राजन गवस यांनी मलपृष्ठावर लिहिलं आहे की, या कवितेला उज्ज्वल भविष्य आहे! आतील कविता वाचून त्याची खात्री पटते!!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 20 November 2021
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस संदीप जगदाळे Sandip Jagdale असो आता चाड Aso Aata Chad

तरुण कवी संदीप जगदाळे यांना नुकताच ‘पहिला केदारनाथ स्मृति सन्मान’ जाहीर झाला आहे. या वर्षापासून केदारनाथ सिंह स्मृति सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. एक पुरस्कार हिंदीतील तरुण कवीला तर एक पुरस्कार इतर भाषेतील तरुण कवीला देण्यात येणार आहे. यंदा पहिल्याच वर्षी हिंदीचा पुरस्कार अचिंत यांना, तर इतर भाषेतील पुरस्कार जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने हा संग्रहाचा परिचय करून देणारा हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

काही वेळेस एखाद्या भाषेतील काव्यविश्वात निराळाच अनुभव घेऊन आलेली कविता दाखल होते आणि त्या त्या भाषेतील काव्यविश्वाला समृद्ध करते. मराठी कविताविश्वात बा.सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, भूजंग मेश्राम, अशा काही मोजक्या कवींच्या वेगळ्या अनुभवांना शब्दबद्ध करणार्‍या कविता अढळस्थान प्राप्त करून आहेत. अर्थात, यातला कोणताही कवी त्या विशिष्ट अनुभवांपुरताच मर्यादित असलेला दिसत नाही. त्या अनुभवांच्याही पलीकडे त्यांनी मोठी झेप घेतलेली दिसून येते. मोठ्या धरणांमुळे गावं, शेतजमिनी नष्ट होणं आणि माणसांना स्थलांतर करावं लागणं, या विषयावर कदाचित मराठीत थोड्याबहुत कविता लिहिल्या गेल्या असतीलही, पण संदीप जगदाळे यांनी ‘असो आता चाड’ या संग्रहातील ‘एक गाव मरताना पाहिलंय’ या विभागात लिहिलेल्या या विषयावरील कविता सर्वार्थाने वेगळ्या आणि खोलवरचा अनुभव देणार्‍या आहेत. संग्रहातील पुढील दोन विभागांत ‘प्रार्थनेची ओळ’ आणि ‘जहाल पान लागलं’ अनुक्रमे शिक्षकी पेशातील अनुभव आणि एकंदरीत गावगाड्याची स्थिती विशद करणार्‍या कविता संकलित केल्या आहेत. पण या संग्रहाला पहिल्या विभागातील कवितांमुळे वेगळेपण प्राप्त होतं.

आपण ज्या गावात जन्मलो, ज्या शेताशिवारात खेळत मोठे झालो ते गाव अन् ती जमीन एखाददिवशी धरणाच्या पाण्याखाली गुडूप होताना पाहणं, ही अस्तित्वाला हादरवून टाकणारी गोष्ट आहे. कवी या अनुभवातून पोळून निघाला आहे. पाण्यात मासे, मगर, कासव, खेकडे राहत असतील, असं इतरांना वाटू शकतं, पण कवीसाठी मात्र त्याच्यापासून दुरावलेलं गावही पाण्यातच राहत असतं आणि म्हणून कोणी त्याला पत्ता विचारला तर भेदरून जावं अशी त्याची स्थिती होते. हा अनुभव ‘माझं गाव...’ या कवितेत अत्यंत संयमित शब्दांत व्यक्त झाला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘घर मरणार नाही...’ या कवितेत घरादाराचा अखेरचा निरोप घेऊन दुसर्‍या ठिकाणी जायला निघालेल्या कुटुंबातील स्त्री काय काय सोबत घेतलं आणि काही मागे राहिलं का, याची मनात उजळणी करत असते, तेव्हा अचानक तिला वाटून जातं, ‘आपण तर अख्खं घरच विसरून आलोय.’ कवी या प्रसंगातून अशा स्थितीत सापडलेल्या माणसांच्या मनाची जी घालमेल होत असते, तिचा परिचय करून देतो.

धरणाच्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते आणि पूर्वी शांत वाहणारी हीच नदी ‘सुपिकतेच्या सगळ्या खाणाखुणा’ पुसून टाकण्याइतपत आक्रमक होते. तो हे वास्तव ‘कोणत्या तहानेनं...’ या कवितेत नदीशी हितगुज करण्याच्या निमित्ताने मांडतो. अशा प्रसंगी त्याला ‘धरण हे नदीच्या देहावरील जखमेसारखं वाटतं.’ या ओळीतून त्याच्या प्रतिमा निर्मितीतील कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो. तो आपल्या मूळ गावापासून कायमचं विलग व्हावं लागल्याचं दु:ख वारंवार व्यक्त करतो. ही त्याच्या जीवनातली भळभळणारी जखम आहे, जिच्यावर कधी खपलीच धरली जात नाही.

विस्थापनाचं दु:ख आणि नव्या प्रदेशात रुजू न शकण्याची वेदना ‘मी खांद्यावर...’, ‘असं कुठवर...’, ‘सोडली गावशीव...’, ‘घर मरणार...’, ‘नदीनं पायखुटी...’ अशा अनेक कवितांत व्यक्त झाली आहे. ‘सोडली गावशीव...’ या कवितेत कवीच्या दृष्टीसमोर विस्थापनानंतरही वाट्याला येणारे अपमान, उपेक्षा आणि त्यांच्या दाबाखाली पिसलं गेलेलं अख्खं गाव आहे. कवी धरणाचं पाणी दुसर्‍या कोणाच्या तरी शेतशिवारांना हिरवंगार करतं झालं, पण ज्यांच्या जमिनी, घरं त्या धरणासाठी गेल्या त्यांच्या ‘घशाला मात्र सदाचीच कोरड आहे’, हा विरोधाभास नेमकेपणाने टिपतो.

तो नव्या वस्तीत राहायला आल्यानंतर एक प्रकारच्या भांबावलेपणाला सामोरा जातो. ‘नदीनं पायखुटी...’ या कवितेत तो लिहितो की, ‘ही परकी माती माझ्या तळपायांना बिलगत नाही.’ हा परकेपणाचा अनुभव विमनस्क करणारा असला तरी त्याने तो मोडून जात नाही, कारण ‘रक्तामांसात मिसळून गेलेली मुळं त्याला उपटून फेकता येत नाहीत कायमची.’ हे मुळांना घट्ट धरून असणं, त्याला उभं राहायला साहाय्य करतं.

आपली घरं, जमिनी पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून जे लोक व्यवस्थेचा प्रतिकार करतात, लढे देतात त्यांची ही मग्रूर व्यवस्था कायम बोळवणच करत आलीय. ‘घर मरणार...’ या कवितेतल्या प्रसंगात जेव्हा धरणाचं पाणी वाढू लागतं, तेव्हा एक निग्रही मुलगी ‘डुबेंगे पर हटेंगे नहीं’ असं म्हणत अडून राहते, तेव्हा कवीला वाटतं की, या मुलीला माहीत नाहीय, इथल्या व्यवस्थेला ‘डोळ्यांतल्या पाण्यापेक्षा धरणातलं पाणी किमती वाटतं.’ कवी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता या विस्थापनामागची व्यवस्थेची भूमिका अधोरेखित करतो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

‘कशासाठी अडून...’ ही कविताही अशा प्रकारचे लढे देणार्‍या लोकांना व्यवस्था कशी कस्पटासमान मानते आणि त्यांच्यापुढे ‘परक्या वाटांवर पायं खोरून मरण्याशिवाय’ अन्य कोणताही पर्याय ठेवत नाही, हे वास्तव व्यक्त करते. याच व्यवस्थेचे प्रतिनिधी कधीतरी अचानक दारात येतात आणि राना-शिवारावर कायदेशीर नोटिसा दाखवून हक्क सांगू लागतात, तेव्हा कवी त्याचे झाडं, पक्षी, माती यांच्याशी एकजीव झालेल्या जगण्याचे दाखले देतो (‘हे रान...’). याच कवितेत तो ‘काळ्या मातीला हिरव्या रंगात बदलून’ त्यातून जे निर्माण होतं ते ‘सगळ्यांच्या पोटापाण्यासाठी वाटून टाकणार्‍यांची’ आणि ‘कापसाला पंतप्रधानांच्या महागड्या सूटमध्ये, धान्याला बियरमध्ये बदलवून टाकणार्‍यांची’ संस्कृती, मूल्यधारणा यांत कसा जमीन-अस्मानाचा फरक आहे, याबद्दल लिहितो. आणि हे त्याचं राजकीय विधानदेखील आहे.

ऋत्विक घटक यांनी असं म्हटलं होतं की, कला आणि विचारधारा यांचा संबंध डाळ आणि मीठ यांच्या संबंधासारखा असतो, जर मीठ जास्त पडलं तर डाळ खाता येत नाही आणि कमी झालं तरीही खाता येत नाही. म्हणजे या दोहोंचा (कला व विचारधारा) समतोल साधता यायला हवा. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता आणि काव्यात्मकतेचा तोल सांभाळून कवितेतून राजकीय भाष्य कशा प्रकारे करता येऊ शकतं, याचा ही कविता उत्तम नमुना आहे.

हा कवी दुसर्‍याचं दु:ख आपलं मानून ते हलकं करण्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरेतून प्राप्त होणारी जी शिकवण आहे, तिला उराशी घट्ट पकडून उभा आहे. त्याच्या नजरेत आपपरभाव नाही. म्हणून तर त्याला धरणाला विरोध करणारा सुलेमानभाई आपला वाटतो, त्याचं ‘उरूसात नाचणं पाहून त्याच्यात वारकरी दिसतो’ (‘धरणाचा तळ गाठताना’). धरणाच्या पाण्यात या सुलेमानभाईच्या बापजाद्यांच्या कबरी गडप झाल्या. त्याने ईदला फातिहा कुठे पढ़ायचा, असा सवाल कवी करतो आणि त्यासाठी सुलेमानभाईला ‘धरणाचा तळ गाठावा लागेल’ असं लिहून त्याचं दु:ख व्यक्त करतो.

नोकरीच्या निमित्ताने गावापासून दूर जाऊन राहावं लागण्याची वेदना त्याच्या मनात सतत ठसठसत राहते. तो व्यक्तिगत आयुष्यातील कडवट अनुभव मागे टाकून अधूनमधून गावात येत-जात राहतो, माणसांशी सुखदु:खाचे शब्द बोलतो पण ‘पदरात पडलेलं परकेपण’ कायम टोचत राहतं असं ‘मला राखता...’ या कवितेत लिहितो. त्याला गावाचं चित्र-चरित्र झपाट्याने बदलू लागल्याचं जाणवतं. जुनी मूल्यव्यवस्था ढासळत चाललीय आणि तिच्या जागी नवी माणसाला उभं राहायला मदत करू शकेल अशी कोणतीही व्यवस्था आकार घेताना दिसत नाही. एखाद्या उंच टोकावरून दगड घरंगळत खाली यावा आणि नाहीसा होऊन जावा, तशी अवस्था होऊ लागल्यासारखं वाटतं. तो ही पडझड उघड्या डोळ्यांनी आणि सजगपणे पाहतो.

‘वसवा पसरलाय गावभर’ या कवितेत ही पडझड नोंदवून ठेवतो. या कवीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो या ग्रामीण भागातील रीतिभाती, परंपरा यांचा आजच्या काळासाळी आवश्यक असणारा संदर्भ घेऊन काहीएक मूल्यात्मक विधान करू पाहतो. उदाहरणार्थ, ‘हजार पिढ्यांनी...’ या कवितेत आपण आपल्या मातीपासून, जुन्या संस्कारांपासून तुटलेलो नाही, हे सांगण्यासाठी गायीच्या खुरातलं पाणी पिऊन शब्द दिला जायचा आणि त्याचं पालन व्हायचं, ही जी काही पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत आहे, तिचा आधार घेतो.

‘गांधी जयंतीला...’ ही कविता केंद्र सरकारचा शेतकर्‍यांप्रती असलेला असंवेदनशील, निर्दयी व्यवहार उघड करते. गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीत आपल्या जगण्यामरण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढणार्‍या शेतकर्‍यांना रोखून धरत त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि दुसरीकडे गांधींच्या नावाचा जयजयकार करणार्‍या सरकारचा ढोंगीपणा पृष्ठभागावर आणते. हे पाण्याचे फवारे पाहून या शेतकर्‍यांच्या मनात येतं की, हेच पाणी आमच्या ताणलेल्या पिकांना दिलं असतं, तर किती बरं झालं असतं. अशा प्रसंग आणि विधानांतून कवी राजकारण्यांची विचारपद्धती, अग्रक्रमाचे विषय आणि सर्वसाधारण माणसाच्या अपेक्षा यांच्यात कशी दरी निर्माण होत चाललीय, हे सुचवतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कवितेत शेतकर्‍यांना उद्देशून ‘दिल्लीजवळ आहे एक भलीमोठी कचराकुंडी/ जिच्यात फेकण्यात येईल/ तुम्ही सांभाळून/ खिशात घडी घालून आणलेला कागद’ असं लिहिलेलं असलं तरी हे सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या आंदोलनांसाठी लागू होणारं विधान आहे. कवी यातून राजकारणाचं केंद्र असलेल्या दिल्लीच्या निष्ठुर राजकीय संस्कृतीचा परिचय करून देतो. तसेच ‘ग्रामस्वराज्य’ म्हणजे नेमके काय हे पुन्हा पडताळून पाहण्याची गरजदेखील कवितेतून व्यक्त करतो. तो फक्त व्यवस्थेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून एकांगी मांडणी करत नाही. शेतकर्‍यांच्या दुर्दशेला काही अंशी ते स्वत:ही जबाबदार आहेत असं सूचन तो ‘आपण थाळा...’ या कवितेत करतो. ‘आपण थाळा वाजवून साप घरात घेतले/ अन् भरली दावण बाजारात उभी करून/ नुस्तंच दावं सावरत/ घरी परतण्याची मरणवेळ आली आपल्यावर’ या ओळींतून अत्यंत वेदनादायी वास्तव आविष्कृत करतो.

इथे भूजंग मेश्राम यांच्या ‘खंडीभर’ या कवितेची आठवण येते. जागतिकीकरणाच्या सपाट्यात सामान्य माणसाच्या जगण्याची झालेली दैन्यावस्था, संस्कृतीचं सपाटीकरण यांविषयी टीकाटिप्पणी करताना ते ‘इस्कोट व्हायचा तो झालाच/ जवा दुभती गाय सोडून झवतं गाढव उरावं घेतलं-’ असं लिहून सर्वसामान्य माणसालाही अंतर्मुख करतात.

जगदाळे हे ग्रामीण भागातील निवडणुकांतील तमाशा, सहकारी पतपेढ्यांचं राजकारण, रासायनिक शेती असं एक एक करत या पडझडीच्या विखुरलेल्या चिन्हांची पुनर्मांडणी करतात. आणि या प्रक्रियेत सामान्य माणसाकडे बोट दाखवायला विसरत नाहीत, हे महत्त्वाचं आहे. मराठीतल्या मोठ्या कवीच्या कवितांतील वैशिष्ट्य जगदाळे यांच्या सुरुवातीच्या कवितांतच प्रतीत होतंय, हे सांगण्यासाठीच केवळ इथे भूजंग मेश्राम यांच्या कवितेचा उल्लेख केला. याच कवितेत जगदाळे त्यांच्या मनात लोकांच्या वागण्यातील चांगुलपणासंबंधी असलेली भाबडी समजूत हळूहळू शबलित होण्याच्या प्रक्रियेविषयी लिहिताना स्वत:च्या अपेक्षाभंगात इतरांच्या जगण्यातील वैफल्यही जोडून घेतात.

शाळेत शिक्षकाची नोकरी करताना आलेले अनुभव, मुलांच्या शाळेतील आणि शाळेबाहेरील जगण्याचं केलेलं निरीक्षण यांविषयीच्या कविता शैक्षणिक क्षेत्राकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतात तसेच कवीत दडलेल्या संवेदनशील शिक्षकाचाही परिचय करून देतात. ‘मी नुस्त्याच हाका...’ ही ग्रामीण भागातील गरीब वर्गातील लोकांना पोटापाण्यासाठी स्थलांतर करावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या मुलांची शाळा हुकते, तेव्हा एका प्रामाणिक शिक्षकाच्या मनात होणारा गलबला व्यक्त करणारी कविता आहे. सगळीकडे लहान मुलांबद्दल बोललं जातं पण कवीला वाटतं की, त्यात ही गरीब वर्गातील मुलं नसतात. या मुलांनी परतून यावं, त्यांच्या हातात पुस्तक ठेवावं आणि त्यांच्या आयुष्यावर पसरलेली काजळी पुसून टाकावी, अशी आतड्यातून निर्माण होणारी इच्छा ‘एवढीच एक...’ या कवितेत व्यक्त करतो.

अभ्यासक्रमाच्या पुस्तकात आमच्या जगण्यामरण्याशी संबंधित कोणत्याच गोष्टी का नाहीत, या शाळेतल्या मुलाने विचारलेल्या प्रश्नावर शिक्षक कवी काहीतरी थातूरमातूर उत्तर देतो. व्यवस्थेची शेतकर्‍यांप्रती असलेली अनास्था तो त्या मुलांना सांगू शकत नाही म्हणून आपण ‘मुसक्या बांधलेल्या ढोरासारखे आहोत’, ‘आपली दातखीळ बसलीय’ अशी विषण्ण करणारी अनुभूती त्याला येते (‘मी मुसक्या...’). या मुलांसाठी खूप काही करावं अशी त्याची इच्छा आहे. पण ‘देता येत नाही...’ या कवितेत आपल्या वर्गातील मुलींना ‘तळहाताएवढीही सावली’ द्यायला आपण असमर्थ ठरतोय या विचाराने येणारी अस्वस्थता प्रभावीपणे मुखर होते. शेवटी या मुला-मुलींनी आयुष्यात कितीही ठेचा खाल्ल्या तरी ‘प्रार्थनेची ओळ मात्र जीवतोड धरून ठेवावी’ अशी आस बाळगतो (‘एवढीच एक...’)

जगदाळे यांच्या कवितांतील व्यक्तिचित्रं सहजासहजी विसरता येण्यासारखी नाहीत. कवीची त्या व्यक्तींच्या जगण्यातील मानसिक गुंतवणूक तीव्र असल्याचं लक्षात येतं. ‘तुझ्या मायाळू...’ ही कविता आजीच्या स्मृतींना उजाळा देते तर लग्न मोडल्यामुळे घरी आलेल्या मुलीचं पुढे कसं करावं, या चिंतेनं खंगून जाणार्‍या बापाचं मनाला चटका लावणारं चित्र ‘रक्तपिती झाल्यासारखा’ या कवितेत आलं आहे. ‘अचानक होत्याचं...’ या कवितेतील दुष्काळी दिवसांतही पाखरांसाठी सगळं वावर खुलं सोडणारा, गोफण गुंडाळून ठेवणारा शेतकरी अजूनही जगातला चांगुलपणा पूर्णत: नष्ट झालेला नाही हा विश्वास बळकट करून जातो. ‘धरणाचा तळ गाठताना’ या कवितेतील सुलेमानभाई त्याच्या सबंध वेदनादायी भूतकाळासह आपल्या मनात घर करून राहतो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पॅलेस्टाइनमधल्या काही चांगल्या कवींच्या कविता आणि गद्य लेखनावर विमानातून होणारं बॉम्बिंग, रॉकेट हल्ले, हिंसाचार यांची गडद छाया असल्याचं दिसतं. कारण त्या अनुभवांनी त्यांच्या सबंध जगण्याला हादरे देऊन ते अस्थिर केलेलं आहे. म्हणून महमूद दारविश यांच्यासारखा कवीही म्हणतो की, ‘मला प्रेमावर लिहावंसं वाटलं तरी अंतत: मी प्रेम न करू देणार्‍या व्यवस्थेविषयीच लिहून बसतो’. धरणाच्या पाण्यात आपलं गाव, जमीन नाहीसं होणं ही जगदाळे यांच्या अस्तित्वाला ढवळून काढणारी घटना आहे. त्यातून जे विस्थापन वाट्याला आलं, त्यातील दु:ख कायम त्यांच्या मनावर धडका देत राहील. जितक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते व्यक्त करता येईल, तितक्या पद्धतींनी त्यांनी तो अनुभव कवितेतून मांडावा. फक्त वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत म्हणून एकाच तर्‍हेचे अनुभव व्यक्त करणार्‍या कविता लिहून पुनरावृत्तीच्या चक्रव्यूहात अडकू नये. विसाव्या शतकातील कवी पाब्लो नेरुदा यांनी आपल्या कवितेविषयी असं म्हटलंय की, ‘If you ask me what my poetry is, I must answer : I don't know. But if you ask my poetry it'll tell you who I am’.

संदीप जगदाळे यांच्या या संग्रहातील कविता त्यांच्या स्वभावातील नितळता, संवेदनशीलता, व्यवहारातील पारदर्शीपणा, इतरांच्या दु:खांशी समकक्ष होण्याची वृत्ती, व्यक्तिगत व्यथेच्या वर्तुळात गरगरत न राहता त्यांना व्यापक समूहाच्या वेदनांशी जोडून घेण्याची सर्वसमावेशक दृष्टी यांची सांगड असलेलं व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यांसमोर उभं करतात. राजन गवस यांनी मलपृष्ठावर लिहिलेल्या मजकुरात लिहिलंच आहे की, या कवितेला उज्ज्वल भविष्य आहे. या संग्रहातील कविता वाचून याची खात्री पटते.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......