परशुराम गंगावणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर गुढीपूर-पिंगुळी इथं ठाकर आदिवासी पारंपरिक कलांनी ओतप्रोत असं देशातलं एकमेव वस्तुसंग्रहालय उभारलंय. त्याचं नाव ‘विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण’. त्याच्या माध्यमातून ठाकरी कलेचं जतन, संवर्धन व प्रशिक्षण देण्याचं काम गंगावणे गेली ४०-४५ वर्षं करत आहेत. या योगदानासाठी त्यांना नुकतंच केंद्र सरकारनं ‘पद्मश्री’ या पुरस्कारानं गौरवलं आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या या संग्रहालयाची ओळख करून देणारा हा खास लेख...
..................................................................................................................................................................
फुलझाडांची दाटी… स्वच्छ हवा.. मस्त श्वास. उंचच उंच वाढलेले काही ताठ माड. काही कमरेत वाकलेले. या माडांवर चितारलेली रंगीत चित्रं. अगदी पहिल्या माडावर अर्थातच श्री गणेश, त्यानंतर रिद्धी-सिद्धी, सीतेच्या स्वयंवरासाठी पोहोचलेल्या ३३ कोटी देवदेवता, हातात वरमाला घेऊन उभी सीता व श्रीराम, विश्वामित्र आणि वाल्मिकी रामायणातील प्रसंग. हे सगळं पाहत थोडं पुढे डोकावलं की, या दाटीत दिसते एक आदिवासी झोपडी म्हणजे खोप. खोपीत डोकावलं की, दिसतात एक ठाकरी आजी-आजोबा कामात गढून गेलेले. डाव्या बाजूला दिसतात मडके, सोरकूल माल्ती, गोली, बुडकुला, शिकं, जानं, टोपली, वाईन-मुसळ अशी स्वयंपाकघरातली साधनं. गिर्हाट (भातसडीसाठीचं साधन), आकडी, कोयताशिवाय मासेमारीसाठी खून व कंडाळं, जू-नांगर, शिपनी, रुमनी ही शेतीची साधनं उजव्या भागावर नजर टाकली की, सहज दिसतात. बांबूपासून बनवलेली रवळी आणि उकड्या तांदळाची उकड काढून नूडल्ससारखा पदार्थ करण्यासाठी याच भागात ठेवलेला शेवगा आपलं लक्ष वेधून घेतो. खोपीचं छत नळ्यांचं आहे... तिथल्या बाजेवर कांबळ आहे, भिंतीवर हाताची बोटं चुन्यात बुडवून काढलेलं नागोबाचं चित्र आहे. आजी सूप घेऊन गृहकृत्यात रमलेली दिसते तर आजोबा पुढची कामं काय आटपायची आहेत, याचा विचार करत घुरगडीमध्ये (हुक्का) रंगलेत.
खोपीच्या पुढे छोट्याशा पायवाटेनं आत जातानाच नंदीबैलाची प्रतिकृती तिच्या मालकासह आपले स्वागत करते. याला म्हणतात पांगुळबैल. तिथून आणखी थोडं पुढे गेल्यावर दिसतं शेजारी शेजारी दारं असलेलं एक बैठं घर. मातकट रंगाचं. घरासमोरचं अंगण लाल मातीत नीट चोपून घेतलेलं. घराच्या दोन्ही दरवाजांपुढे जुन्या पद्धतीत असायचे तसे बसायला सिंहासनासारखे सुबक कट्टे… घराचं छप्पर नळ्यांनी नटलेलं. बाह्यदर्शनीच मोह पाडणार्या या छोट्या घरात आहे तरी काय याची उत्सुकता शिगोशीग वाहू लागते… आणि ही उत्सुकता शमवण्यासाठी मग येतात या ‘विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण’चे शिल्पकार परशुराम गंगावणे व त्यांचे चिरंजीव चेतन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर गुढीपूर-पिंगुळी येथे ठाकर आदिवासी पारंपरिक कलांनी ओतप्रोत असं हे देशातलं एकमेव वस्तुसंग्रहालय.
परशुराम गंगावणे आपल्या सहकाऱ्यांसह
या चिमुकल्या वस्तुसंग्रहालयात प्रवेश करताना अगदी सुरुवातीला ठाकरांच्या देवाला हिरोबाला नमन करून आपले डोळे व कान ‘कला आंगणा’च्या प्रवासाला सिद्ध होतात आणि ठाकरांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी चेतन गंगावणे भिंतीवर लावलेल्या चित्रांकडे बोट दाखवतात आणि सांगू लागतात...‘‘रेडिओ, टीव्ही, सिनेमे दाखवणारे फिरते तंबू, सर्कशी असं काही काहीच नव्हतं त्या काळाबद्दल सांगतोय मी तुम्हाला. वीजही नव्हती पोहोचली तेव्हा खेड्याखेड्यात. त्या काळात रात्रीची जेवणं-खावणं संपली की, लोक एकत्र जमायचे, गप्पा मारायचे, त्यातून थोडं मनोरंजन चालायचं. गोष्टी सांगण्याची आणि ऐकण्याची रीत तर फार फार जुनी. त्या काळात गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहाव्या म्हणून आमच्या पूर्वजांनी, ठाकरांनी एक कल्पना शोधली. त्यांनी झाडांच्या पानांचा, विविध रंगांच्या फुलांचा, रानभाज्यांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार केले आणि ते हातांनीच घडवलेल्या कागदांवर थापले. हे रंग वाळल्यावर मग त्या रंगवलेल्या कागदावर शरीराचे आकार, नाक, डोळे, झगे, उपरणी चितारली. राजा, राणी, राक्षस, पर्या, लहान मुलं, जंगलातले प्राणी-पक्षी असं सगळं उतरू लागलं आणि पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये जणू प्राण ओतला जाऊ लागला. याच गोष्टी तुम्हाला समोर भिंतीवर लावलेल्या चित्रात न सांगताही वाचता येतील पाहा. या चित्रात रामायण-महाभारतातल्या गोष्टी आहेत, नंदीपुराणातील गोष्टी आहेत. चित्रावरून गोष्ट सांगण्याच्या या पुरातन कलेलाच ‘चित्रकथी’ म्हणतात...
साधारण २५ ते ३० चित्रांची एक पोथी म्हणजे एक गोष्ट. यात मुख्य गायक हरदासी पद्धतीनं कथागायन करतो व सहकारी कथानाट्य उभाण्यासाठी झांज, वीणा आणि हुडूक (डमरू) यांचा ताल धरून गोष्ट रंगवून सांगायला मदत करतात. चित्रावरून फक्त गोष्ट सांगणं, मनोरंजन करणं हाच उद्देश नव्हता बरं काय! हे खेळ करणारे ठाकर लोक बहुतेकदा राजाचे गुप्तहेर म्हणून काम करायचे. ते गावागावात जाऊन तिथं काय चाललंय, नवीन काही घडतंय का किंवा घडलंय का, याचा अदमास लोकांच्या बोलण्यातून घ्यायचे. आणि या खबरी राजाजवळ येऊन त्याला सांगायचे. यामुळे नवी धोरणं आखताना राजांना त्याचा फायदा व्हायचा. ठाकर लोक मुळात भटके. गावागावात जायचं, कला सादर करायची आणि बक्षिसी म्हणून जे अन्नधान्य, कपडेलत्ते मिळतील ते घेऊन चालू लागायचं पुढच्या गावाच्या रोखानं हेच त्यांचं जीवन. यामध्ये फरक पडला तो विशेषत: शिवकाळात ठाकरांना वर्षासनं देणं सुरू झाल्यानंतर!’’
‘कला आंगणा’तील दालनाच्या दोन्ही खोल्यांमध्ये मिळून २० चित्रं पाहायला मिळतात. ही चित्रं किमान ४००-५०० वर्षं तरी जुनी आहेत. तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हा चितारलेली ही समृद्ध चित्रं ठाकर कलेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची ओढ वाढवतात. या ‘कला आंगणा’चे निर्माते परशुराम गंगावणेंकडून कळलं की, याच चित्रकथीतली काही चित्रं पुण्याच्या केळकर वस्तुसंग्रहालयामध्ये आहेत. अशी आणखी ६०० ते ७०० चित्रं आहेत त्यांच्याकडे. या चित्रांना स्वच्छ करून ठेवणं, वाळवीपासून वाचवणं, फ्रेम करुन सुरक्षित ठेवणं, याचा खर्च परवडण्यासारखा नसल्यानं किमान जुनी ठाकर आदिवासी कला लोकांना कळावी म्हणून संग्रहालयात केवळ २० चित्रंच त्यांनी पदरमोड करुन लावली आहेत. अर्थात हे संग्रहालयही त्यांनी खूप कष्टानं, स्वत:चं होतं नव्हतं ते सगळं विकून आणि काही दर्दी देणगीदारांच्या मदतीनं उभारलं आहे. ज्यांनी ‘कला आंगण’ उभारण्यासाठी मदत केली, त्यापैकी काही महत्त्वाची नावं सांगायची तर कल्चर आंगण, आंगण टीम-सिंधुदुर्ग, सिबार्ट-काँबॅक, रश्मी सावंत, रमेश कुबल ही नावं आवर्जून घ्यावी लागतात.
पिंगुळीच्या ‘कला आंगणा’त फक्त चित्रंच आहेत असं नाही. तिथं एका मेजावर आहे एक जडसा लाकडी ठोकळा आणि त्यावर ठेवलेले स्वयंपाकघरातल्या डावासारखी रचना असणारे दोन ‘डवले’. या डवल्याचा पुढचा वाटीसारखा भाग नारळाच्या अर्ध्या करवंटीचा आणि त्याला भोक पाडून लाकडी दांडा जोडलेला. चेतन म्हणाले, ‘‘ठाकरी कलेचा हाही एक भाग. या डवल्यांचा खालचा भाग सागवानी डोण्यावर घासून जो विशिष्ट आवाज निघतो, त्या लयीवर गणपतीच्या दिवसात आमच्याकडच्या बाया गाणी म्हणतात. त्याला ‘डोणागीत’ म्हणतात. गणपतीची सकाळची नवी पूजा बांधण्याअगोदर त्याला झोपेतून जागं करण्यासाठी पहाटे किंवा सकाळी अगदी लवकर डोणागीत गाण्याची आमच्याकडे प्रथा आहे.
ऊठ ऊठ रे माळीदादा - बैल जूप रे राटाला
पाणी जाऊदे पाटाला… काय - केगदी बनाला
केगदीच्या केगाद काय - गणपतीच्या पूंजेला
गणपतीच्या पूंजेला काय - गौराईच्या वंशाला
गौराईचा वंश गे - फुलाने डळमळले
फुलांनी डळमळले… काय - वासांनी परमळे
अशा प्रकारे असंख्य रचना गाण्यांमध्ये गुंफून बाया ‘डोणागीत’ गातात… तुमच्याकडे जशी ‘काकडआरती’ तसंच हे!’’
समोरच्या टेबलावरची पारंपारिक वाद्यं पाहत असताना लक्ष वेधून घेत होती अगदी समोरची भिंत… या भिंतीचा भाग व्यापलाय विविध रंग व वेषभूषेच्या कळसूत्री बाहुल्यांनी! राजस्थानी कठपुतळींशी पिंगुळीची कळसूत्री बाहुली नातं सांगते. कळसूत्री बाहुल्यांना नाचवून पुराणकथा सांगताना समोर मृदुंग, तबला, तुणतुणे, झांज आणि हातपेटीच्या सुराने साथीदार गोष्ट अधिक रंगतदार करतात. मुख्य सूत्रधार जमिनीपासून तीन फूट उंचीवर आणि चार बाय आठच्या स्टेजवर एका वेळी चार बाहुल्या म्हणजे गोष्टीतली पात्रं नाचवत लोकांना गुंगवून ठेवतो. कातडीपासून बनवलेल्या छाया बाहुल्यांचा म्हणजेच शॅडो पपेटसचा खेळ करणंही हेही मोठ्या कौशल्याचं काम.
यात बाहुलीची पाठीमागची बाजू हेही एक नवं पात्र म्हणून वापरलं जातं. या खेळात पूर्वी पडद्याच्या मागे तेलाचा दिवा लावून त्याच्या प्रकाशात बाहुल्यांच्या छाया कौशल्यानं नाचवून गोष्ट सांगितली जायची. यात गोष्ट सांगताना वापरलं जाणारं घरगुती वाद्य मोठं मजेशीर आहे. ठाकर लोक जेवायला काशाचा जो मोठा थाळा किंवा ‘वाटा’ वापरायचे, त्याच्या पाठीमागच्या बाजूला मेणाचा थर देऊन त्यावर भेंडीच्या काठीनं वाजवून ताल देत छाया बाहुल्या नाचवल्या जातात.
‘कला आंगणा’च्या दुसर्या दालनात पांगुळबैलाचे दागदागिने मोठ्या कलात्मक रीतीनं भिंतीवर सजवलेले दिसतात. त्याबद्दल विचारल्यावर चेतन म्हणतात, ‘‘पांगुळ म्हणजे ठाकर समाजातली हा विशिष्ट खेळ करणारी पांगुळ आडनावाची माणसं. त्यांच्यासोबतचा नंदीबैल हा साक्षात शंकराचा नंदीबैल आहे, असा गावात श्रद्धाभाव आढळतो. हा बैल भाषिंग, उपलान, घ्याज, भरडा, ड्याज, खानवटी, मूट, वाघनखं, या दागिन्यांनी सजवलेला असतो. त्याच्या पाठीवर मोरपीसंही लावलेली असतात. सदरा, उपरणं, धोतर, फेटा असा वेष घातलेला पांगुळ गळ्यातली ढोलकी एका हातानं व दुसर्या हातात नेवर्या घेऊन वाजवतो आणि लोकांसाठी गाणं गात प्रार्थना करतो. या बैलाला निरनिराळे खेळ शिकवलेले असतात. या नंदीला घेऊन पांगुळ दारोदारी जातात, तेव्हा लोक मेलेल्या नातेवाईकांच्या नावानं पांगुळाला दान देतात. ते दान त्या मृत व्यक्तीला पावतं अशी लोकांमध्ये समजूत आहे.’’
..................................................................................................................................................................
ठाकरी कलापरंपरेचा वारसा म्हणून जपलेल्या चित्रकथीतील ६००-७०० चित्रांची काळजी घेण्यासाठी, ती टिकावीत म्हणून त्यावर योग्य रासायनिक संस्करण करण्यासाठी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयानं परशुराम गंगावणे यांना प्रत्येक चित्रामागे सुमारे तीन ते चार हजार खर्च सांगितला आहे. हे कला आंगण उभारण्यासाठीसुद्धा वणवण सोसावी लागणार्या गंगावणेंना इच्छा असूनही इतका खर्च कसा जमणार?
..................................................................................................................................................................
नव्या पिढीचा प्रतिनिधी चेतन माहिती देताना रंगल्याचं पाहून परशुराम गंगावणेंच्या चेहर्यावर विलक्षण समाधान झळकतं आणि खास ठाकरी कलेविषयी ते पुढे सांगू लागतात, ‘‘पोतराज म्हणजे भवानीमातेचा भक्त- पोत म्हणजे ज्योत. ठाकर त्याला दिवटी म्हणतात. काळे कपडे, कवड्यांच्या माळा व कवड्यांनी मढवलेली त्रिकोणी काळी टोपी, पायात घुंगरु या वेशातला पोतराज देवीची गाणी गातो व सोबत नृत्यही करतो. या नृत्याला संबळ, तुणतुणं, झांज यांची साथ असते. लोकांचं कल्याण व्हावं म्हणून पोतराज स्वत:ला दिवटीनं जाळून घेतो. लोकांच्या, गावाच्या कल्याणासाठी नाचत गात तो देवीला आळवतो. आत्मार्पण करतो जणू! लोकांच्या भावनेला स्पर्श करणारा हा कलाप्रकार विशेष लोकप्रिय आहे.
महाराष्ट्राचा कुळाचार समजला जाणारा गोंधळही थोडा याच प्रकारात मोडणारा. ज्या गावात गोंधळ घालायचा त्या गावातील पाच घरात गोंधळी जोगवा मागतात आणि नंतर गोंधळ घालतात. साथीदार पारंपारिक वाद्यांसह ‘उदे उदे ऽऽ’ म्हणून देवीचा उदेकार करतात. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत भवानीचा गोंधळ घालण्याचं वर्षासन इतिहासकाळापासून अगदी आजपर्यंत पिंगुळीच्या ठाकरांकडे आहे. एकेकाळी अस्पृश्य म्हणून ठाकरांना गावातल्या घरांमध्ये, देवळांमध्ये प्रवेश नव्हता. सिंधुदुर्गचे राजे वाडकर सावंतांनी दसरा महोत्सवाच्या वेळी चित्रकथीचे खेळ करण्यासाठी मानानं आदिवासी ठाकरांना आवतण दिलं, तेव्हापासून गुढीपूर पिंगुळीच्या बाकीच्या अकरा वाड्यांनीही ठाकरांना आपल्यात सामावून घेतलं, त्यांच्या कलेला आदरानं पाहायला सुरुवात केली. या सगळ्याच कलांना जाणून घेऊन त्याचं प्रात्यक्षिकही पाहाण्याची इच्छा असणार्या पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आम्ही खास शो करतो, फक्त एक दिवस आधी कळवलं की झालं! साधारण २५ कलाकारांचा आमचा एक ग्रुप आहे.’’
ठाकरांच्या पारंपरिक लोककला, हस्तकला, नृत्याचे व नाट्याचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार, अशा ठेव्याचं जतन करून महाराष्ट्रभरात ही कला पोहोचवण्याचं काम सातत्यानं केल्याबद्दल महाराष्ट्र शासनानं २००९मध्ये परशुराम गंगावणे यांचा राज्य पुरस्कार प्रदान करून गौरव केला आहे. या सगळ्या कला एकत्र आणून विश्राम ठाकर आदिवासी समाजाचे महाराष्ट्रातलं पहिलं वस्तुसंग्रहालय उभारण्याचं श्रेय गंगावणे यांना जातं.
गंगावणे खरं तर कोकण रेल्वेसाठी काम करता करता दुसरीकडे लोककला जपणुकीसाठी धडपडत होते. हे करत असताना एक दिवस स्कूटर अपघातात परशुराम गंगावणे कायमचे जायबंदी झाले. एक पाय कायमचा अधू झाला आणि चालताना आधारासाठी काखेत कुबडी आली... पण म्हणून लोककला जपण्याचा वसा त्यांनी टाकून दिला नाही; उलट अधिक जोमानं काम सुरू केलं. आवश्यकतेनुसार भारतभर भ्रमंती केली. गुरू-शिष्य परंपरेतून ठाकरी कलेचं जतन, संवर्धन व प्रशिक्षण देण्याचं काम गंगावणे गेली ४०-४५ वर्षं करत आहेत. ठाकर आदिवासी समाजाची मूळ कला आणि स्थानिक लोकांची कला यांच्यात देवाणघेवाण व्हावी, यातून नवी माणसं व कलाकार जोडले जावेत, हा गंगावणेंच्या कामाचा मूळ गाभा. ठाकरी कला, त्यातलं वैविध्य आणि त्या दुर्मीळ होत जाणं, याबद्दल माणसांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, यातून हा समृद्ध वारसा जपण्याची जाणीव वाढीस लागावी, यासाठीच परशुराम गंगावणे यांनी ‘विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणा’ची सुरुवातही २००६पासून केली आहे.
..................................................................................................................................................................
ठाकर आदिवासी समाजानं परंपरेनं जतन केलेल्या आणि वारसा म्हणून स्वीकारलेल्या ११ महत्त्वाच्या कलांपैकी चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या (झायती), कातडीपासून बनवलेल्या बाहुल्या (लेदर पपेट), पांगुळबैल, गोंधळ, पोवाडा, डोणागीत, पोतराज, राधानृत्य या काही मोजक्या कला. या कला जपण्यासाठीच गेली ४०-४५ वर्षं गंगावणे कुटुंब आणि मित्रमंडळ भारतभर फिरून या कलांचं प्रात्यक्षिकांसह प्रदर्शन भरवत आहे. नागोठण्याला झालेला ‘कोकण क्राफ्ट अॅन्ड चिल्ड्रन’ मेळा, त्याआधी पणजीमध्ये सजलेला क्राफ्ट बझार, मध्य प्रदेश आदिवासी लोकला परिषद, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, नॅशनल फोक लोअर सपोर्ट सेंटर, चेन्नई यांसह असंख्य प्रदर्शनं, कार्यशाळा, चर्चासत्रं आणि समारंभांमध्ये ‘विश्राम आदिवासी कला आंगण’ने आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. एड्स, ग्लोबल वॉर्मिंग, कॅन्सर, आरोग्य शिक्षण या प्रश्नावर प्रभावी काम करण्यासाठीही या ठाकर कलेचा प्रभावी उपयोग करता येतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कामातून सिद्ध केलं आहे. हे सगळं करण्याचा हेतू आहे - लयाला चाललेली ठाकर कला जिवंत राहावी, तिचं मोल सगळ्यांना कळावं व नव्या पिढीतून हा वारसा सांभाळणारी मनं घडावीत!
..................................................................................................................................................................
ठाकरी कलेत पारंगत असणार्या सर्व ठाकर कलाकारांनी एकत्र येऊन कलेचं महाराष्ट्रभर सादरीकरण करावं, सादरीकरणाच्या मूळ परंपरा राखून नव्या काळाशी सुसंगत, असे विषयातले बदल स्वीकारावेत आणि नव्या कलाकारांना उत्तेजन मिळावं, असंही परशुराम गंगावणे यांना मनापासून वाटतं. ठाकरी कलेच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळत गेल्यास विस्मृतीत चाललेली पण मोठा वारसा असणारी ही कला देशाच्या पाठीवर कुठे ना कुठे सादर होत राहील आणि जागतिक स्तरावरच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्येही ठाकरी कलेला स्वत:चं असं स्थान मिळू शकेल, असा विश्वास गंगावणे यांना वाटतो आणि तो हळूहळू खराही ठरतो आहे.
मध्यंतरी परदेशातील काही पाहुणे ठाकरी कलेची माहिती घेण्यासाठी आवर्जून ‘कला आंगण’मध्ये आले. इथं असलेल्या निवासव्यवस्थेचा लाभ घेऊन त्यांनी ठाकरी कलेविषयी जाणून घेतलं. आता हळूहळू वेगवेगळ्या दूरदर्शन वाहिन्यांचं लक्ष पिंगुळीकडे वेधलं जाऊ लागलं आहे. ‘कला आंगण’ कोकणच्या पर्यटन नकाशावरही हळूहळू ठळक होत आहे, पण ही कला आणि चित्रकथीतील चित्रं मूळ स्वरूपात जपण्यासाठी एखादी सर्वंकष योजना आखण्याची आणि ती राबवण्याकरता केंद्र व राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यानं आवश्यक त्या अर्थसहाय्य व तांत्रिक मदतीसह गंगावणे कुटुंबीय आणि ‘कला आंगण’ च्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे.
कलाकार आणि अभ्यासकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्याचं काम ‘विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणा’मार्फत वर्षभर चालतं. यासाठी परशुराम गंगावणे देशभर दौरेही आखतात. या कार्यशाळेत ठाकरी चित्रकलेच्या वेगवेगळ्या शैली व थिएटर आर्ट याविषयी माहिती देणं, संशोधनासाठी मदत करणं आदी बाबींचा समावेश असतो. याशिवाय गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांमध्ये तिथल्याच कलाकारांना तयार करून गावातील उत्सव, जत्रा, घरगुती मोठे कार्यक्रम, यांमध्ये ठाकरी परंपरागत कलांना व्यासपीठ मिळण्याबाबत उत्तेजन देण्याचं कामही ‘कला आंगण’ करते.
यासाठी आपण पिंगुळी (गुढीपूर), ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग – ४१६५२० (दूरध्वनी- ०२३६२-२२२३९३\९९८७६५३९०९) इथं नक्की संपर्क साधू शकता.
..................................................................................................................................................................
लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.
sonali.navangul@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment