अजूनकाही
दै. ‘मराठवाडा’चे संस्थापक संपादक अनंतराव भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या ‘कैवल्यज्ञानी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन रविवार, १४ नोव्हेंबर २०२१ रोजी औरंगाबादमध्ये होत आहे. नांदेडच्या अभंग पुस्तकालयातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाला संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी लिहिलेली ही भूमिका…
..................................................................................................................................................................
मे २०१५मध्ये औरंगाबादला स्थायिक झाल्यावर ‘संडे-क्लब’मधे रुजू झालो. गेल्या चाळीसपेक्षा जास्त वर्षांचे मित्र असलेले निशिकांत भालेराव आणि (नुकतेच दिवंगत झालेले) ‘स्वामी’ श्याम देशपांडे यांनी सुरू केलेली एक निखळ गप्पांची चळवळ म्हणजे ‘संडे क्लब’. लेखक, समीक्षक, वार्ताहर, संपादक असे अनेक जण रविवारी सकाळी एकत्र येतात आणि कधी विषयाला धरून, तर कधी विनाविषय इथे गप्पा करतात. उन्हाळ्यातल्या एका रविवारी कुणी तरी चर्चा सुरू केली. नैतिकतेच्या वाटेवरचा सत्शील वारकरी असणारा अनंत भालेराव नावाचा मराठी पत्रकारितेवर असलेला मूल्यधिष्ठित संस्कार, असा सूर त्या चर्चेला लागला. त्यातून अनंतराव भालेराव स्मरणग्रंथाची संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला त्या कामासाठी एक संपादक मंडळ निश्चित करण्यात आले, पण काम सुरू झाल्यावर हळूहळू एकेकाने त्यातून का कोण जाणे काढता पाय घेतला आणि शेवटी अस्मादिक एकटेच उरले. त्या संकल्पनेचं मूर्त स्वरूप म्हणजे ‘कैवल्य ज्ञानी’ आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्यास अंमळ उशीर झाला आहे, तो का झाला याच्या तपशीलात न शिरता झालेल्या या विलंबाबद्दल कोणतीही सबब न सांगता मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या पुस्तकाचे नाव ‘कैवल्यज्ञानी’ ठेवण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. कैवल्य ज्ञान म्हणजे शुद्धज्ञान. अनंतराव भालेराव यांची पत्रकारिता शुद्ध होती, पत्रकारितेच्या पवित्रतेवर त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. त्यांच्या पत्रकारितेचा तो संस्कार आमच्या पिढीवर आहे, म्हणूनच या पुस्तकाचे नाव ‘कैवल्यज्ञानी’ आहे. हा ‘गौरवग्रंथ’ नाही तर मराठी पत्रकारितेतील चार पिढ्यांवर पत्रकारितेचा ‘शुद्ध संस्कार’ करणाऱ्या एका वारकऱ्याचे अनेकांकडून हे करण्यात आलेले नम्र स्मरण आहे.
अनंतराव भालेराव यांच्या निकटस्थ राहिलेल्या मराठीतील ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. अनंतराव भालेराव यांच्या मराठवाड्याबाहेर असणाऱ्या प्रभाव आणि उज्ज्वल प्रतिमेबद्दल प्रतिभावंत नाटककार आणि ललित लेखक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ संपादक, विचारवंत आणि ज्येष्ठतम साहित्यिक, माझे प्राचीन स्नेही सुरेश द्वादशीवार, डॉ. अशोक कुकडे, कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ संपादक प्रकाश बाळ, कमलाकर सोनटक्के, प्र. दि. तांबोळी आणि मी लिहिलेले लेख आहेत.
दैनिक ‘मराठवाडा’ नावाच्या संस्कारपीठात अनंतराव भालेराव यांच्यासोबत किंवा त्यांच्या हाताखाली काम केलेल्या निळू दामले, विजय निरखी, अरविंद वैद्य, संजीव कुळकर्णी, राधाकृष्ण मुळी, व्यंकटेश केसरी, गोपाळ अवटी, अनिल डोंगरे, भारत गजेन्द्रगडकर यांचे लेख या ग्रंथांसाठी लाभले आहेत. या सर्व लेखकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
अरुण तसेच निशिकांत या दोन पुत्रांनी आणि डॉ. सविता या कन्येने, त्यांच्या संपादक व वडील अशा दोन्ही भूमिकांत वावरलेल्या तर, नात सानियाने आजोबा अनंतराव भालेराव यांच्याविषयी केलेले लेखन या पुस्तकात आहे. यापैकी निशिकांतच्या लेखात, समर्पित ध्येयनिष्ठ संपादक व पिता आणि पत्रकार मुलगा यांच्यातल्या भावबंधाचे व्यक्त झालेले कंगोरे विलक्षण गुंतागुंतीचे आहेत; भूमिकांबद्दल ठाम, अ-तडजोडवादी असणाऱ्या बाप-लेकाचे हे नातेसंबंध आहेत आणि ते मनोहारीही आहेत.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
पत्रकारितेतलं व्रतस्थ आणि झुंझार कर्तृत्व, पत्रकारितेविषयी तत्त्वनिष्ठ धारणा, समाजवाद व महात्मा गांधी यांच्यावर अढळ श्रद्धा, मुस्लीम धर्म आणि जीवनशैलीचे अभ्यासक, निझामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्तीचा ध्यास घेतलेले स्वातंत्र्य सैनिक, निर्मोही, उत्कट आणि डोळस, संवेदनशील, वारकरी वृत्तीचा माणूस, असे अनंतराव भालेराव यांचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे जगणे आणि कर्तृत्व एखाद्या विशाल वृक्षासारखे आहे. अनंतराव भालेराव नावाच्या त्या वृक्षाच्या घनगर्द सावलीत वावरलेल्या अनेकांनी केलेल्या या लेखनातून अनंतराव भालेराव यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध मनोज्ञ पैलू समोर आलेले आहेत.
‘केसरी’ आणि ‘मराठवाडा’ ही केवळ दोन दैनिके नव्हेत, तर त्यात सामाजिक बांधिलकी आणि चळवळीशी असणारे विश्वस्ताचे नाते, हे एक समान सूत्र कसे आहे, हे सांगतानाच विद्यमान पत्रकारितेवर परखड भाष्य करणारी, पत्रकारितेतील माझे ज्येष्ठ सहकारी अरविंद गोखले यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
ग्रंथात समाविष्ट या सर्व मजकुराचे वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या ओळी आठवतात-
आपुलिया मनी बरवी, असमाई गोठी जीवीं
ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य जाहले
(चांगली वाटते, जीवात मावत नाही; कोणाला तरी सांगावीशी वाटते, अशी गोष्ट म्हणजे अनंतराव भालेराव यांचे हे स्मरण.)
स्मरणात आदरभाव असला तरी या सर्वांच्या लेखनातून अकारण भक्तीभाव किंवा व्यक्तीपूजा डोकावलेली नाही, तर अनंतराव भालेराव यांच्याविषयी केवळ डोहखोल कृतज्ञताच व्यक्त झालेली आहे.
अनंतराव भालेराव यांच्या काळातील पत्रकारितेला उजाळा देणारेही हे पुस्तक आहे आणि आज मुख्य प्रवाहात पत्रकारिता करणाऱ्या तरुणांसाठी हे कथन स्वप्नवतही वाटण्याची शक्यता आहे. कारण आता पत्रकारितेचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझिनेस’ असा झालेला आहे; अनेक प्रसंगी मालक आणि पत्रकार या दोघांचीही पत्रकारिता ‘पेड’ झालेली स्पष्टच दिसते; बहुसंख्य पत्रकार आणि संपादकही ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ झाल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे तर अनंतराव भालेराव नावाचा पत्रकारितेतला एकेकाळचा हा महानायक तरुण पिढीला दंतकथाही वाटू शकतो. आभासी टीआरपी मिळवलेले किंवा सहकाऱ्यांच्या खूषमस्कऱ्यांवर मोठे झालेले नव्हे तर, नितळ वर्तन आणि लेखनाने वाचकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले अनंतराव भालेराव यांच्यासारखे संपादक या पत्रकारितेला लाभलेले आहेत, हे नवीन पिढीला समजावे, यासाठीही केलेला एक प्रयत्न म्हणजे ‘कैवल्यज्ञानी’ आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या पुस्तकाची तयारी सुरू झाली, तेव्हा राज्य सरकारकडून अनुदान मिळाल्यास पुस्तकाची किंमत कमी ठेवता येईल आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल अशी एक सूचना समोर आली. संपर्क साधल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून असे अर्थसाह्य करण्यास स्वागतार्ह सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार राम पाटील रातोळीकर, मुख्यमंत्र्याचे तत्कालीन सचिव व मित्रवर्य भूषण गगराणी आणि संजीव कुळकर्णी त्यासाठी सर्व स्तरावर चिवटपणे पाठपुरावा केला. ‘धन्यवाद’ हा शब्द त्यासाठी तोकडा आहे आणि तो उच्चारणेही यापैकी कुणालाही आवडणार नाही.
वेधक मुखपृष्ठ व मांडणीचे मानकरी सरदार जाधव, तर मजकूर निर्दोष होण्याचे श्रेय सुरेश सावंत यांचे आहे आणि त्याबद्दल आभार मानणे त्या दोघानाही रुचणार नाही.
या पुस्तकाबाबत वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.
‘कैवल्यज्ञानी’ : पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथ - संपा. प्रवीण बर्दापूरकर
अभंग पुस्तकालय, नांदेड
पाने – ३०८, मूल्य - ३७५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment