अजूनकाही
१. शिवसेना ही योद्धाप्रमाणे लढली. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. परिणामांची पर्वा न करता ही लढाई सुरूच राहील. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला असून आम्ही परिणामांची पर्वा करत नाही. हा लढा फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म, विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच आहे.
साक्षात शिवछत्रपतींच्या काळातल्या कागदपत्रांची छाननी केली, तरी असली बंडल चेवाची भाषा त्यांत आढळणार नाही. निखारे काय, झेंडा निसटू दिला नाही काय, घाव काय, अस्मिता काय? ही मंडळी सकाळी दात घासतात तीही ज्वलंत विचारांनीच घासत असावीत, अशी शंका येते. एवढ्या राणा भीमदेवी गर्जना केल्यानंतर ही म्याँव कमळाच्या डिझाइनच्या ताटलीतून ऊन ऊन दूध पिणार नाही, याची गॅरंटी काय?
………………………………….
२. सहा मजली झोपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वांद्रे पूर्वच्या मुस्लिमबहुल बेहरामपाड्यात शिवसेनेने एमआयएमकडून आयात केलेल्या उमेदवाराला पालिका निवडणुकांसाठी तिकीट देऊन या विभागात शिरकाव केला आणि ती खेळी यशस्वी झाली. बेहरामपाड्यात भगवा फडकला.
भारतीय मन केवढं उदार, विशाल आणि क्षमाशील आहे हो! दंगलीच्या काळात या बेहरामपाड्याविषयी इतकी आग ओकण्यात आली होती की, विजय तेंडुलकरांच्या 'रामप्रहर' या स्तंभाला 'बेहरामप्रहर' म्हणून हिणवलं गेलं होतं. मुंबईत जरा कुठे खुट्ट झालं की, मुखपत्रात बेहरामपाड्याचा उद्धार व्हायचा. त्याच पाड्यातले सगळे तथाकथित 'दहशतवादी' सत्तेसाठी रातोरात 'राष्ट्रीय मुसलमान' बनलेले दिसतात. गंमत म्हणजे त्यांनीही हा इतिहास मागे टाकून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून भाजपला नाकारण्यासाठी शिवसेना स्वीकारली. सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असतं ते असं.
………………………………….
३. हैदराबादच्या एका अभियंत्याची बुधवारी रात्री अमेरिकेतील कान्सस शहरातील एका बारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोराने गोळी झाडण्यापूर्वी ‘गेट आऊट ऑफ माय कंट्री’ (माझ्या देशातून चालता हो!) असे ओरडत होता. या घटनेत आणखी एक भारतीय जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
ट्रम्प तात्यांच्या प्रत्येक मूर्ख विधानाला आणि कृतीला चेकाळून प्रतिसाद देणाऱ्यांना आता तरी भानावर यायला हरकत नाही. तात्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना टिपण्याचा आनंद लुटताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की, तात्या त्याच बंदुकीने भारतीयांनाही टिपणार आहेच. त्यांच्या तुघलकी फर्मानांनी आधीच तीन लाखांहून अधिक भारतीयांवर हकालपट्टीची टांगती तलवार लटकली आहे. या जाणीवेने किमान तिकडच्या शासनप्रणीत उन्मादाची एतद्देशीय आवृत्ती काढण्यापासून वाचलो तरी पुष्कळ.
………………………………….
४. आपल्याकडून कमी वयात जास्त अपेक्षा केल्या गेल्या. भारतात क्रिकेट हा धर्म असल्याने प्रेक्षकांकडे संयम नसतो. मी जेव्हा अवघ्या २२ वर्षांचा होतो, तेव्हा माझ्याकडून ३५ वर्षीय खेळाडूच्या प्रगल्भतेच्या अपेक्षा केल्या गेल्या. पण मला माझ्या खेळावर आत्मविश्वास आहे. : विराट कोहली
मित्रा, चूक प्रेक्षकांची नाही. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे त्यापेक्षाही कमी वयाचे पाहिले आहेत. ते खेळातही अव्वल होते आणि मैदानातल्या, मैदानाबाहेरच्या वर्तनातही प्रगल्भ आणि सुसंस्कृत होते. क्रिकेट हा या देशाचा धर्म आहे, म्हणूनच आपण यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत- एकदा धर्म स्वीकारला की यमनियमही स्वीकारायला लागतातच. त्याबाबतीत सोयीसोयीचं पाहून कसं चालेल?
………………………………….
५. बिहारमध्ये दोन प्रेयसींचे खर्च भागवण्यासाठी अभियंता असलेल्या उच्चशिक्षित तरुणाने स्वत:ची टोळी स्थापन केली आणि महामार्गावर वाहने लुटण्याचे काम सुरू केले. आंतरराज्य टोळीतील पाच कुख्यात दरोडेखोरांना मोबाइल सर्व्हिलन्सच्या आधारे पकडण्यात आले.
इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना विचाराल तर ते सांगतील, हा मनुष्य इंजीनियर असूच शकत नाही. इंजीनियरिंगच्या अभ्यासात इतका वेळ आणि इतकी शक्ती जाते की एक प्रेयसीही सांभाळताना अवघड. त्यात याने दोन प्रेयसींना सांभाळून त्यांचे लाडकोड केले असतील, तर तो इंजीनियर असूच शकत नाही, सुपरमॅनच असायला हवा, असं ते म्हणतील. आता ही बातमी बाहेर आल्यानंतर पोलिसांआधी त्या दोघी मिळून सुपरमॅनचा पाचोळामॅन करून टाकतील, यात शंका नाही.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment