अजूनकाही
भारतातलं पर्यटकांचं सर्वांत मोठं आकर्षण कोणतं असं विचारलं तर उत्तर ‘ताजमहाल’ हेच येईल, यात शंका नाही. अर्थात तिथं प्रत्यक्ष न जाताही टीव्हीवरचे कार्यक्रम, जाहिरातींतून तो आपल्याला वेळोवेळी दिसत असतोच. शिवाय बरेच हिंदी चित्रपट व त्यातली गाणी ‘ताजमय’ आहेत. ‘एक शहेनशाहने बनवा के हसीं ताजमहल’ हे गाणं बहुतेकांनी ऐकलेलं असतंच. एकंदर, ताजबद्दलची विविध मतं, प्रवाद या सगळ्यामुळे तो कायम चर्चेत असतो. त्यात हल्ली भारतात प्राचीन वास्तू, गावं, त्यांची नवी नावं, अशा गोष्टींवर जोरदार चर्चा चालू आहेत.
योगायोगानं माझ्या वाचनात नुकताच एक लेख आला. त्यात पु. ना. ओक यांनी ताजबाबत मांडलेल्या अशाच काही शक्यतांचा संदर्भ होता. त्यामुळे ‘Raaz Mahal - The Palace of Secrets’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आणि तिच्या लेखकाचं नाव नील नेथन हे कळताच उत्सुकता आणखीन चाळवली. बरं हे प्रकाशनही फार वेगळ्या पद्धतीनं झालं. लेखकाच्या नावाची ‘वेबसाईट’, त्यावर कादंबरीची जुजबी माहिती, उपलब्ध करून दिलेलं सुरुवातीचं प्रकरण (जणू ट्रेलर!) आणि ते आवडल्यास कादंबरी सुलभपणे विकत घेण्याचे विविध मार्ग (संकेतस्थळे)! मान गये जनाब!! मग काय, ती घ्यायचा मोह मला आवरला नाही, आणि वाचून होताच या रहस्य-शोधकथेची ओळख इतर वाचकांना करून द्यावी, असं प्रकर्षानं वाटलं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
तर थोडक्यात कादंबरीचं कथानक साधारण असं : भारतीय पुरातत्व खात्याकडे माहितीच्या अधिकाराच्या (RTI) अखत्यारीत एक विचित्र याचिका येते. यात ताजमहालची प्रचलित उगमकथा शास्त्रीय पुराव्यानिशी सिद्ध करण्याची मागणी केलेली असते. अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं की, वरवर पाहता साधी सोपी वाटणारी ही याचिका वाटते तितकी सरळ नाही, परंतु ती त्वरेनं आणि संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं आहे. हे प्रकरण प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ विजय कुमारकडे सोपवलं जातं. तो आग्रा विभागात नुकताच रुजू झालेला, पण काहीसा कंटाळलेला असतो. साहजिकच विजयला यात एक आव्हान दिसतं. तो याचिकेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पद्धतशीरपणे कशी शोधतो, हे करताना त्याला कोणत्या अडचणी येतात आणि आपल्या अहवालात कोणते निष्कर्ष काढतो, याभोवती ही कादंबरी फिरते.
कथानकाची सुरुवात ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीनं १६३१ पासून होते. मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिचं झैनाबादमध्ये केलेलं दफन, राणीचं भव्य स्मारक आग्र्यात बांधायचा शाहजहानने दिलेला संकेत, त्यानंतर ६० वर्षांनी ताजच्या तळघरात एका थडग्यातून झालेली सोन्याच्या नाण्यांची चोरी, या प्रसंगानंतर कथा पोहोचते थेट स्वतंत्र भारतात. १९६०च्या सुमारास प्रोफेसर रॉय ‘ताज’वर संशोधन करून एक महत्त्वाचा शोध लावतात. ते दिल्लीतल्या एका वजनदार नेत्याची भेट घेऊन आपण लावलेल्या शोधाची विस्तृत माहिती पुराव्यांसहित देतात आणि आपला इतिहास कसा मुघलकेंद्रीत आहे, हेही सांगतात. हा नेता त्यांच्या अहवालातल्या काही गोष्टींची खातरजमा करून घेतो. परंतु हे संशोधन जगासमोर यायच्या आतच प्रोफेसर रॉय त्यांचा गूढ रीतीनं अपघाती मृत्यू (की हत्या?) होतो. रॉय यांनादेखील काहीतरी काळंबेरं होऊ शकतं, याची चाहूल लागलेली असावी, कारण मृत्यूपूर्वी त्यांनी कोणाला तरी टपालानं काहीतरी पाठवलेलं असतं. काय असेल त्या टपालात? आणि आता इतक्या वर्षांनंतर ही माहितीची याचिका!
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
याचिकेला उत्तर देण्याच्या दृष्टीनं आग्रा विभागाचे प्रमुख चोप्रा एक शोधगट स्थापतात. त्याचा प्रमुख विजय आणि साथीला तिघं; बरीच वर्षं आग्रा विभागात कार्यरत असलेले चांद मलिक, ‘जेएनयू’मधून आलेला समीर सेठ आणि युनेस्कोची इंटर्न सोनिया. त्यांना ते लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देतात, परंतु संपूर्ण स्वातंत्र्य व योग्य त्या मदतीचं आश्वासनही देतात. विजय त्याच्या गटाला काही गोष्टी स्पष्ट करतो. एक म्हणजे अहवाल हा पुराव्यांवर (खऱ्या वस्तू, नमुने, न्यायालयाचे निकाल, १७व्या शतकातली फर्मानं) आधारित असला पाहिजे, न की दंतकथांवर!
आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी संभाव्य असू शकतात, पण कोणताही निष्कर्ष नवीन तथ्यांवरच आधारित असला पाहिजे. समीर व सोनिया उत्साहानं अनुमोदन देतात. आग्रा ऑफिसमध्ये आयुष्य काढलेल्या मलिकला हे सगळं अनावश्यक वाटतं, परंतु विजयला आव्हान न देता तो या सगळ्यात काहीसा अनिच्छेनं सहभागी होतो. जणू प्रस्थापितांचा प्रतिनिधी म्हणून! सरकारी ऑफिसमधलं वातावरण - राजकारण हे सारं लेखकानं फार छान खुलवलं आहे.
कादंबरी इथून वेग घेते. विजय संशोधनासाठी आग्र्यातली काही स्थळांना भेटी देतो, नंतर इंग्लंडला आणि शेवटी अचानक झैनाबादला जातो. योगायोगानं विजय जिथं जिथं जातो, तिथं तिथं काही अनाकलनीय मृत्यू घडतात. त्यामुळे या प्रकरणावर टीव्ही वाहिन्या, ताज वक्फ बोर्ड आणि यंत्रणांचंही बारीक लक्ष लागलेलं असतं. अहवाल समितीसमोर सादर करायची वेळ येते आणि आयत्या वेळी दिल्लीचे ते वजनदार नेते इतिहासतज्ज्ञ प्रा. माथूरबाई यांना पाचारण करतात. विजय आपलं संशोधन पुराव्यासहित सादर करायला सुरुवात करतो आणि पहिल्याच सत्रानंतर दिल्लीची मंडळी कमालीची अस्वस्थ होतात, कारण त्यांनी आयुष्यभर जे सत्य मानलेलं असतं, त्याला हादरे बसू लागतात आणि त्यांचा पारा हळूहळू चढायला लागतो.
सूज्ञ वाचकांना प्रा. माथूर हे पात्र भारतातल्या इंग्रजी वाहिन्यांवर चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या एका प्राध्यापिकेशी मिळतंजुळतं वाटेल! विजय मात्र शांतपणे तज्ज्ञ साक्षीदार बोलावत ठामपणे आपलं निष्कर्ष मांडतो. त्यामुळे समिती अगदी ‘चेक-मेट’ होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
हे सगळं वाचताना एखाद्या न्यायालयीन खटल्यांमधले ताणतणाव आणि नाट्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण काय आहे हा नवा शोध? आणि मुख्य म्हणजे विजय, त्याचे साथी आणि त्यांच्या स्फोटक अहवालाचं पुढे काय होतं?
या सगळ्या रहस्यांचा छडा आपण कादंबरी वाचूनच लावायला हवा! ते गूढ आणि त्याच्या शोधामागचा थरार हे अगदी शेवटच्या प्रकरणापर्यंत वाचकाला खिळवून ठेवतं. भाषा ओघवती आणि सोपी आहेच, शिवाय बारीकसारीक तपशील, ऐतिहासिक संदर्भही अगदी नेमकेपणानं मांडलेले आहेत. विशेष म्हणजे मोजकीच पण वैशिष्ट्यपूर्ण पात्रं पेरल्यामुळे कादंबरी आपला ठाव घेते. त्यांचे एकमेकातले संवाद, वागणं हे अगदी नैसर्गिक वाटतं.
हे सारं आणि लेखकाचं नाव पाहता तो रस्किन बॉण्डसारखा आंग्ल-भारतीय निवासी तर नसेल, अशी शंका येणं स्वाभाविक आहे! अर्थात लेखक कोणीही असो, या सगळ्यातून त्याचा अभ्यास व कल्पकता जाणवते. दोनच त्रुटी जाणवल्या. एक म्हणजे कथानकात ठिकठिकाणी येणाऱ्या संदर्भांची सूची परिशिष्टात देता आली असती, आणि दुसरी म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेली वेळ; ती देण्याची गरज नव्हती, कारण घटनाक्रम बऱ्याच आठवड्यांचा आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
चोखंदळ रहस्यकथाप्रेमी या कादंबरीचं स्वागत करतील, पण असंही वाटतं की, पुढेमागे या सहिंतेवर एखादी छानशी वेब सीरिज वा चित्रपट निघावा. आणि हे गूढ नाट्य इतक्या बारकाव्यांसह रंजकतेनं लिहिणारा हा नवा लेखक, नील नेथन कोण आहे, कसा दिसतो, याचंही ‘राज’ कालोपरत्वे उलगडेल अशी आशा करूया!
(अमेरिकेतल्या ‘बृहन्महाराष्ट्र वृत्त’च्या नोव्हेंबर ई-पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखात काही बदल करून लिहिलेला हा पुस्तक परिचय.)
.................................................................................................................................................................
या कादंबरीतील एक प्रकरण वाचण्यासाठी पहा -
https://nealnathan.files.wordpress.com/2021/07/raaz-mahal-by-neal-nathan-sneak-preview.pdf
.................................................................................................................................................................
रवी गोडबोले, अॅटलांटा
ravigod08@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment