्येत जेवढी टक्केवारी तेवढं समाजाच्या सर्व स्तरांतील जीवनाला आरक्षण मिळावं’ हे नवीन सूत्र ग्राह्य धरायचं झाल्यास, साठोत्तरी म्हणून गणल्या गेलेल्या काळात अल्पसंख्याकांच्या जीवनाच्या बाबतीत हे प्रमाण अपुरं असावं, असं वाटतं. मुसलमानी जीवनातील काही समस्या, बारकावे यांना या साहित्यात स्थान मिळालेले असेलही कदाचित, पण अशी सरमिसळ बहुदा विरळाच असावी.
युसुफच्या बोलण्यावागण्यातून मला जे गाव कळत होतं, त्यापेक्षा या लिहिण्यात बरंच काही अधिकचं आणि खोलवरचं गवसत गेलं आणि कळलं की आपल्याला ‘ग्रामीण’ वाटत होता तो युसुफ प्रत्यक्षात ‘गावरान’ आहे आणि मुंबईत पन्नास वर्षे घालवूनही त्याच्या अंतरंगात ते गावरानपण शाबूत आहे. यातून माणसाची नाळ आपल्या जन्मजात लाभलेल्या पर्यावरणाशी किती खोलवर रुजलेली असते, हे जाणवून फाळणीच्या वेळी तशी मुभा असतानाही देशांतर न केलेल्या हिंदू-मुस्लिमांची मातीविषयीची ओढ आकळली. आणि ज्या मोजक्या मंडळींनी हे देशांतर केलं असेल, त्यांनी हृदयावर कसा दगड ठेवला असेल, तेही जाणवलं. आणि दोन्ही देशांमधील देशांतर न केलेल्या लोकांना नवीन देशांमधले अल्पसंख्य म्हणून सतत संशयी नजरेला तोंड द्यावं लागतं, तेव्हा त्यांना काय मनस्ताप होत असेल, याची कल्पना आली आणि जीव गलबलला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ही कादंबरी वाचण्याचा महत्वाचा फायदा असा झाला की, हिंदू-मुस्लीम दंगली या शहरांमध्ये होतात, त्यांचं लोण गावांपर्यंत का पसरत नाही, याचं कारण तेथील सरमिसळीमुळे होणाऱ्या वैयक्तिक ओळखीपाळखींचं फलित म्हणून न जाणवणारा आपपरभाव हे असावं; उलटपक्षी शहरात दंगली होतात याचं कारण अनोळखीमुळे वाटणारा पूर्वग्रहदूषित आकस आणि राजकारणातून/धर्मकारणातून या आकसाला घातलं जाणारं खतपाणी/ओतलं जाणारं तेल हे असावं, या माझ्या कयासाचा खुंटा या कादंबरीने हलवून बळकट केला, यासाठी युसुफचे आभार, अभिनंदन...
सध्याच्या धार्मिकदृष्ट्या भडक, भळभळत्या वातावरणात ही कादंबरी महत्त्वाची ठरून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा.
‘हुसेनभाईचा कुणी नाद न्हाय करायचा!’ – युसुफ शेख
अक्षर प्रकाशन, मुंबई
मूल्य – १७५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment