अजूनकाही
मराठीत दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी तीन-चारशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. यंदा दिवाळी अंकांच्या या परंपरेला १११ वर्षं झाली. काही अंक सत्तर-ऐंशी वर्षांपासून नियमित प्रकाशित होतात. ‘वास्तव’ हा तसा अलीकडेच सुरू झालेला एक प्रयोगशील दिवाळी अंक. यंदाचे त्याचे पाचवे वर्ष. ‘वास्तव’चा पहिला अंक सनदी अधिकाऱ्यांच्या प्रवासावरील ‘स्वप्न साकारताना’, दुसरा निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा उहापोह करणारा ‘राजकारण निवडणुकांपलीकडे’, तिसरा आरक्षणाच्या विविध पैलूंचा उलगडा करणारा ‘आरक्षण’ आणि चौथा राजकारण व राजकीय व्यक्तींवर आधारित ‘राजकारणातलं संचित’ या विषयांवर होता. यंदाचा पाचवा अंक ‘करोनानंतरच्या विश्वाचा वेध’ या विषयावर आहे. करोनामुळे शिक्षण, भाषा, कुटुंबसंस्था, राजकारण, प्रसारमाध्यमे, जीवनशैली अशा विविध क्षेत्रांवर काय परिणाम झाले, होतील, याचा आढावा या अंकात विविध मान्यवरांनी घेतला आहे. या अंकाला संपादक किशोर रक्ताटे-सुरेश इंगळे यांनी लिहिलेलं हे संपादकीय खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...
.................................................................................................................................................................
करोना हा गेल्या दीड वर्षापासून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा एक अविभाज्य घटक बनला आहे. जगाने आजवर अनेक महामारींचा सामना केला आहे, अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले आहे. मात्र, एकाच वेळी जगातील प्रत्येक नागरिकाला झळ बसली, असे करोनाच्या महामारीमध्ये पहिल्यांदाच घडताना दिसले. आगामी किमान दोन दशके तरी करोनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आपल्या समाजावर, व्यवसायांवर, जीवनशैलीवर, तसेच सर्वच प्रक्रियांवर राहणार आहे. अशा या करोना महामारीचा सामना करणे आणि त्यामुळे होत असलेली अपरिमित हानी वाचवणे भारतालाच नव्हे, तर कोणत्याही प्रगत देशांनाही जमले नाही. ही हानी वाचवण्यासाठी सर्वच देश आपापल्या परीने अंधारात चाचपडत होते. अखेर, या चाचपडण्यातून करोनावर आलेली लस आणि मोठ्या प्रमाणातील लसीकरण हे कुट्ट अंधारातील कवडसेच म्हणावे लागतील.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मार्च २०२०पासून सुरू झालेल्या करोनाच्या पहिल्या लाटेतून ही महामारी किती रौद्र रूप धारण करणार आहे, हे दिसून आले होते. ते दुसऱ्या लाटेत प्रत्यक्षातही उतरले. या काळात प्रत्येक नाण्यांच्या दोन बाजू अनुभवायला मिळत होत्या. या कालावधीत माणूस कमालीचा संवेदनशील झालेला पाहायला मिळाला. तसेच, या महामारीच्या दहशतीने मनावर इतके दडपण निर्माण केले, की काही जणांच्या मानवी संवेदनाच बोथट झाल्या. एकीकडे करोना रुग्णांना, मदतीचा धावा करणाऱ्या नातेवाईकांना बेफिकीर शेजाराचे अनुभव आले. तर, दुसरीकडे रक्ताचे कोणतेही नाते नसताना हजारो हात मदतीला धावून आले. एकीकडे आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणे हाच धर्म मानून कार्यरत असलेले आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी, स्मशानभूमीत स्वयंसेवेने कार्यरत असलेले कर्मचारी, पोलीस, प्रशासनातील कर्मचारी असे ‘फ्रंटलाइन वर्कर’ दिसून आले. तर, दुसरीकडे केवळ स्वत:चाच नव्हे, तर इतरांचाही जीव धोक्यात घालू पाहणाऱ्या गर्दीचे संतापजनक वर्तनही दिसून आले. मानवी स्वभावाच्या विविध रूपांचे दर्शन घडवून आणलेल्या या करोनामुळे जवळची अनेक नाती दूर झाली, तर दूरची अनेक नाती जवळ आली. अनेकांना आपला आधार गमवावा लागला, तर अनेकांना आधार देणारे हात पुढे आले. असा हा अशाश्वत काळ काहीसा मागे लोटून आता आपण पुढे जाऊ पाहात आहोत. परंतु, या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा मात्र आपल्या मनावर घट्ट कोरलेल्या आहेत अन् त्या तशाच राहतील, यात काही शंका नाही.
करोनाकडे पाहताना सकारात्मक नजरेने किंवा भूमिकेने पाहता येत नाही. कारण, करोनाने समाजाचे जे अनपेक्षित नुकसान केले आहे, ते लवकर भरून निघणारे नाही. तरीही प्राप्त परिस्थितीत बदलांसाठी आणि भविष्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्याच्या बळावरच आपण खचल्यानंतर सावरतोही. या सकारात्मक दृष्टिकोनाची आपल्याला सांगड घालता यायला हवी. नकारात्मक वाटेवरून सकारात्मकतेच्या संवेदनशील पायवाटेला विस्तारता यावे, यासाठीची धडपड करावीच लागते. तीच धडपड आपण ‘वास्तव’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून करत आहोत.
खरे तर कोणत्याही वर्तमानाचे संचित मांडताना भविष्याचा वेध घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. करोनाने सर्वांच्याच वागण्या-जगण्यावर केलेला खोलवर परिणाम आपण अनुभवत आहोत. ज्या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागले, ते एरव्हीच्या बदलांपेक्षा विलक्षण वेगळे आणि अधिक गतिमान आहेत. बदल घडणे आणि घडवणे आपल्यासाठी समाज म्हणून स्वाभाविक प्रक्रियेचे भाग आहेत. करोनामुळे काय घडले, हे प्रत्येक जण त्याच्या परिप्रेक्ष्यात सांगू शकेल. परंतु, साधारणपणे मुख्य प्रवाहातील अतिशय महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यांकडे पुन्हा नव्याने कसे पाहायचे, याचा सम्यक दृष्टिकोन साधता यावा म्हणून करोनापश्चात जगाचा वेध येथे घेत आहोत.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
माणसांसाठी तसा संसर्गजन्य असलेला करोना जगाच्या इतिहासात एकाच वेळी आपल्याच संसर्गाचा अवीट असा दुर्दैवी ठसा उमटवण्यात यशस्वी झाला आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगावर परिणाम केलेल्या करोनाचा जगातील प्रत्येक क्षेत्रावर आमूलाग्र परिणाम झाला आहे. या सर्वांचे समग्र चित्रण या दिवाळी अंकाच्या रूपाने करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
‘वास्तव’चा हा यंदाचा पाचवा दिवाळी अंक. यापूर्वी सनदी अधिकाऱ्यांच्या प्रवासावरील ‘स्वप्न साकारताना’, निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा उहापोह करणारा ‘राजकारण निवडणुकांपलीकडे’, आरक्षणाच्या विविध पैलूंचा उलगडा करणारा ‘आरक्षण’, राजकारण व राजकीय व्यक्तींवर आधारित ‘राजकारणातलं संचित’ या आतापर्यंतच्या चार दिवाळी अंकांचे वाचकांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. परंतु, २०२० च्या दिवाळी अंकाचे नियोजन सुरू असतानाच करोनाची छाया अधिक गडद होत चालली होती. त्यामुळे, आम्ही अंक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला होता. २०२१चा अंक प्रकाशित करताना करोनाची भळभळती जखम नसेल, असा आशावाद आम्हाला होता. परंतु, करोनाने तो सपशेल खोटा ठरवला. संपूर्ण वर्षच करोनाकेंद्रित असल्याने अखेर ही जखम घेऊनच आम्ही यंदा करोना या विषयावर वाहिलेलाच अंक प्रकाशित करत आहोत.
करोनाचा विविध क्षेत्रांवर काय परिणाम झाला, त्यातून कोणती आव्हाने वा संधी निर्माण झाल्या, याचा उहापोह या अंकात केला आहे. नावीन्यता, नामवंत लेखक, दर्जेदार लेखन, आकर्षक मांडणी व सजावट हे आपल्या ‘वास्तव’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. आपण तो यंदाही जपला आहे.
आरोग्याच्या क्षेत्राबरोबरच करोनाने सर्वाधिक परिणाम केलेले क्षेत्र म्हणजे शिक्षण. या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले बदल, राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यामागील भूमिका यांविषयी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पहिल्याच लेखात विस्तृत विवेचन केले आहे. प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्रसाद पानसे, सौ. मनीषा लबडे यांनी या काळातील शिक्षण आणि भविष्यातील वाटचाल यांविषयी अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. तर, बांधकाम क्षेत्रावर करोनामुळे मोठा परिणाम झाला आहे, त्याविषयी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंकुश आजबे यांनी लेख लिहिला आहे.
करोनामुळे सगळे जग ठप्प झालेले असताना, सरकारी यंत्रणेकडे सामान्य माणूस आशाळभूतपणे पाहत असताना राजकारणावरही परिणाम होणे स्वाभाविकच आहे. या काळामध्ये सर्व जगातील सरकारांची भूमिका बदलताना दिसून आली, या राजकीय मानसिकतेतील बदलांवर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी भाष्य केले आहे. तर, करोनोत्तर काळात म्हणजेच, उद्याचे जग व जगाची साहित्य-संस्कृती आणि समाजजीवन कसे असेल? हे माजी सनदी अधिकारी आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उलगडून दाखवले आहे. करोना काळात माध्यमांची विश्वासार्हता, भूमिका यांवरही चर्चा झाली. त्यावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. राम जगताप यांनी करोनामुळे पारंपरिक आणि ऑनलाइन माध्यमांपुढे जी अरिष्टे निर्माण झाली आहेत, त्याचा विस्तृत आढावा घेतला आहे. नीलेश बने यांनी मराठी आणि भारतीय प्रादेशिक भाषांवर कोरोनाचा पडलेला प्रभाव याचा वेध घेतला आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
‘वर्क फ्रॉम होम’ने नेमके काय साधले, याचे वास्तव ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी आपल्या लेखात मांडले आहे. करोनाने आपल्याला सर्वांगीण विकासाचा काय धडा मिळाला आहे आणि काय संधी मिळाली आहे, हे डॉ. विवेक घोटाळे यांनी लेखातून मांडले आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या परिसरातील आरोग्य सेवा, इमारतींची रचना, हवेशीर जागा यांची गरज प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये दिसून आली. त्यामुळेच, नगररचनेतील आतापर्यंतच्या त्रुटी आणि भविष्यातील गरज यांविषयी गंगाधर बनसोडे यांनी लेख लिहिला आहे. तर, पहिल्या लॉकडाउनमध्ये झालेले स्थलांतर, ग्रामीण भागातील रोजगार यांविषयी डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी मूळापासून मांडणी करणारा लेख लिहिला आहे. करोना काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आढावा मधुबन पिंगळे यांनी घेतला आहे.
करोना काळात कुटुंबव्यवस्थेत अनेक चांगल्या गोष्टीही अनुभवायला मिळाल्या, तशाच अनेक दोषही आढळून आले. या बदललेल्या कौटुंबिक वातावरणावर अॅड. वंदना घोडेकर यांनी प्रकाश टाकला आहे. सोलापूर शहरात सरकारी आरोग्य सेवेमध्ये काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात यावर डॉ. अग्रजा वरेरकर यांनी अनुभवपर लेख लिहिला आहे. करोना काळात शहरी व ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसमोर आलेल्या अडचणी व करोनानंतर डॉक्टरांकडे पाहण्याचा रुग्णांचा, नातेवाईकांचा दृष्टीकोन पाचोरा येथील डॉ. भूषण मगर यांनी मांडला आहे.
मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये नवा अध्याय सुरू होताना, दीड वर्षांमध्ये ओटीटीने प्रत्येकाच्या मोबाइलची जागा घेतली आहे. त्याविषयी संकेत लाड यांनी आपल्या लेखातून विश्लेषण केले आहे. तर, या काळात कलाकारांच्या जीवनावर काय परिणाम झाला, याविषयी दिग्दर्शक तेजपाल वाघ यांनी लेखामधून वास्तव मांडले आहे. तर, जगप्रसिद्ध इतिहासकार युव्हाल नोआ हरारी यांचा करोना – परिणाम, निर्णय, धोरण यांबाबतचा वाचनीय असा पूर्वप्रकाशित लेखाचाही अंकात समावेश करण्यात आला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नेहमीप्रमाणेच यंदाही ‘वास्तव’चा दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे. आतापर्यंतच्या अंकाचे ज्या उत्साहात स्वागत झाले, पाठीवर कौतुकाची थाप मिळाली, त्या बळावरच आपल्यासमोर हा अंक सादर करत आहोत. अर्थात, सूचना आणि प्रतिक्रियांच्या अपेक्षेसह...
‘वास्तव’ : करोनानंतरच्या विश्वाचा वेध - संपादक किशोर रक्ताटे व सुरेश इंगळे
पाने : १८०, मूल्य : ३०० रुपये.
अंकासाठी संपर्क : ८२०८० ४२१९१
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment