अजूनकाही
प्रसिद्ध रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं काल वयाच्या ८४व्या वर्षी पुण्यात निधन झालं. नाईकांनी १२००हून अधिक पुस्तकं लिहिली. १९७० ते १९८२ या १२ वर्षांच्या काळात त्यांनी ७००हून अधिक रहस्यकथांची पुस्तकं लिहिली. त्यांच्याविषयीचा हा लेख...
..................................................................................................................................................................
सत्तरच्या दशकात श्रीरामपूरच्या चतु:सीमा खूप मर्यादित होत्या. बेलापूर रोडच्या टोकाला असलेला टांगा स्टँड आणि त्यासमोरची वसंत टॉकीज ही शहराची एक सीमा आणि संगमनेर रोडवरचा नाका ही दुसरी सीमा. तिकडे नेवाश्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली मॉडर्न हायस्कूल एक सीमा, तर रेल्वेखालून जाणाऱ्या भुयारी पुलानंतरची निर्वासित कॉलनी आणखी एक सीमा असायची. मेन रोड हा शहराचा मध्यवर्ती आणि गजबजलेला भाग आणि या रस्त्याच्या अगदी मध्याला असलेली किशोर टॉकीज, शिवाजी रोडला जोडणाऱ्या शेजारच्या बोळातलं पोस्ट ऑफिस हे शहराचं हृदयस्थान होतं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या टॉकीजशेजारी रस्त्यावर विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या होत्या आणि पलीकडे सार्वजनिक कार्यक्रमाचं ठिकाण असलेलं आझाद मैदान. त्याला लागून नव्यानंच स्थलांतर झालेलं श्रीरामपूर नगरपालिकेचं ‘लोकमान्य टिळक वाचनालय’ होतं. ते त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातील एक नामांकित सार्वजनिक वाचनालय होतं. शहरातील सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांची या वाचनालयात नेहमी ये-जा असायची.
वाचनालयातला नियतकालिकांचा विभाग सर्वांसाठी खुला असायचा, मात्र पुस्तकांचा आणि ग्रंथांचा विभाग वाचनसंस्कृतीतील अगदी गाभाऱ्यासारखा असायचा. तिथं काही मोजक्याच लोकांचा वावर असायचा. या विभागातील संदर्भग्रंथ वगळता बाकीची पुस्तकं, मासिकं आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी घरी नेण्यासाठी लोकांना मुभा असायची.
हे लोक म्हणजे या वाचनालयाची अनामत रक्कम भरून वार्षिक वर्गणी नियमितपणे भरणारे वर्गणीदार. त्यांची संख्या त्या वेळी खूप मर्यादित असायची. कारण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली अनामत रकम, वार्षिक वर्गणी आणि वर्गणीदार होण्यासाठी काही मान्यवरांची आवश्यक असलेली शिफारसपत्रं.
या किचकट अटींमुळे सातवी-आठवीत शिकताना इच्छा असूनही मला या वाचनालयाचा वर्गणीदार होता आलं नाही. मात्र त्यामुळे माझ्या वाचनप्रेमावर गदा आली असं म्हणता येणार नाही. कारण शाळा संपली की, या वाचनालयात मी पडिक असायचो. तिथली सर्व जिल्हा पातळीवरची आणि राज्य पातळीवरची दैनिकं आणि नियतकालिकं वाचून काढायचो. नंतर मग तिथल्याच लाकडी टेबलांवर ठेवलेली विविध साप्ताहिकं आणि मासिकं वाचत बसायचो.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
दरम्यान याच काळात पुस्तकांचं एक वेगळंच, अनोखं विश्व असल्याचा मला अचानक शोध लागला. माझे दोन थोरले भाऊ टिळक वाचनालयाच्या समोर आणि किशोर टॉकीजच्या शेजारी असलेल्या एका हातगाडीवर असलेल्या पुस्तकांच्या थप्पीतून काही पुस्तकं नियमितपणे वाचण्यासाठी घरी आणत असत आणि वाचून झाल्यानंतर ती परत देऊन दुसरी आणायचे.
हातगाडीवरचं हे वेगळ्या स्वरूपाचं वाचनालय होतं. इथली वर्गणी माफक होती. मला वाटतं, दर दिवसाला पाच पैसे प्रत्येक पुस्तकासाठी द्यावे लागायचे आणि दोन दिवसांत पुस्तक परत न दिल्यास दंड बसायचा. या वाचनालयात दिवसभर वाचकांची वर्दळ असायची. गुलशन नंदा या लेखकाच्या रंगीत मुखपृष्ठाच्या हिंदी कादंबऱ्याही तिथं असायच्या. शिवाय आंबटशौकीन वाचकांसाठी रंगीत मुखपृष्ठाची छोटीछोटी पुस्तिका कुठेकुठे लपून ठेवलेली असायची. विशिष्ट वर्गणीदारांना ती मिळायची.
या हातगाडीवरून भावानं आणलेलं एक पुस्तक एकदा माझ्या हातात पडलं. ते हातात घेतल्यानंतर संपवूनच खाली ठेवलं. पॉकेटबुक आकाराच्या आणि काळपट रंगाचा कागद असलेल्या त्या पुस्तकाची एकूण पानं असावीत पन्नास-साठ. मात्र वाचनालयात मी वाचायचो, त्या साप्ताहिकांतील आणि मासिकांतील लिखाणापेक्षा हे खूप वेगळं होतं. पुस्तकाचा विषय, लेखनशैली आणि नायक अगदी वेगळ्या धर्तीचे होते. लेखनशैली वाचकांना खिळून ठेवणारी होती. वेळ मिळेल तशी वाचण्यासारखी ही पुस्तकं नव्हती. वाचायला सुरुवात केल्यावर कुठल्याही कारणांमुळे ते पुस्तक अर्धं वाचून खाली ठेवणं अवघड असायचं.
या पुस्तकांच्या लेखकाचं नाव होतं - गुरुनाथ नाईक. या लेखकाच्या अशाच जुन्या पुस्तकांची थप्पी त्या हातगाडीवर रचून ठेवलेली असायची आणि लोक त्यापैकी एखादं पुस्तक निवडून वाचण्यासाठी घरी नेत असत. त्यानंतर मी नाईक यांची पुस्तकं वाचण्याचा सपाटाच लावला. भावाऐवजी मीच त्या हातगाडीकडे जाऊन पुस्तकं आणू लागलो. दुसऱ्या दिवशी आधीचं पुस्तक परत देऊन दुसरं आणू लागलो.
या पुस्तकाच्या मालिकांचे नायक वेगळे असायचे. प्रत्येक मालिकेचा विषय आणि पार्श्वभूमी अगदी वेगळी असायची. त्याअनुरूप भाषा असायची. मला आठवतं- दर आठवड्याला शुक्रवारी नाईक यांच्या मालिकांच्या नव्या पुस्तकांचा संच यायचा. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी ही नवी पुस्तकं घेण्यासाठी वर्गणीदारांची गर्दी असायची. दर आठवड्याला हा लेखक इतकी पुस्तकं कशी लिहितो, याचं त्या वयात नवल वाटायचं, आजही वाटतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वाचकांपेक्षा आणि वर्गणीदारांपेक्षा हातगाडीवरच्या या वाचनालयाचा वाचक आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि अभिरुचीच्या दृष्टीनं खूप वेगळा होता. वाचनालयाचा वाचक हा उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय असायचा. वैचारिक स्वरूपाचं लिखाण वाचणारा, चित्रपट आणि नाटकं पाहणारा असा होता, तर हातगाडीवरची पुस्तकं वाचणारा वाचक मध्यमवर्गीय आणि वाचन, चित्रपट आणि नाटकं यांबाबत फारशी अभिरुची नसणारा होता. या श्रेणीतील वाचकांना खिळून ठेवण्याची हातोटी नाईक यांना लाभली होती.
विशेष म्हणजे नाईक यांच्या कुठल्याही मालिकेतील पुस्तकांचा विषय आणि मजकूर हीन अभिरुचीचा नसायचा. या स्तरातील वाचकांची वाचनसंस्कृती जोपासण्याचं, तिला उत्तेजन देण्याचं फार मोठं काम नाईक यांनी केलं.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबऱ्यांप्रमाणेच नाईक यांच्या पुस्तकांच्या या मालिकांना सरकारी अनुदानं मिळणाऱ्या कुठल्याच वाचनालयात आणि ग्रंथालयांत मुळीच स्थान नव्हतं. कदाचित ही पुस्तकं या वाचनालयात आणि ग्रंथालयांत ठेवणं स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या लोकांच्या उच्च अभिरुचीस साजेसं नसावं.
पुढच्या काळात गोव्यात गेल्यानंतर पत्रकार म्हणून काम करताना एकदा एका पत्रकार परिषदेत एका सहकारी पत्रकारानं समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची ओळख करून दिली- ‘हे गुरुनाथ नाईक. मराठीतल्या अनेक साहसी, रहस्य कथांच्या मालिकेचे लेखक. यांचं नाव तू ऐकलं असशील आणि पुस्तकंसुद्धा वाचली असशील.’ तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला होता.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं. अलीकडच्या काळात तर त्यांना आर्थिक मदत करावी, असं आवाहनसुद्धा करण्यात आलं होतं.
सामान्य मराठी वाचकांना आगळ्यावेगळ्या तऱ्हेचं साहित्य वाचायला देऊन त्यांना वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणण्याचं काम या लेखकानं केलं. विनोदी लेखकाला साहित्यविश्वात प्रतिष्ठा आणि मान मिळत नाही, तीच बाब रहस्य आणि साहसी कथालेखकांचीही असते. वाचकांमध्ये ते कितीही लोकप्रिय ठरले, तरी त्यांचं साहित्य उच्च अभिरुचीचं गणलं जात नाही. त्यामुळे त्यांना साहित्य पुरस्कार वगैरे मिळत नाहीत. नाईक यांचंही असंच झालं.
त्यांच्या निधनानंतर जुन्या पिढीतील अनेक वाचकांनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहिली आणि जनमानसातले त्यांचं स्थान अधोरेखित केलं.
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग एक
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग दोन
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग तीन
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment