ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या ‘शोध नेहरू-गांधी पर्वाचा’ या पुस्तकात मोतीलाल नेहरू ते राहुल गांधी या पाच पिढ्यांची, सव्वाशी वर्षांची अविरत राजकीय वाटचालीचा इतिहास आहे. त्याचबरोबर या काळातल्या काँग्रेसचा आणि भारताचाही. नुकतेच हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
१.
हा ग्रंथ अरविंद पाटकर यांच्या पुढाकाराने ‘मनोविकास’तर्फे प्रकाशित होत आहे. यात एक ऐतिहासिक आणि व्यावहारिक औचित्य आहे. ‘मनोविकास’चा आणि पाटकरांचा प्रवास नेहरू कुटुंबाच्या (घराण्याच्या!) राजकीय प्रवासाला अगदी समांतर राहिला आहे.
व्यक्तिश: माझा आणि पाटकरांचा परिचय साधारणपणे १९६७ ते १९६९ या काळातला आहे. कॉम्रेड डांगे यांच्या कामगार चळवळीतील व कम्युनिस्ट नेतृत्वाच्या, त्यांच्या राजकारणापासून प्रेरणा घेतलेले जे तरुण तेव्हा लालबाग-परळ परिसरात, गिरणगावात होते, त्यांत जसे अरविंद पाटकर होते, तसेच मी आणि माझे काही मित्रही होतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
तो काळ इंदिरा गांधींच्या चैतन्यमयी कारकिर्दीने भारलेला होता. काँग्रेस पक्षाची १९६७च्या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली होती. त्या वेळेस लोकसभा व देशातील सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी होत असत. देशातील आठ राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली होती. तामिळनाडूमध्ये द्रमुक; केरळमध्ये कम्युनिस्ट; बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत संयुक्त आघाड्या, बंगालमध्ये डाव्यांचा समावेश असलेली आघाडी असे. नवे, ‘काँग्रेसविरोधा’चे राजकारण सुरू झाले होते.
राममनोहर लोहियांच्या ‘विचारसरणी-रहित’ पण काँग्रेसविरोधी आघाड्या निर्माण झाल्या होत्या. लोहियांनी तेव्हाच देशाला ‘काँग्रेसमुक्त’ करण्याचा विडा उचलला होता. इंदिरा गांधी म्हणजे एक ‘गूंगी गुडिया’ आहे, असे त्यांचे मत होते. ‘नेहरूंची कन्या’ यापलीकडे इंदिरा गांधींना स्वत:ची ओळख नाही, स्वत:चे राजकारण नाही, अशी लोहियाप्रणीत समाजवाद्यांची धारणा होती.
परंतु, १९६८ नंतर इंदिरा गांधींनी त्यांची तडफ आणि तडाखा दाखवायला सुरुवात केली.
काँग्रेसमधील प्रस्थापित, प्रतिष्ठित आणि बुजुर्ग नेत्यांनी जेव्हा विरोधी पक्षांशी (म्हणजे जनसंघ, स्वतंत्र, समाजवादी) संगनमत करून इंदिरा गांधींना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांनी त्या कारस्थानांची व्यूहरचना भेदण्याचे ठरवले. काँग्रेसमधील स्वयंभू प्रतिष्ठितांना ‘सिंडिकेट’ म्हणून ओळखले जात असे. इंदिरा गांधींनी ‘सिंडिकेट’ला आव्हान दिले आणि त्यामुळे पक्षात फूट पडली.
तो सर्व नाट्यपूर्ण आणि चित्तथरारक काळ या ग्रंथात प्रभावीपणे आला आहे. नेमके याच काळात इंदिरा गांधींच्या बाजूने उभे राहिले कॉम्रेड डांगे. वर म्हटल्याप्रमाणे पाटकर आणि मी त्या राजकारणाचा भाग म्हणून एकत्र आलो. त्या सर्व संघर्षमय राजकारणाचे वर्णन करण्याची ही जागा नाही.
त्यानंतरचे दशक म्हणजे १९७० ते १९८०ची १० वर्षे देशाला कलाटणी देणारी ठरली. जयप्रकाश नारायण यांना पुढे करून काँग्रेसविरोधाचे (म्हणजे इंदिरा विरोधाचे) राजकारण १९७३नंतर पुन्हा तापवले जाऊ लागले. १९७१च्या निवडणुकीत जी ‘बडी आघाडी’ इंदिरा गांधींच्या विरोधात उभी राहिली होती, तिचा धुव्वा उडाल्यानंतर निष्प्रभ झालेल्या त्या पक्षांना जेपी उर्फ जयप्रकाशांचा आधार मिळाला आणि देशाला ‘काँग्रेसमुक्त’ करण्याचे राजकारण पुन्हा सुरू झाले.
जागतिक आर्थिक आरिष्ट, भारताची बिकट परिस्थिती, खनिज तेलाच्या जगभर वाढणाऱ्या किमती, १९७३चा भीषण दुष्काळ, बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या वेळेस भारत-पाकिस्तान युद्ध, त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या एक कोटी निर्वासितांचा आणि सुमारे एक लाख युद्धकैद्यांचा बोजा, अमेरिकेने उघडपणे घेतलेले भारतविरोधी धोरण-अशा परिस्थितीत देशाला गरज होती समन्वयाच्या राजकारणाची, विद्वेषाची नव्हे; संवादाची, विध्वंसक विसंवादाची नव्हे. पण याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेला देशव्यापी रेल्वे संप आणि जेपींनी दिलेली ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा, यामुळे अरिष्टाचे रूपांतर अराजकात होऊ लागले. त्याला आटोक्यात आणण्यासाठी इंदिरा गांधींना आणीबाणी जाहीर करावी लागली.
पाटकरांनी आणि मी हा काळ अगदी जवळून पाहिला आहे-आणि तोही एकाच नेहरू-इंदिरा-डांगेवादी दृष्टिकोनातून. म्हणूनच, पुढे पाटकरांनी जेव्हा पुस्तक विक्रींचा स्टॉल टाकला, तेव्हा त्यांच्या व्यावसायिक प्रयत्नांना मी व माझे मित्र अरुण साधू यांनी साथ द्यायचे ठरवले. त्यानंतरच्या ४० वर्षांत त्या पुस्तकविक्रीच्या बीजातून ‘मनोविकास’ प्रकाशनाचा वृक्ष उभा राहिला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
गिरणगावाच्या कामगारविश्वात वाढलेल्या अरविंद पाटकर यांनी आपली वैचारिक मुळे तशीच ठेवून या वाढत्या वृक्षाचे जातीने संगोपन केले आहे. केवळ व्यापार-व्यवसाय-विक्री-बाजारपेठ या चक्रात न अडकता पुरोगामी, सेक्यूलर, लोकशाहीवादी राजकारणाची नाळ न सोडता ‘मनोविकास’चा विस्तार केला आहे. म्हणूनच मी सुरुवातीसच म्हटले की, पाटकरांचा ऐतिहासिक आणि व्यावहारिक प्रवास देशाच्या राजकारणाला समांतर राहिला आहे. हे पुस्तक म्हणजे त्या प्रवासाचाच एक भाग आहे.
२.
नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान कोण? दिल्लीच्या राजकीय वर्तुळांमध्ये हा चर्चेचा, कुजबुजीचा आणि प्रशस्त अफवांचा विषय असतो. अगदी करोनाच्या महाभयंकर महासाथीत, भविष्य अंधकारमय दिसत असतानाही! काहींना हा प्रश्न अभद्र वाटतो, पण त्यांच्याही मनात तो असतोच. खरे तर त्यात अभद्र असे काहीच नाही. पंडित नेहरू हयात असताना, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, जगभर त्यांची प्रचंड प्रतिष्ठा असतानाही, ‘नेहरूंनंतर कोण?’ या प्रश्नाची उघड चर्चा होत असे.
वेक्स हॅन्गेन या तत्कालीन ख्यातनाम अमेरिकन पत्रकाराने १९६० ते १९६३ या काळात, भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास केला. पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, स.का. पाटील, कृष्ण मेनन, अशा अनेक नामवंत नेत्यांच्या तसेच मुत्सद्द्यांच्या, पत्रकारांच्या आणि अभ्यासकांच्या मुलाखती घेतल्या. नेहरू हयात असतानाच त्यांनी एक ग्रंथ लिहिला - ‘After Nehru, Who?’. तो ग्रंथ खूपच गाजला, कारण भारतीय राजकारणाचे, काँग्रेस पक्षाचे आणि विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे त्यात सविस्तर चित्रण-विश्लेषण होते. काहींनी त्या ग्रंथावर आक्षेपही घेतले. नेहरू साक्षात पंतप्रधान असताना, अशा मथळ्याचे पुस्तक लिहिणे असभ्यपणाचे आहे, असेही म्हटले. पण त्या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी कुणी केली नाही. हल्लीच्या भाषेत त्या पुस्तकाला कुणी ‘ट्रोल’ही केले नाही. मोबाइल फोन वा व्हॉट्सअॅप संस्कृती त्या काळी नव्हती हे खरे; पण मुख्य गोष्ट म्हणजे, राजकीय मतभेद, वाद-विवाद, चर्चा, या सर्व उदारमतवादी, सहिष्णु आणि खुल्या वातावरणात होत. असो, तर नरेंद्र मोदींनंतर कोण? असा प्रश्न विचारला जाण्यात अभद्र वा अशुभ असे काही नाही, तर भविष्यवेधी व भूतकालीन संदर्भ देऊन विश्लेषण करण्याची ती एक रीत आहे.
भाजपमध्ये एक सुप्त स्पर्धा सुरू आहे. मोदींचा वारस बनण्यात अमित शहा, योगी आदित्यनाथ स्पर्धेत आघाडीवर आहेत. अरुण जेटली व सुषमा स्वराज हयात होते, तेव्हा त्यांची नावे चर्चेत असत. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा हवाला देऊन काहींनी नितीन गडकरींच्या नावाचा पुरस्कारही केला आहे. अखेरचा शब्द नागपूरचा म्हणजे संघाचा राहील, अशी ग्वाही दिली आहे.
या सर्व परिचर्चेत गृहीतक असे की, सत्ता भाजपकडेच राहणार आहे, कारण बऱ्याच अंशी देश ‘काँग्रेसमुक्त’ झालाच आहे. पक्षाच्या एका मेळाव्यात अमित शहांनी तर सांगूनच टाकले आहे की, पुढली किमान ५० वर्षे भाजप हाच पक्ष सत्तेत असेल. काही पत्रकार-पंडितांनी २०२१च्या विधानसभा निवडणुकांनंतर, ममता बॅनर्जींना थेट पंतप्रधानपद बहाल करून टाकले आहे. ममता बॅनर्जींना ‘युपीए’ उर्फ ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे प्रमुख आत्ताच करावे, सोनिया गांधींनी युपीए अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि भाजपविरोधी सर्व पक्षांनी ममतांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे, असे सुचवले जात आहे.
दुसरीकडे शरद पवारांच्या (भक्तसदृश) अनुयायांना, अजूनही पवार हेच पंतप्रधान होऊ शकतात (वा होतील) असे अपेक्षित आहे. पुढील ५० वर्षे फारच दूर आहेत! या घडीला पुढल्या नऊ वर्षांत (रीतसर निवडणुका झाल्यास) म्हणजे २०२४ आणि २०२९मध्ये काय होईल? याचे भाकीत करणेदेखील कठीण आहे. करोनाच्या हाहाकारातून, आर्थिक अरिष्टाच्या खाईतून आपण किती तावून-सुलाखून बाहेर पडू, यावर बरेच काही अवलंबून आहे. ५० वर्षांनंतर म्हणजे २०७०-७१मध्ये काय स्थिती असेल? इतकेच काय, भारतीय स्वातंत्र्याच्या व प्रजासत्ताकाच्या शताब्दीला (म्हणजे २०४७ आणि २०५०) भारतीय राजकारणाचा भौगोलिक नकाशा कसा असेल? याचा वेध घेणे उद्बोधक असले, तरी त्याचा ढोबळ अंदाज करणेही अवघड आहे. राजकीय रंगमंचावर कोण असेल वा कोण तेथून हटेल, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
नरेंद्र मोदी आज ७० वर्षांचे आहेत. प्रजासत्ताकाच्या शताब्दीला ते १०० वर्षांचे झालेले असतील. शरद पवार ११० वर्षांचे, ममता बॅनर्जी ९८ वर्षांच्या आणि राहुल गांधी ८० वर्षांचे असतील. प्रत्येक पक्षाच्या नव्या फळीत कोण असेल? ती व्यक्ती कशा रीतीने, कोणत्या पक्षाच्या माध्यमातून आणि कोणत्या परिस्थितीत, पुढील ३० वर्षांत आपले स्थान निर्माण करू शकेल, हा या प्रस्तावनेचा विषय नाही, तरी तो समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच म्हटले की, भविष्य-वेध घेताना भूतकालीन संदर्भही समजावून घ्यावे लागतात. उदाहरण द्यायचे तर, १९३७ साली जेव्हा देशात प्रांतीय निवडणुका झाल्या, तेव्हा हा देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. तेव्हा कुणीही खात्रीलायकरीत्या सांगू शकत नव्हते की, फक्त १० वर्षांनी म्हणजे १९४७ साली भारत स्वतंत्र होईल! काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदु महासभा असे सारे पक्ष तेव्हा निवडणुकीत उतरले होते. हिंदू-मुस्लिमांमध्ये राजकीय तेढ रुजत होती; पण १० वर्षांनी देशाची हिंस्र फाळणी होईल, असे कुणीही म्हणत नव्हते.
सध्या राजकीय चर्चा व्हॉटसअॅपवर, विद्वत्ता टीव्ही चॅनल्सवर, आत्ममग्नता ब्लॉग्जवर, वाद-वितंडवाद गटा-गटांमध्ये होत असल्यामुळे, गंभीर ऐतिहासिक संदर्भांची फारशी गरज कुणाला भासत नाही. आपल्याकडे प्राचीन-अतिप्राचीन पुराण महाकाव्यांना इतिहास समजण्याची प्रथा पडली आहे. राजकीय संदर्भ-संकल्पनांचा वेध पण थेट रामायण वा महाभारतातूनच घेतला जातो. फार तर काही जण शिवाजी महाराजांचे चरित्र व काळ एवढाच संदर्भ विचारात घेऊन, इतिहासावर भाष्ये करतात. त्यांना जोड असते तथाकथित ऐतिहासिक मालिकांची. या टीव्ही मालिकांमध्ये प्रसंगांची नाट्यमयता सादर करण्याच्या नादात, संदर्भ आणि विश्लेषणच हरवून जाते. उरतात ती फक्त कॅरेक्टर्स!
३.
हे पुस्तक (खरे म्हणजे ग्रंथ) त्या पद्धतीच्या शौर्यगाथा आणि शौर्यकथांमध्ये रममाण होणारे नाही. पुस्तकाचा विषय आणि आशय ‘नेहरू-गांधी कुटुंब’ या चौकटीत असला, तरी त्याचे चित्रपटल अथवा कॅनव्हास सुमारे १२५ वर्षांचा आहे. इंग्रजांच्या राजवटीचा माध्यान्ह, संध्याकाळ, संधिप्रकाश, त्या सत्तेचा सूर्यास्त समय, रात्र-मध्यरात्र आणि त्या अंधारमय रात्रीच्या गर्भात असलेली स्वातंत्र्याची पहाट, हा एक मोठा टप्पा पार करून, सुरेश भटेवरा स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या उभारणीच्या संघर्षात प्रवेश करतात. स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सवाकडे झालेली वाटचाल होताना आलेली चित्तथरारक आव्हाने यांची अर्वाचीन इतिहासाच्या ओघवत्या शैलीत मांडणी करून त्यांनी आपल्यासमोर ठेवली आहे.
अर्वाचीन इतिहासाचे ढोबळपणे आपण दोन टप्पे करूया. पहिला म्हणजे सन १६०० ते १८५७ - म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून १८५७च्या शिपायांच्या बंडापर्यंतचा आणि दुसरा टप्पा त्या बंडापासून भारताला प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा. वर म्हटल्याप्रमाणे आपण आता तिसऱ्या टप्प्यात (१९४७-२०२१-२२.) आहोत. या अर्वाचीन आणि समकालीन इतिहासाचे काही घटक समान आहेत. काही चित्तथरारक, काही धक्कादायक, तर काही धोकादायक! जगात आश्चर्य आणि निर्भर्त्सना, खेद आणि प्रशंसा, कौतुक आणि तिरस्कार अशा परस्परविरोधी भावना ज्या घटकाबद्दल प्रकटपणे व्यक्त केल्या जातात, तो मुद्दा म्हणजे नेहरू-गांधी कुटुंबाबद्दल असलेले कुतूहल आणि विद्वेष!
‘नेहरू-गांधी’ असा संधिप्रयोग आपण जेव्हा एकत्रपणे करतो, तेव्हा त्यात अनुस्यूत असतो, मोतीलाल नेहरू-जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधींचा कालखंड. जेव्हा गांधींचे नाव येते, तेव्हा मात्र त्यात गृहीत धरले जाते इंदिरा गांधी-संजय गांधी, राजीव गांधी ते सोनिया आणि राहुल गांधी यांना. (परदेशात अनेकांना आजही ‘गांधी’ नावाचा संदर्भ फक्त महात्मा गांधींशी जोडला आहे असे वाटते. गंमत म्हणजे आपल्या देशातही काही मंडळी त्यांत आहेत.)
सुरेश भटेवरांनी या काळाचा धावता पण विहंगम, समकालीन आणि सखोल, व्यक्तिसापेक्ष आणि समष्टीसापेक्ष, तसेच उत्कंठावर्धक आणि उद्बोधक, असा ऐतिहासिक पट उभा केला आहे. या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रंगमंचावर नेहरू कुटुंबाच्या सहवासात आलेल्या माणसांचा, तत्कालीन घटनांचा, संघर्षाचा, ताणतणावांचा आणि आव्हानांचा विलक्षण वेधक असा शोध त्यांनी घेतला आहे. एका अर्थाने ही एक ऐतिहासिक कुटुंब-शोधयात्रा आहे. सद्य:स्थितीच्या राजकारणाची मुळे गेल्या सव्वाशेहून अधिक वर्षांत कशी विस्तारली आहेत, याचे ते भेदक उत्खनन आहे. हा प्रदीर्घ शोध आणि उत्खनन आपल्याला सद्य:स्थितीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रचलित राजकारण, समाजकारण यांतला गुंता सोडवण्यास या दृष्टीकोनामुळे मदत होते. म्हणूनच, हा ग्रंथ म्हणजे नेहरू कुटुंबाचा इतिहास, त्यांचा वारसा, त्यांचा विचार, यांपुरता मर्यादित नाही. स्वातंत्र्यपूर्व (अगदी काँग्रेसपूर्वसुद्धा)आणि स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांचा झपाटलेला आढावा आहे.
पंडित नेहरूंचे देहावसान होऊन ५७ वर्षे (२७ मे १९६४) लोटली आहेत, म्हणजे जवळजवळ सहा दशके. इंदिरा गांधींची हत्या होऊनही ३७ वर्षे (३१ ऑक्टोबर १९८४) लोटून गेली आहेत, राजीव गांधींच्या हत्येलाही ३० वर्षे (२१ मे १९९१)झालीत. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, नेहरू-गांधी कुटुंब, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसते. त्यांची धास्तीही वाटते.
नरेंद्र मोदींना त्या कुटुंबाचा उद्धार केल्याशिवाय भाषणच करता येत नाही, धोरण ठरवता येत नाही की, राजकारणही करता येत नाही. मोदी २००२मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून आजपर्यंत पंडित नेहरूंच्या प्रतिमेवर, प्रतिष्ठेवर, व्यक्तिमत्त्वावर त्यांनी इतके विषारी शरसंधान चालवले आहे की, आजकालच्या अनेक तरुण-तरुणींना असेच वाटते की, ‘ते सर्व जण म्हणजे पंडितजी-इंदिराजी-राजीव जणू हयात आहेत आणि भयभीत मोदींच्या सिंहासनाला ते दररोज आव्हान देत आहेत!’
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पंडित नेहरूंबद्दलच नव्हे, तर त्यांचे पिताश्री मोतीलाल नेहरू; इतकेच नव्हे, तर त्यांच्या आजोबांपर्यंत मध्यमवर्गीय द्वेषाची माळ संघपरिवाराने जोडली आहे. गेल्या दहा वर्षांत या विद्वेषाचा वणवा पसरला, हे खरे असले, तरी त्या वणव्याला चेतवण्यात समाजवादी-लोहियावादीही आघाडीवर होते. नेहरूविरोध म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे नेहरू-इंदिरा-राजीव-सोनिया-राहुल यांना विरोध! लोकांसमोर मात्र तो ठेवला जातो, काँग्रेसविरोध म्हणून! काँग्रेसमधील जितके नेते, कार्यकर्ते, आमदार-खासदार पक्षात येतील, तितके भाजप घेत असतो. त्यांना वश करीत असतो, विकत घेत असतो अथवा ब्लॅकमेल करून भाजपची ‘ताकद’ वाढवत असतो. वल्लभभाई पटेल, लालबहाद्दूर शास्त्री ते नरसिंहराव हे भाजपला आपल्या परिवारातले वाटतात. (परंतु राव मंत्रिमंडळातील डॉ. मनमोहनसिंग मात्र शत्रुवत्!) मुद्दा हा की, भाजप आणि संघपरिवार काँग्रेसविरोधी नाही, तर त्यांचा मुख्य विरोध नेहरू-गांधी कुटुंबाला, त्यांच्या समर्थकांना आणि नेहरूवादी विचारसरणीला आहे. त्यांचा हा द्वेष स्वत:बद्दलच्या न्यूनगंडातून आला आहे. त्या कुटुंबाच्या प्रतिष्ठा-प्रतिमेपर्यंत आपण पोहोचतच नाही, असा तो न्यूनगंड आहे.
मोतीलाल नेहरूंचा जन्म ६ मे १८६१चा, म्हणजे १८५७च्या बंडानंतर चार वर्षांनी. मोतीलाल यांचे वडील दिल्लीत पोलीस ऑफिसर होते. १८५७च्या बंडाच्या रणधुमाळीत त्यांचे घर, नोकरी, स्थावर, जंगम, सारे काही धुळीला मिळाले. मोतीलाल यांचे वडील गंगाधर, त्यांचा जन्म १८२७चा. अल्पवयातच त्यांचे निधन झाले- म्हणजे तीस-पस्तिशीत. मोतीलाल यांची बौद्धिक व सांस्कृतिक वाढ ही पित्याशिवायच झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्रतेचे, बंडखोरीचे परिमाण त्याच काळात प्राप्त झाले होते-जो संस्कार पुढे जवाहरलाल नेहरूंवर झाला. खरे म्हणजे, मोतीलाल त्या काळी श्रीमंत म्हणावे अशा कौटुंबिक आर्थिक स्थितीत होते. भरभरून चालणारी वकिली, समाजात प्रतिष्ठा, व्यवसायात मानमान्यता. त्या काळातही त्यांच्या युरोपला भेटी होत असत. गांधीजींच्या प्रभावाखाली येऊन काँग्रेसचे कार्य करण्याची, स्वातंत्र्य चळवळीत झोकून द्यायची, मोतीलाल यांना गरजही नव्हती. ते ऐषारामी जीवन जगू शकले असते. गेल्या १०० वर्षांत, आपल्या देशातले लाखो लोक युरोप-अमेरिकेला गेले आहेत. विशेषत: गेल्या ४० वर्षांत. तेथील (तुलनेने) बहुतेक जण, सुखी (समृद्ध) आणि मध्यमवर्गीय जीवनात रममाण झाले आहेत. नेहरू कुटुंबातल्या सर्वांनाच, युरोपात सुखाचे व समृद्धीचे जीवन जगणे शक्य होते. नेहरू इंग्लंडमध्ये शिकले. विज्ञान व कायद्याची पदवी घेऊन भारतात आले. नेहरूंमुळे इंदिरा गांधीही तिकडेच राहू शकल्या असत्या. राजीव तर राजकारणातच येऊ इच्छित नव्हते. सोनिया गांधींना पराकोटीचा अपमान, अवहेलना, कुचेष्टा, उपहास, पराभव सहन करावा लागला. भारतात राहण्यापेक्षा, इटलीतल्या मध्यमवर्गीय जीवनात त्या आनंदाने राहू शकल्या असत्या; पण ते सर्व त्यांनी बाजूला ठेवले. इच्छेविरुद्ध, कर्तव्यबुद्धीने, काँग्रेसची धुरा सांभाळणे त्यांनी पसंत केले. इंदिरा गांधींवरील गोळीबारानंतर, हत्येनंतर रक्तबंबाळ स्थितीतल्या इंदिराजींना सोनियांनीच हॉस्पिटलमध्ये नेले होते. राजीव गांधींचे छिन्नविच्छिन्न कलेवर आणायला त्यांना विमानतळावर जावे लागले. तरण्याबांड संजयचे अपघाती निधन झाले. त्याच्या अंत्यसंस्काराला इंदिरा गांधींची सोबत सोनियांनीच केली होती. अशा सर्व शोकांतिक प्रसंगांना विटून, दुसरे कुणीही सुखेनैव परदेशात स्थायिक झाले असते; पण सोनियांनी काँग्रेसशी, अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्य चळवळीशी, स्वत:ला जोडून घेतले.
४.
स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक नेत्यांचा एकमेकांशी पुरेसा परिचयही नव्हता. वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण, अशी बरीच मोठी मांदियाळी आहे. त्यांच्या वयांत अंतर होते. शिक्षण समान नव्हते. प्रत्येकाचे कौटुंबिक जीवन वेगवेगळे होते. धर्म, जात, परंपरा वेगळ्या होत्या. याखेरीज मोहम्मद अली जीना होते आणि समांतर दलित चळवळीचे अध्वर्यु डॉ. बाबासाहेब आंबेडकरही होते. एक प्रचंड मोठा स्वातंत्र्यलढाच होता तो. तेव्हा कुणाला अंदाज होता, अथवा महत्त्वाकांक्षा होती की, जेव्हा-केव्हा, जसे-कसे स्वातंत्र्य मिळेल, त्यानंतर जी कोणती पद्धत स्वीकारली जाईल, तिचा नेता, राष्ट्रप्रमुख, मुख्य सूत्रधार कोण असेल?
मोतीलाल नेहरूंचा ‘स्वराज पक्ष’ होता; पण गांधीजींचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर, काँग्रेसच्या महाआंदोलनात ते मनापासून सहभागी झाले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १६ वर्षे म्हणजे १९३१ साली त्यांचे निधन झाले. म्हणजे मोतीलालनी नेहरूंची घराणेशाही रुजवण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे ‘चले जाव’चळवळीनंतर, महात्मा गांधींनी स्वत: सुचवले की स्वातंत्र्यानंतर त्यांचा वारस जवाहरलाल नेहरू असेल. १९३६ साली फैजपूर काँग्रेसच्या ५०व्या अधिवेशनानंतर, नेहरूंची कीर्ती देशातच नव्हे, तर साऱ्या दिगंतात पसरली होती. शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, स्त्रिया, त्या वेळचा मध्यमवर्ग, अशा सर्व स्तरांत नेहरूंना प्रचंड लोकप्रियता लाभली होती.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
नेहरूंचा भविष्यवेधही अचूक ठरला होता. जर्मनीत हिटलरशाही प्रस्थापित झाली की, लोकशाही परंपरांवर गदा येईल, हिटलर जगावर युद्ध लादेल आणि त्यामुळे प्रचंड संहार होईल, ही शक्यताच नव्हे, तर भीती आणि खात्रीही नेहरूंनी व्यक्त केली होती. हिटलरने १९३९ साली युरोपातील देशांवर आक्रमण सुरू केले. त्यांतून दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले.
भारतातील ‘चले जाव’चळवळ या जागतिक पार्श्वभूमीवर होती. पंडित नेहरूंचे नेतृत्व, द्रष्टेपण, त्यांचा अफाट लोकसंपर्क, लोकप्रियता आणि जगभर त्यांना प्राप्त झालेली प्रतिष्ठा ओळखूनच, गांधीजींनी त्यांचे नाव सुचवले होते. नेहरूंनी स्वत:चे नाव कधीही सुचवले नव्हते. गांधीजींना आपल्या नावाची शिफारस करण्याची विनंतीही केली नव्हती. वल्लभभाई पटेल पंडित नेहरूंपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरू ५८ वर्षांचे तर वल्लभभाई ७३ वर्षांचे होते. पटेल यांची प्रकृतीही क्षीण होत चालली होती. १९५० साली वल्लभभाईंचे निधन झाले. म्हणजे, भारतात १९५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक संपन्न होण्यापूर्वीच.
ही सर्व पार्श्वभूमी लक्षात न घेता, तमाम संघपरिवाराला आणि नेहरू-विरोधकांना वाटते की, पटेलच पंतप्रधान व्हायला हवे होते. विशेष म्हणजे खुद्द पटेलांनीच, नेहरूंचे जगातील, देशातील आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्थान ओळखून नेहरूच पंतप्रधान झाले पाहिजेत, असे स्पष्ट सांगितले होते. पंतप्रधानपदावरून नेहरू-पटेल यांच्यात कोणताही वाद नव्हता. तरीही, दोघांमध्ये कलह आहे, असा भ्रम निर्माण करून, नेहरूंचे अवमूल्यन करण्याची, संघपरिवाराची कूटनीती आहे. गांधीजींच्या हत्येनंतर खुद्द पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती; पण संघाने त्याबद्दल मौन बाळगायचे, नेहरूंना कमी लेखण्यासाठी पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करायचा, अशी नीती संघाने स्वीकारली आहे. १९५०च्या राज्यघटनेनुसार, स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका १९५२मध्ये झाल्या. त्या निवडणुकीत कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष (काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेला गट), रिपब्लिकन, स्वतंत्र पक्ष, रामराज्य परिषद आणि रा. स्व. संघाने उभा केलेला ‘जनसंघ’ असे प्रमुख पक्ष होते. इतरही काही पक्ष होते; पण नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले. त्यांना जर ते मिळाले नसते, तर नेहरू पंतप्रधानच झाले नसते - घराणेशाही तर दूरच राहिली असती!
नेहरूप्रणीत काँग्रेसने पुन्हा १९५७मध्ये आणि १९६२मध्ये लोकांचा विश्वास संपादन केला. प्रचंड बहुमत संपादन केले. जनतेने १९५२, १९५७ अथवा १९६२पैकी कोणत्याही निवडणुकीत नेहरूंचा पराभव केला असता, तर देश तेव्हाच ‘काँग्रेसमुक्त’झाला असता. परंतु लोकांनी कम्युनिस्ट, स्वतंत्र, जनसंघ, समाजवादी, यांपैकी कुणालाही बहुमत दिले नाही. जनतेचा विश्वासही त्यांना संपादन करता आला नाही. (अपवाद फक्त केरळचा- कम्युनिस्ट पक्षाला तिथे बहुमत मिळाले. देशातले पहिले कम्युनिस्ट राज्यसरकार केरळमध्ये स्थापन झाले.) देशात सर्वत्र एकत्रित निवडणुका झाल्या. काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याचे लोकांनी त्या निवडणुकांमधून सिद्ध केले.
पंडित नेहरूंचे १९६४ साली निधन झाले. काँग्रेसने लालबहाद्दूर शास्त्रींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आणले. पक्षांतर्गत निवडणुकीत मोरारजी देसाईंना पाठिंबा मिळाला नाही. १९६६ साली लालबहाद्दूर शास्त्रींचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. शास्त्री जर हयात असते, तर इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान झाल्याच नसत्या. शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधींना संसदीय नेतेपदासाठी मोरारजींच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. जर ‘घराणेशाही’ असती, तर आपल्या निधनापूर्वीच नेहरूंनी इंदिरा गांधींचे नाव मुक्रर केले असते. शास्त्रींच्या निधनानंतर पक्षांतर्गत निवडणूकही त्यांना लढवावी लागली नसती. शास्त्री हयात असते, तर १९६७ सालची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली असती. पुन्हा शास्त्रीच पंतप्रधान झाले असते. इंदिरा गांधी नाही. त्यानंतर १९६७च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असता, तर इंदिरा गांधी पंतप्रधान होऊ शकल्या नसत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, पण बहुमत काँग्रेसलाच मिळाले. जनसंघ, कम्युनिस्ट, आदींना लोकसभेत फारसे यश मिळाले नाही.
५.
‘नेहरूवाद हा जगाकडे, देशाकडे, समाजाकडे, भविष्याकडे आणि भूतकाळाकडेही बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. कोणत्याही धर्मग्रंथाप्रमाणे वा विचारसरणीच्या प्रमेयांवर उभारलेली, बदल न होऊ शकणारी सिद्धान्तप्रणाली नाही. सर्वप्रथम नेहरूवाद हे मानतो की, बदल, स्थित्यंतर, उत्क्रांती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हा बदल केवळ आपल्या (म्हणजे पक्षाच्या, ग्रंथाच्या, नेत्याच्या, दैवाच्या वा देवाच्या!) इच्छेनुसार होत नसतो. पृथ्वीच्या (म्हणजे विश्वाच्याही) जन्मापासून सातत्याने बदल होत आले आहेत. फक्त निसर्गात नव्हे, तर माणसांच्या जीवनशैलीत, त्यांच्या विचारांमध्ये, एकूणच समाजामध्ये सतत बदल होत आले आहेत. त्या बदलांमध्ये काही सूत्रे आहेत, जी दीर्घकाळ टिकतात. काही सूत्रे क्षीण होतात अथवा लयालाही जातात. परंतु त्या सूत्रांमध्ये गतिमानता असतेच. पुनरुक्तीचा आरोप लक्षात ठेवूनही, एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे की, नेहरूवाद (प्रचलित राजकीय परिभाषेत नेहरू-गांधीवाद) म्हणजे मार्क्सवाद वा हिंदुत्ववाद यांसारखी ग्रंथबाह्य, घट्ट, संकल्पनाबद्ध विचारसरणी नव्हे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
विचल काय आणि अविचल काय? गुरुत्वाकर्षणाचे (आपल्याला समजलेले) नियम अविचल आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्यमालिकाही स्वत:भोवती आणि सूर्याभोवती फिरते. अनंतात अवघे विश्व, अदृश्य अशा गुरुत्वाकर्षण-सदृश शक्तीने टिकून आहे. नव्या संशोधनात हेही स्पष्ट झाले आहे की, एकच विश्व नाही, तर अनेक विश्वं आहेत. या अनंत, अथांग, अचाट विश्वाचा शोध माणूस अथकपणे घेत आला आहे. विज्ञान, संशोधक वृत्ती, अंधश्रद्धेला दूर ठेवून, सत्याचा प्रयोगशील (आणि गणितशील) शोध घेण्यात विलक्षण आनंद आहे. पंडित नेहरूंनी विज्ञानवादाचा पुरस्कार केला. विज्ञानसंस्था उभ्या केल्या. सामुद्रीशोध संख्या, अणुसंशोधन आणि अवकाशसंशोधन यांवर भर दिला. आयआयटीसारख्या संस्था उभ्या करतानाच, फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या मूलभूत संशोधन प्रयोगशाळाही उभ्या केल्या. आइन्स्टाइनपासून आपल्या होमी भाभांपर्यंत अनेक वैज्ञानिकांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले - त्यामागचे सूत्र होते जिज्ञासा! जोपर्यंत माणूस आहे, तोपर्यंत (मन खुले असल्यास) तो जिज्ञासा ठेवणारच. आपल्याला संपूर्ण सत्याचा अंतिम साक्षात्कार झाला आहे वा आपला शोध ‘पूर्ण’ झाला आहे, असे जिज्ञासू व्यक्तीला कधीही वाटणार नाही. जिज्ञासू व्यक्ती आपले निष्कर्ष, सिद्धान्त, अनुभव, सतत शोधवृत्तीने तपासून पाहत असते. तपासताना त्यात काही चूक आढळल्यास, त्याचा पुनर्शोध, पुनर्विचार आणि पुनर्मांडणी करत असतात.
नेहरूवादाचा अर्थच मुळात पुनर्शोध आणि पुनर्मांडणी करत राहणे हा आहे. प्राप्त झालेल्या निष्कर्षानुसार व्यवहार चालू ठेवणे. बदलत्या विश्वात माणसाला वरच्या बौद्धिक व मानसिक स्तरावर नेत राहणे, माणुसकीवर श्रद्धा ठेवून आपली जगण्याची रीत ठरवणे, म्हणजे नेहरूवाद! परंतु हे वैश्विकतेचे घटक आणि तत्त्वज्ञानाचे मुद्दे झाले. प्रस्थापित जगात, दैनंदिन जीवनात व्यवहार करताना कोणती सूत्रे नेहरूवादात अनुस्यूत आहेत? नेहरू जसे राष्ट्रवादी होते तसे आंतरराष्ट्रीयवादीही होते. इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे हा जसा राष्ट्रवादाचा आविष्कार, त्याचप्रमाणे जगात कुठेही, कोणालाही पारतंत्र्यात राहायला लागू नये, म्हणून जगातील शांततेने व एकजुटीने साम्राज्यवादाला, वसाहतवादाला, वंशवादाला, हुकूमशाहीला, धर्मद्वेष्ट्या व्यवस्थांना, अगदी जातीय व्यवस्थेलाही विरोध करणे, संघर्ष करणे आणि स्वातंत्र्य, समता बंधुत्व प्रस्थापित करणे, हे आहे नेहरूवादाचे आंतरराष्ट्रीयवादी उद्दिष्ट! नेहरूंना जागतिक नेतेपद प्राप्त झाले होते. ते केवळ इतर देशांना भेटी देऊन, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांशी हस्तांदोलन करून (वा त्यांना आलिंगने देऊन) झाले नव्हते.
जगातील सर्व देशांत, शांततावादी व समाजवादी नेत्यांना, नेहरू नेतेही वाटायचे आणि सहकारीही! त्यांच्या विचारांतूनच अलिप्त राष्ट्रांची चळवळ जन्माला आली. इजिप्तचे नासर आणि युगोस्लाव्हियाचे टिटो यांना बरोबर घेऊन, १९६१ साली त्यांनी ही चळवळ सुरू केली. नंतरच्या २५ वर्षांत १५०पेक्षा अधिक देश, या चळवळीत सामील झाले. तिसऱ्या जगाने अमेरिका वा रशिया यांच्यासारख्या महासत्तांच्या संघर्षात अडकू नये; त्याऐवजी, शांतता व विकास प्रस्थापित करण्याकडे लक्ष पुरवावे, हे या चळवळीचे उद्दिष्ट होते. तिसरे महायुद्ध टळले याचे मुख्य कारण ही चळवळच होती.
कोणतीही गोष्ट साध्य करायची, तर विकास, संशोधन, संरक्षण, सार्वजनिक शिक्षण, पर्यावरणाचे संरक्षण या विषयांसाठी नियोजनाची गरज असते. अचूक माहितीच्या आधारेच योग्य नियोजन होऊ शकते. लोकसंख्येचे अनेक प्रकारे वर्गीकरण, प्रस्थापित संपत्तीचे (विषम) वाटप, शेती, उद्योग, व्यवसाय, इत्यादी बाबींबरोबरच, निसर्गदत्त भौगोलिक साधनसंपत्ती, या सर्व गोष्टी कोणत्या स्थितीत आहेत याचा डेटाबेस असावा लागतो. त्यानुसार नियोजन करून, विकासाचा मार्ग आणि गती ठरवता येते. भारतात ‘नियोजन आयोग’ याच विचारातून जन्माला आला. नरेंद्र मोदींनी हा नियोजन आयोगच बरखास्त केला. पराकोटीचा नेहरूद्वेष याव्यतिरिक्त या निर्णयाला दुसरे कोणतेही कारण नव्हते.
भारतीय उपखंड - विशेषत: भारत, हा अनेक धर्म, जाती, संस्कृती, भाषा, जीवनशैली, विचार यांसह, भौगोलिक व नैसर्गिक विविधतेने एकत्र विणलेला देश आहे. त्यात कुठल्याही एका धर्माचे, जातीचे, विचारसरणीचे, पक्षाचे, व्यक्तीचे प्रभुत्व/वर्चस्व हे देशाच्या स्थैर्याला धोका निर्माण करू शकते. हिंदू समाज जरी बहुसंख्य (८० टक्के) असला, तरी त्या समाजात अनेक जाती, संस्कृती, जीवनशैली, रोटी-बेटी व्यवहार वा आहारपद्धतीही वेगवेगळ्या आहेत. या सर्वांना एकत्रितपणे, गुण्यागोविंदाने, समाधानाने व कलहविरहित जीवन जगता यावे, याचे तत्त्वज्ञान म्हणजे सेक्युलॅरिझम! सेक्युलॅरिझम म्हणजे अल्पसंख्याकांचा अनुनय नव्हे आणि बहुसंख्याकांचा वर्चस्ववाद नव्हे. देशाची, म्हणजे समाजाची एकात्मता व ऐक्य, सहिष्णु दृष्टिकोन, उदारमतवाद, सर्व समाजांबाबत आस्था, आदर, न्याय, समता, या सर्व बाबी नेहरूंच्या सेक्युलॅरिझममध्ये अनुस्यूत आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
भारताने याच दृष्टिकोनातून संसदीय लोकशाही स्वीकारली. भारताची सामाजिक-सांस्कृतिक वैविध्ये जपण्याचा, लोकशाही व एकात्मता टिकवण्याचा आणि समृद्ध करण्याचा मार्ग म्हणजे संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठापना! अन्यथा, अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय लोकशाही भारतात आणण्याचा प्रस्ताव याच काळात काहींनी केला होता. पण तामिळनाडूपासून नागालँडपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत विविध राज्य-प्रांतांना एका ‘संघराज्यात’ एकत्रित ठेवणे हे संसदीय लोकशाहीतच शक्य आहे. ‘वैविध्यात एकता’ हा संसदीय लोकशाहीचा मंत्र आहे. अध्यक्षीय लोकशाहीत, काही प्रांतांचे (बहुसंख्याक राज्यांचे) वर्चस्व प्रस्थापित झाले, तर देशाची एकता धोक्यात येऊ शकते. पंडित नेहरूंनी सर्व राज्यांना, तेथील संस्कृतींना आणि भाषांना, सर्जनशील विकासाची संधी मिळावी यासाठी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला होता. आता त्या विचारालाही दूर करून, अध्यक्षीय पद्धत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. देशाच्या ऐक्याला त्यातून धोका संभवतो, असे नेहरूंनी म्हटले होते.
थोडक्यात, नेहरूवाद म्हणजे विज्ञानवाद, आंतरराष्ट्रीय वादाच्या अंतर्गत राष्ट्रवाद, मानवतावाद, उदारमतवाद, सेक्युलॅरिझम; नियोजन पद्धतीत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये प्रेम व करुणा यांच्या भावनेतून साध्य करण्याचा सामाजिक प्रयत्न. नेहरूवाद उखडून टाकण्याचे मनसुबे रचणार्यांना, सतत उत्क्रांत होत जाणारा नेहरूंचा विचार त्यामुळेच समजत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव, सोनिया आणि राहुल गांधी या कुटुंबाने हा प्रगल्भ आणि वैश्विक विचार जपला आहे. ज्यांना त्या विचारांचीच धास्ती आहे, तेच देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या नावाखाली, नेहरूवादच गाडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो यशस्वी होणार नाही!
‘शोध नेहरू-गांधी पर्वाचा’ - सुरेश भटेवरा
मनोविकास प्रकाशन, पुणे
पाने - ७५८ , मूल्य - ८५० रुपये.
.............................................................................................................................................
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत.
ketkarkumar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 18 November 2021
कुमार केतकर,
संघाने न केलेला नेहरू-गांधींचा द्वेष तुम्हाला दिसतो. पण द्वेष म्हणजे नेमकं काय? विनायक मेटेच्या चमच्यांनी तुमच्या घरावर जो हल्ला केलेला ना त्याला द्वेष म्हणतात. संघाने कधी काही असलं केलंय का? संघ सॉफ्ट टार्गेट आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर वाट्टेल ते आरोप करता. आणि विनायक मेटेसमोर मात्र तुमची फाटते.
तुम्ही कमालीचे दांभिक आहात. तुम्ही कितीही विद्वान असलात तरी मुळातून तुम्ही सोनिया गांधींच्या पालखीचे भोई आहात. आता सोनियाचा हुजऱ्या नेहरू-गांधींची स्तुतीच करणार ना? तुमच्यासारख्या फट्टू व भाट माणसाचं लेखन फारशा गांभीर्याने घेऊ नये, असं आपलं माझं मत.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Ravi Go
Wed , 17 November 2021
Sundar adhawaa. Sonia/Rahul che drashtepan ajoon disalele naahi! Te bhavishyat diso heech aasha.