१.
महाराष्ट्रात बहुतांश प्रकाशन संस्था या वैयक्तिक मालकीच्या आहेत. ज्या मोजक्या प्रकाशन संस्थांची मालकी संस्थात्मक स्वरूपाची आहे, त्यात लोकवाङ्मय गृहाचा समावेश होतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा म्हणून ही प्रकाशन संस्था सुरू झाली. त्यामुळे त्यातील प्रकाशक, मुद्रक, संपादक ही पदं सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित व्यक्तींनीच सांभाळली. ऐंशीच्या दशकात त्यात काहीसा बदल झाला. कविवर्य नारायण सुर्वे या प्रकाशनसंस्थेशी जोडले गेले. लवकरच त्यांनी प्रकाश विश्वासराव (जन्म – १९ मार्च १९५०, निधन – ४ नोव्हेंबर २०२१) यांना या प्रकाशन संस्थेत बोलावून घेतलं. तसं पाहिलं तर ना सुर्वे कम्युनिस्ट होते, ना विश्वासराव. पण दोघेही या संस्थेत रमले. काही दिवसांनी सुर्वे निवृत्त झाले आणि हळूहळू विश्वासराव लोकवाङ्मय गृहाचे प्रकाशक आणि ‘न्यू एज प्रिटिंग प्रेस’चे मुद्रक झाले. या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी जवळपास २०-२५ वर्षं सांभाळल्या.
आज या संस्थेची महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवहारात आणि मराठी ग्रंथव्यवहारात जी काही प्रतिष्ठा, लौकिक आणि ओळख आहे, त्याचे प्रमुख शिल्पकार विश्वासराव आहेत. त्यांनी या प्रकाशन संस्थेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा या ओळखीच्या पुढे जाऊन मराठीतील एक दर्जेदार प्रकाशन संस्था हा लौकिक मिळवून दिला. अर्थात यासाठी त्यांना भाकपच्या कॉ. गोविंद पानसरे, डॉ. भालचंद्र कानगो, कॉ. सुकुमार दामले यांचा पाठिंबा व स्वातंत्र्य आणि सतीश काळसेकर, जयप्रकाश सावंत यांचं सहकार्य मिळालं. त्यामुळेच त्यांना हे करता आलं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
२.
१९५६ ते १९९३ या काळात मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेल्या तब्बल १८ पुस्तकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या काळात इतके पुरस्कार मिळवणारी ही एकमेव प्रकाशनसंस्था आहे. ९३नंतर मात्र मौजेची सद्दी जवळपास संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांना सर्वांत जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यातही २००७ ते १५ या नऊ वर्षांत या प्रकाशन संस्थेला तब्बल सहा वेळा साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘विठ्ठल रामजी शिंदे’ (गो. मा. पवार), ‘चित्रलिपी’ (वसंत आबाजी डहाके), ‘रुजुवात’ (अशोक केळकर), ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (जयंत पवार), ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ (सतीश काळसेकर) आणि ‘चलत्-चित्रव्यूह’ (अरुण खोपकर). हा एक मराठी प्रकाशन व्यवसायातला विक्रमच म्हणावा लागेल. आणि त्याचं श्रेय लोकवाङ्मय गृहाचे प्रकाशक-मुद्रक म्हणून विश्वासराव यांच्याकडेच जातं. त्यासाठी त्यांचा २०१४मध्ये सासवडला भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सत्कारही करण्यात आला होता.
मराठी ग्रंथप्रकाशन व्यवसायात अशोक शहाणे यांच्यानंतर छपाई, मुद्रण या विषयातली विशेष मातब्बरी कुणामध्ये दिसत असेल तर ती विश्वासरावांमध्येच. अशोक शहाणे यांच्याप्रमाणे त्यांनीही पुस्तकांच्या आकारात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ‘तमाशा – एक रांगडी गंमत’ (संदेश भंडारे), ‘सरवोत्तम सरवटे’ (संपा. अवधूत परळकर), ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ (नामदेव ढसाळ), ‘प्रतिमा-प्रचिती’ (नीतीन दादरावाला), ‘चलत्-चित्रव्यूह’, ‘चित्रव्यूह’ (अरुण खोपकर), ‘भीमायन – अस्पृश्यतेचे अनुभव’ (श्रीविद्या नटराजन, एस. आनंद,), ‘चित्रलिपी’ (वसंत आबाजी डहाके), ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ (सतीश काळसेकर), अशा लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या कितीतरी पुस्तकांचे आकार, त्यांची निर्मिती, छपाई उत्कृष्ट म्हणावी अशी आहे. आणि त्याचं श्रेय पूर्णपणाने विश्वासरावांकडेच जातं.
‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ हा नामदेव ढसाळांचा डॉ. आंबेडकरांविषयीच्या कवितांचा संग्रह. या कवितांची लांबी आणि रुंदी यांची विचार करून मोठ्या चौरस आकाराची विश्वासरावांनी निवड केली, तर त्यांच्याच ‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ या कवितासंग्रहातल्या कवितांची लांबी जास्त असली तरी रुंदी मात्र फार नव्हती. त्यामुळे विश्वासरावांनी त्यानुसार या संग्रहासाठी आकार निवडला. २००८ साली चीनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. मुख्य ऑलिम्पिकनंतर पॅरा ऑलिम्पिक होतं. त्याचा कॅटलॉग एका मित्रानं विश्वासरावांना पाठवला होता. तोच आकार त्यांनी या कवितासंग्रहासाठी निवडला. ‘निर्वाणाअगोदरची पीडा’ हा ढसाळांचा शेवटचा संग्रह. तो लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेला नाही, पण त्याची अक्षरजुळणी, मुद्रण, छपाई हे सर्व लोकवाङ्मय गृहात विश्वासरावांच्या देखरेखीखाली झालं. या संग्रहाचीही विश्वासरावांनी केलेली निर्मिती अतिशय देखणी आहे. नीतीन दादरावाला यांच्या ‘प्रतिमा-प्रचिती’ या जगभरातल्या नामांकित छायाचित्रकारांविषयीच्या पुस्तकाचा आकार आणि त्याची छपाईही त्यातील छायाचित्रांचा विचार करून विश्वासरावांनी केली आहे. तो मराठीतला युनिक म्हणावा असा आकार आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मोठे प्रकल्प हाती घेणं आणि त्यात आपल्या अनेक सहकारी, मित्रांना सामावून घेणं, ही विश्वासरावांची मराठी प्रकाशन व्यवसायातली दुर्मीळ म्हणावी अशी खासीयत होती. त्यांनी प्रकाशित केलेलं डॉ. आंबेडकरांचं चित्रमय चरित्र हे त्यापैकी एक. हे पुस्तक बरंच गाजलं. त्याचं खूप कौतुकही झालं. त्यामानानं विश्वासरावांनी केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या चित्रमय चरित्राची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. कदाचित हे पुस्तक विद्यापीठाने स्वत:च प्रकाशित केल्यामुळे आणि ते बाहेर विक्रीसाठी उपलब्ध नसल्यानं तसं झालं असावं. पण कॉफी टेबल पद्धतीच्या या पुस्तकाची निर्मितीही नितांत सुंदर म्हणावी अशी आहे.
३.
विश्वासरावांच्या कारकिर्दीचा अजून एक विशेष आहे तो महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराबाबतचा. या संस्थेनं १९९४ साली साहित्य पुरस्कार सुरू केले, तर १९९६ साली समाजकार्य पुरस्कार. या अमेरिकास्थित संस्थेच्या पुरस्काराची महाराष्ट्रातून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचं काम केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि लोकवाङमय गृह यांनी २००८पर्यंत केलं. या दोन्ही पुरस्कारांच्या निवड समित्या आणि स्मरणिका यांबाबतीत विश्वासरावांनी मोलाचं योगदान दिलं. तो खरं तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. साहित्य आणि समाजकार्य पुरस्काराच्या स्मरणिका, त्यांचे आकार, त्यांची निर्मिती यातून विश्वासरावांच्या प्रतिभेचा पडताळा घेता येतो. मराठी साहित्यिकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उत्तम छायाचित्रांसह इतक्या देखण्या स्मरणिका इतर कुठल्याही पुरस्कार संस्थेनं आजवर काढलेल्या नाहीत. त्यांच्यामुळे या पुरस्कारांना सुरुवातीपासूनच एक उंची, प्रतिष्ठा मिळण्यात हातभार लागला.
१६ ते २१ जानेवारी २००४मध्ये मुंबईत चौथ्या ‘वर्ल्ड सोशल फोरम’चं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं सगळं नियोजन, प्रसिद्धी यंत्रणा आणि कार्यवाही यांतही विश्वासरावांचा मोलाचा सहभाग होता. याच वर्षी उन्मेष अमृते या धडपड्या आणि उत्साही तरुणानं ‘मांदियाळी’ हा कलेविषयीचा दिवाळी अंक काढायचं ठरवलं होतं. या अंकावर विश्वासरावांचं ‘संपादक’ म्हणून नाव असलं तरी खरं तर ते ‘मानद संपादक’ होते. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे हा अंक संग्राह्य झाला.
याच काळात विश्वासरावांनी अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रा’ची जबाबदारी स्वीकारली. त्यात चित्रकार भरत चव्हाण, ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, लेखक-समीक्षक नीतीन रिंढे यांच्या मदतीनं विश्वासरावांनी छायाचित्रांच्या माध्यमातून पंजाबरावांचा चरित्रपट अतिशय कल्पकतेनं मांडला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
तशाच प्रयोग त्यांनी २०१३ साली माणगावच्या साने गुरुजी स्मारक ट्रस्टसाठीही केला आहे. तिथंही छायाचित्रांच्या माध्यमांतून त्यांनी साने गुरुजींचं कायमस्वरूपी चित्रप्रदर्शन उभारलं आहे. या कामात त्यांना लेखक सुनीलकुमार लवटे, कवी वसंत आबाजी डहाके, पाशा पिंपळापुरे यांचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर साहित्य अकादमीसाठी डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यावर एक तासाच्या लघुपटाची निर्मितीही केली आहे. दिग्दर्शक म्हणून विश्वासरावांनी केलेलं हे कामही लक्षणीय म्हणावं असंच आहे.
४.
विषय हेरणं, लेखक हेरणं आणि त्यांच्याकडून उत्तम काम काढून घेणं हा विश्वासरावांचा एक विशेष होता. सतीश भावसारांशी सहज गप्पा मारता मारता त्यांनी बाबूराव अर्नाळकरांविषयी बोलायला सुरुवात केली. त्यातून विश्वासरावांना ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाची कल्पना सुचली. त्यांनी ती जबाबदारी अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांनी झपाटून गेलेल्या सतीश भावसारांवरच टाकली. त्यांनीही अर्नाळकरांच्या जवळपास हजारभर कादंबऱ्या प्रयत्नपूर्वक मिळवून वाचून काढल्या. त्यातून योग्य ती निवड केली. या पुस्तकाचं काम चालू असतानाच एक दिवस ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार विश्वासरावांना भेटायला आले. त्यांच्याशी नवीन पुस्तकांबाबत बोलताना अर्नाळकरांचा विषय निघाला. तेव्हा एलकुंचवार यांनी त्यांचं अर्नाळकर प्रेम मोकळेपणानं विश्वासरावांपुढे उघड केलं. ते ऐकल्यावर ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाला तुम्हीच प्रस्तावना लिहा, असं विश्वासरावांनी त्यांना सांगितलं. एलकुंचवारांनीही ते मान्य केलं. मात्र नंतर काही दिवसांतच विश्वासराव लोकवाङ्मय गृहातून निवृत्त झाले. परिणामी पुढे हे पुस्तक भावसारांनी राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित केलं.
सतत नवनव्या विषयांचा शोध घेणं, त्यांचा प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करणं, हा विश्वासरावांचा स्वभावच होता. त्यातून लोकवाङ्मय गृहातील शेवटच्या काळात त्यांना नर्मदा परिक्रमा विषय सुचला. मग त्यांनी आपल्या मित्रांशी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजीतली नर्मदा परिक्रमेविषयीची मिळतील ती पुस्तकं मिळवून वाचून काढली. काही निवडक मित्रांसह टप्प्याटप्प्यांनी नर्मदा परिक्रमाही केली. त्या अनुभवावर त्यांनी एका देखण्या कॉफी टेबल पुस्तकाची निर्मिती करायची ठरवलं. पण नर्मदा परिक्रमेचा खर्च, त्यासाठीचं छायाचित्रण (व्हिडिओ व छायाचित्रं) यांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा खर्च बराच वाढत गेला. तरीही विश्वासरावांनी नेटानं हे पुस्तकही पूर्ण केलं. दुर्दैवानं ते त्यांच्या हयातीत प्रकाशित होऊ शकलं नाही. हे पुस्तक तयार आहे मात्र अजून प्रकाशित झालेलं नाही. ते होईल तेव्हा मराठीतल्या नर्मदा परिक्रमेविषयीच्या पहिल्यावहिल्या कॉफी टेबल बुकचं श्रेय विश्वासरावांच्या खाती जमा होईल, यात शंका नाही.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
५.
विश्वासरावांनी पडद्यामागे राहून केवळ अनेक लेखकांना हेरून, त्यांच्याकडून उत्तम लेखनच करून घेतलं नाही, केवळ उत्तम पुस्तकांचीच निर्मिती केली नाही, तर अनेक तरुणांच्या आयुष्यालाही आकार देण्याचं काम केलं आहे. सध्या दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कला निदेशक म्हणून काम करत असलेले सुदर्शन सुर्वे हे त्यापैकीच एक. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘मटा’मध्ये ‘देवमाणूस’ या नावानं एक छोटासा लेख लिहिला होता. त्यात ते शेवटी म्हणतात – “प्रकाश विश्वासराव यांच्यासोबत काम करत नसतानाही आज कम्प्युटरवर काम करताना ते माझ्यासोबत असल्यासारखं वाटतं. या माणसानेच या माठाला घडवलं, शिकवलं. मला माझ्या पायावर उभं राहायला शिकवलं. मी देवाच्या कधी पाया पडत नाही, पण अजूनही समोर प्रभादेवीला सिद्धिविनायक असताना मी त्या प्रेसच्या पाया पडायला विसरत नाही. कारण माझ्यासाठी देव आणि देवमाणूस त्या प्रेसमध्येच विराजमान आहेत.”
..................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment