आपण जे सांगतो, त्याच्याकडे मुलांचं लक्ष नसतं; आपण जसं वागतो, त्याच्याकडेच मुलांचं लक्ष असतं!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
मुक्ता पुणतांबेकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख पालक मूल पालकत्व व्यसन व्यसनाधिनता

२५ जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय पालक दिन’. त्यानिमित्तानं आजच्या पालकांपुढे असलेल्या समस्या आणि त्यावरचे उपाय याविषयी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ मुक्ता पुणतांबेकर यांनी सविस्तर मांडणी केली होती. पत्रकार अमोल जोशी यांनी त्यांना आपल्या यू-ट्युब चॅनेलच्या माध्यमातून बोलतं केलं होतं. त्या संवादाचं हे शब्दांकन...

..................................................................................................................................................................

आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंबव्यवस्था खूप महत्त्वाची आहे. त्यातही पालक आणि मुलांचं नातं हे तर खूप महत्त्वाचं आहे. कामाच्या निमित्तानं मला खूप अनुभव बघायला मिळतात.

एक आई तिच्या मुलाला घेऊन आमच्या ‘मुक्तांगण’मध्ये आली होती. तो ड्रग अ‍ॅडिक्ट होता. तिने त्याला दोन-तीन वेळा अ‍ॅडमिट केलं. तरीही तो काही व्यसन सोडायला तयार नव्हता. त्यांची मध्यमवर्गीय परिस्थिती होती. इतक्या वेळा काही त्याला सपोर्ट करणं त्यांना शक्य नव्हतं. वडील नव्हते. त्याचा मोठा भाऊ कमवायला लागलेला होता. त्याला शक्य होत नव्हतं. एक दिवस तो भाऊ इतका चिडला आणि त्या मुलाला म्हणाला की, ‘आता तू माझ्या घरातून बाहेर पड. आता काही आम्हाला तुला पोसणं, तुझ्या व्यसनाचा खर्च करणं, तुझ्या ट्रीटमेंटचा खर्च करणं शक्य नाही.’ त्याने या छोट्या भावाला घराबाहेर काढलं. तो खाली जाऊन त्याच्या घरासमोरच्या एका बाकावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याची आईही त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याला म्हणाली, ‘तू जिथं जाशील, तिथं तू मला घेऊन जा.’ मग तो मोठा भाऊ खाली आला आणि त्या दोघांना वर घेऊन गेला. नंतर जेव्हा तो त्या मुलाला अ‍ॅडमिट करण्यासाठी आमच्याकडे परत घेऊन आला, तेव्हा हा सगळा प्रसंग सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी येत होतं. तो म्हणाला, ‘माझी आई म्हणाली की, त्याला कोणीही नाकारू शकतं, पण एक आई आपल्या मुलाला कधीच नाकारू शकत नाही. तो तिच्याशी कितीही वाईट वागला, कसाही वागला, तरी आई त्याला सोडू शकत नाही. एक वेळ पत्नी सोडून जाईल, पण आई आपल्या मुलाला अशा प्रकारे सोडून देऊ शकत नाही.’

सध्या पालकत्वासंदर्भातली आणखी एक गोष्ट मी बघत असते. ती म्हणजे, व्यसनाधीनतेचा एक बदलणारा ट्रेंड, प्रवाह आहे. तो म्हणजे, व्यसनाकडे वळण्याचा वयोगट आता खूप खाली यायला लागलेला आहे. खूप लहान वयामध्ये मुलं व्यसनाधीन होत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की, वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाणही खूप वाढायला लागलं आहे. सगळ्यात कॉमन म्हणजे इंटरनेटचं किंवा स्मार्ट फोन, टीव्ही, व्हिडिओ गेम्स यांचं व्यसन. याला ‘आयएडी’ म्हणजे ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’ असं म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला ‘गेमिंग डिसऑर्डर’ म्हटलेलं आहे. हे व्यसन लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय.

