अवघड काळांचा विसर न पडू देता जगण्याचा, माणसांशी जोडलं राहण्याचा, त्यांच्यासाठी उपस्थित असण्याचा सरावच आपल्याला पुढच्या आयुष्यात तारून नेईल
पडघम - सांस्कृतिक
सोनाली नवांगुळ
  • तिसऱ्या एकदिवसीय ‘साहित्य, संगीत, कला संमेलना’ची काही छायाचित्रं
  • Sat , 13 November 2021
  • पडघम सांस्कृतिक साहित्य संगीत कला संमेलन Sahitya Sangeet Kala Sammelan नृसिंहवाडी nruhsingh Wadi नरसोबाची वाडी Narsobachi Wadi

आज नृसिंहवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) इथं साहित्य, संगीत, कलाप्रेमी मंडळाच्या वतीनं तिसरं एकदिवसीय ‘साहित्य, संगीत, कला संमेलन’ होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटक व संमेलनाध्यक्ष लेखिका, मुलाखतकार आणि अनुवाद सोनाली नवांगुळ आहेत. त्यांचं हे अध्यक्षीय भाषण…

..................................................................................................................................................................

वाचणं, लिहिणं, अंगी एखादी कला जोपासणं किंवा कला अनुभवता येणं यानं माणसांची आयुष्य सुंदरच होत नाहीत, तर ती अर्थपूर्ण होतात, हे आपल्यापैकी प्रत्येकानं अनुभवलं असणार! करोनाकाळातील एका वर्षाच्या सक्तीच्या विरामाचा अपवाद नसता तर हे नरसोबाच्या वाडीतलं चौथं ‘साहित्य, संगीत, कला संमेलन’ असलं असतं. तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणार्‍या या नांदत्या, फुलत्या गावात होणार्‍या संमेलनाच्या उद्घाटनाचा आणि अध्यक्षपदाचा मान संयोजकांनी मला दिला, याबद्दल आधी आभार मानते.

छोट्या गावातली सगळ्यांच्या सहभागातून केलेली संमेलनं हे सगळ्यांसाठी घरचंच कार्य असतं. लहान पोरासोरांपासून उंबरठा कसाबसा ओलांडू शकणार्‍या सगळ्या वयोज्येष्ठांचा त्यात सहभाग असतो. अलीकडे ज्येष्ठ लेखक विचारवंत भालचंद्र नेमाडेंची मुलाखत घेतली. ते म्हणतात त्यानुसार गावं जगली ती त्यामध्ये गुंतलेल्या व गुंफलेल्या सेंद्रिय संबंधांमुळे. ते काय म्हणतात याचा अनुभव घेण्यासाठी गावातल्या त्याच मिरमिर्‍या आंबटगोड जिव्हाळ्याचा पोत भूतकाळाच्या वाटेनं समजून घ्यावा लागतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मी खेडेगावातलीच खरं तर. आत्ता गेली २१ वर्षं कोल्हापूरचीच झाली असले तरी त्या आधीची २० वर्षं सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळ्यात काढलेली आहेत. बलुतेदारी राहिली नसली तरी सुतारगल्ली, कुंभारगल्ली, ब्राह्मणगल्ली अशी नावं टिकवून असलेले गल्लीबोळ आणि आळ्या माझ्या भावविश्‍वाचा काही काळ भाग होत्या. लहान वयात अपघातामुळे शारीरिकदृष्ट्या अपंग झाले. घराचा उंबरा ओलांडला, तेव्हा दुसर्‍याच कुणीतरी त्यांना हव्या त्या रस्त्यांवरून फिरवलं. त्या मोजक्या वेळा वगळता एरवी मी माझ्यापाशी असायचे. असं असलं तरी तऱ्हेतर्‍हेच्या माणसांच्या रूपानं गाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतंच हे कळलं.

चिंचेच्या झाडापर्यंत पोहोचायला बाधा येते, तेव्हा एखादी मैत्रीण चिंचेचं गाभुळलेलं बुटूक पोहोचवते आणि चिंच, तिच्यावरची माकडं, तिच्याभवतीचा झाडझाडोरा, हागणदारी, ओढा हे सगळं त्या त्या गंधासहित पोहोचतं. ओढ्यापलीकडची शांताकाकू अर्धा लिटरच्या पितळी तांब्यातून थोडं पाणी मिसळून रतीबाचं दूध आणून घालायची, तेव्हा तिकडचा प्रदेश नकळतपणे त्या सामाजिक भिन्नतेसह पोहोचायचा. त्या वेळी ते आकळायचं नाही, पण सगळे फरक आणि त्यातून कुठे कुठे माणसांनी एकमेकांशी जोडून घेणं पोहोचतंच राहायचं. आपला सन्मान खच्चून राखत आणि त्याची सगळ्यांना जाणीव देत गल्लीत भांडी घासायला येणारी अक्कण दर पौर्णिमा-अमावस्येला कामावरनं सुट्टी घ्यायची आणि पुढच्या दिवशी जास्त खुलून आलेली वाटायची. तसं का? हे कळण्याची अक्कल तेव्हा नव्हती. गूढच वाटायचं अंगात येणं वगैरे. भीतीही वाटायची. मात्र परिस्थितीनं भाजलेल्या, पोळलेल्या, अभावग्रस्त असणार्‍या माणसांची नोंद जेव्हा समाज ‘माणूस’ म्हणून आपणहून घेत नसतो, तेव्हा काय घडतं हे कुठंतरी नोंदलं गेलेलंच असणार. गल्लीत छुपे व्यसनी असतील, पण समोरच्या घरातला पुरुष बेताल ढोसून घरच्यांना शिव्यांनी धुवून काढतो, ते ऐकू येतं.

कुणी एकमेकांच्या डब्यातलं खात नाही, कुणाच्या घरी बाहेरून येणार्‍या जातिबाह्यांसाठी कपबशी वेगळी असते, कुणाच्या घरात राजकारणातले मुरलेले पुढारी असतात, कुणाच्या अंगाला नकोसे वास येतात, कुणाच्या घरात स्वयंपाकघरात राबून स्वत: रांधलेला जिन्नस माजघरात-सोप्यात बसलेल्या पाहुण्यांना वाढायला यायला मनाई असते, हे जग एका जागी खिळूनही मला दिसतंच राहिलं होतं. बघायचं नाही ठरवलं तरी ऐकू येत होतं. ऐकायचं नाही ठरवलं तर स्पर्श करत होतं. एका छोट्या जागेत तुम्ही बद्ध होता, तेव्हा आजूबाजूचं जग जास्तच तीव्र रंगगंधस्पर्शासह तुम्हाला कळू लागतं हा अनुभव मी घेतला.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

मी हे जग कधीतरी लिहीन असं मला वाटलं होतं का? - नाही! अजूनही ठाऊक नाही. मात्र त्या सगळ्याला मुरवून घेऊन मी माझ्या अनुभवांचा आज अर्थ लावते आहे, हे मात्र खरं. सर्वसामान्य सुदृढ शरीराच्या तुलनेत वेगवेगळ्या कारणांनी अपंग झालेल्या ‘शरीरां’ना आणि असं शरीर धारण करणार्‍या जिवंत स्त्री-पुरुषांच्या वाट्याला कळत-नकळत आलेले भेदाभेद, विषम वागणं, मागच्या व पुढच्या जन्मावर भिस्त ठेवून असलेल्या लोकांकडून ऐकलेली मुक्ताफळं, वगळलं जाणं मी काही प्रमाणात अनुभवलं.

सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबामुळं मला हे तडाखे कमी बसले, पण चुकले नाहीत. त्यातून कदाचित व्यापक पातळीवर मी मनोमन विषमतेचा आणि वगळलं जाण्याचा विचार केला असणार. त्याचा सकारात्मक परिणाम मला स्वत:वर झालेला जाणवतो. संवेदनेची पातळी जास्त जिवंत राखता आली आहे, हे कळलं.

एका जागी खिळून राहण्याची वेळ कोविडच्या साथीमुळं सगळ्यांवरच येऊन कोसळली. ही साथ काय आहे, हे कळलं नव्हतं, तेव्हा एक प्रकारच्या बेफिकीरीनं सगळे वागले. आजाराचं स्वरूप वैद्यकीय व्यवस्थेलाही नीटसं कळत नाहीये आणि त्यावरचं नेमकं औषध उपलब्ध नाही, हे लक्षात येईपर्यंत साथ विकोपाला गेली होती. दवाखाने भरून गेले. साथ संसर्गजन्य असल्यामुळे मृतदेहांचे विधी सोडा, त्यांची विल्हेवाट लावायला कुणी तयार होईना. मात्र तरीही माणुसकीच्या जबाबदारीचं भान असणार्‍या व्यवस्थांनी आपली कामं जिवावर उदार होत चोख पार पाडली. दोन वेळच्या भुकेची काळजी नसणार्‍या सगळ्या वर्गातील माणसांनी काही मोजके अपवाद वगळता फक्त टीव्हीच्या बातम्या पाहिल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे आणि सिरीज पाहिल्या. कुणी सरकारची तळी उचलून धरली, कुणी सरकारवर टीका केली. निष्क्रिय काळात निरर्थक उद्योग करत औदासीन्य ओढवून घेतलं. भीती आणि संशयानं स्वत:ची व भवतालच्यांची माती केली.

मात्र जे भान ठेवून, सुरक्षितता पाळून ओळखीच्या-अनोळखी माणसांसाठी उभे राहिले, त्यांना नैराश्यानं शिवलंही नाही. त्यांना धर्मभावना भडकवल्या गेल्याचंही सोयरसुतक नव्हतं. देशभर नव्हे जगभर हाहाकार उडाला होता, अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या चाललेल्या खेळांकडे बघून मनोरंजन करवून घ्यावं की, संतापानं थयथयाट करावा, याचा निर्णय होत नव्हता. मात्र प्रतीकात्मक बोलणं-लिहिणं वगैरेंपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व असण्याची ती वेळ होती. अशा कृतीशील माणसांचं आणि संस्था-संघटनांचं, व्यवस्थांचं चांगलं दर्शन या काळात घडलं. वाहत्या गंगेत हात धुवून घेणार्‍यांचंही घडलं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माणसं चांगली-वाईट असतात, व्यवस्था चांगल्या-वाईट असतात. चिकित्सा करायची वेळ कुठली आणि करणार्‍यांचं कौतुक-त्यांना प्रोत्साहन, आपल्यापरीने मदत करायची वेळ कुठली याचं तारतम्य कसं राखावं याच्या परीक्षेचीही ती वेळ होती. कदाचित आपण या अवघड काळातून बाहेर पडण्याची वेळ जवळ आली आहे. त्यातून जे शिकलो ते नव्या अवघड काळासाठी उपयोगी पडू शकेल. अवघड काळांचा विसर न पडू देता जगण्याचा, माणसांशी जोडलं राहण्याचा, त्यांच्यासाठी उपस्थित असण्याचा सरावच आपल्याला पुढच्या आयुष्यात तारून नेईल असं वाटतं.

कुठल्याही अवघड वेळेत स्वत:ला टिकवायचं कसं हा प्रश्‍न सगळ्यांपुढे ‘आ’ वासून उभा असताना माझी मैत्रीण, ‘लोकमत’ची फीचर एडिटर अपर्णा वेलणकर हिने मला ‘अस्वस्थ काळाचे वर्तमान’ या शीर्षकांतर्गत वेगवेगळ्या लेखक, कवी, चित्रकार, संपादक, पर्यावरण कार्यकर्ते, सिनेमाकर्ते यांच्या मुलाखती घेऊन लिहिण्याची जबाबदारी सोपवली. ते सगळे आपापल्या अनुभवातून आणि जगण्यात दीर्घकाळ मुरण्यातून जे बोलत होते, त्यातून एक लिहिणारी या नात्यानं मला राजकीय-सामाजिक पटावरच्या घटनांचा अर्थ लावण्याचं निराळं भान येत गेलं.

प्रयोगशील व चळवळ्या नाटकवाला म्हणून ज्याची ओळख आहे, त्या अतुल पेठेला मी प्रश्‍न विचारला होता की, ‘अशा अवघड, क्रूर, असंवेदनशील स्थितीत जगायचं कसं?’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मला इथं नोंदवावंसं वाटतं. – ‘‘या कालखंडाला आपण ‘भ्रमितयुग’ म्हणूया. अशी परिस्थिती भीषण असते आणि ती वारंवार उद्भवत असते, मात्र नाहीशीही होत असते. हे आकलन माणसांना लढ्यातून आणि अनुभवातून येत जाते. ज्ञानेश्‍वरांचा कालखंड - तेरावं शतक आणि तुकारामाचा कालखंड - सतरावं शतक. यातील मधल्या वर्षांना महाराष्ट्रात ‘अंधारयुग’ असंच म्हणतात. त्या काळात महाराष्ट्रात एकनाथ सोडला तर द्रष्टा कवीच नव्हता. मात्र अशा दुर्दैवी काळात ‘लव्हाळ्यां’सारखी साधी साधी माणसं काहीतरी करत राहतात, ते महत्त्वाचं आहे. माती पकडून ठेवायची हे त्याचं काम. महापुरात वृक्ष कोसळतात, वाहून जातात, पण लव्हाळी तग धरून राहू शकतात. जी मूल्यं आपल्याला महत्त्वाची वाटतात, ती गंभीरपणे टिकवायचा प्रयत्न या काळात आपण लव्हाळ्यांनी करायचा असतो. अशा काळात जिथं डोळे वटारले जातात, तिथं आपल्या मनात निदान काही प्रश्‍न तयार होतात का हे तपासावे. अशा स्थितीत आपल्या विचार आणि कल्पनाशक्तीवर बंधनं घालता येणं कोणाला तरी शक्य असतं का? सूक्ष्म पातळीवर तरी का होईना, अशी व्यक्ती व्यक्त होणारच. माणसं सदासर्वकाळ अशा तर्‍हेनं मुकी, बहिरी, आंधळी जगू शकत नाहीत. प्रत्येकाला आपली पंचेंद्रियं वापरावीशी वाटतात. काही काळ ती गंजून पडतात अथवा गंजाची जाणीव हरपते, पण एक दिवस आपल्याला लक्षात येतं की, अरेच्चा, आपल्याला स्पर्श कळत नाहीये, गंध येत नाहीये, दिसत नाहीये, चवच लागत नाहीये आणि आपल्याला करोना झालाय! मग उपाय करावे लागतात, प्रतिकारशक्ती कामाला लावावी लागते. ‘इम्युनिटी’ वाढवण्याचा प्रयत्न होतो. त्या वेळी ‘गेली तर गेली चव!’ असं आपण म्हणत नाही, ती परत यावी म्हणून प्रयत्न करतो. हेच सगळं राजकीय, सामाजिक, मानसिक परिस्थितीबद्दल असतं असं मला वाटतं. अशा अवघड कालखंडातच तुमचा कस लागतो. करोना हे रूपक म्हणून बघितलं तर जे व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येतं, तेच सामाजिक पातळीवर ताडता येतं. आता समाजाला विचार करावा लागेल की फुले, आंबेडकर, गाडगेबाबा गेले कुठे? तुकाराम गेला कुठे? त्यांचा समाजाच्या पातळीवर उपयोग आहे की नाही? आपल्याला तुकारामबुवा टिकवता येतो की, नाही यात आपलीसुद्धा लायकी जोखली जाणार. समाजाचं लक्ष कशावर आहे आणि उद्दिष्ट्य काय आहे ते निर्णायक ठरेल. त्यासाठी प्रत्येकाला काही किंमत मोजावी लागेल. त्याकरता ‘आयसोलेशन’ झालेल्या या काळात अधिक मोठी कामं एकेकट्यानं करायचा प्रयत्न करायला हवा. नव्या पिढ्यांकरता या विश्‍वातील ऑक्सिजन मजबूतपणे शाबूत ठेवणं हे आजच्या जिवंत माणसांचं काम आहे, नाही का?”

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

अतुल पेठेनं जो प्रश्‍न विचारला त्याचं उत्तर तुम्ही सगळी माणसे आपापल्या परीने शोधता आहात. एकोप्याची, भावनिक नातं दृढ करण्याची गरज तुम्हाला कळते, म्हणून तर आजचं हे साहित्य, संगीत, कला संमेलन घडून येतं आहे. कला जबाबदारीशिवाय देखणी होत नाही. तिला अनुभवताना आपल्या आसपास असणार्‍या सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्‍नांकडं ती बघायला शिकवते. त्या प्रश्‍नांना सोडवण्यासाठीचा एकोपा, चिकाटी, बौद्धिक खल, संघटन ‘अशा’ व्यासपीठांच्या माध्यमातून जास्त छान होऊ शकतं. आज इथं वाडीचं धार्मिक महत्त्व अधोरेखित करणारी पुस्तकं प्रकाशित होताहेत...

त्यासोबतीनं पुढच्या वर्षी बेकायदेशीर वाळू उपसा, नदीक्षेत्रातील वाढतं प्रदूषण, मगरींचा प्रश्‍न यावर चळवळींनी, कार्यकर्त्यांनी केलेली कामं प्रकाशित व्हावीत, असंही संयोजक पाहतील अशी आशा करते. उदय गायकवाड या माझ्या पर्यावरणीय प्रश्‍न व उत्तरांशी जोडल्या गेलेल्या मित्रानं केरवाडच्या बंडू पाटील व शिरढोणच्या विश्‍वास बालीघाटेचं नाव घेतलं. या सजग कार्यकर्त्यांनी आपल्या परीनं आसपासच्या पर्यावरणाविषयी माणसांना, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याविषयी अशा व्यासपीठांवर जागर घडावा, अशीही इच्छा व्यक्त करते. या फळीतला प्रसाद धर्माधिकारीसारखा तरुण करोनाचा बळी ठरला. त्याच्या हातात असलेली अपुरी कामं आपण समजून घ्यायला हवीत असं वाटतं.

कुमारवयीन आणि किशोरवयीन मुलांसाठीचं हे जग पूर्वीपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. चहूबाजूंनी एकाग्रता भंग करणारी इतक्या माध्यमांची दाटी आहे की, आपल्याला नेमकं काय हवंय हे शोधणं कठीण झालं आहे. त्यांच्या वेगवान जगाविषयी आपल्याला खरं कुतूहल असेल तर ते आपल्याला त्यात प्रवेश देतील. तो प्रवेश मिळवणं म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. मात्र संवाद राखायचा असेल तर प्रयत्न करायला हवेत. ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं’चं चर्‍हाट लावून आपण तो मार्ग नकळत बंद करायला नको. ‘आमच्या वेळी’च्या गोष्टी तुच्छतेच्या किंवा दंभाच्या वेष्टणातून न देता वेगळ्या तर्‍हेनं बोलता येऊ शकतात. कदाचित गोष्ट सांगण्याची पद्धत बदलल्यानं मुलामुलींच्या जगात जाण्याची वेगळी वाट सापडेल. कोण जाणे! आपलीच कुवत तपासावी लागेल, असं वाटतंय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर सातशे वर्षांपूर्वी वसलेल्या, दत्तगुरूंचा दुसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून वाडी क्षेत्र ओळखलं जातं. आपल्या अवतार कार्यात स्वामींच्या अनेक लीला समाजानं अनुभवल्या अशा कथा आहेत. बिदरच्या मुस्लीम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी परत आणली, अशीही एक कथा कानावर आली. ही कथा मी प्रतीकात्मक पद्धतीनं घेऊ बघते आहे. अशा एकत्र येण्यातून, संमेलन-सोहळ्यांमधून तुम्हाला-मला सगळ्यांनाच दृष्टी मिळो, दृष्टीकोन मिळो, याच शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.

sonali.navangul@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......