…मग प्रत्येक वाक-वळणावर भेटत राहतो कधी डाकबंगला, कधी डचांची वखार, तर कधी सड्यावरची धनगर वस्ती...
संकीर्ण - पुनर्वाचन
प्रकाश विश्वासराव
  • ‘वाडी-वस्ती’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ, प्रकाश विश्वासराव, राजापूर रेल्वे स्टेशन, वखार, राजापूर शहराचं एक छायाचित्र आणि धूतपापेश्वराचं मंदिर
  • Mon , 08 November 2021
  • संकीर्ण पुनर्वाचन प्रकाश विश्वासराव Prakash Vishwasrao लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha मधु मंगेश कर्णिक Madhu Mangesh Karnik माधव कोंडविलकर Madhav Kondvilkar

दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ या रविवार पुरवणीत २००८-१० दरम्यान ‘वाडी-वस्ती’ हे सदर प्रकाशित व्हायचे. हे अतिशय खूपच वाचकप्रिय झाले होते. या सदरात महाराष्ट्रातल्या साहित्य-समाज-शिक्षण-कला-राजकारण-उद्योग अशा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी लिहिलं. त्यातील निवडक लेखांचा नंतर त्याच नावानं संग्रह प्रकाशित झाला. याच सदरासाठी प्रकाश विश्वासराव यांनी सांगितलेला आणि मुकुंद कुळे यांनी शब्दांकित केलेला ‘राजापूरची वखार आणि डाकबंगला’ लेख या पुस्तकातही आहे. तिथून तो इथं साभार पुनर्मुद्रित करत आहोत…

..................................................................................................................................................................

मोठं झाल्यावर एकदा तरी राजापूरच्या डाकबंगल्यात राहायचं, असं माझं लहाणपणीचं स्वप्न होतं. माझं बालपण आजोळी म्हणजे राजापूरजवळच्या बार्सू गावी गेलेलं. साहजिकच आजोबांबरोबर किंवा एरवीदेखील कितीतरी वेळा एकट्यानेच हा डाकबंगला मी बाहेरून फिरून पाहिलेला. अगदी आपादमस्तक! ब्रिटिश आमदनीतलं लाजवाब बांधकाम. सगळं लाकडी फर्निचर. थोडासा आडवाटेला असलेला. झाडाझुडपांत गडप झालेला. पण त्याचं दर्शन झालं की, देखणी वास्तू पाहिल्याचं समाधान तिथल्या तिथं मिळायचं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या वास्तूत राहायचं स्वप्न मी पाहिलं आणि ते स्वप्न एकदा अनपेक्षितपणे पूर्ण झालं. मी ‘लोकवाङ्मय गृह’चं काम करत असताना प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्यामुळे माझी ज्येष्ठ लेखक असलेल्या माधव कोंडविलकर यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीतच मला कळलं की, कोंडविलकरांचं गाव माझ्या आजोळगावाच्या जवळच आहे. मग एकदा बार्सूला गेलो असताना मी कोंडविलकरांना राजापूरला भेटलो. तिथं फिरत असताना आमच्या गप्पांत सहज डाकबंगल्याचा विषय निघाला. माझी तिथं राहण्याची असलेल्या इच्छा बघून कोंडविलकरांनी लगेच ती बाब मधु मंगेश कर्णिकांच्या कानी घातली. कर्णिक तेव्हा शासकीय सेवेतच होते. त्यांनी लगेच एक झकास प्लॅन आखला. सगळ्यात प्रथम त्यांनी डाकबंगला बुक केला. नंतर आम्हाला बोलावून घेतलं. मग मी, कोंडविलकर आणि कर्णिक आम्ही तिघे जण राजापूरपासून जवळच असलेल्या वि. सी. गुर्जरांच्या गावाला भेट दिली. तिथून थेट जंगलात शिकारीला गेलो. तेव्हा कर्णिकांकडे बंदूक होती. तिच्याने आम्ही सशाची शिकार केली. ती शिकार घेऊन आम्ही ऐटीत डाकबंगल्यावर परत आलो. आणलेली शिकार खानसाम्यासमोर टाकली आणि त्याला मस्तपैकी मटण करायला सांगितलं. त्या खानसाम्याने केलेल्या झणझणीत मटणाची लज्जत अजून माझ्या जिभेवर आहे.

त्यानंतर डाकबंगला कुणालाही बुक करता येतो, ते समजलं. मग मी अनेकदा या डाकबंगल्यात जाऊन मुक्काम ठोकला. कधी साहित्यिक-चित्रकार मित्रांबरोबर, तर कधी एकट्यानं. आणि दरवेळी हा डाकबंगला मला तेवढाच आवडत राहिला.

राजापूरच्या या डाकबंगल्याची आठवण म्हणजे माझ्यासाठी स्मरणाचा उत्सवच असतो. फक्त हा डाकबंगलाच नाही, राजापूरची वखार आणि संपूर्ण राजापूरही. डचांनी सोळाव्या शतकात बांधलेल्या या वखारीचे आता अवशेषच शिल्लक आहेत. ते अवशेष वखारीच्या एकेकाळच्या ऐश्वर्याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. मी लहाणपणीही ही वखार पाहिली, तेव्हा ती त्यातल्या त्यात सुस्थितीत होती. पण आता ती पूर्णपणे उजाड झालीय. आजही कधी राजापूरला गेलो की, माझ्याही नकळत पावलं राजापूरच्या वखारीकडे वळतात. तिथं बघायला काहीच नसतं. पण त्या भग्न वास्तूतून फिरताना मन कसल्याशा संपन्नतेनं भरून जातं. ती संपन्नता बहुधा माझ्यातल्या कलावंताला अधिक समृद्ध केल्याची सूचक असावी.

ही वखार बघताना डचांच्या बुद्धीचं मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. कारण डचांनी ही वखार नेमकी जागा हेरून बांधलेली होती. वास्तविक कोकण किनारपट्टीवर अनेक बंदरं आहेत. पण वखारीसाठी डचांनी राजापूरचीच निवड केली. कारण हे बंदर अतिशय सुरक्षित मानलं जातं. या बंदराच्या तिन्ही बाजूंनी डोंगर असल्यामुळे कितीही सोसाट्याचा वारा सुटला, तरी तो डोंगरामुळे अडवला जातो आणि बंदरात नांगरलेल्या जहाजांना हानी पोचत नाही. राजापूर बंदराची ही सुरक्षितता लक्षात घेऊनच डचांनी तिथं वखार बांधली.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

राजापूरची आठवण निघाली की, खरं तर मला असं बरंच काही आठवायला-स्मरायला लागतं. आधी डाकबंगला, डचांची वखार, मग धूतपापेश्वरचं मंदिर, मंदिराच्या जवळच असलेली नाखरे गुरुजींची शाळा, राजापूरच्या सड्यावरची धनगरांची वस्ती… असं बरंच बरंच काही.

पण त्याआधी मला आठवतं माझं आजोळ बार्सू. बार्सू राजापासून दोन-तीन किलोमीटरवर वसलेलं. या आजोळगावाचा माझ्यावर कधीही पुसला न जाणारा ठसा उमटलेला आहे. कारण हे माझ्या आईचं माहेरगाव. माझे वडील ब्रिटिश मिलिट्रीत होते, तर माझी आई माझ्या लहानपणीच वारली. साहजिकच आईवेगळं मूल म्हणून खूप लहानपणीच मी आजोळी आलो नि आजोळचाच झालो. समजायला लागल्यापासून वास्तू आणि परिसर म्हणून माझ्यावर प्रभाव या आजोळच्या घराचाच आहे. माझे आजोबा राजाराम हरबाजी कदम गावचे खोत होते. त्यांची खोती मी लहान असतानाच गेली होती. पण खोती गेली म्हणून त्यांची प्रतिष्ठा कमी झालेली नव्हती किंवा गावातला दराराही. माझं आजोळचं घर त्यांच्या या प्रतिष्ठेला आणि दराऱ्याला साजेसं होतं. प्रचंड मोठं घर. सगळ्यात आधी घराचं मोठ्ठं अंगण लागायचं. नंतर लांबलचक पसरलेली पडवी लागायची. या पडवीत करकर वाजणारा झोपाळा कायम झुलत असायचा. कारण कुणी ना कुणी या कडीच्या झोपाळ्यावर सदैव बसलेलं असायचं. या झोपाळ्याच्या समोरच आजोबांची खोली होती. तिथून दोन-तीन पायऱ्या चढून गेलं की, माजघर लागायचं. या माजघराच्या अवतीभवतीनं देवघर, स्वयंपाकघार, बाळंतिणीची खोली, दळणकांडणाची खोली, अशा वेगवेगळ्या खोल्या होत्या. या खोल्या पार करून पुढे गेलं की, परसू आणि तिथून चार-पाच पायऱ्या चढून गेलं की, गुरांचा गोठा लागायचा. केवढा मोठा परिसर होता माझ्या आजोळघराचा. भुलवून टाकणारा.

या वास्तूच्या प्रेमळ छत्रछायेखालीच माझं बालपण गेलं. तिथं झालेलं कोडकौतुक मी अजून विसरू शकलेलो नाही. माझं चौथीपर्यंतचं शिक्षण याच घरात आणि गावातील शाळेत झालं. घरात म्हणण्याचं कारण म्हणजे माझे आजोबा गावच्या शाळेचे चेअरमन होते. तसंच शाळेतील गुरुजीही आमच्या घरीच राहायचे. त्यामुळे घरी राहणाऱ्या गुरुजींनी पहिली व दुसरीचा अभ्यास माझ्याकडून घरीच करून घेतला. मी थेट तिसरीत शाळेत गेलो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माझं पुढचं सातवीपर्यंतचं शिक्षण मात्र मुंबईत खारच्या शाळेत झालं. बार्सूहून मुंबईला येणं मला मानवलेलं नव्हतं. पण वडिलांची ब्रिटिश सैन्यातून सिव्हिलीयन म्हणून मुंबईत बदली झालेली होती आणि त्यांनी मुलाची काही जबाबदारी उचलली पाहिजे, असं वाटल्यानं आजोबांनी मुद्दाम मला त्यांच्याकडे मुंबईला पाठवलं. परंतु काही वर्षांतच म्हणजे सातवीनंतर मी पुन्हा माझ्या आजोळगावी परतलो. माझं एसएससीपर्यंतचं शिक्षण नंतर राजापूरच्या हायस्कूलमध्ये झालं. ही पुन्हा बार्सूला आल्यानंतरची काही वर्षं माझ्यासाठी विशेष संस्मरणीय आहेत. कारण त्या काळात मी आजोबांबरोबर राजापूरच्या बाजारात जायला लागलो आणि मला प्रथमच राजापूर व तिथली बाजारपेठ कळली. हिंदू-मुस्लिमांचं एवढं सुरेख ऐक्य असलेली बाजारपेठ माझ्या माहितीत दुसरी नाही.

केवळ राजापूरची बाजारपेठच कळली असं नाही, तर संपूर्ण राजापूरच मला कळलं आणि त्या आकर्षणातून मी वरचेवर राजापूरला फेऱ्या मारायला लागलो. सुट्टीच्या दिवशी सकाळीच एसटी पकडून मी राजापुरात यायचो. दिवसभर यथेच्छ फिरायचो. कधी डाकबंगला, कधी डचांची वखार, तर कधी नुसताच बाजार.

असाच एकदा फिरत असताना धूतपापेश्वरजवळ असलेल्या एका शाळेत डोकावलो नि मला शाळेचं अप्रूप वाटलं. फुलपाखरं पकडून शाळेत त्यांचे चार्ट करून टांगले होते. आणखी इतरही बरंच काही होतं शाळेत. मला तर त्या शाळेतला माहोल पाहून थेट रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनचीच आठवण झाली.

धूतपापेश्वरचं मंदिर आणि त्याच्या जवळ असलेला धबधबा ही दोन ठिकाणंही राजापूरच्या माझ्या आकर्षणात वाढ करणारी होती. उंचावरून एखाद्या प्रचंड प्रपातासारखा कोसळणारा तो धबधबा पाहत मी तासनतास उभा राहायचो. खरोखर काळावेळाचंही तेव्हा भान नसायचं. राजापुरात आल्यावर माझा सगळा वेळ असाच वेगवेगळ्या स्थळांना भेटी देण्यात जायचा. त्यातलं एक स्थळ राजापूरमधला जवाहर चौकही होता. या नावाला एक इतिहास आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचं या ठिकाणी भाषण झालं होतं. त्यामुळे या चौकाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

राजापुरात आलो की, या परिसरात मी असा हरवून जायचो. पण सगळ्यात जास्त रमायचो तो राजापूरहून बार्सूला जाताना सड्यावर लागणाऱ्या धनगर वस्तीत. ही धनगर वस्ती फार मोठी नव्हती. पण एक अजबगजब गजबजलेपण या वस्तीत असायचं. कमालीची जिवंत वाटायची ही वस्ती. तिथं मी काही मित्र जोडून ठेवले होते. त्यांच्याबरोबर धनगर वस्तीत फिरताना माझा कितीतरी वेळ मस्त मजेत जायचा. कधी कधी मी तिथं राहायचोदेखील. विशेषत: गौरी-गणपतीच्या वगैरे सणाला माझा मुक्काम हमखास असायचा. त्यांचं आवेगपूर्ण गाणं आणि नाचणं सगळ्यांच्याच अंगात मस्ती निर्माण करायचं. वातावरणात एक मस्त झिंग निर्माण व्हायची. ते सारं अनुभवण्यासाठी मी कितीही वेळ त्या धनगर वस्तीवर राहायला तयार असायचो.

आज आता हे सगळं आठवतानाही मी मनानं केव्हाच बार्सू-राजापूरला पोचलोय. लहानपणी आजोळ असलेलं बार्सू आणि राजापूरच्या परिसरात केलेली ती भन्नाट भटकंती मला अजून भारावून आहे. त्या प्रभावातून मी अद्याप बाहेर पडलेलो नाही आणि बाहेर पडण्याची इच्छाही नाही. उलट दिवसेंदिवस त्या परिसरात हिंडण्याची-फिरण्याची हौस वाढतच आहे. म्हणूनच ती हौस फिटवण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळते, मी निघतो मुशाफिरीला राजापूरच्या.

…मग प्रत्येक वाक-वळणावर भेटत राहतो कधी डाकबंगला, कधी डचांची वखार, तर कधी सड्यावरची धनगर वस्ती. सांगा, येताय फिरायला?

‘वाडी-वस्ती’ – संपादक आल्हाद गोडबोले,

डिंपल पब्लिकेशन, मुंबई,

पाने – ५१५, मूल्य – ५५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......