शिरोजीची बखर : प्रकरण सहा - भारतीय राजकारणाचा हा कालखंड उत्तरोत्तर रोचक होत गेला. शिरोजी स्वतः या कालखंडाचा इतिहासकार बनून हे सर्व कांड आपल्यासाठी लिहीत गेला, हे आपले भाग्य!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • नोटबंदी, सीएए आणि एनआरसी
  • Sat , 20 November 2021
  • संकीर्ण व्यंगनामा नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP नोटंबदी सीएए एनआरसी कलम ३७० Article 370

शंभर वर्षांपूर्वीच्या भारतात श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात एकामागून एक अशी वादळे उठत राहिली. नुसतीस संदर्भहीन वादळे. वादळामागून वादळे. जसजशी शिरोजीच्या बखरीची प्रकरणे उजेडात येत आहेत, तसतसा या काळावर प्रकाशझोत पडत चालला आहे. शब्दकर्कश आणि भावकर्कश चर्चा हा या युगाचा एक विशेष ठरला होता. आज या काळाकडे बघताना वाटत राहते की, मानवी ऊर्जेचा किती अनिर्बंध व्यय या काळात झाला. अनेक विद्वान माणसांना आपली ऊर्जा भंपक लोकांशी विवाद करण्यात वाया घालवावी लागली. या काळात सोशल मीडियाचा उदय झाला. या पूर्वी विद्वान आणि विचारवंत, या जगात काय घडते आहे आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे, हे आपल्या लिखाणातून जनतेला समजावून सांगायचे. या काळात मात्र सोशल मीडियाने आणलेल्या क्रांतीमुळे सामान्य जनता आपली मते मांडू लागली. या मतांना भरपूर ‘ट्रॅक्शन’ मिळू लागले. सरकार आणि जनता यांच्या मध्ये विचारवंतांचा इंटरफेस इतके दिवस होता, तो निघून गेला. आपल्या स्वतःच्या अज्ञानातून जन्माला आलेले पूर्वग्रह हेच तत्त्वज्ञान आहे, असे बहुतेकांना या काळात वाटू लागले. प्रचंड गोंधळ माजला. या काळाकडे बघताना शेक्सपियरच्या ओळी या बखरीच्या संपादकांना आठवत आहेत. ‘मॅकबेथ’ या नाटकाच्या पाचव्या अंकाच्या पाचव्या प्रसंगात लेडी मॅकबेथच्या मृत्यू नंतर मानवी जीवनाविषयी मॅकबेथ म्हणतो – ‘It is a tale Told by an idiot, full of sound and fury, Signifying nothing’.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा काळ एखाद्या वेड्याने सांगितलेल्या गोष्टीसारखा अर्थहीन वाटत राहतो. नुसतीच गडबड आणि नुसताच गोंधळ. निष्कर्ष काहीच नाही. बाकी शून्य.

आज २१२१मध्ये आपण हे सगळे बोलणे सोपे आहे. कारण इतिहासात काय घडले हे आपल्या डोळ्यासमोर आहे. शिरोजी लिखाण करत होता, ते या काळाच्या प्रवाहात राहून. आपल्याला आज जो ‘परस्पेक्टिव्ह’ आहे, तो त्याला नव्हता. परंतु त्या काळात राहून काळाची पावले कुठल्या दिशेने चालली आहेत, हे शिरोजीने बरोबर ओळखले होते. मोदीप्रणित राजकारणाच्या कोलाहलातून देशाच्या हाती काहीही लागणार नाही, हे शिरोजीने ओळखले होते. त्यामुळेच त्याच्या या काळाबाबतच्या लिखाणाला विनोदाची डूब आहे. मोदी आणि मोदीप्रणित राजकारण या दोन्ही गोष्टी त्याने फार गांभीर्याने कधीच घेतल्या नाहीत. ज्या वैश्विक मूल्यांवर आधारलेल्या चळवळींमुळे मानवी समाज बदललेले जातात, नेमक्या त्याच मूल्यांना पायदळी तुडवून मोदीप्रणित राजकारणाचा पाया घातला गेला होता. सत्य, अहिंसा, करुणा, समाजातल्या अगदी वंचित समाजाविषयी आस्था, आणि सर्वांत मुख्य म्हणजे न्यायबुद्धी या सर्व गोष्टींवर आधारलेल्या चळवळी असतील, तरच समाज-बदल होतो. यातील कुठलीही गोष्ट नसल्यामुळे ज्या वेगाने मोदीलाट आली, त्याच्या दुप्पट वेगाने ती ओसरणार हे शिरोजीला माहीत होते.

मोदीभक्तांचे मात्र वेगळे होते. एका उज्ज्वल इतिहासाचा पाया मोदीजींनी घातला आहे आणि या इतिहासाचा सुवर्ण कळससुद्धा मोदीजीच एक-दोन वर्षांत बांधणार आहेत, असे सर्व मोदीभक्तांना वाटत होते. जनतेने मात्र मोदीजींना पाच-सात वर्षांत जोखले होते. २०२२च्या उत्तर प्रदेशातील विधान सभा निवडणुकीनंतर ‘मोदीलाटे’ला उतरती कळा लागली.

२०२१ नंतर पुढच्या पाच वर्षांत नक्की काय काय झाले, हे सांगून वाचकांचा हिरमोड आम्ही करू इच्छित नाही. आपल्या संपादकीय टिपणांमध्ये पुढे काय काय घडले, हे सांगून आमचा हिरमोड आपण करू नये, अशा आशयाच्या मेल्स आम्हाला आल्या आहेत. २१२१मधील वाचक वर्ग शिरोजीच्या बखरीमध्ये रमत चालला आहे, याचाच हा पुरावा आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय झाले, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काय झाले, हे आजच्या वाचकाला शिरोजीच्या लिखाणातून समजून घ्यायचे आहे. त्यामुळे आम्ही आज हे सगळे सांगण्याचा मोह टाळत आहोत.

शिरोजीने पहिल्या सहा प्रकरणांमध्ये समर, भास्कर, अविनाश आणि अच्युत ही चारच पात्रे वापरली होती. पुढच्या प्रकरणांपासून या चौघांबरोबरच इतरही पात्रे शिरोजीने आणली. असो.

या प्रकरणात मोदीयुगात काय काय साधले गेले यावर चर्चा आहे.  असो.

आमच्या टिपणांमुळे आम्ही शिरोजीला भेटण्यास अधीर झालेल्या वाचकाला शिरोजीपासून दूर ठेवण्याचे पातक आम्ही करत नाही.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शिरोजीची बखर - प्रकरण सहा

मोदीजी हे एक अवतार आहेत आणि असे नेतृत्व पाच-पाचशे वर्षांनी एखाद्या देशाला मिळते, हे वाक्य पाचशेव्या वेळेला अविनाशने उच्चारले तेव्हा भास्करने त्याला आव्हान दिले.

भास्कर - मोदी हे एक अवतारी पुरुष आहेत. ते मोठे योगी आहेत आणि भारताचे भविष्य उजळून टाकण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे, हे सर्व आपण मान्य करू.

अविनाश - करायलाच पाहिजे.

समर - मोदीजी पहाटे अडीच तास ध्यान करतात आणि त्यांनी झोपेवर विजय मिळवला आहे, हेसुद्धा आपण मान्य करू.

अविनाश - करायलाच पाहिजे. मोदीजी कधीच खोटे बोलत नाहीत.

भास्कर - असे मात्र म्हणता येणार नाही, कारण मोदीजींनी निवडणूक लढवताना भराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात एकदा आपण अविवाहित आहोत आणि एकदा आपण विवाहित आहोत, असे जाहीर केले होते. यातले एक प्रतिज्ञापत्र नक्कीच खोटे आहे.

अच्युत - हे बघ, अवतारी पुरुष नेहमीच खोटे बोलतात. कृष्णाचे उदाहरण आहे.

भास्कर - अवतारी पुरुष खोटे बोलतात, या वाक्याचा आपण स्वीकार करू. मग आता मला सांग, जर मोदीजींनी आपल्याला सांगितले असेल की, त्यांनी निद्रेवर विजय मिळवला आहे, तर ते आपण खरे मानायचे की खोटे?

अविनाश - (चिडत) तुम्ही लोक मोदीजींचा एवढा द्वेष का करता?

भास्कर - आम्ही कुठे द्वेष केला? आम्ही फक्त आम्हाला पडलेले प्रश्न विचारतो आहे.

अच्युत - काय गरज आहे असले प्रश्न विचारण्याची? एवढा मोठा आत्मा आला आहे, भारताचा विकास करायला. भारतातील प्रत्येक नागरिकाला आनंद झाला पाहिजे.

अविनाश - प्रश्न कसले विचरताय? तुम्हाला सिक्युअर वाटले पाहिजे मोदीजी पंतप्रधान आहेत म्हणून.

भास्कर - आम्हाला वाटतेच आहे सिक्युअर. पण गंमत अशी आहे की, आम्हाला तर काँग्रेस सत्तेत होती, तेव्हासुद्धा सिक्युअरच वाटत होतं.

अविनाश - तुम्हाला गुळाची चवच नाहिये.

समर - ठीक आहे आम्हाला गुळाची चव नाहिये. तुम्ही सांगा काँग्रेस होती, तेव्हा आपण का सिक्युअर नव्हतो? आणि आता आपण का सिक्युअर आहोत.

अच्युत - हा काय प्रश्न आहे की काय?

अविनाश – अरे, मोदीजींनी केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या आहेत.

भास्कर - काय काय आहेत?

अविनाश - नोटबंदी आहे, सीएए-एनआरसी आहे, ३७० कलम रद्द केलं आहे.

(नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे रुपयाच्या आणि हजार रूपायच्या जुन्या नोटा अचानक रद्द केल्या. त्याला नोटबंदी म्हटले गेले. सीएए म्हणजे ‘सिटिझनशीप अॅक्टची अमेंडमेंड’. एनआरसी म्हणजे ‘नॅशनल सिटीझनशिप रजिस्ट्री’. जम्मू-काश्मीर हे राज्य ३७० व्या कलमान्वये भारताला जोडले गेले होते आणि त्याद्वारे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला गेला होता. या सर्व गोष्टी काय होत्या याविषयी वाचकाला या बखरीतील चर्चेत माहिती मिळत जाईलच. त्यामुळे आम्ही यावर येथे अजून माहिती देण्याचे टाळत आहोत. - संपादक)

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

भास्कर - ठीक आहे. आपण एक एक गोष्ट घेऊ. तुम्ही समजावून सांगा आम्हाला की, या सगळ्यामुळे आपण जास्त सिक्युअर कसे झालो आहोत.

समर - नोटबंदी यशस्वी झाली असे तुमचे म्हणणे आहे का?

अविनाश - शंभर टक्के यशस्वी झाली आहे.

भास्कर - कशी?

अविनाश - अरे, किती काळा पैसा बाहेर आला नोटबंदीमुळे!

भास्कर - कसा आला?

अविनाश - काळा पैसावाल्यांच्या किती नोटा वाया गेल्या.

भास्कर - किती गेल्या?

अविनाश - खूप गेल्या. पार कंबरडे मोडून गेले काळापैसावाल्यांचे.

समर - (फोन दाखवत) - हे बघ. ७ ऑक्टोबर २०१९ ची बातमी आहे ‘बिझनेस स्टॅन्डर्ड’मध्ये. आरबीआयने सांगितले आहे की, रद्द केलेल्या नोटांपैकी जवळ जवळ ९९ टक्के नोटा परत आल्या आहेत.

अविनाश - आल्या असतील.

समर - आल्या असतील काय? अरे म्हणजे वाया नाही गेल्या नोटा लोकांच्या. लोकांनी वेगवेगळ्या आयडिया करून आपल्या काळ्या पैशाच्या नव्या नोटा घेतल्या परत. तुम्ही काही नाही करू शकलात.

भास्कर - रघुराम राजन म्हणाले होते २०१४च्या ‘विनोद दोशी व्याख्यानमाले’त की, नोटबंदीचा काही उपयोग होणार नाही. लोक वेगवेगळ्या आयडिया करून नोटा बदलून घेतील म्हणून.

(रघुराम राजन हे जगद्विख्यात अर्थशास्त्रज्ञ होते. काही काळ आरबीआयचे गव्हर्नरदेखील होते.)

अविनाश - त्या राजनचं काही सांगू नकोस. त्याच्यापेक्षा मोदीजींना अर्थशास्त्र खूप जास्त कळतं.

भास्कर - (हसत) कळत असेल. मोदी हैं तो मुमकिन हैं.

समर - पण या बाबतीत बरोबर आले राजन हे आपल्याला स्वीकारायला पाहिजे. मोदीजींना कळलंच नाही की, भारतीय जनता आपल्याला फसवेल. राजनना बरोबर कळलं होतं.

अविनाश - मोदीजी कधीही फसत नाहीत.

अच्युत - आरबीआय फसली असेल. त्यांनी भ्रष्टाचार करून नोटा परत दिल्या असतील.

समर - म्हणजे आरबीआयवाल्यांनी पैसे खाल्ले असं तुला म्हणायचं आहे का?

अविनाश - सरळ आहे.

समर - पण मोदीजी तर म्हणाले होते - न खाऊँगा न खाने दूंगा.

अच्युत – अरे, तुम्हाला मोदीजींची यश मान्यच करायचं नाहिये का? तो अवतारी पुरुष रात्री एक क्षणसुद्धा न झोपता झटतो आहे देशासाठी आणि तुम्ही हे काय बोलताय?

भास्कर - ९९ टक्के नोटा परत आल्या तर नोटबंदी यशस्वी झाली असं कसं म्हणता येईल?

अविनाश - नोटबंदी मुळे टेररिस्ट हल्ले संपले भारतावरचे.

समर - कसे काय?

अविनाश - टेररिस्ट लोकांकडे पाकिस्तानने छापलेल्या जुन्या नोटा होत्या त्या वाया गेल्या.

समर - मग २०१६ पासून भारतावर १९ अतिरेकी हल्ले झाले त्याचे काय?

अविनाश - अजिबात झालेले नाहीत.

समर - (फोन पुढे करत) हे बघ विकीपीडियावर लिस्ट आहे.

अच्युत - हे बघ, एवढ्या मोठ्या देशात अशा गोष्टी होत राहातात. मोदीजींचं लक्ष आहे सगळ्यांकडे.

भास्कर - चांगली गोष्ट आहे. पण नोटबंदी झाली आणि काळा पैसाही बाहेर नाही आला आणि टेररिस्ट हल्ले पण नाही संपले. म्हणजे नोटबंदी यशस्वी झाली असे म्हणता येईल का? मला तर फार इन-सिक्युअर वाटायला लागलं आहे आजकाल.

समर - परत हा अविनाश म्हणतो आहे की, आपले आरबीआयवाले फार पैसे खातात म्हणून.

भास्कर - म्हणजे भ्रष्टाचार फार सेन्सिटिव्ह ठिकाणी व्हायला लागला आहे.

अविनाश - तुम्ही गप्प बसा रे! मोदीजी मोठे आहेत, हे तुम्हाला मान्य नसेल तर राहू द्या. त्यांचे काही बिघडत नाही तुम्ही त्यांना न मानल्यामुळे.

अच्युत - नुकसान तुमचंच आहे.

भास्कर - आमचं कसलं नुकसान?

अविनाश - सीएए आणि एनआरसीमुळे तुम्हाला सिक्युअर नसेल वाटत तर तुमच्यासारखे करंटे तुम्ही.

भास्कर - आम्हाला नीट समजावून सांग सीएए आणि एनआरसीमुळे आम्हाला सिक्युअर का वाटायला पाहिजे?

अविनाश - अरे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान अशा सगळ्या देशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध अशा सगळ्यांना नागरिकत्व मिळते आहे. हा देश ‘आपला’ होत आहे. लक्षात येतंय का तुझ्या?

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भास्कर - २०१६पासून ४१७१ लोकांना नागरिकत्व दिले गेले आहे सीएएखाली. भारतात १०० कोटी हिंदू आहेत. त्यात अजून चार हजार हिंदूंची भर पडली म्हणून मला का सिक्युअर वाटावे?

अविनाश - तुमच्या सारखे देशद्रोही लोक या देशात आहेत, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे.

अच्युत - अरे बाबा, खरी गेम एनआरसीमध्ये आहे. देशभर नागरिकांचे रजिस्टर तयार होईल. भारतात बंगलादेशी मुसलमान घुसले आहेत, रोहिंग्या घुसले आहेत. इतर खूप देशद्रोही मुसलमान घुसले आहेत. ते सगळे आयडेंटिफाय होतील.

समर - किती घुसले आहेत?

अच्युत - एकट्या पश्चिम बंगालमध्येच एक कोटी आहेत.

अविनाश - आसाममध्ये तर किती आहेत हिशोबच करता येणार नाही.

भास्कर - ठीक आहे. किती लोक आहेत या वादात आपण नको पडायला. खूप आहेत आपण मान्य करू.

समर - या सापडलेल्या घुसखोरांचे आपण काय करणार आहोत?

अच्युत - त्यांना त्यांच्या देशात परत पाठवायचे.

समर - आणि तो देश म्हणाला की, हे तुमचेच नागरिक आहेत तर काय करायचे?

अच्युत - असं कसं म्हणतील ते? त्यांचे लोक आहेत त्यांना घ्यायला लागणार?

भास्कर - का बरं? हे सारे त्यांचे लोक आहेत, हे कशावरून म्हणायचं आपण? 

अच्युत - कशावरून काय? आपण चेक केलं की, विषय संपला.

भास्कर - आणि त्यांनी नाही ऐकलं तर?

अविनाश - युद्ध करायचं! मोदीजी बघून घेतील काय करायचं ते.

भास्कर - आपण आपल्या देशाच्या शेजारी जे जे देश आहेत, त्या सगळ्यांशी युद्ध करायचं?

अविनाश - करायचं. मोदी हैं तो मुमकिन हैं.

समर - (हसत) असं कसं शक्य आहे?

अविनाश - का नाही?

समर - आपण पाकिस्तान, नेपाळ, ब्रह्मदेश, बांगलादेश आणि श्रीलंका या सगळ्यांशी युद्ध करायचं?

अविनाश - हो.

भास्कर - आणि या सगळ्या देशांच्या बाजूने चीन उतरला तर?

अविनाश - त्यालाही संपवतील मोदीजी.

(अविनाशच्या वाक्यावर भीषण शांतता पसरते.)

समर - कसं संपवतील? मुसलमानी देशांनी आपला ऑइल सप्लाय बंद केला तर?

अविनाश - मोदीजी बघून घेतील त्यांच्याकडे.

समर - कसे बघून घेतील? आताच पेट्रोल १०० रुपायला गेले आहे, तर काही करता येत नाहिये मोदीजींना.

अच्युत - गोमूत्रापासून पेट्रोल तयार करायचे संशोधन सुरू आहे.

भास्कर - काय म्हणतोस?

अच्युत - गोमूत्रापासून तयार झालेल्या अर्ध्या लिटर पेट्रोलवर एक ट्रक चारशे किलोमीटर चालतो.

समर - (भयंकर हसत) कुठे सुरू आहे हे संशोधन.

अच्युत - सीक्रेट आहे ते.

भास्कर - बरं बाबा मोदीजी हरवतील त्या सगळ्या देशांना. सायन्सचा अजून अपमान नको आहे. एक सांग, ज्या घुसखोरांची चौकशी चालू आहे, त्यांची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे?

अविनाश - त्यांना डीटेन्शन सेंटरमध्ये ठेवायचं.

भास्कर - पश्चिम बंगालमध्ये एक कोटी घुसखोर आहेत. त्यांनाही डीटेन्शन सेंटरमध्ये ठेवायचं?

अविनाश- हो.

भास्कर - एक कोटी लोकांना?

अविनाश - हो.

समर - एक कोटी लोक किती असतात, हे माहीत आहे ना?

भास्कर - पुण्याची लोकसंख्या पन्नास लाख आहे. दोन पुण्यांना डीटेन्शन सेंटरमध्ये ठेवणार तुम्ही. किती मोठी डीटेन्शन सेंटर्स लागतील माहीत आहे का?

अविनाश - मोदी हैं तो मुमकिन हैं!

समर - खर्च किती होईल माहीत आहे का. त्यांचे अन्न, त्यांच्या पोरांची शिक्षणं, त्यांचे औषधोपचार.

अविनाश - ही वाळवी भारतातून काढून टाकायची असेल तर हे करायला लागणार.

समर - हे बघ असे सर्व करण्यापेक्षा आपण थोडं थांबलो तर प्रश्न आपोआप सुटेल. नाहीतरी, बांगलादेश आपल्या पेक्षा श्रीमंत होत चालला आहे. हे लोक आपोआप तिकडे जातील.

भास्कर - (जोरात हसतो)

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

अविनाश - (चिडत) मोदीजी असताना आपल्या पेक्षा कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही.

समर - अरे हो, अमेरिकेला भरताच्या पायाशी आणणार होते मोदीजी, त्याचे काय झाले.

भास्कर - इथे बांगला देशच आपल्या पुढे चालला आहे.

अच्युत - किती द्वेष भरला आहे मनात तुमच्या!

अविनाश - मोदीजींनी ३७० कलम रद्द केले त्याचे काहीच नाही तुम्हाला.

भास्कर - अतिशय मोठी गोष्ट केली मोदीजींनी.

अविनाश - केलीच आहे.

भास्कर - प्रश्नच नाही.

अविनाश - छप्पन इंच का सीना लागतो त्यासाठी.

(मोदीजींची छाती छप्पन इंचांची आहे असा समज मोदीभक्तांमध्ये त्या काळी होता. छप्पन इंच म्हणजे सुमारे पाच फूट होतात. पाच फूट एवढी अनेक लोकांची ऊंची सुद्धा असत नाही. आज हसू येते पण त्याकाळी याविषयी काहीही बोलायची सोय नव्हती. या वरून आपल्याला मोदीभक्तांच्या मनोवस्थेचा अंदाज येतो. - संपादक.)

समर - बरोबर आहे. आता ३७० कलम रद्द केल्यामुळे परिस्थिती मध्ये नक्की काय बदल झाला हे पाहू.

अविनाश - खूप बदल झाले. काहीही झाले तरी भारताची पकड सुटणार नाही, हे जगातल्या सगळ्या लोकांना कळले.

समर - भारताकडे दीडशे अणुबॉम्ब आहेत, हे ज्या दिवशी जगाला कळले होते, त्या दिवशीच सगळ्या जगाला कळले होते की, आता काही भारत काश्मीर सोडत नाही.

अच्युत - तुम्हाला मोदीजींना काही क्रेडिटच द्यायचे नाहिये.

भास्कर - अणुबॉम्ब असलेल्या दोन देशांमध्ये युद्ध होत नाही हा अनुभव आहे. युद्ध करणाऱ्या दोन्ही राष्ट्रांचा संपूर्ण विनाश होऊ शकतो हे दोन्ही राष्ट्रांना माहीत असतं.

समर - इंदिरा गांधींनी पोखरणला पहिला अणुस्फोट केला तेव्हाच काश्मीर कायमसाठी आपला झाला.

अविनाश - काहीही बोलू नकोस. मोदीजींनी ३७० कलम रद्द केले नसते तर काश्मीर गेला असता.

समर - ३७० लागू झाले तेव्हा भारत सरकारकडे एकूण तीन विषय आले. विदेश नीती, संरक्षण आणि करन्सी. बाकी सगळ्या गोष्टींवर जम्मू-काश्मीर विधानसभा कायदे करणार होती.

अविनाश - त्याचा काय संबंध इथे?

समर - गेल्या ५० वर्षात काँग्रेसने हळूहळू जास्त जास्त विषय केंद्राकडे आणले. २०१५मध्ये २८७ विषयांवर काशमीरमध्ये कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला होता.

अविनाश - असेल.

समर - असेल काय? याचा अर्थ असा की, ३७० वे कलम आतून पोखरून टाकले होते आपण.

अच्युत - पण काश्मिरमध्ये इतर भारतीय जमीन घेऊ शकत नव्हते.

अविनाश - आता घेऊ शकतो आहे आपण.

समर - तू घेऊन दाखव एक प्लॉट श्रीनगरमध्ये उद्या.

अविनाश - माझ्याकडे पैसे नाहियेत नाहीतर घेतला असता.

भास्कर - तू बंगला विकलास त्याचे आलेत की पैसे.

अच्युत - आमच्या मनात आलं तर आम्ही घेऊ नक्कीच. आमच्याकडे पैसे आहेत की, नाहियेत हा प्रश्नच नाहिये.

भास्कर - घेऊन दाखवा.

समर - एक सांग तू तुझा पुण्यातला प्लॉट का विकलास?

अच्युत - गुंड अतिक्रमण करायची धमकी देत होते.

समर - (जोरात हसतो.)

अविनाश - हे बघ काश्मीरी पंडितांचा प्रश्न मोठा आहे. त्या बिचाऱ्यांना हाकलून दिले गेले होते ८९ साली.

समर - त्यांना त्यांची घरे आणि जमिनी मिळाल्याच पाहिजेत परत. ३७० कलम रद्द झाल्यावर किती पंडित परत काश्मीरमध्ये जाऊ शकले आहेत?

अविनाश - ती प्रक्रिया सुरू झाली आहे.

भास्कर - हे बघ, ११ ऑक्टोबरच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधली बातमी आहे. उरलेसुरले पंडित काश्मीर सोडून जम्मूला जायच्या तयारीत आहेत. अतिरेकी आता रँडमली हत्या करत आहेत म्हणून हे लोक काश्मीर सोडत आहेत. ६० ते ७० टक्के पंडित काश्मीर सोडायचा विचार करत आहेत.

समर - सरकार त्यांना राहा म्हणून सांगते आहे. ते ऐकायला तयार नाहीत.

अविनाश - खोटी आहे ती बातमी.

समर - एक प्लॉट घेऊन दाखव श्रीनगरमध्ये आणि आमची तोंडं बंद कर.

अच्युत - तुम्हाला म्हणायचं काय आहे? देऊन टाकायचा आहे का काश्मीर?

भास्कर - भारताकडे अणुबॉम्ब आहेत म्हणजे काश्मीर कुठल्याही परिस्थितीत जाणार नाहिये. आणि हे कर्तृत्व २०१४ च्या आधीच्या भारताचे आहे.

अच्युत - मग म्हणायचं काय आहे तुम्हाला?

भास्कर - जगात काश्मीरसारख्या तीन मोठ्या चळवळी झाल्या. कॅनडातल्या क्युबेक प्रांताला स्वतंत्र व्हायचे होते. नॉर्दर्न आयर्लंडला स्वतंत्र व्हायचे होते. स्पेनमधील बास्क प्रांताला स्वतंत्र व्हायचे होते. प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजूंकडून हिंसाचार केला गेला. शेवटी या प्रांतातील लोकांची मने जिंकली गेल्यानंतरच हे प्रांत खऱ्या अर्थाने त्या त्या देशात मिसळून गेले. तिथल्या लोकांनीच फुटिरतावाद्यांना गप्प बसवले. 

अविनाश - तुझ्या बोलण्याला काही अर्थ नाहिये.

भास्कर - ठीक आहे. आपण वाट पाहू. ३७० कलम रद्द झालेच आहे. आता तुम्ही काश्मिरी जनतेची मने जिंकणार असाल तर आम्हाला हवेच आहे.

समर - लक्षात ठेव अटल बिहारी वाजपेयींनी काश्मीरसाठी त्रिसूत्री दिली आहे. ती फार महत्त्वाची आहे- ‘जमूरियत, इन्सानियत आणि काश्मिरियत’. (लोकशाही, मानवता आणि काश्मिरी अस्मितेचा आदर.)

(अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचे नेते होते. यांनी भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवले. मर्यादाशील आणि मानवतावादी दृष्टिकोणासाठी ते प्रसिद्ध होते.)

अच्युत - मोदीजी आणि अटलजी यांची तुलनाच होऊ शकत नाही. मोदीजी हे अवतार आहेत. मानवता वगैरे अटलजींनी बोलावं कारण ते माणूस होते. मोदी तो प्रोब्लेम सुलझानेवाला श्रीकृष्ण हैं.

समर - ठीक आहे तू एक प्लॉट घे श्रीनगरमध्ये. एक छान बंगला बांध. आम्ही मस्तपैकी राहायला येऊ.

अविनाश - तू गप रे. मोदीजींना अजून २० वर्षे द्या कश्मीर मधले लोकच आमच्या जमिनी विकत घ्या ना प्लीज, असं म्हणत पाया पडत येतील आपल्या.

भास्कर - म्हणजे तुला म्हणायचं आहे की, ३७० कलम रद्द झालं तरी आपल्याला सध्या श्रीनगरमध्ये प्लॉट २० वर्षांनी प्लॉट विकत घेता येणार आहे.

 समर - हे बघा, तुम्ही दोघं एक करा. नोटबंदी, सीएए-एनआरसी आणि ३७० रद्द करणे, यामुळे नक्की काय साध्य झालं, हे आम्हाला नीट लिहून द्या प्लीज.

अविनाश - आम्हाला वेळ नाहिये.

समर - एक महिना घ्या.

भास्कर - एक वर्षं घ्या.

अविनाश - नरेंद्र मोदी नावाचा सूर्य या विश्वात तळपतो आहे. त्याच्या तेजाने सर्व जग दिपून गेले आहे. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा, असं या जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटते आहे. आणि तुम्ही करंटे लोक काय विचार करताय? मोदीजींनी टाकलेले प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाकलेलं असतं. त्याचे फायदे लिहून काय मागताय?

अच्युत - तुम्हाला तुरुंगात टाकलं पाहिजे.

भास्कर - जोपर्यंत या देशात लोकशाही आहे, तोपर्यंत प्रश्न विचारले जाणार.

अविनाश - नरेंद्र मोदी जोपर्यंत या देशाचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत कुणीही कसलाही प्रश्न विचारायची गरज नाहिये. त्यांच्या नंतर जर कुणी आलतूफालतू आला तर विचारा प्रश्न!

एवढं बोलून अविनाश आणि अच्युत निघून गेले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मोदीयुगात असे सगळे वातावरण होते. या युगात या अशा वातावरणात चर्चा होणे अशक्यच होते. कर्तृत्वाचा सूर्य तळपतो आहे, पृथ्वी तेजाने दिपून गेली आहे, अशी मोघम वाक्ये वापरली जायला लागली तर चर्चा कशा होणार. या सर्व मोदीभक्तांना लवकरच एक दारुण फटका बसणार होता. पण त्याबद्दल सांगून वाचकाच्या कुतुहलाचा घात आम्ही करू इच्छित नाही.

माणूस एक वेळ आपल्या राजकीय विरोधकांना उत्तरे द्यायचे नाकारू शकतो. पण, इतिहासाचे उत्तरदायित्व कसे टाळता येणार कुणाला?

जनता जनार्दन सतत सजग असतो. काळाचे ‘स्पिरिट’ सतत जागे असते. त्यालाच तर जर्मन तत्त्वज्ञांनी ‘झाईट-गाइस्ट’ हे नाव दिलेले आहे. म्हणजे इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात जिवंत असलेली ‘बिलीफ-सिस्टीम’. इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात जिवंत असलेल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिका आणि श्रद्धा. स्वातंत्र्य-प्राप्ती नंतरच्या भारतात लोकशाही इतकी खोलवर रुजली होती की, मोदी-प्रणित राजकारणाने चर्चा दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही प्रश्न ‘आ’ वासून उभे राहायला लागले. तुम्ही विचारवंतांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे नाकारू शकाल. पण, स्वतः जनताच जर उभी राहून प्रश्न विचारायला लागली तर तुम्ही काय करणार?

भारतीय राजकारणाचा हा कालखंड उत्तरोत्तर रोचक होत गेला. शिरोजी स्वतः या कालखंडाचा इतिहासकार बनून हे सर्व कांड आपल्यासाठी लिहीत गेला, हे आपले भाग्य!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......