सु. श्री. कंगना रनौतसारख्या वाचाळवनितांची विचारविलसिते येतात ती ‘हिटलरी प्रोपगंडा’ तंत्रातून…
पडघम - देशकारण
रवि आमले
  • कंगना रनौत ‘टाइम्स नाऊ’च्या कार्यक्रमात बोलताना
  • Sat , 13 November 2021
  • पडघम देशकारण कंगना रनौत Kangana Ranaut स्वातंत्र्य Liberty भीक ‌Bheek

भारतास भीक म्हणून स्वातंत्र्य मिळाले, हे सु. श्री. कंगना रनौत यांचे म्हणणे, तसेच भारतास स्वातंत्र्य मिळाले ते ९९ वर्षांच्या भाडेकराराने हे भाजप युवा मोर्चाच्या प्रवक्त्या सु. श्री. रूची पाठक यांचे विधान ही वाचाळवनितांची विचारविलसिते म्हणून दुर्लक्षिता येणार नाहीत. या विधानांवर कोणाही सुजाण नागरिकाच्या जळजळीत प्रतिक्रिया येणे हे स्वाभाविकच. या मतांवरून या दोन्ही महिलांच्या मेंदूच्या आकाराविषयी शंका उपस्थित होणे, हेही काही असामान्य कृत्य ठरणार नाही. पद्म पुरस्काराने सन्मानित होणे आणि विचारबुद्धी असणे या दोन्हींचा परस्परसंबंध असतोच असे नाही, हे रनौतबाईंनी वेळोवेळी सिद्ध केलेलेच आहे. त्या विचार करू शकतात, असे तर त्यांच्या पाठीशी असलेले जल्पकांचे लष्करही म्हणणार नाही. तरीही त्यांच्या या तथाकथित विचारांची केवळ रेवडी उडवणे वा त्यावर केवळ टीका करणे, हे योग्य ठरणार नाही.

याचे कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीबाबतच्या ज्या धारणा त्या बाळगत आहेत, त्या केवळ त्या दोघींच्याच नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून तसा विचार करणारा एक मोठा समूह या देशात नांदत आहे. रनौत वा पाठक या दोन भगिनी केवळ त्यांचे प्रतिनिधीत्व करत असून, त्यांना शाब्दिक मार देणे, हे आवश्यक असले, तरी पुरेसे नाही. भारताचा इतिहास आणि सत्य याबाबत आस्था असणाऱ्यांना त्याने समाधान नक्कीच मिळू शकेल. पण ते क्षणिक असेल. ते टिकावू असावे याकरता हे असे अ-विचार मुळापासून उखडून फेकणे आवश्यक आहे. त्यात समस्या हीच आहे की, हे लक्षात येईपावेतो खूप उशीर झालेला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘इतिहासाची फेरमांडणी’ नावाचे एक थोतांड आपल्याकडे माजवण्यात आले. त्यामागे एकच सूत्र होते की, आजवर आपणास सांगण्यात वा शिकवण्यात आलेला जो इतिहास आहे, तो सर्व खोटा आहे. ‘आर्य भारतात आले’ येथपासून त्यास प्रारंभ होतो, तो मुघलकाळ मार्गे स्वातंत्र्य चळवळीपर्यंत येतो. इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्याची गरज म्हणून हिंदुस्थानचा ‘खरा’ इतिहास विकृत स्वरूपात मांडला. त्यानंतर मार्क्सच्या अनुयायांनी त्याची अधिक वाट लावली. आता तो डोक्यावर पडलेला इतिहास पुन्हा पायावर उभा करण्यासाठी त्याचे पुनर्लेखन करणे आवश्यक आहे, असे येथील धार्मिक कट्टरतावादी मंडळींचे म्हणणे आहे. या कट्टरतावाद्यांत केवळ हिंदुत्ववादीच येतात असे नाही, मुस्लीम जमातवाद्यांमध्येही हा इतिहास पुनर्लेखनाचा कंडू दिसतो. यांतील हिंदुत्ववाद्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ बोलून थांबत नसतात. सत्ता आणि साधनांची वाट पाहात बसत नसतात. इतिहासाच्या पुनर्लेखनास त्यांनी केव्हाच संस्थात्मक रूप दिले आहे. इतिहासाचे त्यांचे हे नवे ‘संशोधन’ पुस्तके, बौद्धिके, लेख येथपासून अलीकडे व्हॉट्सॲप विद्यापीठांतील लघुलेख, टवाळखोर किस्से, विखारी विनोद अशा विविध मार्गांनी समाजात पाझरत ठेवण्यात येत असते. रनौतादी द्वेषमूर्तींची स्वातंत्र्याबाबतची प्रस्तुत मते, ही अशाच एखाद्या मार्गातून उगवलेली आहेत.

यांपैकी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालाच नाही, गांधीजींच्या भिकेच्या कटोऱ्यात ब्रिटिशांनी स्वातंत्र्य टाकले, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक मतांचा भाग झाला. मतांना तर्क, तथ्य, पुरावा यांचा आधार असावाच लागतो असे नाही. जो जी वांच्छिल तो ती मते बाळगू शकतो. तेव्हा त्यांचा प्रतिवाद करणे, हे अवघडच काम. मात्र भारतास ९९ वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य मिळाले, असे कोणी म्हणत असेल, तर त्याला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे सांगता येऊ शकते. आता तसा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही, कारण मुळातच तसे काही झालेले नाही.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

भारतास ९९ वर्षांच्या कराराने स्वातंत्र्य मिळाले असते, तर ते कोणासही लपवून ठेवता आले नसते. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांसारखी प्रभावी नेतेमंडळी असताना हे कोणासही शक्य झाले नसते. भारताबरोबर वा त्याच्या आगेमागे ब्रिटिश गुलामगिरीतून स्वतंत्र झालेल्या कोणत्याही देशास अशा प्रकारचे भाड्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. मुळातच हे सारे अत्यंत तर्कहीन आहे, धादान्त खोटे आहे. पण तरीही त्यावर या देशातील लाखो शिकले-सवरलेले लोक विश्वास ठेवत आहेत. तेच सत्य आहे असे मानत आहेत. हे असे का, हा खरा प्रश्न आहे. त्याचे उत्तर अत्यंत साधे आहे. या गोष्टी महाअसत्य आहेत आणि म्हणूनच लोक त्या सत्य असल्याचे मानत आहेत. हे सारे प्रथमदर्शनी विचित्र वाटेल, अतार्किक वाटेल. जे अत्यंत खोटे आहे त्याचा स्वीकार लोक खरे म्हणून कसा करतील असा प्रश्न पडेल. याचे उत्तर दिले आहे प्रोपगंडा-पंडित ॲडॉल्फ हिटलरने. 

तो सांगतो, लोकांचा भावनिक गाभा हा सहज भ्रष्ट होऊ शकतो. सामान्य लोकांची मनेही अत्यंत साधी असतात. आदिम साधी. छोट्या खोट्या गोष्टींपेक्षा मोठ्या असत्याला ते हसतहसत बळी पडतात. असे का? तर ही सामान्य माणसे स्वतः नेहमीच लहानलहान खोटेपणा करत असतात. पण मोठ्या प्रमाणावर खोटेपणा करायचा म्हटले तर त्यांचे हात कापतात. ते तसे करू शकत नाहीत. त्यांना शरम वाटत असते त्याची. एखादी महाखोटी गोष्ट तयार करून सांगावी असे कधी त्यांच्या डोक्यातच येत नाही. आणि जर आपल्यात तसे धाडस नसेल, तर दुसऱ्या कोणामध्ये तरी तसे, सत्य विकृत करण्याचे धाडस कसे असेल असे त्यांना वाटत असते. एखादी गोष्ट महाअसत्य आहे असे त्यांना कोणी पुराव्याने सिद्ध करून सांगितले, त्याबाबतची तथ्ये त्यांच्यासमोर ठेवली, तरी ते त्याविषयी शंका घेतील. ते म्हणतील, कदाचित याचे काही वेगळेही स्पष्टीकरण असेल. हिटलर सांगतो, महाअसत्यामध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते. षडयंत्र सिद्धान्त लोकप्रिय होतात, लोक त्यांवर विश्वास ठेवतात याचे एक कारण हेच आहे. ही महाअसत्ये जेव्हा व्यक्तीने बाळगलेल्या अन्य मतांशी जुळतात तेव्हा तर मग ती त्याच्यासाठी ब्रह्मसत्यच बनतात. हेच ते हिटलरचे ‘बिग लाय तंत्र’.

भारतीय स्वातंत्र्याविषयीच्या उपरोक्त महाअसत्यांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग देशात आहे तो यामुळेच. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ज्या नीतिमूल्यांच्या पायावर उभी होती, ती सर्वच येथील धार्मिक सत्ताकारणाला छेद देणारी होती. त्या चळवळीने येथील कट्टरतावाद्यांच्या सामाजिक सत्तेचा पाया खिळखिळा केला होता. त्यांच्या हितसंबंधांच्या आड ती येत होती. परिणामी तिला त्यांचा विरोध हा असणारच होता. त्यामुळेच या वर्गाने प्रारंभीपासून भारतीय स्वातंत्र्याविषयी अपप्रचार आरंभिला. आजवर त्यांची केवळ कुजबूज होती. आता तिचा सार्वत्रिक बुजबुजाट झाला आहे. याचा सामना करणे सोपे नाही. कारण ही बिमारी आहे. ती खूप दिवसांची आहे, खोल मुरलेली आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

असा आजार एका दिवसात बरा होत नसतो. त्यासाठी दूरगामी प्रयत्न आहेत. त्यांची सुरुवात ही सातत्याने सत्ये, तथ्ये, वास्तव समोर आणणे यांपासून करावी लागणार आहे. पत्रकारितेच्या वर्गात सांगतात, की प्रत्येक बातमीत सहा ‘क’ असले पाहिजेत. ते म्हणजे - काय, कधी, कोणी, कुठे, का आणि कसे. तरच ती बातमी परिपूर्ण होते. पत्रकारिता आणि जाहिरातकला यांचा ‘पाट लागल्या’चा आजचा काळ आहे. हे सत्योत्तरी सत्याचे युग आहे. अशा वेळी लोकांनीच बातमीदारीतील हे सहा क-कार अंगवळणी पाडून घ्यावेत. शंका घ्याव्यात, प्रश्न विचारावेत हे सांगावे लागणार आहे. काम मोठे आहे. ‘सत्यमेव जयते’ हा मुण्डकोपनिषदाच्या तिसऱ्या मुण्डकातील मंत्र. तो आपले राष्ट्रीय विधान आहे. त्याला जागण्यासाठी तरी हे काम करावे लागेल.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Sun , 14 November 2021

माझ्या लहानपणी आम्ही चरखा चलाचलाके लेंगे स्वराज लेंगे हे गीत म्हणायचो. या गीताने जर ज्यांनी स्वातंत्र्य मिळवायला आपल्या जीवाचे दान दिले त्यांचा जर अपमान झाला नसेल तर मग कंगणाच्या बोलण्याने का व्हावा?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......