परवाच पुण्यात अशीच केस वाचनात आली. एका आठ वर्षांच्या मुलानं पोर्नोग्राफिक व्हिडिओ बघून त्याच्या तीन-साडेतीन वर्षांच्या मैत्रिणीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर केस झाली. हे वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं होतं. अशा प्रकारच्या केसेस आता वाढायला लागलेल्या आहेत. या मुलांना आमच्यापर्यंत आणायचं कसं? त्यासाठी आम्ही त्यांच्या पालकांना सांगतो की, आधी एक-दोन सेशन्स आपण तुमच्याबरोबरच घेऊ या. कारण इतक्या लहान वयात जर मुलाला व्यसन लागलेलं आहे, तर थोड्याफार प्रमाणात पालकांनीसुद्धा स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे. थोडा संवाद बदलायची गरज आहे.

..................................................................................................................................................................

कधीकधी आपण सांगितलेलं मुलांना आवडत नाही, अशा वेळी आपण मध्यस्थांची मदत घेऊ शकतो. काऊन्सेलरकडे जाण्यात काही कमीपणाचं नाही. खूप लोकांना असं वाटतं की, मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला आम्ही काही वेडे आहोत का, आमच्या मुलाला काय वेड लागलंय का? उलट नॉर्मल लोकांनीच काऊन्सेलरकडे जायला हवं. जेणेकरून पुढे प्रश्न वाढत नाहीत. उलट यातून आपण पालकत्वाबाबतच्या छोट्या छोट्या अडचणी तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन वेळीच सोडवू शकतो.

.................................................................................................................................................................

मुलं जर लहानपणापासून बघत असतील की, त्यांचे पालक खूप जास्त वेळ फोनवर किंवा इंटरनेटवर घालवत आहेत, तर त्यांनाही त्यात काही वेगळं वाटत नाही. कारण ती जन्मापासूनच ही गोष्ट बघत असतात. त्यामुळे आम्हाला आधी पालकांना सांगायला लागतं की, आपल्या मुलांनी जे करावं किंवा जे करू नये, असं आपल्याला वाटतं, तो बदल आपण आधी स्वतःमध्ये करायला हवा.

अगदी अलीकडची घटना सांगते. साधारण १० वर्षांच्या एका मुलीला घेऊन तिचे आई-वडील आले होते. ते सांगत होते की, ‘ही संध्याकाळी खेळायला बाहेर जात नाही. गेम्स खेळत बसलेली असते...’ तर मी पुढे काही बोलण्याच्या आधी ती मुलगीच मला म्हणाली, ‘संध्याकाळी आईबाबाही टीव्ही बघत असतात. आई तर सारखी व्हॉट्सअ‍ॅपवरतीच असते. तर तुम्ही त्यांना सांगा की, संध्याकाळी आधी ते बंद करा. मगच मी खाली खेळायला जाईन.’ त्या मुलीला बाहेर बसायला सांगून मला तिच्या पालकांना सांगायला लागलं की, ‘तुम्हाला जे वाटतंय ना, तिने संध्याकाळी बाहेर जावं, मोकळ्या हवेत खेळावं; तर तुम्ही हा बदल आधी स्वतःमध्ये करा.’ हल्ली प्रत्येक वेळेला असं होतं की, आम्ही मुलांना जे काही सांगतो, ते आधी पालकांना सांगायला लागतं.

दोन-तीन वर्षांपूर्वीची एक घटना. एक आई-वडील आपल्या मुलाला आमच्याकडे घेऊन आले. प्रॉब्लेम असा काही नव्हता. ते म्हणाले की, ‘मुलाची दहावीची परीक्षा झाली आहे. तुला स्मार्टफोन घेऊन देणार असल्याचं आम्ही त्याला सांगितलं होतं. दहावीचं वर्षभर तो साधा फोन वापरत होता. त्याला स्मार्टफोन घेऊन द्यायच्या आधी आम्हाला असं वाटलं की, एकदा तुमची भेट घ्यावी आणि स्मार्टफोन वापरायच्या बाबतीत त्यानं काय काय काळजी घ्यावी, त्याबद्दल तुमच्याशी चर्चा करावी. म्हणून आम्ही आलोय.’ त्यांनी असा विचार केला याचं मला खूप छान वाटलं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून स्मार्टफोन वापरायचे काही नियम ठरवले. त्या मुलालासुद्धा त्यात सामील करून घेतलं. खूप छान नियम केले. उदा. काही विशिष्ट वेळेला घरातलं कोणीही स्मार्टफोन किंवा कुठलंही गॅजेट्स वापरणार नाही. म्हणजे संध्याकाळचा वेळ, जेवणाचा वेळ. आजकाल आपण बघतो की, जेवतानासुद्धा टीव्ही सुरू असतो किंवा जेवताना लोक मेसेज वगैरे पाठवत असतात. तर तेव्हा कोणीही फोन बघणार नाही. रात्री १० वाजता घरातला वायफाय बंद होईल आणि त्यानंतर सगळे गप्पा मारतील किंवा झोपायला जातील. आम्ही काही असेही झोन्स ठरवले की, तिकडे फोन अजिबात येणार नाही. उदा. डायनिंग टेबल, बेडच्या. खूप लोक ही चूक करतात की, बेडच्या शेजारी फोन ठेवतात. त्यामधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्सचासुद्धा आपल्याला रात्रभर त्रास होत असतो.

त्या पालकांनी आपल्या मुलाशी चांगला संवाद साधला होता. सगळेच पालक हे करू शकतात. सध्या आपण ही ओरड ऐकतो की, घरातला संवाद कमी झालाय. कमी झाला असेल तर आपण या क्षणापासून तो वाढवूदेखील शकतो. म्हणजे असं नाही की, मुलाला म्हणायचं- सांग रे बाबा, दिवसभर आज तू काय केलंस? तर तो सहजगत्या वाढवायचा. आपण मुलांना सांगू शकतो की, आज दिवसभर मी काय केलं? मग मुलं काहीतरी सांगतील. त्यांना मजा वाटेल. संवाद चांगला करण्याचा एक खूप छोटा आणि सोपा उपाय आहे- रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबानं एकत्रितपणे बसून घ्यायचं. ही छोटी गोष्ट केली तरी संवाद खूप चांगला होऊ शकतो. काही अ‍ॅक्टिव्हिटीज पालक आणि मुलं एकत्र बसून करू शकतात. काही बोर्ड गेम्स खेळू शकतात. पालक काही मुलांना वाचून दाखवू शकतात किंवा त्यांना सांगू शकतात की, तुला जे वाटतं ते आम्हाला वाचून दाखव. सगळ्यांनी मिळून फिरायला जाणं, एकत्रितपणे व्यायाम करणं असे खूप उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो.

फक्त संवाद साधताना एक गोष्ट करायची, मुलांवर लेबल लावायचं नाही. नाहीतर काही वेळा काय होतं की, मुलं त्यांच्या परीनं, त्यांना जे महत्त्वाचं आहे ते सांगत असतात आणि आपण त्यांना उडवून लावतो. म्हणजे, ‘हॅ! असं काही नाही किंवा तुला जे वाटतंय त्याला काही अर्थ नाही.’ त्यांना जे वाटतंय, ते महत्त्वाचं आहे, ते आपण शांतपणे ऐकलं पाहिजे.

मी इथं माझ्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगते. आठवीत होते, तेव्हा मला गणित अजिबात आवडायचं. गणिताची प्रचंड भीती बसली होती. ती इतकी अति झाली की, मी एक दिवस माझ्या आई-बाबांना म्हणाले, मला शाळा सोडून द्यायची आहे. आता मला शिकण्यात अजिबात रस राहिलेला नाहीये. माझे आई-बाबा म्हणाले, ‘हो का? नाहीये का तुला शिकण्यात रस? ठीक आहे. सोडून दे शाळा.’ मला खूप आश्चर्य वाटलं. कारण मला असं वाटत होतं की, ते मला पटवून देतील- शिक्षण मुलांसाठी कसं महत्त्वाचं आहे. त्यावरचे युक्तिवाद मी तयार ठेवले होते. पण ते वापरण्याची वेळच माझ्यावर आली नाही. कारण ते माझ्या होकार देऊन टाकला. मग मी घरीच होते. बाबाबरोबर फिरले. दोन-तीन दिवसांनी मी आई-बाबांना म्हटलं की, ‘मी जाते आता शाळेत’. मग ते म्हणाले, ‘जायचंय का तुला, जा शाळेत तू.’ आणि मी परत जायला लागले. मग त्यांनी हळूहळू मला विचारलं की, ‘का तुला असं वाटत होतं?’ मी माझ्या गणिताच्या भीतीविषयी सांगितलं. त्यावर बाबा म्हणाला, ‘हो, मलाही गणिताची खूप भीती वाटायची. आपण असं करू या, तू आणि मी मिळून आपण तुझं गणिताचं पुस्तक जरा वाचू, समजून घेऊ. मीपण शिकतो. आपण एकत्रितपणे बघू की, आपल्याला समजतंय का?’ आम्ही खरंच तसं केलं. एकत्र बसून ती गणितं सोडवायचा प्रयत्न केला, आणि माझी गणिताची भीती गेली. नंतर मला कधीच त्याची भीती वाटली नाही.

आत्ता मी त्या प्रसंगाकडे बघते, तेव्हा मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. कारण तेव्हा माझ्या भावना एकदम तीव्र झालेल्या होत्या. त्या वेळेला आई-बाबांनी त्या समजून घेणं, अ‍ॅक्सेप्ट करणं महत्त्वाचं होतं, जे त्यांनी केलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं असतं की, नाही, शिक्षण कसं महत्त्वाचं आहे, तर मी शाळेत गेले असते, पण कदाचित त्यांनी माझं कारण समजून घेतलं नसतं, माझी गणिताची भीती गेली नसती. किंवा त्या क्षणी त्यांनी मला विचारलं असतं की, का नाही जायचंय, तर ते मला तेवढा प्रतिसाद देत नाहीत म्हटल्यावर मी मोकळेपणाने माझी भीतीपण त्यांच्याशी शेअर केली नसती. आपलं मूल जेव्हा चार्ज्ड-अप असतं आणि आपल्याला काहीतरी सांगत असतं, तेव्हा कुठलीही कमेंट न करता किंवा त्याला सल्ले न देता त्याचं शांतपणे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. ते पालक म्हणून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.

दुसरी गोष्ट, आपण कधी कधी समजून घेत नाही की, त्यांची पिढी, आपली पिढी आणि त्यांचे विचार, आपले विचार यात खूप फरक आहे. खरं तर हे पूर्वापार चालत आलेलं आहे. ‘श्यामची आई’पासून ते आपल्या मुलांपर्यंत ‘जनरेशन गॅप’ दिसतेच. आपण जेव्हा पौगंडावस्थेत असतो, तरुण असतो, तेव्हा आपण आपल्या पालकांवर टीका केलेली असतेच, पण मग आता आपण आपल्या मुलांना का नाही समजून घेत? आपणही त्या भूमिकेत जायला पाहिजे.

एकदा ‘मुक्तांगण’मध्ये एक लहान वयाचा मुलगा अ‍ॅडमिट होता आणि त्याची थोडी लाँग टर्म ट्रीटमेंट होती. त्याला गांजाचं व्यसन होतं. जवळजवळ तीनेक महिने तो अ‍ॅडमिट होता. त्याला केस वाढवायची खूप हौस होती. मग ते तीन-चार महिने त्याने काही केस कापले नाहीत. पोनीटेल वगैरे बांधली. त्याचे आई-वडील डिस्चार्जच्या वेळेला आले. मधल्या काळात आम्ही काही कारणानं त्यांना मुलाला भेटू नका, असं सांगितलं होतं. तीनेक महिन्यांनी ते भेटायला आले. ते माझ्यासमोर बसले होते. मी मुलाला बोलवून घेतलं. छान तब्येत झालेला, आई-बाबांना बघून खूश झालेला मुलगा, पण त्या विषयी बोलायचं सोडून त्याची आई म्हणाली, ‘हे काय केलंय केसांचं? कसं दिसतंय ते!’ त्याचा चेहरा पडला! आणि नंतर तो माझ्या काऊन्सिलिंगला अजिबात प्रतिसाद नव्हता. संपूर्ण सेशनभर चिडून बसला होता. त्या वेळी मला खूप वाईट वाटलं. त्याची तब्येत महत्त्वाची आहे, तो व्यसनातून बाहेर आलाय, तीन महिने त्याने ट्रीटमेंट घेतली आहे, हे महत्त्वाचं आहे की, त्याचे वाढलेले केस महत्त्वाचे आहेत?

मला पालकांचं हे खरंच कळत नाही. आपल्या मुलाच्या दृष्टीनं त्याची हेअर स्टाइल, तो कसा दिसतो, त्याच्या फॅशन्स हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माझ्याकडे येणाऱ्या पालकांना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की, तुमच्या मुलाचे केस, त्याचे कपडे, त्यांच्या स्टाइल्स यावर टीका करू नका. कारण आपल्याही वयात हे घडलेलं आहे. आपल्याही काही फॅशन्स होत्या. आपल्या पालकांनी तेव्हा आपल्यावरही टीका केलेली असते, ती तेव्हा आपल्याला आवडलेली नसते. त्यामुळे मुलाला समजून घ्या. त्याच्या भूमिकेत जाऊन विचार करा.

अशा खूप गोष्टी सांगता येतील. माझं एक खूप आवडतं वाक्य आहे- ‘लिव्ह अँड लेट लिव्ह’ – जगा आणि जगू द्या. हे पालक म्हणून आपण मुलांसाठी करू शकतो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण स्वीकार केला, तर आपल्या मोठ्या गोष्टी ती ऐकायला तयार होतात. एक पालक म्हणून आपल्याला चांगलं ‘रोल मॉडेल’ होता आलं पाहिजे. कारण सुरुवातीचे शिक्षक आपणच असतो. आपल्याकडे बघूनच मुलं शिकत असतात. खूप वेळा तर थेटपणे आपल्याला काही सांगायलाही लागत नाही.

एक प्रसंग सांगते. खूप वर्षांपूर्वी एका शिक्षणतज्ज्ञांचं भाषण मी ऐकलं होतं. त्या वेळी एका मुलाच्या आईने त्यांना एक प्रश्न विचारला होता- ‘माझा मुलगा शाळेतून आला की, बूट तिथंच भिरकावतो, बॅग तिथंच टाकतो. मी कितीही सांगितलं, तरी ऐकत नाही. मी कितीही चिडले, तरी ऐकत नाही.’ त्यावर ते शिक्षणतज्ज्ञ म्हणाले- ‘त्याला तुम्ही सांगूच नका. आधी तुम्ही निरीक्षण करा की, तुम्ही आणि त्याचे वडील बाहेरून घरी आल्यावर तुमचं सामान कसं ठेवता?’ मग त्यांच्या लक्षात आलं की, आपणही चपला तशाच ठेवतो. लॅपटॉपची बॅग तिथंच ठेवतो. मग त्या तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘तुम्ही हा बदल तुमच्यामध्ये आधी करा. त्यानंतर तुम्हाला मुलाला सांगायलाच लागणार नाही की, कपडे-बूट जागच्या जागी ठेव.’ आपण जे सांगतो, त्याच्याकडे मुलांचं लक्ष नसतं; आपण जसं वागतो, त्याच्याकडे मुलांचं लक्ष असतं. त्यामुळे आपण भाषण देऊन जे काम होणार नाही, ते आपल्या वागण्यात छोटे छोटे बदल करून होतं.

अलीकडे घडलेला एक प्रसंग सांगते. एक वडील त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाला घेऊन आले होते. ते सांगत होते की, हा सिगरेट ओढायला लागलाय. मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही सिगरेट ओढता का?’ तर ते म्हणाले की, ‘हो, मी ओढतो.’ मग मला त्यांना सांगायला लागलं की, ‘मी तुमच्या मुलाला कसं सांगू की, तू सिगरेट सोड. तो मला म्हणेल की, माझेच बाबा सिगरेट ओढतात.’ त्यावर ते म्हणाले की, ‘मी १३व्या वर्षी नव्हतो ओढत. नोकरी लागल्यावर ओढायला लागलो.’ पण मूल हे काही समजून घेत नाही की, माझे वडील कुठल्या वयात ओढायला लागले. त्याच्या दृष्टीनं वडील ‘रोल मॉडेल’ असतात. ते ओढतात, तर मला ओढायला काय हरकत आहे? त्यामुळे आधी आपल्या वागण्यात बदल केला, तर मुलांमध्ये तो आपोआपच होतो. मग वेगळं काही सांगायला लागत नाही.

..................................................................................................................................................................

दोन शब्द आहेत – वापर आणि गैरवापर. सध्या मोबाइल फोन किंवा कुठलीही गॅजेट्स आपल्याला लागतातच. त्यांच्यावाचून आपलं चालतच नाही. आपण त्यांचा मनोरंजनासाठी, शिक्षणासाठी, ऑनलाइन काही वस्तू मागवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी वापर करतो. पण गैरवापर कधी होईल? आपण सगळा वेळ तेच करत बसलो, त्याच्यावरच खूप जास्त वेळ घालवायला लागलो, रात्रभर जागायला लागलो, व्यायाम आणि इतर गोष्टी विसरायला लागलो तर. त्यामुळे आपण ‘वापर’ या पातळीवरच राहायचं आहे, ‘गैरवापर’ झाला, तर पुढे अब्युझ होतं. त्या टोकापर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही.

.................................................................................................................................................................

अर्थात काही गोष्टी मुलांना सांगायलाही लागतात. पण त्या सांगण्याची एक पद्धत आपण ठरवू शकतो. सगळ्यांसमोर किंवा बाहेरच्या लोकांसमोर सांगू नका किंवा आरडाओरडा करून सांगू नका. मुलांचेही मानापमान तीव्र असतात. जसे आपल्याला असतात, तसे त्यांनाही असतात. त्यामुळे मूल एकटं असताना, त्याच्यावर लेबल न लावता किंवा टीका न करता शांतपणे, छान पद्धतीनेसुद्धा आपण त्याला सांगू शकतो.

खूप वेळा असं होतं की, आपण दमून आलेलो असतो आणि आपलं मूल आपल्याला काहीतरी सांगायला लागतं. आपल्याला मात्र घरातली कामं दिसत असतात. मग आपण आपला फोन त्याच्या हातात देतो. त्यामुळे आपल्यालाही बरं पडतं आणि मुलालाही. पण असं नाही चालत. आपल्याला त्याच्याबरोबर वेळ घालवायलाच पाहिजे. मोबाइल बघण्यापेक्षा आपण त्याला वाचून दाखवणं, गप्पा मारणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कितीही बिझी असलो, तरी आपण पालक आहोत हे विसरता कामा नये.

आपण मुलाला लहानपणापासून काही सांगू शकतो. दोन शब्द आहेत – वापर आणि गैरवापर. सध्या मोबाइल फोन किंवा कुठलीही गॅजेट्स आपल्याला लागतातच. त्यांच्यावाचून आपलं चालतच नाही. आपण त्यांचा मनोरंजनासाठी, शिक्षणासाठी, ऑनलाइन काही वस्तू मागवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी वापर करतो. पण गैरवापर कधी होईल? आपण सगळा वेळ तेच करत बसलो, त्याच्यावरच खूप जास्त वेळ घालवायला लागलो, रात्रभर जागायला लागलो, व्यायाम आणि इतर गोष्टी विसरायला लागलो तर. त्यामुळे आपण ‘वापर’ या पातळीवरच राहायचं आहे, ‘गैरवापर’ झाला, तर पुढे अब्युझ होतं. त्या टोकापर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही. पालक म्हणून आपलं बाळ अगदी छोटं असल्यापासूनच जागरूक राहायचं आहे. आपण अनेकदा पाहतो की, अगदी छोट्या छोट्या बाळांनासुद्धा जेवण भरवताना पालक काहीतरी लावून देतात. त्यामुळे त्या बाळाला कळत नाही की, ते किती खातंय. ही सवय बाळाच्या आरोग्यासाठी अगदी चुकीची आहे. पालक आणि मुलामध्ये जे एक नातं तयार होत असतं, त्या दृष्टीनंसुद्धा ही गोष्ट बरोबर नाही.

फोनमधून किंवा अशा प्रकारच्या गॅजेट्सममधून रेडिएशन्स निघतात. खूप लहान मुलांचा मेंदू किंवा कवटी विकसित झालेली नसते. त्या रेडिएशन्सचा मुलांच्या मेंदूवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अगदी छोट्या बाळाच्या हातात किंवा त्याच्याजवळ फोन द्यायचा\ठेवायचा नाही. काही पालक बाळाची सतत छायाचित्रं, व्हिडिओज काढतात आणि ते सोशल मीडियावर सारखे अपलोड करतात. जसजसं ते बाळ मोठं व्हायला लागतं, तशी त्याची स्वप्रतिमा ही त्या छायाचित्रांवर किंवा त्याला येणाऱ्या लाइक्सवर अवलंबून राहायला लागते. ‘शेरेंटिंग’ या दृष्टीनं ही गोष्ट बरोबर नाहीच, पण ‘डार्क वेब’ नावाची एक गोष्ट आहे, जिथं आपल्या मुलांच्या छायाचित्रांचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच या गोष्टी आपण टाळायला हव्यात.

पण ज्या मुलांना ही सवय ऑलरेडी लागलेली आहे, त्यांच्या पालकांनी काय करायचं? आपण थोडंसं त्याला भरवत, गप्पा मारत, गोष्टी सांगत थोडा वेळ फोन बाजूला ठेवायचा. त्याला थोडंसं रडूही द्या. रडल्यानं काही प्रॉब्लेम होत नाही. बाळाला हे कळतं की, आपण जितक्या जास्त वेळ रडू किंवा जितकं मोठ्यानं रडू, तितकं पालक आपलं ऐकणार आहेत. मग ते तसंच वागायला लागतं. बाळ रडलं तरी चालेल, पण शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी किंवा अगदी त्याच्या सामाजिक विकासासाठीसुद्धा त्याची मोबाइलची सवय हळूहळू कमी करा. त्याचं मनोरंजन पूर्णपणे फोनवर, स्क्रीनवर अवलंबून असणं, अतिशय चुकीचं आहे.

आपण कितीही छान वागलो, तरी पुढे मूल मोठं झाल्यावर ‘तुम्ही माझ्यासाठी हे नाही केलंत, ते नाही केलंत’, असं आपल्याला म्हणूच शकतं. पण आपला त्याच्याबरोबर संवाद चांगला आहे का, आपण त्याला पुरेसा वेळ देतो आहोत का, मुलाला जेव्हा काही प्रश्न येतो, ताण येतो, तेव्हा ते आपली मदत घ्यायला मोकळेपणाने आपल्याकडे येतं आहे ना, अशा काही गोष्टी आपण पडताळून बघू शकतो. आपण आपल्या मुलाचा मित्र व्हायचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण खूप दमलेले असतो, ताणात असतो आणि मुलावर ओरडतो. त्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं. मग आपण वस्तू वगैरे देऊन त्याची भरपाई करायचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा मुलाची चक्क माफी मागून टाकावी.

माझ्या बाबानं - अनिल अवचट यांनी - आम्हा दोघी बहिणींविषयी एक लेख लिहिला होता. त्यात त्यानं असं म्हटलं होतं की, आपणच मुलांना वाढवतो असं नाही, तर मुलंही आपल्याला वाढवत असतात. आपण सगळे जण विचार करू शकतो की, मुलं होण्याच्या आधीचे आपण आणि मुलं झाल्यानंतरचे आपण, यात कितीतरी बदल झालेला आहे. आपला संयम केवढा वाढलेला आहे! आपण खूप सोशिक झालेलो आहोत!! साधं इंटरनेट वगैरे आपल्याला मुलाकडून शिकायला लागतंय. आपण ‘ओपन’ राहायचं. मुलाकडून शिकण्यात आणि तसं जाहीर करण्यात कमीपणा वाटून घेण्याचं काही नाही.

..................................................................................................................................................................

व्यसनाधीनतेचा एक बदलणारा ट्रेंड, प्रवाह आहे. तो म्हणजे, व्यसनाकडे वळण्याचा वयोगट आता खूप खाली यायला लागलेला आहे. खूप लहान वयामध्ये मुलं व्यसनाधीन होत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की, वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाणही खूप वाढायला लागलं आहे. सगळ्यात कॉमन म्हणजे इंटरनेटचं किंवा स्मार्ट फोन, टीव्ही, व्हिडिओ गेम्स यांचं व्यसन. याला ‘आयएडी’ म्हणजे ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डर’ असं म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला ‘गेमिंग डिसऑर्डर’ म्हटलेलं आहे. हे व्यसन लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय.

.................................................................................................................................................................

अर्थातच शिस्त ही गोष्टदेखील येते. मला माहिती आहे, हे बोलणं खूप सोपं आहे, पण जेव्हा शिस्त आणि इतर गोष्टी येतात, तिथं आपल्याला सारासार विवेकबुद्धीचा वापर करायला लागतो आणि योग्य-अयोग्य ठरवायला लागतं.

कधीकधी आपण सांगितलेलं मुलांना आवडत नाही, अशा वेळी आपण मध्यस्थांची मदत घेऊ शकतो. काऊन्सेलरकडे जाण्यात काही कमीपणाचं नाही. खूप लोकांना असं वाटतं की, मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला आम्ही काही वेडे आहोत का, आमच्या मुलाला काय वेड लागलंय का? उलट नॉर्मल लोकांनीच काऊन्सेलरकडे जायला हवं. जेणेकरून पुढे प्रश्न वाढत नाहीत. उलट यातून आपण पालकत्वाबाबतच्या छोट्या छोट्या अडचणी तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन वेळीच सोडवू शकतो.

या क्षेत्रात इतकी वर्षं काम केल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की, काऊन्सेलर असणं त्या मानानं सोपं आहे, पण एक पालक असणं अवघड आहे. ती एक तारेवरची कसरत आहे. पण तितकीच त्यात मजाही आहे. पालक होणं हे ‘ट्रायल अँड एरर’च असणार आहे. आपल्या हातून चुका होणारच आहेत. कारण आपण काही १०० टक्के ‘पर्फेक्ट’ नाही, किंवा आपल्या दृष्टीनं आपण जे चांगलं वागतोय, ते मुलांना आवडेलच असं नाही. पण निदान आपल्या बाजूनं प्रयत्न तरी करायला हरकत नाही.

पालक असणं खूप आनंदाचं आहे. ताण घेण्यापेक्षा त्याचा आनंद घेतला, तर आपण आपल्या मुलांचे खूप चांगले मित्रही बनू शकतो!

शब्दांकन भाग्यश्री भागवत

..................................................................................................................................................................

लेखिका मुक्ता पुणतांबेकर या ‘मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रा’च्या संचालक आहेत.

puntambekar@hotmail.com 

muktangancorporate@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा