१२व्या ते १७व्या शतकांदरम्यान अनेक मुस्लीम कवी-संतांनी निर्गुण संतपरंपरा सुरू केली!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
सतीश बेंडीगिरी
  • संत कबीर, दादू दयाळ, रहिमदास आणि रजब अली खान पठाण
  • Thu , 28 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख राम Ram संत कबीर Kabir दादू दयाळ Dadu Dayal रहिमदास Rahim Das रजब अली खान Rajab Ali Khan

राजकीय क्षेत्रात हिंदू-मुस्लिमांचे नाते आजच्या काळात कसेही असो, पण मध्ययुगीन काळात पठाण आणि मुघलांच्या राजवटीत मुस्लीम भक्त, संत आणि कवींनी हिंदू देवतांचे गुणगान गायले आणि त्याविषयी साहित्यनिर्मितीही केली. त्यामुळे हिंदी, अवधी, उर्दू आणि ब्रज भाषेतले साहित्य समृद्ध आणि संपन्न झाले. त्यांचे हे योगदान पाहून भारतेन्दु हरिश्चंद्र म्हणाले होते- ‘इन मुसलमान हरिजनन पर कोटिन हिन्दू वारिए’. त्यांनी हे विधान भावनेच्या भरात किंवा अनावधानाने केले नाही. मुस्लीम भक्त, संत आणि कवींनी निर्माण केलेल्या साहित्याचा आढावा घेतला, तर आपणही असेच विधान करू.

१२व्या ते १७व्या शतकाच्या दरम्यान अनेक धर्माभिमानी मुस्लीम कवी आणि संत होऊन गेले. या  काळात बरीच राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उलथापालथ झाली. भारतीयांचा ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लिमांचा ‘एकेश्वरवाद’ यांची स्वतःची तत्त्वे आणि परंपरा होती. दोन वेगवेगळ्या पंथांच्या आणि विरोधी संस्कृतींच्या संघर्षामुळे सामाजिक रचनेत एक वैचारिक गोंधळ माजला होता. अशा वेळी हताश आणि निराश झालेल्या आमजनतेला मानसिक आधार आणि आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शनाची गरज होती. अशा परिस्थितीत धार्मिक रीतिरिवाज आणि जातीय गुंतागुंतीदरम्यान अंत्यज आणि अस्पृश्य जातींमधून येणारे भक्त आणि संत यांनी हिंदूंचा ‘ब्रह्मवाद’ आणि मुस्लिमांचा ‘देववाद’ (खुदावाद) यांचे सुयोग्य मिश्रण करून निर्गुण संतपरंपरा सुरू केली. यामध्ये इतर जातींसह मुस्लिमांचाही समावेश होता.

या भक्तीपरंपरेतून जी चळवळ निर्माण झाली, त्याला आधार मिळाला तो ईश्वराचे सर्वोच्च अस्तित्व आणि मनुष्य प्राण्यातील जिवंतपणा यांच्यात असणारी समानता या समजुतीचा. आमजनतेसाठी मोक्ष मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे भक्ती. भक्ती व प्रेम यांचा संबंध जोडून मोक्ष प्राप्त करता येतो, असे या कवींनी आणि संतांनी सांगितले. निराकार परमेश्वराची पूजा करताना हे निर्गुण भक्त त्याला राम, गोविंद, हरी, रघुनाथ इत्यादी नावाने हाक मारत असत. भगवंताची प्राप्ती करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या आत्म्याला भगवंताच्या चरणी लीन करणे... पूर्ण समर्पण. या संतांनी जाणले की, परमेश्वराचे नामस्मरण केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मानवाला त्याची कृपा प्राप्त होते.

..................................................................................................................................................................

‘‘मी हिंदू नाही आणि मुसलमानही नाही. मी स्वतःला रामाच्या हवाली केले आहे. रामनामाच्या प्रभावामुळे  माझ्या अंतःकरणात प्रकाश भरला आहे. रामाचे चिंतन आणि स्मरण यात अशी जादू आहे, ती सर्वांना  आपल्या कवेत घेते-  मग तो हिंदू असो किंवा मुस्लीम. कबीरचा रामनामाचे  स्मरण करण्यात जी  शक्ती आहे- ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक साहस निर्माण करते. राम मानवी मनाच्या आत्म्याशी  तादात्म्य  पावतो. आत्मा आणि परमात्मा याला समानार्थी शब्द म्हणजेच राम.’’

.................................................................................................................................................................

हिंदू-मुस्लीम एकतेचा आणि भक्ती चळवळीचा हा संक्रमण काळ संपूर्ण मानवतेच्या प्रबोधनाचा काळ ठरला. या काळात राम आणि कृष्ण या हिंदू देवतांची नावे सर्वतोमुखी झाली आणि या दोन हिंदू देवता श्रेष्ठ ठरल्या.

भारतीय संस्कृती आणि धर्माचा सनातन पुरुष म्हणजे दशरथ पुत्र श्रीराम. ते लोकोत्तर आणि ऐतिहासिक आहेत. त्यांचे चरित्र, जीवन, कार्य अतुलनीय असून, ते देश, काळ आणि धर्माच्या पलीकडे आहेत. ‘राम’ हा शब्द रम् धातुच्या मुळामध्ये ‘घ्’ (अ) प्रत्यय जोडून तयार होतो. याचा अर्थ ‘रमण’ करणे किंवा आनंद घेणे. म्हणजेच राम हा तो घटक आहे, जो सर्व प्राण्यांमध्ये ‘रमण’ करतो आणि ज्यामध्ये सर्व योगी, ध्यानधारक, भक्त, साधक, तपस्वी, रामनामाचा जप करून आनंद घेतात. म्हणजे ‘रमन्ते योगिनो यस्मिन्निति रामः।’ अशा तऱ्हेने राम परमब्रह्म, शाश्वत, अगोचर, नित्यानन्दस्वरूप आहेत.

राम ही मानवी मनाची ऊर्ध्वमुखी, उदात्त शक्ती आहे. तो जगाचा प्राण आणि आत्मा आहे. राम असण्याचा अर्थ आनंदप्रद, हर्षदायक असणे असा आहे. म्हणजेच ‘मनाचा मोकळेपणा’. तो काहीही लपवत नाही. जो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने रामाचे स्मरण करतो, तो त्याचा होऊन जातो. तो अग्नीचे बीज आहे. त्याच्यापासून निर्माण होणारी ऊर्जा, उष्मा, हर्षोल्लास, तेज आणि ओज मानवी संबंध टिकवण्यासाठी, मग तो कोणत्याही धर्माचा असो किंवा जातीचा असो, आवश्यक आहे.

निर्गुण मुस्लीम कवींना हे रामनामाचे अनन्यसाधारण महत्त्व समजले. त्यांनी ते मनःपूर्वक जाणून घेतले आणि रामनाम आत्मसात केले. सामाजिक जीवनात धार्मिक-सांस्कृतिक सौहार्द निर्माण करण्यासाठी, या मुस्लीम संतांनी ‘रामा’ला जणू काही दत्तक घेतले. मग ते कामिल बुल्के असो किंवा मध्ययुगीन काळातील कबीर, दादू, रजब, जयासी, रहीमदास, वाजिद जी, शेख, आलम, मुबारक वगैरे असोत, किंवा अगदी आधुनिक काळातले ‘हरे रामा हरे कृष्णा’ असे भजन करणारे ‘इस्कॉन’चे जॉर्ज हॅरीसन, गोव्यात समुद्र किनाऱ्यावर येऊन गिटार हातात घेत ‘हरे रामा हरे कृष्णा’चा जयघोष करणारे बेभान हिप्पीज, बीटल्स बँडमधील कलाकार किंवा स्वामी श्रीला प्रभुपद यांना गुरू मानणारा पाश्चिमात्य समाज असो. मुस्लीम संतांनी ‘राम-कृष्णा’चा जप करत हिंदू समाजाचे सीमोल्लंघन केले! या संतमंडळींत प्रामुख्याने नाव घेतले जाते ते कबीर आणि रहीम यांचे. त्यांनी रचलेले दोहे दोन्ही समाजात सारख्याच आवडीने अजूनही म्हटले जातात.

कबीराचा जन्म कसा झाला, या विषयावर न जाता कबीर या शब्दाचा अर्थ बघितला, तर तो आहे- ‘सर्वज्ञ’. कबीर जरी मुस्लीम कुटुंबात राहत होते, तरी ते रामाचे उपासक होते. कबीराचे ‘दर्शन’ ही भक्ती काळातली ऐतिहासिक घटना आहे. कबीर जन्मजात मुस्लीम होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहे, पण त्यांनी त्यांची जात ‘जुलाहा’ म्हणून स्वीकारली होती. कबीर निर्गुण शाखेचे संस्थापक संत, भक्त  आणि कवी मानले जातात.

‘कबीर’ हे नावच भक्तीचे प्रतीक आहे. त्यांची महानता हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही मान्य आहे. संत तुलसीदास यांच्याप्रमाणे त्यांचे लक्ष भारतीय ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लीम ‘एकेश्वरवाद’ यांच्यातील सूक्ष्म भेदांकडे आकर्षित झाले नाही, कारण त्यांनी ‘रामा’ला सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात स्वीकारले. अशा तऱ्हेने हिंदू-मुस्लीम यांच्यातली दरी मिटवण्याचे काम कबिरांनी केले.

रामनाम परम तत्त्व आहे, हा मंत्र कबिरांना त्यांचे गुरू रामानन्द यांनी सांगितला. त्यांना धर्म आणि जाती याच्या पलीकडे जाऊन रामाच्या भक्तीत लीन होण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे कार्यही केले. रामनाम उच्चारताना कबिरांनी जे दोहे लिहिले, त्यामुळे योगी, सिद्धपुरुष, पंडित आणि इतर मुस्लीम भक्तांपेक्षाही ते काकणभर सरसच ठरतात. धर्म आणि जातीच्या झगड्यात वारंवार पडणाऱ्या लोकांना उपदेश करताना ते म्हणतो – ‘ब्रह्मा म्हणजेच राम आणि तोच रहीम आहे. रामाला शरण जावे आणि आपला उद्धार करून घ्यावा. रामनाम अलख, अविनाशी आणि निर्गुण आहे. रामनाम हे वेद, पुराण, स्मृति यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि समजून घेण्यासाठी सोपे आहे.’ रामनामाचे मर्म समजून घ्या असे सांगताना ते म्हणतात -

‘निर्गुण राम जपहुं रे भाई, अविगति की गति लखी न जाई,

चारि वेद जाके सुमृत पुरानां, नौ व्याकरनां मरम न जानां।’

कबिरांनी आपल्या काळात त्यांच्या बाबतीत होणाऱ्या मतमतांतरापासून स्वतःला वेगळे करत सांगितले- ‘‘मी हिंदू नाही आणि मुसलमानही नाही. मी स्वतःला रामाच्या हवाली केले आहे. रामनामाच्या प्रभावामुळे माझ्या अंतःकरणात प्रकाश भरला आहे. रामाचे चिंतन आणि स्मरण यात अशी जादू आहे, ती सर्वांना आपल्या कवेत घेते- मग तो हिंदू असो किंवा मुस्लीम. कबीरचा रामनामाचे स्मरण करण्यात जी शक्ती आहे- ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक साहस निर्माण करते. राम मानवी मनाच्या आत्म्याशी तादात्म्य पावतो. आत्मा आणि परमात्मा याला समानार्थी शब्द म्हणजेच राम.’’

‘कबिराचा राम’ ही विचारधारा मानली गेली. तिचा खळाळता प्रवाह कोणीच थोपवू शकत नव्हते. एवढंच नव्हे तर ‘कबिराचा राम’ हा साक्षात्कार आणि प्रेमाचा विषय बनून गेला आहे. तो तत्त्वज्ञानाच्या सिद्धान्तापेक्षा आणि बुद्धिवादापेक्षा वरच्या दर्जाचा असून विश्वव्यापी झालेला आहे. कबिरांप्रमाणेच त्यांच्या समकालीन मुस्लिमांनीही रामाला पाहिले आणि समजून घेतले.

..................................................................................................................................................................

भारतीयांचा ‘अद्वैतवाद’ आणि मुस्लिमांचा ‘एकेश्वरवाद’ यांची स्वतःची तत्त्वे आणि परंपरा होती. दोन वेगवेगळ्या पंथांच्या आणि विरोधी संस्कृतींच्या संघर्षामुळे सामाजिक रचनेत एक वैचारिक गोंधळ माजला होता. अशा वेळी हताश आणि निराश झालेल्या आमजनतेला मानसिक आधार आणि आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शनाची गरज होती. अशा परिस्थितीत धार्मिक रीतिरिवाज आणि जातीय गुंतागुंतीदरम्यान अंत्यज आणि अस्पृश्य जातींमधून येणारे भक्त आणि संत यांनी हिंदूंचा ‘ब्रह्मवाद’ आणि मुस्लिमांचा ‘देववाद’ (खुदावाद) यांचे सुयोग्य मिश्रण करून निर्गुण संतपरंपरा सुरू केली.

.................................................................................................................................................................

कबिरांचा प्रभाव त्यांच्या समकालीन संत दादू दयाल यांच्यावर पडला. दादूंचे शिष्य रजब अली खान पठाण हे मुस्लीम. रजब आम जनतेला, योगीजनांना, सिद्धपुरुषांना आणि साधू-संतांना रामाचे नाव लक्षात ठेवण्यास आणि अंतःकरणात जपण्यास  सांगतात. ते म्हणतात-

‘सेवक राम का रे, सदगुरू की सुन धारि,

राम नाम उर राखिये भाई, आतम तत्व उबारि।’

‘राम-रहीम’ आणि ‘केशव-करीम’ यांच्या ऐक्याचे गाणे गाणारे रजब रामप्रेमाला वश झाले आहेत. जसे अग्नि (प्रेम) सोन्याचे दोन तुकडे (आत्मा आणि ब्रह्म) एकमेकांत वितळवते, तसेच हे प्रेम राम आणि आत्मा यांना एकत्र करते. रजब त्यांच्या एका साखीमध्ये म्हणतात-

‘रज्जब पावक प्रेम है, कंचन आतम राम,

गल मिलावै दुहिन को, प्रेम करे यह काम।’

रजब यांचा असा विश्वास होता की, रामाची प्राप्ती करण्यासाठी हिंदूची मर्यादा किंवा मुस्लिमाची प्रतिष्ठा आवश्यक नाही, ते केवळ ‘रज्जब राम रटै सोई पावै’ या नावाचे स्मरण करूनच प्राप्त होतील. म्हणजे जो रामाचे स्मरण करेल, त्याला राम दिसेल.

दादू दयाळच्या शिष्यपरंपरेत ज्याचे नाव घेतले जाते, त्यातील एक म्हणजे वाजिद पठाण. गुरूच्या उपदेशामुळे त्यांच्या मनाची शांती मिळाली. त्यानंतर ते गुरूच्या पायावर नतमस्तक होऊन राम नामाचा जप करू लागले. राघोदासांनी त्यांच्या संबंधात लिहिले आहे- ‘छाड़िकै पठान कुल, राम नाम कीन्हों पाठ।’

ज्ञानाच्या सर्वोच्चपदावर पोहोचलेल्या संतांसाठी हिंदू असणे काय किंवा मुस्लीम असणे काय, काहीच फरक पडत नाही.वाजिदला गुरूच्या कृपेने ‘रामनामा’चा महिमा कळला, म्हणून ते २४ तास रामनामाचा जप करत राहिले. ते म्हणतात -

‘रामनाम की लूट फबी है जीव कू, निसवासर वाजिद सुमरता जीव कू।

कहियो जाय सलाम, हमारी राम को, नैंन रहे झड़ लाय, तुम्हारे नाम को।’

मध्ययुगीन काळातील मुस्लीम कवींमध्ये अकबराच्या दरबारातील अब्दुर्रहीम खानखाना हे रहीमदास नावाने प्रसिद्ध आहेत. हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे रहिमदास संत तुलसीदास यांचे समकालीन असून दोघेही चांगले मित्र होते. तुलसीदास वाल्मिकीचे संस्कृत बोलीभाषेत लिहितो म्हणून पंडितांना राग आला होता आणि पंडितांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रहिम यांनी तुलसीदासांना मशिदीत आसरा दिला होता. तुलसीदासांनी पंडितांना उत्तर दिले होते-

‘तुलसी सरनाम गुलामु है रामको, जाको रुचै सो कहै कछु ओऊ।

माँगि कै खैबौ, मसीतको सोइबो, लैबोको एकु न दैबेको दोऊ॥’

(मी तुलसी रामाचा गुलाम, तुम्ही काहीही बरळा, भीक मागून खातोय, मशिदीत झोपतोय, मला काही घेणं नाही, ना देणं).

आता या सर्व पंडितांचा पिच्छा नको म्हणून तुलसीदास शेवटी मशिदीत गेले. तिथं ही मंडळी येणार नव्हती. तिथं त्यांना निवांतपणा मिळाला आणि त्यांनी लेखन सुरू केलं.

कबिरांनी जसे दोहे रचले, त्याप्रमाणे रहीमनीही रचले. त्यात त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले. उदा. –

‘रहिमन धागा प्रेम का, मत तोरो चटकाय | टूटे पे फिर ना जुरे, जुरे गाँठ परी जायI’

हा त्यांच्या अनेक प्रसिद्ध दोह्यांपैकी एक आहे. बहुभाषिक रहीम सेनापती, दाता, मुत्सद्दी, कलाप्रेमी, साहित्यिक, ज्योतिषी यासह राम-कृष्ण यांचे भक्त होते. काव्यात ‘रहिमन’ असे नाव लिहिणाऱ्या रहीमदासांचे अरबी, फार्सी, तुर्की, संस्कृत, हिंदी, अवधी, ब्रज इ. भाषांवर प्रभुत्व होते. त्यांचा ‘दोहावली’ हा तीनशे दोह्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. ‘मदनाष्टक’ या काव्यात खडी बोली व संस्कृत अशा मिश्रित भाषेत मालिनी वृत्तात राधा-कृष्णांच्या रासलीलेचे वर्णन आले आहे. ‘खेट कौतुकजातकम्’ हा संस्कृत फार्सीमिश्रित हिंदी भाषेत रचलेला ज्योतिषविषयावरील ग्रंथ होय. रामायण, महाभारत, पुराणे इत्यादींचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी काही भक्तिपर स्फुट श्लोकरचना संस्कृतमध्येही केली असून ती ‘रहीम काव्य’ वा ‘संस्कृत काव्य’ नावानं प्रसिद्ध आहे. काही श्लोकांत संस्कृतसोबतच हिंदीचाही वापर आढळतो.

भारतीय संस्कृतीच्या अंतरंगात इतक्या खोलपर्यंत शिरणारा आणि तिच्याशी एकरूप झालेला अन्य मुस्लीम कवी सापडणे कठीण आहे. दोहावलीत मुख्यत्वेकरून नीती व भक्तीसंबंधीचे विचार व्यक्त झाले आहेत. शार्दूलविक्रिडित, मालिनी, शिखरिणी, वरवै, दोहा, सोरठ, कवित्त, सवैया वगैरे संस्कृत-प्राकृत वृत्तांचा त्यांनी वापर केला आहे. त्यांचे नीतिपर दोहे हिंदीभाषी प्रदेशात खूपच लोकप्रिय आहेत. तुलसीदासांच्या ‘बरवै रामायणा’वर त्यांच्या ‘बरवै नायिकाभेद’ या काव्याचा परिणाम झालेला आहे.

..................................................................................................................................................................

भारतीय संस्कृती आणि धर्माचा सनातन पुरुष म्हणजे दशरथ पुत्र श्रीराम. ते लोकोत्तर आणि ऐतिहासिक आहेत. त्यांचे चरित्र, जीवन, कार्य अतुलनीय असून, ते देश, काळ आणि धर्माच्या पलीकडे आहेत. ‘राम’ हा शब्द रम् धातुच्या मुळामध्ये ‘घ्’ (अ) प्रत्यय जोडून तयार होतो. याचा अर्थ ‘रमण’ करणे किंवा आनंद घेणे. म्हणजेच राम हा तो घटक आहे, जो सर्व प्राण्यांमध्ये ‘रमण’ करतो आणि ज्यामध्ये सर्व योगी, ध्यानधारक, भक्त, साधक, तपस्वी, रामनामाचा जप करून आनंद घेतात. म्हणजे ‘रमन्ते योगिनो यस्मिन्निति रामः।’ अशा तऱ्हेने राम परमब्रह्म, शाश्वत, अगोचर, नित्यानन्दस्वरूप आहेत.

.................................................................................................................................................................

अकबराच्या ‘दीन-ए-इलाही’ या ग्रंथात हिंदुत्वाला जे स्थान दिले गेले आहे, त्यापेक्षा रहिमनी हिंदुत्वाला आपल्या कवितेत कितीतरी अधिक मोठे स्थान दिले आहे. रहिम धर्माने मुस्लीम होते, पण संस्कृतीने शुद्ध भारतीय होते. ते जातीयवादापासून लांब राहणारे, उदारमतवादी आणि मानवतावादी होते. त्यांना हिंदू देव-देवताआणि त्यांच्या उपासना पद्धतींची चांगली ओळख होती. रहीम यांचा राम तुळशीच्या रामासारखाच, निर्वासितांचा रक्षक, दीनबंधू भाऊ आणि गरिबांचा रक्षणकर्ता आहे.

रहीम म्हणतात-

‘गहि शरणागति राम की, भवसागर की नाव।

रहिमन जगत उधार कर, और न कछु उपाव।’

वनवासात असताना रामाने चित्रकूट हे ठिकाण आपलं निवासस्थान बनवलं होतं, हे लक्षात ठेवून, जेव्हा रहीम स्वतः संकटात येत, तेव्हा ते चित्रकूटला येऊन राहत असत. या स्थानाचं महत्त्व व्यक्त करताना ते म्हणतात -

‘चित्रकूट में रमि रहे, रहिमन अकध नरेस।

जापर विपदा पड़त है, सो आवत यह देस।’

रहीम यांच्या दोह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जगाविषयीचे छोटे छोटे अनुभव मोठ्या कौशल्यानं आणि पुराव्यानिशी मांडले आहेत. ते व्यक्त करताना रामाची कथा लोकांमध्ये खोलवर कशी पोहोचली आहे, हे ठसवण्यासाठी ते म्हणतात -

‘ओछे काम बड़े करें, तौ न बड़ाई होय।

ज्यों रहीम हनुमंत को, गिरधर कहै न कोय।’

एकेश्वरवादावर विश्वास ठेवणारे हे सर्व मुस्लीम कवी, संत आणि भक्त हिंदूंच्या देवतेला पूजत होते. त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा खोलवर प्रभाव पडलेला दिसतो. त्यांच्या कविता आणि पदावल्या वाचताना त्यांची हिंदू धर्म आणि संस्कृतीवर नितांत श्रद्धा होती आणि ते जनमानसात अजूनही लोकप्रिय आहेत, हे कळून येते. हे धर्माभिमानी मुस्लीम कवी भक्तीचळवळीची आणि हिंदू-मुस्लीम ऐक्यतेची बलस्थानं आहेत. सामाजिक जडत्व आणि बाह्य अवडंबरांना दूर करण्यासाठी या संतांची भूमिका अतिशय मोलाची आहे.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख