अजूनकाही
१. मुंबईसह राज्यातील सहा महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येईल. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. मुंबईत कदाचित थोडाफार फरक पडू शकतो. तशी वेळ आल्यास शिवसेनेनेच भाजपला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा. युती ही शिवसेनेने तोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास टाळीसाठी शिवसेनेनेच हात पुढे करावा. शिवसेना भाजपमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
रावसाहेब, वैचारिक मतभेद असण्यासाठी आधी येनकेनप्रकारेण सत्ता मिळवण्याच्या हव्यासापलीकडे काही विचार असायला हवा असतो. तुम्हा दोघा पक्षांच्या विषारी प्रचारानंतर दोन्ही पक्षांवर तसा आरोप कोणीच करू धजणार नाही. शिवसेनेला मुंबईत सर्वाधिक जागा मिळाल्या तरी महापौर भाजपचाच होणार अशा थाटात तुम्ही त्यांच्याकडूनच युतीसाठी पुढाकाराची अपेक्षा ठेवताय, हे तर जामच भारी आहे.
…………………………………………………………
२. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत न मिळाल्यास कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी
निवडणुकीआधी कुणीही कुणावरही कितीही निरर्गल टीका करू शकतं, निवडणुकीआधी कुणीही कुणावरही कितीही गंभीर आरोप करू शकतं, निवडणुकीआधी कुणीही कुणाचंही कितीही चारित्र्यहनन करू शकतं आणि निवडणुकीआधी आपण काय बरळत होतो, याची भीडभाड न ठेवता निवडणुकीनंतर कुणीही कुणाबरोबरही जाऊ शकतं आणि तोंड वर करून त्याचं समर्थनही करू शकतं, हे आता आम्हाला पाठ झालंय पंत.
…………………………………………………………
३. जावळीच्या खुर्शीमुरा गावातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आली होती. वसंत मानकुमरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला होता. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.
राजे, भूतकाळाच्या गडावरून खाली उतरा. ज्यांनी बांगड्या भरलेल्या असतात, त्यांनीही तुम्ही म्हणता त्या अर्थाने आता बांगड्या भरलेल्या नाहीत. त्या दुबळ्या उरलेल्या नाहीत आणि नेभळटपणाचं प्रतीकही राहिलेल्या नाहीत. शिवाय कुणीतरी वेडगळ हल्ला चढवला की, आपण लगेच त्याला नेस्तनाबूत करायला धावायचं, याला आजकाल सरसकट शौर्यही गणलं जात नाही. तेव्हा, (हे तुम्हाला सांगून काहीच उपयोग नसतो, तरीही) सबूर!
…………………………………………………………
४. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात चिनी कोबीची लागवड यशस्वी झाली असून त्या कोबीला चांगली पानेही आली आहेत, असे नासाने म्हटले आहे. अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी अजून कोबीचे सेवन केलेले नाही. चिनी प्रकारातील टोकियो बेकाना नावाची ही कोबीची प्रजाती असून ती अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी वाढवली आहे. थोडी कोबी खाण्यासाठी वापरली जाणार असून बाकीची नासाच्या केनेडी अवकाश केंद्रात अभ्यासासाठी परत पाठवली जाणार आहे. अवकाश स्थानकात वाढवलेले हे पाचवे पीक आहे.
कोबी चिनी आहे म्हटल्यावर निर्वात पोकळीतही तो वाढेल, यात शंका नाही. शिवाय तो अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर मागवून विकला तरी सर्व खर्च जोडूनही तो भारतातल्या फेरीवाल्यांकडे भारतीय कोबीपेक्षा स्वस्त दरातच मिळेल, यातही काही शंका नाही.
…………………………………………………………
५. नोटाबंदीनंतर निर्माण झालेला अभूतपूर्व चलनताप आता कुठे कमी होत असतानाच ‘गरज असेल तरच एटीएममधून लोकांनी पैसे काढावेत. काही जण गरजेपेक्षा जास्त पैसे एटीएममधून काढतात. त्यामुळे इतरांना पैसे मिळत नाहीत. असे होऊ नये यासाठी लोकांनी उगाचच पैसे काढू नयेत,’ असे आवाहन केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी केले आहे.
दासबाबू, खातं आमचं, पैसे आमचे, काढणार आम्ही; किती काढायचे हे सांगणार तुम्ही? बहुत नाइन्साफी है. कोणाला किती पैशांची गरज आहे हेही तुम्हीच ठरवणार का? तुमच्या या उद्योगांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय आणि लोक मुळात बँकांमध्ये पैसेच ठेवायचे बंद होतील. तेव्हा, आवरा… स्वत:ला.
…………………………………………………………
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment