आपण ‘राजा शिवछत्रपति’ कधी काळी वाचले होते आणि आपल्याला ते आवडले होते, याचा आज पश्चाताप होत नाही
संकीर्ण - पुनर्वाचन
रवींद्र कुलकर्णी
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 16 November 2021
  • संकीर्ण पुनर्वाचन शिवशाहीर Shivshahir बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare शिवाजी महाराज Shivaji Maharaj राजा शिवछत्रपति Raja Shivchhatrapati

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै २०२१ रोजी १००व्या वर्षांत पर्दापण केले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकााविषयी दै. ‘पुण्यनगरी’ मध्ये २२ ऑगस्ट २०२१ प्रकाशित झालेला हा लेख... लेखकाच्या पूर्वसंमतीनं...

..................................................................................................................................................................

बाबासाहेब पुरंदरे शंभरीत शिरले हे खरे न वाटण्याचे काहीच करण नाही. माझीच पन्नाशी उलटून गेली. अनेक गोष्टी विसरल्या गेल्या. ते अंगण गेले, तुळशी वृंदावन गेले असले काही म्हणत टिपे गाळण्याचा माझा स्वभाव नाही. जुने गेले व नवीन बरेच मिळालेही आहे. जुने झाले तरी विसरले गेले नाही, अशा फार थोड्या गोष्टी आहेत. त्यात बाबासाहेबांचे ‘राजा शिवछत्रपति’ आहे. दोन खंडातल्या हार्डबाऊंड स्वरूपात  मी ते पहिल्यांदा पाहिले. त्याच वेळेला चौथीच्या पाठ्यपुस्तकात इतिहासात शिवाजी महाराज होते. गेल्या पन्नास वर्षांत त्याच्या मुखपृष्ठावरचे महाराजांचे चित्र बदललेले नाही. त्यात एका ठिकाणी संपूर्ण पानभर फिकट गुलाबी रंगात पावनखिंडीत शिवाजी महाराज बाजीप्रभूंशी बोलताहेत असे चित्र होते. त्या वेळी पुस्तकातल्या त्या पानाला कान लावला तर शिवाजी महाराज व बाजीप्रभू यांच्यातला संवाद ऐकू येईल असे वाटायचे.

शिवशाहिरांच्या पुस्तकाने आणि त्यांच्या व्याख्यानांनी इतिहास नामक विषयाचे दार केवळ किलकिले नाही केले, तर धाड्कन लाथ मारून उघडून दिले. मी ते जर वाचले नसते तर इतिहास नामक विषयाचे मूर्त स्वरूप मी सहज कल्पिणे अवघड होते. कुठल्याही धर्मातल्या निराकार ईश्वराला चित्रकलेच्या साहाय्याने वा मूर्तीकलेच्या मदतीने मूर्त स्वरूप देऊन कलाकारांनी त्या परमेश्वराला सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे जे काम केले, तेच काम या पुस्तकातल्या भाषेने आणि त्यातल्या दिनानाथ दलालांच्या चित्रांनी इतिहासाबाबत माझ्या पिढीसाठी केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या पुस्तकाचा प्रभाव माझ्यावर फार काळ राहिला नाही, पण त्याने माझा पुढचा प्रवास सोपा केला. नंतर काही वर्षांनी अ. रा. कुलकर्ण्यांचे ‘शिवकालीन महाराष्ट्र’ वाचले, तर ते कोरडे वाटले नाही. आजही इतरांना कितीही कोरडे वाटणारे मजकूर असलेले वा त्या वेळच्या अर्थकारणाचे आकडे छापलेले इतिहासाचे पुस्तक मी आपले म्हणू शकतो.

आज शिवशाहिरांचे शिवचरित्र मला आवडते का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असे आहे. माझ्या स्वभावानुसार मी शिवशाहिरांच्या दारात फार रेंगाळलो नाही. आता ते पुस्तक वाचले तर हसू येते. वाढलेल्या वयातही जी माणसे त्यात रमतात, त्यांच्याशी माझे जमत नाही. या पुस्तकानंतर अनेक  ऐतिहासिक, खरे तर अनऐतिहासिक कादंबऱ्या व कथा आल्या. पुराणात रमणाऱ्या आपल्या समाजमनाने  इतिहास हा केवळ रमण्याचा, अभिमानाचा विषय केला. अजूनही महाराष्ट्राबाहेरही इतिहास आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही. गनिमीकाव्यातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. आजही किती सहज आपण दुखावले जातो!

शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर औरंगजेब समजला पाहिजे, हे कुरुंदकरांचे म्हणणे डावलून त्यापुढच्या ‘श्रीमान योगी’कडे आपली धाव असते. पण त्याबरोबर अभिमान, समाजाच्या श्रद्धा खुंटीवर टांगून निर्लेप मनाने इतिहास लिहिला जाऊ शकतो काय? वर्तमान राजकारणाच्या चष्म्यातून इतिहास पाहाणे टाळणे शक्य आहे काय?

केवळ ७० वर्षांपूर्वी झालेल्या दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लिहिताना तो किती वेगवेगळ्या प्रकारे लिहिला गेला आहे, याचा आढावा ‘द बॅटल फॉर हिस्ट्री’, ‘रि फायटिंग वल्ड वॉर टू’ या छोट्याशा पुस्तकात लष्करी इतिहासकार जॉन किगनने घेतला आहे. तो लिहितो, “इंग्रजी भाषेतल्या दुसऱ्या महायुद्धाच्या विद्यार्थ्यांना ‘द नेकेड अँड डेड’ ही कादंबरी लिहिणारा नॉर्मन मिलर वा ‘मेन अॅट आर्म्स’ लिहिणारा इव्हीलीयन वॉ सारखा कादंबरीकार टाळता येणार नाही.” इतिहासावर जेवढा हक्क इतिहासकारांचा आहे तेवढाच कवी आणि कादंबरीकारांचाही आहे. या गटात शिवशाहीर येतात.

श्रद्धा आणि अभ्यास यांचे आपापसातले युद्ध शिवशाहिरांच्या योगदानानंतरही चालूच राहील. पण इतिहासाचा कितीही अभ्यास केला तरी आणि अगदी कोणी अखंड भारताची जरी लालूच दाखवली तरीही मी महाराजांना ‘वाट चुकलेला देशभक्त’ असे म्हणू शकत नाही. राजांना ३०० वर्षे होऊन गेली आहेत. महाराष्ट्राने महाराजांची बाजू सतत लावून धरली आहे, यात या पुस्तकाचा मोठा वाटा आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आज शिवशाहिरांच्या शिवचरित्रातले जे आवडते त्याचा शिवचरित्राशी संबंध नाही. वर लिहिल्याप्रमाणे  त्यातली चित्रे मी विसरलो नाही. त्यातले विशेष करून अफजलखान, मिर्झाराजे, एक भले मोठे कुलुप, त्यात वर बसलेला औरंगजेब, त्याच्या पुढे खालच्या बाजूला भाला घेऊन पहारा देणारा भला थोरला सैनिक व त्याच्या दोन पायांमधून मिठाईचे पेटारे घेऊन बाहेर पडणारे महाराजांचे मावळे, उंबरखिंडीत घोड्यावर बसलेल्या देखण्या शिवाजी महाराजांच्या पुढे दया मागणारा करतलब खान, महमद कुलीखान बनलेले आणि तंबूच्या मागून अलगद निसटू पाहणारे नेताजी पालकर!  हे सारे मला जरी त्यांच्या आधार कार्डासकट भेटले व ते दलालांच्या चित्रातल्यासारखे दिसत नसतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवणे मला  अवघड आहे.

बाजीप्रभूंना डोक्यावर केस नव्हते हे दीनानाथ दलालांनी कसे ठरवले, याचे मला फार कुतूहल आहे. पन्हाळगडावरून चोर वाटेने निघाल्यावर, रात्री जंगलात क्षणभर वीज लकाकते आणि आपल्याला दिसते की  शिवाजी महाराज पालखीत आहेत व बाजीप्रभू बाजूनं चालत आहेत. त्यांचा एक हात तलवारीवर आहे. त्यांची व महाराजांची नजर मागे आहे. लकाकलेल्या विजेचा प्रकाश बरोबरच्या सैनिकांच्या भाल्यांच्या फाळांवरही पडलेला आहे. हे चित्र घरातले लाईट गेलेले असताना, कंदिलाच्या प्रकाशात, बाहेर पाऊस पडत असताना, पागोळ्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर पाहणे विलक्षण परिणाम करणारे  असे. ते खोटे असूच शकत नाही.

‘राजा शिवछत्रपति’ची संक्षिप्त चित्रमय आवृत्ती जी ‘महाराज’ म्हणून काढली आहे, त्याच्या प्रस्तावनेत पुरंदऱ्यांनी ही चित्रे कशी काढली गेली, यावर प्रकाश टाकला आहे. “मी दलालांना प्रसंग सांगत असे व ते लगेच पेन्सिलने आकृती काढत. मी ते तपासायचो व फेरबदल सुचवायचो. हे काम वर्षभर चालले. संपूर्ण शिवचरित्र मी त्यांना कथन केले व त्यांनी ते चित्रित केले.” दीनानाथ दलालांनाच त्यांनी ते पुस्तक अर्पण केले आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

पुरंदऱ्यांच्या ‘राजा शिवछत्रपति’ या गोड पुस्तकावर आणि त्याच्या लेखकावर नंतर अपेक्षित नसलेले, इतिहासाशी संबंधित नसलेले आरोप झाले. मनातल्या मनात का होईना, त्याची कारणे शोधणे, तसेच  त्यातले खरे-खोटे ठरवणे असभ्यपणाचे वाटले. तोपर्यंत वाढत्या वयानुसार पुस्तक मनातून हळूहळू उतरून गेले होते. ‘खूप जगल्याने जीवनातील अनेक चांगल्या गोष्टी मी गमावून बसलो आहे’, हे जी. ए. कुलकर्ण्यांचे वाक्य आठवून गेले. पण आपण ‘राजा शिवछत्रपति’ कधी काळी वाचले होते आणि आपल्याला ते आवडले होते, याचा आज पश्चाताप होत नाही. या पुस्तकाच्या ऋणात राहणे मला आवडते. 

..................................................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......