शास्त्रीय संगीताचं जतन म्हणजे म्युझियम उभी करणं नाही!
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 25 February 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe धृपद Dhrupad ख्याल Khayal ठुमरी Thumri

शास्त्रीय संगीताच्या संरक्षण, प्रचार-प्रचारासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अनेक स्तरांवर प्रयत्न केले जातात. शास्त्रीय संगीत ही प्रजाती बचाव करण्याजोगी आणि बचाव केला तरच तरेल अशी आहे, असा सार्वत्रिक समज आहे. शास्त्रीय संगीत बचाव कार्य हे एक नेक काम आहे आणि शास्त्रीय संगीत प्रत्येक जण जणू काही प्रत्येक क्षणी तेच उदात्त काम करत असतो. का कुणास ठाऊक पण मला इथं आमच्या एका काकांची आठवण होत आहे. तिरकस, खमंग बोलण्यात त्यांचा हातखंडा होता. स्वयंपाकातला एखादा पदार्थ कसा झाला, असं त्यांना विचारण्याची जुर्रत नवशिकी सुगरण जर का करती झाली तर स्वयंपाकातल्या फोडणीच्या खमंगपणाची कमी आमच्या या काकांच्या अभिप्रायानं भरून निघे. या काकांनी स्वतंत्र भारतातील उदार धोरणाला अनुसरून आपल्या अभिप्रायाचं शब्दांकन केलं होतं – चविष्ट किंवा आरोग्यप्रद! पदार्थांचं mutually exclusive असं ते वर्गीकरण होतं. संगीताचं असं वर्गीकरण करायचं का – रंजक किंवा शास्त्रीय?

शास्त्रीय संगीत हा आजच्या जगाचा कलाप्रकार आहे की नाही? की तो केवळ एक स्मारक प्रकारातला पारंपरिक वारसा आहे? कलेकडून ज्या अपेक्षा समाज करतो, त्या शास्त्रीय संगीत पूर्ण करतं का? अपेक्षा जशा बदलत जातात तसं शास्त्रीय संगीत बदलतं का? प्रश्न खूप आहेत.

हे सर्व प्रश्न बाजूला सारून शास्त्रीय संगीताच्या वारशाचं जतन अशी ठाम भूमिका जरूर घेता येईल. पिढ्यानपिढ्यांनी, शतकानुशतके जो वारसा जपला, संपन्न केला, तो जतन करायलाच हवा. अनेक पिढ्यांनी सातत्यानं ध्यास घेऊन नादाचं सूक्ष्मातिसूक्ष्म आकलन करण्याची जी क्षमता मानवी संवेदनेत निर्माण केली आहे, ती आपोआप टिकेल का? सूक्ष्मतेचा हा ध्यास सुटला तर ती क्षमताही कमी कमी होत जाईल. त्या सूक्ष्मतेचा सतत उपयोग करत राहिलो तरच ती टिकेल. आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन ही आपली जबाबदारी आहे. म्हणून शास्त्रीय संगीताचं जतन, संवर्धन आवश्यक आहे. बाजाराच्या नियमांवर शास्त्रीय संगीताच्या भवितव्याला सोडून देता येणार नाही. बाजार व्यवस्था (Market economy) आपण नाकारू शकत नाही. म्हणजे या व्यवस्थेत आपण शास्त्रीय संगीताला टिकवून धरण्यासाठी व्यवस्थेला अनुरूप प्रयत्न करायला हवेत.

थोडक्यात, शास्त्रीय संगीताची केवळ आवड नव्हे, मागणी उत्पन्न करायला हवी. लोकशाही व्यवस्थेत जनाधार महत्त्वाचा. जनाधाराशिवाय कोणतीही गोष्ट टिकून राहू शकत नाही. म्हणून शास्त्रीय संगीताला जनाधार मिळवून द्यायला हवा. व्यक्ती म्हणून आपल्या अगदी मर्यादित शक्तीतही याबाबतीत काही करू शकतो.

पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रीय संगीत मैफलींना हजर राहणं. या मैफलीसाठी तुम्ही जे तिकिट काढाल, त्याहीपेक्षा अधिक आर्थिक पाठबळ तुमच्या तिकिट काढून हजर राहण्यानं तुम्ही देत असता. आजच्या बाजारपेठेत कोणत्या प्रकारची उत्पादनं खरेदी करणारे ग्राहक शास्त्रीय संगीत ऐकायला जातात, याचा अभ्यास मार्केटिंगवाले करत असतात. याच अभ्यासाच्या पायावर प्रायोजनाची धोरणं ठरत असतात. बँकिंग सुविधा, गृहकर्ज, कार अशा वस्तूंचे ग्राहक शास्त्रीय संगीत ऐकत असतील तर या वस्तूंचं उत्पादन-वितरण करणाऱ्या कंपन्या शास्त्रीय संगीताला प्रायोजन देतील.

दुसरी गोष्ट म्हणजे उदयोन्मुख किंवा अव्यावसायिक गायक-वादकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना-म्युझिक सर्कल्सना विविध प्रकारे साहाय्य करणं, अशा संस्थांचं सदस्यत्व घेणं. आपल्या ऐपतीप्रमाणे वर्षातून किंवा दोन वर्षातून एक छोटेखानी (तरी) मैफल प्रायोजित करणं. शास्त्रीय संगीत विकत घेणं, भेट म्हणून एकमेकांना देणं. हे सगळं कर्तव्य भावनेनं करता येण्यासारखं आहे. घरात निदान काही वेळ शास्त्रीय संगीत वाजणं आवश्यक आहे, विशेषत: घरात १२ वर्षं वयाच्या आतली मुलं असतील तर. त्यांच्या कानावर शास्त्रीय संगीत पडायला हवं, म्हणजे त्यांना ते आपलंसं वाटेल. निदान ‘एलियन’ वाटणार नाही. वयाने मोठी झाल्यावर ही मुलं ठरवू शकतील की, आपल्याला शास्त्रीय संगीत आवडतं की नाही, आपण ते ऐकायचं की नाही. कोणत्याही (शास्त्रीय) संगीतप्रेमी माणसानं द्यावीत ती प्रिकॉशन्स मी आतापर्यंत दिली!

आता बाजूला टाकलेल्या प्रश्नांकडेही पाहू या. कोणत्याही कलेकडून असणारी प्राथमिक अपेक्षा म्हणजे मनोरंजन. त्याचे अनेक स्तर असतात. सर्व मनोरंजन एकाच पातळीचं नसतं, हे जरी खरं असलं तरी मनोरंजन होणं आवश्यक आहेच. संगीत या कलेतही आजच्या जगात अनेक विधा उपलब्ध आहेत. या उपलब्धतेकडे कुठेतरी असं तर होत नाही ना की, संगीतातून मिळवायच्या मनोरंजनासाठी श्रोता संगीताच्या अन्य विधांवर विसंबून राहतो आणि शास्त्रीय संगीत हा केवळ आदराचा विषय राहतो?

जुन्या जमान्यात शास्त्रीय संगीताची मैफल म्हणजे एक उपभोगसमुच्चय (Package) होता. स्वरतालानं होणारं मनोरंजन, संपन्न वारशाशी संबंधित असणारा अभिमान, अभिजन असण्याची सुखद जाणीव, निवांतपणा, उत्तेजित अवस्थेचा अनुभव, गंमत-मजा, आणिक काही काही. एकाच वेळी हे सर्व काही गायनाच्या मैफलीतूनच घेतलं जात होतं. आता जर यातल्या वेगवेगळ्या गरजा वेगवेगळ्या ठिकाणांहून अधिक कार्यक्षमतेनं भागवल्या जात असतील तर शास्त्रीय संगीत मैफलीतून कोणती विवक्षित, विशिष्ट गरज पूर्ण होते? जे सुंदर असतं पण वापरात नसतं, ते म्युझियममध्ये जाऊन बसतं! शास्त्रीय संगीताच्या वारशाचं जतन म्हणजे म्युझियम उभी करणं तर नाही ना? काळाबरोबर जी गोष्ट पुढे जाते तीच टिकते आणि काळाबरोबर पुढे जाताना बदल होत जातात. काही नव्या गोष्टी आत येतात, काही जुन्या मागे टाकल्या जातात. या अर्थानं टिकणं म्हणजे नव्या रूपात पुढे येणं! शास्त्रीय संगीताच्या संदर्भात ही प्रमेयं तपासून घेता येतील.

शब्दभाषा झपाट्याने बदलत जाणारी गोष्ट आहे. भाषा तुलनेनं लवकर जुनी, कालबाह्य होते. शब्दभाषा रोजच्या जीवनव्यवहाराच्या अधिक जवळ असते आणि जीवनव्यवहार झपाट्यानं बदलत असतो. म्हणून शब्दभाषेचे वर्ण्य विषय लवकर कालबाह्य होतात. आज शिक्षित मध्यमवर्गात सास, नयन, बजणारी पायल हे विषय कालबाह्य ठरत चालले आहेत. शास्त्रीय गायनात वापरल्या जाणाऱ्या कविता (शब्द-बंदिश) श्रोत्यांनी गांभीर्यानं ऐकल्या तर त्या शब्दांवर लगडलेलं संगीतही कालबाह्य होऊन जाईल, पण तसं होत नाही. कारण शास्त्रीय गायनाने श्रोत्याच्या कानात केव्हाच सांगून ठेवलंय – ‘स्वर ऐक, शब्द सोड!’

दुसरा मुद्दा विलंबित लयीचा. जग वेगवान बनलंय, जगाचा वेग वाढलाय, म्हणून विलंबित लय आणि त्या लयीत गायलं-वाजवलं जाणारं संगीत कालबाह्य झालंय असं काही लोक म्हणतात. “पाऊण तास-तासभर एक राग ऐकायला वेळ कोणाला आहे हो आजकाल!” यावर प्रतिवाद करणारे म्हणतात – “गर्भाशय नऊ महिन्यांवरून सात किंवा पाच महिन्यांवर तर नाही ना आलं? दिनमान २४ तासांवरून २० तासांवर नाही ना आला? श्वासांची गती? नाडीची गती?...जग कुठे फास्ट झालंय? जुन्या निवांत काळात तर विलंबित लय समभक्तीमुळे आपलीशी वाटत होती, तर नव्या युगात तीच विलंबित लय विषमभक्तीमुळे हवीशी वाटते, वाटायला हवी.”

चला, तर एवढ्या चर्वितचर्वणानंतर आपण आपल्याशी ठरवू या की, अगतिक शास्त्रीय संगीताला वाचवण्यासाठी आपण उदारपणानं शास्त्रीय संगीताचे आश्रयदाते होणार की, अतीव आनंदाच्या अनुभवाच्या शक्यता अजमावण्यासाठी लागणारी तयारी करणार? शास्त्रीय संगीत काळाच्या उदरात गडप होणार असेल तर होऊ दे, पण त्या आधी काही दशकं, कदाचित काही शतकंही आपण गडप होणार तेव्हा संगीतासाठी काही करण्यापेक्षा, आपल्यासाठी काही करू या. चला, शास्त्रीय संगीत ऐकू या.

 

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......