या वर्षी ‘काबिनी’च्या जंगलात फिरण्याचं ठरलं. कर्नाटक / केरळच्या हद्दीवर हे समृद्ध जंगल वसलेलं आहे. यालाच ‘नागरहोलेचं जंगल’ही म्हणतात. यावर आपल्या व्यंकटेश माडगूळकर, चित्तमपल्लींनी बरंच लिहिलं आहे. ते वाचलं होतं, पण प्रत्यक्षात अनुभवलं नव्हतं. आमच्या लग्नाचा वाढदिवस कुठल्या तरी जंगलात साजरा करावा हेही मनात होतं. या अनुषंगानं माहिती जमवायला सुरुवात केली. कुर्गच्या पुढेच काबिनीला जाता येतं, हेही कळलं. ‘कुर्ग’ हे कर्नाटकातील थंड हवेचं उबदार ठिकाण.
कानडी बोलत असलो तरी मला कानडी वाचता येत नाही, समजते किंवा संवाद साधता येतो. परत मी चाललो होतो, तिथल्या कानडीचा प्रकार वेगळा होता. कुर्गला कोडागु भाषा होती. कानडी, तुळु, मल्याळमचं मिश्रण अशी ती भाषा आहे. तिथला मूळचा कोडावा समाज आदिवासी. त्यांना परवानगीशिवाय हत्यार बाळगण्याची परवानगी आहे म्हणे! इथल्या वातावरणात कॉफीची बरीचशी लागवड होते. खाली उतरलं की, मंगलोरचा समुद्र किनारा आणि वर कुर्गला गेलं की, पार हिमालयातल्या उबदार शहरांचा अनुभव. साधारण कानडी माणसं दाट रंगांची असतात, पण इथल्या माणसांना सौंदर्याचं वरदानच आहे. दिपिका पदुकोन याच भागातली आहे.
महात्मा गांधी कुर्गला जेव्हा पहिल्यांदा आले होते, तेव्हा हरिजनांबरोबरचा स्थानिक लोकांचा झगडा प्रखर होता. तेव्हा गांधी त्यांना म्हणाले होते, ‘तुमच्या चेहर्यावरचं सौंदर्य तुमच्या हृदयातही पाझरू दे, हरजिनांना माणुसकीची वागणूक द्या.’ त्यानंतर इथल्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळणं सुकर झालं होतं. तर या विभागात फिरण्याचं ठरलं. मग कुर्गच्या अगोदर मुकांबिकाच्या मंदिरातही जाण्याचे ठरले. माझा केरळी मित्र नेहमी केरळात जाताना एक दिवस मुकंबिकाला मुक्काम करूनच पुढे जायचा. मुकंबिकाला सरस्वतीचे भारतातले एकमेव मंदिर आहे. तिथल्या अडिगा नावाच्या गुरुजींचा त्याने पत्ताही पाठवला. हे शहर / मंदिर केरळाच्या हद्दीवर असल्याकारणाने इथं मल्याळम / तुळू भाषा जास्त बोलली जाते.
..................................................................................................................................................................
लहानपणी अक्षरश: पकडापकडी, लपाछपी वगैरे खेळ आम्ही भावंडं या परिसरात खेळायचो. आज तिथं जागोजागी सुरक्षा रक्षक आणि अनेक बंधनं बघून हसायला आलं. आतली वास्तू बघितली यात एकदा आवाज काढला की, तो सात वेळा घुमतो हे माहीत असल्यामुळे आत वरच्या बाजूला जाणारा प्रत्येक जणच ओरडत होता. त्याचा इतका कोलाहल माजला होता की, आत एखादं मिनिटदेखील शांतपणे बसता येणं शक्य नव्हतं. त्या कोलाहलानं तो घुमट कोसळेल की काय, अशीही भीती वाटायला लागली.
.................................................................................................................................................................
या सगळ्या नियोजनात स्वप्निलचाही सहभाग होता. फक्त तो आमच्या स्वत:च्या गाडीने दोन दिवस अगोदर निघून दांडेली करून आम्हाला कुंदापूरला भेटणार होतो. आम्ही नुकतीच नवीन गाडी घेतली. त्याच गाडीनं सगळा प्रवास करायचं ठरलं. जाताना मी व सखी रेल्वेनं कुंदापूरला उतरणार आणि स्वप्निल आम्हाला कारने तिथं घ्यायला येणार आणि नंतरचा सगळा प्रवास आम्ही आमच्या कारने करणार असं ठरलं.
स्वप्निलला एकट्यानं गाडी चालवायचा ताण नको म्हणून सोबतीला एक ड्रायव्हर ठेवला. रेल्वेच्या गाड्या अजूनही पूर्णपणे सुरू नाहीत आणि स्टेशनवर शिरायला बाहेर पडायला एकच रस्ता. त्यामुळे आमच्या बॅगा कशा न्यायच्या वगैरे हे सगळे प्रश्न कार नेणार असल्याकारणानं चुटकीसरशी सुटले.
मडगाव सुटलं आणि स्वप्निलला भेटण्याचे वेध लागले. मध्यरात्री दीड पावणेदोनला कुंदापूर येणार होतं. झोप लागेना. दिवसभर तशीही गाडीत तुटक तुटक झोप झालेली होतीच. मग गुगलवर बघताना लक्षात आलं की, त्याच्या अलीकडेच ‘बायंदूर’ला उतरलो, तर तिथून मंदिर अधिक जवळ पडेल. स्वप्निलने खात्री करून तिथंच एक हॉटेल बुक केलं. आमच्या ड्रायव्हरला सांगून ठेवलं, सगळं सामान तर अगोदरच गेलेलं होतं. त्याच्यापुढे मंगलोर हे मोठं स्टेशन येणार होतं. आपण लहानपणी मंगलोरी कौलांबद्दल ऐकलेलं असतंच. त्या संपूर्ण विभागात फिरताना यातल्या अतिशय सुंदर, विविध प्रकारच्या कौलांच्या घरांना बघताना डोळे अगदी सुखावत होते. आमच्या मागे पुढे अनेक माणसं उतरण्यासाठी तयार होत होती. त्यांच्या त्यांच्या भाषेचे उद्गार कानावर पडत होते.
रात्रीच्या अंधारात धास्तावलेल्या मनानं कर्नाटकात पाऊल ठेवलं. अप्रतिम असं ते छोटंसं स्टेशन होतं. सगळीकडे करोनाचं सावट होतं. त्यामुळे इथं आम्हाला कशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, याची काहीच कल्पना नव्हती, पण कुठेही, जराही त्या महामारीचं सावट जाणवत नव्हतं. फार लोक नव्हतेच, जे काही उतरले, ते अगदी चटाचट रिक्षा / कारने पसारही झाले. वर लख्ख आकाश उजळलं होतं. वातावरणात हलकीशी थंडी होती, आम्ही आमची गाडी शोधायला लागलो तर ती दिसेना, आता पुढचा सगळा प्रवास आम्ही आमच्या कारनेच करणार होतो. आम्ही ड्रायव्हरला फोन केला, तो लगेच आला आणि आम्हाला घेऊन हॉटेलवर आला. स्वप्निल दिवसभराच्या प्रवासानं दमला होता. त्याने तब्बल ७०० किलोमीटर गाडी चालवून दांडेली / गोकर्ण असे टप्पे पार पाडले होते. कपडे बदलून पथारी पसरली. सकाळी लवकर उठून आवरून घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली.
कुर्गला पक्षी निरिक्षण
आम्ही कार घेतली, तेव्हा सुरुवातीला आम्हाला तिचा खूपच मन:स्ताप झाला. पहिल्याच ट्रीपमध्ये आमचे दोन्ही टायर फुटले. ते बदलण्याच्या नादात ऑनलाईन फ्रॉडला सामोरं जावं लागलं होतं. प्रवासाला सुरुवात करताना अनाठायी गेलेले पैसे, त्यापायी झालेला नाहक मन:स्ताप सारं सारं आठवलं. गाडीला संपूर्ण शरण गेलो. तिला आमच्या निर्विघ्न प्रवासाची विनंती केली. त्यात मुलगा स्वत: चालवणार होता. रस्त्यावर आपण कितीही चोख असलो तरी समोच्याच्या चुकीमुळे आपल्याला त्रास भोगावा लागू शकतो. त्यामुळे तशीही थोडी धास्ती होती. संपूर्ण प्रवासात स्वप्निलने तब्बल ३५०० किमीटर गाडी एकट्यानं चालवली. या सगळ्या वेळी मी मागे अस्वस्थ असायचो. त्याच्यावर अविश्वास नव्हता पण काळजी पोटी!
संपूर्ण प्रवासात अनेक ठिकाणं आम्ही बघितली, पण कुठेही उतरून कुणाला या पठ्ठ्यानं पत्ता विचारला नाही. गुगल नामक व्यवस्थेवर आजच्या पिढीचा किती भरवसा आहे, ते या प्रवासात जाणवलं. एवढंच नाही, तर त्याची अचूकता दरवेळी प्रत्ययास आली. आम्हाला संपूर्ण प्रवासात गुगलने विनासायास / विना व्यत्यय दिशादर्शन केलं. बर्याचदा जंगलात नेट नसायचं, तेव्हा स्वप्निलने तो सगळा रस्ता ऑफलाईन डाऊनलोड केलेला असायचा. आम्ही जर पूर्वीप्रमाणे विचारत विचारत हिंडलो असतो, तर इतका प्रवास करूच शकलो नसतो.
तर मुकांबिकाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो, तेव्हा रामरायाच्या जन्माची रखरखती दुपार झालेली होती. उडुपीच्या मार्गानेच आम्हाला कुर्गला पोचायचं होतं. चांगलं जेवण कुठे मिळेल, या विवंचनेत असतानाच स्वप्निलने गुगलचा आसरा घेतला. उडुपीच्या एका गल्लीत गाडी टाकली. बाहेरच्या उन्हातच गाडी पार्क करून आत शिरलो. आत एसी नव्हता, पण बाहेरच्या झळाही जाणवत नव्हत्या. बिल्डिंगच्या आत पंख्याखाली शांत वाटत होतं. ‘एमटीआर’ नावाचं ते छोटंसंच हॉटेल होतं. सहज विचारलं काय आहे तर त्याने थाळीचे प्रकार सांगितले. आम्ही थाळीच मागवली. सुरुवातीला एक काळपट रंगाचं द्रव्य आलं. ते काय आहे याची चव घेता घेता संपलंदेखील. शेवटपर्यंत ते काय हे कळेना. मग तिथल्या मॅनेजरलाच विचारलं. तो म्हणाला, ‘द्राक्षाचा रस आहे’. आम्ही पुढच्या जेवणाला तयार झालो आणि त्या छोट्याशा हॉटेलात आम्हाला साक्षात अन:पूर्णाचंच दर्शन झालं. इतक्या विविध प्रकारचे पदार्थ, एका मागोमाग येत होते की, ते चाखून चाखूनच आम्ही दमलो. भाताचेच पाच-सहा प्रकार होते. बंगलोरच्या आसपास कर्नाटकात तब्बल सोळा प्रकारचे भात बनतात, हे ऐकून होतो. त्यातले काही प्रकार आम्ही आता प्रत्यक्ष अनुभवत होतो. कर्नाटकातल्या कडबू / खिरीचे असंख्य प्रकार आमच्या समोर एकापाठोपाठ येत होते; परत प्रत्येक पदार्थ हव्या तितक्या वेळा घेता येत होता. एखादा पदार्थ परत मागितला तर तिथला सेवक जवळ येऊन इतकंच म्हणायचा की, ‘अहो, पुढची व्हरायटी अजून बाकी आहे, त्याची पण जरा चव घ्या की!’ खूप प्रेमानं, आग्रहानं तो आम्हाला खिलवत होता. आम्हाला तसंही दक्षिण भारतीय जेवण आवडतंच. त्यात ‘हुळी / अन्ना’ असेल तर आनंदाची परमावधीच! आणि इथं तर साक्षात अन:पूर्णाच हात जोडून उभी असल्यासारखी एका पाठोपाठ एक पदार्थ ताटात येत होते. प्रत्येकाची चव, रंग, गंध, निराळा. काय खाऊ नि काय नको असं झालं. मध्येच पाणी मागितलं, ग्लास तोंडाला लावला तेव्हा कळलं प्यायला कोमट पाणी होतं. आम्ही सुरुवातीला तोंड वाकडं केलं, पण नंतर त्या पाण्याची गंमत लक्षात आली. गरम पाण्याच्या घोटाबरोबर आमच्या घशाला काहीच चिकटत नव्हतं, हे लक्षात आलं. घसा निर्मळ होत जातोय, जेवण पचायलाही मदत होते आणि तहानही भागते. अशा काही गोष्टींची करोना काळात आम्ही तशी सवय लावून घेतलेलीच होती आणि इथं ती अनायसे उपलब्ध होती. मग आम्ही यानंतर संपूर्ण प्रवासात जेवताना गरम पाणीच वापरलं. एकतर इथल्या स्थानिक पदार्थांचाच आस्वाद घेतला आणि सकाळ, संध्याकाळ गरम पाणीच प्यायलो. त्यामुळे आमची पोटं बिघडली, घसे खराब झाले, असं काही घडलं नाही.
काबिनीतला सफरीचा थरार आणि कुर्गच्या जंगलात पक्ष्यांच्या आवाजाने नादावलेला स्वप्निल
रात्रीचा आमचा मुक्काम कुर्गला होता. सकाळी आम्ही तिथला धबधबा, राजाचा महाल, ओंकारेश्वर मंदिर बघितलं. या मंदिराची खासीयत म्हणजे बाहेरून ते मशिदी सारखं वाटतं. चार बाजूला चार मिनार आहेत. मुस्लीम आक्रमकांपासून वाचण्यासाठी अशा तर्हेची रचना आहे. एके ठिकाणी आम्ही ‘थलकावेरी’ बघणार होतो. पहिल्यांदा अर्थ बोध होईना, नंतर लक्षात आलं, साक्षात कावेरीचं उगमस्थानच आपण बघणार आहोत. गंगोत्री / यमनोत्री बघितलेली होती. तिथला खडतर प्रवास अंगावर काटा आणणारा. त्यामानानं पार वरपर्यंत जाता येणारा इथला रस्ता खरंच सुखावणारा. या ठिकाणी एक खूप छान मंदिर बांधलेलं आहे. एकतर सगळा मोकळा अवकाश वास्तूत तसाच ठेवला आहे. फक्त पायर्या वरपर्यंत जातात. एक छोटसं गोमुख आणि अलीकडे उगमस्थानाला पार चांदीची प्रभावळ लावलेलं छोटेखानी मंदिर, त्यातून कावेरीचा उगमातला झरा बंदिस्त केलेला. मागच्या बाजूला ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगा! सगळ्या उत्तराखंडमध्ये गंगोत्री-यमनोत्री फिरताना पाण्याचा नाद सतत सोबत करत असतो, जागोजागी धबधबे फुटलेले असतात. पाणीच पाणी चहूकडे असंच दृश्य असतं. इथं असं काहीही नव्हतं. कावेरी या नावातच जादू होती. प्रात:स्मरणीय नद्यांमध्ये कावेरीचं नाव आदरानं घेतलं जातं. तसाही मी नद्यांच्या नादानं हिंडणारा… नदी, पाणी, समुद्र दिसला तर मला उचंबळून येतं, काय करू नि काय नको असं होतं. नद्यांची वेगवेगळी रूपं मी नोकरीच्या निमित्तानं रोजच अनुभवत असतो. मी माझ्या मार्गावर तब्बल सोळा एक छोट्या, मोठ्या नद्या रोजच ओलांडतो.
नदी उगमाच्या ठिकाणी छोटी असते, नंतर ती विस्तारत जाते. अनेक प्रवाह स्वत:मध्ये सामावत स्वत:बरोबर इतरांनाही समृद्ध करत जाते. नदी आली की, नदीबरोबर काही गोष्टी / कथा / दंतकथाही सोबत येतात. मी जी कावेरी बघत होतो, ती तामिळनाडू, श्रीशैल करत बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. माझ्या ‘कावेरी’चा जरा अधिक शोध घेताना परिणीता दांडेकरांचे लेख वाचायला मिळाले. त्या म्हणतात, तसे मी ‘बिलिमोरा’ स्टेशनला ओलांडतो ती कावेरी नर्मदेची उपनदी असावी. नद्यांची नावं लोक स्वत: सोबत घेऊन हिंडतात. पूर्वी कुणीतरी कावेरी बघितलेली असते. त्याला ही नदी बघताना त्या कावेरीची आठवण येते, तेव्हा तो या नदीलाही कावेरीच म्हणतो. अगदी सिंगापूरमध्येदेखील भारतातल्या प्रसिद्ध नद्यांची नावं सर्रास दिसतात. तर मी दक्षिणेत बघितलेली कावेरी आणि कामावर जाताना ओलाडंतो ती कावेरी वेगळी.
कावेरीच्या उगमस्थानाजवळ पोचण्यापूर्वीच तीन नद्यांचा संगम असा एक बोर्ड लागलेला होता. खरं तर आपल्या जनमानसांत संगमाचं महत्त्व अपरंपार आहे. कारण त्या ठिकाणी सगळी चांगली-वाईट कर्म करता येतात. ती तिथल्या स्थानिक लोकांची गरज असते. तर इथं दोन नद्यांचे प्रवाह दिसत होते. कावेरी आणि कन्निका, संज्योती नावाची नदी म्हणे गुप्त वाहते आहे. आम्ही हे बघून पुढे सरकलो. तेव्हा तिथल्या पाण्यावर मजा करणारा कॉमन ‘किंगफिशर’ आम्हाला अधिक भावला होता. दिवसभर कुर्गला फिरताना संध्याकाळी सहाच्या आत पुढच्या ‘होम स्टे’ला पोचायचे वेध लागले होते.
‘चिंगारा होम स्टे’ हे सुरेश अण्णा नावाच्या निसर्गवेड्याचं स्वत:चं रिसोर्ट आहे. त्याच्या अनेक कथा, दंतकथा त्या भागात प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षं जंगलात फिरताना, खरं जंगल कसं जपायचं, हे ज्ञान अनुभवानं यांना येत गेलं. जंगल न बिघडवता तिथं त्यांनी छानपैकी रिसोर्ट उभं केलं. त्यांचं पार्किंग गेट खाली आहे. तिथं आपली गाडी सोडून चार-पाच किलोमीटर आत दाट जंगलात त्यांची जीप आपल्याला घेऊन जाते. पुढचे दोन दिवस आम्ही तिथंच राहणार होतो. आमची गाडी आम्ही परत आल्यावरच दिसणार होती. एका घराच्या पडवीत आमची गाडी पार्क केली, तेव्हा दोन ‘टिपू’ आमचे स्वागत करायला तयारच होते. जीपचा ड्रायव्हर म्हणाला, ‘इथले कुत्रे तुमच्याशी खूपच फ्रेंडली वागतात’. त्याचा प्रत्यय आम्हाला दुसर्याच दिवशी आला.
सकाळी स्वप्निलबरोबर खूप दिवसांनी पक्षी बघायला बाहेर पडलो, तर हॉटेलचे चारही कुत्रे आमच्याबरोबर चालायला लागले. रात्रीच्या ड्रायव्हरने सांगितलेला प्रत्यय येत होता. अक्षरश: संपूर्ण वेळ ती आमच्यासोबत फिरत होती. आम्ही पक्षी बघताना शांतपणे फिरत होती. कुत्र्यांनी या संपूर्ण वेळात जराही आवाज केला नाही. एकदा आम्ही नेहमीचा रस्ता सोडून एक वेगळी पायवाट धरली. तर कुत्रे मुख्य रस्त्यावर बसून राहिले. आम्ही त्या ठिकाणी चुकून गेलो आहोत, याची त्यांना खात्री होती. परत फिरून योग्य रस्त्याला लागल्यावर ते आमच्याबरोबर परत चालायला लागले. सकाळी सकाळी भरपूर रंगीबेरंगी पक्षी बघितले. स्वप्निलला लहान असताना जंगलात फिरवायचो, तेव्हा पुस्तकं वगैरे घेऊन जायचो. पक्षी बघितला की, पुस्तकात ताडून बघायचो. आता स्वप्निल स्वत:च एक पुस्तक झाला आहे. त्याला पक्षी दिसता क्षणीच तो त्याचं नाव, वर्णन सांगतो. माझ्यासोबत अख्खा पक्ष्यांचा ‘एनसायक्लोपिडीयाच’ असल्यामुळे पूर्ण प्रवासात कुठलेही जंगल अनोळखी वाटलं नाही.
काबिनीतला राहण्याचा थाट...
संध्याकाळी सखीला घेऊन या रिसोर्टच्या मालकाच्या धबधब्यावर गेलो. त्यांच्या मालकीचाच तो डोंगर आणि धबधबा होता. सगळीकडे कॉफीचे मळे दिसत होते, पण जंगलही छान जपलं होतं. आम्ही तसे इथल्या उदमांजरांना बघण्यासाठी तरसलो होतो. कॉफीच्या बिया खायला उदमांजरं पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी या मळ्यातून फिरत असतात. इंग्रजीत त्यांना ‘सीवेट’ (Civet) म्हणतात. ‘कोपीलुवाक’ नामक कॉफीसाठी फिलिपिन्स, इंडोनेशिया इथं ‘सिवेट’ खास पाळले जातात. ‘सिवेट’ कॉफीच्या बिया खातात आणि त्यांच्या विष्ठेतून त्या बाहेर पडतात. स्थानिक आदिवासी त्या बिया गोळा करून देतात. त्यावर प्रक्रिया केली जाते. त्या कॉफीला एक वेगळीच चव असते, पण या चवीची किंमत तब्बल किलोला १०० युस डॉलर वगैरे असते. याची चव खाणार्या सिवेटच्या तणावावरही अवलंबून असते म्हणे! जगातल्या खवय्यांच्या मते सिवेट कॉफी ही चवीसाठी नसून निव्वळ दंतकथेसाठीच खरेदी केली जाते. याची चव फारच वाईट असते असं जगातले सगळेच कॉफी तज्ज्ञ म्हणतात.
तर या सिवेट, उदमांजराचे तब्बल सातेक प्रकार या जंगलात आढळतात. आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो, तिथं सरपटणार्या प्राण्यांवर संशोधन करणारे नेहमी पावसाळ्यात येत असतात. तोच इथल्या सरडे, साप, बेडकांचा हंगाम असतो. तब्बल २३ प्रकारचे बेडूक या जंगलात, या भागात सापडल्याची नोंद आहे. आम्ही रात्री उदमांजराच्या शोधात फिरताना तब्बल पाच ते सहा वेगवेगळ्या बेडकांचे आवाज ऐकले होते. तर या उदमांजराची हालचाल ज्या वेळी होते, त्या वेळी जंगलात जाण्याचे आम्ही ठरवले. आम्ही निघालो, तेव्हा संध्याकाळ नुकतीच उतरत होती. अर्थात जंगलात अंधार पण लगेच होतो. मी आणि स्वप्निल खूप दिवसांनी अशा अनोळखी जंगलात निघालो, तेही अंधार पडण्याच्या सुमारास. जंगलातला उजेड हायसं वाटणारा असतो, पण अंधार मात्र हादरवून टाकतो. त्या अंधाराला जंगलाचा एक विशिष्ट गंध असतो. त्या भन्नाट शांततेलाही एक आवाज असतो तो आम्ही बर्याचदा ऐकला, अनुभवला आहे. प्रत्येक वेळी एक वेगळाच थरार जाणवतो.
आमच्या रिसोर्टच्या पलीकडे गेटजवळ उदमांजरं रस्ता पार करतात, अशी माहिती आम्हाला दिली गेली. आम्ही बरेच आत चालत गेलो. एक छोटा झरा ओलांडला त्याच्या पलीकडे काही अंतर चालल्यावर अंधार अंगावर येऊ लागला, थोडीशी भीतीही वाटायला लागली. एकतर जंगल सरपटणार्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे, प्राणी, रस्ता, जंगल, वाटा सारंच अनोळखी. मीच शेवटी स्वप्निलला थांबवलं. जरा अंधार पडू दे, मग आपण इथूनच परतीच्या रस्त्याला लागू असं आम्ही ठरवलं. रस्त्यावरच स्वप्निल छानपैकी बसला, मनातून जरासा धास्तावलेलो पण स्वप्निलला कळू नये, याचा आटोकाट प्रयत्न करत तसाच उभा राहिलो. आकाशात पश्चिमेला शुक्राची चांदणी आणि इतरही तारकादळ उमललेलं होतं. संध्याकाळचा एक विशिष्ट गंध मनात भरून घेतला. रातकिड्यांची किरकिर अंधाराला अधिकच गडद बनवत होती. थोड्या वेळानं आम्ही परतीच्या मार्गाला चालायला सुरुवात केली. स्वप्निलच्या कपाळावर हेडटॉर्च होता, तेवढाच उजेड, बाकी भोवताल सगळा अंधारात बुडालेला. दोघेही जंगलातली शांतता अनुभवत चालत होतो. सहज मागे बघितलं आणि अक्षरश: चक्रावूनच गेलो. अचानक सगळा रस्ता काजव्यांनी भरून गेला होता. आमच्या गुडघ्याच्या खालच्या पातळीवर दोन्ही बाजूला काजव्यांचं अक्षरश: रान फुललं होतं. आम्ही तिथंच थबकलो. काजवे आमच्या खांद्यांवर बागडायला लागले. जे डोळ्यांना दिसत होतं, ते मी कणभरानेही मांडू शकत नाही. अक्षरश: भान विसरायला झालं.
रात्री जंगलातली झोप अंगावर येत गेली, तेव्हा सकाळच्या ‘काबिनीचे’ वेध लागले होते. काबिनीचं जंगल केरळ आणि कर्नाटकाच्या हद्दीवर आहे. आम्ही तिथं जाताना एके ठिकाणी केरळची हद्द ओलांडली. ‘वायनाडच्या’ जंगलातल्या अप्रतिम रस्त्यानं जाताना हरणं, गरुड, हत्ती अगदी सहजच दृष्टीस पडत होते. एक तर रस्ता इतका अप्रतिम होता की, डोळे झाकून गाडी चालवावी. सगळ्या प्रकारच्या झाडांनी समृद्ध असं ते जंगल, त्यातला रस्ता संपूच नये असं वाटणारा आणि अचानक आम्हाला काबिनीच्या गेटचा रस्ता दिसला. गेटवरच फॉर्म भरून करोनाच्या संदर्भातली तपासणी झाली आणि आमची गाडी आमच्या कॉटेजच्या बाहेरच लागली. ड्रायव्हरला राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. मैसूरच्या राजाचं स्वत:चं जंगल या संस्थेनं चालवायला घेतलं आहे. ‘जंगल लॉज रिसोर्ट’च्या कर्नाटकातल्या सगळ्याच वास्तू खूप देखण्या आणि उत्तम रीतीनं सांभाळल्या गेल्या आहेत. प्रचंड स्वच्छता, भरपूर मोकळं आवार, तत्पर सेवक वर्ग, सतत मदत करायला उत्सुक असे मार्गदर्शक आणि ड्रायव्हर. परत कुणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही. इमानदारी कसून भरलेली. उगाच कहाण्यांवरती न रमता प्रचंड व्यावसायिक दृष्टीकोन. आपल्याकडे आलेला पर्यटक तृप्त होऊनच गेला पाहिजे, याची प्रचंड काळजी तिथलं व्यवस्थापन घेताना दिसलं. याचा अनुभव वेगळ्या तर्हेनं कसा आला, तर २५ तारखेला आम्ही पोचलो. संध्याकाळी पाण्यावरची सफारी वगैरे केली. पाण्यावरचे भरपूर पक्षी, हत्तीचा संपूर्ण कळप पाण्यावर आलेला बघितला. इतक्यात काही जंगली डुकरं (सुवर) पाणी प्यायला पुढे सरसावली. तर सुळेवाल्या हत्तीनं सगळ्यांना पार हुसकावूनच लावलं, तेव्हा लक्षात नाही आलं, पण नंतर लक्षात आलं की, हत्तीणीच्या मध्ये लपून एक पिल्लूसुद्धा पाणी पीत होतं. आजकाल सुळेवाला हत्ती दिसणं फारच दुर्मीळ झालं आहे. पण तो दिसला म्हणून खुश झालो.
डावीकडे काबिनीतला पाण्यावरचा हत्तींचा कळप आणि उजवीकडे काबिनीतलाच एक सुळेवाला हत्ती
सगळं फिरून आलो, फ्रेश होताना रूमच्या जवळ असणार्या सेवकाला सहज म्हणालो की, ‘उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, एखादा पुष्पगुच्छ मिळू शकेल का?’ तो म्हणाला, ‘नक्की मिळेल’. मग त्याने त्यांच्या मॅनेजरला फोन लावून दिला. मी काही म्हणायच्या अगोदरच त्याने आमच्या रूमचे तपशील घेतले आणि म्हणाला, ‘इथल्या कुकशीही बोलून घ्या. तुमच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर त्याला तसं सांगा.’ लगेच त्या कर्मचार्यानं तिथल्या मुख्य शेफशी बोलण्यासाठी फोन लावून दिला. तो उत्तर भारतीय शैलेंद्रकुमार नावाचा गृहस्थ होता. त्यानेही फारच आस्था दाखवली. म्हणाला, ‘तुमच्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं काही बनवणं शक्य नाही, पण काही इच्छा असेल तर सांगा ते बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन.’ मग मी परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला मुगाचा हलवा बनवायला सांगितला. त्यानेही होकार दिला. दुसर्या दिवशी सकाळी सफारी करून आलो. फार वेगळं काही दिसलं नाही, पण काही पक्षी, नेहमीचे प्राणी मात्र दिसले. कॉटेजवर आलो तर दरवाजावर टकटक झाली आणि स्थानिक फुलापानांचा अप्रतिम पुष्पगुच्छ घेऊन दरवाजात एक जण उभा होता. तिथल्या सेवकांनी तो स्वत: बनवून आणला होता. फुलांची रचना जपानी इकबेनाच्याही वरताण होती. परत कुठल्या टिप वगैरेची अपेक्षाही न ठेवता लगेच तो माणूस निघूनही गेला.
संध्याकाळच्या सफारीत आम्हाला खूप शोधल्यावर काबिनीतला प्रसिद्ध ‘ब्लॅक पँथर’ दिसला. तब्बल २० एक फुट फूच झाडावर तो बसला होता. सखीला लग्नाच्या वाढदिवशी असलं काही तरी दुर्मीळ दाखवणं यापेक्षा मोठी, कुठलीही भेट असू शकत नाही. बाकी शेकरू, इतर प्राणी, पक्षी दिसतच होते, पण ‘ब्लॅक पँथर’नं मजा आणली. आमच्या जीपमध्ये पुण्याचे फडके नावाचे कुटुंब काबिनीला तब्बल पाचव्यांदा आलेले होते आणि आमच्या अगोदर दोन दिवस ते जंगल हिंडत होते, पण त्यांनाही तो पहिल्यांदाच दिसत होता. शेवटी जंगलातला दुर्मीळ प्राणी-पक्षी दिसण्यासाठी तुमच्या इच्छेबरोबर तुमचं नशीबही जोरावर असावं लागतं.
दमूनभागून चहा घेऊन रूमवर आलो. रात्रीच्या जेवणाला गेलो तर आमच्या पसंतीचा मुगाचा हलवा तिथल्या सगळ्यांसाठीच बनवलेला दिसला आणि आम्ही तिघंही आवाकच झालो. त्या वेळी करोना काळातही तब्बल १०० एक निसर्गप्रेमी तिथं उपस्थित होते आणि त्यांचे नेहमीचे कर्मचारीदेखील होते. सगळी व्यवस्था बघणारे मॅनेजर सतत फेरी मारून सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेत रहायचे. कुठे काही कमतरता असेल तर स्वत: तिथला गोंधळ दूर करायचे. त्यांनीही आम्हाला शुभेच्छा देऊन सकाळी बुके मिळाला का विचारलं, तेव्हा आम्ही भारावूनच गेलो. मुगाच्या हलव्याची चव तर इतकी बहारदार होती की, अक्षरश: तोंडात ठेवला की, विरघळत होता.
इथल्या राहण्याची, स्वच्छतेची, परिसरातल्या रस्त्यांची, झाडांची तारीफ करावी तितकी कमीच आहे. याहूनही इथल्या खानपान व्यवस्थेवर स्वतंत्र लेख लिहावा इतकी चोख व्यवस्था होती. अहो, नाश्त्यालाच तब्बल १९-२० पदार्थांची रेलचेल असायची, जेवणाला याची संख्या दुप्पट व्हायची. तुम्ही चव घेतघेतच दमून जाल. आम्ही तिथं सकाळ, संध्याकाळ मिळून पाचएक वेळा जेवलो, पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचं सांबार होतं. कधी नुसत्या शेंगा घातलेलं, कधी भोपळा, कधी कोहळा, कधी सगळ्या भाज्या घातलेलं. प्रत्येक वेळी मिठाई, खीर वेगळी असायची. मांसाहारींसाठी यातही अधिकचं काही असायचं. जेवणाचा बुफे मांडलेला असायचा. त्याच्या बाजूला जुन्या सागाची एक तुळई होती, छान पॉलिश केलेली. त्यावर सतत एक वेलची केळीचा घड लटकलेला असायचा. जाता-येता त्यातली केळी तुम्ही खाऊ शकत होता. कधीही बघा तो संपलेला नसायचा. शेवटाकडे पान-सुपारी ठेवलेली. हवं तसं मिळवून खायचं. यात सुपारी बडीशेप, चुना, कात स्वतंत्र ठेवलेला असायचा. छान मघई पानाची चळत ठेवलेली असायची.
चिंगारा रिसोर्टच्या जंगलातला एक गंमतीदार प्रसंग आठवला. साधारण बुफेमध्ये शेवटाकडे बडीशेप ठेवलेली असते. तिथंही होती, पण त्याच्या अगोदर सॉस, मीठ, बडिशेप आणि कसली तरी काळपट पावडर होती. इथं सुपारीच्या बागा बघत होतोच. वाटलं ती सुपारीची पावडरच असेल. एकदा जेवण संपल्यावर बडीशेपच्या ऐवजी सुपारीची पावडर खावी म्हणून बकाणा भरला आणि पार जीभेपासून आतपर्यंत जळजळ व्हायला लागली, मला कळेना सुपारी इतकी तिखट कशी. परत कुणाला सांगायची सोय नाही. मी पाणीवर पाणी प्यायलो, तो तडाखा कमी व्हायला बराच वेळ लागला. नंतर सहज तिथल्या माणसाला विचारलं, ‘यात काय काय मिक्स केलं आहे?’ तो म्हणाला, ‘यात काहीच मिक्स नाही, कारण ही सुपारी नाही, मिरीची पावडर आहे’! म्हणजे जंगलातला जो नियम की, अनोळखी, फुलापानाला हात लावू नये, चव बघू नये, तोच नियम इथंही लागू होता. आपण आगाऊपणाने विकतची दुखणी घेतो, ते बरोबर नाही.
काबिनी नदीच्या किनारी वसलेल्या नागरहोलेच्या जंगलात इतकं काही जंगल अनुभवलं की, आम्ही स्वत: समृद्ध होत गेल्याची जाणीव येत गेली. इथं खाण्या-पिण्याची रेलचेल होतीच, पण वातावरणातला आल्हाददायकपणा अंगावर येत होता. बरेच लोक सफारी न घेता नुसतं राहण्यासाठीदेखील आलेली.
शेवटच्या दिवशी सकाळी आम्हाला फिरताना पुन्हा एक सुळेवाला हत्ती दिसला. स्वप्निलला फोटो काढताना त्याचा चेहरा दिसावा म्हणून ड्रायव्हरने जीप पुढे दामटवली, तर हत्ती आमच्या बरोबरीनं पळायला लागला. जीपला स्पर्धा करावी असा तो समांतर पळत होता. आम्हाला कळेना की, तो का धावतो आहे? अचानक एके ठिकाणी तो आमच्याकडे तोंड करून उभा राहिला, शांतपणे गवताच्या काड्या चघळत राहिला. तो सागाची फांदी तोडायचा, तोंडात घालायचा आणि नंतर बाहेर काढून फेकून दयायचा, तेव्हा त्याचं पार चिपाड झालेलं असायचं. तर तो उभा राहिला, तिथं मागच्या बाजूला जरा हालचाल दिसली, नीट बघितलं तर मागे हत्तीण आपल्या पिलाबरोबर चरत होती. त्यांच्या संरक्षणासाठी तो इतका धावला होता.
काबिनीतला अगदी जवळून दिसलेला देखणा वाघ
नंतर अचानक वाघाचे कॉल यायला लागले, म्हणून एके ठिकाणी वाट बघत उभा राहिलो, तर अक्षरश: चार फुटांवरून नेमका आमच्याच जीपला वळसा घालून देखणा वाघ पुढे जाऊन चक्क रस्ता ओलांडून पलीकडच्या जंगलात दिसेनासाही झाला. सकाळी सकाळी सफारीत असं काही बघायला मिळणं यासारखं सुख नाही. जंगलात वाघ दिसणं म्हणजे मोठीच पर्वणी असते, पण तेवढेच बघण्यासाठी जंगलात जायचं नसतं, हे आम्ही अनुभवानं शिकलो आहोत. जंगलातली झाडं, तिथला गंध, इतर पक्षी, प्राणी असं बरंच काही म्हणजे जंगल असतं. खर्या अर्थानं ते ‘अरण्यवाचन’ असतं.
आमचा काबिनीचा मुक्काम संपला होता, नाष्टा वगैरे करून आम्ही आमच्या कारने धर्मस्थळच्या दिशेनं निघालो. पुन्हा एकदा कुर्ग पार करायचं होतं, पण बाहेरच्या रस्त्यानं आम्ही जाणार होतो. एके ठिकाणी ‘कुशलनगर’ नावाचं गाव लागलं. एका मित्रानं आठवणीनं तिथं इडली खायला सुचवलं होतं. आजूबाजूच्या कॉफीच्या मळ्यात काम करणार्या कारागिरांचं हे मुख्य गाव. इथं द्रोणातून एकदम नरम इडली मिळते, असं ऐकलं होतं. आम्ही पोचलो, तेव्हा इडलीची नाही तर जेवणाची वेळ झाली होती. मग तिथल्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन धर्मस्थळच्या दिशेनं निघालो.
धर्मस्थळ इथं प्राचीन शिवाचं मंदिर आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे जैन लोक इथल्या व्यवस्थेचं मुख्य काम पाहतात, तर हिंदू ब्राह्मण पूजाअर्चा करतात. पोचता पोचता संध्याकाळ झाली होती, दर्शन करून आम्ही उडुपीत मुक्काम करायचं ठरवलं. तास दीड तासात पोचलोदेखील. दिवसभराच्या प्रवासानंतर झोप मात्र चांगली हवी म्हणून हॉटेल शोधायला लागलो.
छानपैकी आंघोळ करून झोपून गेलो. सकाळी दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. द्वैत-अद्वैताचा झगडा आपल्या शास्त्रात फारच पुरातन आहे. अद्वैत मानणारे शंकराचार्य आणि द्वैत मांडणारे मध्वाचार्य हे दोघंही प्रचंड ज्ञानी होते, एकमेकांच्या पंथाचा आदर करणारे होते, तर उडुपीच्या श्रीकृष्णाचं मंदिर मध्वाचार्यांनी बांधलेलं आहे. संजय उपाध्ये त्यांच्या व्याख्यानात सांगतात ते अद्वैत मला नेहमीच भावतं. झाडाचं बी जमिनीत फुटतं, आपला अहंकार सोडून मातीत मिसळतं ते खरं अद्वैत. त्यातून नवं झाड उगवतं. उडुपी श्रीकृष्ण मठाचं दर्शन करून मुरुडेश्वराच्या दिशेनं निघालो. त्याच दरम्यान गोव्यातून येणार्या प्रवाशांची करोना तपासणी करण्याचे महाराष्ट्र सरकारचे आदेश निघाले. रस्त्यांवर वाहनांची कोंडी होते आहे, असंही वाचनात आलं. मुरुडेश्वराच्या अलीकडे नितांत सुंदर निळा समुद्र, बघून मोहरलेला होतो. मुरुडेश्वराचं दर्शन घेऊन गोकर्णला पोचलो. तिथल्या गुंफा, बीच हे सगळं बघण्यासाठी निदान चार दिवस तरी हवेत. आम्ही फक्त तिथल्या शंकराचं दर्शन घेतलं. इथं आत्मलिंग आहे, असं म्हणतात. रावणाची / गणपतीची कहाणीही सांगितली जाते. रावणाने आत्मलिंग खाली ठेवलेली पिंड उचलताना त्याला कानाचा आकार आला वगैरे. हीच कथा रामेश्वराच्या संदर्भातही सांगितली जाते. तिथं पिंडीवर रावणाच्या बोटाचे वळ आहेत म्हणे! तर आम्ही दर्शन करून शेजारच्याच समुद्रावर दाखल झालो आणि एका अप्रतिम सूर्यास्ताचं दर्शन झालं. संपूर्ण लाल बिंब, निळ्या समुद्रात गुडुप होताना एक वेगळीच अनुभूती आली. समुद्राचा विस्तीर्ण किनारा तुम्हाला नम्र व्हायला हवं, हे सुचवत असतो. अर्थात आपण त्याच्याकडून काय घेतो, यावरच सगळं अवलंबून असतं.
तर याच्यापुढचा रस्ता कसा असेल हे ठरत नव्हतं. मला मात्र माझी मुळं खुणावत होती. मुलगा मोठा झालेला, त्याला माझं आजोळ फिरवावं, त्यानिमित्तानं काही नातेवाईक भेटले तर भेटावं. माझा जन्म जिथं झाला आणि मी जिथं दर सुट्टीला येऊन बागडायचो, तो परिसर त्याच्याबरोबर हिंडावा असं मनापासून वाटत होतं. माझ्या घडण्याच्या काळात, अभावाच्या काळात मी तिथं बर्याचदा गेलो होतो, पण आता मी ज्या टप्प्यावर होतो, तिथून मला हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायचं होतं.
हे सगळं भैरप्पांवरच्या लेखानं मनाच्या पृष्ठभागावर आलेलं होतं. स्वप्निल नकाशावर रस्ते दाखवायचा तेव्हा हुबळी, धारवाड, जमखंडी, बदामी, गदग ही सगळी गावं मला खूणावायची. जुने दिवस आठवत रहायचे. जीएंनी लावलेलं धारवाडचं वेड म्हणजे माझा हळवा कोपरा होता. कॉलेजला असताना जी.एं.वर एक वॉलपेपर केलेला आठवतंय. त्या वेळी आतासारखी संगणकाची उपलब्धतता नव्हती. आमच्या एका मैत्रिणीनं तो एकटाकी हातानं लिहून काढला होता. त्याचं उद्घाटन प्रख्यात कवी शंकर वैद्यांच्या हस्ते झालं, तेव्हा त्यांनी त्याला दासोपंताच्या ‘पासोडी’ची उपमा दिली होती. त्या वेळी मला ‘दासोपंत’, ‘पासोडी’ याबद्दल काहीच माहिती नव्हती. नंतर कधीतरी पैठणला गेलो, तेव्हा त्या पासोड्या बघून भारावलो होतो. एके वर्षी कॉलेजमधल्या सरांच्या बरोबर जीएंच्या ‘ऑर्फियस’ कथेचं वाचन केलेलं आजही आठवतंय. एकतर वाचनाच्या मांदियाळीत सुरुवातीलाच जी.ए. वाचले. त्यामुळे इतर सटर-फटर वाचन आपसूकच वगळलं गेलं. त्या जी.ए.चं धारवाड मला खुणावत होतं.
प्रत्येकालाच आपल्या मुळांची ओढ असते, तिथलं कौतुक त्याला हवहवंसं असतं, पण अतिपरिचयात ते दुर्लक्षित होतं. तर ही सगळी गावं, त्यांची नावं नुसती आठवतानाही मी भारावून जात होतो. कसलीतरी अनामिक ओढ मला खेचत होती, काय ते कळत नव्हतं.
बदामीचा तलाव आणि भूतनाथ मंदिर
सगळ्यांचं ठरलं तरच जायचं नाहीतर कोल्हापूर मार्गे घरी परतायचं असं ठरलं. कोल्हापूरच्या रस्त्यावर बेळगाव लागणार होतं. गोकर्णहून निघालो, ते सरळ रात्री हुबळीला मुक्काम केला. स्टेशनच्या समोरच एक हॉटेल घेतलं. या स्टेशनवर समोरच मी जे इंजिन रोज चालवतो, त्याची एक मोठी प्रतिकृती ठेवली होती. ‘डब्ल्यु डीपी फोरडी’चा मोठा कारखाना इथं आहे. मी रोजच्या कामात हुबळीचंच इंजिन चालवतो. उगाचच आपली नाळ या शहराशी आधीपासूनच जुळलेली आहे असंही मला वाटू लागलं. हुबळीलाच सुरुवातीला या इंजिनाच्या प्रशिक्षणासाठी आम्हाला पाठवलं जायचं. आज रेल्वेत या इंजिनावरच बर्याच मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या जातात.
तर हुबळी स्टेशनसमोरच एका हॉटेलात शिरलो. त्यालाच विचारलं, ‘कुठे घरगुती जेवण मिळेल का?’ रात्रीचे पावणे अकरा वाजलेले होते. सकाळपासूनचं सगळंच जिरलेलं होतं. तो पण लगेच म्हणाला, ‘शेजारीच बसवण्णांची खानावळ आहे. तो आता बंद करेल, अगोदर जेवून घ्या, नंतर चेक इन करा.’ आम्ही तत्परतेनं तिथं पोचलो. त्याला थाळी सांगितली. भात, सांबार मिळालं तरी चालेल, एवढ्याच माफक अपेक्षेत होतो. कर्नाटकात लिंगायत समाजात बसवण्णा हे नाव तसं खूपच कॉमन आणि त्याच्या नावाच्या शाकाहारी खानावळीही मुबलक. इतक्यात मालक काकुळतीला येऊन म्हणाला, ‘चपाती उपलब्ध नाहीत संपल्यात.’ आम्ही म्हणालो, ‘काही हरकत नाही. जे असेल ते आणा!’ तो म्हणाला, ‘चपातीऐवजी पुरणपोळी चालेल का? आमचे डोळे चमकले. पोळीला पुरणपोळीचा पर्याय आजतागायत ऐकलेला नव्हता. त्याला म्हणालो, ‘गड्या, जरा पण उशीर करू नको. ताबडतोब आण!’ त्यांनी छान गरम करून तुपात घोळवून पुरणपोळी वाढली. भात, वरण, काकडीची भाजी, शेंगाचटणी असा साग्रसंगीत मेनू बघूनच आम्ही तृप्त झालो. कर्नाटकात काकडीला ‘सौंतेकार्डू’ म्हणतात आणि त्याची दाण्याचा कुट घालून केलेली भाजी आम्हाला तिघांनाही आवडते. घरीपण अधूनमधून आम्ही ती करतोच, पण इथल्या भाजांची चव काही निराळीच होती. इथली देशी काकडी नुसती खायलादेखील गोड लागते. त्यातही त्याची भाजी तेही भुकेल्या पोटानं खायला मिळणं यासारखं सूख नाही.
तर हुबळीत रात्री मुक्काम केला. सकाळी बनशंकरीच्या दिशेनं निघालो. महाराष्ट्रात जशी देवीची साडेतीन शक्तीपीठं प्रसिद्ध आहेत. तशीच कर्नाटकातील ‘बनशंकरी’ या पार्वतीच्या रूपाला शक्तीपीठच मानतात. आम्ही डोंबिवलीत जिथं राहतो, तिथंही एक बनशंकरीचं मंदिर आहे. कर्नाटकातील स्थानिक माणसांनी तिची स्थापना केली आहे. जमेल तसं आम्ही या मंदिरात जात असतो, पण त्याचं मूळ मंदिर जिथं आहे, तिथं जायला मिळतंय, याची एक वेगळीच उत्सुकता लागली.
स्वप्निल मात्र या संपूर्ण वेळात काहीतरी गुगलवर शोधत होता. त्याने एके ठिकाणी गाडी उभी केली. मीही खाली उतरून भोवतालाचा अंदाज घेतला आणि लक्षात आलं बदामी ज्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या गुंफा इथंच आहेत. लगेच गाडी तिकडे वळवली आणि एका नितांत सुंदर अनुभवाला सामोरे गेलो. चाणक्य काळातील या गुंफा आपला ऐतिहासिक वारसा आहेत. इतकं अप्रतिम कोरीव काम या दगडांवर केलेलं आहे की, नजर हटत नाही. विष्णूच्या सगळ्या अवतारांची गोष्ट इथं दगडांवर जिवंत झालेली आहे. त्या दगडांचा मातकट रंग, पावसाळी कुंद वातावरण वर गेल्यावर दिसणारा अगस्ती तलाव, भूतनाथाचं मंदिर, नजरेत तरी काय काय साठवायचं? एके क्षणी तर आम्ही त्या अगस्ती तलावाच्या पायर्यावर इतके निवांत झालो की, तिथून हलावंसंच वाटेना. संपूर्ण आसमंतात एक अपार शांतता होती. शांत पाणी, तृप्त आकाश आणि आम्ही दोघंही मौनात गेलेलो. इतक्यात स्वप्निलने वास्तवाचं भान आणून दिलं.
आम्ही पुन्हा एकदा इथल्या बसवण्णाच्या खानावळीतच जेवायला गेलो. गरम गरम भाकरी त्यावर हवे तितके तूप आणि खमंग भात-वरण खाताना तृप्तीचा ढेकर दिला. नंतर बनशंकरीचे दर्शन घेतले. फार गर्दी नव्हती. त्यामुळे निवांत दर्शन झाले. इथे प्रसादाला कडबू दिले जातात. कडबु म्हणजे पुरणाची उकडलेली करंजी. ती इथे कर्नाटकात सर्रास बनते. आम्ही पण कडबुसाठी ललचावलो होतो. पण करोनामुळे सध्या तो प्रसाद बंद आहे असे कळले तेव्हा थोडे नाराज होऊनच पुढे सरकलो. नंतरचा टप्पा विजापूरला पोचायचे होते. स्वप्निलने परत गुगलवर शोधाशोध केली, वेळेचा अंदाज घेतला आणि सूर्यास्ताच्या वेळी आपण ‘इब्राहीम रोजा’ बघायचा हे जाहीर करून टाकलं.
तिथं शाही कबरी आहेत. त्यांच्या जोडीला त्या काळात फक्त आमिरबाई कर्नाटकींना मान मिळाला होता. ती कबर मला बघायची होती. संध्याकाळ उतरत होती. त्यामुळे अंधार लवकरच होणार होता. सगळी माणसं बाहेर पडत होती, तेव्हा आम्ही मात्र आत शिरत होतो. तिथल्या सिक्युरिटीलाही आमची दया आली. त्याने आम्हाला लवकर लवकर जाऊन यायची विनंती केली. आम्ही मुंबईतून आलो म्हणून त्याला अधिकच कौतुक वाटलं. त्यात मी त्या कबरीजवळ जाण्याची परवानगी मागितली. तिथला बर्यौपकी माहीतगार माझ्या विनंतीनेच चमकला. पण लगेच परवानगी देताना म्हणाला, ‘अहो, इथल्या स्थानिक माणसांनाही याची कल्पना नाही, तुम्हाला कसं माहिती?’ मी त्यांना रविप्रकाश कुलकर्णीचं नाव सांगून काहीच उपयोग नव्हता. मोगलकालीन स्थापत्य, आमिरबाईंची कबर, इब्राहीम रोजा, सोबत सखी आणि मुलगा या सगळ्याचा एक वेगळाच परिणाम आमच्या तिघांवरही झाला. तिथून आम्ही अगदी शांत होऊन निघालो.
..................................................................................................................................................................
पहिल्यांदा अर्थ बोध होईना, नंतर लक्षात आलं, साक्षात कावेरीचं उगमस्थानच आपण बघणार आहोत. गंगोत्री / यमनोत्री बघितलेली होती. तिथला खडतर प्रवास अंगावर काटा आणणारा. त्यामानानं पार वरपर्यंत जाता येणारा इथला रस्ता खरंच सुखावणारा. या ठिकाणी एक खूप छान मंदिर बांधलेलं आहे. एकतर सगळा मोकळा अवकाश वास्तूत तसाच ठेवला आहे. फक्त पायर्या वरपर्यंत जातात. एक छोटसं गोमुख आणि अलीकडे उगमस्थानाला पार चांदीची प्रभावळ लावलेलं छोटेखानी मंदिर, त्यातून कावेरीचा उगमातला झरा बंदिस्त केलेला. मागच्या बाजूला ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगा!
.................................................................................................................................................................
दुसर्या दिवशी गोल घुमट बघायला गेलो. लहानपणी या ठिकाणी सहजच प्रवेश मिळायचा. आता हेरिटेज साईट जाहीर झाल्यामुळे ऑनलाईन तिकिटं काढूनच आत जावं लागतं. लहानपणी अक्षरश: पकडापकडी, लपाछपी वगैरे खेळ आम्ही भावंडं या परिसरात खेळायचो. आज तिथं जागोजागी सुरक्षा रक्षक आणि अनेक बंधनं बघून हसायला आलं. आतली वास्तू बघितली यात एकदा आवाज काढला की, तो सात वेळा घुमतो हे माहीत असल्यामुळे आत वरच्या बाजूला जाणारा प्रत्येक जणच ओरडत होता. त्याचा इतका कोलाहल माजला होता की, आत एखादं मिनिटदेखील शांतपणे बसता येणं शक्य नव्हतं. त्या कोलाहलानं तो घुमट कोसळेल की काय, अशीही भीती वाटायला लागली. लगेचच बाहेर आलो. त्या वास्तूचं सौंदर्य बाहेरूनच नजरेत भरून घेतलं आणि बाहेर पडताना सहज एका झाडाकडे लक्ष गेलं. आपल्या सातवीणेसारखं वाटलं, पण पानं थोडी अधिक लांब होती. मग अधिक तपास केला, तर ती मोठी सातवीण असल्याचं कळलं. इथं त्याची ओळीनं चार-पाच झाडं उभी होती.
विजापूरला भेट दिल्यानंतर मात्र का कुणास ठाऊक परतीचे वेध लागले. मी लहान असताना जे जे निसटलं होतं, त्यातलं काही पुन्हा नव्यानं गवसलं होतं, एवढं मात्र नक्की! अर्थात ठरवून नियोजन करून काहीच घडलं नव्हतं. या दरम्यान चक्क १३ दिवस आम्ही आमच्या कारने तब्बल साडेतीन हजार किलोमीटर फिरलो. कारने सुरुवातीला दिलेला मन:स्ताप / आर्थिक फटका हे अजूनही डोक्यातून जात नाही. पण या प्रवासात मात्र या आठवणींतून कारने आम्हाला अगदी अलगद सोडवलं. आम्ही गाडीला आपलं मानलं होतंच, पण गाडीनंही आम्हाला बहुधा स्वीकारलं असावं. आमच्या गाडीनं आम्हाला अगदी जोजवत जोजवत फिरवलं. बायको मला नेहमी म्हणते, ‘अरे, गण्या तू कुणाकुणाच्या ऋणात राहणार आहेस?’ सध्या मी या नव्या गाडीच्या ऋणात आहे. काही ऋणं फेडायची नसतात. त्यातलंच हे एक!
..................................................................................................................................................................
लेखक गणेश मनोहर कुलकर्णी रेल्वे अभ्यासक आणि कला आस्वादक आहेत.
magna169@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment