प्रकाश विश्वासराव नावाचं ‘लोकवाङ्मय गृहा’तलं सांस्कृतिक ऊर्जाकेंद्र...
संकीर्ण - श्रद्धांजली
राम जगताप
  • प्रकाश विश्वासराव आणि लोकवाङ्मय गृहाचं बोधचिन्ह
  • Mon , 08 November 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली प्रकाश विश्वासराव Prakash Vishwasrao लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha नारायण सुर्वे Narayan Surve सतीश काळसेकर Satish kalsekar

प्रकाश विश्वासराव आणि लोकवाङ्मय गृह यांचा मेल-आयडी अनेक वर्षं एकच होता. तो बदलला ५ मे २०१५ रोजी. त्या दिवशी विश्वासरावांचा लोकवाङ्मय गृहातील कार्यकाळ संपला. तेव्हा त्यांनी या त्यांच्या मेलवरून त्यांच्या संबंधित स्नेही, मित्र, आप्त यांना आपला नवीन मेल आयडी कळवला. पण लोकवाङ्मय गृहाशी ते इतके जोडले गेलेले होते की, या नव्या मेल आयडीवरून कुणी त्यांच्याशी किंवा त्यांनी इतरांशी संपर्क साधला असेल, माहीत नाही. निदान त्यांची संख्या तरी जेमतेम असण्याचीच शक्यता आहे.

विश्वासरावांनी लोकवाङ्मय गृहातून निवृत्ती स्वीकारली, याचा धक्का महाराष्ट्रभरातल्या (भारतभरातल्या आणि भारताबाहेरच्याही) त्यांच्या कितीतरी मित्रांना तसा काहीसा अचानकच बसला, असंच म्हणावं लागेल. त्याचं एक कारण असं होतं की, विश्वासरावांच्या बहुतेक स्नेह्यांनी, आप्तांनी ते कधी निवृत्त होतील, याची कल्पनाही केली नव्हती. इतकंच काय पण खुद्द विश्वासरावांनाही आपण निवृत्त व्हावं, असं कधी वाटलं होतं की नाही, माहीत नाही. पण त्यांना निवृत्त व्हावं लागलं. त्यानंतर जेमतेम वर्ष-दोन वर्षंच ते चालते-फिरते राहू शकले. लवकरच त्यांना स्मृतिभ्रंश जडला. आणि मग ते या जगातल्या कुणाला फारसे ओळखेनासे झाले. अगदी त्यांच्या जिवलग मित्रांनाही. हळूहळू त्यांची प्रकृती बिघडत गेली. आणि परवा ४ नोव्हेंबर २०२१ रोजी ते हे जग शरीरानेही सोडून गेले. त्यांना स्मृतिभ्रंश झाला, त्या दिवशी, खरं तर ५ मे २०१५ रोजी त्यांनी मनानं हे जग सोडलं, असं म्हणणंच जास्त रास्त ठरेल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

प्रकाश विश्वासराव काही कम्युनिस्ट नव्हते. पण ते कम्युनिस्ट पक्षाच्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशनसंस्थेचे प्रकाशक-मुद्रक होते. अनेक वर्षं त्यांनी हे काम केलं. त्याची सुरुवात ऐंशीच्या दशकात झाली. नारायण सुर्वे यांनी त्यांना आग्रहानं लोकवाङ्मय गृहात आणलं. चित्रकार वगैरे लोकांकडे एक कलंदरपणा, मस्त फकिरी किंवा मस्तमौला वृत्ती सर्वसाधारणपणे दिसून येते. ती विश्वासरावांमध्येही होती. तोवर त्यांनी बहुधा मानेपर्यंत रुळणारे केस कापले होते. त्यांचं चित्रकार म्हणून करिअरही रुळू लागलं होतं. ‘धर्मयुग’, ‘सारिका’ या आघाडीच्या हिंदी नियतकालिकांमध्ये ते चित्र काढत होते. ‘कर्ण खरा कोण होता?’ (दाजी पणशीकर), ‘गभमन’ (सुरेश चिखले), ‘अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती’ (जनार्दन वाघमारे) अशा पुस्तकांची मुखपृष्ठं करत होते. (अगदी अलीकडे म्हणजे २०१० साली विश्वासरावांनी ‘समग्र सेतुमाधवराव’ या डबल क्राइन आकारातल्या पाच मराठी व दोन इंग्रजी खंडांची मुखपृष्ठं केली आहेत.) त्यामुळे ते लोकवाङ्मय गृहाच्या कम्युनिस्ट वातावरणात किती रमतील, याची त्यांनाही फारशी खात्री नव्हती. पण ते रमले. इतके की, हळूहळू ते लोकवाङ्मय गृहाचा एक अविभाज्य भाग होऊन गेले.

तसं पाहिलं तर लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेला मर्यादा होत्या. कम्युनिस्ट पक्षाची ती एक शाखा होती\आहे. पण पुरोगामी विचारांची पुस्तकं प्रकाशित करत असल्यानं तिचा एक सांस्कृतिक दबदबा तयार होऊ लागला होता. त्याचं श्रेय सुरुवातीच्या काळात नारायण सुर्वे यांना आणि नंतर प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर यांना जातं. कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक शाखा ते मुंबईतील एक सांस्कृतिक चर्चाकेंद्र असा लोकवाङ्मय गृहाचा प्रवास झाला, त्याचं श्रेय सर्वांत जास्त विश्वासरावांकडेच जाईल, यात कुठलीही शंका नाही.

विश्वासराव त्यांच्या मितभाषीपणामुळे लोकवाङ्मय गृहात आणि कम्युनिस्ट वातावरणातही रुळले. पण त्यांची वृत्ती कम्युनिस्टाची नव्हती, ती एका अस्सल कॉम्रेडची (म्हणजे मित्राची) होती. त्यांचं कशावर प्रेम नव्हतं? चित्रकलेवर तर होतंच, पण जगण्यावर होतं, साहित्यावर होतं, माणसांवर होतं. त्यांच्यातल्या चांगुलपणावर होतं. मित्रांसह मिळून एकत्र काम करण्यावर होतं. खाण्यावर होतं. फिरण्यावर होतं. संगीतावर होतं, चित्रपटांवरही होतं. आणि दारूवरही होतं.

‘मद्य नव्हे, हे मंतरलेले पाणी’ या पुस्तकातल्या लेखात विश्वासरावांचे सहकारी आणि मित्र सतीश काळसेकर यांनी लिहिलंय – “एकेकाळी पावसात माथेरानला जाणे हमखास असायचे. सुधाकर बोरकर, प्रताप भोसले, प्रकाश विश्वासराव या मित्रांबरोबरच आणखी एक मित्र उगवायचा. देविदास मानकर. तो अचानक यायचा. त्याचा आवाज दर्दभरा. कितीही दारू प्याला, तरी आवाज लागायचाच. माथेरानच्या पावसात, गच्च काळोखात, छपराच्या पत्र्यावर माकडे उड्या मारायची, कधी पावसाची तडतड असायची, आत अंधार. मेणबत्तीचा अपुरा प्रकाश, सगळीकडे ओल, भूतबंगल्यासारखे अंगावर काटा आणणारे वातावरण आणि त्या वातावरणात मानकर एकाग्र होऊन लताची गाणी म्हणायचा. सोबत देशी दारू असायची. गाण्यांनी सगळ्यांच्या काळजांत कालवाकालव व्हायची. प्रेमाच्या हळव्या आठवणी निघायच्या. वातावरणातली कातरता अधिकच वाढायची. ते सुखाचे दिवस होते. खूप चणचणीचे. जेमतेम देशी दारू पिता यावी, इतक्या आधाराचे. पण त्या दारूची सर आता स्कॉचलाही येत नाही.”

माणसं जोडण्याचा तर अजिबात म्हणजे अजिबातच कंटाळा नव्हता. त्यांच्या केबिनशेजारच्या छोट्याशा ग्रंथालयातल्या रिडिंग टेबलाभोवती बसून महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्याही कितीतरी लेखक-कलावंतांनी विश्वासरावांनी आवडीनं मागवलेल्या जेवणाचा आस्वाद घेत मारलेल्या गप्पा किंवा त्या मारता याव्यात यासाठी साधलेली जेवणाची वेळ हा आता निव्वळ आठवणींचा भाग झालाय.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

असा माणूस कम्युनिस्टांच्या काहीशा मर्यादित वर्तुळात वावरत असला तरी त्याच्याभोवती माणसांचं मोहोळ जमायला फारसा वेळ लागला नाही! विश्वासरावांचा माणसांतल्या चांगुलपणावर नको इतका विश्वास होता. त्यामुळे गप्पिष्ट नसूनही त्यांचं मित्रवर्तुळ विस्तारत गेलं. केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातल्या, आणि भारतभरातल्या कितीतरी पुरोगामी लेखक-कलावंतांचं. सुधन्वा देशपांडे यांनी परवा त्यांच्या निधनानंतर फेसबुकवर जी छोटीशी इंग्रजी पोस्ट लिहिली आहे किंवा अरुण खोपकर यांनी जी मराठी पोस्ट लिहिली आहे, त्यातून याचं काही प्रमाणात प्रत्यंतर येतं. सुधन्वा यांनी ‘लेफ्ट वर्ड’ ही आपली दिल्लीस्थित इंग्रजी प्रकाशनसंस्था सुरू करण्यापूर्वी काही दिवस विश्वासरावांसोबत राहून मुद्रण, छपाई इत्यादी गोष्टी समजून घेतल्या होत्या. खोपकरांसारख्या अतिशय ‘पर्टिक्युलर’ आणि शिस्तबद्ध कलावंत-लेखकाला सांभाळणं, हे तसं सोपं काम नव्हतं, नाही. पण केवळ खोपकरच नाही तर अशा कितीतरी कलंदर कलावंतांचा, विक्षिप्त लेखकांचा आणि शिस्तबद्ध जीवनशैली असलेल्यांचा विश्वासरावांवर अपार लोभ होता. विश्वासरावांसमोर ते अजूनच शालीन होत. त्यांच्यापुढचं त्यांचं वर्तन नव्यागताला किंवा अभ्यागताला चकित करत असे.

विश्वासरावांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी चुंबकीय जादू होती हे नक्की. चुंबकाच्या संपर्कात येताच, भराभर लोहकण त्याला चिकटतात आणि एकदा चिकटलेले लोहकण चुंबकानं सोडेपर्यंत वा त्यांना ओढून बाजूला करेपर्यंत वेगळे होत नाहीत. तद्वत कितीतरी क्षेत्रांतली माणसं विश्वासरावांशी जोडली गेली होती. चार-दोन माणसं किंवा मित्र जोडणं, हे तसं थोड्याशा प्रयत्नानं कुणालाही जमतं. पण विविध क्षेत्रांतली अनेकानेक गुणवान, प्रतिभावान आणि कर्तृत्ववान माणसं जोडणं, त्यांना मैत्रीच्या कक्षेत नेणं, हे सोपं काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे चुंबकीय शक्तीच असावी लागते. विश्वासरावांकडे ती भरपूर होती. नपेक्षा लोकवाङ्मय गृहाच्या लेखकांपलीकडे केवळ महाराष्ट्रातलेच नाहीतर देशभरातले (आणि बाहेरचेही) कितीतरी लेखक त्यांच्याशी जोडले जाते ना. पत्रकार, संपादक, अभ्यासक, संशोधक, चित्रकार… कितीतरी मोठं वर्तुळ होतं त्यांच्या स्नेह्यांचं, आप्तांचं. अनुपमा राव यांच्यापासून अरुंधती राव यांच्यापर्यंत आणि कुमार केतकरांपासून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यापर्यंत. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, पुष्पा भावे, गो. मा. पवार, वसंत आबाजी डहाके, महेश एलकुंचवार, राजन गवस, सुनीलकुमार लवटे, उत्तम कांबळे, प्रभाकर कोलते, प्रभा गणोरकर, प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन, अशोक शहाणे, उदय प्रकाश, हेमू अधिकारी, अरुण काकडे, अरुण शेवते, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. भालचंद्र कानगो, रमेशचंद्र पाटकर, रमेश शिंदे, निखिलेश चित्रे, नीतीन रिंढे, सतीश काळसेकर, नारायण कुलकर्णी कवठेकर, जयप्रकाश सावंत, पाशा पिंपळापुरे, शशिकांत सावंत, सतीश भावसार, क्रांती जेजुरीकर, सुधीर पानसे, अरविंद वैद्य, दिगंबर पाध्ये, अशा साहित्य-कलाक्षेत्रातल्या कितीतरी मान्यवरांच्या आशयसंपन्न चर्चा-गप्पा लोकवाङ्मय गृहात झडत-घडत असत.

स्टॉलवर्ट माणसं स्टॉलवर्ट माणसांभोवतीच जमा होतात, असं सहसा पाहायला मिळतं. विश्वासराव स्टॉलवर्ट होतेही आणि नव्हतेही. म्हणजे स्टॉलवर्ट माणसांसाठी ते स्टॉलवर्ट होते, तर लोकवाङ्मय गृहाच्या डीटीपी विभागातल्या किंवा मुद्रणालयातल्या किंवा सिक्युरिटी विभागतल्या अनेकांसाठी ते मार्गदर्शक, हितचिंतकही होते. कुठल्या तरी गबाळ्या पण उच्च प्रतीचे कपडे शिवणाऱ्या शिंप्याशी आणि चेहऱ्यानं गांजलेल्या पण हातात कलाकुसर असलेल्या सुताराशीही त्यांची मैत्री होते. आपल्या परीनं त्यांना काम मिळवून देण्यातही ते कधी हयगय करत नसत.

अडीअडचणीतल्या प्रत्येकाची मदत करण्याची वृत्तीच होती. दातृत्व तर अफाट म्हणावं असंच होतं. इतकं की, जवळच्या मित्रांनी दिलेल्या भेटवस्तूही ते अनेकदा इतरांना देऊन टाकत. कधी कधी त्यांच्यासमोरच. आपल्या कामगारांना आर्थिक मदत करणं, त्यांच्या कौटुंबिक तक्रारी जाणून घेणं, हे ते करतच असत, पण बाहेरून मदतीसाठी, सल्ल्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आलेल्या कुणालाही ते कधीही विन्मुख परतू देत नसत. प्रसंगी पदराला खार लावून, स्वत:चा वेळ खर्च करून मदतही करत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांनी ४ जुलै २००४ रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनात तेथील मराठी माणसांचा ‘उपकार, औदार्य आणि त्याग’ या विषयावर पाठ घेतला होता. अप्रतिम असं हे भाषण आहे. पण ते त्या वेळी गाजलं ते भलत्याच कारणानं. तर हा पाठ पुढे पुस्तिकेच्या रूपानं प्रकाशित झाला आहे. उपकार, औदार्य आणि त्याग या संकल्पनांचे नेमके अर्थ समजावून सांगणारं तेंडुलकरांचं हे भाषण प्रत्येकानं वाचावं असं आहे. या संकल्पनांचे नेमके अर्थ जगण्याचं काम विश्वासरावांनी केलं. त्यांनी कित्येकांना मदत केली, पण कधी उपकाराची भाषा तर सोडाच त्याचा फारसा उल्लेखही त्यांच्या तोंडून व्हायचा नाही. औदार्यही त्यांच्याकडे विपुल होतं. त्यांच्याकडून पुष्पळ मदत घेणारेही नंतर त्यांची छोटी-मोठी, सहजसाध्य कामंही करत नसत. तेव्हाही विश्वासराव त्रागा करताना किंवा त्या व्यक्तीला बॅक लिस्टमध्ये टाकताना दिसले नाहीत. ते तो विषय सोडून त्याच्याशी संवाद कायम ठेवत आणि प्रसंगी त्याला पुन्हा मदत करत. आणि त्याग? विश्वासराव हे एक त्यागी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना कशाचाही मोह नसे. त्यांच्याकडे अनेक दिग्गज चित्रकारांची चित्रं होती, पुस्तकं होती. त्यांना अनेकांनी दिलेली सुंदर सुंदर भेटी होत्या. कितीतरी पुस्तकं होती. त्यातल्या कितीतरी गोष्टींचा त्यांनी त्यांच्या मित्र-आप्त-स्नेही यांच्यासाठी सहजगत्या त्याग केला. आपली येणी वसूल करण्यात त्यांना फारसं स्वारस्य नसायचं, पण देणी देण्यात मात्र ते तत्पर होते. मित्रांसाठी तर ते कायमच विविध प्रकारचे त्याग करत असत, अगदी सहजपणे, खुशीनं.

विश्वासराव गप्पिष्ट नव्हते. अगदी जिवलग मित्रांच्या गप्पांतही ते मोजकंच बोलतं. वक्ते तर यत्किंचितही नव्हते. लेखक होते का? जेमतेम. ‘अक्षर’च्या दिवाळी अंकांत त्यांनी चित्रकार अंजली इला मेनन (१९९७) व छायाचित्रकार सुनील जाना (२००३) यांच्यावर लेख लिहिले आहेत. लिहिण्याचा त्यांना मनस्वी कंटाळा होता. पण जगभरच्या नामवंत चित्रकारांची पुस्तकं विकत घेण्याचा, त्यांचा आणि त्यांच्या चित्रांचा संग्रह करण्याचा, प्रसंगी ती पुस्तकं आपल्या मित्रांना भेट देऊन टाकण्याचा मात्र अजिबात कंटाळा नव्हता. एकदा प्रकाशनासाठी स्वीकारलेलं पुस्तक अधिकाधिक देखणं कसं होईल, यासाठी वाट्टेल ती मेहनत आणि प्रसंगी तोटा सहन करण्याचाही कंटाळा नव्हता. गेल्या ३०-४० वर्षांत लोकवाङमय गृहानं कितीतरी देखणी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यातून विश्वासरावांची प्रतिभा, कल्पकता आणि प्रयोगशीलता दिसून येते. एक दर्जेदार, पुरोगामी विचारांची पुस्तकं प्रकाशित करणारी संस्था असा या प्रकाशन संस्थेला लौकिक मिळवून देण्यात विश्वासराव-काळसेकर यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ इतकंच नव्हे, तर सांस्कृतिक वाद-संवादाचं केंद्र म्हणूनही त्यांनी या संस्थेचा लौकिक निर्माण केला.

विश्वासराव लोकवाङ्मय गृहातून ज्या दिवशी निवृत्त झाले, त्याच दिवशी लोकवाङ्मय गृहातलं सांस्कृतिक केंद्र बंद झालं. त्यात लोकवाङ्मय गृहाचं मोठंच नुकसान झालं, पण त्याहून मोठं नुकसान महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळीतल्या एका प्रवाहाचं झालं. खरं तर प्रत्येक मराठी प्रकाशन संस्था हे एक सांस्कृतिक केंद्र असायला, व्हायला हवं. पण अशी उदाहरणं महाराष्ट्रात सहसा दिसत नाहीत. मुंबईत श्रीपु-पटवर्धन यांचं मौज प्रकाशन गृह तसं होतं. त्यानंतर प्रकाश विश्वासराव यांचं लोकवाङ्मय गृह. आपल्या लेखकांशीही धड स्नेहसंबंध राखता येऊ न शकणाऱ्या मराठी प्रकाशकांकडून सांस्कृतिक केंद्राच्या पुढारपणाची अपेक्षा करणं तसंही व्यर्थच आहे म्हणा!

एकदा बॉम्बे हॉस्पिटलमधून नुकतेच उपचार घेऊन आलेले नामदेव ढसाळ (गप्पा मारता मारता कारच्या खिडकीतून दिसणाऱ्या समुद्राकडे पाहत) आपल्या मायस्थेनिया ग्रेविस या आजाराविषयी सांगताना मला म्हणाले होते – “हातात घेतलेली वाळू हळूहळू घरंगळून जावी तसा माझा प्राण या आजारानं घरंगळत, निसटून चालला आहे.” महाराष्ट्राच्या बौद्धिक ऱ्हासाचंही मला कधी कधी असंच वाटतं. कितीतरी काळापासून तो असाच घरंगळत चालला आहे. आणि आपल्यासोबत या बौद्धिक-सांस्कृतिक चळवळीतल्या एकेका शिलेदारांना घेऊन जात आहे. अगदी मुंबईपुरतं आणि निवडक उदाहरणांपुरतं बोलायचं झालं तर श्री. पु. भागवत, राम पटवर्धन, अरुण टिकेकर, य. दि. फडके, पुष्पा भावे अशी मोठी यादी सांगता येईल. संस्थांच्या पातळीवर सांगायचं तर मौज प्रकाशन गृह, अक्षर प्रतिरूप, दै. महानगर, स्ट्रँड बुक स्टॉल, मॅजेस्टिक बुक हाऊस…

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

२००८ साली मुंबईतलं ‘अक्षर प्रतिरूप’ हे मुद्रणालय बंद झालं, तेव्हा दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये (९ एप्रिल) सतीश कामत यांनी ‘बंद पडलेला अड्डा’ असा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी केवळ एक मुद्रणालय बंद पडलं नसून मुंबईतलं एक सांस्कृतिक केंद्र बंद पडलं, असं लिहिलं होतं. विश्वासरावांच्या निधनानं मुंबईतलं अजून एक सांस्कृतिक केंद्र बंद झालंय, कायमचं. ‘अक्षर प्रतिरूप’ची जागा कुणीही घेऊ शकलं नाही. श्री.पु.-पटवर्धन यांची तरी कोण घेऊ शकलं? विश्वासरावांचीही कुणी घेऊ शकणार नाही. ते सहजसोपं नाही, हे खरंच, पण तशी इच्छाशक्ती असलेली माणसंच आता महाराष्ट्रात फारशी राहिलेली नाहीत, हे जास्त खरं आहे. एखाद्या माणसानं तनमनधनानं, समर्पित भावनेनं आणि आपल्या आयुष्याची मोलाची वर्षं खर्च करून उभं केलेलं सांस्कृतिक केंद्र (वा चळवळ) त्याच्यानंतर आलेल्यांना चालवावंसं वाटत नाही, उलट ते शक्य तितक्या लवकर कसं मोडीत काढावं, याचाच ते प्रयत्न करतात. आधीच्यांनी खस्ता खाऊन उभी केलेली संस्था, संस्थातंर्गत वातावरण, कार्यशैली आणि त्यातून तयार झालेली कार्यसंस्कृती, याला नंतरचे लोक नेस्तनाबूत करतात, पण स्वत: मात्र काहीही ‘नव-निर्माण’ करत नाहीत. महाराष्ट्रात कुठल्याच क्षेत्रात फारशी दणकट परंपरा दिसत नाही, ती या वृत्तीमुळेच.

…आणि हे तुम्हाला सगळ्या क्षेत्रात दिसेल. साहित्याच्या, पत्रकारितेच्या, सामाजिक संस्था, चळवळी-आंदोलनांच्या, शेतीच्या, उद्योगधंद्यांच्या… सगळीकडे हेच दिसतं. व्यक्तिगत स्वार्थानं पछाडलेल्यांना सांस्कृतिक कामांची मातब्बरी समजत नाही, हे सांप्रत काळातल्या महाराष्ट्राचं सर्वांत मोठं दुर्दैव आहे.

म्हणूनच तर विश्वासराव लोकवाङ्मय गृहातून निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्याविषयी कुठल्याही वर्तमानपत्रांत ‘अक्षर प्रतिरूप’सारखा लेख छापून आला नाही, आणि आता तो गेल्यावर तरी येईल की नाही, याचीही फारशी शाश्वती नाहीच. त्यांच्या निधनाच्या बातम्याच दिसतील न दिसतील अशा पद्धतीनंही येत असतील तर इतर गोष्टींची अपेक्षा तरी कशी करणार?

उलट सध्याच्या दूषित आणि सोयीस्कर काळात माध्यमकर्मींकडून ‘बट, हू इज प्रकाश विश्वासराव?’ असाच अगोचर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता जास्त आहे.

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......