अजूनकाही
‘Any intelligent fool can make things bigger, more complex and more violent. It takes a touch of genius – and a lot of courage-to move in the opposite direction.’ - Albert Einstein
मॅनेजमेंटच्या आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करताना जेव्हा ‘इनोव्हेशन’ किंवा ‘नावीन्या’चा विषय येतो, तेव्हा माझ्याकडून एकाच लेखकाच्या दोन पुस्तकांचा आवर्जून उल्लेख होतो, ती म्हणजे- ‘जुगाड इनोव्हेशन’ आणि ‘फ्रुगल इनोव्हेशन’. (‘जुगाड’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.)
मॅनेजमेंट वा इंजिनीअरिंग या दोन्ही शाखेतील विद्यार्थी भविष्यातील उद्योजक असतात किंवा नोकरदार. नोकरदार होणं सोपं असतं, उद्योजक होणं अवघड, पण दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्वक पाय रोवून उभं राहणं त्याहून कठीण.
स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सारखं काही तरी नावीन्यपूर्ण शोधत राहावं लागतं, डोळस असावं लागतं. त्यासाठी एखादा प्रस्थापित व्यावसायिक अभ्यासक्रम केलाच पाहिजे, असं मात्र काही नाही. उलट, जगातले आजचे काही प्रचंड यशस्वी उद्योजक पारंपरिक पद्धतीनं शिक्षण न घेतलेले असेच आहेत. तसेच, ज्यांनी अगदी जुजबी शिक्षण घेतलं आहे, असे लोकदेखील व्यवसायात प्रचंड यशस्वी झाल्याची भरपूर उदाहरणं आहेत आणि ‘गरज ही शोधाची ‘जननी’ असते, तर उणीव ही ‘आजी’ ’, हे त्यांनी आपल्या उपलब्धीतून दाखवून दिलं आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
ज्यांना सामाजिक-आर्थिक गरजांची नाडी गवसली आणि त्या पूर्ण करण्यासाठी अगदी कमी खर्चात स्थानिक संसाधनांचा आधार घेऊन स्वदेशी पद्धतीनं एखादी नावीन्यपूर्ण वस्तू किंवा सेवा ज्यांनी घडवली व पुरवली आणि त्यालाच आपला व्यवसाय बनवून स्थापित केलं, अशा उद्योगकर्मींच्या यशाची गाथा या दोन पुस्तकांचा आत्मा आहे. नवी राडजू, जयदीप प्रभू आणि सिमोन आहूजा या लेखकांनी या दोन पुस्तकांत भारताच्या कानाकोपऱ्यात व्यापून राहिलेल्या नव-उद्योजकतेचं दर्शन घडवलं आहे.
एखादा उद्योग सुरू करायचा म्हणजे अर्थशास्त्राच्या प्रस्थापित नियमाप्रमाणे चार उत्पादक-घटकांची आवश्यकता असते - जमीन, श्रम, पैसा आणि उद्योजकता. पण ही पुस्तकं ज्या उद्योजकांच्या यशस्वीतेची कहाणी सांगतात, त्यांच्याकडे ‘उद्योजकतेशिवाय’ होती, ती हक्त एक ‘आयडिया’ (कल्पना).
नेमकं उद्योजकतेवर बोलताना आजही प्रात्यक्षिकांपेक्षा (प्रॅक्टिकल) सिद्धांन्तांवरच (थेअरी) अधिक भर देण्यात येतो. जेव्हा एखादे मूलभूत संशोधन (प्युअर इनोव्हेशन) व्हायचं असतं, तेव्हा सिद्धांन्त समजून घेणं अपरिहार्य असतं, पण जेव्हा सिद्धान्ताधारित अनुप्रयोग (अप्लाइड इनोव्हेशन) व्हायचा असतो, तेव्हा पुस्तकांच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष पाहण्याची आणि अनुभवण्याची गरज असते.
ही दुसरी बाजू अजूनही व्यावसायिक अभ्यासक्रमातून दुर्लक्षित राहिली आहे. व्यावसायिक प्रगतीसाठी ते किती आवश्यक आहे, याचा ऊहापोह या पुस्तकांत केलेला आहे. अन्यथा होतं काय की, समाजाला उपयोगी न पडणारं एखादं नाविन्यपूर्ण संशोधन शैक्षणिक विद्यापीठांतून आकार घेतं आणि मग त्याचा व्यावसायिक विस्तार होत नाही. कारण एखादी सामाजिक वा आर्थिक गरज त्याच्या मुळाशी गृहीतच धरलेली नसते. परिणामतः कोणताही उद्योजक अशा संशोधनासाठी स्वतःचा पैसा गुंतवायला तयार होत नाही. ज्या छोट्या उद्योजकांनी नेमकी अशी सामाजिक वा आर्थिक गरज हेरलेली असते, त्यांना स्वतःच्या अनुप्रयोगामागील सिद्धान्त माहीत असतोच असंही नाही, पण ते व्यवसायिकदृष्ट्या सफल होतात; कारण त्यांचं संशोधन समाजोपयोगी असते.
५० डिग्री तापमानात शिजणाऱ्या आपल्या गावातील लोकांचे हाल पाहून, त्यांना परवडेल अशा फक्त दोन हजार रुपयात स्थानिक मातीतून इलेक्ट्रिसिटी विना चालणारे ‘मिट्टीकूल’ फ्रिज बनवणारा भारतीय उद्योजक प्रजापती, पुढे त्याच मातीपासून १०० रुपयाचा ‘नॉन स्टिक तवा’ बनवतो. त्याचं नावदेखील ‘फोर्ब्ज मॅगझीन’मध्ये सामील होतं; तेव्हा ‘जुगाड’ या भारतीयांसाठी उपरोधानं वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ‘डूइंग मोअर विथ लेस’ असा नवा अर्थ प्राप्त होतो. भारतासारख्याच चीन, ब्राझील, केनिया, मेक्सिको, कॉस्टा रिका, अर्जेंटिना, फिलिपिन्स या ‘प्रिझमॅटिक’ (फ्रेड रिग्जचे ‘इमर्जिंग इकॉनॉमीज’साठीचं आवडतं नामकरण) देशांमध्ये असे मातीचे पाय असणारे प्रयोग होत असतात.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
बेंजामिन फ्रँकलिन यांनी अमेरिकेत असाच १८व्या शतकांत कमी सरपण लागणार स्टोव्ह बनवला होता. त्या वेळी अमेरिकेतदेखील पुष्कळतेची उणीव होती, शेतीसंबंधी कित्येक ‘जुगाडू’ आणि भुईमुगावरचे औद्योगिक प्रयोग १९-२०व्या शतकात जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हरने केलेले आहेत. पुढे पश्चिम जगात अधिक उत्पादनासाठी, अधिक इंडस्ट्रिअल रिसर्चचा पाया घातला गेला आणि ‘अधिकासाठी अधिक’ अशी नवी संरचना अस्तित्वात आली. ती नवीनतेला मातीपासून दूर घेऊन गेली, म्हणून आज पुन्हा सामान्यांच्या अवाक्यातल्या नवीनतेची गरज भासते आहे.
‘थ्री-एम’सारख्या मोठ्या कंपनीचं एखादं डिव्हिजन अशा कद्रू पद्धतीनं काम करतं किंवा टाटा ग्रुपने एक लाखाची ‘नॅनो’ कार बनवण्यासाठी केलेली धडपड किंवा भारती-एरटेलने अंगीकारलेलं ‘असेट लाईट’ मॉडेल, वा रेनॉची ‘लोगान’ ही नो-फ्रिल्स कार, गोदरेजची ‘छोटू’ रेफ्रिजरेटर प्रॉडक्ट लाईन, अशा भरपूर यशोगाथा या पुस्तकात आहेत. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, ते कनक दासांसारख्यांनी उत्तर भारतात रस्त्यांवरील खड्यातून सायकल चालवताना लागणाऱ्या धक्क्यातून गतिशील ऊर्जा निर्माण करून सायकलचा वेग वाढवण्यासाठी केलेले प्रयोग; आपल्या टेक्सटाईल मिलसाठी दोन विंड-टर्बाइन्स बनवून स्वतःची वीज निर्मिती करणारे गुजरातमधील तुलसी तांती आणि अशाच कितीतरी अनामिकांचं उद्योगजगत.
‘कांगारू केअर’च्या धरतीवर एम्ब्रेस कंपनीने विकसनशील देशांसाठी बनवलेली ३० मिनिटांत चार्ज होताच सहा तास नवजात बाळाला गर्मी देणारी पोर्टेबल ‘बेबी वार्मर्स’, महागड्या इन्क्यूबेटर्सना नव्या छोट्या ‘जुगाडू’ स्वरूपातील पर्याय ठरली. त्यांना या कंपनीनं खेड्यातील घराघरांत पोचवलं. डायबेटिसचा भारतातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पेशंट्सना हॉस्पिटलपर्यंत येण्याची गरज असू नये, या भावनेतून ‘रिमोट’ पद्धतीनं या आजाराचं व्यवस्थापन करणारी पद्धती शोधून काढणारे ‘मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. व्ही. मोहन या पुस्तकात आहेत. तसंच खेड्यांतील घराघरांत ‘सोलर लाईट्स’च्या माध्यमातून वीज पोचवून कित्येक भविष्य घडवणारे SELCOचे संस्थापक हरीश हांडे आहेत. नवजात अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी स्थानिक इलेक्ट्रिशियनच्या मदतीनं लाकडी पेटी आणि १०० वॉटचा बल्ब वापरून केवळ पाच हजार रुपयांत स्वदेशी इन्क्यूबेटर बनवून पहिल्याच प्रयोगात मृत्यूदर निम्म्यावर आणणारे डॉ. सत्या जगन्नाथन या पुस्तकातील अनेक नव-उद्योजकांसारखेच एक ‘हिरो’ आहेत.
मोठ्या कंपन्यांकडे नवीन प्रयोगांसाठी भांडवल असतं, ते छोट्या उद्योगांकडे नसतं, तेव्हा दोघांच्या प्रयोगशीलतेत आणि संघर्षात आकाश पाताळाचं अंतर असतं. भारतात आता मध्यम-लघु-सूक्ष्म उद्योग (एमएसएमई) जोर धरू लागलेत, तेव्हा त्यांना मार्गदर्शक उदाहरणं या पुस्तकात कितीएक सापडतील. भारतात अजूनही स्टार्टअप्ससाठी परिसंवाद आयोजित केला की, व्याख्याते म्हणून राजनेते वा सरकारी अधिकाऱ्यांना बोलावण्याची पद्धत आहे. ते हजारो कोटी रुपयांचे आकडे आणि योजना त्यांच्या अंगावर फेकत असतात, पण त्या बिचाऱ्या नव-उद्योजकांना ‘ज्या लोकांनी आयुष्यात स्वतः एकदेखील उद्योग केला नाही अशांकडून आपल्याला काय मिळणार?’ हा प्रश्न सतावत राहतो. ‘जावे त्याच्या वंशा’, हे जर लक्षात ठेवलं तर स्टार्टअप्सना मार्गदर्शक शिबिरांतून केवळ उद्योजकांनीच मार्गदर्शन केलं पाहिजे, म्हणजे अशी शिबिरं काही तरी इम्पॅक्टफुल होतील, नाही तर केवळ ‘जेवण ठीक होतं’ एवढ्या चर्चेपुरतीच ती उरतील. आपल्या हाती एक देश म्हणून दवडण्यासाठी वेळ कधीच नसतो, नव-उद्योजकाकडे तो अजिबात असत नाही, तेव्हा घेतलीच तर वेळेला न्याय देणारी सरकारी वर्कशॉप्स आपण घेतली पाहिजेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एकदा गुरूग्राममधील नामांकित स्टार्टअपच्या सीईओला भेटलो. त्याला विचारले, ‘तुझा एखादा सरकारी अनुभव सांग.’ तो म्हणाला, मला एकदा सरकारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावून विचारलं, ‘आमच्याकडून मदतीची काय अपेक्षा आहे?’ तेव्हा मी एवढंच म्हणालो, ‘मला काहीही मदत करू नका. मी स्वतःला मदत करण्यास सक्षम आहे. फक्त माझ्या मार्गात जे जुन्या प्रक्रियांमुळे अडथळे निर्माण होतात, तेवढे फक्त दूर करा.’ तो पुढे हेही म्हणाला, ‘आमच्यासारखी भारतातील स्टार्टअप्स अमेरिकन सरकारसोबत काम करतात, जो कॉन्ट्रॅक्ट केला त्याचा पुरेपूर मान राखला जातो, वेळेवर पैसे मिळतात; पण भारतात सरकारसोबत काम करत नाहीत, का? ते मुळातून समजून घेण्याची आवश्यकता आहे.’
एखाद्या राज्याच्या ‘स्मार्ट सिटी’कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जेव्हा एखादा नव-उद्योजक अर्ज भरतो, तेव्हा असे कार्यक्रम सरकार नव्हे, तर सरकारच्या वतीनं काही ‘इव्हेंट मॅनेजर्स’ घेतात, असं कळतं. ते नव-उद्योजकाला ई-मेल करून ‘आपण पुढील काही वर्षांत किती करोड रुपयांची गुंतवणूक आमच्या राज्यात करू शकता? किती लोकांना रोजगार देऊ शकता?’ हे एका फॉर्ममध्ये स्वच्छ भरून पाठवायला सांगतात. त्याला कळत नाही, अशी माहिती तो नव-उद्यमी कसा भरणार, पण खोटं बोलायची सवय नसल्यानं तो ‘असं काही करता येणार नाही, मला फक्त सरकारची योजना आधी समजून घ्यायची आहे’, हे मात्र कळवतो. काही उत्तर येत नाही. त्याची नोंदणी होत नाही. अचानक कार्यक्रमाच्या एक दिवस आधी फोन येतो, ‘आपण अवश्य या.’ जातो तेव्हा कळतं की, या उपद्व्यापांमुळे केवळ सरकारी अधिकाऱ्यांचीच नोंदणी झालेली असते. कोणी तरी मध्यंतरी कान ओढलेले असतात- ‘आपल्या योजना आपणच स्वतःला समजावून सांगायच्या का?’ अन् चक्रं फिरतात, त्यालाही बोलावणं येतं. अशी अनास्था आपल्या सिस्टीममध्ये नव-उद्योगांबाबत ओतप्रोत आहे, म्हणून ‘जुगाड’ वा ‘फ्रुगल इनोव्हेशन्स’चे प्रयोग ठायी-ठायी अपरिहार्य बनून राहतात.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment