‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादाच्या निमित्तानं सलमाच्या जगात मिसळण्याचा ‘जो’ अनुभव मिळाला, तो स्वत:पलीकडे नेणारा होता...
दिवाळी २०२१ - विशेष लेख
सोनाली नवांगुळ
  • डावीकडे सलमा या लेखिकेच्या ‘इरंदम जामथिन कधाइ’ या मूळ तमिळ कादंबरीच्या ‘द अवर पास्ट मिडनाईट’ या इंग्रजी अनुवादाचे मुखपृष्ठ आणि उजवीकडे मराठी अनुवादाचे. मध्यभागी सलमा आणि सोनाली नवांगुळ यांची छायाचित्रं
  • Fri , 29 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख सलमा salma इरंदम जामथिन कधाइ द अवर पास्ट मिडनाईट The Hour Past Midnight मध्यरात्रीनंतरचे तास Madhyaratrinantarchae Taas मुस्लीम Muslim मुस्लीम महिला Muslim Women

पुस्तक कुरिअरनं घरी आलं. त्या आधी फोनवर कविता महाजन म्हणाल्या होत्या, ‘ ‘भारतीय लेखिका’ या मालेतलं पुस्तक अनुवादासाठी पाठवतेय. कादंबरी आहे. मोठी आहे, पण तू करशील चिकाटीनं.’ कविताताईंना संपादक म्हणून विश्वास वाटतो, तर मी कशाला डरायचं म्हणून मी मोठ्या तोंडानं, ‘हो, करेन की!’ म्हणून टाकलं. प्रत्यक्षात कादंबरी हातात आली, तेव्हा छाती दडपून गेली. कारण यापूर्वीचा मी केलेला पहिला अनुवाद १७४ पानांचा. आता हे मजबूत ४७८ पानांचं बाड. पुन्हा मुलाखती वगैरे... मागं हटायचं नाही, हे ठरवून ‘काम’ हातात घेतलं.

सलमा या लेखिकेने ‘इरंदम जामथिन कधाइ’ या मूळ तमिळ भाषेत लिहिलेल्या कादंबरीच्या ‘द अवर पास्ट मिडनाईट’ या लक्ष्मी होलस्ट्रोमनी केलेल्या इंग्रजी अनुवादावरून मी मराठी अनुवाद करणार होते. कामाची सुरुवात करताना मला वाटलं, ‘ड्रीमरनर’सारख्या एका अनुवादाचा अनुभव माझ्या खात्यावर जमा आहे. ती पश्चिमी संस्कृतीत वावरलेल्या खेळाडूची आत्मकथा. तसं वातावरण माझ्यापर्यंत टीव्ही व आंतरराष्ट्रीय सिनेमांमधून पोहोचलेलं असलं तरी मी प्रत्यक्ष न अनुभवलेलं. खेळाचं विश्व मला अपरिचित. तरी ते पुस्तक चांगल्यापैकी होऊ शकलं, तर तामिळनाडूसारख्या भारतातल्याच एका राज्यात राहणाऱ्या सलमानं लिहिलेलं वातावरण माझ्या जास्त परिचयाचं असू शकेल. शिवाय पुस्तक चाळल्यावर त्यातला मजकूर संवादी वाटत होता. सलमाच्या ज्या मुलाखती पाठवल्या होत्या, त्या आधी वाचल्या. जेमतेम नववीपर्यंत पोहोचू शकलेली ही बाई जे सांगते, ते तिच्या अनुभवातून आलेलं, हे लक्षात आलं. अशी बाई फार अवतरणं, सुभाषितवजा वेचे, जगण्याचं घनघोर तत्त्वज्ञान वगैरे न सांगता सोपं, पण गंभीर आशयाचं काही सांगेल, अशीही आशा वाटली आणि पहिल्या चार प्रकरणांचा अनुवाद करून मी कविताताईंना संपादकीय सूचनांसाठी पाठवला.

या चार प्रकरणांत होतं काय? तर कादंबरीतली एक नायिका राबिया, तिचं काही मित्रमंडळ, त्यांचा साधारण दिनक्रम, जवळच्या घरात झालेला नात्यातल्या प्रौढ बाईचा मृत्यू, फिरदौस नावाच्या मुलीनं पहिल्याच रात्री नवऱ्याला पाहून दिलेली नकाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नि त्यामुळे माजलेला गोंधळ, त्या मुस्लीमबहुल गावाला लागलेली रमजानसारख्या सणाची चाहूल आणि त्यासाठी लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या पूर्वतयारीत गढलेल्या बायका. यातली माणसं कुणाची कोण आहेत, याचा पत्ता मला अजून लागायचा होता... त्यामुळे इंग्रजीतला मजकूर शक्य तितक्या सहज व बोलीभाषेतल्या मराठीत आणणं इतकंच काम मी नेकीत केलं. कविताताईंना ते पसंत पडावं या ताणाखाली केलं. त्यांच्या सूचना येईपर्यंत पुढची दोन-तीन प्रकरणं वाचली, पण लक्षात आलं की, नात्यांचा भयंकर गोंधळ उडतोय. त्यामुळे गोष्ट जी आहे, त्यापेक्षा मनात ती निराळीच लक्षात राहतेय. पेक्षा हे बरं की, करणार असलेल्या एक-दोन प्रकरणांचं वाचन करावं नि लक्षात ठेवायचा ताण डोक्याला न देता, वाचेन तितकंच पुन्हापुन्हा योग्य करत न्यावं.

..................................................................................................................................................................

तमिळ साहित्यात सलमानं आपलं अस्तित्व निर्विवादपणे ठळक केलंय. सलमाची लिहिण्याची शैली कुठल्याही अभिनिवेशाशिवायची. सविस्तर वर्णनांमधून येणारी गोष्ट कुठलाही वैरभाव न पेरणारी, कसलेही उपदेश न देणारी. अनुवादात तिचं हे वाहतेपण हरवू न देणं ही जबाबदारीच होती... जबाबदारीचं भान ठेवून मी हे जग आपल्या भाषेत आणायचा प्रयत्न केला, इतकंच सांगता येईल…

.................................................................................................................................................................

मला थेट कॉम्प्युटरवर श्री लिपीत लिहिण्याचा सराव. त्यामुळे एकेका पानावर जसजशी पात्रं उगवतात तशी ती पेजमेकरच्या एका कोपऱ्यात लिहून ठेवायला लागले. मुस्लीम माणसांच्या जगण्या-वागण्याबद्दलची माझी समज मी येता-जाता न्याहाळलेल्या माणसांच्या पलीकडं न गेलेली. ही माणसं पाच वेळा नमाज पढतात इतकंच सामान्य ज्ञान होतं, पण त्यांची नावं व त्यासाठीची रिच्युअल्स याबद्दलची कल्पना नव्हती. हळूहळू या अपरिचित पर्यावरणाबद्दलची ओढ वाटायला लागली. सगळी कादंबरी न वाचल्यामुळे पुढं काय याची उत्सुकता वाढायला लागली.

दरम्यान पाठवलेल्या चार प्रकरणांवर कविताताईंकडून सूचना व दुरुस्त्या हाती आल्या.

मुस्लीम माणसांच्या भाषेतबद्दलही ठरीव साच्यातलं ठाऊक असणाऱ्या मी पहिली चूक ही केली होती की, अनुवादात हिंदी वाक्यंच्या वाक्यं पेरली होती, तीही उर्दू व हिंदीतला फरक लक्षात न घेता. हे असं का केलं, असा प्रश्न मला कविताताईंनी विचारल्यावर मी उत्तर दिलं, ‘मला वाटत होतं की, हिंदी वापरल्यामुळे मुस्लीम वातावरणाचा फील येईल.’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘नुसतंच ‘वाटणं’ याला काही अर्थ नाही. तू या वाटण्याला योग्य लॉजिक देत असशील तर मी मान्य करेनही’. लॉजिक माझ्याकडे नव्हतं. हिंदीतल्या काही वाक्यांमुळे अनुवाद छान वाटतोय असं मला वाटत होतं. यामुळे कविताताईंच्या कडक आवाजाचा रागही आला. मात्र त्यांचा अनुवादातला व संपादनातला अनुभव लक्षात घेता, त्या योग्यच सूचना देणार, यावर विश्वासून व मला योग्य कारण न देता आल्यामुळेही मी त्यांचं म्हणणं मान्य केलं. अपवाद वगळता अशी वाक्यं व शब्द वगळून टाकली. अर्थात त्या वेळी स्वातंत्र्यपूर्व काळापासून तमिळ लोकांचा हिंदी विरोधाचा राजकीय निर्णय माझ्या गावीच नव्हता.

वाक्यरचना करताना ती अगदी सहज वाटावी म्हणून मी क्रियापदांची रचना गंमतशीर केली होती किंवा काही ठिकाणी क्रियापदच वापरलं नव्हतं. उदा - ‘तुला यावर काहीच बोलायचं नाही?’ऐवजी ‘नाही बोलायचं तुला यावर काही?’ इथं उदाहरणादाखल एखादं वाक्य वाचताना अर्थात विशेष काही फरक पडताना जाणवत नाही, पण एका पानावर अशी तीन-चार वाक्यं आली तर खटकतं आणि उगीचंच काव्यमयता आणल्यासारखं वाटतं. रोज बोलताना आपण सारखं ‘असं’ बोलत नाही, ही जाणीव मला दुरुस्ती सुचवली गेल्यावर झाली. सोपं लिहिणं म्हणजे सर्वनामं व क्रियापदं यांच्या जागांची अदलाबदल नव्हे, याचं भान आलं. दरम्यान मी गोष्टीत गुंतायला लागले.

तामिळनाडूमधलं मुस्लीमबहुल एक छोटंसं गाव आणि रूढी-परंपरांमध्ये कर्मठपण असणारी कुटुंबं यांचा साधारण वर्षभराचा पट समोर उलगडत असतानाही त्यांचा बराच गुंतागुंतीचा भूतकाळही समजून घेणं गरजेचं होतं. तो सावकाश कळत जात होताच, कारण कादंबरी ‘आजचं’ सांगताना अचानक जुन्या आठवणींच्या कड्या उलगडायला लागायची. गोष्टीत खूप काही नाट्यमय घडत नसतानाही ती गुंतवून ठेवत होती. सणाच्या तयारीपासून ते गल्लीतल्या घरांच्या रचनांपर्यंतची वर्णनं अत्यंत सविस्तर व रोचकता वाढवणारी होती. तरी सगळ्यात पहिल्यांदा धसका बसला त्यातल्या भरपूर बायकांचा नि या समाजात साट्यालोट्याचं प्रकरण प्रचंड असल्यामुळे त्यांची नाती समजून घेण्याचा.

इंग्रजीतला मजकूर वाचताना त्यात सांगितलेले अंकल नेमके काका आहेत, मामा की अन्य कुणी आणि आंटी या मामी, मावशी, वहिनी, काकू की अन्य कुणी, हे समजून घेताना त्रासून गेले. कादंबरी निम्म्यावर पोहोचली तरी मी आपली माझ्या सोयीसाठी बनवलेल्या नात्यांच्या तक्त्यात वेळोवेळी लिहिलेली नाती बदलत बदलत गोष्ट नव्यानं समजून घेत राहायचे. यातल्या माणसांची अंदाजे वयं काय असतील, याचाही अंदाज त्यातून लागत गेला आणि साधारण समवयस्क कोण असावेत, त्यांनी एकमेकांशी कशा भाषेत बोललं तर चालेल हेही कळत गेलं.

हळूहळू यातल्या असंख्य बायकांनी मला झपाटून टाकलं. पाच नमाजांच्या मधल्या वेळेत स्वत:साठी बारीकसा अवकाश शोधणाऱ्या बायकांचं रोजचं जगणं कसं असू शकेल, हे समजून घेताना स्वत:ला जन्माबरोबर मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी मोल वाटायला लागलं.

थोडा वेळ कामात विश्राम घेऊन कॉम्प्युटरपासून बाजूला जावं नि बाहेर फेरटफका मारून यावं म्हणून कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवर जायचे, तेव्हा वाटायचं, मी राबियाच्या किंवा नफिजाच्या घरातून बाहेर पडलेय नि गल्लीतल्या बाकीच्या बायका मला तिथं भेटताहेत. कमी-अधिक वयाच्या, बुरखे घातलेल्या या बायकांमध्ये कुणी स्थूल दिसलं की वाटायचं, अरेच्चा ही तर सौरा, विधवा झालेल्या शरीफाची आई. हा बारीकसा, दाढी राखलेला, उभट चेहऱ्याचा व गोल टोपी घातलेला माणूस सुलेमानसारखाच वाटतोय! अचानकच इतकी मुस्लीम माणसं का दिसायला लागलीहेत अवतीभवती? या आधी मला इतकं ठळकपणे त्यांचं असणं का जाणवलेलं नव्हतं?

झपाटून सलग काम करण्यानं माझं रोजचं जग या कादंबरीतल्या जोहरा, अमिना, सैनू, फिरदौस, नफिजा, कादर, करीम, हनीफा, सिकंदर, नुराम्मा, राबिया, मदिना, उमा, इलियाज, अहमद यांच्यात बेमालूम मिसळून गेलं. कादंबरीतल्या प्रसंगानुसार दिवसभर एक निरागस प्रसन्नता जाणवत राहायची किंवा एक विचित्र बेचैनी. ही खेच इतकी जास्त होती की, एक शॉर्ट-टर्म सदर लिहिताना मला कादंबरी ड्रॉवरमध्ये दडपून ठेवावी लागली.

यापूर्वी जे काही थोडंबहुत मुस्लीम स्त्रीचं जग वाचलेलं, ते बरंचसं देशाबाहेरच्या बायकांनी लिहिलेलं. मारझोड, पाशवी बलात्कार, कधी केस छाटून, तर कधी स्तन कापून केलेलं त्यांचं शारीरिक विद्रूपीकरण, त्यातून आलेलं मानसिक खच्चीकरण असं अत्यंत हृदय हेलावणारं होतं ते सगळं. त्यांचं सत्य खोटं वाटावं इतकं ढळढळीत खरं नि नाट्यमय.

‘मध्यरात्रीनंतरचे तास’मध्ये जगणाऱ्या बायका पुरुषसत्ताक जगात लहानसहान गोष्टींसाठी नाडल्या जाणाऱ्या. उंबरठ्याआत रोज ‘बारीकसारीक’ तडजोडी करत जगावं लागणं, सिनेमाला जाण्यापासून ते लैंगिक संबंधांपर्यंत स्वत:च्या इच्छा दाबाव्या लागणं, नवऱ्याला आवडत नाही म्हणून दिलासा देणारी मैत्री तोडावी लागणं, अशा कितीतरी दु:खांना आणि सलांना प्रतिष्ठा ती किती? कारण पुरुषसत्ताक जगात बाईबाबतीत तिनं तडजोडी करत जगणं हे पुरुषांइतकंच बाईच्याही सरावाचं. अशा परिस्थितीत सलमानं चितारलेल्या असंख्य बायका छोटे छोटे विद्रोह करतात. त्यांच्या जगात त्यांनी केलेला हा उठाव भविष्यात किती दूरगामी परिणाम घडवून आणू शकतो, याची फिकीर न करता, मात्र चौकटीत राहून हुंकार देतात, हेही कमी नाही, हे मला कळत गेलं.

..................................................................................................................................................................

खूपशा बायकांच्या ‘अशा’ गोष्टीतले सगळेच पुरुष हिणकस, वखवखलेले नि धर्मकर्मठ असणं यानं बायकांच्या सोसण्याला एक वजन मिळू शकतं. ग्लॅमर येऊ शकतं. तरीही सलमाच्या गोष्टीतले पुरुष तिनं असे काळे रंगवलेले नाहीत, कारण तिचं म्हणणं ते सरसकट तसे नसतातच. वर्षानुवर्षांच्या पुरुषसत्ताक जगात पुरुषांनी थोडं मजबूत, आक्रमक, बेमुर्वत नि माजोरं असणं तिनं साहजिक मानलंय, तरीही ते कुणी खलनायक नाहीत, तर चाकोरीचा बळी आहेत, हे ती जरूर दाखवते. अर्थात त्याचं समर्थन करत नाही. त्यामुळेच मुलीच्या पाठवणीच्या वेळी मन भरून आलेला, पण तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवताना दचकलेला कादर दिसतो. आपल्या बायकोचे दुसऱ्या पुरुषाशी असणारे संबंध दुरून कानावर असतानाही तिच्यावर विश्वासून साथ देणारा बशीर, शरीफाला सुंदर सुंदर पत्रं लिहिणारा व पत्ररूपानं उरलेला तिचा नवरा सलाम, आपल्या नातीला शिक्षणासाठी घरी ठेवून घेणारे हनीफ, असे यातले कितीतरी पुरुषही याच जगाचा एक हिस्सा आहेत.

.................................................................................................................................................................

मुरूक्कू, पुट्टू, अथिरसम, कुझांबू (कुळांबू), अप्पम, वडई असे नाना खाद्यप्रकार तिखट आहेत की, गोड हे माहिती नसताना त्यांच्या पाककृती शोधून त्यांची व्हर्च्युअल चव अनुभवताना दिवसदिवस उपासानं अशक्त झालेल्या बायका सगळ्याच घरादाराला खूश ठेवायचं म्हणून स्वयंपाकघराशी कशा बांधल्या आहेत, हे दिसत होतं.

कादंबरी पुढे जायला लागली, तसा माझ्यासाठी एक कठीण काळ आला. ती माझी स्वत:ची मर्यादा होती. माझ्या घरात जिथं मासिक पाळीविषयीसुद्धा खाणाखुणांनी बोललं जायचं, तिथं या उंबरठ्याआतल्या बायकांची लैंगिकतेबद्दलची मोकळीढाकळी बोलणी, कोपरखळ्या, चेष्टामस्करी, ‘ती’ दुखणी मराठीत आणताना मी शब्द कसे वापरणार होते? पांढरपेशा, सुशिक्षित नि तशा मोकळ्या वातावरणात वाढूनही माझा हा संकोच मला चकित करून गेला. स्तन, त्यांचा आकार, त्यावरून केलेली मस्करी, लिंग नि योनीवरून झालेल्या गप्पा, याचा अनुवाद माझ्यासाठी केवळ भाषिक अनुवाद उरला नाही. मीही आतून मोकळी होत गेले, सहज होत गेले. वाढाळू वयातल्या राबियाला अहमदनं दिलेला, लिंगाचा भाग उठावदार दिसणारा लाकडी बाहुला पाहून तिच्या आईची- जोहराची बाहुला केरात फेकून देण्याची जी प्रतिक्रिया होती, थोड्या फार फरकाने मीही भाषेबाबतचा संकोच जागा ठेवून तशीच व्यक्त होत होते, हे माझ्या लक्षात आलं.

एकदा हा अडथळा पार केल्यावर मग भाषेच्या दृष्टीनं सोपं होत गेलं, पण सलमाच्या लेखनातून ज्या गोष्टी येत होत्या, त्यानं अस्वस्था वाढत गेली. कुटुंबाची व स्वत:चीही प्रतिष्ठा पणाला लावून फिरदौससारख्या देखण्या मुलीनं नवऱ्याबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं केलेलं धारिष्ट्य एकीकडे नि नव्या प्रेमाची चाहूल लागून शरीराच्या हाकांनी बेभान झाल्यावर घडणारं नाट्य दुसरीकडे. आपल्या मावशी व बहिणीबाबतीत जे घडलं, ते आपल्या मुलीबाबतीत घडू नये म्हणून वाढत्या वयातल्या राबियाभोवती नियमांचं कडं घट्ट करणारी जोहरा, या सगळ्यांतूनही राबिया नि अहमदमध्ये फुलत असलेलं कोवळं निरागस प्रेम नि एकमेकांच्या देहाविषयीचं सुप्त आकर्षण, बिछान्यात नव्या बाईला सराईतपणे खेळवणाऱ्या सरपंचानं प्रत्येक निवडीच्या वेळी बाईला मुतायला लावून तिची धार कुठवर जाते, यावरून तिची क्षमता तपासण्याबद्दलची बायकांमधली कुजबूज, शरीयतचा वास्ता देऊन मौलवीनं बायकोला पोरं जन्माला घालणं भाग पाडणं, पुरुषांचे लग्नसंबंधांव्यतिरिक्तचे घरोबे, बायकांचंही नवऱ्याव्यतिरिक्त आवडलेल्या पुरुषाशी असलेल्या नात्याचं बायकांमधलं उघड गुपित… कितीतरी गोष्टी…

उंबरठ्याआतला हा असा मोकळेपणा रंगवताना आपल्या मुलींना वाढवताना बायका कशा संकोचलेल्या होत्या, हेही सलमानं दाखवलंय. ‘छातीकडे, योनीकडे पाहिलंस तर काळीठिक्कर पडशील, मग तुझ्याशी कुण्णी लग्न करणार नाही,’ अशी भीती लहानपणापासून मुलींना घातली गेलीय. लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या शारीरव्यवहाराविषयी कमालीची गुप्तता पाळत आल्यावर अचानकच सगळ्या जणी ‘पुरुषा’वरून आपल्याशी घाणेरडं का बोलतात नि व्हिडिओ क्लिप्स का पाहायला लावतात, या गोंधळात अडकलेल्या वहिदाची मनोवस्था या विरोधाभासातच लक्षात यायला लागली. पिचलेल्या परिस्थितीतून बाहेर येऊनही कंगाल आयुष्य जगणाऱ्या व परिस्थिती पालटण्यासाठी कुठल्या तरी गुप्त खजिन्याची वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या नुराम्मावर गावपंचायत बहिष्कार टाकते. का? तर तिची विधवा मुलगी कुणा हिंदू मुलाबरोबर पोटच्या पोराला मागं टाकून पळून गेली म्हणून! ‘माझ्या मुलीच्या अपराधाची शिक्षा मला का?’ असा जाब विचारत मशिदीसमोर जमिनीवरची माती मुठींनी उधळत आक्रोश करणारी नुराम्मा अखेर वेडी होत अंथरुणाला खिळते. घरासमोरच्या रस्त्यावर कसलाही आवाज झाला तरी वेडसर अवस्थेत ‘कोण, कोण?’ असा प्रश्न विचारणारी नुराम्मा चमत्कार व्हावा म्हणून ज्या जिनची वाट बघते, तो अखेरपर्यंत येणारच नसतो, हे सत्य तिला माहिती नसेल का? तरीही आशा जिवंत ठेवणं, याला भाबडेपणा म्हणावा की मूर्खपणा?

खूपशा बायकांच्या ‘अशा’ गोष्टीतले सगळेच पुरुष हिणकस, वखवखलेले नि धर्मकर्मठ असणं यानं बायकांच्या सोसण्याला एक वजन मिळू शकतं. ग्लॅमर येऊ शकतं. तरीही सलमाच्या गोष्टीतले पुरुष तिनं असे काळे रंगवलेले नाहीत, कारण तिचं म्हणणं ते सरसकट तसे नसतातच. वर्षानुवर्षांच्या पुरुषसत्ताक जगात पुरुषांनी थोडं मजबूत, आक्रमक, बेमुर्वत नि माजोरं असणं तिनं साहजिक मानलंय, तरीही ते कुणी खलनायक नाहीत, तर चाकोरीचा बळी आहेत, हे ती जरूर दाखवते. अर्थात त्याचं समर्थन करत नाही. त्यामुळेच मुलीच्या पाठवणीच्या वेळी मन भरून आलेला, पण तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवताना दचकलेला कादर दिसतो. आपण मुलीला समोर घेऊन कधी सुखदु:खाच्या गोष्टी केल्या नाहीत, मग आतून जे प्रेम वाटतंय ते कसं दाखवायचं, दाखवणं योग्य ठरेल का, या गुंत्यात अडकलेला कादर बाप म्हणून बिचारा वाटायला लागतो. आपल्या बायकोचे दुसऱ्या पुरुषाशी असणारे संबंध दुरून कानावर असतानाही तिच्यावर विश्वासून साथ देणारा बशीर, शरीफाला सुंदर सुंदर पत्रं लिहिणारा व पत्ररूपानं उरलेला तिचा नवरा सलाम, आपल्या नातीला शिक्षणासाठी घरी ठेवून घेणारे हनीफ, असे यातले कितीतरी पुरुषही याच जगाचा एक हिस्सा आहेत.

यात बदलत्या राजकीय परिस्थितीचा व त्यामुळे बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा तमिळीयन व श्रीलंकन्सच्या संघर्षाचा एक संदर्भ हलकासा येतो. बरेचसे पुरुष हे श्रीलंका किंवा सौदी, सिंगापूर अशा ठिकाणी नोकरीधंद्यानिमित्त राहणारे व सणावारी गावाकडे परतणारे. त्यांच्यावर बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचे परिणाम झाले की, त्याचा असर घरादारावर ठरलेला. बायकोपासून इतका काळ लांब राहिल्यावर ते त्यांच्या शारीरिक गरजा कशा नि कुठे भागवतात आणि त्यांच्या गावात राहिलेल्या बायका अशा वेळी काय करतात, हा प्रश्न असेल तर याचं उत्तर काय देणार? उंबरठ्याआतली गोष्ट अनुवादित करताना वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीतल्या या कैक बायकांच्या नजरेतून पाहिलेलं विश्व केवळ उंबरठ्याआतल्या घडामोडी सांगणारं नाही, याची जाणीवही मला होत गेली. यातल्या निखळ आनंदाच्या गोष्टी, एकत्र गप्पा मारताना पाचकळ विनोदावर सातमजली हसणं, ठसठसणारी वेदना, सल केवळ सलमाच्या गावच्या मुस्लीम स्त्रियांचीच नव्हे, तर सगळ्याच बायकांची आहे, याची जाणीव होणं, अनुवादाला खऱ्या अर्थानं भिडायला मदत करणारं ठरलं.

सलमाच्या या कादंबरीतल्या त्या त्या दिवशी करणार असलेल्या गोष्टीनं माझा दिवस कसा असेल, हे ठरत जायचं. निराशा, राग, चिडचिड या चक्रात कधीतरी एकदम हलकं वाटून जायचं. असं करता करता मी पुस्तकाच्या शेवटाकडं येत चालले होते. पॅराप्लेजिक मी होतेच, पण शरीराची निकड म्हणून त्या काळात मी कॅथेटर वापरायला सुरुवात केली होती. युरिन बॅगमध्ये युरिन साठत राहायची. त्यामुळे तासातासानं टॉयलेटमध्ये जाणं टळलं होतं. जो वेळ वाचायचा, त्यात माझा एखादा उतारा मार्गी लागायचा. दिवसभर मी कॉम्प्युटरला चिकटलेली असायचे. संध्याकाळी उदय कुलकर्णींनी जबरदस्तीनं मला आवरायला पाठवलं. थोडा वेळ बाहेर जाऊन ताजी हवा खाणं आवश्यक आहे, म्हणून हट्ट धरला. माझा जाण्याचा मूड नव्हता, थकले होते. मात्र त्यांचा आग्रह मोडवेना म्हणून आवरायला गेले नि कळलं की, माझ्या पोटात-पाठीत एक विचित्र कळ जाणवतेय. दिवसभर पाणी प्यायचं भान राहिलं नव्हतं, म्हणून बॅगमध्ये युरिनही फार साठली नव्हती. बॅग केव्हा रिकामी केली, त्या वेळी किती युरिन साठली होती, काहीच लक्षात नव्हतं. थोड्या वेळात कळ वाढत गेली. उलटीची संवेदना जोर धरू लागली. बसल्याबसल्या एखादं हाड तुटलं काय, असं वाटावं इतकी जीवघेणी ती कळ होती.

डॉक्टर अजित कुलकर्णींना फोन केला, तर त्यांनी हॉस्पिटलला जा, निरोप ठेवतो असं सांगितलं. ते एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं बाहेर होते. ज्या माणसाला माझ्या सगळ्या दुखण्यांवर उपाय सापडतो आणि ज्याचा मला प्रचंड आधार वाटतो, असा डॉक्टर उपलब्ध नसल्यानं माझं अवसान गळालं. एक्स-रे, पेनकिलर, इंजेक्शन्स, सलाईन... सगळं करून झालं. श्वास घेणंही जड झालं होतं... मानेखालचं शरीर फुटून जाईलशी अत्यंत वाईट वेदना... उलटीचा जर्कही सहन होईना. तीन तास असेच निघून गेले... मला प्रायव्हेट रूममध्ये हलवलं. डॉक्टर कॉन्फरन्स संपवून मला तपासायला पोहोचले. त्याच क्षणी त्यांनी सांगितलं, कॅथेटर बदला व मला इन्फॉर्म करा. नवं कॅथेटर लावताच जवळपास आठशे मिली तुंबलेली युरिन बॅगमध्ये वेगाने आली नि पोट अगदी सैल झालं. एकदम निवळलेला ताणही सहन होत नव्हता. ब्लॅडर व किडनीवर बराच ताण आला होता, युरिन इन्फेक्शन होतंच. पाच दिवस शिरेतून हेवी अँटिबायोटिक्स रिचवून व पुढची पंधरा दिवसांची औषधं घेऊन घरी परतले.

डॉक्टर म्हणाले, ‘‘भान विसरून काम करायला हरकत नाही, पण लक्ष ठेवा!’’ मी अगदी खजील झाले. एकूण रूटिनबद्दल इतकी काटेकोर असून मी कसा काय हा हलगर्जीपणा केला? एखादं पुस्तक तुम्हाला जग इतकं विसरायला लावतं? मला वाटतं, मी कदाचित नुसती वाचक असते तर असं घडण्याचे चान्सेस कमी होते... मात्र इथं वेगळ्या भाषेतून आपल्या भाषेत सगळा मजकूर आणताना मी त्यांच्या जगात इतकी खोलवर घुसले की, जणू लवकरात लवकर हे सगळ्यांना सांगितल्याशिवाय मला मोकळा श्वास घेता येणार नव्हता.

..................................................................................................................................................................

मुस्लीम माणसांच्या भाषेतबद्दलही ठरीव साच्यातलं ठाऊक असणाऱ्या मी पहिली चूक ही केली होती की, अनुवादात हिंदी वाक्यंच्या वाक्यं पेरली होती, तीही उर्दू व हिंदीतला फरक लक्षात न घेता. हे असं का केलं, असा प्रश्न मला कविताताईंनी विचारल्यावर मी उत्तर दिलं, ‘मला वाटत होतं की, हिंदी वापरल्यामुळे मुस्लीम वातावरणाचा फील येईल.’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘नुसतंच ‘वाटणं’ याला काही अर्थ नाही. तू या वाटण्याला योग्य लॉजिक देत असशील तर मी मान्य करेनही’. लॉजिक माझ्याकडे नव्हतं.

.................................................................................................................................................................

काम पूर्ण केल्यावरही मी मोकळा श्वास घेतला का? एक खरं की, या अनुवादामुळे एखाद्या कामासाठी नेटानं बसायची सवय लागली. अमुक एका इंग्रजी शब्दासाठी प्रतिशब्द काय असा विचार करता करता भावनेला किंवा क्रियेला नेमके शब्द शोधावेत, अशी आस निर्माण झाली. शब्द सापडत जाण्याचा व भावना नेमकी पोहोचवण्याचा विलक्षण आनंद मिळाला. स्वातंत्र्य, नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना, स्त्रीवाद, मानवी संस्कृती, धर्मांधतेमुळे येणारी कट्टरता या सगळ्याचा एक वेगळा विचार जो यातल्या बायकांच्या नजरेतून सुरू केला होता, त्याबद्दल माझं एक आकलन तयार झालं. मात्र अनुवाद संपल्यावर व संपादकीय सूचनांनुसार इतकी मोठी स्क्रीप्ट जवळपास तीन वेळा उपसत राहण्याचं तांत्रिक काम योग्य तऱ्हेनं पूर्ण केल्यावरसुद्धा जी अस्वस्थता मनभर भरून आली, तिला काही वाट मिळाली का? सलमानं उंबरठ्याआत आपापल्या परीनं बंडाचं निशाण फडकवणाऱ्या ज्या बायका रंगवल्या त्या तिनं अनुवभलेल्या! त्यांचं जगणं बदललं काय? मुळात माणसांचं जगणं बदलून टाकणं, ही अशा एखाद्या कथात्म साहित्याची जबाबदारी असू शकते काय?

मला वाटतं, एक अनुवादक म्हणून काम करताना मला सलमाच्या या जगात मिसळण्याचा जो अनुभव मिळाला, तो स्वत:पलीकडे नेणारा होता... मूलभूत संकल्पनांचे अर्थ अधिक ठळक करणारा होता. मानवी मनातल्या सूक्ष्म भावभावनांबद्दल व मनोव्यापारांबद्दल अधिक सजग करणारा होता. सलमा तिच्यावर केलेल्या डॉक्युमेंटरीत म्हणते, ‘‘सगळ्या अन्यायाबद्दलची चीड तीव्र प्रकारे बंडखोरी दाखवत व्यक्त करणं माझ्या स्वभावात नाही. या सगळ्या माझ्या भवतालाला व माणसांना सोडून मी कुठं जाऊ? मी इथंच जगले-वाढलेय. मी उंबऱ्याबाहेर पाऊल टाकू शकले, पण सगळं मुळापासून बदलू शकत नव्हते. ते कदाचित उद्या बदलेल, कदाचित परवा… कदाचित ...’’

तमिळ साहित्यात सलमानं आपलं अस्तित्व निर्विवादपणे ठळक केलंय. सलमाची लिहिण्याची शैली कुठल्याही अभिनिवेशाशिवायची. सविस्तर वर्णनांमधून येणारी गोष्ट कुठलाही वैरभाव न पेरणारी, कसलेही उपदेश न देणारी. अनुवादात तिचं हे वाहतेपण हरवू न देणं ही जबाबदारीच होती... जबाबदारीचं भान ठेवून मी हे जग आपल्या भाषेत आणायचा प्रयत्न केला, इतकंच सांगता येईल…

(‘मायमावशी’च्या २०१६ सालच्या एका अंकातून…)

..................................................................................................................................................................

‘मध्यरात्रीनंतरचे तास’ - सलमा, अनुवाद - सोनाली नवांगुळ

मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - ५०० रुपये.

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4187/Madhyaratrinanantarche-Tas

..................................................................................................................................................................

लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.

sonali.navangul@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा