‘शि-वा-जी’ या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर ‘भक्ती’ निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपति’ने केलं
संकीर्ण - श्रद्धांजली
सुश्रुत वैद्य
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 16 November 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

मी शाळेत असताना जे लेखक वाचत मोठा झालो, ज्यांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली, परत-परत वाचली, ज्यांनी माझं लहानपण अक्षरश: घडवलं, त्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या चार-पाच लेखकांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. त्यांचं ‘राजा शिवछत्रपति’ मी इतक्या वेळा वाचलंय की, त्याला गणतीच नाही. माझ्याकडे आज असलेली त्याची प्रत, ही तिसरी प्रत आहे. त्याच्या पहिल्या दोन प्रती मी इतक्या वेळा वाचल्या आहेत, की वाचून-वाचून त्याचं पान अन् पान सुटं होऊन त्या खराब झाल्या. तिसर्‍या प्रतीचीही अवस्था काही फार वेगळी नाहीये.

इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो? त्याच्यातलं खरं-खोटं काय? पुरावे कोणते? त्याच्या मागच्या राजकीय विचारधारा काय आहेत? इतर सिद्धान्त कुठले? हा सगळा विचार खूप-खूप नंतर आला. या सगळ्याच्या आधी ‘शि-वा-जी’ या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर भक्ती निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपति’ने केलं. शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्त्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचं काम या पुस्तकानं केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक, ऐतिहासिक किंवा अद्भुत कथेच्या नायकानं मनावर इतकं गारूड केलं नव्हतं. त्या गारुडामागची सत्यता, दार्शनिकता, त्याचं मूल्य, तेव्हा कळलं नव्हतं, पण आता कळतंय.

शास्त्रकाट्याच्या कसोटीवर न उतरणारी नुसतीच भावनिकता फार स्पृहणीय नव्हे हे तर खरंच; पण आपल्या स्व‍त्वाचीच जाणीव नसलेला, आपल्याला, आपल्या समाजाला, आपली विशिष्ट ओळख देणार्‍या गोष्टींनाही ‘आपले’ न मानणारा, नुसताच भावनाविहीन शास्त्रकाटा होणंही चांगलं नाही. स्वतःची ओळख शाबूत ठेवून जगाला भिडावं, आणि मग बाकीच्यांना बरोबरीच्या नात्यानं वागवावं हे चांगलं. पण ही स्वतःची ओळखच जर शाबूत नसेल तर आपल्यात एक बेगडीपणा येतो. अशी सगळ्याची तार्किक चिरफाड करायची सुरी हाती घेऊन, स्वतःच्या अहंकाराच्या, स्वार्थाच्या अभिनिवेशी पवित्र्यात ‘तय्यार’ असलेले बेगडी ‘विचार-योद्धे’ बनणं चांगलं नव्हे. ते व्हायला नको असेल तर काही गोष्टी संस्कारक्षम वयातच घडाव्या लागतात. मनाच्या गवताच्या पेंडीचा आळा सुटण्याआधीच हे व्हावं लागतं. एकदा तो आळा सुटून गवताच्या काड्या वाऱ्यावर इकडेतिकडे पांगल्या की, कितीही धडपड केली तरी ती पेंडी पुन्हा पहिल्यासारखी एकसंध कधीच होत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खुद्द श्रीशिवछत्रपतींच्या आयुष्यात, त्यांच्या कार्यात ही स्वतःच्या सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक, भौगोलिक ओळखीबद्दलची स्पष्टता दिसतेच. त्यांची इतरांबद्दलची सहिष्णुता या स्पष्टतेच्या मजबूत पायावर उभी होती आणि म्हणूनच ती इतकी प्रामाणिक होती. ही स्व‍त्वाची जाणीव, त्या स्व‍त्वाचं रक्षण, पोषण, भरण करणारा श्रीशिवछत्रपतींचा पराक्रम, त्या सामर्थ्यातून आलेली त्यांची उदारमनस्कता हे आपलं सांस्कृतिक संचित आहे. आजच्या ‘आधुनिक’ आणि ‘आधुनिकोत्तर’ काळात, वैचारिक ध्रुवीकरणाच्या जमा‍न्यात तर या संचिताचं मोल पूर्वी कधी नव्हतं इतकं अधिक आहे.

संस्कृतीचं हे संचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला निरपेक्ष, सहज पद्धतीने निरागस वयातच जायला हवं. आपण ‘आधुनिक’ व्हायच्या आधीच्या काळात कदाचित ते तसं जातही असेल. पण या ‘आधुनिक’ काळातही ते कसं द्यावं, याचा वस्तुपाठ बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये होता. आणि ते पुस्तक असंच योगायोगानं ‘झालेलं’ नव्हतं. ते तसं होण्यामागे स्वतः बाबासाहेबांना असलेली या स्व‍त्वाची जाणीव व त्यामुळे निर्माण झालेली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली भक्तीची भावना - भक्तीच म्हणायला पाहिजे - वैचारिक आकर्षण, आदर, आश्चर्य, तुलना, मूल्य, अभ्यास, व्यासंग, ध्यास, चिकित्सा हे सगळं असूनही या सगळ्याच्या पलीकडे गेलेली भक्तीची भावना - होती, म्हणूनच ती त्यांच्या लेखनातून आमच्यापर्यंत पोहोचली. माझ्यासारख्या लाखो, कदाचित करोडो, मुला-मुलींपर्यंत पोहोचली. त्या मुला-मुलींनी, आजच्या पालकांनी, आपल्या मुलांना जर मराठी शिकवलं, तर ती इथून पुढेही पोहोचत राहील.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

मोठमोठे लेखक आपल्याला नानाविध गोष्टींची ओळख करून देतात, आपले वैविध्यपूर्ण अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतात. पण या परक्यांच्या ओळखीपेक्षा, बाहेरच्या अनुभवांपेक्षा फार अधिक मोलाची गोष्ट बाबासाहेबांनी केली. आम्हाला आमची स्वत:चीच ओळख करून दिली. स्वत्व म्हणजे काय याची अनुभूती दिली. छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना मुजरा करणारा हेन्री ऑक्झेंडन आणि त्या चित्राला बाबासाहेबांनी दिलेलं ‘वाकल्या गर्विष्ठ माना, यश तुझे हे आसमानी’ हे शीर्षक पुढच्या काळात, गोऱ्यांच्या देशात असताना त्यांच्या नजरेला नजर भिडवणाऱ्या स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा स्रोत होतं. अजून आहे.

बाबासाहेबांनी आम्हाला समृद्ध करणारे इतके दरवाजे उघडून दिले की, त्याची आम्हाला तर तेव्हा कल्पना नव्हतीच, पण कदाचित त्यांना स्वत:लाही नसेल. पण त्याहीपेक्षा आधुनिकतेच्या रेट्याखाली तुटत चाललेली आमची नाळ त्यांनी आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडून ठेवली. या उपकारांचे उतराई कोणत्या शब्दात व्हायचे? ते शक्य तरी आहे का? ही कृतज्ञतेची भावना अशीच आयुष्यभर कायम राहो, इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना.

..................................................................................................................................................................

लेखक सुश्रुत वैद्य संगणक-तज्ज्ञ असून त्या क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. ‘नव्या तंत्रज्ञानांचा व्यावसायिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल’ या विषयाचे अभ्यासक आहेत. तसेच ते प्राचीन भारतीय संस्कृती व संगीताचेही अभ्यासक आहेत. 

sushrut.vaidya@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......