दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पत्रकार प्रगती बाणखेले यांच्या निवडक रिपोर्ताजचं ‘ऑन द फिल्ड’ हे पुस्तक नुकंतच पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
‘ऑन द फिल्ड’ हे माझं पहिलंच पुस्तक वाचकांच्या हाती देताना मनापासून आनंद होतोय. पत्रकार म्हणून अनेक वर्षं लिहीत असले, तरी पुस्तकाच्या माध्यमातून आपलं लिखाण वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद वेगळा असतो. पुस्तकरूपानं लिखाण दीर्घ काळ राहतं आणि वाचक ते अधिक निगुतीनं वाचतात. त्यामुळे या पुस्तकाचं महत्त्व माझ्यासाठी अधिक आहे.
गेल्या काही वर्षांत विविध विषयांवर लिहिलेले लेख एकत्रित करून त्यांचं पुस्तक करायचा विचार समोर आला, तेव्हा ते लेख आज किती सुसंगत आहेत, ही शंका सर्वप्रथम मनात आली. मग त्यानुसार तपासून पाहिलं, तेव्हा त्यातले बहुतांश विषय आजही ताजेच आहेत; किंबहुना त्यातील काही समस्या अधिकच गंभीर झाल्या आहेत, असं प्रकर्षानं जाणवलं. काही विषयांच्या बाबतीत ‘आज काय स्थिती आहे?’ असा प्रश्न वाचकांच्या मनात येणं साहजिक होतं, म्हणून प्रत्येक लेखाच्या अखेरीस एक छोटंसं टिपण जोडायचं ठरवलं. त्यामुळे हे लेख वाचताना वाचकाला मधल्या काळाचा सुटलेला संदर्भ भरून काढता येईल, असं मला वाटतं.
..................................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
पत्रकारितेत असल्यानं सातत्यानं वेगवेगळ्या तत्कालीन विषयांवर लिखाण करावं लागतंच. पुष्कळदा ते दैनिकात जाणार असल्यानं छोट्या लेखाच्या स्वरूपात किंवा स्फुट असतं. पण दिवाळी अंकाच्या निमित्तानं सविस्तर लिहिण्याची संधी मिळते. गेली काही वर्षं ‘रिपोर्ताज’ या माझ्या आवडत्या प्रकारात मी काम करत आहे. बातमीमागची बातमी शोधणं, समस्येच्या मुळाशी जाऊन तपासणं, संबंधित लोकांशी त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष बोलणं, यातून त्या प्रश्नाची व्यापकता, खरं स्वरूप सविस्तरपणे समोर आणता येतं. पुरेसा वेळ घेऊन काम करता येत असल्यानं सगळ्या बाजू विस्तारानं जिवंत अनुभवानिशी मांडता येतात. या पुस्तकातील बहुतेक लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यात अर्थातच मी काम करत असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेले लेख सर्वाधिक आहेत.
२०१३मध्ये ‘कराची प्रेस क्लब’च्या निमंत्रणावरून आम्ही काही पत्रकार पाकिस्तान भेटीवर गेलो होतो. या भेटीमुळे पाकिस्तानकडे, विशेषत: तिथल्या लोकांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलून गेला. पाकिस्तानमधील घटनांकडे मी अधिक सजगपणे पाहू लागले, त्याविषयी वाचू लागले. त्यातून भारत-पाकिस्तान संबंधांविषयीच्या घडामोडींकडे राजकारणापलीकडे जाऊन मानवी भावनेनं पाहता येऊ लागलं.
केवळ एकमेकांच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याच्या कारणावरून भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार एकमेकांच्या तुरुंगात सडत राहतात. एकदा कराचीच्या तुरुंगात मरण पावलेल्या गुजरातमधील एका मच्छिमाराचा मृतदेह मुंबईमार्गे गुजरातकडे जाणार होता, त्या प्रक्रियेशी जवळून संबंध आला, तेव्हा या प्रश्नाचं विदारक स्वरूप ध्यानात आलं. मग गुजरात आणि दीवला जाऊन पाकिस्तानी तुरुंगातून सुटून आलेल्या मच्छिमारांशी, तुरुंगात असलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष बोलून समोर आलेलं वास्तव ‘निळा दर्या लाल रेघ’मधून मांडता आलं.
पाकिस्तान भेटीत अनुभवलेलं भगतसिंगांचं हौताम्यस्थळ असलेलं ऐतिहासिक लाहोर शहर ‘मैंने लाहोर देख्या’मधून मांडलं आहे. ‘आँखो को विसा नहीं लगता’ या लेखात प्रेमासाठी धोका पत्करून अवैध मार्गानं पाकिस्तानात गेलेला आणि गुप्तहेर म्हणून तिथल्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागलेला मुंबईचा उच्चशिक्षित तरुण हमीद अन्सारी आणि त्याच्या सुटकेसाठी दोन्ही सरकारंच नव्हे तर, यूएनपर्यंत लढणारी त्याची आई फौजिया अन्सारी यांची गोष्ट आहे. या तिन्ही लेखांमधून एक वेगळं पाकिस्तान वाचकांसमोर उलगडेल, याची खात्री आहे.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
माझी ती पाकिस्तान भेट आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाची यासाठी की, त्यानंतर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध वेगानं बिघडत गेले. इतके की, आमच्या त्या भेटीनंतर वर्षभरात पाकिस्तानात काम करत असलेले दोन पत्रकार, ‘हिंदू’च्या मीना मेनन आणि ‘पीटीआय’चे स्नेहेश अलेक्स फिलिप या दोघांना माघारी धाडण्यात आलं. एवढंच नव्हे, तर गेल्या आठ वर्षांत मुंबईहून पत्रकारांचा एकही गट पाकिस्तानात जाऊ शकलेला नाही.
‘साऊथ एशियन फॉर ह्यूमन राइट्स’ (SAHR) या श्रीलंकास्थित संस्थेच्या निमंत्रणावरून दक्षिण आशियातील निवडक पत्रकारांसोबत अनुभवलेली यादवी युद्धानंतरची श्रीलंका हा एक हादरवून टाकणारा अनुभव होता. त्रिंकोमाली वगैरे शहरांची नावं आपण यादवी युद्धादरम्यान बातम्यांमधून वाचलेली असतात. जिथं तमीळ वाघ आणि श्रीलंकेचं लष्कर यांच्यात घमासान युद्ध झालं. त्या भागांत प्रत्यक्ष हिंडायला मिळणं आणि या यादवीचे चटके ज्यांना बसले, त्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोलता येणं, हा अनुभव नशिबानेच मिळाला असं म्हणावं लागतं. कारण आज श्रीलंकेत राजपक्षे सरकारच्या राजवटीत लोकशाहीचा गळा घोटला जात असताना तमीळबहुल भागात परदेशी पत्रकारांच्या अशा भेटींना परवानगी मिळणं अशक्य. एखाद्या देशात यादवी युद्ध होतं, तेव्हा तिथल्या कित्येक पिढ्यांचं जगणं कसं विस्कटून जातं, हे या रिपोर्ताजमधून अनुभवता येईल.
तृतीयपंथीयांचं जग हा सातत्यानं माझ्या लिखाणाचा, वृत्तांकनाचा विषय राहिला आहे. तृतीयपंथी त्यांच्या विश्वाची दारं सहजपणे कुणासाठी उघडत नाहीत, असं म्हणतात. पण मला हा विश्वास संपादन करता आला. त्यातून गौरी सावंत, दिशा शेख, शमिभा, प्रिया पाटील, माधुरी सरोदे यांसारख्या तृतीयपंथी कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. ‘गणेश ते गौरी - एका अर्धुकाचा प्रवास’ हा गौरी सावंतच्या अनोख्या आयुष्याचा प्रवास उलगडणारा लेख आणि तृतीयपंथीयांच्या आयुष्याची ओळख करून देणारा ‘तिसऱ्या जगात’ हे लेख वाचल्यावर वाचकांचे तृतीयपंथीयांबद्दलचे पूर्वग्रह दूर होतील, याची खात्री वाटते.
गर्भलिंग तपासण्या आणि लिंगनिवडीतून होणारे गर्भपात, यावर मी सतत लिहीत आहे. २०११च्या जनगणना अहवालानंतर हरयाणातील मुलींची संख्या प्रचंड घटली होती. त्यानंतर त्या राज्यानं ही स्थिती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले आणि ते कितपत यशस्वी झाले, हे ‘हरयाणा बदल देंगे’ या लेखामधून वाचता येईल.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘बालाघाटातील बालवधू’ हा लेख माझ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील वृत्तमालिकेच्या आधारे पुन्हा लिहिला आहे. ‘पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो’ या वॉशिंग्टनच्या संस्थेनं बालविवाह या विषयावर काम करण्यासाठी दिलेल्या अभ्यासवृत्तीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील बालविवाहांच्या समस्येवर लिहिलं होतं. हे सारे अनुभव चटका देणारे होते. कोविड काळात कायदा राबवणारी माणसं पोहोचणार नाहीत, या खात्रीनं देशभरात अनेक कोवळ्या मुलींना बोहल्यावर चढवलं गेलं. बालविवाह ही कुठेतरी दूर राजस्थान, बिहारमध्ये नव्हे, तर आपल्या शेजारी घडणारी गोष्ट आहे, याची जाणीव अद्याप आपल्याकडे नाही. नोंदवल्या जाणाऱ्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष होणारे बालविवाह कितीतरी अधिक आहेत. त्यातून या मुलींचं आयुष्य किती भीषण वळण घेतं, ते ‘बालाघाटातल्या बालवधू’ या लेखात वाचायला मिळेल.
ऊसतोडणी कामगिरांच्या मुलांचं शिक्षण हा आणखी एक ज्वलंत प्रश्न. ८ ते १४ वर्षं वयोगटातल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्यातलाही आता ११ वर्षं उलटली. अद्यापही ही मुलं शाळेच्या वर्गात अक्षरं गिरवण्याऐवजी फडात ऊस तोडतात. त्यांच्या शिक्षणाच्या दशा आणि दिशेबद्दल मी ‘शिक्षणाच्या हक्कावर अर्धा कोयता’ हा रिपोर्ताजमधून मांडलं आहे.
डोक्यावर छप्पर नाही, सांगण्यापुरतंही गाव नाही असं आयुष्य वाट्याला असलेली माणसं देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षं झाली, तरी जगणं शोधायला भटकत आहेत. ‘भटके आयुष्य’ अशा वर्गवारीशिवाय त्यांच्या वाट्याला फार काही आलेलं नाही. अशाच काही भटक्यांनी महानगरी मुंबईत आश्रय घेतला आहे. ही माणसं कशी जगतात, याची शोधयात्रा ‘भटक्यांची मुंबई’मधून वाचकांना अनुभवता येईल.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
‘गावकारभारणी’ या लेखातून ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर सत्तेत बायकांच्या वाट्याला खरंच अर्धा वाटा आला का, याचा धांडोळा घेतला आहे. राजकीय हक्क बरोबरीनं मिळाल्याशिवाय सक्षमीकरणाची वाट ताकदीनं चालता येणार नाही, याची खूणगाठ बांधलेल्या गावकारभारणींना गावं बदलायची संधी मिळाली असली, तरी त्यांना राज्य आणि देश बदलायला विधानमंडळं आणि संसदेत जायचं आहे. या वाटेवर नेमकं काय वाढून ठेवलं आहे आणि हा प्रवास किती कठीण आहे, हे या लेखातून समजून घेता येईल.
हे सगळं लिखाण एकत्र करून त्यात पुस्तकाच्या दृष्टीनं सूचना करणं, माझ्या हजार शंका शांतपणे ऐकून घेऊन त्यांना उत्तर देणं, रेंगाळत काम करणाऱ्या मला रुळांवर ठेवणं ही कामं आमचा जुना कुटुंबस्नेही प्रसिद्ध लेखक, संशोधक संजय सोनवणीनं त्याच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून न कंटाळता केली. त्याच्या सततच्या दट्ट्याशिवाय हे पुस्तक पूर्ण झालं नसतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एका पत्रकाराचं रिपोर्ताजच्या पठडीतलं लिखाण प्रसिद्ध करण्याची केवळ तयारीच नव्हे, तर उत्साहानं ते अल्पावधीत मार्गी लावणाऱ्या ‘प्राजक्त प्रकाशना’च्या जालिंदर चांदगुडे यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. अत्यंत अर्थपूर्ण मुखपृष्ठामधून पुस्तकाचा नेमका आशय वाचकांपर्यंत पोहोचवणारे संतोष घोंगडे, पुस्तकाची सुबक छपाई करणारे एम. के. प्रिंटर्स, अक्षरजुळणी करणारे सॉफ्टवर्ल्ड सर्व्हिसेस आणि मुद्रितशोधन करणारे नरेंद्र आढाव आणि मीनाक्षी मेमाणे-समगीर यांचा पुस्तक दर्जेदार करण्यात मोलाचा वाटा आहे.
हे पुस्तक तुम्हाला कसं वाटतं, याबद्दल अपार उत्सूकता आहे. तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.
‘ऑन द फिल्ड’ – प्रगती बाणखेले
प्राजक्त प्रकाशन, पुणे
पाने – १८४, मूल्य – २४० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment