पत्रकार ‘आत्मसन्मान’ कार्यालयात गहाण ठेवून कुटुंब चालवण्यासाठी कसेबसे दिवस ढकलत आहेत आणि ‘चौथा स्तंभ’ म्हणून लोकशाहीचे ओझे वाहत असल्याचे उसने अवसान आणत आहेत…
पडघम - माध्यमनामा
सचिन दिवाण
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 18 November 2021
  • पडघम माध्यमनामा वर्तमानपत्र Newspaper पत्रकारिता Journalism पत्रकार Journalist संपादक Editor

परवा, १६ नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय माध्यम दिन’ (नॅशनल प्रेस डे) झाला आणि काल पत्रकारितेतील एका सहकाऱ्याने आत्महत्या केल्याचे कळले. त्यांना मनापासून श्रद्धांजली. अशी कोणती विवंचना होती, ज्यापायी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, हे मला माहीत नाही. या संदर्भात काही मित्रांशी फोनवर बोलणे झाले आणि पत्रकारितेतील आजच्या एकंदर स्थितीची चर्चा झाली. ती काही फार चांगली नाही. पण याबद्दल कोणी जाहीरपणे लिहितानाही दिसत नाही. मग मित्र म्हणाले की, ‘आम्हाला नोकरीची भीती आहे. तू सध्या कोणत्याही माध्यमात कामाला नाहीस. तुला नोकरी जाण्याची धास्ती नाही. मग तूच लिही.’ मलाही हौस होतीच. म्हणून हे लिहीत आहे.

इतर कोणाला दोष देण्यापूर्वी सुरुवात स्वतःपासून म्हणजे पत्रकारांपासूनच करतो. ‘पत्रकार’ ही जरा व्यापक संज्ञा झाली. प्रसारमाध्यमांत काम करणारे खूपच कमी कर्मचारी त्या व्याख्येत बसतात. बाकीचे सगळे अन्य कुठल्याही क्षेत्राप्रमाणेच साधे नोकरदार आहेत. त्यांची ‘प्रोफेशनल डेझिग्नेशन्स’ काहीही असोत. त्यांना वाटते की, जगातील सगळी अक्कल आपल्यालाच आहे आणि जगाला शिकवण्याचा मक्ता आपल्याच मिळाला आहे. वस्तुस्थिती तशी नाही. याची मी पाहिलेली काही उदाहरणे -

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात २००२ ते २००४ या काळात मी पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तेव्हा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने औषधनिर्माणाविषयी एक जागतिक परिषद भरवली होती. त्याच्या प्रसिद्धीचे काम आमच्या विभागाकडे होते. या परिषदेला अन्य अनेक देशांसह मोल्डोवा देशाचे एक शास्त्रज्ञ आले होते. स्थानिक माध्यमांनी त्यांचे वर्णन ‘मालदीवचे शास्त्रज्ञ’ असे केले. वास्तविक दोन्हींत बराच फरक आहे. मोल्डोवा किंवा मोल्डेव्हिया हा सोव्हिएत युनियनमधून फुटून स्वतंत्र झालेला युरोपमधील एक लहानसा देश आणि मालदीव हा भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागरात वसलेला बेटांचा एक देश. दोन्हींत किमान पाच-सात हजार किमींचे अंतर आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल जे. जे. सिंग हे एकदा काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला आले होते. त्यांच्या पत्रकार परिषदेत ‘पीटीआय’ या प्रख्यात वृत्तसंस्थेच्या कोल्हापूरमधील ज्येष्ठ प्रतिनिधींनी - जे त्या वेळी निवृत्तीकडे झुकले होते - जनरल सिंग यांना एक प्रश्न विचारला, ‘फ्रान्सच्या मदतीने बांधण्यात येत असलेल्या स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या कथित घोटाळ्याचे काय झाले?’ जनरल सिंग हसून म्हणाले – ‘हा प्रश्न नौदलाशी संबंधित आहे. मी भूदलाचा प्रमुख आहे. मी कसे काय त्याचे उत्तर देऊ?’

माझे बाबा एकदा घरी दै. ‘सकाळ’ वाचत बसले होते. त्याच्या एका पानावरील मजकूर दाखवून मला म्हणाले, ‘हे बघा, तुमचे पेपरवाले काय तारे तोडत आहेत’. त्या पानावर अर्थशास्त्रातील ‘ग्रेशम्स लॉ’संबंधी काही मजकूर छापून आला होता. त्यात लिहिले होते की, ‘लोक मळकट नोटा खपवून कोऱ्या नोटा स्वतःकडे ठेवतात’. वास्तविक ‘ग्रेशम्स लॉ’ असा आहे – ‘व्हेन इन्ट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ मनी इज मोअर दॅन इट्स एक्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू, देन बॅड मनी ड्राइव्ज गुड मनी आऊट ऑफ सर्कयुलेशन’. याचे थोडे स्पष्टीकरण देतो. समजा चांदीच्या मोहरा चलनात आहेत. एका नाण्याची चलनातील किंमत म्हणजे एक्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू ५ रुपये आहे आणि ते नाणे वजनावर विकले, तर त्याचे १० रुपये मिळतात. ही त्याची ‘इन्ट्रिन्सिक व्हॅल्यू’. अशा वेळी लोक ती नाणी चलन म्हणून वापरण्यापेक्षा त्यांचा साठा करून वजनावर विकतात. आता यासाठी कागदाच्या चलनी नोटांचे उदाहरण कसे लागू पडते? पण ‘सकाळ’ने ते अर्थविषयक पानावर छापले होते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

दै. ‘पुढारी’ हे कोल्हापूरमधील सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र. त्यात तेव्हा छापून आलेले एक वृत्त सांगतो, त्यावरून त्याचा दर्जा कळेल. कोल्हापूरजवळच्या एका गावात एका शाळकरी मुलीवर बलात्कार झाला होता. पोलिसांनी एक तरुण मुलगा आणि एक मध्यमवयीन माणूस, अशा दोघांना संशयित म्हणून अटक केली होती. या घटनेवरून परिसरात मोठा तणाव होता आणि जमावाने संशयितांची घरेही पेटवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना तपासासाठी कोठडीतील संशयितांच्या वीर्याचे नमुने हवे होते. तरुण संशयिताचा नमुना लगेच मिळाला. पण मध्यमवयीन संशयिताचा नमुना लवकर मिळत नव्हता. म्हणून पोलिसांनी चक्क कोठडीत वेश्या आणल्या. तरीही त्याचा नमुना मिळाला नाही. मग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काहीशा तरुण आणि बऱ्या दिसणाऱ्या वेश्या आणल्या. त्यांना पाहून मध्यमवयीन संशयिताच्या वीर्याचा नमुना मिळाला. यावर त्या संशयिताने उपहासाने पोलिसांनाच सुनावले – ‘हे कालच केले असते, तर तुमचा त्रास वाचला असता’. ही निर्लज्ज कथा ‘पुढारी’ने आहे तशी छापली होती.

पुढे मी कामानिमित्त पुणे, दिल्ली, मुंबई येथे गेलो. वाटले होते की, या मोठ्या शहरांमधील पत्रकार मंडळी अधिक अभ्यासू आणि प्रगल्भ असतील. मात्र माझा पुरता भ्रमनिरास झाला.

दै. ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयातील एक अनुभव. एक तरुण महिला सहकारी ‘पीटीआय’कडून आलेल्या बातम्यांचे भाषांतर करत होती. टू-जी घोटाळ्यावरून दंगा होऊन योगायोगाने एकाच वेळी दिल्लीत लोकसभा आणि मुंबईत विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज थांबले होते. यावर तिने अगदी निरागसपणे विचारले – ‘असे ऑटोमॅटिक असते का? इथले कामकाज बंद पडले की, तिकडचेही बंद पडते का?’ याच मॅडमनी नंतर एकदा अशीच शंका विचारली होती. त्या वेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी संबंधित ‘कॅश फॉर वोट’ प्रकरणाची बातमी होती. संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नोटांची बंडले वाटल्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. या बाईंनी विचारले होते – ‘संसदेत अशा नोटा वाटायला अलाऊड आहे?’ यावर काय उत्तर देणार?

ठीक आहे. ही महिला सहकारी निदान बरीच तरुण आणि शिकाऊ होती. याच कार्यालयातील बऱ्याच ज्येष्ठ सहकाऱ्यांची कथा. पदाने बरेच वरचे आणि जवळपास निवृत्तीला आलेले. एका बातमीत ‘सब-सहारन आफ्रिका’ असा शब्द होता. त्याचा अर्थ आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडील सहारा वाळवंटाचा भाग सोडून उरलेली दक्षिणेकडील आफ्रिका. कार्यालयातील या दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांना हे पटतच नव्हते. त्यातील एक - जे ज्येष्ठ संरक्षण विश्लेषक होते - त्यांनी लगेचच हे मान्य केले आणि आपल्याला माहीत नव्हते, अशी प्रांजळ कबुलीही दिली. पण दुसरे - जे न्यायालयाचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार होते - त्यांना ही बाब पटतच नव्हती. त्यांनी यावर तासभर वाद घातला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पहिली गोष्ट म्हणजे समाजातील सर्वांत हुशार मुले किंवा मुली (cre'me de la cre'me) पत्रकारितेच्या व्यवसायात येत नाहीत. कारण येथील आर्थिक मोबदला फारसा आकर्षित करणारा नाही. आजकाल जी मुले येतात, ती बहुतांशी टीव्ही चॅनेल्सच्या झगमगाटाला भुलून आलेली असतात. पत्रकारितेत दोन गोष्टी महत्त्वाच्या - एक, समाजाला सांगण्यासाठी आपल्याकडे वेगळे काहीतरी असले पाहिजे. दोन, ते ज्या माध्यमातून सांगायचे, त्या माध्यमाचे तंत्र अवगत असले पाहिजे.

सध्या मी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात सहयोगी व्याख्याता (गेस्ट लेक्चरर) म्हणून शिकवतो. त्या निमित्ताने पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा पाहायला मिळाला. ही काही उदाहरणे - विविध विषयांतील पदवी घेऊन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आलेली मुले. विषय- ‘विज्ञान पत्रकारिता’ (सायन्स जर्नलिझम). वर्गातील एकाही मुलाला आर्किमिडीजची ‘युरेका, युरेका’ ही गोष्ट माहीत नव्हती. यांना काय ढेकळं ‘सायन्स जर्नलिझम’ शिकवणार? तोंडी परीक्षेत एका मुलानं काय सांगावं – ‘बहिष्कृत भारत’ हे संस्कृत भाषेतील नियतकालिक होते. ही सरकारी शिक्षणसंस्थेतील स्थिती.

आता खासगी संस्थेचं उदाहरण पाहू. संजय घोडावत हे पूर्वी ‘स्टार’ गुटख्याचे उत्पादन करणारे व्यावसायिक. त्यांनी आता कोल्हापूरजवळ खासगी विद्यापीठ उभं केलं आहे. त्यात पत्रकारितेचाही अभ्यासक्रम आहे. काही दिवस तिथं शिकवलं आणि तात्त्विकदृष्ट्या पटलं नाही म्हणून सोडून दिलं. तेथील पहिल्याच बॅचच्या तिसऱ्या वर्षाच्या वर्गातील एकाही मुलाला जॉर्ज फर्नांडिस यांचं नाव माहीत नव्हतं.  तिसऱ्या म्हणजे शेवटच्या वर्षातील मुलांना एका विषयावर सखोल संशोधन करून शोधप्रबंध (थिसिस) सादर करणं आवश्यक होतं. एका मुलानं विचारलं – ‘म्हणजे आता मला बाहेर जावे लागणार?’ ही करोनापूर्व काळातील घटना आहे. आता ही सर्व मुलं पदवी घेऊन बाहेर पडली आहेत. पुण्या-मुंबईतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.

अशा ‘रॉ मटेरिअल’वर (कच्चा मालावर) प्रक्रिया करताना शिक्षणसंस्थांची भूमिका येते. पण त्यांचीही स्थिती दयनीय आहे. (मुळात पत्रकारिता हा शिकवण्याचा विषय आहे की, नाही हा वादाचा मुद्दा आहे.) पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या अगदी नावाजलेल्या - सरकारी आणि खासगी अशा दोन्हीही - संस्थांमध्ये चांगल्या अध्यापकांची वानवा आहे. जे काही नेट, सेट, पीएच.डी. क्वालिफाइड प्राध्यापक आहेत, त्यांचं सैद्धांतिक ज्ञान बरं आहे, पण त्यांना प्रसारमाध्यमांतील कामाचा अनुभव नाही. प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिकवण्याची हातोटी असेलच असं नाही. त्यामुळे शिक्षणसंस्था आणि उद्योगधंदे यांच्यात जी ‘फॉरवर्ड-बॅकवर्ड लिंकेजेस’ असतात, ती या क्षेत्रात जवळपास नाहीत. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मानवी संसाधनांची जशी कमतरता आहे, तशीच अन्य साधनसामग्रीचीही कमतरता आहे. अनेक संस्थांकडे वाचनालय, स्थिर आणि चलत्-चित्रण करणारे कॅमेरे, डिजिटल एडिटिंग लॅब्ज, अशा सुविधाच नाहीत. काही ठिकाणी असल्याच तर त्या धूळ खात पडलेल्या असतात. सर्व तांत्रिक सुविधा शिक्षणसंस्थांकडे असणंही शक्य नाही. काही बाबी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपदरम्यान शिकणं अपेक्षित असतं. पण फार कमी जण ते गांभीर्यानं घेतात. मुलांचा कल कसेबसे दिवस भरून प्रमाणपत्र मिळवण्याकडे असतो.

असे पदवीधर जेव्हा जॉब मार्केटमध्ये येतात, तेव्हा त्यांचं सामान्यज्ञान, विशेष विषयाचं ज्ञान, तांत्रिक आणि भाषाविषयक कौशल्यं या सर्वच बाबी अपुऱ्या असतात. त्यांना नोकरीत सुरुवातीला आणि नंतरही मिळणारे पगार तुटपुंजे असतात. काही तुरळक अपवाद वगळता. स्वतः अभ्यास करून कौशल्यं वाढवण्यात त्यांना फारसा रस नसतो. वरवर काहीतरी काम करून रोजची वेळ निभावून नेण्यातच ते धन्यता मानतात.

विविध प्रसारमाध्यमांत आज जे वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत, त्या मंडळींनीही एकंदर पत्रकारितेत आणि साहित्यात काही फार मोठं योगदान दिलं आहे, अशातला भाग नाही. काही सन्माननीय अपवाद आहेत. पण एकंदर भरणा साहेबाची मर्जी सांभाळत नोकरी टिकवणाऱ्यांचाच आहे. असं करत वर्षानुवर्षं रोजच्या पाट्या टाकत राहिलं आणि व्यवस्थेला आव्हान दिलं नाही की, यथावकाश वरच्या पदावर वर्णी लागते. त्यामुळे आजचे बरेचसे संपादक हे लिहिणारे संपादक नाहीत, तर ‘फिक्सर एडिटर’ झालेले आहेत. पूर्वी कधीतरी बातमीदारी करत असताना जे राजकीय लागेबांधे निर्माण झालेले असतात, त्यांचा वापर करून मालकाची सरकारदरबारी तटलेली कामं करून देणं, हीच काय ती त्यांची कामगिरी उरली आहे. अथवा अनेक संपादक आज ‘ग्लोरीफाइड प्रुफ-रीडर’ बनले आहेत.

उप-संपादकांच्या अंगावर भाषांतर, मुद्रितशोधन, संपादन, पानांचा लेआऊट करणं, अशी अनेक कामं टाकून त्यांचा ‘यंत्रमानव’ करून टाकला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे कार्यालयात मी कामाला होतो. त्यांच्या शिक्षणविषयक प्रकाशनात माझी नेमणूक होती. पद होतं, ‘कॉपी एडिटर’. पण लवकरच लक्षात आलं की, त्यात कॉपी एडिटिंगचा भाग कमी आणि कॉपी-पेस्टिंगचा भाग जास्त होता. त्यामुळे मी गमतीनं स्वतःला ‘कॉपी-पेस्टर’ म्हणू लागलो. दिल्लीहून आलेली पानं पुण्याच्या गरजेनुसार बदलून छपाईसाठी पाठवावी लागत. म्हणजे त्यात केवळ पुणे-स्पेसिफिक चेंजेस करायचे असत. पुढे-पुढे मला याची इतकी सवय झाली की, मोजून सहा मिनिटांत मी एक पान हातावेगळं करत असे. कामात इतका यांत्रिकपणा आला होता की, मी आता स्वतःला ‘कॉपी-पेस्टर’ नव्हे, तर ‘मास्टर-पेस्टर’ म्हणू लागलो होतो - जसं सचिन तेंडुलकरला ‘मास्टर’ ब्लास्टर म्हणतात तसं!

टीव्ही चॅनेल्सबद्दल तर बोलायलाच नको. अर्णब गोस्वामीसारखे अँकर आणि निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांच्यासारखे पॅनेलिस्ट बोलतात किंवा ओरडतात असं म्हणणंही चुकीचं आहे. प्रत्यक्षात ते भुंकतात. नुसते भुंकत नाहीत, तर ते काम मूळ ज्या श्वान प्रजातीचे आहे, त्यांनाही लाजवतात.

पत्रकारांचं वेतन तुटपुंजं आहे. कॉन्ट्रॅ्क्ट पद्धतीमुळे नोकरीची शाश्वती नाही. नोकरीत पगारवाढीची आणि पदोन्नतीची व्यवस्था पारदर्शक आणि खात्रीची नाही. कामाच्या वेळा अडचणीच्या आहेत. कामाच्या ठिकाणी आणि घरून येता-जाताना  मिळणाऱ्या सुविधा तोकड्या आणि निकृष्ट आहेत. पत्रकारांना मालक पुरेसा पगार देत नाही, साहेब सुटी देत नाही, बँका कर्जे देत नाहीत आणि मुलींचे बाप मुलगी देत नाहीत, अशी एकंदर अवस्था आहे. बाजारातील दरानं घर विकत घेता येत नाही. त्यातून पळवाट म्हणून ‘म्हाडा’ किंवा ‘सिडको’च्या लॉटरीत सवलतीच्या दरात घरं मिळवली जायची. आता त्यांचे दरही जवळपास बाजारभावाशी मिळतेजुळतेच झाले आहेत. शिवाय हव्या त्या ठिकाणी घर मिळेल याची खात्री नाही. आता तर ज्यांनी अशी घरं घेतली आहेत, त्यांना बँकेच्या कर्जाचे हप्ते भरणंही मुश्कील झालं आहे. कार्यालयात आत्मसन्मान गहाण ठेवून कुटुंब चालवण्यासाठी, मुलाच्या शिक्षणाची, मुलीच्या लग्नाची आणि आपल्या म्हातारपणाची सोय करण्यासाठी पत्रकार कसेबसे दिवस ढकलत आहेत. आणि ‘चौथा स्तंभ’ म्हणून लोकशाहीचं ओझं वाहत असल्याचं उसनं अवसान आणत आहेत.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

करोनानं या अडचणींत भरच टाकली आहे. खर्च आणि नफ्याचा ताळेबंद बसत नसल्यानं अनेक वर्तमानपत्रं बंद पडली आहेत. जी सुरू आहेत, त्यात नोकर आणि पगार कपात केली गेली आहे. पगार केव्हा पूर्ववत होणार, याची काही शाश्वती नाही. पगारवाढीचं तर बोलूच नका. हळूहळू वाचकांची वर्तमानपत्रं विकत घेऊन वाचण्याची सवय मोडू लागली आहे. खप कमी झाले आहेत.

एकीकडे पारंपरिक माध्यमं बंद पडत असताना ऑनलाइन पोर्टल्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि यू-ट्यूब चॅनेल्स आदी वाढत आहेत. पण तिथंही नफ्याची किंवा कमाईची गणितं वाटतात तितकी सोपी नाहीत. बरं, पारंपरिक माध्यमं सोडून तिकडे जावं, तर सगळ्यांकडे ती कौशल्यं आणि नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी किंवा क्षमता आहे, असंही नाही. ‘ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ऑन द अदर बँक ऑफ द रिव्हर’.

वर्तमानपत्रामधील नोकरीचा कंटाळा आला की, थोड्या बऱ्या पगाराच्या अपेक्षेनं पीआर (पब्लिक रिलेशन्स - जनसंपर्क) किंवा अ‍ॅड (जाहिरात) एजन्सीत नोकरी मिळवणं, हा पत्रकारांचा जुना उद्योग. पण आता तिथंही कुत्रं हाल खात नाही. ज्या कॉर्पोरेट जगताच्या भरवशावर हे क्षेत्र चालत होतं, त्यांच्याकडेच आता पैसा उरलेला नाही. मग अ‍ॅड आणि पीआर बजेटमध्ये कपात होणं साहजिकच आहे. त्यातही बरेच पत्रकार आता उघडपणे राजकीय नेत्यांचे जनसंपर्क अधिकारी बनले आहेत. 

याला जसे पत्रकार स्वतः जबाबदार आहेत, तसेच प्रसारमाध्यमांचे मालक आणि प्रशासनही जबाबदार आहे. बहुतांश प्रसारमाध्यनं राजकीय नेत्यांच्या मालकीची आहेत किंवा त्यांचे मालक कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारधारेच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून समाजसुधारणेसाठी काही भक्कम घडेल, अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

जांभेकर, टिळक-आगरकरांची पत्रकारिता आता राहिली नाही, हे मान्य. वर्तमानपत्र हे आता एक विकाऊ ‘प्रॉडक्ट’ बनलं आहे. त्याच्याकडून समाजसुधारणेची अपेक्षा बाळगणं अनाठायी. आता पत्रकारितेची उद्दिष्ट्यं काय, तर ‘टू इन्फॉर्म, एज्युकेट अँड एन्टरटेन’. त्यातही ‘इन्फॉर्म’ आणि ‘एन्टरटेन’ हे एकत्र करून ‘इन्फोटेनमेंट’ हा प्रकार चालू आहे. तोही अगदी सुमार दर्जाचा.

मग यावर उपाय काय? पुढील मार्ग काय?

माध्यमं यापूर्वीही अनेक स्थित्यंतरांतून गेली आहे. रेडिओ आल्यानंतर वर्तमानपत्रं, मासिकांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. टीव्ही आल्यावर अशीच शंका घेतली गेली. पुढे इंटरनेट आल्यावरही तेच. पण प्रत्येक वेळी माध्यमं बदल स्वीकारत टिकून राहिली. त्यांचं स्वरूप बदललं, पण ती संपली नाहीत, त्यांची गरज संपली नाही. जाहिरातींवर आधारित माध्यमांचं प्रारूप आता संकटात आलं आहे. त्यासाठी नवे पर्याय तपासून पाहिले जात आहेत. उदा., ‘सब्स्क्रिप्शन-बेस्ड मॉडेल’. त्यात दर्जेदार पत्रकारितेसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील. माध्यमांच्या मालकीच्या मॉडेलमध्येही बदल करावे लागतील. स्थित्यंतराच्या या धुक्यात भविष्याचं चित्र सुस्पष्ट दिसत नाही, पण माध्यमं त्यातूनही तगतील. कारण ‘गोष्ट सांगणं’ (द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग) हा माध्यमांचा आत्मा आहे. भविष्यातही समाजाला गोष्टींमध्ये रस असणारच आहे. ती सांगण्याच्या पद्धतीत केवळ बदल होत आहेत...

.................................................................................................................................................................

लेखक सचिन दिवाण मुक्त पत्रकार आहेत.

sbdiwan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......