‘अमेरिका फर्स्ट’ची ‘ट्रम्पेट’ वाजवणारा अमेरिकन व्यंगचित्रकार!
पडघम - विदेशनामा
मूळ लेखिका – मॉली गॉट्स्चॉक, मराठी अनुवाद- सविता दामले
  • व्यंगचित्रकार व बालसाहित्यिक थिओडोर झ्युस
  • Thu , 23 February 2017
  • विदेशनामा International Politics थिओडोर झ्यूस रिचर्ड एच. मिनियर Theodor Seuss Richard H. Minear डोनाल्ड ट्रम्प Donald Trump हिलरी क्लिंटन Hillary Clinton रोनाल्ड रेगन Ronald Reagan

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ चा नारा देत निवडणूक लढवली, जिंकली. आता ते याच धोरणाला पुढे रेटत अमेरिकीतील उपऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे निर्बंध आणू पाहत आहेत. ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही अमेरिकेत राबवले गेले होते. तेव्हा त्याची व्यंगचित्रांच्या माध्यमातून थिओडोर झ्युस यांनी खिल्ली उडवली होती. त्याविषयी…

.............................................................................................................................................

डॉ. झ्यूस हे अमेरिकन अनुभवविश्वातील एक लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहेत. ‘कॅट इन द हॅट’ (१९५७) आणि ‘ग्रीन एग्ज अँड हॅम’ (१९६०) ही त्यांची लहान मुलांची पुस्तकं दीर्घ काळ सर्वाधिक खपाची म्हणून  गणली जातात. त्यांच्या अदभुतरम्य, चित्रविचित्र व्यक्तिरेखा आणि काव्यात्मक यमक यांनी बालसुलभ कल्पनाशक्तीला सदैव भुरळ घातली आहे. मात्र लेखक म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी डॉक्टर झ्यूस राजकीय विडंबन चित्रकार होते. दुसरं महायुद्ध होण्यामागे ज्या ‘स्वतःपुरते पाहणा-या’ प्रवृत्ती कारणीभूत ठरल्या, त्यावर भाष्य करणारी चित्रं त्यांनी तेव्हा काढली होती. त्या चित्रांतून आजचा काळही ध्वनित होतो.

दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर लगेचच्या काळात डॉ. झ्यूसनी (त्यांचं खरं नाव थिओडोर झ्यूस गायसेल, २ मार्च १९०४ – २४ सप्टेंबर १९९१) न्यूयॉर्कमधील’ ‘पी एम’ नामक एका छोट्या वृत्तपत्रासाठी ४०० हून अधिक राजकीय विडंबनचित्रं काढली. उदारमतवादाकडे झुकलेल्या या वृत्तपत्राचा वाचकवर्ग तुलनेनं कमी होता (कारण एका प्रतीला ५ सेंट ही किंमत तत्कालीन अन्य वृत्तपत्रांच्या किमतींच्या मानानं खूपच अधिक होती.) शिवाय एरवी डॉ. झ्यूस आपली राजकीय मतं छुपी ठेवत. त्यामुळे हे त्यांचं कार्य फार लोकांपर्यंत पोचलं नाही.

ते इतकं की खुद्द त्यांची पत्नी ऑड्री गायसेल हिलाही आपल्या मृत पतीने राजकीय विडंबनचित्रं काढली आहेत, हे इतिहासकार रिचर्ड एच. मिनियर यांनी १९९९ साली त्या विषयावर पुस्तक काढलं तोपर्यंत ठाऊक नव्हतं. मिनियर यांच्या पुस्तकाचं नाव होतं, ‘डॉ. झ्यूस गोज टू वॉर’. त्या पुस्तकात डॉ. झ्यूसनी काढलेल्या २०० विडंबनचित्रांचा समावेश होता. त्यावर बोलताना मिनियर म्हणाले की, त्यांनी त्या पुस्तकावर एकदा भाषण केलं तेव्हा ते भाषण झाल्यावर  श्रीमती गायसेल त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी त्या विडंबनचित्रांविषयी आश्चर्य व्यक्त केलं.

त्या विडंबनचित्रांपैकी काही चित्रं मागच्या काही आठवड्यात पुन्हा दिसू लागली आहेत. त्यांचा भर १९४० सालच्या ‘ अमेरिका फर्स्ट’ या ‘फक्त स्वतःपुरते पाहण्याच्या’ प्रवृत्तीवर आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ ही उद्घोषणा हल्लीच ट्रम्प प्रशासनानं आपलं लोकानुनयी परराष्ट्रधोरण राबवण्याच्या हेतूनं प्रचारात आणली. ‘केवळ अमेरिकन लोकांचेच हितसंबंध जपले जातील’ हे या परराष्ट्रधोरणामागचं गमक आहे.

त्यातील एक चित्र ‘अमेरिका फर्स्ट’ मोहीमेची नाझी पक्षाशी तुलना करणारं आहे. त्यात दाखवलं आहे की, ‘ग्रेट अमेरिकन स्लाईड शो’ कार्यक्रमात एक मृदू स्मित करणारा, ब्लेझर कोटधारी अमेरिकन माणूस आहे. त्याच्या कोटावर ‘अमेरिका फर्स्ट’ असा छाप आहे. त्याच्या बाजूला उभ्या, एका उग्र चेहऱ्याच्या माणसाच्या स्वेटरवर ‘स्वस्तिक’ चिन्ह आहे. सयामी जुळ्यांसारखे हे दोघं एकमेकांना जोडले गेलेले त्या चित्रात दाखवले आहेत.

१९४१ साली काढलेल्या आणखी एका चित्रात एक मजेशीर कांगारू दाखवला आहे. त्याच्या अंगावर ‘अमेरिका फर्स्ट’ अशी अक्षरं लिहिली आहेत. त्याच्या पोटातून आणखी एक कांगारू बाहेर आला आहे. त्यावर लिहिले आहे,’ नाझी’. त्या कांगारूच्या पोटात आणखी एक छोटा कांगारू आहे. त्यावर लिहिलं आहे, ‘फॅसिस्ट’. या चित्राच्या मथळ्यात लिहिलंय - “नातेवाईक? नाही... तीन मित्र फिरायला चालले आहेत.’’

मिनियर हे दुसऱ्या महायुद्धकाळातील जपानवरचे महत्त्वाचे इतिहासकार आहेत. मॅसेच्युसेट्स अमहेर्स्ट विद्यापीठात शिकवताना आपल्या विद्यार्थ्यांना डॉ. झ्यूस यांचं राजकीय कार्य ओळखता येतं का, हे पाहण्यासाठी ते कोडी घालायचे. तेव्हा ते ‘अमेरिका फर्स्ट’ हे विडंबनचित्र वापरत असत. नाझी जर्मनीतून पळून येणाऱ्या ज्यूंना आपल्या देशाची दारं बंद करण्याच्या धोरणावर टीका करणाऱ्या त्या विडंबनचित्रात दाखवलंय की, एक स्त्री आपल्या नातवंडांना गोष्ट सांगते आहे आणि तिच्या अंगावरच्या स्वेटरवर ती उद्घोषणा छापली आहे. ती आठवण सांगताना मिनियर म्हणाले की, “मी त्या चित्राखालची स्वाक्षरी झाकायचो आणि मुलांना म्हणायचो की, तुम्हा सर्वांना हा चित्रकार माहिती आहे. कोण आहे बरं तो?’’ मुलांना ओळखायला थोडा वेळ लागायचा, परंतु सरतेशेवटी कुणी ना कुणी त्या विडंबनचित्राच्या कोपऱ्यातली ‘झ्युसियन’ मांजर शोधून काढायचाच.

डॉ. झ्यूस अनेक राजकीय मुद्द्यांबाबत मतं व्यक्त करत असले तरी अमेरिका-जपान संबंध आणि जपान-वंशी अमेरिकन हा विषय आला की, ते अन्य लोकांसारखेच आंधळे व्हायचे. पर्ल हार्बरची घटना घडल्यावर सर्व जपान-वंशी अमेरिकन नागरिकांना राजकीय बंदी म्हणून छावण्यांत बंद करून ठेवायचे अशी चाल अध्यक्ष रूझवेल्टनी खेळली. त्यापूर्वी एक आठवडा अगोदर डॉ. झ्यूसनी एक झोंबरं विडंबनचित्र काढलं होतं. त्या चित्रात दाखवलं होतं की, जपान-वंशी अमेरिकनांचे तांडेच्या तांडे स्फोटकांचे पेटारे घेण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र नंतरच्या काळात त्यांना आपण तशी चित्रं काढल्याचा पश्चात्ताप झाला.

‘पी एम’ या वृत्तपत्रासाठी विडंबनचित्रं काढणं १९४३ साली बंद करून डॉ. झ्यूस  कॅप्टन म्हणून लष्करात भरती झाले. तिथं त्यांनी फ्रॅंक काप्राचा सहाय्यक म्हणून युद्धप्रचारक लघुपट बनवले. युद्ध संपल्यावर ते परतले आणि त्यांनी मुलांच्या गोष्टी लिहायला सुरूवात केली. १९५४ साली प्रसिद्ध झालेलं ‘हॉर्टन हिअर्स अ हू’ हे त्यांचं अभिजात पुस्तक म्हणजे अमेरिकेने जपानमध्ये जी घुसखोरी केली, त्या विषयी मागितलेली क्षमा आहे. तसंच वर वर पाहता नैतिक अर्थ सांगणारं, पण आतून राजकीय संदेश देणारं असंही ते पुस्तक आहे असं बरेच लोक मानतात. त्या कथेत एक उदारहृदयी हत्ती तरुणांना शिकवण देतो की, ‘व्यक्ती ही शेवटी एक व्यक्ती असते, मग ती कितीही लहान असो.’

बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे की, ‘हार्टन हिअर्स अ हू’ हे डॉ. झ्यूस यांचं सामाजिक–राजकीय संदेश देणारं एकमेव पुस्तक नाही. मिनियर म्हणतात की, त्यांची लहान मुलांच्या समजशक्तीवर खूप श्रद्धा होती.

या भिंगातून तुम्ही त्यांची पुस्तकं आज वाचलीत तर तुम्हाला दिसेल की, चटकन प्रभावित होणाऱ्या कोवळ्या मनांना सूक्ष्म आवाहन करून त्यांच्यात सहिष्णुता, प्रतिकार आणि जागृती बिंबवण्याचा प्रयत्न त्यात केला गेला आहे.

डॉ. झ्यूस यांनी काही संदेश तर अगदी उघड उघड दिले. ‘कॅट इन द हॅट’ या पुस्तकात तर ते ‘हुकुमशाहीविरुद्ध बंड पुकारायला सांगतात. असं असलं तरी बऱ्याच कथांतील अंतर्प्रवाहाबाबत वादही झडले, तर काही संपादन करताना दबले गेले.

“डॉ. झ्यूसनी ‘यर्टल द टर्टल’ हे विडंबनचित्र पहिल्यांदा काढलं, तेव्हा त्या कासवाच्या मिशा हिटलरसारख्या होत्या.’’ मिनियर सांगतात. परंतु छापताना त्या मिशांना चाट मारली गेली. त्यानंतर १९५८ साली त्यावर लिहिलेल्या गोष्टींच्या पुस्तकातली कथावस्तू एका सत्तापिपासू कासवाभोवती फिरताना दाखवली आहे. त्यात त्यांनी फॅसिझमचे दुष्परिणाम अगदी मूलभूत गाळीव रूपात दाखवले आहेत.

त्याचप्रमाणे १९५३ सालच्या ‘द स्नीचेस अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकात काही ‘पिवळे’ प्राणी दाखवले होते. त्यातील काहींच्या पोटावर चांदणीची खूण होती, तर काहींच्या नव्हती. वांशिक पूर्वग्रहांपासून दूर राहण्याचा संदेश त्यातून दिला होता. ज्यूंच्या हॉलोकॉस्टच्या (वंशसंहाराच्या) वेळेस त्यांना पिवळे बिल्ले लावण्याची सक्ती झाली होती, हे लक्षात येण्यासाठी फार कल्पनाशक्ती ताणण्याची गरज नाही. “त्या पोटावरच्या चांदण्या म्हणजे स्टार ऑफ डेव्हिडची खूण नसली तरी तोच मुद्दा त्या गोष्टीच्या पाठीमागे होता,’’ मिनियर म्हणतात.

त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून राजकीय अर्थ निघतोच असं नाही, परंतु त्यांनी १९५६ साली लिहिलेल्या ‘इच डिसेंबर’ आणि ‘हाऊ द ग्रिंच स्टोल ख्रिसमस’ अशा चिरतरुण पुस्तकांतून नव्या पिढीला चंगळवादाच्या सापळ्याबद्दलचा संदेश दिलेला आढळून येतो. १९७१ सालच्या ‘द लोराक्स’ या पुस्तकात त्यांनी पर्यावरणवादाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. १९८४ सालच्या ‘द बटर बॅटल बुक’ या पुस्तकात यूक्स आणि झुक्स यांची कहाणी आहे. पावाच्या कुठल्या बाजूला लोणी लावायचं यावरून त्यांच्यात अखंड वाद झडतात. त्यातूनच त्यांच्यात शस्त्रस्पर्धा सुरू होते. शीतयुद्धाचा उपहास करणाऱ्या या कथेत असहिष्णुतेचे दुष्परिणाम उघड केले आहेत.

या कहाण्यांपैकी काही कहाण्या ७० वर्षांपेक्षाही अधिक जुन्या आहेत, काही बाबतीत त्या कालसुसंगत नसल्या तरीही रात्री झोपतानाच्या गोष्टी आणि प्राथमिक शाळातील शिकवण यासाठीचा खुराक म्हणून अजूनही त्यांची पारायणं होत असतात. त्यांनी शिकवलेले धडे डोळे उत्सुकतेने उघडे ठेवून ऐकणाऱ्या मुलांना आणि त्यांना गोष्टी सांगणाऱ्या प्रौढांना सारखेच मार्गदर्शन करत आहेत हे मात्र निःसंशय.

‘अमेरिका फर्स्ट’ हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. अशा वेळी सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवायचं असेल तर त्यासाठी ‘कलात्मक अभिव्यक्ती’ची ताकद किती असतं, याचं स्मरण याच कहाण्या आपल्याला करून देतात.

.............................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

                       

.............................................................................................................................................

सविता दामले प्रसिद्ध अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......