भारतातील मुलांसाठी चार्ल्स डिकन्ससारख्या लेखक-कार्यकर्त्याची आत्यंतिक गरज आहे!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
अलका गाडगीळ
  • चार्ल्स डिकन्स आणि त्यांच्या १६ कादंबऱ्यांतील काही प्रसंग
  • Wed , 27 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख चार्ल्स डिकन्स Charles Dickens ऑलिव्हर ट्विस्ट युनिसेफ बालहक्क पिकविक पेपर्स अ ख्रिसमस कॅरल ए टेल ऑफ टू सिटीज द ओल्ड क्युरियोसिटी शॉप डेव्हीड कॉपरफील्ड ब्लीक हाऊस लिटिल डोरीट हार्ड टाइम्स

चार्ल्स डिकन्सचं ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ नावाचं पुस्तक माझ्या हाती पडलं, तेव्हा मी चौथी-पाचवीत असेन. दहा वर्षांचा ऑलिव्हर हा अनाथ मुलगा लंडनच्या निवासी कारखान्यात (वर्क हाऊस) ढोर मजुरी करत असतो. तिथे त्याला अर्धपोटी राहायला लागतं. तिथले गुंड आणि त्यांनी हाती धरलेली मुलं त्याचा छळ करत असतात. या रोजच्या हिंसेला कंटाळून ऑलिव्हर पळून जातो. पण अखेरीस त्याला एका गुंडांच्या टोळक्यातच आश्रय घ्यावा लागतो.  

पुस्तक वाचत असताना ऑलिव्हरची कहाणी सुफल संपूर्ण होईल, असं त्या वयात वाटलं होतं. पण गोष्टीत तसं काहीच न झाल्यानं मला खूप वाईट वाटल्याचं आठवतं. दारिद्र्यामुळे मुलांवर अनन्वित हिंसा होते आणि हिंसा हिंसेलाच जन्म देते, हे वैश्विक सत्यं ‘ऑलिव्हर ट्विस्ट’मुळे उमजलं.  

डिकन्स एकोणिसाव्या शतकातील सर्वांत लोकप्रिय इंग्लिश लेखक. त्याच्या लेखनात लहान मुलं आणि कामगार वर्गाच्या शोषणाची मांडणी दिसून येते, तसंच न्याय विरुद्ध अन्याय आणि योग्य विरुद्ध अयोग्य असा संघर्षही दिसतो. ही सार्वकालिक मूल्यं आणि त्यांच्यातील अंतर्विरोध डिकन्सनी टिपले. त्याच्या कादंबर्‍या आजही लोकप्रिय आहेत.

डिकन्स लहान मुलांच्या हक्कांचे कडवे पुरस्कर्ते होते. बालकांच्या हक्क रक्षणासाठी ‘युनिसेफ’ ही संस्था युनायटेड नेशन्सने स्थापन केल्याला सत्तर वर्षं होऊन गेली. दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपात अनेक मुलं अनाथ झाली, तसंच अनेक मुलं जखमीही झाली होती. त्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी युनिसेफची स्थापना करण्यात आली. युरोपातील मुलांना मदत करून झाल्यानंतर संघटनेचं स्वरूप बदललं. आता मुलांचं हक्करक्षण, पोषण, त्यांच्यावर होणार्‍या हिंसा अशा मुद्द्यांवर युनिसेफ काम करते. १५० वर्षांपूर्वी डिकन्स यांनी मुलांच्या हक्कांची पाठराखण केली, युनिसेफ तेव्हा अस्तित्वातही नव्हती.

..................................................................................................................................................................

‘अ ख्रिसमस कॅरल’मधील बॉब स्क्रूज ख्रिसमसच्या आदल्या दिवशी तीन भुतं दिसतात- पहिलं भूतकाळातील ख्रिसमसचं, दुसरं वर्तमान काळातीळ ख्रिसमसचं आणि तिसरं येणार्‍या ख्रिसमसचं. या भूतांशी संवाद झाल्यानंतर त्याला ख्रिसमसची घृणा वाटेनशी होते आणि त्याचा कंजूषपणा कमी होतो. ख्रिशन धर्मातील पापक्षालनेची संकल्पना वापरून स्क्रूजला सदबुद्धी मिळाल्याने त्याला दुर्गुंणापासूनही मुक्ती मिळते. या कादंबरीमुळे ख्रिसमसच्या मुहूर्तावर गरिबांना मदत करण्याच्या परंपरेला उजाळा मिळाला.

.................................................................................................................................................................

काही वर्षांपूर्वी युनिसेफ आणि ‘नाइन इज माइन’ या संघटनांनी एकत्र येऊन मुलांवर होणार्‍या हिंसेसबंधी ‘प्ले इट सेफ’ या नावाचा संशोधन अभ्यास हाती घेतला होता. या संशोधनासाठी राज्यभरातील पाच हजार मुलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात अनेक मुलांनी सांगितलं -  ‘मारझोड, आरडाओरडा हे तर राजरोस चालतं’.

ऑलिव्हर ट्विस्टला निवासी कारखान्यात हिंसेचा सामना करावा लागला होता. त्याला घरची छत्रछाया मिळालीच नाही, पण घर आणि शाळेत तरी मुलं सुरक्षित असतात का? युनिसेफच्या संशोधन अभ्यासात मुलं सांगत होती की, घरातही हिंसा होते. मारहाण तर नित्याचीच झाली आहे. त्याशिवाय उपाशी ठेवणं, कोंडून ठेवणं, अशा शिक्षाही दिल्या जातात. विशेष म्हणजे या शिक्षा ‘शिक्षा’च मानल्या जात नाहीत. आई-वडिलांवर प्रेम असतं, पण मार, अपमान आणि अविश्वास या दुविधेत मुलं होरपळून जातात. अशा मुलांचं मन डिकन्स यांना समजलं होतं. गरिबीत होरपळणार्‍या मुलांना त्यांनी आवाज दिला. त्यांचं म्हणणं जगापुढे मांडलं.

सुप्रसिद्ध आयरीश कवी आणि नाटककार ऑस्कर वाइल्ड साहित्यासंबंधी काय म्हणतात पहा- ‘साहित्य जीवनाची हुबेहूब नक्कल नसते. लेखक आपल्या प्रयोजनासाठी जीवनासंबंधीची अटकळ बांधतो’. डिकन्स आणि वाइल्डसारखे थोर लेखक आपल्या कलाकृतींतून माणूसपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात.

डिकन्स शब्दप्रभू होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची सुरुवात विलक्षण आणि आश्चर्यजनक असायची. पहिल्या वाक्यातच संकल्पनांची कारंजी उडत. दीडशे वर्षं होऊनही ‘ए टेल ऑफ टू सिटीज’चं गारुड अजूनही उतरत नाही. त्यातलं पुढील वचन अनेकदा वापरलं जातं -

“It was the best of times, it was the worst of times, it was the age of wisdom, it was the age of foolishness, it was the epoch of belief, it was the epoch of incredulity, it was the season of Light, it was the season of Darkness, it was the spring of hope, it was the winter of despair, we had everything before us, we had nothing before us, we were all going direct to Heaven, we were all going direct the other way – in short, the period was so far like the present period…”

(तो काळ सर्वोत्तम होता. तो काळ सर्वांत वाईट होता. तो ज्ञानाचा काळ होता, तसाच तो अज्ञानाचाही काळ होता. ते युग श्रद्धेचं होतं. ते युग अंधश्रद्धेचं होतं. तो मोसम उजेडाचा होता. तो मोसम अंधाराचा होता. तो आशेचा वसंत ऋतु होता. तो निराशेचा हिवाळा होता. आमच्यासमोर सर्व काही होतं. आमच्याकडे काहीही नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो काळ सांप्रत काळासारखाच होता.)

डिकन्स यांच्या या वचनाला आता दंतकथेचं स्वरूप आलं आहे.

‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या कादंबरीत फ्रेंच क्रांतीनंतरच्या पॅरिस आणि लंडनमध्ये उमटलेल्या पडसादांची कथा आहे. या क्रांतीच्या प्रणेत्यांवर रुसोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होतं असं म्हणतात, पण डिकन्सनी तत्त्वज्ञान बाजूला ठेवलं आणि तळाच्या पातळीवरील लोकांच्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात, तसंच मानवतेला काळिमा फासणार्‍या घटना फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान घडत गेल्या तरी सामान्य माणसांनी मानवी मूल्यांचा त्याग केलं नाही, हे सत्य अधोरेखित केलं.

कादंबरीतील मौंसीनियरर एवेरमोंड द मारक्वीस हा सरदार निर्ममहृदयी असतो. त्याच्या घोडागाडीखाली एक लहान मूल चिरडलं जातं. नुकसान भरपाई म्हणून मारक्वीस एक नाणं मुलाच्या वडिलांच्या अंगावर फेकतो. पुढे क्रांतिकारी त्याला मारून टाकतात. क्रांतिपूर्व फ्रान्समध्ये अमीर-उमरावांनी अत्याचार केले. क्रांतीनंतर तरी वंचितांना मोकळा श्वास घेता आला का? डिकन्सनी गरीब-श्रीमंत, अत्याचारी राज्यकर्ते आणि  बिचारी जनता, अशी द्वैतात्मक मांडणी केली नाही. त्यातील अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच उठावानंतर सर्व व्यवस्था कोसळून पडल्या, त्याचं वर्णन डिकन्सनी भावुक शब्दांनी ओतप्रोत भरलेल्या शैलीत केलं आहे-

‘‘सैनिकी ज्ञान आणि अनुभव नसणारे सेनाधिकारी, नौकानयन कधीच न केलेले नौदल प्रमुख, प्रशासकीय कारभाराचा अनुभव नसणारे उच्च अधिकारी आणि नसलेल्या रोगांवर उपचार करणारे डॉक्टर अशांची चलती होती. दुसर्‍या बाजूला कर गोळा करणारे आणि करदाते दमून-भागून झोपी गेले होते. गुलामांना आणि ओझ्याच्या बैलांना विश्रांतीची आणि उपासमार होणार्‍यांना मेजवान्यांची स्वप्नं पडत असतात, तशातच त्यांना झोप लागते.”

अधिकारांच्या आणि महत्त्वाच्या जागांवर अयोग्य व्यक्ती नेमणं, हे त्या काळातच होत होतं का? सैन्य आणि शस्त्रास्त्रांचं ज्ञान नसणारे संरक्षणमंत्री, पर्यावरणाबद्दल कळकळ नसणारे पर्यावरणमंत्री, आर्थिक व्यवहाराचं सम्यक ज्ञान नसणारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि ‘अर्थव्यवस्था कोसळणे ही देवाची करणी’ असं म्हणणाऱ्या अर्थमंत्री आज पहायला मिळताहेत. त्यामुळे डिकन्स यांचं हे वचन भविष्यसूचक होतं, असं वाटू लागतं.

डिकन्सनी आपल्या लेखनात बोलीभाषांचा उपयोग केला. त्यामुळे कथानकाची पार्श्वभूमी उजागर व्हायची. ते बोलभाषाप्रवीण होते. बोलींचा उपयोग केल्यामुळे त्यांची पात्रं खरीखुरी वाटत आणि कथानकातील संवाद प्रवाही होत. त्यांनी ‘कॉकनी’ ही लंडनच्या वस्त्यांमध्ये बोलली जाणारी बोलभाषा ‘पिकविक पेपर्स’ या कादंबरीत वापरली आहे. यातील सॅम हे पात्र खराखुरं वाटतं. ‘ऑल गुड फीलीन सर. द वेरी बेस्ट इंटेंशन अॅज न जंनलमन सेड वेन ही रन अवे’ – (इथे ‘व्हेरी’चा उच्चार ‘वेरी’ केला आहे. कॉकनीमध्ये ‘व्ह’चा उच्चार ‘व’ आणि ‘व’चा उच्चार ‘व्ह’ असा केला जातो.) आजही ‘पिकविक पेपर्स’ ही कादंबरी लोकप्रिय आहे, त्याचं काहीसं श्रेय या भाषिक बारकाव्यांकडे जातं.

जॉर्ज बरनार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकातील नायिका एलिझाबेथ डू लिटिलची बोली ‘कॉकनी’ होती. या नाटकावर नंतर ‘माय फेर लेडी’ हा चित्रपट बनला आणि तोही खूप चालला.

आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीच्या ‘पिकविक पेपर्स’च्या काही भागाचं लेखन डिकन्सनी लंडनच्या कॅसल कोर्ट मार्गावरील ‘जॉर्ज अँड व्हलचर’ या टॅव्हर्नमध्ये बसून केलं. तिथंच ‘पिकविक क्लब’ नावाचा क्लब होता. डिकन्स या रेस्टॉरंटच्या अगदी जवळ राहत असत. त्यामुळे ते लेखन आणि मद्यपान करण्यासाठी तिथं बसत असत. या ऐतिहासिक वारश्यामुळे ‘जॉर्ज अँड व्हलचर’ला खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे. ५० वर्षांपूर्वी हे रेस्टॉरंट पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. डिकन्सच्या वंशजांनी मध्यस्थी केली आणि हे हॉटेल वाचलं. डिकन्सचे खापरपणतू आणि त्यांचे कुटुंबीय आपला ख्रिसमस ‘जॉर्ज अँड व्हलचर’मध्येच साजरा करतात. इंग्लिश लोकांना आपल्या वारश्याचा अभिमान वाटतो आणि ते कटाक्षानं इतिहासकालीन वास्तूचं जतन आणि परंपरांचं पालन करतात.

बातम्या, वृत्तलेख, कथा, कादंबर्‍या असे अनेक जॉनर - वाङ्मयप्रकार डिकन्सनी सहजपणे हाताळले. पण त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये एक समान दुवा आहे – व्हिक्टोरियन काळात आकार घेत असलेल्या औद्योगिक क्रांतीची परखड समीक्षा. व्हिक्टोरियन काळातच इंग्लंडच्या आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडात वसाहती झाल्या होत्या. साम्राज्यवाद पारमोच्च बिंदूला पोचला होता. विश्वाच्या २६ टक्के भूमीवर इंग्लंडचं अधिराज्य स्थापित झालेलं होतं. पण इंग्लंडमधील गरीब मात्र पिचत होते. निवासी फॅक्टऱ्यांना छळछावण्यांचं स्वरूप आलं होतं. इंग्लंडमध्ये सोन्याचा धूर निघत असे असं म्हटलं जात असे. पण स्वदेशातील गरिबांपर्यंत तो काही पोचत नव्हता. ऑलिव्हर ट्विस्टसारखी किशोरवयीन मुलं फॅक्टरीच्या रोगट वातावरणात गुदमरून जात होती. त्यांचं बालपण हिरावून घेतलं जात होतं.

या काळातील इंग्लिश समाजाचं यथार्थ चित्रण डिकन्सच्या लेखनातून दिसून येतं. मानवी हिंसा, राजकीय आणि शासकीय हिंसा, असमानता, लोभ-लालसा, तसंच प्रेम आणि प्रतारणा, अशा सार्वकालिक विचार-विकार आणि भावनांचा सुबक कोलाज त्यांच्या लेखनात दिसतो. ते एकाच वेळी तात्कालिक आणि सार्वकालिक असं लेखन असल्यामुळे त्यांच्या कथा-कादंबर्‍यातील वचनांचे नेहमी दाखले दिले जातात.

लहान मुलांसाठी घर तरी सुरक्षित असतं का? असे प्रश्न डिकन्सनी आपल्या लेखनातून मांडले होते. युनिसेफच्या संशोधनानेही घर असो व सार्वजनिक स्थान, मुलांच्या हक्कांचं रक्षण होतच नाही, हे पुढे आणलं.

डिकन्स यांचं कुटुंब मोठं होतं. त्यांना १२ मुलं होती आणि सतत येणारे पै-पाहुणे यांचा घरी पसारा असायचा. लेखनामध्ये धो धो पैसे मिळण्याचा तो काळ नव्हता. ख्रिसमस येण्यापूर्वीच पैशांची वानवा झाल्यामुळे त्यांनी ‘अ ख्रिसमस कॅरल’ नावाची कादंबरी लिहिली. पण अशा स्थितीत लिहिलेल्या या  कादंबरीलादेखील वैश्विक परिमाण लाभलं. करुणेचा क्षुद्रपणावरचा विजय, मानवतेवरचा अन्याय आणि गरिबीवरचा विजय यांची गोष्ट ‘कॅरल’मध्ये आहे. डिकन्स असं लिहू शकले, कारण त्यांनी गरिबी आणि अभावाचे चटके सोसले होते. त्यांचे वडील कर्जबाजारी होते आणि आईला काबाडकष्ट करावे लागले होते. आजच्या काळात डिकन्स जन्माला आले तर काय होईल? वैश्विक असमानतेचा परिचय त्यांना करून द्यावा लागणार नाही. ते सारं आकलन त्यांना परिस्थितिमुळे आपोआपच होईल. त्यांचं बाळपण अत्यंत हलाखीत गेलं होतं, म्हणूनच दारिद्रयातील मुलांचं चित्रण ते समर्पकपणे करू शकले.

आजही मुलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. भारतात अल्प भू-धारकांना शेतमजूर ठेवणं परवडत नाही. परिणामी घरातल्या मुलांनाच शेतात काम करावं लागतं. नांगरणी, पेरणी, कापणी अशी कामं आली की, शाळेत जाता येत नाही. घरकामातही मदत करावी लागते. शेतीचं काम रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा करावं लागतं. ऑफिस बंद राहू शकतं, पण शेतकाम मोसमात चालूच ठेवावं लागतं. आळस केला किंवा उशीर केला की, मारझोडही सहन करावी लागते. मुलं शेतात आलीच नाहीत, तर त्यांना मार सहन करावा लागतो. मुलांवरील अत्याचार थांबणार तरी कधी, असा प्रश्न डिकन्सनी मांडला होता. आजही तो प्रश्न लागू पडतो.

बालपणी डिकन्सना अभिनेता व्हायचं होतं. त्यांना नाटकं आवडायची. ‘थिएटर रॉयल’ या नाटक कंपनीत ते ऑडिशनसाठी गेले होते. घरच्या घरी ते नाटकं बसवायचे. विल्की कोलिन्स यांनी लिहिलेलं ‘फ्रोझन डीप’ नावाचं नाटक डिकन्सनी बसवलं होतं. हे नाटक करतानाच १८ वर्षांच्या एलेन टर्नन नावाच्या नटीच्या ते प्रेमात पडले. एलेनबरोबरचं प्रेम प्रकरण त्यांनी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य झालं नाही. अखेरीस त्यांनी घर सोडलं. पण पुढे ते प्रकरण टिकलं नाही. आपणहून घर सोडल्याच्या मानसिक धक्क्यातून ते सावरले नाहीत.    

अखेरच्या काळात त्यांनी नेलीसंबंधित कागदपत्रांची होळी केली. तरीही काही कागदपत्र दुसरीकडे ठेवलेली असल्यामुळे ती वाचली. त्यामुळे आजच्या पिढीला नेलीबद्दलची माहिती मिळाली. ‘आम्ही काही लपवणार नाही. माणसं पर्फेक्ट कुठे असतात? आम्ही या प्रकरणाची अधिक माहिती मिळवत आहोत. नेलीला मूल झालं होतं, पण ते वाचलं नाही’, डिकन्सचे खापरपणतू मार्क डिकन्स सांगतात.

डिकन्सच्या पत्नी कॅथरीन डिकन्स प्रसिद्धीपासून फारच दूर होत्या. त्यांच्याबद्दल फारसं काही लिहिलं गेलेलं नाही. डिकन्सच्या गर्लफ्रेंडबद्दल मात्र त्या काळीही वृत्तपत्रं आणि नियतकालिकांतून कंड्या पिकवल्या जात होत्या. डिकन्सचे वंशज आता त्यांच्या पत्नीबद्दलची माहिती खणून काढत आहेत

कॅथरीन डिकन्सना १२ मुलं झाली. प्रत्येक बाळंतपणानंतर त्यांना नैराश्य यायचं. त्या काळामध्ये प्रसवोत्तर नैराश्याबद्दल (postnatal depression) जाणीवच नव्हती. त्यातून बाहेर पडायला काही दिवस लागायचे. कुटुंबात अस्वस्थता पसरायची. एवढ्या मुलांचा सांभाळ आणि घरातल्या जबाबदार्‍यांनी कॅथरीन मेटाकुटीला आल्या होत्या. डिकन्स अधिक वेळ घराबाहेर राहायचे. ते लेखक होते, त्यांचा संचार साहित्यिक आणि नाट्यवर्तुळात असायचा. लेखक-कलावंत घरी यायचे, पार्ट्या चालायच्या. कॅथरीन पाहुण्यांची सरबराई करायच्या. पण त्यांच्या गप्पांमध्ये त्या सामील व्हायच्या नाहीत. दोघे जोडीदार होते, पण बरोबरीचे नव्हते.

मार्क डिकन्स सांगतात, ‘‘आमच्या घराण्याला तेजस्वी मूळपुरुष लाभला आहे. आमच्या सुप्रसिद्ध पूर्वजांनी आम्हाला समृद्ध केलं आहे, आम्ही भाग्यवान आहोत. अनेकांना आपली चुलत चुलत भावंडं माहिती नसतात. आम्हाला तिसर्‍या आणि चौथ्या पिढीतील चुलत आणि मावस भावंडं माहिती आहेत. २०१२ साली चार्ल्स डिकन्स यांचा द्विशतसावंत्सरिक जन्मदिवस होता. तो साजरा करण्यासाठी वेस्टमिन्स्टर अॅबीमध्ये प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. प्रिन्स चार्ल्स त्याला उपस्थित राहिले होते. मी तिथं एका पत्राचं वाचन केलं. नंतर आम्ही कुटुंबियांनी मेजवानी दिली. चार्ल्स डिकन्स यांच्या वंशजांची संख्या आता २०० झाली आहे. आम्ही खापर खापर पणतू, कुटुंबात लग्न करून आलेल्या सुना आणि जावई आणि सगळ्यांची मुलं मिळून २०० कुटुंबीय आहोत.’’ 

डिकन्सना पार्टी आवडायची. क्रिसमस ते मोठ्या स्टाइलध्ये आणि थाटात साजरे करायचे. अगदी ‘ख्रिसमस कॅरोल’मध्ये वर्णन केलेल्या ख्रिसमससारखीच ऐट असायची. पार्टीचे यजमान म्हणून प्रत्येक गोष्टीत ते लक्ष घालायचे. त्यांचं वाइन सेलर सगळ्यांसाठी खुलं आसायचं. गाणी, गप्पाटप्पा, आणि क्रिकेट मॅचेस व्हायच्या. ही मौजमजा अनेक दिवस चालायची.    

..................................................................................................................................................................

‘द ओल्ड क्युरियोसिटी शॉप’ या कादंबरीतील लहानगी नेल खूप आजारी असते. ती जगली की मेली, हे पुढल्या आठवड्यातील अंकात येणार होतं. न्यू यॉर्कला अंकाची आवृत्ती घेऊन येणार्‍या जहाजाची वाट बघत हजारो वाचक बंदरावर हजर झाले होते. अंक मिळवण्यासाठी लोकांची जबर धक्काबुक्की झाली होती. ज्यांना वाचता येत नसे, ते जाहीर वाचन ऐकण्यासाठी गर्दी करत. न्यू यॉर्कला डिकन्स यांनी भेट दिली, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं होतं. त्यांच्या स्वागताची तुलना बीटल्सच्या जॉन लेनन, पॉल मकार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या लोकप्रिय गायक कलावंतांच्या अमेरिकेत झालेल्या स्वागताशी करता येईल.

.................................................................................................................................................................

‘डेव्हीड कॉपरफील्ड’मधील मिस्टर मिकाबर या पात्राप्रमाणे डिकन्सचे वडील नेहमी दुसर्‍यांकडून पैसे मागायचे. ‘मी चार्ल्स डिकन्सचा बाबा आहे, म्हणून मला कर्जाऊ पैसे द्या’ असं सांगत पैसे घ्यायचे. कादंबरीतील मिकाबर आपल्या वडिलांचं कर्ज फेडतो, तसंच डिकन्सना वडिलांची उधारी चुकती करावी लगायची. डिकन्स कधी दिवाळखोर झाले नाहीत, पण ते पैसे साठवूही शकले नाहीत.  

‘ब्लीक हाऊस’ या कादंबरीत जार्नडाईस कुटुंबाची कहाणी आहे. जार्नडाईस विरोधात जार्नडाईस असा वारसाहक्काचा खटला अनेक पिढ्या सुरू असतो. आता तरी निर्णय लागेल आणि आपल्याला संपत्ती मिळेल, असं दोन्ही पक्षांना वाटत असतं. पिढ्यानपिढ्या चालणारे खटले, कोर्टबाजी, तिथं चालणारे छक्केपंजे आणि निसटता न्याय यावर डिकन्सनी ताशेरे ओढले आहेत.

डिकन्सच्या आजच्या वंशजांना ते ‘सुपरस्टार’ वाटतात. त्यांची बरीचशी पुस्तकं मालिका स्वरूपात प्रसिद्ध झाली. समारंभात आणि मंडळांमध्ये या साप्ताहिक मालिकांचं जाहीर वाचन केलं जायचं. विश्वास बसणार नाही, अगदी आजच्या टीव्ही मालिकांप्रमाणे त्या काळातील लेखनही मालिका स्वरूपात छापून येत असे. प्रत्येक एपिसोडचा शेवट हुरहूर लावणारा असे. पुढे काय होणार याच्या अटकळी बांधल्या जायच्या. पैजा लावल्या जायच्या. त्या काळी पुस्तकं घेणं परवडायचं नाही. लोकांची वाचनाची भूक दैनिकं आणि साप्ताहिकं शमवायची. डिकन्सना अमाप वाचक मिळाले.

‘द ओल्ड क्युरियोसिटी शॉप’ या कादंबरीतील लहानगी नेल खूप आजारी असते. ती जगली की मेली, हे पुढल्या आठवड्यातील अंकात येणार होतं. न्यू यॉर्कला अंकाची आवृत्ती घेऊन येणार्‍या जहाजाची वाट बघत हजारो वाचक बंदरावर हजर झाले होते. अंक मिळवण्यासाठी लोकांची जबर धक्काबुक्की झाली होती. ज्यांना वाचता येत नसे, ते जाहीर वाचन ऐकण्यासाठी गर्दी करत.

न्यू यॉर्कला डिकन्स यांनी भेट दिली, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत झालं होतं. त्यांच्या स्वागताची तुलना बीटल्सच्या जॉन लेनन, पॉल मकार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या लोकप्रिय गायक कलावंतांच्या अमेरिकेत झालेल्या स्वागताशी करता येईल. डिकन्सना बघण्यासाठी हजारो लोक दाखल झाले होते. अमेरिकेत इंग्लिश राजघराण्यातील सदस्यांनंतर प्रभाव पाडणार्‍या व्यक्तींमध्ये डिकन्स यांचा क्रमांक लागायचा.

‘अ ख्रिसमस कॅरल’मुळे लोक गरिबांना मदत करण्यास उद्युक्त झाले. या छोटेखानी कादंबरीतील क्रचिट कुटुंबीयांना अभावाचा सामना करावा लागत असतो. इंग्लंडमधील एक मोठा वर्ग गरिबीत राहत होता. बॉब स्क्रूज या मुख्य पात्राच्या पापक्षमनाची ही गोष्ट आहे. कवडीचुंबक असलेल्या स्क्रुजला ख्रिसमस आवडत नसे. खोल गेलेले डोळे, टोक असलेलं नाक आणि खप्पड गाल, असं त्याचं रूप होतं. संताप येऊन तिरकस बोलताना त्याचे डोळे लाल होत असत. या सणासाठी पैसे खर्च करावे लागतात, याचा त्याला संताप येत असतो. पण ख्रिसमसच्या आदल्या दिवशी त्याला तीन भुतं दिसतात- पहिलं भूतकाळातील ख्रिसमसचं, दुसरं वर्तमान काळातीळ ख्रिसमसचं आणि तिसरं येणार्‍या ख्रिसमसचं. या भूतांशी संवाद झाल्यानंतर त्याला ख्रिसमसची घृणा वाटेनशी होते आणि त्याचा कंजूषपणा कमी होतो. ख्रिशन धर्मातील पापक्षालनेची संकल्पना वापरून स्क्रूजला सदबुद्धी मिळाल्याने त्याला दुर्गुंणापासूनही मुक्ती मिळते. या कादंबरीमुळे ख्रिसमसच्या मुहूर्तावर गरिबांना मदत करण्याच्या परंपरेला उजाळा मिळाला. नाताळची कथा म्हणून ‘अ ख्रिसमस कॅरल’ नाताळच्या सुट्टीत आवर्जून वाचावं, असा मानदंड या पुस्तकाला मिळाला.

औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमधील बेकारी आणि गरिबी दूर झाली नाही. निवासी फॅक्टऱ्यांमध्ये हजारो लोक काम करत होते. अनाथ आणि रस्त्यांवर राहणार्‍या मुलांची संख्याही बरीच होती. यांत्रिकीकरणमुळे अनेक लोक बेकार झाले होते. या बिकट आर्थिक परिस्थितीचा मुलांवर सर्वांत वाईट परिणाम झाला. साम्राज्यवादाची फळे तळाच्या पातळीवर पोचलीच नाहीत. आधुनिकीकरणामुळे कुटुंबव्यवस्थेवर ताण पडला. त्याचा फटका मुलांना बसला. काही पालकांनी आपल्या मुलांना अनाथ आश्रमात ठेवणं पसंत केलं. गरीब वस्त्यांमध्ये दारुडे वडील, अनेक मुलं झाल्यामुळे खंगून गेलेली आई असं चित्र दिसणं नेहमीचं झालं होतं.

रोजच्या जीवनातल्या असंख्य अशाच हिंसा आजच्या भारतातही घडत आहेत. ‘शाळेत बाथरूम नाही. आम्हाला उघड्यावर जावं लागतं. गेलं नाही तर त्रास होतो. काय करावं समजत नाही. बाथरूम आणि संडास नसल्यामुळे मला शाळेत असुरक्षित वाटतं’, असं अनेक शाळकरी मुली सांगतात. या सार्‍या छुप्या आणि नेहमी घडणार्‍या\दिसणार्‍या, नित्याच्या हिंसा आहेत आणि त्या बलात्कार व खून यांच्यापेक्षा कमी धोकादायक आहेत का? पण या सार्‍या हिंसा आहेत, हे कोणी मानायला तयार नाही. ‘बाथरूम नाही ही काय हिंसा झाली?’ असं अनेकांना वाटतं. प्रसारमाध्यमंसुद्धा अशा बातम्या उचलत नाहीत. बलात्कार आणि खून झाला की, त्याच्या मात्र बातम्या होतात. डिकन्सनी हिंसेचे अनेक बारकावेही समजून घेतले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.  

त्यांनी आपल्या लेखनातून बालमजुरी, रस्त्यांवर राहणारी मुलं, घरी आणि वस्तीत हिंसा सहन करणारी मुलं यांचं चित्रण केलं. औद्योगिक क्रांतीमुळे मुलांचा आसरा तुटला आणि त्यांना अमाप हिंसेला तोंड द्यावं लागलं, याची सतत मांडणी केली. बालहक्कांचे ते पुरस्कर्ते होते. ‘ऑलिव्हर ट्विस्ट’, ‘डेव्हीड कॉपरफील्ड’, ‘लिटिल डोरीट’, ‘अ ख्रिसमस कॅरल’, ‘ओल्ड क्युरियोसिटी शॉप’ या आणि इतर अनेक कादंबऱ्यांतील लहान मुलं आर्थिक–सामाजिक व्यवस्थेमुळे आणि प्रौढांच्या बेजबाबदारपणामुळे देशोधडीला लागलेली दिसतात.

डिकन्स ब्रिटिश साम्राज्यवादाच्या सावलीत वाढले. त्यांना गरिबांचा आणि उपेक्षितांचा कळवळा  असला तरी त्यांच्या संवेदना साम्राज्यवादी होत्या का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. ब्रिटनच्या वसाहतवादाचा त्यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला नाही. त्यांच्या कथा-कादंबऱ्या औद्योगिक महानगरीय असायच्या, तरी त्यात ब्रिटिश वसाहातवादाच्या छाया परिघावर अस्पष्टपणे प्रतीत होताना दिसतात.  

भारतात मागास जाती, आदिवासी आणि दलित जातीतील मुलामुलींवर, तसंच दिव्यांग मुलांवर अधिक हिंसा होते. अपमान, शिवीगाळ, भेदभाव या मौखिक हिंसेसोबत कोंडून ठेवणं, मारझोड अशाही हिंसा या मुलांना सहन कराव्या लागतात. दलित आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वर्गात वेगळं बसवलं जातं. मुलं, अनाथ मुलं, स्त्रिया, मानसिकरित्या अस्थिर झालेली माणसं यांचा छळ होतो. डिकन्स या सार्‍या दुर्बलांना मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग सुचवतात, तो आहे प्रतिष्ठित वर्गातील सहयोगी मिळवणं. अभिजनांकडे सद्गुण असणं आवश्यक आहे, तरच ते दुर्बलांना आसरा देऊ शकतात. डिकन्सच्या लेखनातून मुलांच्या प्रश्नाचं चिंतन सतत दिसून येतं. 

‘हार्ड टाइम्स’ या कादंबरीत व्हिक्टोरियन काळातील मुलांच्या हक्कांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रॅडग्रीन या कुटुंबातील लुईझा आणि टॉम ही दोन मुलं वडिलांच्या सर्वंकष सत्तेविरोधात बंड करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना पारंपरिक पद्धतीनं मोठं करण्याचा वडिलांचा मानस असतो. व्हिक्टोरियन समाजात उच्च-नीचतेच्या जाणिवा प्रखर होत्या. हुजूर आणि मजूर वर्गामधला भेद मोठा होता. शहरी मध्यमवर्गाचा उगम होत होता. स्त्रियांना कोणतेच हक्क नव्हते. ओझिया बौंडर्बी या ३० वर्षांनी मोठ्या असलेली पुरुषाशी लुईझाला लग्न करावं लागतं. तिला गुलाम असल्यासारखं वागवलं जातं आणि कुटुंबाच्या भरभरारीसाठी तिचा बळी दिला जातो. व्हिक्टोरियन काळात मुलांना हक्क नव्हते. मुलं म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी असं मानलं जात होतं.

..................................................................................................................................................................

तो काळ सर्वोत्तम होता. तो काळ सर्वांत वाईट होता. तो ज्ञानाचा काळ होता, तसाच तो अज्ञानाचाही काळ होता. ते युग श्रद्धेचं होतं. ते युग अंधश्रद्धेचं होतं. तो मोसम उजेडाचा होता. तो मोसम अंधाराचा होता. तो आशेचा वसंत ऋतु होता. तो निराशेचा हिवाळा होता. आमच्यासमोर सर्व काही होतं. आमच्याकडे काहीही नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो काळ सांप्रत काळासारखाच होता.

.................................................................................................................................................................

चार वर्षांपूर्वी हैदराबादच्या आराधना समधारिया या तेरा वर्षांच्या मुलीनं ६८ दिवस उपवास करण्याचं ठरवलं. तिच्या या उपवासला आई-वडिलांची संमती होती. उपवास सुरू झाल्यानंतर काही दिवसांत तिची प्रकृती धसाळू लागली, तरी तिच्या पालकांनी डॉक्टरला बोलावलं नाही. तिची स्थिती अधिकच बिघडली आणि ती मरण पावली. तिच्या आई-वडिलांनी तिला उपास कसा करू दिला? प्रकृती खालावल्यावर डॉक्टरांना का बोलावलं नाही? असे प्रश्न निर्माण होतात. तिच्या मृत्यूनंतर आई-वडिलांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. पण या सगळ्यांमागे काय आहे? मुलांना स्वतःचे हक्क नसतात आणि मुलं ही आई-वडिलांची मालमत्ता असते, ही धारणा आजही प्रचलित आहे. म्हणूनच आपल्या अत्यवस्थ झालेल्या मुलीला उपचारही न करण्याचं पाऊल आराधनाच्या आई-वडिलांनी उचललं.

‘आराधनाचा आम्हाला अभिमान वाटतो’ असं तिचे आजोबा म्हणाले. धर्मासाठी मुलीचा बळी द्यायलाही तिच्या कुटुंबियांना लाज वाटली नाही. या सगळ्या विरोधात डिकन्सनी आघाडी उघडली असती, हे नक्की. डिकन्सचं आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम होतं. त्यांनी आपल्या मुलांना एकदाही मारलं नाही. त्या काळामध्ये मुलांना मारणं ही नित्याची गोष्ट होती. पण दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलांचे अधिकार अबाधित ठेवले, ही गोष्ट थोरच म्हणावी लागेल. ‘आपल्या राष्ट्रपित्याने अहिंसा परमो धर्म असं म्हटलं होतं. माझ्या दारू पिणार्‍या वडिलांनी हे तत्त्व पाळलं तर किती चांगलं होईल’. युनिसेफच्या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या विदर्भातील १४ वर्षांच्या मुलाने ही इच्छा व्यक्त केली होती.

भारतातल्या आजच्या मुलांना चार्ल्स डिकन्ससारख्या लेखक-कार्यकर्त्याची अत्यंत जरुरी आहे, हेच या मुलाच्या म्हणण्यावरून सिद्ध होतं.

पूर्वप्रसिद्धी कलामंच, वार्षिक अंक २०२०

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ युनिसेफसाठी काम करतात.

alkagadgil@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख