‘मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद ही परिपूर्ण वा निर्दोष रचना आहे, असं मानत नाही. मात्र, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायानं मी समाजवादी आहे…’
ग्रंथनामा - झलक
दत्तप्रसाद दाभोळकर
  • ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 November 2021
  • ग्रंथनामा झलक स्वामी विवेकानंदांची खरी ओळख Swami Vivekanandanchi Khari Olakh दत्तप्रसाद दाभोळकर Dattaprasad Dabholkar स्वामी विवेकानंद Swami Vivekananda समाजवाद Socialism

प्रसिद्ध लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ हे स्वामी विवेकानंदांच्या आजवर करण्यात आलेल्या मांडणीला पूर्णपणे छेद देणारं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातील ‘समाजवादी विवेकानंद’ या एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१ नोव्हेंबर १८९६ रोजी लंडनहून कुमारी मेरी हेल यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंद लिहितात, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे.’ हे पत्र आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यांनी हे पत्र लिहिलं नसतं, तरीही ते समाजवादी आहेत हे आतापर्यंत लक्षात आलं असेल.

यापूर्वी आपण पाहिलंय की, विवेकानंद सर्वधर्म परिषदेनंतर केवळ एक वर्षानं पत्र लिहून आपल्या शिष्यांना कळवतात, ‘मी साधू नाही, संत नाही. मी गरीब आहे आणि गरिबी व अज्ञान यांच्या गाळात रुतून बसलेल्या २० कोटी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे. हे माझे भाऊ खेड्यात, झोपडीत राहतात आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या तीनही राजवटीत ते निर्दयपणे भरडले गेलेत.’ या परिस्थितीचं कारण सांगताना ते लिहितात, ‘धर्माला सामाजिक कायदे बनवण्याचा काहीही अधिकार नाही. या देशातली कोट्यवधी माणसं पिढ्यानपिढ्या दु:ख भोगताहेत. याचं एकमेव कारण म्हणजे, धर्माने सामाजिक क्षेत्रात केलेली ढवळाढवळ. दलित-ब्राह्मण स्त्री-पुरुष, हिंदू-मुसलमान-ख्रिश्चन हे भेद मिटवणं आणि दलितांचा सामाजिक स्तर सुधारणं व गरिबांचा आर्थिक स्तर सुधारणं हे माझं जीवितकार्य आहे.’ समाजवादाची नेमकी मांडणी आपण याच शब्दांत तर सांगतो!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आजही विवेकानंद समाजवादी नाहीत, ते सनातनी हिंदू आहेत. त्यांनी भारतातल्या मुसलमानांना समुद्रात बुडवा म्हणून सांगितलंय, अशा जाहिराती भारतभर करणारे लोक आहेत. हे असं का होते? सनातनी मंडळी परिवर्तनवादी मंडळींना प्रथम उपेक्षेने संपवण्याचा प्रयत्न करतात. ते तसे संपले नाहीत, तर त्यांना उपहासाने संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातो आणि तरीही ते संपले नाहीत, तर त्यांना हवं तसं कापून आपल्या चौकटीत बसवून आम्ही आणि ते एकच तर सांगतोय, असं सांगून बहुजन समाजाची छानपणे फसवणूक करतात.

सनातनी पुण्याने महात्मा जोतीबा फुले यांच्याकडे प्रथम अजिबात लक्ष दिलं नाही. उपेक्षेने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळी हे जमणार नाही हे लक्षात आलं, त्या वेळी चिपळूणकरांनी आपल्या निबंधामालेत लिहिलं, ‘या जोतीला निबंध म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? आणि हा म्हणे निबंध लिहितोय. लिहू देत बिचाऱ्याला. हा ज्योती म्हणजे मोहरीचा एक दाणा. या पारड्यात पडला काय आणि त्या पारड्यात पडला काय! त्यामुळे काय फरक पडणारे.’

आणि आज समरसता मंचावर एका बाजूला गुरू गोळवलकर, दुसऱ्या बाजूला डॉ. हेगडेवार आणि मध्ये जोतीबा फुलेंचा फोटो. खरं तर परिवाराने महात्मा जोतीबा फुले यांना स्वीकारलं, तर या देशातली परिवर्तनाची लढाई यशस्वी होते आणि संपते. विवेकानंदांबद्दल नेमकं असंच आहे. त्यामुळे विवेकानंदांची समाजवादी मांडणी अधिक स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे.

 

हा परिव्राजक, हा भटका संन्यासी राजकारण, राजकीय व्यवस्था याबद्दल सर्वप्रथम पुसटसं काही बोलतो, ते सर्वधर्म परिषदेनंतर एक वर्षाने. १९ नोव्हेंबर १८९४ रोजी अमेरिकेतून आपल्या मद्रासमधील शिष्यांना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, “इंग्रजांपासून सत्ता मिळावी म्हणून आपल्यातले काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ‘ज्यांना इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते, ते स्वत:च स्वातंत्र्याला लायक नसतात.’ कल्पना करा की, इंग्रजांनी सगळी सत्ता तुम्हाला दिली, तर त्याचा परिणाम काय होईल? ज्यांच्या हातात सत्ता येईल, ते इतरांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापर्यंत काहीही सत्ता पोहोचू देणार नाहीत. गुलामांना सत्ता हवी असते, इतरांना गुलाम बनवण्यासाठी.’’

आपल्याला नवी रचना शोधायची आहे, हे आपल्या शिष्यांना सांगणारे विवेकानंद आपल्या गुरुबंधूंजवळ ही रचना अधिक स्पष्टपणे सांगतात. १८९५मध्ये शशीला म्हणजे रामकृष्णानंदांना लागोपाठ दोन पत्रं पाठवून त्यात लिहितात, ‘श्रीरामकृष्णांनी आपल्याला सांगितलंय, स्त्री-पुरुष, ब्राह्मण-चांडाळ, गरीब-श्रीमंत हा समाजातला खोटा भेदभाव आपण कायमचा नष्ट केला पाहिजे आणि भगवान गौतम बुद्धांना तर मी सर्वांत मोठा दार्शनिक मानतो, कारण त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की, जातिभेद हा या देशाच्या अवनतीचं एकमेव कारण आहे.’

विवेकानंद अर्थगत जातींबद्दल बोलताहेत, कल्याणकारी राज्याबद्दल बोलत नाहीत. विवेकानंद अमेरिकेत पोहोचले, तेव्हा अमेरिकेत समृद्धी ओसंडून वाहत होती. विवेकानंदांनी अमेरिकेत ५ ऑक्टोबर १८९३ रोजी दिलेल्या भाषणाचा वृत्तांत ‘क्रिटिक’च्या ७ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो असा, ‘तुमच्या अमेरिकेतले गरीब हिंदुस्थानात राजपुत्र ठरतील. मी अमेरिकेतल्या गरीब आणि वाईट भागांतून फिरलो आहे. तो विभागही मला सुखकारक आणि आल्हाददायी वाटला.’

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

परंतु अमेरिकेतील या समृद्धीचं कौतुक करत असतानाही, त्याने दिपून न जाता २३ जून १८९४ रोजी अमेरिकेतून म्हैसूरच्या राजेसाहेबांना पत्र पाठवून त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलंय. ते लिहितात, ‘पाश्चात्य लोक आमच्या जातिभेदावर कितीही टीका करोत; पण त्यांच्यात आमच्यापेक्षादेखील वाईट असा जातिभेद आहे आणि तो म्हणजे पैशावर आधारलेला जातिभेद, अर्थगत जातिभेद. अमेरिकन लोक मानतात की, सर्वशक्तिमान डॉलर काहीही करू शकतो. त्यामुळे या देशात जेवढे कायदे आहेत, तेवढे जगात इतरत्र कुठेही नाहीत. इथले लोक कायदे जेवढे धाब्यावर बसवतात, तेवढं जगात दुसरीकडे होणार नाही!’ विवेकानंद अमेरिकेत आलेल्या कल्याणकारी राज्याने दिपून गेलेले नाहीत. अर्थगत जातिव्यवस्था वाईट आहे, असं सांगताहेत. समाजवाद नसेल, अर्थगत जातीयता संपवून समता आणलेली नसेल, तर कल्याणकारी राज्यात पैशाच्या जोरावर श्रीमंत कसेही वागतील, काहीही करतील, हे सांगताहेत.

जगभर समाजवाद येतोय, हे विवेकानंद आपल्या शिष्यांना सांगताहेत. १८९८मध्ये बेलूर मठ भाड्याच्या जागेत भरत असताना त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, ‘गरीब लोक दिवस-रात्र फक्त राबत असतात. मानवी बुद्धीने नियंत्रणाखाली ठेवलेल्या यंत्रासारखे ते सारखे राबत असतात. बुद्धिमान आणि चतुर लोकांनी सगळ्या जगभर त्यांच्याकडून गुरांसारखी ढोर मेहनत करून घेऊन स्वत:साठी सुख-समृद्धी निर्माण केली; पण आता काळ पालटला आहे. भरडल्या जाणाऱ्या जगभराच्या श्रमजीवी वंचित माणसांना याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. त्या एकत्र येऊन संघटित रीतीने आपले न्याय्य हक्क मागू लागले आहेत. युरोप-अमेरिकेत या श्रमजीवी लोकांनी एकत्र येऊन लढ्याला सुरुवातही केली आहे. भारतातही ही नवजागृतीची चिन्हं दिसू लागली आहेत. आजकाल भारतात त्यांनी पाळलेले हरताळ हे या जागृतीचं प्रमाण आहे.’

 

१ नोव्हेंबर १८९६ रोजी मेरी हेल यांना विवेकानंदांनी पाठवलेलं पत्र विस्तृत आहे. त्या पत्रात ते लिहितात, ‘प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद ही परिपूर्ण वा निर्दोष रचना आहे असं मी मानत नाही. मात्र, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायानं मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद येणारच, त्याचा प्रवाह आता कुणालाच थांबवता येणार नाही आणि तो प्रत्यक्षात आल्यावर, अनुभवातून आपण त्यातली त्रुटी दूर करू.’

या पत्रात विवेकानंदांनी शासनव्यवस्था वर्णव्यवस्थेशी जोडलेली आहे. समाजवाद म्हणजे शूद्रांची, दलितांची, वंचितांची राजवट, अशी व्याख्या ते करतात. त्यांनी मांडलेली रचना पुढीलप्रमाणे आहे.

‘मानवी समाजावर क्रमाने चार वर्णांचं शासन चालतं. हे चार वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे होत. प्रत्येक वर्णाच्या शासनात काही गुण असतात आणि काही दोष असतात.’

‘जेव्हा ब्राह्मणांचं राज्य असतं, तेव्हा वंशपरंपरेवर आधारलेला घोर संकुचितपणा दृष्टीस पडतो. ब्राह्मणांचे व त्यांच्या वंशजांचे अधिकार पूर्णपणे सुरक्षित ठेवले जातात. फक्त त्यांनाच ज्ञान संपादन करता येतं. ज्ञानाचं दान करण्याचा व ज्ञानावर आधारित धनसंपादन करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो. ज्ञानविज्ञानाच्या सर्व शाखांची पायाभरणी आणि उभारणी याच काळात होत असते. हे या काळाचं वैभव आहे. ब्राह्मणवर्ग मनाचा विकास करतो, कारण मनाद्वारेच तो इतरांवर शासन करत असतो.’

‘क्षत्रियांची राजवट ही जुलूम-जबरदस्तीची आणि निष्ठुरतेची असते; परंतु ते संकुचित स्वभावाचे नसतात आणि त्यांच्या राजवटीत कला व सामाजिक संस्कृती या गोष्टींचा उदय होतो. त्यानंतर येते वैश्यांची राजवट. या राजवटीत जनतेला शांतपणे चिरडून टाकण्याचं व त्यांचं रक्तशोषण करण्याचं सामर्थ्य असतं. त्यामुळे ती भयंकर असते. मात्र, या राजवटीचा एक फायदा आहे. वैश्य हा व्यापारासाठी स्वत:च सर्वत्र हिंडत असतो. त्यामुळे पूर्वीच्या दोन राजवटींत संकलित झालेल्या कल्पनांचा व विचारांचा प्रसार करण्याचं कार्य तो चांगल्या प्रकारे करतो. वैश्य हे क्षत्रियांहूनही कमी संकुचित स्वभावाचे असतात; परंतु त्यांच्या राजवटीत संस्कृतीच्या अधोगतीला प्रारंभ होतो.’

‘सरतेशेवटी आता शूद्रांची राजवट येईल. भौतिक सुखांचा प्रसार सार्वत्रिक होईल. शिक्षणाचा फार प्रचंड प्रमाणात सर्वत्र फैलाव होईल. शूद्रांची, श्रमजीवी लोकांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारेल, त्यांचा सामाजिक दर्जा सुधारेल; परंतु संस्कृतीची घसरण हा (कदाचित) तिच्यापासून तोटा असेल. त्यामुळे असाधारण प्रतिभावंतांची संख्या कमी होऊ लागेल.’

‘ब्राह्मणकाळातील ज्ञानविज्ञान, क्षत्रिय काळातील संस्कृती, वैश्यकाळातील प्रसारक प्रवृत्ती आणि शूद्रकाळातील समतेचा आदर्श या सगळ्या गोष्टी ज्या राज्यात शाबूत आहेत, परंतु या सर्व राजवटींचे दोष ज्यात नाहीत, असे एखादे राज्य जर निर्माण केले, तर ते आदर्श राज्य ठरेल; परंतु हे शक्य आहे का?’

‘पहिल्या तिघांची पाळी आता संपली आहे. आता शेवटच्यांची म्हणजे शूद्रांची पाळी आली आहे. त्यांची राजवट येईलच. तिला कुणी थोपवू शकणार नाही. ‘गोल्ड स्टँडर्ड’ (सुवर्णमान पद्धती) आणि ‘सिल्व्हर स्टँडर्ड’ (रजतमान पद्धती) यांच्यामधील खाचाखोचा मला माहीत नाहीत, हे खरं. (खरं तर यासंबंधी फारसं ज्ञान कुणालाच दिसत नाही म्हणा!) तथापि, या सुवर्णमान पद्धतीमुळे गरीब लोक अधिक गरीब होत आहेत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, हे मला दिसत आहे. ‘सुवर्णांच्या क्रुसावर मरण्यास आम्ही तयार नाही,’ असं ब्रायनने म्हटलं आहे, ते पूर्णपणे योग्य आहे. रजतमान पद्धतीमुळे या विषम झगड्यात गरिबांना अधिक चांगली संधी मिळेल.’

 

मी समाजवादी आहे, असं विवेकानंद म्हणालेत हे खरं; पण आम्ही समाजवादी आहोत, असं म्हणून समाजवादी होता आलं असतं, तर स्वतंत्र पक्ष सोडून भारतातले इतर सगळे पक्ष कमी-अधिक वेळ समाजवादी होते, असं म्हणावं लागेल! पण ही सांगून होणारी गोष्ट नाही. ती व्यवहारात दिसावी लागते. मार्क्स सांगतो, समाजवादाला, कोणत्याही परिवर्तनाला धर्मचिकित्सेपासून सुरुवात होते आणि धर्मचिकित्सा करणं हे असिधाराव्रत आहे. ती अग्निपरीक्षा आहे. डॉक्टर लागूंसारखे ज्येष्ठ रंगकर्मी ज्या वेळी ‘देवाला रिटायर करा’ असं म्हणाले, त्या वेळी सनातनी मंडळींनी त्यांनाच ‘रिटायर’ करण्याचा प्रयत्न केला. सनातनी धार्मिक मंडळी एवढ्यावरच थांबत नाहीत. धर्मचिकित्सा करणाऱ्या माणसाला भ्याडाप्रमाणे पाठीमागून गोळी घालून पळून जातात आणि मग आपल्या वीरकृत्याचा जल्लोष करतात. विवेकानंदांनी धर्मसमीक्षा आणि धर्मचिकित्सा केली. फार भेदकपणे केली; पण त्यांनी वेगळी रणनीती वापरली. २ नोव्हेंबर १८९३ रोजी आपला शिष्य अळसिंगा पेरूमल यांना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, ‘बुद्धदेवांपासून राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंत सर्व समाजसुधारकांचे, धर्मसुधारकांचे प्रयत्न फसले, कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तींवर आघात करावा लागेल.’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विवेकानंदांची ही रणनीती नीटपणे लक्षात घ्यायला हवी. विज्ञान कितीही बरोबर असलं, तरी विज्ञान माणसाला सांगतं, ‘जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीतून निर्माण झालेले एक रसायन होतास आणि मृत्यूनंतर माती बनून तू पुन्हा कायमचा नाहीसा होणार आहेस.’ हे खरं की खोटं हा वाद बाजूला ठेवू या; पण हे खरं असलं, तरीही ९९ टक्के माणसं हे स्वीकारू शकत नाहीत. माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म हवे असतात. तुम्ही धर्मांवर टीका केली, तर समाज तुमच्यापासून दूर जातो. आपण नेमकं काय करत आहोत, हे विवेकानंदांनी आपला भाऊ महेंद्रनाथ यांना सांगितलंय. त्यांनी ते ‘लंडनेर स्वामी विवेकानंद’ या आपल्या पुस्तकात ग्रंथित केलंय.

१८९६मध्ये लंडन इथं विवेकानंदांचं भाषण होतं. एके दिवशी त्यांच्या एका दुपारच्या भाषणाच्या वेळी महेंद्रनाथ तिथे पोहोचले. विवेकानंदांनी १८९० साली कलकत्ता सोडल्यावर सहा वर्षांनी प्रथमच ते त्यांना भेटणार होते. दुपारचं जेवण झालं होतं. पुढच्या भाषणापूर्वी विवेकानंद खुर्चीवर बसून डुलकी घेत होते. त्यांनी डोळे उघडले. आपल्या भावाकडे पाहिलं. त्याला म्हणाले, ‘भाऊ, तू ओळखलंस का मला? मी सेंट पॉलप्रमाणे धर्माचं वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही.’

धर्माचं वेड पांघरून विवेकानंद निवांतपणे भेदक धर्मचर्चा करत आहेत का? तसं असावे. लागूंनी ‘देवाला रिटायर करा’ म्हणून सांगितलं त्याच्या १०० वर्षं आधी विवेकानंदांनी ते अधिक दाहक शब्दांत सांगितलंय. मी समाजवादी आहे, असं ते मेरी हेल यांना म्हणतात. त्याच्या सहा महिने तीन दिवस आधी २७ एप्रिल १८९६ रोजी अलमबझार मठातील आपल्या गुरुबंधूंना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, ‘मठाचा सर्व खर्च मी देईन; पण मठ माझ्या रचनेप्रमाणे चालला पाहिजे. आपले देव आता जुने झालेत. आपल्याला आता नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे, कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.’

 

समाजवादी माणूस एका देशात काम करत असतो. मात्र, त्याच्या मनातल्या देशांच्या सीमारेषा केव्हाच पुसलेल्या असतात. विवेकानंदांनी आपल्या परदेशातल्या मित्रांना आणि भारतातल्या शिष्यांना हे अगदी स्पष्टपणे सांगितलय. ९ ऑगस्ट १८९५ रोजी न्यूयॉर्कहून लंडनमधील आपले मित्र ई. टी. स्टर्डी यांना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, ‘आणखी एक गोष्ट. भारताविषयी मला प्रेम आहे, यात शंका नाही; पण दररोज माझी दृष्टी अधिकाधिक स्वच्छ होत चालली आहे. आपल्याला भारत, इंग्लंड, अमेरिका यांचं काय हो! अज्ञानी लोक ज्याला मानव समजतात, त्या ईश्वराचे आपण आपण सेवक आहोत. जो वृक्षाच्या मुळाला पाणी घालतो तो सबंध वृक्षालाच पाणी घालत असतो. सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक कल्याणाचा एकच मूलभूत असा पाया आहे. तो म्हणजे, मी आणि माझा भाऊ एकच आहोत, ही जाणीव. हे सर्व समाजाच्या आणि सर्व देशांच्या बाबतीत लागू पडणारं सत्य आहे.’

फक्त सुशिक्षित हिंदूमध्ये आढळून येणाऱ्या जात्यंध, धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक भेकडांपैकी एक बनून जगावं आणि मरावं यासाठी मी जन्माला आलेलो नाही.’

 

विवेकानंदांची वैचारिक आणि व्यावहारिक मांडणी नीटपणे लक्षात घ्यायला हवी. अमेरिकेतून परत आल्यावर, सार्वजनिक सत्कार समारंभ संपल्यावर विवेकानंदांनी लिहिलेली दोन पत्रं फार महत्त्वाची आहेत. पहिलं पत्र त्यांनी २४ एप्रिल १८९७ रोजी ‘भारती’ मासिकाच्या संपादक श्रीमती सरला घोष यांना लिहिलं. त्यात ते लिहितात, ‘भारताचा जो सत्यानाश झाला त्याचं एकमेव कारण म्हणजे, राज्यसत्ता आणि वर्णाभिमान याच्या जोरावर या देशातील सगळी विद्या आणि बुद्धी काही मूठभर लोकांनी आपल्या हातात ठेवली. आपल्याला जर पुन्हा या देशाचा उद्धार करायचा असेल, तर सर्वसामान्य जनतेत विद्येचा प्रसार करायला हवा. केवळ शिक्षण, शिक्षण, शिक्षण हा एकच मंत्र आहे. युरोपातल्या अनेक शहरांमधून हिंडताना, तिथल्या गरीब लोकांच्या असलेल्या शिक्षणाच्या सोयी बघून आपल्या देशातल्या गरिबांची दशा माझ्या मनात येत असे आणि मला रडू कोसळे.’

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

३ जानेवारी १८९८ रोजी श्रीमती मृणालिनी बोस यांना पाठवलेलं पत्र अधिक बोलकं आहे. त्यात ते लिहितात, ‘मूळ प्रश्न असा आहे की, समाज जे निर्णय घेतो, ते निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी घेतले जातात का? या प्रश्नाला अनेक जण होकारार्थी उत्तर देतात. उलट, काहींच्या मते हे असं होत नसतं. काही व्यक्ती इतरांच्या तुलनेने अधिक ताकदवान होऊन इतरांना आपल्या कह्यात आणतात आणि मग कपटानं, कारस्थानं लढवून, नियम बनवून अक्कलहुशारीनं अथवा जुलूम-जबरदस्तीनं आपला हेतू तडीस नेतात. हे जर खरं असेल, तर अज्ञानी लोकांना स्वातंत्र्य देणं धोक्याचं आहे, असं सांगण्यामागील नक्की हेतू काय आहे? ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे?’

‘मी किंवा तुम्ही चालवलेल्या संपत्तीच्या अपहरणाचा अगर अशाच प्रकारच्या पिळवणुकीच्या मार्गातील अडथळ्यांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य, असा ‘स्वातंत्र्य’ शब्दाचा अर्थ नक्कीच नाही. माझ्या मते आपलं शरीर, आपली बुद्धी व आपलं धन या सर्वांचा दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारे अपाय होणार नाही, अशा प्रकारे आपल्या इच्छेप्रमाणे उपयोग करण्याचा निसर्गदत्त, निसर्गसिद्ध हक्क म्हणजे स्वातंत्र्य होय. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, समाजाच्या सर्व घटकांना संपत्ती, शिक्षण अथवा ज्ञान मिळवण्यासाठी समान संधी असली पाहिजे. काही लोक दुसराच प्रश्न पुढे करतात. त्यांच्या मते दलित आणि गरीब यांना स्वातंत्र्य दिलं, त्यांना आमचाच सामाजिक दर्जा दिला. संपत्ती मिळवण्यासाठी व संग्रह करणारी रचना दिली, त्यांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या आणि उच्चवर्णीयांच्या मुलांबरोबर ज्ञान मिळवण्याची समान संधी दिली, तर ती माणसं माजतील. जी माणसं ही अशी मांडणी करतात, ती समाजाच्या हितासाठी आहे, की त्यांच्या स्वार्थासाठी आहे? ‘समाजातील खालच्या वर्गालाही जर उद्या शिक्षण मिळालं, तर मग आमची सेवा कोण करेल.’ ही भाषा मी इंग्लंडमध्येही ऐकली आहे!’

‘मूठभर श्रीमंतांच्या चैनीखातर लक्षावधी स्त्री-पुरुषांनी दारिद्रयाच्या नरकात आणि अज्ञानाच्या गडद अंधारात पिचत राहिलं पाहिजे, या गाळात रुतून राहिलं पाहिजे. कारण, या बिचाऱ्यांना शिक्षण आणि धन मिळालं, तर म्हणे समाजाची घडी बिघडून जाईल! अरे, हा समाज कुणाचा बनला आहे. या लक्षावधी लोकांचा, की तुमच्या-माझ्यासारख्या मूठभर निवडक उच्चवर्णीयांचा?’

‘समाज हा निवडक उच्चवर्णीयांचाच बनलेला आहे, हे खरं आहे असं जरी मानलं, तरी आम्हीच इतरांचं नेतृत्व केलं पाहिजे, या आपल्या अहंकाराला काय आधार आहे? आपण काय सर्वज्ञ आहोत? प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्यावा. त्यासाठी सामाजिक व राजकीय रचना हवी. समाजातील गरीब आणि दलित यांच्या विकासाला अडथळा आणणारे सर्व सामाजिक नियम घातक असून, त्यांचं शक्य तो लवकर उच्चाटन करण्यासाठी आपण पावलं टाकली पाहिजेत आणि ज्या नव्या नियमांमार्गे समाज स्वाधीनतेच्या मार्गावर पुढे जाईल, अशा नियमांचा पुरस्कार करून त्यांना उत्तेजन द्यायला हवं.’

 

जगात सर्वत्र मानवी समाजात समता निर्माण करण्याचं स्वप्न पाहून त्यासाठी जे काही करावं लागेल, त्याची शास्त्रीय पद्धती सर्वप्रथम सांगणारा महामानव म्हणजे कार्ल मार्क्स. मार्क्स यांचं एक महत्त्वाचं विधान आहे, ‘धर्म ही अफूची गोळी आहे.’ मार्क्स यांचं हे विधान लक्षात घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मार्क्स यांना जी समता हवी आहे, त्याला आपण साम्यवाद म्हणतो. माझ्याशी बोलताना मधू लिमये एकदा म्हणाले होते, ‘आम्ही समाजवादी आहोत, पण आम्ही गांधींची माणसं आहोत आणि गांधीजी तर ‘ईश्वर अल्ला तेरे नाम’ असं सांगणारा धर्म मानत होते. लोहियासुद्धा राम आणि धर्म यावर बोलायचे. मग आम्ही धार्मिक उत्सवांपासून, देवाच्या प्रार्थनेपासून दूर राहिलो. ही आमच्या रणनीतीमधली एक चूक आहे. खरं तर मुंबईत कम्युनिष्टांचेही लालबागमध्ये गणपती उत्सव होतात. कलकत्त्यात आजही साम्यवादी मंडळींचे दुर्गापूजेचे मंडप असतात.’

साम्यवादी हिंसा मानतात; समाजवादी मंडळींना हिंसा अजिबात मान्य नाही. हृदयपरिवर्तन करून नाही तर शांततामय मार्गाने समता सांगणारा समाजवाद त्यांना मान्य आहे. केवळ एवढंच नाही, तर हिंसेच्या मार्गाने समता प्रस्थापित होऊच शकणार नाही, हा त्यांचा विश्‍वास आहे.

विवेकानंद नेमकं हेच मत मांडतात. २१ फेब्रुवारी १९०० रोजी स्वामी अखंडानंद यांना पाठवलेल्या पत्रात ते लिहितात, ‘आपलं कार्य निराधार, गरीब, अशिक्षित अशा शेतकरी-कामकरी वर्गासाठी आहे आणि प्रथम त्यांच्यासाठी कार्य केल्यावर जर काही वेळ उरला, तरच मग सुशिक्षितांसाठी कार्य करा. शेतकरी-कामकरी लोकांना प्रेमानं आणि सेवेनं जिंकता येईल. त्यानंतरच तेच आपले छोटे-छोटे निधी उभारू लागतील आणि आपापल्या खेडेगावी कार्य सुरू करतील आणि मग हळूहळू त्याच लोकांमधून आपल्याला कार्यकर्ते मिळतील. खेड्यातील शेतकरी-कामकरी वर्गातील मुलामुलींना थोडं फार तरी लिहायला व वाचायला शिकवा. त्यांना नव्या कल्पना द्या.’

विवेकानंद सर्व धर्मांकडे संप्रेरक म्हणून पाहतात. त्यांची दोन विधानं या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. ‘ग्रंथ हे धर्माचे आधार नाहीत, तर धर्म हे ग्रंथांचे आधार आहेत.’ आणि ‘काळाच्या एका चौकटीत धर्माने जी मूलभूत तत्त्वं सांगितली, ती ग्रंथीत करण्यासाठी धर्मग्रंथ निर्माण झाले. काळाची ती चौकट बदलल्यावर धर्मातली मूलभूत तत्त्वं आजच्या चौकटीत समजावून देण्यासाठी धर्मग्रंथांना बदलावं लागेल.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

म्हणजे, धर्म या संप्रेरकात शिरलेले दोष काढून टाकावे लागतील आणि त्याच वेळी या प्रक्रियेसाठी नवा संप्रेरक शोधला किंवा बनवला पाहिजे, असं ते सांगतात. ‘उद्याचा धर्म सर्व धर्मांच्या समन्वयावर आधारित असेल, पण विज्ञान हा त्याचा पाया असेल. त्यामुळे हा नवा धर्म स्थितीशील न होता गतिशील असेल.’ आणि हे सर्व कसं करता येईल हे १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहमद हुसेन यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. ते लिहितात, ‘तिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. मात्र, हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल.’

आणि जानेवारी १८९७मध्ये भारतात प्रथम परत आल्यावर फेब्रुवारी १८९७मध्ये मद्रासमध्ये ‘हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, ‘सगळ्या समाजवादी सिद्धान्तांना आणि रचनेला अध्यात्माची जोड द्यावी लागेल.’

‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ •- डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

मनोविकास प्रकाशन, पुणे

मूल्य -  ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Sat , 20 November 2021

या लेखातील शेवटचे वाक्य मला विचार करायला लावणारे आहे असे वाटले  म्हणून हे comment  लिहीत आहे. ते वाक्य असे की "जानेवारी १८९७मध्ये भारतात प्रथम परत आल्यावर फेब्रुवारी १८९७मध्ये मद्रासमध्ये ‘हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत ते ( स्वामी विवेकानंद) म्हणतात, ‘सगळ्या समाजवादी सिद्धान्तांना आणि रचनेला अध्यात्माची जोड द्यावी लागेल.’ समाजवादी विचारांची पाठराखण करणारे असे मानतात की बहुसंख्य जनतेचे आर्थिक-सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकशाही समाजवादी रचना उपयुक्त आहे. डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असणाऱ्यांची या संदर्भातील  विचार-प्रक्रिया काहीशी एकांगी असते.  म्हणूनच माझ्या मते या संबंधी विचार करताना लोकशाही समाजवादी विचार कुठे  कमी पडले याबद्दलची चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे.   या चर्चेत उपयुक्त ठरू शकणार प्रा वसंत पळशीकर यांच्या मराठी विश्वकोशातील 'लोकशाही समाजवादा" वरील टीपणातील काही भाग मला समर्पक वाटला तो भाग येथे मी उर्धृत करत आहे:  “लोकशाही समाजवादाच्या आर्थिक फेरमांडणीविषयी लोहियांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या. भारतातील मनुष्यबळाची उपलब्धता व भांडवलाची कमतरता ध्यानात घेता, तसेच संपत्ती व सत्तेचे केंद्रीकरण रोखण्याच्या दृष्टीने, येथे श्रमसधन अल्पप्रमाण यंत्रांचा वापर अधिकात अधिक करणे श्रेयस्कर ठरेल, असे त्यांनी प्रतिपादले. आज हेच तत्त्व समुचित तंत्रविज्ञान या शब्दप्रयोगाने मांडले व ओळखले जाते. प्रत्येकास अर्थपूर्ण रोजगार मिळावा व त्याआधारे किमान जीवन वेतनाची हमी मिळावी. ही बाब सर्वाधिक अग्रक्रमाची मानून या देशात आर्थिक विकासाची व्याख्या तसेच नियोजन केले जावे, या गांधीजींच्या आग्रहाचे प्रतिबिंब लोहियांच्या विचारात पडलेले दिसते. रोजगार, समता व न्याय प्रस्थापनेचा मुद्दा वा व्यक्तिस्वातंत्र्य असो, विकासाच्या मार्गक्रमणात त्या गोष्टी आपल्या पदरात थोड्याथोड्या का होईना पडत आहेत वा अनुभवाला येत आहेत, अशी प्रचीती शोषित-पीडित व दरिद्री-बेकार व्यक्तींना आली पाहिजे. ‘तत्काळ पडताळ्याचे तत्त्व’ (प्रिन्सिपल ऑफ इमीडीअसी) लोहियांनी मांडले मात्र दुर्दैवाने, ‘समुचित तंत्रविज्ञाना’ विषयी, विकेंद्रित अर्थ आणि उद्योग–व्यापार संरचनेविषयी वा पर्यायी विकासनीतीविषयी अधिक सखोल वा तपशीलवार मांडणी नंतरच्या काळात लोकशाही समाजवादी चळवळीमध्ये केली गेली नाही.”   प्रा पळशीकरांचे हे विचार आणि डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी करून दिलेली ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ •ही दोन्ही आपल्या चर्चेत उपयुक्त होतील असे वाटते. 


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......