अजूनकाही
पुणे आणि तेथील ‘पाटी’दार, विसराळू प्राध्यापक, झालेच तर संता-बंता हे आपल्याकडील काही पारंपरिक विनोदविषय. बायको हा त्यातीलच एक. वस्तुतः हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. बायकोस विनोदाने घेणाऱ्यांचे खाण्याचे हाल कुत्रे खात नाही, याची अनेक उदाहरणे तर आपल्या अवतीभवतीच आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात, की कोणी कितीही सांगितले तरी लोक त्यापासून परावृत्त होत नाहीत. सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक असते, असे अत्यंत घाणेरडे चित्र दाखवून सांगितले जाते, म्हणून काही कोणी सिगारेट ओढणे बंद करत नाही. लग्न करू नका, असे अनुभवी मंडळी कानीकपाळी ओरडून सांगतात, म्हणून काही कोणी विवाहमंडळात नाव नोंदवायचे राहत नाही. बायकोवरील विनोदाचेही तसेच. आणि तरीही या विषयावर मायमराठीत आजवर इतके आणि इतक्या जणांनी लिहिलेले आहे, की त्याचा एक तरी पदर सुटला असेल का, असे वाटावे. पण वाटणे आणि असणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
लेखक, कवी डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांचे ‘पत्नीपुराण’ हे ताजे पुस्तक वाचले की, लक्षात येते, स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंतकाळचा विनोदविषय असतो. तांबोळी यांच्या या पत्नीपुराणाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत वेगळ्या, आतापर्यंत अस्पर्शित अशा कोनातून त्यांनी या विषयाकडे पाहिले आहे. खरे तर हे एकट्या पत्नीवरील पुस्तक नाही. केंद्रस्थानी पत्नी असली (आणि ती असतेच ना!), तरी तो डॉक्टरांच्या भाषेत सांगायचा, तर ‘विधिवत् विवाहोत्तर सांवत्सरिक वर्तना’चा शोध आहे.
तांबोळी यांच्या मते, नैसर्गिक ऋतुचक्र आणि सांसारिक जीवन यांचा खोल असा संबंध आहे. सहा ऋतूंचे जे सहा सोहळे असतात, त्यातील रूढी-परंपरा, व्रतवैकल्ये असतात, त्यांचा आणि पती-पत्नी, त्यांचा संसार यांवर दाट परिणाम होत असतो. परिणय ते पती-पत्नींतील प्रणय आणि राग-अनुराग ते वादविवाद असे सारे काही याच ऋतुचक्राशी बांधले गेलेले आहे. ते कसे, याचे खुमासदार वर्णन म्हणजे हे ‘पत्नीपुराण’. या संबंधांचे एक उदाहरण म्हणून ‘चैत्रचातुर्य’ हे प्रकरण पाहावे.
तांबोळी लिहितात – ‘‘…चैत्रात तर सारी सृष्टी बहरलेली, मोहरलेली असते. अनेक सजीवांमध्ये मनसोक्त हर्षपालवी फुटलेली असते. या काळात कोणतेही, काहीही, कसेही आणि कोठेही सारे काही सुंदर नवे, निर्मळ आणि अद्भुत दिसत असते. हा वसंतसंकेत ज्ञात असतो तो फक्त वधुपित्याला! प्रत्येक वधुपित्याला हे माहीत असते की, या वसंत इफेक्टमुळे आपले ‘जनरल प्रॉडक्ट’ म्हणून विख्यात असलेले कन्यारत्न आता केवळ या काळात क्वालिटी प्रूव्हन, फॅक्टरी सर्टिफाईड हा उच्च दर्जा बाळगून आहे. या काळात जर आपल्या कन्येला दाखवण्याचा कार्यक्रम केला तर संभाव्य वरपक्षातील सारेजण पसंती दाखवणार आहेत… म्हणूनच जो तो वधूपिता हा वसंत इफेक्ट संपण्याआधीच भर वैशाखातच आपल्या मुलीचा विवाह आटोपून घेण्याचा अट्टहास धरतो.’’
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
भगवद्गीतेत श्रीकृष्णाने मार्गशीर्षाला मासोत्तमाचा दर्जा दिलेला आहे. ‘पत्नीपुराण’ वाचताना जाणवत राहते, की आषाढ हा सांसारिक पुरुषासाठीचा एक महत्तम मास आहे. कालिदासाने त्यांच्या विरहकाव्यातून अजरामर केलेला हा महिना. तांबोळी सांगतात तो आसक्तीचा, असोशीचा महिना आहे.
‘‘आषाढवृष्टी म्हणजे विश्वासार्ह आणि दमदार! इतका पाऊस की घराबाहेर पडण्याची हिंमत न होऊ देणारा!… याच आषाढातल्या एकांतसोयीसाठी दुसरी एक परंपरा ज्येष्ठात आगळीच सोय करून जाते. ज्येष्ठातील काही ठरलेल्या तिथींवर गावोगावचे वारकरी आषाढातल्या एकादशीसाठी पंढरपूरला निघून जातात. मात्र अशी वारकरी मंडळी आपल्या कुटुंबातील नवदाम्पत्याला मात्र घरीच थांबण्याचा आग्रह करून त्यांना ह्या एकांताचा अप्रत्यक्षपणे लाभ देऊ पाहतात!’’
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सांसारिक जीवनात भरलेले हे ऋतुंचे रंग डॉक्टरांनी मोठ्या खुबीने टिपले आहेत. अर्थात हे एका विनोदी लेखकाचे निरीक्षण आहे. तेव्हा लेखक जेव्हा ‘भाद्रपद वैभव’, ‘भाद्रपद भारूड’, ‘भाद्रपदाची भादरणी’, ‘भाद्रपद कहाणी’ सांगत असतात, ‘हिंदू संस्कृतीतील भार्या पतीला मी आज आतूर आहे हा संकेत एवढा (म्हणजे भाद्रपदाचा) महिना सोडला तर कधीच देत नसते,’ असे सांगून हे याच महिन्यात का घडते, याचे नैसर्गिक कारण सांगत असतात तेव्हा ते फॅक्ट चेक करत बसायचे नसते. ज्यांना रसभंगच करून घ्यायचा आहे, त्यांनी ते जरूर करावे. इतरांनी मात्र त्याची गंमत लुटावी, या लेखनातील प्रणयाचे संकेत, सूचक शृंगार यांच्या हलक्याशा सुगंधाने मोहून जावे. ‘चैत्राचे चातुर्य’, ‘वैशाखाची विवाहकारकता’, ‘आषाढाची असोशी’, ‘श्रावणाचा संसारबोध’, ‘भाद्रपदाच्या भानगडी’, ‘पौषाचे पाणचटलेपण’, ‘माघाची माया’ हे सारे पाहून चकीत होऊन जावे, की अरे, हे असे आहे तर!
पुराणांत एक छान पाल्हाळीकपणा असतो. तो बाज टिकवून, भाषेच्या गमतीजमती करत तांबोळी यांनी ही प्रकरणे लिहिली आहेत. याचबरोबर त्याला जोड आहे ती संशोधनाची. एल. के. कुलकर्णी यांचे ‘नक्षत्रविहार’, ‘भूगोलकोश’, दुर्गाबाईंचे ‘ऋतुचक्र’ अशा पुस्तकांतून ऋतुंचे रंग समजून घेत त्यास आपल्या निरीक्षणाची, विनोदबुद्धीची आणि अनुभवांची जोड डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळे या पुराणाला छान माहितीचीही चव आली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सजले आहे ज्ञानेश सोनार यांच्या चित्राने. ते त्यांच्या खिडकीचित्रांची आठवण करून देणारे आहे. त्यांची आतील चित्रेही विषयाची रंगत वाढवणारी आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
जाता जाता थोडेसे विनोदाबद्दल. अनेकांनी असा एक गैरसमज पाळलेला असतो, की विनोद म्हटले की तेथे खदाखदा (मग ते स्टॉकमधले असले तरी चालेल!) हसणे आलेच पाहिजे. तर ते तसेच नसते. पाऊस कधी हत्तीचा असतो, कधी वळवाचा असतो, तर कधी छान सावनी असतो. विनोदाचेही तसेच असते. तांबोळी यांचा हा विनोद सावरीच्या कापसासारखा आहे. अलगद तरंगत जाणारा. तेथे ओढाताण नाही. ओठांच्या किनाऱ्यावर स्मिताची नाजूक रेषा कोरत कोरत तो हलकेच मनात शिरतो. तो भाषिक आहे, तो स्वाभाविक आहे, तो निर्विष आहे, विसंगतींवर बोट ठेवणारा आहे. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा तो स्वतःवर केलेला आहे, अत्यंत वैयक्तिक विनोद आहे आणि म्हणूनच तो प्रातिनिधिक आहे. मराठी समाजापुरता ‘वैश्विक’ आहे. आणि म्हणूनच हे पत्नीपुराण अगदी जवळचे वाटते. अनेकदा सह-अनुभवाचा लाभ देते. ‘पत्नीपुराण’चे यश सामावले आहे ते त्यातच.
.................................................................................................................................................................
या पुस्तकातील एक प्रकरण वाचण्यासाठी पहा -
कौटुंबिक आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक विवाहितांना ‘आषाढ वैभव’ स्पष्ट उलगडलेले असते!
.................................................................................................................................................................
‘पत्नीपुराण’ - डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
पद्मगंधा प्रकाशन, पुणे
मूल्य - १८० रुपये
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment