अजूनकाही
माझे वडील, गनिभाई हे पुण्यातील गेल्या पिढीतील जुन्या पुस्तकांचे विक्रेते. अत्यंत साधारण व्यक्तिमत्त्व, पांढरा पायजमा आणि फुल शर्ट, बाह्या वर दुमडलेल्या. लुकडी अंगकाठी आणि कधीच न थकणारं शरीर. त्यामुळे ते दुरूनदेखील चपळ हालचालींमुळे सहज ओळखून येत. शेवटपर्यंत त्यांनी सायकल सोडून दुसरं वाहन वापरलं नाही. सायकलवरूनच ते खूप दूर दूर जात असत. पुस्तकांसाठी मोठ्या थैल्या सोबत घेऊन पुण्यात फिरत. त्यांचा दिनक्रम अगदी साधा होता. सकाळी नऊ वाजता उठून बाहेर पडायचं आणि कुठे कुठे फिरून जुनी पुस्तकं जमवायची. नंतर ती रस्त्याच्या कडेला बसून विकायची.
सोशल मीडिया नसण्याचा तो काळ होता. लोक साधे आणि समाधानी होते. त्या काळी पुणं एवढं पुढारलेलं नव्हतं. थोडंसं सुस्त होतं, संध्याकाळी सहानंतर लोक कामावरून घरी परतत. मग पुस्तकप्रेमींची पावलं आपसूक जुन्या पुस्तकांच्या दिशेनं वळायची. काहींना दिवाळी अंक पाहायचे असत. तेव्हा आत्ताप्रमाणे विद्यार्थी टेक-मॅक्सच्या नोट्सना प्राधान्य न देता जाडजूड टॉम (थिअरी ऑफ मशीन) - सॉम (स्ट्रेंग्थ ऑफ मटेरिअल) असे ठोकळे घेण्यासाठी यायचे. काय हवं ते सांगायचे. फिल्म शौकीन ‘फिल्मफेअर’, ‘स्टारडस्ट’ अशी मासिकं न्यायला यायचे. शिवाय ‘इलेक्ट्रॉनिक्स फॉर यु’, ‘चिप’, ‘डिजिट’, ‘इन्साईड-आऊटसाईड’, ‘फेविकोल’चे अंक… असे त्या त्या विषयाला वाहिलेले कितीतरी अंक घ्यायला पुस्तकप्रेमी यायचे. शिवाय साहित्य-कला-इतिहास-इंग्रजी कादंबऱ्यांचे चाहते, कायद्याची पुस्तके घेणारे वाचक यायचे.
..................................................................................................................................................................
वयाच्या सत्तरीपर्यंत त्यांनी पुस्तकविक्रीचं काम केलं. आयुष्यात ते पहिल्यांदाच आणि शेवटचं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले आणि वयाच्या ८५व्या वर्षी, १ ऑक्टोबर २०२१ रोजी हे जग सोडून गेले. आता ते मला विचारून धंद्याची आणि जगाची खबरबात घेणार नाहीत. त्यांच्या साध्या व्यवहारातही एक सौंदर्य होतं, नात्यांची प्रेमळ गुंफण होती. एकतर पुस्तकं वाचणारी मंडळी तशी बहुश्रुत, सभ्य आणि त्यांच्या क्षेत्रातील उत्तम व्यक्तिमत्त्वं असतात. त्यामुळे या वाचकांनी गनिभाईंवर भरभरून प्रेम केलं.
.................................................................................................................................................................
वडिलांचा स्वभाव तसा बोलका होता. शिवाय कुणालाही न दुखावता वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. सोबतीला चहा व विडीचं व्यसन. त्यामुळे आपल्या अनेक ग्राहकांशी त्यांचे अगदी घट्ट स्नेहसंबंध तयार झाले होते. त्यांच्याशी तासनतास गप्पा मारायलाही कुणी कुणी येत असत.
व्यवहाराच्या बाबतीत वडील जरा ‘कॅज्युअल’च होते. त्यामुळे ते स्वस्तात पुस्तकं देऊन टाकायचे. एखाद्या पुस्तकाची फार जास्त किंमत घेणं त्यांना पटायचं नाही. आणि खूप पुस्तकं आणून मोठ्ठा स्टॉल लावून जास्त विक्री करावी असंही त्यांना कधी वाटलं नाही. पुस्तकांच्या पाच-सहा थैल्या सायकलवरून आणायच्या आणि ती पुस्तकं सुंदर प्रकारे रचून ठेवायची. वारंवार धूळ झटकत राहून पुस्तकं स्वच्छ ठेवायची. तसंच पुस्तकं परत भरून ठेवतानाही देखण्या पद्धतीनं भरत. असा त्यांचा सगळा टापटीप कारभार होता. त्यांचे कपडेदेखील कायम व्यवस्थित असायचे. जी गोष्ट कपड्यांची, तीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची. झऱ्यातल्या पाण्यासारखं त्यांचं मन नितळ होतं. जे काही असेल ते लगेच बोलून टाकणं असा त्यांचा शिरस्ता होता.
वडील मूळचे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक या गावचे. त्यांचं पाच भावंडांचं कुटुंब. वडिलांचा जन्म १९३६चा. ब्रिटिशांच्या आमदनीतील तीन यत्ता त्यांनी पास केल्या होत्या. त्यांना थोडी फारसी, उर्दू आणि इंग्रजी भाषा येत असे. कन्नडवर मात्र त्यांचं प्रभुत्व होतं. पुण्यात आल्यावर काही वर्षांतच ते अगदी छान मराठी बोलू-वाचू लागले. १९६२च्या आसपास ते गाव सोडून पुण्यात आले. ‘लकी हॉटेल’मध्ये नोकरीस लागले. त्या काळी ते खूप प्रसिद्ध होतं. आता ते राहिलं नाही, पण सध्या जे गुडलक हॉटेल आहे, त्याच्यासमोर ते होतं. तिथून फिल्म इन्स्टिट्यूट जवळ असल्यामुळे नवोदित कलाकारांची तिथं वर्दळ असायची. वडील देवानंद, डॅनी डेंग्झोपा, शत्रुघ्न सिन्हा यांना अगदी जवळून पाहिल्याचं सांगत. पुढे डॅनी हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाचं काम करायला लागला असला तरी वास्तव आयुष्यात अत्यंत सभ्य आणि शिष्टाचार पाळणारा होता. शत्रुघ्न सिन्हा खूप वांड आणि लगेच मारमारीवर यायचा, अशा आठवणी ते आम्हाला सांगत असत. बऱ्याच वर्षांनी देवानंद लकी हॉटेलला भेट देणार होता, तेव्हा माझ्या मोठ्या भावाला त्यांनी ओळखीनं आत बसवून देवानंदला जवळून बघण्याची संधी दिली होती.
‘लकी हॉटेल’मध्ये वडील काम करत असताना त्यांचे इतर उद्योगदेखील चालू असायचे. भांडी घासायची पावडर बनवणं-विकणं. सुट्टीत तळेगाव-सिंहगड पायथा-खेडशिवापूर अशी गावं सायकलवरून फिरून तेथील गावरान अंडी आणून पुण्यात विकण्याचाही त्यांनी प्रयत्न करून पाहिला होता. अर्थात रस्त्यातील खड्डे, अंगातला चपळपणा आणि सायकलचा सुसाट वेग यातून किती अंडी पुण्यापर्यंत शाबूत आली आणि किती फुटली असतील, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक!
हे सर्व असं चाललेलं असताना गावाकडून त्यांचे मोठे बंधू अधूनमधून परत नेण्यासाठी येत असत. पण स्वतंत्र राहण्याचं वेड लागल्यामुळे मोठ्या भावाच्या कडक शिस्तीखाली ते टिकत नसत. संधी मिळताच पुण्याला पळून येत. अशातच त्यांचे प्रभात रोड, नारायण पेठ आणि डेक्कनची पुलाची वाडी या परिसरांत मित्र-हितचिंतक बनले. हॉटेलशिवाय इतर उद्योग म्हणजे भांडी घासण्याची पावडर विकून त्या बदल्यात रद्दी घेणं चालूच होतं. एके दिवशी सकाळी ते अशीच रद्दी घ्यायला गेले असताना एका गृहस्थांनी त्यांना सांगितलं की, ‘ही खूप चांगली पुस्तकं आहेत, रद्दीत फेकू नकोस, वीक, पैसे मिळतील.’ झालं, वडिलांना एक नवीन धंदा सापडला- जुनी पुस्तकं विकण्याचा. हळूहळू ते या धंद्यात इतके रमले की, ‘लकी हॉटेल’ची नोकरी सोडून पूर्णवेळ हेच करू लागले.
सुरुवातीला त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या गोविंद बल्लाळ देवलद्वाराजवळ आपलं बस्तान बसवलं. तिथं अनेक मान्यवर लेखक, पत्रकार, प्राध्यापक आणि डॉक्टर त्यांच्याकडून पुस्तकं विकत घेत. वडिलांनी अनेकांना खूप चांगली चांगली, दुर्मीळ अशी पुस्तकं दिली आणि लोकांनीही त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांच्यासाठी आपल्या बंगल्याची दारं कायम उघडी ठेवली होती. त्यामुळे जास्तीची पुस्तकं ठेवण्यासाठी त्यांना कधी फारशी अडचण पडायची नाही. कोणाच्या तरी बंगल्याच्या गॅरेजमध्ये किंवा जिन्याखाली ते पुस्तकं ठेवून येत असत.
माझ्या जन्माची कथादेखील अशीच मजेशीर आहे. डॉक्टरांनी आईचं सिझेरियन करायला लागेल असं सांगितलं. ते पावसाळ्याचे दिवस होते. सारखा पाऊस पडत होता. वडिलांकडे सिझेरियन साठीचे पैसे नव्हते. भर पावसात वडिलांनी सायकल काढून दोन लोकांच्या भेटी घेतल्या आणि मोठी रक्कम जमा केली. असा तो प्रेमाचा आणि आपुलकीचा काळ होता.
आणखी एक मजेशीर किस्सा आठवतो. २००५ किंवा २००७ आसपास वडील व्यवसायातून हळूहळू निवृत्त होऊ लागले होते. स्टॉलवर मला थांबवून कुठे कुठे जात असत. एकदा एक माणूस बिबवेवाडीवरून आला. आणि रागारागानं म्हणू लागला की, ‘कुठे आहे तो गनिभाई. त्याच्या मी कानाखाली मारणार आहे.’ हा आपल्या वडिलांबद्दल असं का म्हणतोय हे मला कळेना. काय झालं म्हणून विचारल्यावर तो म्हणाला की, गनिभाईनं एका बाईला छेडलं आहे. मी वडिलांना चांगलंच ओळखत असल्यानं त्याच्या या वाक्यावर जोरात हसू लागलो. मी त्या माणसाला काय घडलं ते सविस्तर विचारलं. गनिभाई कसे दिसतात, ते विचारलं. त्यावर त्यानं सांगितलं की, त्याचं एक रद्दीचं छोटं दुकान आहे. जीन्स पॅन्ट, काळी सनी गाडी, रे बॅनचा गॉगल घातलेले गनिभाई त्याच्याकडे पुस्तकं न्यायला येत असतात. त्यांनी त्याच्या दुकानावर रद्दीत पुस्तकं टाकायला आलेल्या मोलकरणीला पाठलाग करून अडवलं आणि तिची छेड काढली. मी लगेच ओळखलं की, हा जीन्स आणि सनी गाडीवाला माणूस म्हणजे वामनराव नाईक. ते एक नग व्यक्तिमत्त्व होतं. (ते २०१०च्या आसपास हृदयविकाराच्या झटक्यानं गेले.) अगदी बालिश माणूस होता. थोडं बोबडं बोलायचा. वडील जुन्या पुस्तकांची विक्री अनेक वर्षांपासून करत असल्यानं त्यांचं बऱ्यापैकी नाव झालेलं होतं. त्यांचं गुडविल वापरण्यासाठी वामन सरळ ठोकून द्यायचा की, मीच गनिभाई आहे. त्यानं त्या बाईचा पाठलाग करून पुस्तकांसाठी अडवलं असावं आणि परिस्थिती बिघडल्यावर गाडीवरून पळून गेला असावा. ती बाई तिच्या ओळखीच्या माणसांना घेऊन दुकानदाराकडे आली आणि ही सगळी वरात गनिभाईंचा पत्ता काढत आमच्यापर्यंत पोचली होती. मी मग त्यांना वडील खूप वयस्कर असून, भोळ्या वामनबद्दल नीट सांगितलं. मग तो माणूस ‘तुमच्या वडिलांच्या पाया पडून माफी मागतो, त्यांना बोलवा’ असं म्हणू लागला.
आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे बांधकाम व्यावसायिक डीएसके हे एकेकाळी वडिलांचे मित्र आणि काही व्यवहारापुरते पार्टनरदेखील होते. आता साल आठवत नाही, पण वडील आठवण सांगत. तेव्हा डीएसके एक धडपडे तरुण होते. वडील पुस्तक विक्रीसोबत रद्दी आणि स्क्रॅप घेण्याचंही कामही करत. त्यांच्या ओळखीचे एक सदगृहस्थ ‘कमिन्स’मध्ये अधिकारी होते. ते वडिलांना कर्नाटकचे असल्यामुळे जवळ करायचे. त्यांच्या ओळखीनं काही दिवस वडील आणि डीएसके कमिन्समधून पांढरा कागद घेऊन मार्केटमध्ये देत. नंतर कर्नाटकचा घरं बांधणारा एक वयस्कर कॉन्ट्रॅक्टर डीएसके यांना आपला व्यवसाय सांभाळायला देऊन कायमचा गावी गेला. पुढे त्यांनी त्याच व्यवसायात भरारी घेतली.
आणखी एका लबाड वकिलाचा किस्सा आठवतो. वडिलांकडे एक पुस्तकप्रेमी येत असत. त्यांनी अविवाहित राहून पुस्तकांचाच व्यासंग केला हेता. त्यांचंही नाव आता आठवत नाही. पण अंतिम समयी त्यांनी वडिलांना बोलावून घेऊन ‘माझी सगळी पुस्तकं तू घे आणि लोकांपर्यंत पोचव’ असं सांगितलं. पुस्तकं खूप होती. ती ठेवायला वडिलांकडे जागा नव्हती. तेव्हा त्या दोघांचे एक कॉमन मित्र हे वकील होते. ते म्हणाले, ‘माझ्या घरी ठेवा आणि थोडी थोडी करून विका.’ पुस्तकं खूपच सुंदर आणि दुर्मीळ होती. वडिलांनी दोन आठवडे त्यातली थोडी विकली. पण नंतर त्या वकीलसाहेबांच्या मनात पाप आलं. ते वडिलांना म्हणाले, ‘बसं झालं, तुझी पुस्तकं संपली. आता परत येऊ नको.’ या प्रकारामुळे वडील खूप अस्वस्थ, विचलित झाले होते, पण नाईलाज होता. काहीही करता येणं शक्य नव्हतं.
वडिलांना एकदा एक कर्नाटकचा तरुण लकडी पुलावर मासिकं विकताना दिसला. वडिलांनी ओळख करून घेतली, तर तोदेखील उडुपी हॉटेलमध्ये नोकरी करून उरलेल्या वेळेत हे काम करत होता. त्या तरुणाचं नाव – प्रभाकर. मग वडिलांनी त्याला सोबत घेऊन जुन्या पुस्तकांच्या धंद्याबाबत बरंच मार्गदर्शन केलं. आणि प्रभाकरनीही वडिलांवर भरभरून प्रेम केलं. दोघांच्या तासनतास गप्पा चालायच्या. वडिलांच्या अंतिम वेळीही प्रभाकर हॉस्पिटलमध्ये येऊन वडिलांना भेटून गेले. आमच्यातलं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नाही. रस्ता रुंदीकरणामुळे वडिलांची बालगंधर्वजवळील जागा गेली, तेव्हा डेक्कनच्या लकडी पुलावर प्रभाकरच्या शेजारी आम्ही आमचा स्टॉल लावू लागलो. एव्हाना वडील थकले होते. मी आणि मोठा भाऊ पुस्तक विक्री पाहू लागलो होतो. तो काळ कॉम्प्युटर नवीन नवीन येण्याचा होता. भाऊदेखील पुस्तकं विकता विकता कॉम्प्युटरविषयीची मासिकं आणि पुस्तकं मन लावून वाचत असे. पुढे त्याने त्यातच शिक्षण घेतलं. तो ग्राफिक डिझायनर बनला आणि आता चांगलाच स्थिरावलाय.
..................................................................................................................................................................
हॉटेलशिवाय इतर उद्योग म्हणजे भांडी घासण्याची पावडर विकून त्या बदल्यात रद्दी घेणं चालूच होतं. एके दिवशी सकाळी ते अशीच रद्दी घ्यायला गेले असताना एका गृहस्थांनी त्यांना सांगितलं की, ‘ही खूप चांगली पुस्तकं आहेत, रद्दीत फेकू नकोस, वीक पैसे मिळतील.’ झालं, वडिलांना एक नवीन धंदा सापडला- जुनी पुस्तकं वकण्याचा. हळूहळू ते या धंद्यात इतके रमले की, ‘लकी हॉटेल’ची नोकरी सोडून पूर्णवेळ हेच करू लागले.
.................................................................................................................................................................
व्हॉटसअॅप-फेसबुक नसण्याचा तो काळ. पुस्तक विक्री चांगली व्हायची. लोकांकडे मनोरंजनाची साधनं कमी होती. २००८नंतर हळूहळू वडिलांनी कामातून निवृत्ती घेतली. मी व्यवसाय बघू लागलो. कालांतरानं ऑनलाईन साधनं वापरून पुस्तक विक्री सुरू केली. वडिलांना इंटरनेट कळत नव्हतं, पण कुतूहल खूप होतं. ते मला प्रश्न विचारचे- कशी विक्री होते वगैरे. माझी कुठे वर्तमानपत्रात बातमी किंवा लेख आला की, त्यांना बरं वाटायचं. मी दुर्मीळ पुस्तकांचा लिलाव करतो, हे ऐकून त्यांना विस्मय आणि समाधान वाटायचं. एकेकाळी ‘पुणे डायजेस्ट’ हे इंग्रजी मासिक पुण्यातून प्रकाशित होत असे. ६८च्या आसपास या मासिकानं जुन्या, दुर्मीळ पुस्तकांचे विक्रेते म्हणून वडिलांवर एक छोटासा लेख छापला होता. ते मासिक बरेच दिवस आमच्या घरी होतं, पण नंतर कुठेतरी गहाळ झालं.
...तर असे हे माझे साधेसुधे वडील! वयाच्या सत्तरीपर्यंत त्यांनी पुस्तकविक्रीचं काम केलं. आयुष्यात ते पहिल्यांदाच आणि शेवटचं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले आणि वयाच्या ८५व्या वर्षी, १ ऑक्टोबर २०२१ रोजी हे जग सोडून गेले. आता ते मला विचारून धंद्याची आणि जगाची खबरबात घेणार नाहीत. त्यांच्या साध्या व्यवहारातही एक सौंदर्य होतं, नात्यांची प्रेमळ गुंफण होती. एकतर पुस्तकं वाचणारी मंडळी तशी बहुश्रुत, सभ्य आणि त्यांच्या क्षेत्रातील उत्तम व्यक्तिमत्त्वं असतात. त्यामुळे या वाचकांनी माझ्या वडिलांवर भरभरून प्रेम केलं. त्यांच्यासारखा उत्साह आणि टापटीपपणा माझ्याकडे अंमळ कमीच, तो आणण्याचा प्रयत्न करेन, हीच माझी या साध्या, पापभीरू आणि अजातशत्रू माणसाला श्रद्धांजली!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
लेखक समीर कलारकोप हे पुण्यातील जुन्या व दुर्मीळ पुस्तकांचे विक्रेते आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment