‘हिंदू - एकविसाव्या शतकातील सामाजिक समस्या’ या चिकित्सापर ग्रंथामध्ये राकेश वानखेडे यांनी भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ ही कादंबरी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथाची तुलनावजा चिकित्सा केली आहे. या पुस्तकात ‘हिंदू कादंबरीतला स्त्रीविचार’, ‘हिंदू कादंबरीतला धर्मांतराचा विचार’, ‘हिंदू कादंबरी आणि संघविचार’, ‘आदिवासी समाजजीवन आणि हिंदू’, ‘भटक्या विमुक्त जाती आणि हिंदू कादंबरी’, ‘हिंदूमधील दुभंगलेला नायक’, अशी प्रकरणे आहेत. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
‘‘खंडेराव त्या अंधारात तू न घाबरता न पळता पाय रोवून उभा राहिला होतास, तसेच कोणत्याही कामात उभा रहा. इथला उद जसा जमिनीतून कोणाला कळणार नाही, असं वेडंवाकडं वरखाली गिरकी घेणारं तीरपंतारपं बिळ उकरून इथेच कुठेतरी सुरक्षित जागेवर लपून बसलेला आहे. तसाच तूही वर्तमान काळात बसून राहा. कान, डोळे, नाक, मिशा क्षणाक्षणाला तल्लख ठेवून या प्रतिकूल परिस्थितीला केव्हा अनुकूल करता येईल, याची वाट पाहत. तो बिळावाटे बाहेर पडला होता, तसाच तूही आहेस. हे अफाट विश्वातलं तुझ्या आयुष्याचं बुजलेले भुयार खणत राहा. कचरू नको. धज. शेवटी एक उजेडाचा बिंदू असतोच सुटकेचा. असाच आत्ममग्न, आत्मकेंद्री हो. खणत राहा ती चांदणी ते उजेडाचं टोक. केव्हातरी तुझ्याही वाट्याला येईल. तोच शेवट. तेच यश पूर्णविराम.’’
या ओळी आहेत ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतल्या. ही कादंबरी आहे एक दीर्घकाळ नुसतीच नावाला टिकून राहिलेल्या, अवमूल्यन झालेल्या हिंदू संस्कृतीक जीवनशैलीच्या शोकात्मतेची. तिला ‘मराठीतली अभावपुजनाचा प्रघात पाडणारी कादंबरी’, असेही म्हणता येईल. जे अस्पृश्यतेचे ‘सफरर’ नाहीत, मात्र ‘छद्म साक्षीदार’ आहेत, ते जातीअंताच्या लढ्याकडे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे कसे पाहतात, याचा नमुना ही कादंबरी आहे. छद्म अशा साक्षीदार घटकाला आपली मुळे आणि मूल्य कोसळत आहेत, हे एका बाजूला वाटते, तर त्याच वेळी जातिव्यवस्था ही रंगीबेरंगी फुलपाखरासारखी आहे, असेही वाटत राहते. त्यांचे हे त्यांच्यापुरते असणारे निराधार आकलन मोठे करणारी ही कादंबरी आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
जो काही भारतीय चांगुलपणा आहे, त्याला हिंदू म्हणून सांगणे म्हणजे म्हणजेच हिंदू म्हणजेच भारतीय आणि भारतीय म्हणजे हिंदू या सदरातले हे तुष्टीकरण आहे. आज देशात आलेल्या उजव्या लाटेची सारी कच्ची सामग्री हिंदू जगण्याच्या शैलीत ओतप्रोत आहे, हेही दाखवणारी ही कादंबरी आहे. एक परंपरेचा दीर्घ पगडा असलेला मोठा समुदाय संक्रमणावस्थेत सापडल्यावर त्याची नवमूल्यं स्वीकारायची मनोदशा किती नकारात्मक असते, हे मांडणारी ही साहित्यकृती होय. ती दुहेरी पेचात सापडलेला समुदाय ठळक करते. हा दुहेरी पेच समुदायाला आहे, तसाच तो नायकाला, पर्यायाने लेखकालाही आहे. एक मोठ्या भूखंडावरची हिंदूंनी सांस्कृतिक लढाई गमावल्याची कबुली देणारी ही कादंबरी आहे.
नेमाडे यांचे मोठेपण हेच आहे की, दुहेरी पेचाचे दोन्ही संदर्भ आपल्यापुढे त्यांनी मांडले आहेत. या भरभक्कम सहित्यकृतीचे दोन ढोबळ भाग कर येतात. पहिली अडीचशे पाने ही भूतकाळाच्या गौरवाची आहेत, तर नंतरची उर्वरित पाने ही आजची हिंदू समुदायाची निरीक्षणे आहेत. त्यात हिंदू समुदाय संस्कृतीला आलेले ओंगळ रूपाची ती सटायर चिकित्सा आहे. या चिकित्सेसाठी दोन्ही काळाचे भरभक्कम असे चोखंदळ संदर्भ पुरवणारी ही कादंबरी आहे. ‘हिंदू’ टिपिकल माणसाचे अंतरंग टिपणारी, हिंदू कसा आहे- तर तो कर्मठ आणि न बदलणारा या कादंबरीसारखाच आहे, असे सांगता येते. चिकित्सेसाठी दोन्ही संदर्भ ठेवल्यामुळे लेखकाचे अभिनंदनच केले पाहिजे. या ठिकाणी नेमाड्यांवर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्याचा माझा उद्देश नाही. हिंदू धर्मातले ते प्रातिनिधिक घटक आहेत. या लेखात ‘हिंदू’ हा शब्द ‘हिंदू धर्म’ अणि ‘हिंदू कादंबरी’ दोन्ही अर्थानं वापरलेला आहे. यातला खंडू म्हणजे नेमाडे नव्हे. म्हणून माझी मतं ही नायकाबाबत आहेत.
ही प्रचलित अर्थाने समीक्षा नाही, फार तर एका वाचकाची प्रतिक्रिया असे तिला म्हणता येईल. समीक्षेला प्राथमिक शिस्त असते, असे मी मानतो. ती या चिंतनाला नाही. म्हणून ती प्रतिक्रिया होय. इतरांनी कुणी काय-काय या कादंबरीविषयी म्हटले, ते काहीही मी पाहिलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जातीसंस्थेचे विध्वंसन’ या पुस्तिकेतील अवतरणे देऊन माझा मुद्दा स्पष्ट करणार आहे. म्हणजे येथे फक्त तीनच घटक आहेत नेमाड्यांची ‘हिंदू’ ही कादंबरी, ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ ही छोटीशी पुस्तिका आणि मी केलेले विश्लेषण. या तीनच घटकांभोवती ही सगळी चर्चा आहे. त्याच्या पलीकडे मला ही चर्चा इतरांची उद्धरणे देऊन भरकटवायची नाही. काही संदर्भ आलेच तर ते केवळ अनुषंगिक आहेत. डॉ. आंबेडकरांचे इतर लिखाण असो किंवा नेमाडेंचे इतर लिखाण असो, याचादेखील या विश्लेषणाशी संबंध नाही. हे विश्लेषण फक्त ‘हिंदू’ कादंबरीपुरतेच सीमित आहे.
प्रत्येक काळाची गुणवत्ता जोखण्याची काही मानांकने निकष असतात. मध्ययुगाचे भाष्य असल्यास ते बौद्धविचारावर, अर्वाचीन असल्यास ते संतविचारावर आणि आधुनिक असल्यास ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारावर घासून पाहावे लागते. त्याच आधाराने या लेखात नेमाडे यांच्या देशीग्रस्त मर्यादांची चर्चा होते, तसेच मुद्दा हा अस्पृश्यतेच्या सहप्रवासाचा नसून समानतेचा आहे. या मुद्द्यावर हिंदू समाज आणि ही साहित्यकृती कशी आहे, ते पाहणे मला अगत्याचे वाटते आहे. तीच माझ्या या आस्वादवजा प्रतिक्रियेची मर्यादा समजावी.
जो-जो मनुष्य हिंदू धर्मात राहिल, त्या-त्या माणसाला आपल्या विचारस्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही, हे सूतोवाच करणारी ही कादंबरी आहे, असे माझे मत झालेले आहे. हिंदूमधल्या खूप समूहाला बोलघेवडी समृद्धी नको, तर समता हवी आहे. त्याच्या या हतबलतेचा आवाज टिपण्यात सदर साहित्यकृती कशी कमी पडत जाते, ते आपण पाहणार आहोत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
ऑडिसन असे म्हणतो- ‘‘एखाद्याच्या बुद्धीने समाजाचे कसे हित किंवा अहित होते आहे, याचा फारसा विचार न करता जर लोक त्याच्या पात्रतेबद्दल आदर बाळगत असतील, तर यापेक्षा समाजाला अन्य मोठी घातक गोष्ट असू शकत नाही. बुद्धीच्या या नैसर्गिक देणगीचा व कलात्मक सिद्धीचा उपयोग सदगुणांच्या विकासासाठी होत असेल व सभ्यतेला बाध आणत नसेल, तरच ती सिद्धी मूल्यवान ठरते. आपण ज्याच्याशी संभाषण करतो, त्याच्या मनाचा कल व वृत्ती आपल्या नीट लक्षात येईपर्यंत त्याच्याबद्दल चांगली मते बनवण्याचे टाळले पाहिजे. नाहीतर त्याच्या व्यक्तिमत्त्वातील आकर्षणामुळे विचारांती तिरस्कार करण्याजोग्या माणसांच्या जाळ्यात आपण सापडू.’’
नेमाड्यांच्या बाबतीत मराठी साहित्याचे असेच झाले आहे. त्यांच्या या प्रभावामुळे मराठी साहित्य लिखित परंपरेऐवजी मौखिक परंपरेकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून ही चिकित्सा आवश्यक आहे.
या लेखाच्या अगदी सुरुवातीला कादंबरीच्या पृष्ठावरील (२०१६ : ३६१) वरील नेमाड्यांनी स्वतःच्या आत्ममग्नतेचा खुलासा करणारा उतारा दिला आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे हिंदूचे स्वपुरते पाहण्याचा विन्यास रचणारी ही कादंबरी आहे. म्हणजे पारंपरिकतेने बध्य हिंदू कुटुंब असो वा व्यक्तिरेखा या साऱ्यांचा हा धांडोळा म्हणजे ही कादंबरी आहे.
मोरगाव नावाचे एक काल्पनिक खान्देशातले गाव या कादंबरीत आहे. असे म्हणतात की, भारतात मौर्य काळात सोन्याचा धुर निघत असे. त्या गतसमृद्धीचे प्रतीक म्हणून असे नाव घेतलेले असावे असे दिसते. चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक बौद्ध होता, पण आजा चंद्रगुप्त हा मात्र हिंदू होता. म्हणून बौद्ध झाल्याने भारताचे ते सुवर्णयुग गुप्तांनी अशोकच्या काळात घालवले असे गृहीतक लेखकाचे असावे. यामुळे खंडूच्या गावाचे नाव मौर्यग्रामवरून मोरगाव झाले आहे. बौद्धमय भारत झाल्यामुळे या महान हिंदू संस्कृतीचा सुवर्णयुगाचा समृद्धीचा ऱ्हास झाला असे गोंधळाचे प्रमेय मोरगाव या नावापासूनच या कादंबरीत आहे.
कादंबरीच्या शीर्षकापासूनच गोंधळ सुरू होतो. लेखकाला ठामपणे हिंदू जगण्याचा शैलीला ‘समृद्धी’ही म्हणता येत नाही वा ‘अडगळ’ही म्हणता येत नाही. अडगळ ही समृद्ध असली म्हणून ती जगण्याच्या कामी उपयोगी येत नसते वा तिला टिकाऊ असेही म्हणता येत नाही. पण ‘अडगळी’ला ‘टाकाऊ’ हाच योग्य पर्यायी शब्द मराठीत आहे. पण हे असे म्हणण्याचे धाडस कादंबरी वा नायक करत नाही. म्हणून ज्याबाबत काहीही ठाम सांगता येत नाही, ते म्हणजे ‘हिंदू’ होय.
असाच हिंदू समुदायाप्रमाणे प्रचंड गोंधळ असलेला, अपराधी गंड असलेला, भान हरपलेला, सामाजिक चळवळीकडे तुच्छतेने पाहणारा, जगात होऊन गेलेल्या परिवर्तन, क्रांत्या, रेनेसान्सच्या मूल्यांचा कोणतीही गुजवार्ता कानी नसलेला, झापडबंद, आपल्या अंडकोषात बद्ध, स्वप्रेमात बुडालेला नायक म्हणजे खंडू होय. जो सिंधु संस्कृतीपर्यंत जाऊनही आपल्या अंडकोषाचं साधं टरफलंही न टरकाऊ शकलेला, समाजविकृतीच्या जात जाणिवा गोंजारणारा असा नायक आहे. तो समाजात होणाऱ्या सुधारणेप्रती त्यामुळेच प्रचंड तटस्थ आहे.
आंबेडकर म्हणतात- ‘कार्लाइल जातीसंबंधी तटस्थ भूमिका असलेल्यांना जैविक तंतू म्हणतो’.
नेमाड्यांनी आपले विचारवहण करण्यासाठी असाच जैविक तंतु मानसपुत्र म्हणून खंडूला जन्माला घातला आहे. खंडूच्या कथानातून त्यांच्या सात पिढ्यांचा इतिहास या कादंबरीत उलगडत जातो. पण आंबेडकर म्हणत की, ‘हिंदू धर्म हा नाल्यासारखा आहे. बौद्ध स्वच्छ नाला व ब्राह्मणी गलिच्छ नाला. या दोहोंच्या संगमामुळे हिंदू धर्माचा घाणेरडा नाला तयार झाला आहे. पण घाण साफ करता येईल.’ मात्र हिंदू समुदायाचा तसा कधीच हेतू नसल्याने खंडू तसा कादंबरीत उभा राहत नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
तुम्ही कितीही नवं व्हायचा प्रयत्न केला तरी आधीचं सगळं संपूर्ण नष्ट करता येत नाही, ते नाहीसं होत नाही, ही या कादंबरीची बीजसंकल्पना (२०१६ : २२८) आहे. जुनी-नवी साधनसामग्री वापरून वाडा बांधला जातो. ही वाड्याची प्रतिमा घेऊन लेखकाला हिंदू धर्माचा ढाचा कसा तयार झाला आहे, हे दाखवायचं आहे. सारचं नवं नसतं. जुनंही नव्या बांधणीसाठी उपयोगी येतं. हिंदू हे याच आपल्या सेंद्रीयत्वावर उभे आहेत. जुने लाजीरवाणे असले तरी त्याची लाज बाळगू नका, त्याद्वारेच नवबांधणी होईल, असा विश्वास नायकाला येथे आहे. वाड्याच्या रोजच्या वापराच्या वस्तूंचा तपशील, असा सारा भरपूर सरंजामी ऐवज जमा झालेला आपल्याला वाचायला मिळतो.
गरीब हिंदूच्या घरांत सतरा पिढ्यांत सापडणार नाही, अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा तपशील (२०१६:२२९) कादंबरीत आला आहे. अन्नवस्त्र आदी गरजातून मुक्त झालेल्या हिंदू परंपरेने सरंजामी शोषक असणाऱ्या पाटील, देशमुख आणि महाजनांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. उदरनिर्वाहाच्या फिकिरीत असलेल्या, मोठ्या संख्येने श्रमिक असणाऱ्या हिंदूंशी तिचा संबध नाही. मात्र ती मूठभर असणाऱ्या शोषकांची आहे. मात्र आपला संयत निरोगीपणा राखण्यासाठी कुणब्यांची व्यथा असल्याचा बनाव ती करते.
विविध जातींचे प्रातिनिधिक चित्रण करणारी ती नाही किंवा ती विविध जातींची प्रातिनिधिक कादंबरी नसून अपवादात्मक अशा कुटुंबाची आहे. तिचा आणि कष्टकऱ्यांचा काही संबंध आलाच, तर तो त्रोटक असा आहे. त्यातले अनेक प्रसंग, अनेकदा कष्टकऱ्यांच्या अंतरघटीताचा आव आणत असला, तरी पण तेथील समृद्ध रेखाटणे सारी सरंजामदाराची आहेत. हे सरंजामदार आणि शोषक हे हिंदू समाजात एकमेकात कधीच मुरलेले नव्हते, हे ती सांगत नाही.
आंबेडकर म्हणतात- ‘समाजाच्या सर्व घटकांचा परस्परसंबध हा दानाचा नसावा, तो विनियमयाचा असावा.’ असा विनियम स्थापित करणारा नायक समाजाचा आदर्श असतो. हिंदू समाजातला महाजनवर्ग हा सामंतीव्यवस्थेतला पायाभूत घटक होता. शोषण हेच त्याचे लक्षण असल्याने हिंदू समाजाचा तो कधीही आदर्श म्हणून तो मानला गेला नाही. कोणत्याही एका वर्गाचे अन्य वर्गावर राज्य असणे हे कोणत्याही अर्थाने चांगले नाही. असे आदर्श मूल्य प्रस्थापित करण्याऐवजी खंडू आपल्या मागास विचारांचे ग्लोरीफीकेशन करताना दिसतो. खंडूचे आर्थिक दारिद्र्य नसले तरी बौद्धिक आहे. त्यांच्या दारिद्र्याची संस्कृती तो सहेतूने स्वीकारतो.
खंडू म्हणतो, ‘....मॉडर्न शब्दाचा अर्थ कुरूप, अल्ट्रा मॉडर्न म्हणजे की, इतकं कुरूप काहीही नाही.’ (२०१६:२२९) हेच हिंदूंचं गृहीतक आहे. ‘हिंदू’ कादंबरी मध्यम जातींना मॉडर्न करण्याऐवजी भ्रामक हिंदुत्वाची अस्मिता देत, मध्यम जातींच्या तथाकथित गतसमृद्धीची तोंडपाटीलकी करणारी आहे. ब्राह्मण हे पहिल्या दर्जाचे ब्राह्मण व आपण दुसऱ्या दर्जाचे ब्राह्मण, असा समज असणाऱ्या मध्यम जातींसाठीची ‘हिंदू’ कादंबरी ‘खयाली पुलावाचे दासबोध’च आहे. समाजातले वर्चस्वकेंद्राचा फक्त येथे बदल केला आहे. आम्ही तुमच्या जुन्या मालकापेक्षा चांगला आहोत, हे असे खालच्या वर्गाला येथे भासवणे, असे प्रयोजन आहे. याउलट निरोगी समाजास कोणतीही मालकशाही नकोच असते. या विचारापर्यंत खंडू येत नाही. हेच या कादंबरीचं अपयश आहे.
‘हिंदू’ ही देशमुख-महाजन कुटुंबाची कहाणी आहे, पण ती अत्यंत बेमालूमपणे कुणबी असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. मुळात देशमुखांचा आणि कुणब्यांचा तरी काय संबंध असतो? कुणबी हे श्रम व्यवस्थेशी जोडलेले आहेत, तर देशमुख हे वरच्या वर्चस्ववादी, सरंजामी शोषकव्यवस्थेशी जोडलेले आहेत. या कादंबरीत सहेतूक कुणबी कुटुंबाचा विविध समाजांशी असणाऱ्या आंतरक्रिया येतात. उदा.- कुणबी : पशुपक्षी, कुणबी : बारा बलुतेदार, कुणबी : मारवाडी, कुणबी : महार-मांग-चांभार, कुणबी: व्यापारी,तसेच कुणबी : वसाहती कालखंड, कुणबी : धनगर, कुणबी : ब्राह्मण. त्याचबरोबर कुणब्याचे पशुपक्ष्यांशी, प्राण्यांशी असलेले संबंध, कुणब्याचे वारकरी-महानुभव-नाथपंथीयांशी असलेले संबंध, कुणब्याचे यात्रा, खेळ, उत्सव, सण, परंपरा यातल्या खूप साऱ्या आंतरक्रिया या कादंबरीत येतात. तसेच कुणब्यांची : आपत्य, सवत, सावत्र भाऊ, स्त्रियांची विविध रुपे, त्यात मुलगी, सून, जाऊ, आई, आजी, पणजी, आजीसासू, अत्या, ननंद, भावजयी, तसेच बाळंत झालेली स्त्री, माहेरवाशी माघारी आलेली स्त्री, सोडलेली स्त्री, बायको, वांझ, तरुणपणी रांडावून गेलेली, रांडावपणात म्हातारपण काढलेल्या विधवा, वेश्या, दाशी, भटक्या, शिंदळ्या या कादंबरीत आलेल्या आहेत. या साऱ्या घटकांशी कुणब्याचे आणि कष्टकऱ्यांचे मनस्वी संबंध असतात, देशमुखांचे नाही. कुणबी हा अलुतेबलुतेदारांचा विवादास्पद नगरपिता होता, हे कुणीही मान्य करेल. पण देशमुख आणि महाजन हे आलुतेबलुत्याचे अमान्य असे अस्वीकाहार्य स्वयंघोषित नगरपिता असण्याबाबत कायम कलह चालत आलेला आहे. असा हा देशमुख महाजनांच्या दडपशाहीचा कोणताही कलह कादंबरी टिपत नाही.
मात्र कुणब्यांची झूल अंगावर घेऊन देशमुखांना जे मुळातच व्यवस्थेतले सर्वाधिक ऐदी क्रूर, असे खलनायक आहेत, त्यांना वारकरी झूल चढवून, कष्टकऱ्यांचा मुखवटा बांधून हिरो करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. सामान्य हिंदूचे जगणे यापेक्षा वेगळे आहे. कष्टणारे-राबणारे हात गावाला हवे असत. ते हात येथे अदृश्य आहेत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
देवाला मुली काय आणि बोकडबळी काय, अशी हिंदूंची धारणा असते. याबाबत आंबेडकर म्हणत, ‘देवासाठी मुली सोडणारे लोक हे केवळ आपल्या मुलींचेच हितशत्रू नाहीत, तर ते समाजाचेही शत्रू आहेत.’ त्याचे उदाहरण म्हणजे तिरोणी आत्या होय. ती एका अर्थाने देवदासीच आहे.
आंबेडकर देवदासींबाबत म्हणत- ‘देवाची दासी म्हणजे विश्वाची योषीता.’ आता महानुभवांच्या मठातली योगिनी आणि देवदासी यात फरक असतो असेही काहीजण म्हणतील. पण महानुभावांची पाठचिकित्सा, काळे कपडे घालून चालणारे गुप्तकार्य अणि समाजापासून दुरावल्याने लाभलेल्या एकांत, याने महानुभव पंथाचा ऱ्हास झाला. म्हणून महानुभव पंथ तुम्हाला काहीही माहीत नाही, अशा प्रतीवादाला अर्थ नाही. त्यासाठीही आंबेडकरांच्या भाषणातले एक वाक्य सांगावे लागेल की- ‘आम्ही हिंदू धर्माचे बारसे जेवून बसलो आहोत’.
या कादंबरीत देशमुखांच्या धाकट्या पातीचे नागोरावाचा खंडू हा वंशज होय, ज्याच्या वाटचालीकडे आणि परत घरी माघारी फिरण्याबाबत म्हणता येते की, पारंपरिक हिंदू वातावरणात गुणवत्तेला कोणतेही प्रोत्साहन नसते. गुणवंताला हिंदू हे निरुत्साही करतात, त्याला खुंट्याला बांधतात. याचे उदाहरण म्हणून खंडू सांगता येतो.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा : ‘होय, हे पोलिटिकल स्टेटमेंट!’ - डॉ. भालचंद्र नेमाडे
..................................................................................................................................................................
खंडूमध्ये मुळातच गुणवत्ता आहे वा नाही हाही प्रश्न उभा करता येईल. पाकिस्तान-अफगाणिस्तानात जाऊनही बौद्ध अवशेषाबाबत तो काहीही सांगत नाही. कारण आजच्या अफगाणची भूमी जेवढी बौद्धपंथी होती, तेवढी देशातली अन्य कोणतीही भूमी नाही. मुस्लीम आक्रमकांनी जेवढी तोडफोड करून बौद्ध संस्कृती गाढली, ते सारे अवशेष जर खंडू उकरत असता, तर त्याच्या गुणवत्तेतली निरपेक्षता कळली असती. तो हे उकरणं टाळत, बाकी सारे काही उत्खनन करतो. हा त्याचा अप्रामाणिकपणाच प्रत्ययास येतो.
गावचे महाजन असणाऱ्या खंडूच्या कुटुंबाचा विस्तार थेट कुंडलिक, विठ्ठल यापासून खंडेरावपर्यंत होत आलेला आहे. नेमाडे अपल्या नायकांची नावे देताना म. फुले यांनी जी बहुजनांना आपले सांस्कृतिक राजकारण रेटताना अब्राहमणी रीच्युअल, मिथकांची, अवैदिक आचारधर्म शैलीची ओळख करून दिली होती, तशीच नावे नेमाडे पात्रांना देतात. कॉ. शरद् पाटील यांच्या ‘अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रा’त हेच सांगितले आहे. तसेच याबाबत आंबेडकर आपल्या २५ डिसेंबर १९५४च्या देहूरोड, पुणे येथील भाषणात सांगतात- ‘‘पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग तयार झाला. पुंडलिकचा अर्थ कमळ. कमळाला पाली भाषेत पांडुरंग असे म्हणतात. पांडूरंग म्हणजेच विठ्ठल’’. विठ्ठलास बुद्ध सिद्ध करण्याचे अनेक अभ्यास आपल्याकडे उपलब्ध आहेत.
मुद्दा असा की, लेखक सारेच बौद्ध परंपरेचं घेऊनही खंडूला आपल्या भारतीय असण्याचे, म्हणजेच बुद्ध असण्याचे मुळं कोरता येत नाही. उलट खंडू हा त्यावर माती लोटणाऱ्यातला होतो. हे त्याच्या दुभंगलेल्या मानसिकतेचे, अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे. अब्राह्मणी प्रतीकं घेऊन ब्राह्मणी शोषणव्यस्थेचे गुणगान तो करताना येथे दिसतो. म्हणजे आपले असणारे, होऊ शकणारे हे खंडू-पांडू, विट्ठल, पुंडलिक हे नायक ब्राह्मणी धर्माच्या भजनी लागले, असे यातून दिसते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नेमाडे या कादंबरीच्या माध्यमातून चातुर्वर्ण्य ही सामाजिक प्रथा नाही, तर ते जगण्याचे सांस्कृतिक तत्त्वज्ञान आहे, असे ठसवण्याचा प्रयत्न करतात. यात किती फसवेपणा आहे, हे सिद्ध होते. सारा हिंदू समाज गुण्यागोविंदाने नांदत होता, लेखकाचे असे एक आवडते मत कादंबरीभर वावरत राहते.
डॉ. आंबेडकर असे म्हणतात- ‘हिंदू समाज एक भ्रामक कल्पना आहे.’
असा समाज कधीच अस्तित्वात नव्हता. ही एक कादंबरी आहे, तो काही इतिहास नव्हे, लेखकाची ‘डिस्क्रिप्टीव्ह लिबर्टी’ मान्य करूनही, वाचक म्हणून काही प्रश्न उभे राहतात. नेमाड्यांचा दावा होता की, मी कादंबरीत भरभक्कम काम करणार आहे, जेणेकरून माझ्या पश्चात चांगला कादंबरीकार व्हावा. अनुभवांशी प्रामाणिक असण्याची सचोटी त्यांनी नव-कादंबरीकारांना घालून दिली आहे, कृत्रिम अवास्तव असे काही मांडू नये, असा आग्रह ते तहहयात धरत आले आहेत. पण त्याच मताचे आता काय करावे, हा सवाल कादंबरीत उभा राहतो. त्यांनी कादंबरी लेखनात वापरल्या जाणाऱ्या फ्लॅशबॅक तंत्राचा विरोध केला होता, पण ही सारी कादंबरीच फ्लॅशबॅकमध्येच उलगडत जाते. मेलेल्या भावडूच्या डायरीतल्या नोंदीतून भावडू खंडूला आदेशित करत राहतो, असा या कादंबरीचा फॉर्म आहे. भावाने भावाला केलेल्या आज्ञाकथन असे मी याचे तंत्र समजतो. वाचकालाच निवेदक केले, मी तू आहेस असे म्हणत समूहाच्या तोंडी सारा आशय देणे शक्य नाही. हिंदू हा एकजिनसी समूह होताच कुठे? त्याची लयबद्धता एका सूत्रात, विचारात, कथनात कशी बांधता येईल?
‘हिंदू - एकविसाव्या शतकातील सामाजिक समस्या’ (डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीची चिकित्सा ) - राकेश वानखेडे
सहित प्रकाशन, गोवा
पाने - १६०
मूल्य - २०० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment