राजमान्य राजश्री वा शिवशाहीर वा पद्मविभूषण वा महाराष्ट्रभूषण वा पुण्यभूषण ऐसी जेयांची त्रिभुवनीं दुंदुभी झडत असे तेयांचे चरणीं उदंड दंडवत. ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे माहारास्ट्र मुल्कातून स्वर्गारोहन’ ऐसे वर्तमाण गेल्यापासैन तिकडे म्हणे, मोठा हर्षोल्हास जाहला. प्रंतू इकडचे वर्तमाण काय पुसावे? मऱ्हाट मुल्कात मोठाच उच्छाव सुरू जाला असे. फेसबुक-ट्विटरनामक व्यासपिठीं तर भारंभार वार्ता नित्याच्याच. प्रंतू सांप्रत काळीं व्हॉटसअॅप नामक यंत्रणाही मौजूद असल्याने आपल्याविषयीच्या वार्ता तत्क्षणी देशोदेशी पोहचत्या झाल्या व दुनियाभरचे शिवप्रेमी दु:खाने व्याकूळ होवौन गेले.
आम्ही मरहट्टे मरौन जाऊ किंतु हटणार नाही ऐसा बदलौकिक दुनियाभर जाला असे. त्याचा लटकेपणा आम्ही आमचे जीवित्बळें प्रकट करीताहोत. आम्हास आसरू ढाळीणे वगैरे बाबी शोभा देत नाहीत, प्रंतु काय सांगावे राजे, आपण माहारास्ट्र मुल्काचा निरोप घेतल्यापासोन आम्हास डोळ्यास डोळा लागेनासा जाला आसे. आसरूंचे प्रपात तर तीन-चार प्रहर ओसंडत राहतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आमचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज. तुमच्या तर ते जिविताचे जिवित. तेणेंकारणे आपण जिवितभर शिवरायांच्या विज्ञापना आम्हाकारणें करित राहिलात. तुम्ही छत्रपति शिवाजीमहाराजांचे प्रिय शिष्य. राजांनी आज्ञा केलियास कदापि अवज्ञा न करणार ऐसी आपली ख्याती. तुमचेपासी दऊत व लेखणिया नानापरीच्या. वाणी रसाळ, शब्दप्रभुत्व घोड्याच्या लगामावानी. कोठे हलकेच टाच मारावि, कोठे भागदौडीचा इशारा करावा, कोठे चाल करून जावे, कोठे रण दुंदुभी झाडावी, या कौशल्यांत आपण वाकबगार. मनी आणाल ते कवित्व कराल, हे माहारास्ट्र मुल्क गत सत्तर वर्षांपासोन साक्षात पाहत, ऐकत आला. आपली हुन्नर, कसब, आदब, आपली वाणी आणि लेखणी माहारास्ट्र मुल्कात पोरासोरांपासून थोरांपर्यंत सर्वांशी विदित.
साक्षात छत्रपती शिवाजीमहाराजांनी आपणांस बाळपणींच वळखिले होते, तियें कारणें तुमची कसवटी तयांनी घेतली नायी. तुमच्या हाती त्यांनी आपली जीवनकहाणी मोठ्या हुकमी इराद्याने आणि आनंदाने सुपुर्त केली. तयांची आज्ञा होताच बोरू तासून व दऊत भरौन व कागदास यथोयोग्य समास पाडौन आपण बखर लिहावयास घेतली. ‘निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ’ इया न्यायें आपण छातीचा कोट करौन व पायांस पादत्राणें सरकावून गड-किल्ले आक्रमत राहिलात… सारा माहारास्ट्र मुल्क पादाक्रांत केलात. ऐसे ऐसे काम करावयाचे तरी धिटावा मोठा असावा. तो मनीं धरिला. शिवाजीमहाराजांचे पायी मुंडासे ठेवण्याचा मनसुबा केला. सर्व काही जनीजनार्दनस्वामींचे मर्जीनुरूप तडीस नेले. तयांतून जे हाती आले ते समस्त मऱ्हाठ्यांच्या प्रित्यर्थ सादर केले. ‘राजा शिवछत्रपति’ हा नजराणा मऱ्हाट मुल्कास अर्पण केलात. तो यत्नपूर्वक जमविलेला मजकूर तुम्ही मऱ्हाट मुल्कातल्या लेकीबाळींना, पोसासोरांना, म्हाताऱ्याकोताऱ्यांना साठ-सत्तर वर्षे मुक्तहस्ताने, मुक्तवाणीने देत राहिलात. कुठला प्रहर म्हनू नये की, दिस म्हनू की, रात म्हनू नये, आपण तिन्हा त्रिकाल या माहारास्ट्र मुल्कास छत्रपती शिवाजीमहाराजांचा विसर पडू दिला नायी.
आपल्या लेखणीचे कसब आम्हा पामरांनी काय वर्तावे? आपण फकस्त उभे राहिलात तर समस्त मऱ्हाठी कोशांतले शब्द आपल्या पायीं हात जोडून नौबती झाडत. आपण लिहू लागलात तर साक्षात् सरस्वती आपल्या बोरूतून झरू लागे. शिवाजीमहाराजांचे मनींचे ईंगीत ते तुमचे मनी साग्रसंगीत, हे आम्ही पक्के जाणौन आहो.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
मऱ्हाटभूमीचे राजे शिवाजीमहाराज. तेयांचा दबदबा माहारास्ट्र मुल्कात काय तो आपणांशि ठावां! तयांचा महिमा आपरंपार. गडकिल्ल्यांत, दऱ्याखोऱ्यांत, कडीकुलपांत, सांदीकोपऱ्यांत अडकून पडलेल्या राजांच्या इतिहासाला आपण वाचा दिली, शब्द दिले व तो जिताजागता केला. हे आम्हा पामरांचे नसीब. मलिद्यावाचौन कवण कवणाचा नसे, ऐसी सांप्रत काळची मसलत. प्रंतू आपण कशाची म्हणून पर्वा केली नाहीत. शिववेडात दौडत राहिलात, रमून गेलात आणि आम्हालाही त्यात भिजवून टाकून सोडले. ‘राजा शिवछत्रपति’ने माहारास्ट्र मुल्की हर्षकल्लोळ जाला. सांप्रत काळी मऱ्हाटभूमी अवकाळवश हायहाय करताहे, ही वार्ता आपणांशी विदित होतीच. इये मुल्कात प्राण फुंकावा या कारणें आपण शिवाख्यान गायला लागलात. काळ पाहो जातो, आपली कीर्त ताबडतोबीने पुण्याबाहेर फाकू लागली. तमाम दुनियेस आचंबा वाटेलशी आपली वाणी व लेखणी…
कितीयेक बुद्धिमंत व कारभारी यांणी बहुत खल केला आसे. प्रंतू आपल्यासारिखे कवणास शिवाख्यान गाता न आले. यत्नांची पाराकाष्ठा तर कैकांनी केली, पण कवणास ती सिद्धी प्राप्त जाहली नाही. आपल्या शिवाख्यानाचा बौध आचरणें करौन मनावर ठसवावयाचे नीतीदर्शन कित्येकांस जाहले नाही ते नाहीच. तेणेकारणे तयात आघाडी राहिली म्हणावी तर ती आपलीच! यैसे मुत्सद्दीपण आपण दाखविले व शिवरायांवरील कीटाळ पिटाळौन लाविले. आपल्या हुकमी अस्त्रापुढे आमच्या आळस, अज्ञान व अनास्थेची मात्रा बहुकाळ चालिली नाही. कितीही मुलुखगिरी केली, तरी सीलंगणास मोहिमेवर निघतेप्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराजांस मुजरा करौनच निघून जाण्याचा रिवाज आपण रूढ करून दिलात. मोहीम फत्ते होताच शिवचरणांचा आठव याद करावयाचे वळण लाविलेत. कैकांनी आपला शीरस्ता माहारास्ट्री मुल्कात पाळिला, सांप्रत काळीही पाळितात. छत्रपती शिवाजीमहाराजांची इभ्रत व ईतमाम कायम राहिला पाहिजे, ऐसा एकचि निश्चो करौन आपण वार्ता करत राहिलात. जाले गेले गंगेसी मिळाले, ऐसा वीचार आम्हास धरू दिला नाहीत. ऊगवेल ते दिवसीं शिवपाडवा करणेचा मनसुबा वर्तत राहिलात. तो सोहोळा रंगदार करावेयासाठी जे जे आपणांस जमले ते ते करीत राहिलात.
तुम्ही शिवचरित्र गायनात कधी चुकूर झाला नाहीत. ते ऐकौन ऐकौन आम्ही लहानाचे मोठा जाहलो. प्रौढपुरुष झालो. जमेल तैसा योगक्षेम चालविण्याचा यत्न केला. तुम्ही लाविलेले शिवचरित्राचे आख्यान माहारास्ट्र मुल्कातील तीन पिढ्या ऐकत-पाहत मोठ्या जाहल्या.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
सारे आलबेल व्हावे हा तो आपले वचनाचा शीरस्ताच. तेणेकारणें आपण खंततही राहिलात. ‘राजा शिवछत्रपति’ (११वी आवृत्ती, १९८८)मध्ये पयल्याप्रथमच वदलात की, “वास्तविक संपूर्ण शिवचरित्र अद्याप इतिहासकारांना गवसलेलेच नाही. लक्षावधी अस्सल कागदपत्रे अजून अंधारातच आहेत. अज्ञानामुळे आणि अनास्थेमुळे अगणित कादगपत्रे नष्ट होत आहोत. कुणी पाणी तापवण्यासाठी त्यांचं जळण करीत आहे, कुणी फटाकडे करण्यासाठी ती वापरीत आहे, कुणी ताबूताला ती अस्तर म्हणून चिकटीत आहे. वाळवीच्या किड्यांचा उदनिर्वाह मुख्यत: या ऐतिहासिक कागदपत्रावरच चालतो म्हणे! आळस, अज्ञान आणि अनास्था या तिघांचं प्राबल्य आमच्या जीवनातच पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे, या गोष्टीचा आम्हाला अद्याप सुगावाच लागलेला नाही.”
‘ ‘गोनिदां’ची दुर्गचित्रे’ या ग्रंथाचे समापन (१३ जून २०१२) समारंभात वदलात की, “महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची दुरवस्था पाहिली की मन विषण्ण होते. युरोपात गडकिल्ल्यांवर ऐतिहासिक संग्रहालये आहेत. आपल्याकडे तसं काहीच नाही.”
प्रंतू शिवाजीमहाराजांचे जोरावर आमच्यातील काहींनी राजकारण नाम धारण करौन आपुलाल्या झोळिया व खीसे व तीजोऱ्या व बीळे बळदे भरविली. आवघेया माहारास्ट्र मुल्काची ही आवस्ता जाहली. जे दिशेस पाहावे ते दिशेस नाना चिमित्कार दिसौन मन स्छंभित होवौन गेले. कोठे नेमिषमात्रे आंगरख्याचा व पागोट्याचा रंग पालटों शकतात ऐसे किमयागार. कोठे फकस्त एका हनुमान उडाणे ये गोटातील वीर ते गोटीं जाती ऐसे द्रिश्य. कोठे लपाछपीचे खेळात मस्तीखोर पोरासोरांनी भोज्या पकडावेयास धाव घेयावी तदवत एका कुर्सीकारणे कैकांची भागदौड. कैकांशी तर खाविंदचरणारविंदीं मिलिंदायमान होण्यापरती धन्यता ती दुसरी राहिली नाही. ऐसी विपरीत करणी न कधी पूर्वी जाली, न भविष्यात होवों शके. आस्तू.
आम्ही मरहट्टे, आम्हास तरवार घेवौन, घोड्यावर मांड ठोकून रणमैदान पादाक्रांत येते, प्रंतू प्रेमालाप काही आम्हाशि धार्जिणा नाही. शत्रूपक्षाचे बुजगबाहुले उभे करौन दंड थोपटल्याचे लळीत केले की, आमचे गर्भगळित आवसान पूर्ववत होते. अर्थात ते आपणांसही विदित होतेच. गतसांप्रत काळी ‘पुरंदरे फितूर, गनिम’ यैसे यैसे लोक बोलों आले. प्रंतू आपण सींव्हगरजना करौन परत परत जाहीर केले – ‘आपण इतिहाससंशोधक नाही, इतिहासकारही नाही, शिवकीर्ती गाणारा मी फक्त शिवशाहीर आहे’. मोठाच नम्र सोभाव दाखविला. तेणेकारणें दिल मोठा करौन आमचा बाळपुंडावा सहन केलात. या उपरी आमच्या धाकुटेपणाची लाज ब्रह्मांडात मावेना ऐसी वाढौन तियेच्या भाराखाली दासाची दीनावस्ता होवौन गेली व येणेकारणें आमचे मुख मळीण मात्र जाले. शिवाख्यान ऐकौन ऐकौन मोठे व्हावयाचे व जाणतेपण येऊ लागिले की, संशोधनपूर्वक सिद्ध केलेली बुके वाचावयाची आसितात, हे आम्हांस कळो आले नाही. आमच्यातले काही धुरंधर तर तुमचे शिवाख्यान ऐकौन ऐकौनच म्हातारे जाहले. तयांचा नेणतेपणाकडून जाणतेपणाकडे प्रवासच जाहला नाही, यात आपला दोष कसचा? आस्तू.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
प्रस्तुत काळीं आन गत-प्रस्तुत काळीं माहारास्ट्र मुल्कात विशेषेंकरौन आपल्यासारिखा दुसरा चिमित्कार वा शाहीर वा इतिहासपुरुष घडला नायी, भविष्यात घडौन येईल याची कवणे खात्री बाळगावीं? तो घडौन येईल तेवा येईल, तवर नेमिषमात्रें इश्वास राखला जाईल याची कवणे आशा द्यावी? तवर आमच्या दु:खाचे कितीयेक टवके उडत राहतील! आसरूंच्या प्रपातांना उतार कसा पडणार? काळिजातला आकांत कैसा शमेल?
तुम्ही शिवरायांचे शिलेदार, आम्ही शिवरायांचे मावळे. केवढा धुरंधर आपला इतिहास! गर्वाने छातीचा कोट व्हावा तैसा. प्रंतू आपण आम्हास सोडून गेल्यापासून आमच्या काळिजातला दु:खाश्रूंचा लोंढा समिद्राच्या भर्तीच्या लाटांसारखा त्वेषात्वेषाने बाहिर ओसंडतो आहे.
तुम्ही मृत्युला भ्याला नाहीत. उलटपक्षी आपला बाडबिस्तरा बांधौन त्याची वाट पाहात राहिलात व त्याने हाक दिली, तेव्हा त्याचे बोट धरौन चालू लागलात. आम्ही तुम्हास नजराणा केलेली छत्रचामरे, सिंहासने, बिरुदावल्या कशाकडेही मागे वळून पाहिले नाहीत. कशाचाही मोह आपल्याला पडला नाही. संथ… शांत… धीरगंभीर पावले टाकत इहलोकीची यात्रा संपवून परलोकात गेलात…
प्रंतू आपण आम्हाशी पोरके करून गेलात… आता आम्ही शिवाख्यान कुण्याच्या तोंडोन ऐकावे? कुणाच्या शब्दाने व वाणीने आमचे बाहू स्फुरण पावतील? आमच्या छातीवरच्या तटबंद्या तटतटतील? आमचे दंड थरथरतील? आम्ही तो एक घुंगुरटे, क्षुद्र चिलीट. प्रंतू आपणाकारणें आम्हाशी शिवाजीमहाराजांचा पदस्पर्श झाला. तुळजाभवानीने पाखरमाया धरली. याउपरी आमच्या जिवित्बळे आम्ही छातीचा कोट करून आपला वारसा आपल्या नातवंडांपतवंडांहाती सुपूर्द करावा, हेच ईष्ट मानिले पाहिजे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आपणापरोक्ष इकडील वर्तमान घडिले तैसे धाडिले असे. आपला कुटुंबकबिला मोठा. संबंध शिवशाही हाच आपण परिवार मानिला. त्यांशी भेटौन आपणांशी हर्ष जाहला असेल. सपरिवार व सधर्मबंधूंसह सुखी आसा. आम्हा मर्त्य मानवांची फिकीर करू नोहे. आम्ही जगत राहू, शिवाजीमहाराजांच्या व तुमच्या नावें उमाळे-उसासे टाकीत राहू व एके दिवसी मरून जाऊ. आमची वार्ता ती केवढी! प्रंतू आपले कवतिक कैक पिढ्या करत राहतील…
आस्तू. आधिक काय लिहणे?
कळावे. खबरनवीस कलमबहाद्दर याची सेवा रजू करून घेणे.
.................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पत्रकार-संपादक निखिल वागळे यांनी घेतलेली मुलाखत
आपण ‘राजा शिवछत्रपति’ कधी काळी वाचले होते आणि आपल्याला ते आवडले होते, याचा आज पश्चाताप होत नाही
..................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sonali Navangul
Mon , 22 November 2021
व्वा व्या जगतापसाहेब! बखरीच्या शैलीत संपूर्ण श्रद्धांजली लेख लिहून काढणं, तोही वाचनीय, कठीण होतं. साधलं आहे तुम्हाला. ‘अक्षरांचा श्रम केला’ की काय ते आठवलं हे वाचून. पुरंदरेंना भयंकर आवडला असता!