अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्री अरुण साधू यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ‘माझ्या मराठीचा बोल’ हा त्यांचा लेखसंग्रह नुकताच ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. १९९४-९५ साली साधूंनी दै. ‘महानगर’मध्ये लिहिलेल्या ‘अक्षांश-रेखांश’ या साप्ताहिक सदरातील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाच्या नावाप्रमाणे यातील बहुतांश लेख मराठी भाषेविषयी आहेत. त्यातील हा एक वेगळा लेख… (या मूळ लेखाचं शीर्षक आहे – ‘एक गोड खजिना चोराच!’.)
..................................................................................................................................................................
काही पुस्तकं अशी असतात की, वेळ मिळेल तेव्हा ती उघडून मिळेल त्या पानावरून वाचायला सुरुवात केली तरी आनंद होतो. मोकळा वेळ कसा घालवायचा याचा आपल्याला मुंबईत तरी प्रश्न पडत नाही. बाहेरही पडेल असं वाटत नाही. पण मग एखादे वेळी वैताग येतो. काहीच करावंसं वाटत नाही. वर्तमानपत्रही हाती धरवत नाही. सायंकाळच्या दैनिकांना आजकाल ‘टाइमपास’ म्हणतात. पण तीही नकोशी वाटतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अशा वेळी मनाचा हिय्या करून ही अशी खास पुस्तकं नुसती चाळण्यासाठी उचलावीत. ती शक्यतो आपलीच असावीत. आजूबाजूला अव्यवस्थितपणे विखरून ठेवावीत. थोडा हात लांबवला की, पुस्तक हाती आलं पाहिजे. आता ज्याच्या त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. विरंगुळ्याचे प्रकार आपापलेच असतात. कोणाला वाचनाचा तिटकारा असतो, कोणी टीव्हीवर जीव लावण्याचा प्रयत्न करून अधिकच उद्विग्न होतो. कोणी मग नशापाणी करू लागतं; कोणी धूम्रपान करतं. पण या साऱ्या उद्वेग वाढवणाऱ्या गोष्टी असतात. त्यापेक्षा बाहेर पडून रपेट मारणं अधिक फायदेशीर.
खरी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आपल्या आवडीची पुस्तकं. पुस्तकं वाचण्याचेही वेगवेगळे प्रकार असतात. एखादं मोठं पुस्तक वाचायला आणून ठेवलं असेल तर प्रथम आपण टाळाटाळ करतो. गार पाण्यात उडी मारण्यापूर्वी नकोसं वाटतं तसं. त्याचं कारण असं की, एकदा का ते पुस्तक हातात घेतलं की, तहान, भूक, झोप, महत्त्वाची कामं, सारं सारं विसरून झपाटल्याप्रमाणं ते आपण वाचत जातो. वाचून झाल्यावर स्वप्नातून बाहेर आल्याप्रमाणे भयचकित होतो. पोकळीसारखी विषण्णता जाणवू लागते. कधी आपण सुन्न होऊन जातो.
ते वाचन वेगळं आणि वर सांगितलेलं टाइमपास वाचन वेगळं. अशा ‘फुटकळ’ वाचनामुळे कामं बाजूला पडत नाहीत, वेळ वाया जात नाही, फुकट पोकळी वगैरे निर्माण होऊन खिन्नबिन्न काही वाटत नाही. उलट मौज वाटते, उत्साह वाटतो, अनेक वेळा नवीन गोष्टी कळतात, जुन्या गोष्टींचे, कवितांचे नवे गर्भित अर्थ ध्यानात येतात. एवढंच नव्हे तर आपल्या ज्ञानातही भर पडल्यासारखी वाटते. दुप्पट जोमानं नेहमीच्या कामाला लागावंसं वाटतं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
प्रत्येकाच्या दृष्टीनं टॉनिकसारखी काम करणारी ही पुस्तकं वेगवेगळी असतात. ज्याच्या त्याच्या छंदाप्रमाणे, व्यासंगाप्रमाणे म्हणत नाही. कारण व्यासंगाच्या व्यग्रतेमधून आलेला मानसिक शीण घालवण्यासाठीच तर अशी हलकीफुलकी पुस्तकं वाचायची असतात. पुस्तक हाती घेतल्याबरोबर जे पान उघडेल त्या पानापासून.
काही लोकांना राग येईल, पण अशा उपयुक्त पुस्तकांमध्ये आपण कितीतरी अभिजात ग्रंथांची गणना करतो. म्हणजे उदाहरणार्थ, ‘तुकारामाची गाथा’ कोणत्याही पानापासून उघडली तरी दरवेळी काहीतरी नवंच कळतं. मन चकित होऊन जातं. तसंच आहे ‘ज्ञानेश्वरी’चं. पण आपली समस्या ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आकलनाची असते. म्हणून न. चिं. केळकरांचं ‘ज्ञानेश्वरीचं सर्वस्व’ अशा नावाचं हे जुनं पुस्तक आहे. तीच गोष्ट ‘बायबल’ची किंवा ‘भगवतगीते’ची. आपण काही आस्तिक नव्हे. पण असे सहज म्हणून धार्मिक ग्रंथ किंवा अगदी भाकड देवांच्या-देवींच्या कथा वाचायला घेतल्या तरी असा रसपूर्ण अनुभव येतो.
दुसरा प्रकार आहे तो कोशांचा. तर्कतीर्थांचा ‘विश्वकोश’ फारच उत्तम. खरं म्हणजे ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ घरी नेण्याची आपली महत्त्वाकांक्षा असते. पण ते परवडत नाही म्हणून दुधाची तहान ताकावर. अर्थातच यात विश्वकोशाला कमी लेखण्याचा मुळीच इरादा नाही. मराठीतील हा कोश कोणत्याही जागतिक कोशाच्या गुणात्मक दर्जाचा आहे. पण इंग्रजी भाषेतील कोशांच्या मागे उभं असलेलं प्रचंड आणि प्रदीर्घ असं संस्थात्मक आणि आर्थिक पाठबळ आपल्याकडे अजून मिळत नाही. म्हणून ताक म्हणायचं एवढंच. पण या विश्वकोशाचा कोणताही खंड उघडून कोणतंही पान पाहा. समाधान मिळण्याची खात्री.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
इंग्रजीत असे कितीतरी कोश असतात. म्हणजे चरित्रकोश- साहित्यिकांचे, कवींचे, चित्रकारांचे, जागतिक पुढाऱ्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे, वैज्ञानिकांचे, धर्मगुरूंचे… आणखी किती प्रकार म्हणून सांगावेत. हे झालं चरित्रकोशांबद्दल. आणखी अनेक विषयांवरील विशेष माहिती देणारे असंख्य कोश. अर्थात, हे सारे ग्रंथराज आपल्या घरी असू शकत नाहीत. पण पदपथांवर स्वस्तात मिळाले तर जरूर घ्यावेत.
एवढ्यावर संपत नाही. काही इतिहासाची पुस्तकं, काही कादंबऱ्या आणि काही कवितासंग्रहदेखील या वर्गात मोडतात. आणखी एक राहून गेलं. वार्षिक घटनांची तपशीलवार जंत्री देणारी इयरबुकसारखी काही पुस्तकं असतात. प्रकाशकांच्या पूर्वग्रहांची त्यावर सावली असते हे खरं. तरीही कोणत्याही पानापासून वाचायला सुरुवात केली तरी मजा येते. सहज उपलब्ध असल्यानं अमेरिकेत प्रसिद्ध होणारा ‘वर्ल्ड अल्मानाक’ तर फारच माहितीपूर्ण. पुस्तक उघडायचा कधी कंटाळा येणार नाही. आचार्य विनोबा भावेंचं कुठलंही पुस्तक कुठे उघडा. एवढं सोपं, एवढं प्रासादिक, मराठीशिवाय अध्यात्मापासून विज्ञानापर्यंतची रेंज. विनोबा अजूनही ग्रेट आहेत.
दुर्दैवानं या वर्गात बसणारी मराठी कादंबरी सध्या काही आठवत नाही. (स्वत:च्या कादंबऱ्यांचे अपवाद केलेच पाहिजेत.) आवडीचे कवितासंग्रह हमखास या वर्गात बसतात. कोणतंही पान उघडावं, मिळेल ती कविता थोडीशी स्वत:शी गुणगुणावी आणि पुस्तक मिटून ठेवावं. दिवसभर मग ती कविता आपल्याशी गुणगुणत राहते, संवाद करत राहते. कवी मात्र आवडीचा असायला हवा. दोन हमखास मदतीला धावून येणारे दिग्गज म्हणजे केशवसुत आणि मर्ढेकर. काही लोकांना राग येईल, पण त्यात सुर्वे आणि ढसाळचाही समावेश करता येईल. दरवेळी नवा चमत्कार, नवी अनुभूती. इंग्रजी कविता नीट कळत नाहीत आणि आणखी मराठी कवींची यादी देत बसलं तर ज्या मूळ हेतूनं स्तंभ लिहायला सुरुवात केली तो राहूनच जाईल.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
हेतू होता प्रा. एकनाथ साखळकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘आठवणीतल्या कविता’ या तीन भागांतील कवितासंग्रहांची भरभरून स्तुती करण्याचा. तेवढी जागा आता उरली नाही. या संग्रहांचे संपादक आहेत पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर, राम पटवर्धन. ही तीन पुस्तकं घरात कुठेही विखरून ठेवावीत म्हणजे मौजच मौज. येता-जाता मेजवानी.
म्हणजे उदाहरणार्थ, झटकन पान उघडल्याबरोबर तुमच्या नजरेसमोर-
लाट उसळोनी जळीं खळे व्हावें,
त्यात चंद्राचें चांदणे पडावें;
तसे गाली हासता तुझ्या व्हावें,
उचंबळुनी लावण्य वर वहावें!
या ओळी आल्या तर मेजवानी वाटेल की नाही? जुना खजिनाच सापडल्यासारखा वाटेल किंवा पाटणकरांच्या –
सूर्य गेला मावळून
काऊ चिऊ भूर
बाई काऊ चिऊ भूर
आकाशाच्या मैदानात
स्वर्गगंगेचा पूर
या ओळींनी सुरू होणाऱ्या ‘लिंबोणीच्या झाडामागे’ या कवितेनं अख्खं बालपण नजरेसमोर उभं राहून जिवाला हुरहुर लागेल. संपादक रमेश तेंडुलकर यांनी म्हटल्याप्रमाणे हा एक मुक्त खजिना आहे. कोणाही रसिकानं तो सहज लुटावा आणि आनंद घ्यावा. त्यातील कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे अन्योक्तीपर वेचे आणखीच मौज आणतात. शार्दूलविक्रीडित, पृथ्वी, मंदारमाला, भुजंगप्रयात, वसंततिलका आदी आता विसरू लागलेल्या वृत्तांमधील आगळं नादमाधुर्य जाणवून चित्ताला संतोष होतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अर्थात, इथे रसग्रहण करायचं नाही. पुस्तकांची भलावण करून प्रकाशकांचा फायदा करून देतो म्हटलं तर तीही सोय नाही. कारण बिचाऱ्या संपादकांनी आणि प्रकाशकांनी केवळ कवितेच्या प्रेमापोटी वेळ देऊन हा उपदव्याप केलेला. सगळ्या प्रती अगोदरच संपल्या आहेत. चौथा भाग काढण्याचं मात्र साखळकरांनी जाहीर केलं आहे, ही किती आनंदाची गोष्ट. तेव्हा त्यांची आणि संपादकांची भलावण करत आपण बिनदिक्कत हा खजिना लुटत राहावा, यासारखी दुसरी कोणती सुसंस्कृत आणि मधुर लुटालुट नसेल. ही पुस्तकं मिळत नसतील तर कुठून तरी अलगद ढापायलाही हरकत नाही. अशा ग्रंथांची चोरी म्हणजे महापुण्यच.
‘माझ्या मराठीचा बोल’ – अरुण साधू,
ग्रंथाली, मुंबई,
पाने – १०६,
मूल्य – १२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment