अजूनकाही
उत्तर प्रदेशात भाजप इतका घाबरलेला का दिसू लागलाय? पक्षाच्या आक्रमकतेमागे दडलेली भीती आत्मविश्वासाचा मुखवटा फाडून बाहेर का डोकावतेय? मागच्या साडेसात वर्षांत पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर या प्रकारची भीती दिसू लागली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक मोहिमेमध्ये योगी आदित्यनाथ यांना हिंदुत्वाचा चेहरा बनवण्यात अपयश आलं, तेव्हाही हा पक्ष आपल्या इतका घाबरलेला- बावरलेला नव्हता. या वेळी तर योगी आदित्यनाथ आपल्याच राज्यात निवडणुकीला सामोरं जात आहेत. असं वाटतंय की, उत्तर प्रदेशबरोबर पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसह १३ राज्यांत २९ विधानसभा आणि तीन लोकसभा जागांसाठी झालेल्या पुनर्निवडणुकीतल्या पराजयानं भाजपला जणू आतून हलवून टाकलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या तीन आणि लोकसभेची एक जागा काँग्रेसने खेचून घेतली. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात होती की, रविवार नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एका परिवारा’वर मोठा हल्ला करतील. झालंही तसंच. काँग्रेसने खेचून घेतलेली मंडी लोकसभेची जागा भाजपने अडीच वर्षांपूर्वी चार लाख मतांनी जिंकली होती. या पुनर्निवडणुकीच्या वेळी भाजपच्या अजेंड्यावरून काँग्रेस जवळपास गायब झाली होती. पण आता ती पुन्हा भूतासारखी समोर उभी ठाकलीय.
..................................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
पंतप्रधान ज्या वेळी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीला संबोधित करत होते, त्याच वेळी भाजपच्या चिंतेचं केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की, दीपावलीच्या निमित्तानं अयोध्येत सरयू नदीच्या किनाऱ्यावर हजारो लीटर मोहरीचं तेल खर्च करून १२ लाख दिवे लावण्यात आले होते. त्यातील बहुतांश दिवे जोराच्या वाऱ्यामुळे विझताच आजूबाजूच्या परिसरातील शेकडो गरीब मुलांनी आपापल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये ते तेल भरण्यासाठी गर्दी केली होती. मोहरीच्या तेलाचा दर सध्या २६५ रुपये प्रति लीटर आहे. ते उत्तर प्रदेशमधल्या ३० टक्के जनतेला विकत घेणं परवडण्याजोगं नाही. भाजपच्या दृष्टीनं उत्तर प्रदेशचं महत्त्व खूप आहे. कारण निवडणुका तर पाच राज्यांमध्ये होत आहेत, पण दिल्लीतल्या बैठकीत फक्त योगी आदित्यनाथ यांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. बाकीच्या नेतृत्वस्थानी असलेल्या पक्षनेत्यांशी व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. एवढंच नव्हे तर, कार्यकारिणीमध्ये पक्षाचा राजकीय प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारीही योगी आदित्यनाथ यांच्यावरच सोपवण्यात आली होती. २०१७ आणि २०१८मध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये राजकीय प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथसिंह यांनी पार पाडली होती.
याविषयी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘योगी आदित्यनाथ भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते संसदेत खासदारही होते. योगीजींनी करोना महामारीच्या काळात लोकांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत राजकीय प्रस्ताव का सादर केला जाऊ नये?’
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांना दिल्या गेलेल्या अतिमहत्त्वाकडे दोन दृष्टीकोनातून पाहता येऊ शकतं. पहिला म्हणजे, केंद्र सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये ‘सब कुठ ठीक’ चाललेलं नाही ही शक्यता. दुसरा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या लखनौ दौऱ्यात येत्या निवडणुकीला मोदींच्या ‘सत्तावापसी’शी जोडणाऱ्या वक्तव्यामुळे. त्यांनी म्हटलं होतं की, ‘मोदींच्या नेतृत्वाखाली २०२४ची लोकसभा निवडणूक जिंकायची आहे, त्याची पायाभरणी करण्याचं काम उत्तर प्रदेशची २०२२ची विधानसभा निवडणूक करणार आहे. मी हे उत्तर प्रदेशच्या जनतेला सांगायला आलो आहे की, मोदीजींना २०२४मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं असेल, तर २०२२मध्ये पुन्हा एकदा योगीजींना मुख्यमंत्री बनवावं लागेल. तेव्हाच देशाचा विकास होऊ शकतो.’
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
निवडणूक निकालाबाबत भाजपच्या शंका-आशंका अमित शहा यांच्या चिंतेतून स्पष्टपणे पाहायला मिळतात. आणि कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनामधूनही. पंतप्रधान कार्यकर्त्यांना म्हणाले की, त्यांनी सामान्य जनता आणि पक्ष यांच्यातला पूल व्हावं. टीकाकार असंही म्हणू शकतात की, सामान्य जनता आणि पक्ष यांच्या दरम्यान दरी निर्माण झाली आहे आणि ती मोदींनी ती ओळखली आहे.
तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पुन्हा निवडून आणण्याविषयीची चिंता भाजपला आत्तापासूनच घेरू लागली आहे. पण तशी काही चिंता सामान्य जनतेमध्ये दिसत नाही. इतकंच काय पण ज्या राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे आणि त्यातील बहुतेकांना २०२४च्या आधी विधानसभा निवडणुकीचा सामना करायचा आहे, तेथील सामान्य जनतेमध्येही ती दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या आधी जिथं विधानसभा निवडणूक होणार आहे, अशा राज्यांची संख्या १६ इतकी आहे. या राज्यांत लोकसभेच्या जवळपास अडीचशे जागा आहेत. त्यात केरळ, तामिळनाडू, प. बंगाल, महाराष्ट्र ही राज्यं समाविष्ट नाहीत. भाजपला ही चिंता वाटत असावी की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील (जिथं एकेक करून दोन मुख्यमंत्र्यांना अलीकडेच हटवण्यात आलंय.) विपरीत निकालाचा परिणाम येत्या निवडणुकीवर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होऊ शकतो. शेअर मार्केटची गोष्ट अजूनच वेगळी आहे. हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या पुनर्निवडणुकीच्या निकालाच्या परिप्रेक्ष्यात पंतप्रधानांचा ‘एका परिवारा’वरील कोप समजण्यासारखा आहे. कारण कमीत कमी दोनशे लोकसभा जागा अशा आहेत, जिथं एकतर काँग्रेस सत्तेत तरी आहे किंवा मुख्य विरोधी पक्ष तरी आहे.
खूप प्रयत्न करूनही भाजपला २०१७प्रमाणे उत्तर प्रदेशात मंदिर आणि हिंदुत्व हा विधानसभा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवता येत नाहीये. यातून या पक्षाची चिंता समजून येते. धर्माच्या नावावर अयोध्येत कोट्यवधी रुपये खर्च करून पेटवलेल्या दिव्यांतलं तेल गरीब मतदारांनी आपल्या उपाशी पोटांत सामावून टाकलं, आणि केंद्र सरकारला इशाराही दिलाय.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
त्यामुळे योगी आदित्यनाथ आपला विजय निश्चित करण्यासाठी हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच कायम राहतील कि अन्य पर्यायांचाही प्रयोग करून पाहतील? (उदा. त्यांनी नुकताच केलेला पश्चिम उत्तर प्रदेशातील कैरानाचा दौरा.) ते पर्याय कोणते असू शकतात? निवडणूक आणि युद्धात आता सारं काही क्षम्य झालेलं आहे. त्यामुळे नव्या पर्यायांवर चोरपावलांनी काम सुरू केलेलं असलं तरी आश्चर्य वाटायला नको.
येत्या तीन महिन्यांत उत्तर प्रदेशमधल्या सामान्य जनतेचं बरंच काही पणाला लागणार आहे. त्यामुळे तिला प्रत्येक घडामोडीकडे बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण या राज्यात भाजपकडून जे तोडगे\पर्याय वापरले जाणार आहेत, त्याच्या यशापयशाच्या ‘फोटो कॉपीज’ येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत.
अनुवाद - टीम अक्षरनामा
.................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख https://lalluram.com या हिंदी पोर्टलवर ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://lalluram.com/article-why-is-bjp-looking-so-scared-shravan-garg/
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment