‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ हे प्रा. अरुण वाहूळ यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच लोटस इंडिया प्रकाशन (औरंगाबाद)तर्फे प्रकाशित झाले आहे. या विषयावरील हे मराठीतले पहिलेच पुस्तक असावे. अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या पुस्तकाला माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
अरुण वाहूळ यांनी ‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ हे पुस्तक लिहून म्यानमारचा भूगोल, राजकारण, वंशकारण, संस्कृतीकरण, धर्मकारण आणि अर्थकारण या सर्व विषयांना विलक्षण कौशल्याने सुलभ शैलीत आणि अन्वयार्थ पूर्ण पद्धतीने गुंफले आहे. अरुण वाहूळ यांनी म्यानमारचा भौगोलिक इतिहास, तेथील स्वातंत्र्य चळवळ, ब्रिटिश साम्राज्याचा म्यानमानवर झालेला संस्कार, तेथील लोकांचे धार्मिक-वांशिक वर्गीकरण, तेथील बौद्ध व इस्लाममधील तणाव, रोहिंग्या मुस्लिमांचं बहिष्कृत जीवन, तसेच त्यांच्या त्या स्थितीतील जगण्या-मरण्याच्या प्रश्नांचा वेधक आढावा घेतला आहे. रोहिंग्या समस्या कशा प्रकारे हिंस्त्ररूप धारण करू शकते, याचे वर्णन शब्दश: थरारक आहे.
हिंदी चित्रपटगीतांचा शौक असणाऱ्यांना ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे माहीत असते. पण त्या रंगून (आजचे यांगून) वा मंडालेच्या परिसरातील समाज, संस्कृती, राजकारण, इतकेच काय तर भूगोलही माहिती नसतो. विशेषत: स्वत:ला ‘अखंड भारता’चे हिंदू समजणाऱ्यांनाही कधी काळी याच ‘अखंड भारता’चा भाग असलेल्या म्यानमारविषयी विलक्षण अज्ञान दिसून येते. त्यांच्या संकल्पनेतील अखंड भारतात अफगाणिस्तान, पाकिस्तान, संपूर्ण काश्मीर, नेपाळ, तिबेट, भूतान, बांग्लादेश आणि म्यानमार असूनही पराकोटीचा स्वाभिमान असणाऱ्या हिंदूंना पण तो नकाशा वा त्यातील विविध राष्ट्राचा धर्म, संस्कृती, भाषा, जीवनशैली, समाजकारण आणि राजकारण यापैकी काहीही माहिती नसते. जर त्यांना देशाचा भूगोल आणि जनजीवन माहिती नसेल, तर तेथील अवघी चार टक्के लोकसंख्या असलेल्या रोहिंग्यांची माहिती काय असणार?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
बहुसंख्याक मराठी माणसांना (खरे म्हणजे भारतीयांना) भूतकाळामध्ये रमणे आवडते. म्यानमारबद्दल त्यांच्या मनात भूतकाळाची आठवण म्हणून लोकमान्य टिळकांना व सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज राज्यकर्त्यांनी तुरुंगवासाची शिक्षा देऊन मंडाले येथे कैदेत ठेवल्याचे आठवते, पण तेथील इतिहास, संस्कृती यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नसते. तसेच शरदचंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांतील पात्रे ढाका (म्हणजे एकेकाळचे पूर्व पाकिस्तान आणि आजचा बांग्लादेश) आणि रंगून येथून ये-जा करत असल्याची माहिती भारतीयांना असली तरी भारताचा मंडाले व रंगून या शहरांशी जवळचा सामाजिक-सांस्कृतिक संबंध असल्याची जाण फार कमी लोकांमध्ये पाहण्यास मिळते. म्यानमार किंबहुना आग्नेय आशियातील सर्वच देश भारताला मोठा भाऊ मानतात, पण भारत ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. भारताला महासत्ता होण्याची इच्छा आहे, पण त्यासोबत येणारी कर्तव्ये व जबाबदाऱ्या नको आहेत.
म्यानमानरची आजची लोकसंख्या सुमारे साडेपाच कोटी म्हणजे महाराष्ट्राच्या अर्धी. क्षेत्रफळ फार नाही. तसा दाटीवाटीचा देश (दक्षिण आशियातील बहुतेक देशांची लोकसंख्या आणि जीवनानुकूनल जमिनीचे क्षेत्रफळ याचे नाते विषमच आहे). बांग्लादेश आणि म्यानमार यांच्यात जसे भौगोलिक नाते आहे, तसेच लोकसंख्येची घनताही समान आहे. तसे पाहिले तर म्यानमार धर्मनिरपेक्ष राष्ट्र, राज्याचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही, पण सुमारे नव्वद टक्के लोकसंख्या बौद्धधर्मीय आहे. राज्यघटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण प्रत्यक्षात बौद्धांपेक्षा इतर धर्मीयांचे स्थान राष्ट्राच्या जनजीवनात दुय्यम (आणि अपमानकारक) आहे. बौद्ध धर्मीयांमध्ये ‘थेरवादी संप्रदाय’ मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
जागतिकीकरणाच्या भाऊगर्दीमध्ये माणसाच्या संवेदना बोथड होत असताना, तसेच जागतिकीकरणाच्या स्पर्धेत संस्कृती, धर्म, वंश, जात या संकल्पना पुसट होत असताना काही राष्ट्रे मात्र अजूनही या संकल्पनेच्या प्रभावातून मुक्त झालेली दिसत नाहीत. चीनी कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता माओ म्हणाला होता- “क्रांतीच्या माध्यमातून राजकीय आणि आर्थिक बदल घडत असतात, पण सांस्कृतिक व धार्मिक बदल केल्याशिवाय खरे परिवर्तन घडत नाही. कारण कालांतराने राजकीय आणि आर्थिक बदलावर सांस्कृतिक मूल्ये व धार्मिकता हावी होत असते. ते राजकारण आणि अर्थकारणाला जुन्या पद्धतीमध्ये परिवर्तीत करतात.” अशीच काही परिस्थिती सध्या म्यानमानरमध्ये सुरू आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक-धार्मिक सुधारणा न झाल्यामुळे देशात नवे संकट निर्माण झाले. बहुसंख्याकांच्या जमातवादाच्या असुराने गरीब रोहिंग्यांचा बळी घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते- “अल्पसंख्याकांपेक्षा बहुसंख्याकांची सांप्रदायिकता खऱ्या अर्थाने देशात मोठे संकट निर्माण करू शकते.” अगदी त्याच पद्धतीने म्यानमारमध्ये नव्वद टक्के असणाऱ्या बौद्ध समाजाने चार टक्के असणाऱ्या मुस्लिमांना लक्ष्य केले आहे.
आशियातील बहुतांश राष्ट्रे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युरोपीय सत्तांच्या प्रभावाखाली होती. त्यापैकी म्यानमारही १९३५पर्यंत ब्रिटिश भारताचा भाग होता. १९३५च्या कायद्याने ब्रिटिशांनी म्यानमारचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले. त्यानंतर तेथे राष्ट्रीय चळवळ प्रभावी झाली. त्या राष्ट्रीय चळवळीचे पहिले शिलेदार बौद्ध भिक्षू होते. त्यांनी बौद्ध पगोड्यामध्ये ब्रिटिश लोक पादत्राणांसह प्रवेश करतात, याचे निमित्त करून ब्रिटिशांवर हल्ले केले. त्यातून म्यानमारच्या राष्ट्रवादाची पहिली ठिणगी पडली. जेथे युरोपियन सत्तांचा प्रभाव होता, तेथे राष्ट्रीय चळवळ व राष्ट्रवादाचा पाया धर्माने घालून दिला होता. युरोपियन सत्तांच्या प्रभावाखाली राहून राजकीय, सामाजिक सुधारणा झाल्या, पण त्या पूर्ण नव्हत्या. त्यास अंतिम रूप येण्यापूर्वीच आशियातील राष्ट्रांनी स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळे सामाजिक, राजकीय बदलांचे वारे मंदावले, अर्धसुधारित लोकांना घेऊन नव-स्वातंत्र्यवादी राष्ट्राची वाटचाल सुरू झाली खरी, पण जातीची, धर्माची, वंशाची, विषमतेची जळमटे मात्र दूर होऊ शकली नाहीत. धर्माचा कमी झालेला प्रभाव पुन्हा राजकीय क्षितिजावर मान वर काढू लागला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्यानमार.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
राष्ट्रीय चळवळीमध्ये बौद्ध धर्माची भूमिका महत्त्वाची राहिल्यामुळे स्वातंत्र्यानंतर बौद्ध धर्मालाच महत्त्व असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका भिक्षूंनी घेतली. त्यास तत्कालीन राज्यकर्ते व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. बौद्ध धर्मीयांच्या मागणीबरोबर वांशिक गट वेगवेगळ्या मागण्या करू लागले. म्यानमारच्या विशिष्ट भौगोलिकतेमुळे त्या देशात विविध जमाती उदयास आलेल्या होत्या. या जमाती काही शेकडो वर्षे त्या देशात वास्तव्य करून आहेत. तुलनेने अलीकडच्या ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काळात या जमाती आणि त्याच्या बोली भाषेमधून नव्या अस्मिता तयार झाल्या. त्यातून म्यानमारच्या नव्या समस्या निर्माण झाल्या. लोकशाहीची परंपरा नसलेल्या देशामध्ये म्यानमारचा अंतर्भाव होत असल्यामुळे अल्पावधीतच अराजकता निर्माण होऊन लष्कराने सत्तेचे नियंत्रण स्वत:कडे घेतले. लष्कराने समाजवादाच्या प्रभावाने धर्माचे महत्त्व कमी करून मार्गक्रमण केले. थेरवादी संप्रदायाने प्रत्येक क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो दबदबा कायमस्वरूपी टिकवण्याच्या दृष्टीने रोहिंग्यांना बौद्ध धर्माचा शत्रू बनवण्यासाठी जाणीवपूर्वक जे प्रयत्न झाले, त्यातून रोहिंग्या व बौद्ध संघर्षाची सुरुवात झाली. ते या पुस्तकामध्ये चित्तवेधक आहे.
म्यानमारच्या उत्तरेला आराकान प्रदेशात अल्पसंख्याक मुस्लिमांचे वास्तव्य आहे. एकेकाळी त्यांची संख्या दहा लक्ष होती. पण गेल्या सुमारे २५-३० वर्षांत आणि विशेषत: आठ-दहा वर्षांत बहुसंख्याक असलेल्या बौद्ध समाजाकडून त्या मुस्लिमांवर अत्याचार होऊ लागले. रोहिंग्या हे परकीय आहेत म्हणून त्यांच्या वस्त्या जाळून टाकल्या गेल्या. स्त्रियांवर\मुलींवर बलात्कार झाले. तरुण-वृद्धांवर हिंसक हल्ले करण्यात आले. या क्रौर्याचे टोक म्हणजे लहान मुले आणि अबलांना जगणे अशक्य झाले. या पुस्तकामध्ये रोहिंग्या शब्दाचे मूळ व कूळ अरुण वाहूळ यांनी सांस्कृतिक व समाजशास्त्रीय पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे.
बौद्ध धर्माला म्यानमारमध्ये महत्त्वाचे स्थान नसण्याचे मुख्य कारण इस्लामधर्मीय रोहिंग्या असल्याचा प्रचार मूलतत्त्ववादी भिक्षूंनी केली. रोहिंग्या हे बाहेरून आपल्या देशात वास्तव्यास आल्याचा प्रचार करून, तसेच त्यांना दुय्यम नागरिकत्व असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात जनसामान्यांना उभे केले. त्याचा परिणाम हा झाला की, रोहिंग्यांना म्यानमारच्या बाहेर काढण्याचा नियोजित कट करण्यात आला. रोहिंग्या मुस्लीम कडवे आहेत, अतिरेकी आहेत असे म्हणत बहुसंख्याक बौद्ध लोक अगदी स्थानिक बौद्ध भिक्षूंच्या मदतीने, आशीर्वादाने तमाम रोहिंग्यांवर हल्ले करू लागले. यामध्ये हल्ले करणाऱ्यांमध्ये भिक्षू असल्याचे अनेक दाखले या पुस्तकात अरुण वाहूळ यांनी दिले आहेत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आज जगात विविध प्रकारच्या अल्पसंख्याक (धार्मिक, वांशिक, प्रांतिक, भाषिक) गटावर हल्ले सुरू झाले आहेत. म्यानमारमध्ये शेकडो वर्षं वास्तव्य करूनही रोहिंग्यांना दुय्यम नागरिकत्व देण्यात आले. श्रीलंकेतील तामिळ समाज अशाच अस्थितीत आहे. पाकिस्तानमध्ये शिया-अहमदिया इस्लामी राष्ट्रांतही उपेक्षित आहे. वांशिक स्थानिक संघर्षातून रवांडातील उग्रवादी बहुसंख्याकांनी तुत्सी समाजावर असेच हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये किमान सहा लाख तुत्सी लोकांची हत्या करण्यात आली. युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यानंतर तेव्हा सर्बियन बहुसंख्याकांनी बेल्जियम मुस्लिमांना छळछावण्यांमध्ये पाठवले, काहींचा छळ करून ठार केले. रशियामध्ये युक्रेन व रशियन यांच्यातही संघर्ष सुरू आहे. दहशतवादाचा जन्म आणि विस्तार अशाच यादवीमधून होतो. याची असंख्य उदाहरणे आपणास जगाचा अभ्यास केल्यानंतर सापडतात.
भारतासारख्या स्वत:ला सहिष्णू आणि अहिंसावादी समजणाऱ्या देशातही अल्पसंख्याक मुस्लिमांना असुरक्षित वाटू लागले आहे. लव्ह-जिहाद, लिचिंगच्या माध्यमांतून मुस्लिमांना त्यांची जागा दाखवली जात आहे, नागरिकत्व कायद्यात केलेले बदल त्यातून जाणीवपूर्वक मुस्लिमांना वगळणे, या घटना अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणाऱ्या आहेत. तसेच लोकसंख्या गणनेच्या प्रक्रियेत बदल करून मुस्लीम समाजाला कायदेशीरपणे, बहिष्कृत करण्याचा प्रकार सुरू आहे. मीडिया, नोकरशाही, पोलीसयंत्रणा वापरून मुस्लिमांचे वास्तवात दुय्यमत्व प्रस्थापित केले जात आहे. कोणत्याही समाजाच्या उत्पीडनाची सुरुवात अशाच पद्धतीने होते, हे अरुण वाहूळ यांनी केलेल्या रोहिंग्यांच्या अभ्यासावरून सविस्तरपणे स्पष्ट होते. रोहिंग्याविषयीचे लिखाण इतक्या सविस्तरपणे इंग्रजीमध्येदेखील झालेले नाही. (माझी सूचना आहे की, अरुण वाहूळ यांनी या पुस्तकाचे भाषांतर हिंदी आणि उर्दूत करायला हवे.)
आजघडीला जास्त अत्याचारित समाज म्हणून रोहिंग्याचा उल्लेख होतो. बांग्लादेशामध्ये राहत असलेल्या निर्वासित रोहिंग्यांना तो देश आता ठेवू इच्छित नाही. त्यामुळे रोहिंग्यांना बोटीत बसवून निर्मनुष्य सहारा बेटावर सोडले जात आहे. काही लाख रोहिंग्यांना म्यानमारमधून हद्दपार केल्यानंतर त्यांना कुठेही आसरा दिला गेला नाही. तसेच ज्यांनी काही प्रमाणात त्यांना आश्रय दिला होता, आता ते त्यांना बाहेर काढत आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
दक्षिण पूर्व आशियात आणि दक्षिण युरोपातही अशीच परिस्थिती आहे. कित्येक हजार लोक बोटींमध्ये बसून भूमीच्या आसऱ्याचा, जगण्याचा शोध घेत आहेत. फ्रान्सिस बेकन या इतिहासकाराने इतिहासाची व्याख्या करताना म्हटले होते- “मानवाला शहाणी बनवणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास.” रोहिंग्या समस्येची पार्श्वभूमी भारतीयांनी व्यवस्थित लक्षात घेऊन शहाणे होण्याची वेळ आहे. कारण आपले मार्गक्रमण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे भारतामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याकांची स्थिती रोहिंग्याप्रमाणे होऊन देशात पुन्हा दुसरी समस्या निर्माण होणार नाही ना, याची खबरदारी सर्वांना घ्यावी लागेल, तर इतिहासापासून आपण काही तरी बोध घेतला असे आपणास म्हणता येईल.
या पुस्तकात प्रा. अरुण वाहूळ यांनी घेतलेल्या रोहिंग्याचा शोध प्रातिनिधिक आहे. हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत जावयास हवे.
‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ - अरुण वाहूळ
लोटस इंडिया प्रकाशन, औरंगाबाद
मूल्य – २७५ रुपये.
.............................................................................................................................................
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत.
ketkarkumar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment